19 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ८ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ८ वे *

** श्रीदत्तसंप्रदाय व भगवान श्रीनृसिंह : ऋणानुबंध **

भगवान श्रीनृसिंह ही देवता पुराण कालापासूनच खूप प्रसिद्ध आहे. श्रीनृसिंहांची अनेक स्थानेही जुन्या काळापासून भरभराटीला आलेली आहेत. नृसिंह उपासना देखील समाजाच्या सर्व थरांमध्ये पोचलेली पाहायला मिळते.
भगवान श्रीनृसिंह हा अवतार श्रीदत्तसंप्रदायामध्येही खूप मानला व उपासला गेलेला दिसून येतो. श्रीदत्त संप्रदाय व श्रीनृसिंह भगवंतांचा अन्योन्य-संबंध असून तो फारसा आजवर लोकांसमोर आलेला नाही. म्हणून तो महत्त्वाचा विविधांगी संबंध आजच्या आपल्या लेखामधून आपण त्यांच्याच कृपेने अभ्यासणार आहोत.
श्रीनृसिंह अवतार शनिवारी झाला म्हणून श्रीनृसिंह उपासनेत शनिवार हा मुख्य वार मानतात. कलियुगातील प्रथम दत्तावतार भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज व द्वितीय दत्तावतार भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मवार शनिवारच आहे. त्यामुळेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडीची वारी ही शनिवारचीच मानतात. तसा उल्लेख श्रीगुरुभक्त यांनी " सावळा सद्गुरु तारू मोठा रे..। " या वाडी नित्यक्रमाच्या पदात केलेला आहे की, " द्वादशी शनिवार करिता वारी पाडवा । " पूर्वी दत्त संप्रदायातही गुरुवारपेक्षा शनिवारलाच अधिक महत्त्व होते, हे यावरून कळते. नंतरच्या काळात ते महत्त्व गुरुवारला प्राप्त झाले असावे.
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंची व भगवान श्रीनृसिंहांची जन्मवेळ ही देखील एकच, सूर्यास्ताचीच आहे. तसेच दोघांचाही जन्म शुक्लपक्षातील चतुर्दशीलाच झालेला आहे.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादजींना भगवान श्रीदत्तप्रभूंनी अवधूतवेषात आत्मस्वरूपाचा उपदेश केल्याचा उल्लेख श्रीमद् भागवत महापुराणाच्या सातव्या स्कंधात येतो.
श्रीपादश्रीवल्लभ चरितामृत या ग्रंथातही अनेकवेळा भगवान श्रीनृसिंहांचा तसेच औदुंबर वृक्षाचा उल्लेख येतो. त्यात एकेठिकाणी आजवर इतरत्र कोठेच न आलेला एक वेगळाच संदर्भ सांगितलेला आहे. श्रीनृसिंह भगवंत औदुंबराच्याच लाकडापासून बनवलेल्या खांबातून प्रकटले व त्यानंतर त्या खांबाला पालवी फुटली. तोच औदुंबर वृक्ष होय. त्याची प्रल्हादजी नियमाने पूजा करीत असत. पुढे त्यांना औदुंबरवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या श्रीदत्तप्रभूंनी आत्मबोध केला होता. त्याच वेळी त्या औदुंबरवृक्षाने मनुष्यरूपाने प्रकट होऊन भगवान श्रीदत्तप्रभूंना आशीर्वाद मागितल्यावर त्यांनी, तुझ्याठायी मी सूक्ष्मरूपाने अखंड वास करीन व कलियुगातील अवतारात तुझ्यातून प्रकटलेल्या भगवान नृसिंहांचेच नाव मी धारण करीन, असा आशीर्वाद दिला. श्रीनृसिंह दैवताचे प्रेम म्हणूनच कलियुगातील या द्वितीय अवतारामध्ये भगवान श्रीदत्तप्रभूंनी स्वत:ला " नरहरि " किंवा " नृसिंह सरस्वती " असेच नाम धारण केलेले दिसून येते.
