31 May 2016

*** सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ***



आज वैशाख कृष्ण दशमी, श्रीज्ञानेश्वरभगिनी  ब्रह्मचित्कला सद्गुरु श्रीसंत मुक्ताबाई महाराजांचा ब्रह्मलीन दिन !
श्रीमुक्ताबाई या फार थोर विभूतिमत्व होत्या. अश्विन शुद्ध प्रतिपदेला, घटस्थापनेला पृथ्वीतलावर आविर्भूत झालेली ही साक्षात् आदिशक्ती जगदंबाच होती. त्यांचे वर्णन करताना सर्वच संत गहिवरून जातात, ते उगीच नाही.
श्रीसंत मुक्ताईंच्या अलौकिक स्वरूपात; मातेचे वात्सल्य, कारुण्याचा परमोत्कर्ष, भगिनीचा अवखळपणा, श्रीगुरुकृपेचे शांभव समाधी-वैभव, अखंड स्वरूपस्थितीचा अपूर्व आविष्कार, स्वानुभूत ज्ञानाचा निरंतर वाहणारा झरा व त्यामुळे प्राप्त झालेला परमार्थप्रांतातला लोकविलक्षण अद्वितीय अधिकार, अखंड आत्मतदाकारतेमुळे आलेली जगाविषयीची एक मस्तवाल बेफिकिरी, अवधूती मस्ती यासारख्या अनेक गोष्टी एकाच वेळी प्रकटलेल्या पाहायला मिळतात. म्हणूनच सगळे संत त्यांना " आदिशक्ती मुक्ताबाई " असे अतीव गौरवाने म्हणतात.
भक्तश्रेष्ठ नामदेवांसारख्या महात्म्याला, भक्तीत न्यून ठरणारा अल्पसा अहंकारही स्पष्टपणे दाखवून देण्याची हिंमत बाळगणारी लहानगी मुक्ताई त्यांना " सणकांडी " भासली तर नवल नाही. सणकांडी म्हणजे तडतडणारी प्रकाशमय फुलबाजी. चौदाशेवर्षे योगसाधनेने जिवंत राहिलेल्या श्रीचांगदेवांना, सिद्धींच्या नादात आयुष्य व्यर्थ गेले असे ठणकावून सांगून श्रीगुरुकृपेचे खरे माहात्म्य पटवून देणारी आणि वर ती अद्वयानंद वैभव असणारी श्रीगुरुकृपा प्रदान करून परिपूर्ण करणारी ही ब्रह्मचित्कला खरोखरीच अवर्णनीय आहे. प्रत्यक्ष आपल्या सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउलींनाही, आपल्या जन्म-कर्माचे भान सुटू नये म्हणून विनम्रपणे ताटीचे अभंग रचून बोध करणा-या या श्रीमुक्ताईंचे अवघे विश्वच सामान्य बुद्धीला अनाकलनीय आहे, शब्दांच्या पलीकडचे, त्यांच्या कवेत न मावणारे आहे. त्या साक्षात् आदिशक्तीच आहेत, हेच त्यांच्याकडे पाहून वारंवार मनापासून पटते.
भगवान श्रीमाउलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर महिन्याभराने सासवडला श्रीसोपानदेवांनी समाधी घेतली. त्यानंतर पुणतांब्याला श्रीमुक्ताईंचे स्वनामधन्य शिष्य श्रीचांगदेवांनीही समाधी घेतली. त्यासुमारास श्रीमुक्ताईंना स्वरूपाची फार ओढ लागली असल्याचे सर्व संतांना जाणवू लागले. म्हणून श्रीनिवृत्तिनाथांनी मुक्ताईला, कोणत्या दिवशी तू गमन करणार ? असे विचारले. त्यावर मुक्ताईंनी दिलेले उत्तर त्यांचा पारमार्थिक अधिकार स्पष्टपणे सांगणारे आहे. त्या म्हणतात,
आमुच्या स्वस्थानीं नाहीं पा अंधार ।
अवघे चराचर प्रकाशत्वें ॥१॥
उदय आणि अस्तु नाही स्वरूपासी ।
ऐसे मुनिऋषी जाणताती ॥२॥
आम्ही कधीं आलो स्वरूप सोडोन ।
जावे पालटोन जेथील तेथे ॥३॥
अंतर बाहेर स्वामींचें स्वरूप ।
स्वयें नंदादीप उजळिला ॥४॥
