2 Sept 2018

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् -सप्तम पुष्प

सप्तम पुष्प
आज श्रीजन्माष्टमी !
पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू आणि त्यांचेच अपरस्वरूप भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराज यांच्या दिव्य आविर्भावाचा पुण्यपावन दिन !
भगवान श्रीकृष्णच ज्ञानाची पुन्हा स्थापना करण्यासाठी सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या रूपाने अगदी तेच सर्व तिथी, योग साधून श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला बरोबर मध्यरात्री श्रीक्षेत्र आळंदी येथे अवतरले. या दोन्ही अवतारवरिष्ठांच्या एकरूपत्वाचे हे प्रत्यक्ष प्रमाणच म्हणायला हवे !
भगवान श्री माउलींची पूर्णकृपा लाभलेले सत्पुरुष श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज श्री माउलींच्या अवतारामागची एक अनोखी हकिकत सांगत असत. ही फारशी ज्ञात नसलेली, अप्रसिद्ध अशी गोष्ट आजच्या दिवसाचे औचित्य साधून मुद्दामच आपल्यासमोर ठेवीत आहे.
एकदा सगळी सृष्टी जलमय झालेली असताना भगवंत बालरूप धारण करून एका वडाच्या पानावर आपला पायांचा अंगठा चोखत पहुडले होते. नेमके ' नारायण नारायण ' करीत श्री नारदमुनी तेथे आले व भगवान बालमुकुंदांचे ते त्रिभुवनमोहक रूप पाहून गालातल्या गालात हसू लागले. देवांनी देखील वेडाचे पांघरुण घेऊन हसण्याचे कारण विचारले. नारद म्हणाले, "अहो देवा, तुम्ही या जगाचे पालक आणि असे बाललीला करता आहात, मग हसू येणारच ना ?" त्यावर बालमुकुंद प्रभू उत्तरले, "पण तू कारण नाही विचारलेस त्याचे ?" नारदजी म्हणाले, "विचारणारच होतो, पण तुमचे हे रूप पाहून हसूच फुटले त्याआधी."  
श्रीभगवंत म्हणाले, "गड्या, मी जेव्हा जेव्हा अवतार घेऊन येतो तेव्हा हजारो भक्त याच श्रीचरणांवर डोके ठेवून धन्य होतात. मला कळत नाही की एवढी काय जादू आहे या पायांमध्ये ? सहज मनात आले, आपण अंगठा चोखून पाहावा की खरोखरच तो एवढा गोड आहे का ? म्हणून......" 
यावर नारदमुनी आणखी जोरात हसले व म्हणाले, "देवा, आता मी काय सांगावे आपल्याला, पण भक्तमंडळींना जे सुख मिळते, गोडवा लाभतो तो काय अंगठा चोखून थोडीच कळणार आहे ? त्यासाठी आपले मस्तक दुस-याच्या पायांवर ठेवावे लागेल. तेव्हाच कळेल." एवढे बोलून नारायण उच्चार करीत नारदमुनी निघून गेले. हे ऐकून देवही विचारात पडले.    
पुन्हा सृष्टी निर्माण झाली. मत्स्य, कूर्म, वराह आदी अवतार झाले. नंतर श्रीभगवंत नववा बौद्ध अवतार घेऊन पंढरीत विटेवर प्रकटले. पुढे कलियुग सुरू झाल्यावर पुन्हा भगवंतच साक्षात् माउलींच्या रूपाने अवतरले. काही काळाने ते पंढरपूर येथे आपल्या भावंडांसमवेत दर्शनाला गेले. त्यावेळी माउलींनी श्रीपांडुरंगांच्या समचरणांवर मस्तक ठेवल्याबरोबर त्यांना त्या श्रीचरणांच्या अपूर्व गोडीचा अनुभव प्रथमत: आला व त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, "मुक्ते, अगं, तो वटपत्री शयन करणारा बालमुकुंद भगवंत आणि हा समचरण साजिरा पांडुरंग एकच आहे हो ! त्याच्या चरणांची गोडी मोठीच विलक्षण आहे !" त्याच आनंदानुभवातून माउलींना त्यांचा आयुष्यातला पहिला अभंग स्फुरला,