श्रीनृसिंह अवतार धारण करून भगवंतांनी, " देव आहे व तो सर्वत्र व्यापून राहिलेला आहे !" हेच दाखवून दिलेले आहे. शिवाय देवत्वाचा विरोध करणा-याचा समूळ नायनाट केलेला आहे. हेच कार्य श्रीदत्तप्रभू व त्यांच्या सर्व अवतारांनी केलेले आहे. त्यांनी अप्रकट असलेले देवत्वच लोकांना दाखवून दिले. शिवाय नास्तिकांची ती नास्तिकबुद्धी आपल्या कृपेने नष्ट करून लोकांची धार्मिक श्रद्धा बळकट केलेली आहे. एकप्रकारेे नृसिंहरूपाच्याच कार्याचा हा पुढील भाग म्हणता येईल. भगवान नृसिंहांनी दुष्टांचाच नाश केला तर भगवान माउली म्हणतात तसा, या अवतारांनी केवळ दुष्टबुद्धीचा नाश करून समाजात अास्तिकता वाढविली.
श्रीदत्त संप्रदायातील वेदतुल्य मानलेल्या श्रीगुरुचरित्रातील तीन हकिकतींमध्ये श्रीनृसिंहांचा उल्लेख येतो. श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी तटाकयात्रा करीत असताना, मंजरिका क्षेत्री राहणा-या श्रीमाधवारण्य नामक संन्यासी भक्तावर कृपा केल्याचा उल्लेख तेराव्या अध्यायात येतो. हे माधवारण्य श्रीनृसिंहभक्त होते व त्यांना स्वामींनी नृसिंहरूपातच दर्शन दिले होते. तसेच मानसपूजेतील नृसिंहमूर्ती प्रत्यक्ष होईल, असा आशीर्वादही दिला होता.
पंधराव्या अध्यायात भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या शिष्यांना पवित्र तीर्थक्षेत्रांची माहिती सांगितलेली आहे. त्यात गाणगापूरच्या भीमा-अमरजा संगमावरील कल्पवृक्ष अश्वत्थासमोर " नृसिंहतीर्थ " असल्याचा उल्लेख आलाय. त्यानंतर कृष्णाकाठावरील कोळे नृसिंहपूरच्या श्रीनृसिंह भगवंतांचाही श्रीस्वामी महाराज आवर्जून उल्लेख करतात.
एकोणिसाव्या अध्यायात औदुंबर वृक्षाचे माहात्म्य व श्रीदत्तप्रभूंचे त्यावरील विशेष प्रेम कथन करताना पुन्हा भगवान श्रीनृसिंहांचा उल्लेख येतो. हिरण्यकश्यपूच्या विषयुक्त रक्तामुळे नखांचा होणारा दाह,  भगवती लक्ष्मीमातेने आणलेल्या औदुंबराच्या फळांमध्ये नखे रोवल्याने शांत झाला. म्हणून औदुंबर वृक्षाला भगवान श्रीनृसिंहांनी भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. औदुंबराला भगवान श्रीनृसिंहांनीच " सदा फळित तू होसी । " असा कल्पवृक्ष होण्याचा आशीर्वादही दिलेला आहे. तसेच, " आम्ही लक्ष्मीसह निरंतर तुझ्याखाली वास करू ", असाही वर दिलेला आहे. तोच वर त्यांनी श्रीनृसिंह सरस्वती स्वामींच्या रूपाने पूर्ण केलेला दिसून येतो. तेथे एका ओवीत श्रीगुरुचरित्रकार म्हणतात,
अवतार आपण तयाचे ।
स्थान आपुलें असे साचें ।
शांतवन करावया उग्रत्वाचें ।
म्हणोनि वास औदुंबरीं॥१९.२८॥
येथे श्रीगुरुचरित्रकार सरस्वती गंगाधर, भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामींना स्पष्टपणे नृसिंह-अवतार म्हणतात. या आधीच्या ओवीत गुरुचरित्रकार फार महत्त्वाचा संदर्भ सांगतात की,
याकारणें श्रीगुरुमूर्ती ।
नृसिंहमंत्र उपासना करिती ।
उग्रत्वाची करावया शांति ।
औदुंबरी वास असे ॥१९.२७॥
सरस्वती गंगाधर या ओवीत स्पष्ट सांगतात की, भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज " नृसिंह मंत्र उपासना " करत होते. तसेच नृसिंह अवताराप्रमाणेच उग्रत्वाची शांती करण्यासाठी ते नित्य औदुंबरवृक्षाखाली वास करीत असत.