" श्रीसद्गुरुराया, आमच्या नित्यवसतीच्या स्थानी कसलाच अंधार नाही, तेथील सगळे विश्वच प्रकाशरूप आहे. आमच्या निरंतर अनुभूतीला येणा-या आत्मसूर्याला उदय अस्त नाहीत, तो अखंड उदितच आहे. आम्ही कधी आमचे स्वरूप सोडून आलो म्हणून आम्हांला तेथे पुन्हा जायची गरज? आमच्या श्रीगुरुस्वामींचेच अपरंपार व आनंदमय स्वरूप, त्यांच्याच कृपेने प्रकटलेल्या शांत-स्निग्ध बोधदीपाच्या तेजात आमच्या नित्य अनुभूतीत प्रतीत होत असल्याने, सर्वत्र तोच ब्रह्मानंदोत्सवच आम्ही अविरत साजरा करीत आहोत. तेव्हा जाणेयेणे हा आमच्यासाठी केवळ एक भ्रमच आहे. " काय ही अनुभूतीची सखोलता !! श्रीगुरुकृपेने आकळलेला शांभव बोध सर्वांगी धारण करून त्या बोधाचा परिपाक असणारी ही निरालंब स्वानंदस्थितीच जणू श्रीमुक्ताई हे नामरूप धारण करून प्रकटलेली होती. खरोखरीच धन्य त्या श्रीमुक्ताई !!
श्रीसंत मुक्ताबाईंची अभंगसंपदा अल्प असली तरी त्यांच्याच स्वरूपासारखी अत्यंत गूढ-गहन आहे. सर्वसामान्यांच्या आकलनकक्षेच्या कैक योजने दूर असणारे हे शब्दधन केवळ श्रीगुरुकृपेच्याच बळावर आपल्या बुद्धीत प्रकाशते, म्हणून त्याचे मोल अनन्यसाधारण आहे. श्रीसंत मुक्ताबाईंच्या " मुंगी उडाली आकाशी । " या अत्यंत गहन अभंगावर श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराजांच्या अधिकारी शिष्या प. पू. सौ. शकुंतलाताई  आगटे यांनी फार सुरेख प्रवचनसेवा केलेली आहे. श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे लहानसेच पण विलक्षण पुस्तक, श्रीसंत मुक्ताबाईंचा सर्वार्थाने थोर अधिकार व त्यांच्या " सांगण्याची " खोली आपल्याला जाणवून देण्यात समर्थ आहे. हा अभंग वाचून एखाद्याला त्याचा सरळ अर्थही सांगणे शक्य नाही. पू. सौ. ताईंनी तर त्याचा अद्भुत योगार्थही अप्रतिमरित्या समजावून सांगितला आहे. भगवती कुंडलिनी शक्तीच्या कार्याचे मार्मिक वर्णन करणा-या श्रीमुक्ताबाईंच्या या कूट अभंगाचे हे विवरण नक्कीच वाचनीय, नित्य चिंतनीय आहे. ( मुंगी उडाली आकाशी : श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. सवलत मूल्य: ₹ २० /-)
तापी तीरावरील पुरातन तपोभूमी असलेल्या मेहूण गावी आजच्या तिथीला श्रीमुक्ताई ब्रह्मलीन झाल्या. ही आदिमाया जशी प्रकटली तशीच नकळत स्वरूपी मिसळली देखील ! मनोहर नभात अंकुरलेल्या विराटाच्या गाभ्यात वीज कडाडली, तशी ही भूलोकीची तेजस्वी ज्ञान-शलाका आपल्या मूळ स्वरूपात सर्वांच्या देखत पण कोणाच्याही नकळत विरून गेली. मागे उरले ते त्यांचे " मुक्ताबाई " हे पावन नाम, त्यांच्या परमपावन लीला-कथा. त्या पापहारक नाम, रूप व कथांच्या सप्रेम स्मरणाने आजच्या पुण्यदिनी आपणही पावन होऊया  !!
श्रीसंत एकनाथ महाराज श्रीमुक्ताबाईंचा यथोचित गौरव करताना अतीव प्रेमभराने म्हणतात,
मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ ।
सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥
मुक्ताबाई चतुर्विधा ।
जो जप करील सदा ।
तो जाईल मोक्षपदा ।
सायुज्यसंपदा पावेल ॥
जय मुक्ताई माउली !!
( मुंगी उडाली आकाशी : श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 सवलत मूल्य: ₹ २० /-)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