रूप पाहाता लोचनी ।
सुख जाले हो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥२॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनी विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचे आगर ।
बापरखुमादेविवर ॥४॥
अशी ही आपलीच अलौकिक श्रीचरणगोडी भगवंतांना अनुभवायला मिळाली ती माउलींच्या अवतारामध्ये !
भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू आणि त्यांचेच परिपूर्ण अवतार भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींचा आज जन्मदिवस ! तुम्हां आम्हां हरिभक्तांसाठी महान पर्वणी. ज्यांच्या संगतीत अवघी संत मांदियाळी विसावली; ज्ञानाने, आनंदाने भरून पावली व वारंवार नतमस्तक झाली; ज्यांची 'वाङ्मयी श्रीमूर्ती' असणारी भगवती श्री ज्ञानेश्वरी अनन्य भक्तांचे लळे आजही मायेच्या प्रेमाने निरंतर पुरवीत आहे; जे आपले "माउलीपण" आजही क्षणोक्षणी सार्थ ठरवीत आहेत, त्या ज्ञानियांचे राजे, कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींचे तुम्ही आम्ही पाईक आहोत, त्यांच्या 'अक्षर' शब्दब्रह्माची सुख-वाट चोखाळत परमार्थ करीत आहोत, हे आपले सर्वोत्तम परमभाग्य आहे ! या थोर भाग्याची इतर कशाशी कधीही तुलनाच होऊ शकत नाही !
http://rohanupalekar.blogspot.in ]
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्याशी एकदा अशीच चर्चा चालू असताना त्यांनी मला माउलींच्या प्रेमावेगाने एक अतीव मधुर गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले, "अरे, मंत्रशास्त्रात अक्षरांनाही लिंग असते. अ,आ हे पुल्लिंगी आहेत तर उ,ई हे स्त्रीलिंगी. त्यानुसार 'आई' या शब्दात दोन्ही ५०% येतात, तर 'माउली' या शब्दातही मातृत्वाचा डबलडोस आहे, तिथे पितृत्व ३३% आणि मातृत्व ६६% आहे. सद्गुरु श्री माउलींचे नामही असे मातृत्वाने परिपूर्ण आहे बघ !" आमच्या सद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या या अगाध मातृत्वावरून अवघे जग ओवाळून टाकले ना, तरी ते कमीच पडेल !
सद्गुरु श्रीमाउलींच्या "ज्ञानदेव" या चतुराक्षरी ब्रह्मनामाचे माहात्म्य सांगताना श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात, "ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो । वासुदेवचि होतो अखंड वदनी वदे तो ॥" मनोभावे, प्रेमादरे ज्ञानदेव नामजप करणा-याला साक्षात् देवच ज्ञान देऊन कृतार्थ करतात आणि जो त्याहीउपर ते नाम प्रेमपडिभराने सतत घेतच राहतो, तो सर्वांगाने वासुदेवच होऊन ठाकतो. काय अलौकिक आहे पाहा ज्ञानदेव-नाममहिमा !!!
