21 Sept 2018

ऐक तू येवढे चंदन पाखरा

आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, श्रीवामनद्वादशी !
भगवान श्रीमहाविष्णूंचे पाचवे अवतार आणि माता अदिती व महर्षी कश्यपांचे पुत्र भगवान श्रीवामनांची आज जयंती ! भाद्रपद शुद्ध द्वादशीला, मध्यान्ह समयी अभिजित् मुहूर्तावर श्रीवामनांचा जन्म झाला होता.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचा नातू विष्णुभक्त बलिराजाने स्वर्गलोकावर स्वारी करून देवांचा पराभव करून इंद्रपद बळकावले. बलिराजा असुर असूनही अत्यंत सत्त्वशील, सत्यवचनी व दानशूर भगवद्भक्त होता. त्याने नर्मदेच्या किना-यावरील भृगुकृच्छ म्हणजेच आजचे भडोच येथे मोठमोठे यज्ञ करायला सुरुवात केली. त्याचे सत्त्व हरण करून त्याने बळकावलेले इंद्रपद त्याच्याकडून पुन्हा काढून घेण्यासाठी, त्यातील एका यज्ञात बटू रूपात प्रकट होऊन श्रीभगवंतांनी त्याला तीन पाऊले जमीन मागितली.
श्रीवामनांच्या दिव्य रूपाने मोहित झालेल्या बलिराजाने दानाचा संकल्प केल्यावर ते आपले वामनरूप टाकून प्रचंड मोठ्या स्वरूपात प्रकट झाले. त्यांनी दोन पावलात स्वर्गलोक व मृत्युलोक व्यापला. आता तिसरे पाऊल कुठे ठेवू ? असे विचारल्यावर बलिराजाने आपले मस्तक झुकवले व श्रीवामनांना मस्तकावर पाऊल ठेवायची विनंती केली. श्रीवामनांनी त्याच्या मस्तकावर आपला श्रीचरण ठेवून त्याला सप्तपाताळातील सुतललोकात जाण्याची आज्ञा केली. शिवाय त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन स्वत: त्याचे द्वारपाल होऊन ते राहिलेले आहेत.
बलिराजा हा सप्तचिरंजीवांपैकी एक असल्याने आजही सुतललोकाचा अधिपती म्हणून तो कार्यरत आहे. त्याच्या द्वारी प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णू गदा घेऊन संरक्षणासाठी उभे असतात. श्रीमद् भागवताच्या आठव्या स्कंधातील अध्याय क्रमांक पंधरा ते तेवीस या नऊ अध्यायांमधून श्री शुक महामुनींनी फार सुंदर आणि भावमधुर शब्दांत श्रीवामनावताराची व बलीच्या उद्धाराची लीला वर्णिलेली आहे. या नऊ अध्यायांमधून भक्तिशास्त्रातले अतिशय महत्त्वाचे सिद्धांत ते स्पष्ट करून सांगतात. विशेषत: भक्ताचे अंत:करण कसे असायला हवे ? भक्तीचे आणि भगवन्नामाचे माहात्म्य काय ? अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा त्यांनी यात विशेष ऊहापोह केलेला आहे. आवर्जून वाचावेत, अभासावेत असे हे नऊही अध्याय अत्यंत महत्त्वाचेच आहेत. भागवतकार असुर असूनही बलिराजाची यथार्थ स्तुती करतात. कारण बलिराजा हा सर्व वैष्णवांसाठी प्रात:स्मरणीय असा महान वैष्णव आहे. त्यामुळेच बलिराजाचे चरित्र आपल्यासारख्या भक्तांसाठी सदैव आदर्श आहे. सद्गुरु श्री माउली देखील बलिराजाच्या कथेचा उल्लेख करून श्रीवामन भगवंतांचे माहात्म्य सांगताना म्हणतात, *"दान मागोनि दारवंठेकार । जाहालासी बळीचा ॥ ज्ञाने.११.४.१०६॥"* "देवाधिदेवा, तुमचे औदार्य जगावेगळेच आहे, तुमच्या अपका-यांवरही तुम्ही उपकारच करता, पात्रापात्र न पाहता उदारपण दाखवता. अहो, बळीच्या घरी तीन पावले जमिनीचे दान मागायला काय गेलात; त्याने सर्वस्वच तुम्हांला अर्पण केले म्हणून प्रसन्न होऊन आजही त्याच्या द्वारी द्वारपाल म्हणून तिष्ठत उभे आहात ! देवा, तुमच्यासारखे तुम्हीच, अत्यंत अद्भुत आणि अपूर्व !"