28 comments:

  1. 🙏🙏🙏🌺🌺🌺Shree Adishakti la Trivar Dandavat.. Sashtaang Namaskar 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. श्री मुक्ताबाई महाराजांच्या सुकोमल चरणी साष्टांग दंडवत!
    लेख खूप अप्रतिम झालाय!!

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर अध्यात्मिक विवरण. छानच

    ReplyDelete
  4. खूपच छान. श्री आदिशक्ती मुक्ताआईंच्या चरणी साष्टांग नमस्कार.

    ReplyDelete
  5. श्री आदिशक्ती मुक्ताई यांचे श्रीचरणी अनेक साष्टांग दंडवत....🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹

    ReplyDelete
  6. सुंदर मांडणी,माहिती. छानच. ��

    ReplyDelete
  7. अप्रतिम. पण ताटीचे अभंग हे प्रक्षेपित आहेत, समकालीन वाङ्ममयाशी साधर्म्य नाही वाटत, तसेच "उपजताची ज्ञानी" अशा ज्ञानेश्वर माऊलींना क्षणिक ही अज्ञान झाले हे पटत नाही.

    ReplyDelete
  8. आदिशक्ती मुक्ताईंना शत शत प्रणाम.अप्रतीम लेख.धन्यवाद.

    ReplyDelete
  9. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आशा आत्मोन्नतीच्या चढत्या क्रमाने शेवटी मुक्ती,सर्वोच्च अवस्था, अशा मुक्ताईना शतशः दंडवत

    ReplyDelete
  10. वाचेला मौन पडलं.

    ReplyDelete
  11. आदिशक्ती मुक्ताईमहाराजाना साष्टांग नमस्कार

    ReplyDelete
  12. खूपच सुंदर व आम्हाला अपरीचीत असलेली माहिती मिळाली

    ReplyDelete
  13. Khupach sunder

    ReplyDelete
  14. राम क्रुष्ण हरी!

    ReplyDelete
  15. 🙏🙏
    संजय देशपांडे

    ReplyDelete
  16. आदिशक्ति मुक्ताई महाराजांना कोटि कोटि प्रणाम।।
    सौ.यशश्री विश्वास तावसे
    .

    ReplyDelete
  17. मुक्ताई म्हटलं की परकर पोलक्यातली लहानगी 7-8 वर्षाची मुलगी डोळ्यांसमोर येते, माऊलींच्या पाठीवर भाकरी भाजणारी मुक्ताई, आणि चांगदेव, नामदेव अशा दिग्गज संतांचा अहंकार निरसन करणारी मुक्ताई, अशी विविध रूपे नजरेसमोर येतात, या आदिशक्तीस शतशः दंडवत🙏🙏🙏

    ReplyDelete
  18. खूप छान माहिती पूर्ण लेख. धन्यवाद सर

    ReplyDelete
  19. खूप आभार .

    ReplyDelete
  20. धन्य धन्य ती मुक्ताई!सकल जनाची माऊली!🙏🙏🙏🌹

    ReplyDelete
  21. श्री ज्ञानेश भगवान विष्णू. निवृत्ती भगवान हर.
    सोपान भगवान ब्रह्मा ,मुक्ताक्का ब्रह्मचित्कला

    ReplyDelete
  22. मुक्ताई आदिशक्तीस साष्टांग नमन

    ReplyDelete
  23. अप्रतिम विवेचन..चित्कला मुक्ताबाई स सादर दंडवत..🙏💜🙏

    ReplyDelete
  24. आदिशक्ती ब्रह्मचित्कला मुक्ताईच्या चरणी साष्टांग दंडवत 🙇

    ReplyDelete