चोविसाव्या अध्यायात श्रीत्रिविक्रम भारतींचा प्रसंग आहे. हे थोर संन्यासी देखील श्रीनृसिंह भक्तच होते. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी कुमसी गावी गेले होते. त्यावेळी त्यांनी श्रीत्रिविक्रम भारतींना मानसपूजेत नृसिंहरूपातच दर्शन दिल्याचा उल्लेख येतो.
तृतीय श्रीदत्तावतार, राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामींचेही जन्मनाम " नृसिंहभान " असेच होते. प्रसंगी तेही नृसिंहरूपासारखेच अत्यंत उग्र रूप धारण करीत असत. त्यावेळी त्यांच्यासमोर जाण्याची कोणाचीही छाती होत नसे. त्याचबरोबर त्यांचे अलौकिक भक्तवात्सल्यही त्यांच्या सर्व गोष्टींमधून स्पष्ट जाणवते. त्यांच्या अशा अपरंपार भक्तप्रेमाचे वर्णन करणा-या अनेक कथा त्यांच्या बखरीत सापडतात. अत्यंत असह्य उग्रत्व व त्याचवेळी अपरंपार करुणा या नृसिंहरूपाचेच वैशिष्ट्य असणा-या दोन्ही गोष्टी श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या ठायी विलसणा-या श्रीनृसिंहतत्त्वाचेच प्रत्यंतर देत आहेत.
भगवान श्रीनृसिंहांची उपासना करून त्यांची पूर्णकृपा प्राप्त झालेले परम भाग्यवान जीव देहपातानंतर भगवान श्रीदत्तात्रेयांच्या स्वरूपाशी एकरूप होतात, असा स्वानुभव काही नृसिंहभक्त महात्म्यांनी नोंदवून ठेवलेला आहे. हा आजवर फारसा ज्ञात नसलेला विलक्षण संदर्भ तर श्रीनृसिंह भगवंत व श्रीदत्त भगवंतांचे एकरूपत्वच सांगत नाही का?
श्रीदत्तसंप्रदायामध्ये अशाप्रकारे श्रीनृसिंह भगवंतांचीही उपासना केली जाते. याही संप्रदायात श्रीनृसिंह हे भक्तवत्सल व भक्त-रक्षणकर्ते म्हणूनच पूजिले जातात. श्रीदत्त संप्रदायातील आजवरच्या अनेक थोर सत्पुरुषांचे इष्टदेव भगवान श्रीनृसिंहच असल्याचे त्यांच्या चरित्रांमधून पाहायला मिळते. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील थोर विभूतिमत्व, प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांचेही भगवान श्रीलक्ष्मीनृसिंह हेच इष्टदेव होते.
श्रीदत्तसंप्रदायातील अधिकारी विभूती व श्रीनृसिंह भगवंतांचे परमभक्त तसेच श्रीनृसिंह कोशाचे संपादन-प्रमुख, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे श्रीनृसिंह भगवंतांच्या अवीट गोडीच्या लीलेचे मोठ्या मार्मिक व गूढार्थपूर्ण शब्दांमध्ये वर्णन करताना म्हणतात,
विदारूनी महास्तंभ ।
देव प्रकट स्वयंभ ॥१॥
राखावया भक्तजन ।
स्वये येती नारायण ॥२॥
ऐसा प्रल्हाद बळिया ।
केले देवासी खेळिया ॥३॥
देव अंकित भावाचा ।
लोट नयनी कृपेचा ॥४॥
भक्त घेई अंकावरी ।
प्रेमे चाटितो श्रीहरी ॥५॥
बहू नवलाव जाला ।
दैत्य तोही उद्धरिला ॥६॥
म्हणे अमृता माधवा ।
फेडी स्तंभाते आघवा ॥७॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

0 comments:

Post a Comment