रूपाने सान पण कीर्ती-गुणांनी महान अशा भगवान श्रीवामनांच्या रूपात प्रकटलेल्या भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीमहाविष्णूंच्या श्रीचरणी सादर दंडवत प्रणाम !
आजच्याच पावन तिथीला भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे निस्सीम भक्त व थोर अवतारी सत्पुरुष प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज माधानकर यांची पुण्यतिथी असते. सोमवार दि.२० सप्टेंबर १९१५ रोजी पुणे मुक्कामी आपल्या देहाची खोळ सांडून श्री महाराज माउलीरूप झाले होते.
स्वत:ला भगवान "श्री माउलींची कन्या" म्हणवून घेणारी ही "पंचलतिका" गोपी अत्यंत अलौकिकच आहे. त्यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात केलेले कार्य हा अद्भुत चमत्कारच आहे. त्यांनी एवढ्या थोड्या काळात १३२ ग्रंथ रचलेले आहेत, विश्वास बसणार नाही आपला. श्री गुलाबराव महाराज स्वत: चालता बोलता चमत्कारच होते, यात शंका नाही.
आज श्रीगुलाबराव महाराजांच्या पुण्यतिथी दिनी, त्यांच्या एका भावपूर्ण अभंगावरील चिंतनाद्वारे त्यांचे पुण्यप्रद संस्मरण करू या.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
माहेर !!
कोणत्याही स्त्रीची अत्यंत जिव्हाळ्याची ठेव असते. माहेर म्हणजे मायेची उबदार कूस, पित्याचा प्रेममय आश्वासक स्पर्श, सख्या-सुहृदांचा आधाराचा हात आणि बरेच काही. हृदयाच्या अगदी आतल्या गाभ्यात, नित्य-सुगंधित कुपीत जपलेल्या, वेध लावणाऱ्या मनोहर आठवणी म्हणजे माहेर. प्रेमाचा खळाळता झरा म्हणजे माहेर. मुळात स्त्री ही भगवंताची ममतामूर्ती ; तिचे ममत्व जिथे प्रकर्षाने जडलेले असते ते म्हणजे माहेर. अशा माहेराची नुसती सय जरी आली तरी, वैशाख वणव्याने होरपळलेल्या झाडावर श्रावणमेघाने मनसोक्त वर्षाव करावा तशीच काहीशी प्रत्येक स्त्रीची अवस्था होऊन जाते. सासुरवासाचा शीण, घालून पाडून बोललेल्या टोमण्यांचा कढ जिथे निःशेष नाहीसा  होतो, ते विश्रांतीचे, आधाराचे स्थान म्हणजे माहेर !!
माहेर शब्दातला ' मा ' हा 'माय' या जिव्हाळ्याचा नात्याचा द्योतक आहे. जिथे आपले मायबाप राहतात ते माहेर. लौकिक जगातली ही पद्धत संतांनी आपल्या आध्यात्मिक जगतातही वापरलेली दिसून येते श्रीपंढरीनाथ भगवंत हे संतांचे माय-बाप म्हणून मग पंढरी हे त्यांचे माहेर ! "जाईन  गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेर आपुलिया ॥" अशी प्रेमभावना भगवान श्री माउली व्यक्त करतात . "माझे माहेर पंढरी । " हा संत एकनाथांचा अभंग तर सुप्रसिद्धच आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजही म्हणतात की, "प्रवृत्ति सासुर  निवृत्ती माहेर । तेथे निरंतर मन माझे ॥" अशा या अविनाशी माहेराची  सर्व संतांना कायमच ओढ लागून राहिलेली असते.
