श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
आज चैत्र पौर्णिमा. बुद्धिमंतांमध्येही श्रेष्ठ असणा-या, महाबलवान व महापराक्रमी असूनही स्वत:ला आपल्या स्वामींचा, प्रभू श्रीरामांचा तुच्छ दास म्हणविण्यात धन्यता मानणा-या, प्रत्यक्ष महारुद्रावतार भगवान श्रीहनुमंतरायांची जयंती !! चैत्र पौर्णिमेच्या मनोहर प्रभाती, सूर्योदयाला अंजनी मातेच्या पोटी नुकताच त्यांचा जन्म झालेला आहे. रघुकुलभूषण दशरथ राजांनी केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञातला कैकयीचा जो यज्ञचरु घारीने पळवून नेला होता, तो अंजनीमातेच्या ओंजळीत तिने टाकला व त्याच्या भक्षणाने मारुतीरायांचा गर्भ राहिला, असे संत नामदेवराय आपल्या अभंगात सांगतात. म्हणजे भगवान श्रीरामरायांच्या अवतारातील श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न या चतुर्व्यूहातच मारुतीरायांचाही समावेश होऊन हा पंचव्यूह तयार होतो. हे पाचही अवतार परब्रह्मस्वरूपच आहेत.
श्रीमारुतीरायांचे मंदिर नाही असे एकही गाव संपूर्ण भारतात शोधून सापडणार नाही. मारुतीराय हे हरिभक्तांचे रक्षक म्हणून तर सुप्रसिद्धच आहेत. त्याचवेळी ते भूतप्रेतपिशाचादी गणांपासूनही भक्तांचे संरक्षण करतात. त्यांचे स्मरण केले असता नक्कीच इष्ट कार्यसिद्धी होते. म्हणून ते नित्यवंदनीय आहेत. यासाठीच श्रीसमर्थ रामदास स्वामी आपल्याला प्रेमाने उपदेश करतात,
नांव मारुतीचें घ्यावें ।
पुढें पाऊल टाकावें ॥१॥
अवघा मुहूर्त शकुन ।
हृदयीं मारुतीचें ध्यान ॥२॥
दास म्हणे ऐसें करा ।
सदा मारुती हृदयीं धरा ॥५॥
श्रीमारुतीराय म्हणजे मूर्तिमंत दास्यभक्ती. त्यांची संपूर्ण शक्ती ते आपल्या प्रभूंच्या सेवेसाठीच बाळगून आहेत. दैत्यांच्या ठिकाणी सुद्धा शक्ती असते, अमाप बळ असते, परंतु या बळाला क्रौर्याची व अहंकाराची जोड असते. त्यामुळे ते बळ भगवत्कृपेला प्राप्त होत नाही. याउलट हनुमंतराय हे अपरिमित बळ असूनसुद्धा स्वत:ला भगवंतांचे दास म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. त्यामुळेच त्यांच्यावर भगवंतांची निरंतर कृपा असून ते भक्तिमार्गात सुद्धा श्रेष्ठत्वाला पावलेले वीर आहेत. त्यासाठीच ते चिरंजीव देखील झालेले आहेत.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक प. पू. श्री. शिरीषदादा कवडे म्हणतात, " अहंकार हा परमार्थमार्गातील सर्वात मोठा शत्रू आहे. भगवंतांचे परिपूर्ण प्रेम साधावयाचे असेल तर साधकाचा अहंकार प्रथम समूळ जायला हवा आणि तो तसा जाण्यासाठी त्याने स्वत:ला कमी दर्जाचे, तुच्छ, क्षुद्र मानले पाहिजे. जे नुसतीच ग्रंथांची पोपटपंची करतात त्यांची अशी समजूत असते की, ' दास्यभक्ती मुळे साधक दुबळा आणि पराधीन होतो ! ' शिवाय; कोणाचीही गुलामगिरी का व कशासाठी करायची ? असाही किंतु त्यांच्या मनात असतो. त्यांच्या या समजुतीचा अर्थ परमार्थात: एवढाच असतो की, ' त्यांनी खरे तत्त्वज्ञान समजूनच घेतलेले नाही. '
' दास्य ' या शब्दाचा व्यावहारिक अर्थ आपण हनुमंतरायांच्या दास्यभक्तीला लावू नये. तर परमार्थमार्गात दास्य म्हणजे आपला अहंकार उत्तरोत्तर कमी करीत जाणे, असा आहे. हे दास्यच अंतिमत: परमार्थाची चरम अनुभूती देत असते. श्रीमारुतीरायांच्या या अलौकिक दास्यभावाची, प्रभू श्रीरामांवरील उत्कट प्रेमाची व त्यांच्या जगावेगळ्या बुद्धिचातुर्याची एक अद्भुत कथा प. पू. श्री. शिरीषदादा सांगतात.
