6 Apr 2016

तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं चूडारत्न


अनंत असा भगवंत सांत करून त्याला आपल्या हृदयात पूर्णपणे धारण करणा-यांनाच ' संत ' म्हणतात. शक्ती, बुध्दी, युक्तीने ज्याच्या गुणांचा अंत जाणता येत नाही असा अपार, अमर्याद परमात्मा सर्वार्थाने आपल्या हृदयात धारण करणे काही सोपे नाही. पण ज्यांना ते साधते ते संत मात्र त्यामुळे श्रीभगवंतांपेक्षाही मोठेच ठरतात ! अशाच थोर संतांच्‍या मांदियाळीत आपल्या निर्मळ तेजाने आणि अद्भुत कार्याने झगमगणारे विभूतिमत्व म्हणजे फलटण नगरीचे भूषण प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज हे होत. आज भाद्रपद कृष्ण अष्टमी, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी त्यांची ४१ वी पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांचे हे सादर चरित्र-गुणगान !!
पहिल्या महायुद्धात निष्णात सर्जन म्हणून नेत्रदीपक कार्य करून त्यावेळचा 'कैसर ई हिंद' हा सर्वोच्च भारतीय सन्मान प्राप्त करणारा एक तगडा जवान, आपली सन्मानाची नोकरी, पद, प्रतिष्ठा आणि चालून आलेली कीर्ती, संपत्ती क्षणात सोडून एका दिगंबर आणि वरकरणी गावंढळ भासणा-या पण अंतरंगी ज्ञानबोधाने आत्मतृप्त झालेल्या विभूतीच्या पायी शरणागत होऊन सेवा करीत राहतो हे नक्कीच जगाच्या उफराटे आहे. पण त्याच एका समर्पक निर्णयाने डॉ. गोविंद रामचंद्र उपळेकर या व्यक्तीचा पूर्ण कायापालट होऊन एक थोर महात्मा निर्माण झाला हे विसरता येणार नाही.
फलटण जवळील माळेगाव येथे माघ शुद्ध द्वितीया, दि. १५ जानेवारी १८८८ रोजी गोविंदकाका उपळेकर महाराजांचा जन्म झाला. श्री. रामचंद्रपंत व सौ. जानकी तथा अबई या सत्शील दांपत्याच्या पोटी श्रीदत्तप्रभूंच्या केलेल्या उपासनेचे फळ म्हणून हे संतरत्न जन्माला आले. अत्यंत कुशाग्र बुद्धीचा गोविंदा लहानपणी तालीम, पोहणे असे खेळ आवडीने खेळत असे. सातशे श्लोकांची भगवद्गीता शेवटून सुरवातीपर्यंत अशी उलट्या क्रमाने तोंडपाठ म्हणून दाखवणारा हा मुलगा, अलौकिक बुद्धीची स्वर्गीय देणगी बरोबर घेऊनच जन्मला होता. पुढे पुण्याच्या बी. जे. मेडीकल कॉलेजमधून एल. सी.पी. एस. होऊन नुकत्याच सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात तो सैन्यात सर्जन म्हणून भरती झाला. त्यानिमित्ताने इंग्लंड, नैरोबी, रावळपिंडी, फ्रान्स अशा ठिकाणी त्याने सेवा रूजू केली. पण त्याच सुमारास आत्म्याच्या शोधाने व्याकूळ झालेल्या त्याला एका दिगंबर साधूचे वारंवार दर्शन होऊ लागले होते. सुट्टीवर फलटणला आलेला असताना अचानकच त्या साधूचे खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे दर्शन झाल्याने डॉ. गोविंद उपळेकर भारावून गेले. अंतरीची खूण पटली आणि त्यांनी आपल्या प्रथितयश नोकरीचा राजीनामा देऊन पुसेसावळीच्या लोकांच्या दृष्टीने वेड्या कृष्णा परिटाच्या अर्थात् श्रीकृष्णदेव महाराजांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले.
श्रीकृष्णदेव महाराज हे राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामींच्या परंपरेतील झाकले माणिक होते. श्रीस्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट - श्रीकृष्णसरस्वती महाराज, कोल्हापूर - श्रीधोंडीबुवा महाराज, पलूस - श्रीकृष्णदेव महाराज, पुसेसावळी - श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज, फलटण अशी ही अवलिया महात्म्यांची अद्भुत गुरुपरंपरा आहे. श्रीकृष्णदेव महाराजांच्या कृपेने डॉ. गोविंद उपळेकर हे परमार्थातील उच्च आत्मानुभूतीच्या पदी आरूढ झाले. पण त्यासाठी अतिशय खडतर अशी गुरुसेवा त्यांनी केली होती. श्रीकृष्णदेवांच्या देहत्यागानंतर त्यांनी १९२३ साली आपल्या श्रीगुरूंच्या चरित्रपर " श्रीकृष्णदेव " या नावाचा ४५० पानांचा इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांचे मिश्रण असणारा ग्रंथ लिहिला. १९२३ ते १९३३ अशी दहा वर्षे संपूर्ण भारतभर मौनाने तीर्थयात्रा केली आणि श्रीगुरुकृपेने लाभलेला अमृतमय ब्रह्मानंद रिचवून पचवून लोकांच्या कल्याणासाठी पुन्हा फलटणला कायमचे वास्तव्य केले. याच यात्राकाळात हिमालयात त्यांना साक्षात् भगवान नर-नारायणांचे प्रत्यक्ष सगुण दर्शन लाभले व त्यांनी पुढील कार्याचे पू. काकांना मार्गदर्शनही केले होते.