अर्वाचीन काळातील एक फार थोर अवतारी सत्पुरुष, प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराजांनी, अवघ्या चौतीस वर्षाच्या आपल्या आयुष्यात केलेली ग्रंथनिर्मिती आणि जगदुद्धाराचे कार्य इतके भव्य-दिव्य आहे की आश्चर्यालाही आश्चर्य वाटेल. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींना आपले पिता मानून ही "ज्ञानेश्वरकन्या" त्यांच्या श्रीचरणांचे निरंतर अनुगमन करीत राहिली. माउलींचे पितृत्व पुरेपूर सार्थ ठरवीत या 'पंचलतिका' नावाच्या कृष्णप्रिया गोपीने स्वतंत्र 'श्रीज्ञानेश्वर मधुराद्वैत दर्शना'ची स्थापना केली. लौकिक अर्थाने बालपणीच दोन्ही डोळ्यांचे अंधत्व प्राप्त झालेल्या या प्रज्ञाचक्षू  महात्म्याची अलौकिक दृष्टी जगाच्याही पल्याडचे सारे बसल्याजागी पाहू शकत होती. किती आणि काय बोलणार? आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, दि. २१ सप्टेंबर रोजी श्रीसंत गुलाबराव महाराजांची १०३ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्त आपल्या प्रेमळ माहेराचे  वर्णन करण्याऱ्या त्यांच्या एका नितांतसुंदर पदाचा सप्रेम आपण आस्वाद घेऊ या.
स्त्री जरी देहाने सासरी वावरत असली तरी मनाच्या एका कोपऱ्यात तिचे माहेरपण तिने जपलेलेच असते. मनाने ती माहेरी जाऊन क्षेमसमाधान मिळवत असते. या नित्याच्या पण अव्यक्त सुखानुभूतीला शब्दरूप देत मनरूपी पक्ष्याला विनंती करताना श्रीगुलाबराव महाराज म्हणतात ;
ऐक तू येवढे चंदन पाखरा ।
निरोप माहेरा नेई माझा ॥१॥
पुण्याहुनि आहे गांव सहा कोस ।
पुसत वाटेस जाय तेथे ॥२॥
लक्षिजे दुरूनी सोन्याचा पिंपळ ।
बैसे अळुमाळ तया मुळी ॥३॥
माझिये मायेस सांगावे एकांती ।
माझी ही विनंती प्रेमभरे ॥४॥
तुझिया कन्येस सासुरवास मोठा ।
येऊं द्यावी पोटा कृपा कांही ॥५॥
कितीवेळ तुज माझा ये आठव ।
कांही गुप्तभाव पुसे सख्या ॥६॥
केव्हा धाडशी लवकरी मूळ ।
घेऊनी सकळ भाक येई ॥७॥
तुझे पक्षीराजा वंदिते मी पाय ।
ज्ञानेश्वरमाय भेटवावी ॥८॥
पूर्वी संदेशवहनाचे काम पक्षी करीत. त्याला अनुसरून श्री गुलाबराव महाराज ही 'चंदन पाखरा' रचना करीत आहेत. या पक्ष्याचे रूपक खरे तर त्यांनी आपल्या चित्तावर, मनावरच रचलेले आहे. श्रीसद्गुरुकृपेने साधना घडल्याने चित्त शुद्ध होत आलेले आहे. त्याला विवेक आणि वैराग्य असे दोन पंख असून त्यांना साधनेने बळकटी मिळालेली आहे. आता तो चिदाकाशात उंच भरारी मारून, मुक्त संचार करीत परमात्म्याच्या, श्रीसद्गुरूंच्या ठिकाणी जाऊन त्यांचे दर्शन घेऊ शकतो, हे जाणून श्रीमहाराज त्या मनरूपी पक्षीराजाला मोठया प्रेमादराने 'चंदनपाखरा' म्हणून विनंती करीत आहेत. चंदन जसे सर्वांगी शुद्ध, सोज्ज्वळ आणि सुगंधी, तसेच हे चित्तही साधनेने शुद्ध झालेले आहे. प्रापंचिक वासना, कामना नष्ट झाल्यामुळे आणि सद्गुरुकृपेने भगवत्प्रेमाची प्राप्ती झाल्यामुळे त्या मनाला दैवी सुगंध येऊ लागलेला आहे.म्हणूनच महाराज मनाला चंदनपाखरा म्हणत आहेत. अशा हळवारलेल्या मनाकरवी श्रीमहाराज आपल्या श्रीगुरुमायेला निरोप पाठवत आहेत.