" एके दिवशी भरत आणि शत्रुघ्न विचार करतात, ” हनुमंतराय देवांपुढे सतत उभे असतात, देवांची सर्व कामे करायला सदैव तत्पर राहतात. यावरही कडी म्हणून की काय, देवांनी स्वमुखाने काही सांगण्याआधीच त्यांची इच्छा जाणून ती ते पूर्ण करण्यास प्रयत्नशील असतात. त्यामुळे आम्हाला देवांची सेवा करावयाची संधीच मिळत नाही. " म्हणून एक दिवशी श्रीहनुमंतराय स्नानादी कर्मांसाठी शरयू नदीवर गेले असता ही संधी साधून भरत आणि शत्रुघ्न या दोघांनी देवांच्या सेवेला कोणत्या गोष्टी लागतील, कोणती सेवा कोणत्या वेळेत व्हायला हवी? अशी यादी तयार केली आणि ती यादी श्रीरामरायांपुढे सादर करून त्यांची अनुमती मिळवली. इकडे हनुमंतराय स्नान आटोपून प्रभूंना पूजेसाठी फुले आणावयास जाणार इतक्यात तेथे भरत आणि शत्रुघ्नाचे आगमन झाले. ते म्हणाले की, ” आतापासून देवांची सेवा करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, तेव्हा तुम्ही आजपासून रजा घ्यावी. " असे म्हणून स्वत: श्रीरामप्रभूंची त्या सेवायादीला असलेली संमती त्यांनी हनुमंतांना दाखवली. हनुमंतराय ती यादी काळजीपूर्वक वाचून त्यांना म्हणाले, " यामध्ये एक सेवा अनुल्लेखित आहे, ती सेवा करण्याची परवानगी मला द्यावी. कोणती सेवा ? अशी विचारणा झाल्यावर, ” भगवंतांना जेव्हा जेव्हा जांभई येईल तेव्हा तेव्हा चुटकी वाजवण्याची सेवा माझ्याकडे द्यावी, " असे ते म्हणाले. आता भगवंतांचा देह दिव्य असल्याने त्यांना काही सतत जांभई येणार नाही, असा विचार करून त्यांनी या सेवेला होकार भरला. आता मात्र ' बुद्धिमतां वरिष्ठं ' असे मारुतीराय भगवंतांना केव्हाही जांभई येऊ शकते, म्हणून सदासर्वकाळ त्यांच्यासोबतच असत. त्यामुळे त्यांचे अनुसंधान अबाधित राहिलेले होते. उलट ते आता दिवसभर विनाखंड देवांचे मनोहर रूप डोळ्यांनी सतत पाहू शकत होते. मात्र रात्रीच्या वेळी प्रभू अंत:पुरात जात असताना हनुमंतांना तिथे मात्र प्रवेश दिला गेला नाही. ते खिन्न होऊन महालाच्या बाहेर एके ठिकाणी जाऊन बसले. यांच्या मनात आले की, आता जर प्रभूंना जांभई आली तर आपल्याला कसे कळणार? असा विचार येताच आपली सेवा खंडित होईल या भीतीने त्यांनी सारखी चुटकी वाजवण्यास सुरुवात केली.
