15 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ४ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ४ थे *

भक्त - भगवंत हे प्रेमनाते बोला-बुद्धीच्या पलीकडचे, अत्यंत विलक्षण असे असते. सर्वच नात्यांमध्ये प्रेम अनुस्यूत असतेच, पण या सगळ्या नात्यांमध्ये भक्त-भगवंत आणि गुरु-शिष्य ही दोन नाती फार वेगळेपण मिरवणारी व अपूर्व प्रेम व्यक्त करणारी अशी असतात. श्रीज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात भगवान श्रीमाउलींनी भगवंतांच्याच मुखाने हा समग्र भक्तियोग अप्रतिम शब्दांत वर्णन करून सांगितलेला आहे. त्यात एकेठिकाणी ते म्हणतात,
ऐसे अनन्ययोगें ।
विकले जिवें मनें आंगें ।
तयांचें कायि एक सांगें ।
जें मी न करीं ॥ज्ञाने.१२.६.८२॥
अरे अर्जुना, कायिक, वाचिक व मानसिक भावांनी अखंड माझे (भगवंतांचे) अनुसंधान करणा-या, मलाच जीव, मन, शरीर व प्राणांनी पूर्ण विकल्या गेलेल्या माझ्या अनन्य भक्तांची अशी कोणती गोष्ट आहे की जी मी कधी करत नाही?
भगवंतच भक्तांच्या सर्व गोष्टी न सांगता सांभाळत असतात, त्यांची पडेल ती सेवा ते अत्यंत आनंदाने करीत असतात. म्हणून तेच खरे ' भक्तश्रेष्ठ ' म्हटले जातात. आजवरच्या असंख्य संतांच्या चरित्रातले अनंत प्रसंग याला साक्ष आहेत. याविषयी साक्षात् श्रीभगवंतांचेच हृदगत सांगताना श्रीमाउली म्हणतात,
तैसे ते माझे ।
कलत्र हें जाणिजे ।
कायिसेनिही न लाजें ।
तयांचेनि मी ॥ज्ञाने.९.७.८६॥
भगवंत आपल्या भक्तांना लाडक्या पत्नीप्रमाणे जपत असतात, भक्तांच्या, भक्तांसाठी कोणत्याही गोष्टी करताना त्यांना अजिबात लाज वाटत नाही. आपल्या अनन्य भक्तांसाठी अगदी हीन गोष्टी देखील देव प्रेमानेच करतात.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांसाठी झालेला अगदीच आगळा-वेगळा, अभूतपूर्व श्रीनृसिंहावतार हा श्रीभगवंतांच्या याच भक्तवात्सल्य-ब्रीदाचा मनोहर आविष्कार नव्हे काय? दैत्यराज हिरण्यकश्यपूचा तो कसला विचित्र वर, त्यावर पूर्ण विचारांती झालेला, अर्धा मानव व अर्धा सिंहरूप अवतार, खांबामधून प्रकटणे, नखांचे अभिनव अस्त्र, तिन्हीसांजेची वेळ, उंब-यासारखे मजेशीर ठिकाण ; काय एकेक विलक्षण गोष्टी सांभाळून व दैत्याच्या वरामध्ये काहीही न्यून न येऊ देता केलेली अवतार लीला, सारेच न्यारे, अद्भुत आहे. पण भक्त प्रल्हादांसाठी असल्या विचित्र रूपाने प्रकट होऊन देवांनी आपले ब्रीद राखलेच शेवटी. माउलींची वरील ओवी जणू भगवंतांनी नृसिंह रूप घेऊन खरी करून दाखवलेली आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.
भगवान श्रीमाउलींनी श्रीज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाच्या शेवटी एका ओवीत, अर्जुनावरील कृष्णकृपेचे महत्त्व सांगताना भगवान श्रीनृसिंहांचा मार्मिक उल्लेख केलाय. ते म्हणतात,
जो प्रल्हादाचिया बोला ।
विषाही सकट आपणचि जाहाला ।
तो सद्गुरु असे जोडला ।
किरीटीसी ॥ज्ञाने.१०.४२.३३४॥
अर्जुनाच्या सर्व इच्छा तत्काळ पूर्ण होत आहेत कारण त्याला भगवान श्रीकृष्णांसारखे सद्गुरु लाभलेले आहेत. हे भगवंत प्रल्हादाच्या सतत चालणा-या सप्रेम नामस्मरणासाठी स्वत:च विषरूपही झाले तसेच त्याला त्यांनी सर्व संकटांमधून सुखरूप बाहेर काढले. इथे उपमेच्या माध्यमातून श्रीमाउली भगवंतांचे भक्तांवरील परमप्रेमच सांगत आहेत. बाल प्रल्हादावर हिरण्यकश्यपूने अनंत अत्याचार केले; पण प्रत्येकवेळी तो वाचला. कारण हे भगवंतच त्या त्या भयानक रूपात स्वत:च जाऊन प्रल्हादाचे रक्षण करीत होते. हिरण्यकश्यपूने विष पाजले तर ते विषच भगवंत बनून राहिले. त्यामुळे ते प्यायल्याने मरायच्या ऐवजी प्रल्हादजी अजरामर झाले; इतके की आज अनेक युगे लोटली तरी प्रल्हाद-श्रीनृसिंहांच्या भक्तिकथा आम्हांला हव्याहव्याशा वाटतात. त्या ऐकल्याने आमचे भक्त-हृदय आजही भगवंतांवरच्या प्रेमाने उचंबळून येते. आमचे बालमन व बालपण आजी-आजोबांच्या तोंडून रसभरित प्रल्हादचरित्र ऐकून आजही निश्चिंततेचा अनुकार देते. भक्तवर प्रल्हादांचे हे सर्वजनप्रियत्व हेच त्यांच्या अनन्य हरि-निष्ठेचे व एकूणच भगवद् भक्तीचे अलौकिकत्व भरभरून सांगत नाही का?
भगवंतांच्या या भक्तवात्सल्याचे नेमके वर्णन करताना श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात,
प्रल्हादाकारणे नरसिंह झालासी ।
त्याचिया बोलासी सत्य केले ॥१॥
राम कृष्ण गोविंद नारायण हरी ।
गर्जे राजद्वारी भक्तराज ॥२॥
विठ्ठल माधव मुकुंद केशव ।
तेणे दैत्यराव दचकला ॥३॥
तुका म्हणे त्याकारणे सगुण ।
भक्ताचे वचन सत्य केले ॥४॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

0 comments:

Post a Comment