१९३३ ते १९७४ अशी एक्केचाळीस वर्षे ज्ञानेश्वरीचा हा थोर अभ्यासक महात्मा जनता जनार्दनाच्या सेवेत आत्मतृप्त होऊन निमग्न राहिला. खडतर गुरुसेवेने लाभलेला अमृतानंद माउलींच्या हरिपाठाच्या माध्यमातून जनसामान्यांना मुक्तहस्ते वाटत राहिला. आपल्याला लाभलेला गुरुप्रसाद त्यांनी २८ ग्रंथांमधून सर्वांसाठी खुला केला. ज्ञानेश्वरीवर " सुबोधिनी " नावाची अडीच हजार पानांची सुरेख टीका डॉ. गोविंद महाराजांनी रचलेली आहे. प. पू. काकांचे स्पष्ट मत होते की माउलींचे वाङ्मय " अमूल्य " आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे लाखो रुपये मूल्याचे संपूर्ण प्रकाशित वाङ्मय, कधीही कोणाकडून एक रुपया देखील न घेता, कायम विनामूल्य वाटले. प. पू. काकांचे उत्तराधिकारी प. पू. बागोबा महाराज कुकडे यांनी अथक परिश्रम करून हे वाङ्मय प्रकाशित करून विनामूल्य वितरणाचे सर्व कार्य गुरुसेवा म्हणून संपन्न केले.
प. पू. काकांचा उपदेश अगदी सोपा होता. कोणत्याही लौकिक अवडंबराच्या भानगडीत न पडता, आपली दररोजची कर्तव्ये प्रेमाने व निष्ठेने, भगवंतांची पूजाच आहे या बुद्धीने अलिप्तपणे करावीत व निरंतर त्या परमात्म्याचे स्मरण करीत राहावे, असे ते सांगत. माउलींचा परमदिव्य हरिपाठ दररोज वाचणे, जवळ बाळगणे व श्रीज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा इत्यादी सद्ग्रंथांचे जमेल तसे प्रेमाने वाचन-चिंतन करणे, असे त्यांच्या उपासनेचे सुटसुटीत रूप होते. त्यांनी घालून दिल्याप्रमाणे उपासना करून प्रापंचिक व पारमार्थिक सुख-समाधानाचा अनुभव घेणारे हजारो सज्जन आजही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांनी स्वत: फलटण येथे सुरू केलेला दररोज रात्रीचा हरिपाठ पठणाचा उपक्रम, आज पंच्चाहत्तरहून जास्त वर्षे झाली अव्याहतपणे चालू आहे, हे मोठे आश्चर्यच होय.
अत्यंत साधेपणा, प्रसिद्धिपराङ्मुखता, आणि पराकोटीचे निरहंकार अमानित्व यांसारखे दिव्य अलंकार मिरवणारा हा माउलींचा बोधपुत्र आपल्या अंगच्या ब्रह्मतेजाने देदीप्यमान ठरला. " किंबहुना चराचर आपणचि जाहला ।" ही माउलींची ओवी जणू त्यांचे चपखल वर्णन करते. आपली सहज समाधीची उन्मनी स्थिती ढळू न देता, समोर येणा-या प्रत्येकाचे दु:ख दूर करून त्याला सन्मार्गाला, माउलींच्या भक्तिमार्गाला लावण्याचे महान कार्य करीत राहिला. महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री कै. कन्नमवार, भोर, फलटण, शिरगांव इत्यादी संस्थानांचे राजे-रजवाडे व प्रथितयश डॉक्टर वगैरे सारख्या बड्या असामी प. पू. काकांच्या भक्तमंडळात होत्या. दूरदूरहून हजारो लोक दर्शनाला येत, पण त्यांच्या वागण्या बोलण्यातले मार्दव, प्रेमळपणा आणि विनम्रता कधीच कणभरही कमी झाली नाही. माउलींची ज्ञानेश्वरी अक्षरश: जगणारा हा महान संत, निरपेक्षपणे सर्वांना सहज सोप्या भक्तिवाणीने सप्रेम मार्गदर्शन करीत करीत कृतार्थतेने जगला. केवळ फलटण, साताराच नव्हे, तर अवघ्या भारताचेच नाव उज्ज्वल करीत, भाद्रपद वद्य अष्टमी, मंगळवार दि. ८ ऑक्टोबर १९७४ रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी भगवत्स्वरूपी कायमचा निमग्न झाला.
आपल्या ८८ वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात प.पू. गोविंदकाकांनी हजारो जीवांचा उध्दार तर केलाच, पण आजही समाधी मंदिरातील आपल्या चिन्मय अधिष्ठानाने त्यांचे ते लोकोध्दाराचे कार्य अखंड चालूच आहे आणि पुढेही निरंतर चालूच राहील !
राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थांच्या परंपराशाखेचे मुकुटमणी व माउलींच्या वाङ्मयाचे थोर अभ्यासक, उपासक, सद्गुरु डॉ. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४१ व्या पुण्यस्मरण-दिनी त्यांच्या जीवन-कार्याचे हे सप्रेम स्मरण हीच जणू त्यांच्या श्रीचरणीं आपण सर्वांनी प्रेमादरपूर्वक अर्पण केलेली भावपुष्पांजलीच आहे ! 