इकडे अंत:पुरात मात्र वेगळाच प्रकार घडत होता. बाहेर हनुमंत जसजश्या चुटक्या वाजवत होते तसतश्या प्रभू श्रीरामांना काहीच कारण नसताता अचानक जांभयांवर जांभया येऊ लागल्या. हे पाहून श्रीसीतामाई घाबरून गेल्या, राजवैद्यांना पाचारण केले. त्यांनाही हा प्रकार कळेना. प्रभू तर एकामागून एक जांभयाच देत असल्याने त्यांनाही काही बोलता येईना. भरत शत्रुघ्नाला सुद्धा काय होते आहे हेच कळेना. अखेर कुलगुरु श्रीवसिष्ठांना बोलावणे धाडले. त्यांनी काय तो प्रकार जाणून घेऊन, हनुमंतराय कुठे आहेत, असे विचारले. तेच सातत्याने चुटक्या वाजवत राहिल्याने प्रभू रामांच्या जांभया थांबत नाहीत, हे वसिष्ठांच्या नेमके लक्षात आले होते. त्यांनी हनुमंतांना निरोप पाठवला व प्रभू श्रीरामांनी बोलावल्याचे सांगितले. मारुतीरायांना प्रचंड आनंद झाला व ते तत्काळ श्रीरामप्रभूंच्या समोर उभे ठाकले. त्यासरशी त्यांची चुटकी थांबली व पर्यायाने देवांची जांभई देखील थांबली. या अनोख्या लीलेद्वारे श्रीरामरायांनी आपल्या या अनन्य दासाच्या थोर भक्तीचा सर्वांना परिचय करवून दिला. भरत शत्रुघ्नांनीही श्रीहनुमंतांचा दास्यभक्तीचा अधिकार नम्रपणे कबूल केला आणि त्यांना पुनश्च सर्व सेवा सोपवल्या. अशाप्रकारे परम बुद्धिमान श्रीमारुतीरायांनी आपली स्वामीसेवा अबाधित राखून अखंड अनुसंधानही त्यातच बरोबर साधले. "
श्रीमारुतीराय हे बल-बुद्धीचे थोर आदर्श आहेत. सामान्यत: बळ व बुद्धी एकत्र नांदत नाहीत, असे म्हटले जाते. पण श्रीहनुमंतराय हे या दोन्हींच्या पूर्ण प्रभावाने झालेल्या संगमाचे विशेष उदाहरण आहेत. शिवाय बळरूपी गंगा व बुद्धीरूपी यमुनेच्या जोडीने हरिभक्तीरूपी गुप्त सरस्वतीचाही अपूर्व त्रिवेणी संगम श्रीमारुतीरायांच्या ठायी झालेला दिसून येतो. स्वामीभक्तीचेही ते चिरंतन प्रतीक आहेत. आपण आजच्या त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून, बलोपासनेचे व बुद्धीयुक्त सद्गुरुसेवेचे प्रयत्नपूर्वक अवलंबन करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घेऊया. असे जर आपण मनापासून करू लागलो, तरच आपण खरी हनुमान जयंती साजरी केली असे म्हणता येईल व यातच श्रीमारुतीरायांचीही प्रसन्नता आपल्याला प्राप्त होईल !!
आजच्या तिथीचा अजून एक फार विलक्षण संदर्भ म्हणजे, आजच छत्रपती श्रीशिवाजी महाराजांची पुण्यतिथी असते. प्रत्यक्ष मारुतीरायांचे अवतार असणा-या आपल्या सद्गुरूंच्या, श्रीरामदास स्वामींच्या आराध्य दैवताची व मूळ स्वरूपाची जयंतीच शिवरायांनी देहत्यागासाठी निवडावी, हा योगायोग अजिबात नव्हे. समर्थकृपेने शिवराय परिपूर्ण संतत्वाला पोचलेले होते व त्यांनी श्रीमारुतीरायांच्याच दास्यभक्तीचा आदर्श समोर ठेवून श्रींचे राज्य चालविले होते. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणत, " श्रीज्ञानेश्वर महाराज हे संतांचे राजे तर शिवाजी महाराज हे राजांमधले संत होते ! " खरोखर शिवरायांनी आपले संतत्व व प्रगाढ गुरुभक्तीच हनुमान जयंतीला देह ठेवून न बोलता आपल्याला दाखवून दिलेली आहे. या महान विभूतीच्या चरणीं पुण्यतिथी निमित्त सादर वंदन !
( छायाचित्र: प. पू. डॉ. गोविंदकाका उपळेकर महाराज नित्य दर्शनाला जात असत ती फलटण येथील प्राचीन श्री उघडा मारुती मंदिरातील प्रसन्न श्रीमूर्ती.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी. )
0 comments:
Post a Comment