"अरे चंदनपाखरा, तू माझे जरा ऐकतोस का ? माझा एक निरोप माझ्या माहेरी पोहचव ना ! माझे माहेर आळंदी, ते पुण्याहून सहा कोस आहे. तू वाटेत विचारत विचारत जा आळंदीला. तिथे जवळ पोहोचलास की, तुला देदीप्यमान असा सुवर्ण पिंपळ लांबूनच दिसेल. तो माझ्या माहेराची वैभवसंपन्न खूणच आहे. त्यांच्या मुळाशी जरा विसावा घे. तिथे बसल्यावर तुझा प्रवासाचा शीण क्षणात नष्ट होईल. ताजातवाना झालास की, माझ्या परमप्रेमळ श्री ज्ञानेश्वरमायेस जाऊन भेट. अतीव प्रेमभराने माझा हा निरोप तिला एकांतात सांग.
माझ्या ज्ञानाईस सांग की, "तुझ्या या कन्येस खूप कठीण सासुरवास भोगावा लागत आहे. प्रपंचरूपी सासरी खूप कष्ट करावे लागत आहेत. या कन्येसाठी तुझ्या पोटी काही माया येऊ देत. तुझ्या प्रेमकृपेशिवाय ही व्यथा कोण हरण करणार ? माझ्या आईला विचार की, तुला किती वेळा आपल्या लेकीची आठवण येते ? मला तर अखंडच तुझी सय येत असते. पक्षीराजा, तिला जरा अशा काही गुप्त गोष्टी विचार. कारण तिला जरी माझी आठवण येत असली तरी वरवर ती ते दाखवणार नाही. म्हणून लोकांपासून तिने गुप्त ठेवलेली ही गोष्ट तू मात्र प्रेमाने तिला विचारून जाणून घे व मला येऊन सांग. माझ्या आईला माझी आठवण येते , हे ऐकून मी किती सुखावेन काय सांगू तुला !
खूप दिवस, वर्ष झाली आईची भेट नाही, माहेरी जाणे झालेली नाही. माझ्या प्रेमार्द्र ज्ञानमातेस विचार की, ती मला माहेरी येण्यासाठी कधी मूळ पाठवणार आहे ? मी चातकासारखी वाट पाहत आहे. माहेरून असे मूळवणे आल्याशिवाय मला सासरचे लोक सोडणार नाहीत. म्हणून हे पक्षीराजा, तू माझ्या कोमल हृदयाच्या अलंकापुरस्वामिनीस सगळ्या गोष्टी नीट विचारून तिचे आश्वासन माझ्यासाठी घेऊनच परत ये !
हे माझ्या प्रिय पक्षीराजा, तू माझी आणि माझ्या ज्ञानेश्वरमायेची भेट लवकरात लवकर घडवून आण. मी तिच्या विरहाने कशी दिवस कंठते आहे ते तू पाहतोच आहेस. बा पक्षीराजा, मी तुझ्या पायी वंदन करते पण तू माझा एवढा निरोप माझ्या परमप्रिय मातेला जाऊन सांग आणि तिचे आधाराचे शब्द मला ऐकवून सुखी कर !"
माहेरच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या आणि आपल्या आईला भेटण्यासाठी आतुर झालेल्या सासुरवाशिणीचे अंतरंग अगदी मोजक्या पण चपखल शब्दांमध्ये श्रीसंत गुलाबराव महाराजांनी येथे मांडले आहे. ही केवळ त्यांची कविकल्पना नाही, तर प्रत्यक्ष आपला स्वानुभवच त्यांनी येथे साकार केला आहे. या ज्ञानेश्वरकन्येचे अंतःकरणही आपल्या जगद्वंद्य मायमाउलीसारखे कुसुम-कोमल आहे, हळवे आहे.
श्रीमहाराजांच्या हृदयी विलसणा-या अपरंपार करुणेची प्रसन्न श्रीमूर्तीच या पदामधून शब्दरूप सुरेख गर्भरेशमी पैठणी ल्येऊन आपल्यासमोर उभी ठाकते. त्या राजस पैठणीचा पोत, तेजस्वी रंग, पदरावरचे नाजूक मोरपंखी नक्षीकाम, सोनेरी जरीचा पैठणीकाठ आणि निरभ्र आकाशात नक्षत्रे विखुरल्यासारखे तिच्या अंगावरचे देखणे बुट्टे पाहता पाहता आतून-बाहेरून मोहरून गेलेलो आपण, या ज्ञानेश्वरकन्येच्या चिरंतन-माहेरी, अलंकापुरनिवासिनी ज्ञानमाउलीच्या उबदार आणि आश्वासक मायकुशीत कधी विसावतो ते आपले आपल्यालाही कळत नाही. उरते ती केवळ उन्मन करणारी त्या अत्यद्भुत प्रेमकृपेची नित्यसुगंधी स्पर्शजाणीव ; आपल्याही मनाचे चंदनपाखरू करणारी, सतत हवीहवीशी वाटणारी आणि अंतर्बाह्य सुखविणारी !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