लेखक - रोहन विजय उपळेकर

9 comments:

  1. Namaste
    thanks and congratulations shri Rohanji for introducing the life, work and updesh of Sadguru Upalekar maharaj in such a brief article...

    ReplyDelete
  2. गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  3. Shree gurudev datt ❤️
    Shree swami samarth ❤️

    ReplyDelete
  4. http://shribaathavalesliterature.blogspot.com/2022/09/blog-post_29.html

    ReplyDelete
  5. नमस्कार रोहनजीं,तुम्ही काका महाराजाबद्दल खूप सुंदर माहिती दिली ,त्याबद्दल आम्ही भरून पावलो.- नंदेश माने ,पुणे -27

    ReplyDelete
  6. या विभूतीला शतशः दंडवत

    ReplyDelete
  7. 🌹🙏 पूज्य उपळेकर महाराजांच्या या चरित्रासाठी शतशः धन्यवाद.

    ReplyDelete
  8. रोहन, छान वाटले पूज्य काकांबद्दल वाचून!! मी रोजच सुप्रभाती त्यांना वंदन करते. अककलकोट स्वामी समर्थ, हरिबुवा, ति.काका, माझे गुरू महर्षि विनोद यांचे स्मरण व वंदनाने माझा दिवस सुरू होतो.

    ReplyDelete