थोर माउली-कृपांकित सत्पुरुष प.पू.डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे श्री माउली हे सर्वस्वच होते. ते कायम अतीव प्रेमादराने माउलींना "जगज्जीवन" या मधुर संबोधनाने गौरवीत. ते स्पष्ट म्हणत असत की, "कलियुगात एकमात्र देव म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज !" ते नुसतेच असे म्हणत नसत, तर त्यांच्या प्रत्येक कृतीत, विचारांत श्री माउलीच सर्वस्वाने भरून राहिलेले होते. सद्गुरु  श्री माउलींचीही आपल्या या लाडक्या दासावर अपार प्रेमकृपा होती. म्हणून तर त्यांची वाङ्मयी श्रीमूर्ती असणारी श्री ज्ञानदेवी प.पू.श्री.काका अक्षरश: जगत होते. त्यांनी आपले उत्तराधिकारी पू.बागोबा कुकडे यांना एकदा भावावेशात सांगितले होते की, "बागबा, या गोविंदाने माउलींची ओवी न् ओवी अनुभवलेली आहे !" माउलींच्या कृपेने पू.काका असे अंतर्बाह्य ज्ञानदेवमय होऊन ठाकलेले होते.
भगवान श्री माउलींच्या अलौकिक शब्दब्रह्माचे चपखल वर्णन करताना संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक व माउलींच्या कृपापरंपरेतील थोर सत्पुरुष प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या "श्रीज्ञानदेवांची शब्दकळा" या अप्रतिम ग्रंथात म्हणतात, "माउलींच्या वाणीला भगवती गंगेचा अवखळ ओघ आहे, यमुनेचे प्रेमातुर गांभीर्य आहे, हिमालयाची गूढरम्य शांतता आणि सकलतीर्थांचे अम्लान पावित्र्य आहे. या भौतिकतेतही, अलौकिकाची दीपावली साधकहृदयात उजळविणारी ही चित्कला केवळ अनुपमेय आहे. श्रीज्ञानेश्वरी, श्रीअनुभवामृत आदी सारस्वतातून, त्याच वाणीचा अमृतस्पर्श अपार वात्सल्यमय होऊन, आपल्या तान्हुल्यांना सुखपान्हा चोजवीत असतो. आमच्या मायमराठीचे केवढे हे भाग्य; की या वाणीने तिची वस्त्रभूषा स्वीकारून धन्य केली !
*या शब्दाला 'शब्द' तरी कसे म्हणावे? 'शब्दब्रह्म' म्हणूनही त्याचे अतर्क्य सामर्थ्य अस्पर्शच राहून जाईल. हा तर साक्षात् श्रीभगवंतांचाच करुणावतार !! या शब्दाला अनन्यगतिक होऊन भजणारा, तनुमनु-प्राणांची त्यावरून कुर्वंडी करणारा कुणी जर माउलींच्याच स्नेहमय अस्तित्वाचाच अविभाज्य अवयव होऊन राहिला; तर त्यात नवल ते कोणते ?*
अहो सद्गुरु माउलीराया ! अशा अमूर्त, अत्यद्भुत सृष्टीची रचना-संकल्पनाही जेव्हा विचारांच्या चौकटीत मावेनाशी होते, तेव्हा स्वत:च्या कोतेपणाची जाणीव होऊन कळते की आमची उंची तर जेमतेम आपली पवित्रमंगल श्रीचरणधुली मस्तकी घेण्याइतपतच आहे. हे परमसौभाग्य तरी थोडे कसे म्हणावे ?"
सद्गुरु श्री माउलींची कन्या होण्याचे महद्भाग्य लाभलेले प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज आपल्या एका नमनाच्या श्लोकात म्हणतात,
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम् ।
पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् ॥
"परमशांतीचेच स्वरूप असणारे साक्षात् पूर्णब्रह्म आणि निखिल आनंदस्वरूप अशा आळंदीपती भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांना सदैव नमन असो !"
भगवान श्री ज्ञानराज माउलींचे असे एकमेवाद्वितीयत्व पुरेपूर जाणल्यामुळेच, अत्यंत प्रेमादराने भगवान सद्गुरु श्रीमाउलींची फार भावपूर्ण स्तुती करताना श्री तुकोबाराय जणू आपल्याच सगळ्यांचे हृद्गत मांडतात की,
ज्ञानियांचा राजा गुरुमहाराव ।
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥
मज पामरा हें काय थोरपण ।
पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥
ब्रह्मादिक जेथें तुम्हां वोळगणें ।
इतर तुळणें काय पुढें ॥३॥
तुका म्हणे नेणें युक्तीची ते खोली ।
म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥
"सर्व ज्ञानियांचे श्रेष्ठ राजे असणारे गुरूणां गुरु श्री ज्ञानदेव माउली हे साक्षात् ज्ञानाचे देवच आहेत. आपल्यासमोर मजसारख्या पामरांनी काय थोरपण मिरवावे ? पायीच्या वहाणेने पायी राहावे, यातच भले असते. अहो देवा, ब्रह्मादिक देवताही जेथे तुमची सेवाचाकरी करण्यात धन्यता मानतात, तिथे इतरांची काय तुलना करावी ? तुमच्या युक्तीची व ज्ञानाची खोली जाणणे आमच्यासारख्यांच्या अवाक्याबाहेरचेच आहे, तेव्हा त्या फंदात न पडता मी आपला तुमच्या श्रीचरणीं अनन्यभावे मस्तक ठेवतो हेच बरे !"
खरोखरीच माउलीचरणीं अनन्यगतिक होऊन निरंतर दंडवत घालण्यातच अखिल जगाची दौलत सामावलेली आहे. त्यांचा कृपावरद कर पाठीवर फिरण्याच्या सौभाग्यासमोर तर परमेष्ठीपदही तुच्छ आहे. "माउलीमाये, कधी दया येणार गं तुला आमची ? तुझ्याशिवाय अंतरी कालवाकालव होते आहे फार ! लवकर ये आणि पदराखाली घे, भुकेने जीव व्याकूळ झाला आहे. ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायी । धांवोनिया येई दुडदुडा ॥"
पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू व त्यांचे अपरस्वरूप करुणाब्रह्म भगवान श्री ज्ञानेश्वर माउली यांच्याच करुणाकृपेने गेले सात दिवस आपण त्यांच्या गुणवर्णनाची सेवा करू शकलो आहोत. ही सर्व त्यांनीच करवून घेतलेली शब्दसेवा त्यांच्याच सकलतीर्थास्पद अम्लान श्रीचरणीं श्रीजन्माष्टमीदिनी, 'महाराज ज्ञानेश्वर माउली' या नामाच्या गजरात समर्पितो आणि अनंत अनंत दंडवत घालून तेथेच विसावतो !
सरतेशेवटी सद्गुरु श्री.शिरीषदादांच्याच वाणीचा आश्रय घेऊन श्री माउलींच्या श्रीचरणीं सर्वांच्या वतीने मनोभाव विदित करतो,
सागराची गाज शोभे तयापाशी ।
थेंबुटे आवेशी कोण काजा ॥१॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हांपुढे केवी ।
वाचाळी करावी लेकराने ॥२॥
बोबड्या उत्तरे रिझें जरी तात ।
अज्ञानाची मात कवणासी ॥३॥
मी तो अज्ञ पोर अंध पंगु मुके ।
उच्छिष्ट भातुके द्यावे माते ॥४॥
अमृतेसी काही ठावे नाही आन ।
मर्यादेचे मौन भले मानी ॥५॥
देवा माउलीराया, आपल्या श्रीचरणकृपेचे भातुके देऊन आपले  स्मरण सदैव राहावे एवढेच आमच्या मनीचे कोड पुरवावे हीच कळकळीची प्रार्थना !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली ।


10 comments:

  1. अति सुंदर अणि madhur

    ReplyDelete
  2. रोहनजी लेखअप्रतिम

    ReplyDelete
  3. अत्यंत सुंदर सादर वंदन

    ReplyDelete
  4. अप्रतिम,भावविभोर केले लेखनाने.बालमुकुंदांची गोष्ट आवडलीनमस्कार

    ReplyDelete
  5. सिद्धार्थ जोशी9/06/2023 5:42 pm

    🌲माऊली🌳🌿🌸🌹🙏

    ReplyDelete
  6. ।।राम कृष्ण हरि।।

    ReplyDelete
  7. खूपच छान.

    ReplyDelete
  8. खुपच सुंदर !

    ReplyDelete
  9. अप्रतीम

    ReplyDelete