10 comments:

  1. माझे साष्टांग नमन 🙏 अत्यंत भावपूर्ण लेख ।

    ReplyDelete
  2. श्री गुलाबराव महाराजांच्या पदाचा अर्थ वाचताना ड़ोळे पाण्याने भरून येतात. आपण त्या काळात नकळत ओढले जातो व पुणे, आळंदी, सुवर्णपिंपळ असा सर्व भाग अनुभवतो.... सुंदर लेख

    ReplyDelete
  3. प्रभंजन8/29/2020 1:25 pm

    अतिशय सुरेख! अभंगाच्या अर्थाद्वारे चंदनपाखराशी किती छान संवाद साधलाय!! अभंगाचे शब्द मधुर आहेतच पण अर्थसुद्धा अवीट गोडीचा, उबदार आणि मऊमुलायम आहे. दादा, अर्थ सांगताना किती रे समरस होतोस!!

    ReplyDelete
  4. धन्य तो प्रह्लाद भक्त,त्याचे चरणी आणि वामनाना त्रिवार वन्दन
    तसेच द्न्यानेष्वर कन्या गुलाबराव महाराजाना सादर प्रणिपात

    ReplyDelete
  5. काय ते प्रेम...काय ती अद्भुत रचना...
    सर्वच अप्रतिम, अगाध...(काही उपमाच नाहीयेत).!!
    🙏🙏🙏💐💐💐

    ReplyDelete
  6. फार छान.

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर आणि अविस्मणीय आहे लेख. वाचून मन मोहरून गेले. आपल्या लेखणीचा पक्षीराज असाच माहेरासाठी अशाच उंच भराऱ्या मारू दे. --- श्रीकांत जोशी, चिंचवड, पुणें.

    ReplyDelete