17 Sept 2018

बिन राधा कृष्ण आधा

नमस्कार, आज श्रीराधाष्टमी !!
अनुत्तरभट्टारिका, व्रजनंदिनी, महारासेश्वरी, कृष्णमन्त्राधिदेवता श्रीकृष्णवल्लभा आदिशक्ती भगवती श्री श्रीराधाजींची जयंती !
बिन राधा कृष्ण आधा । असे महात्मे आवर्जून सांगतात. नुसते सांगतात नव्हे तर ती वस्तुस्थितीच आहे. शक्तीशिवाय 'शिव'ही 'शव'रूप होऊन जातात, असे भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजही म्हणतात.
पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंची आल्हादिनी दिव्यशक्ती म्हणजे अपर-श्रीकृष्णस्वरूपा भगवती श्रीराधा !
रा शब्दोच्चारणादेव स्फीतो भवति माधव: ।
धा शब्दोच्चारणादेव धावत्यैव ससम्भ्रम: ।
एखाद्याने अत्यंत प्रेमाने "राधा" नाम घ्यायचे ठरवून त्यातले नुसते "रा" उच्चारले की, भगवान श्रीकृष्णप्रभू अत्यंत उल्हासित, आनंदित होतात आणि पुढे "धा" म्हटल्याबरोबर त्या भक्ताच्या मागे मागे धावू लागतात, इतके त्यांचे श्रीराधाजींवर प्रेम आहे.
भगवान श्रीकृष्ण व भगवती श्रीराधाजी, हे जगातील अनादी-आद्य दांपत्य आहे. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली श्रीअनुभवामृताच्या पहिल्या ओवीत शिवशक्ती म्हणून यांनाच नमन करताना म्हणतात,
ऐसीं हे निरुपाधिके ।
जगाची जिये जनकें ।
तिये मियां वंदिली मूळिकें ।
देवोदेवी ।।अमृ.१.१।।
जगाच्या या आद्य माय-बापांच्या श्रीचरणीं सादर दंडवत प्रणाम घालून ते आपला अमृतानुभव कथन करीत आहेत; कारण तो यांच्याच अलौकिक प्रेमलीलेचा विलास आहे. ही प्रेमलीलाच खरा अमृतानुभव असून तोच अद्वितीय रसानंद माउली श्रीसद्गुरुकृपेने निरंतर आस्वादत आहेत व मोठ्या करुणेने त्यांनी तोच आपल्यालाही कथन केला आहे.
"श्रीराधा" हे श्रीभगवंतांइतकेच अगम्य, बोलाबुद्धीच्या पलीकडले चिरंतन तत्त्व आहे. श्रीभगवंतांची माया सर्व ठिकाणी कार्यरत आहे, पण केवळ राधा या एकाच ठिकाणी ती टिकत नाही. उलट मायेचे साक्षात् अधिपती असणारे भगवंतही ज्या मायेने मोहित होतात, ती "स्वमोहिनी माया" म्हणजेच श्रीकृष्णप्रेमस्वरूपा श्रीराधाजी होत. म्हणूनच त्यांच्या समोर श्रीभगवंतांचे देखील काहीही चालत नाही.
श्रीभगवंतांची साक्षात् कृपाशक्ती म्हणजे श्रीराधा !  म्हणून श्रीराधाजींची कृपा झाल्याशिवाय श्रीकृष्णस्वरूपाचे कधीच पूर्ण आकलन होऊ शकत नाही, असे महात्मे म्हणतात. राधातत्त्व हे मानवी बुद्धीच्या कक्षेत कधी मावणारच नाही, तेवढी झेपच नाही आपल्या कोत्या बुद्धीची. या दिव्यपावन तत्त्वाची सद्गुरुकृपेने अनुभूती नक्की येते, पण या तत्त्वाचे कोणालाही कधीही पूर्णपणे आकलन होऊ शकत नाही.
भक्तिशास्त्रामध्ये वर्णिलेला, सर्व सात्त्विक भावांचा परमोत्कर्ष असणारा महाभाव अतीव दुर्लभ  म्हणून सांगितलेला आहे. श्रीकृष्णप्रेमाराधिका श्रीराधाजी या साक्षात् महाभावरूपिणीच आहेत. त्या विलक्षण महाभावावर केवळ श्रीराधाजीच एकमेव आरूढ होऊन निरंतर ती प्रेमलीला आस्वादतात.
श्रीकृष्णप्रेमाचे ऊर्जस्वल लखलखीत सगुणसाकार रूप म्हणजे श्रीराधा ! प्रेममयता हेच त्यांचे स्वरूप आहे आणि तेच अनन्य व विशुद्ध प्रेम हे त्यांच्यापर्यंत पोचण्याचे एकमात्र साधनही आहे. शिवाय त्या प्रेमाची प्राप्ती व्हायला देखील त्यांचीच कृपा व्हावी लागते. तिथे ना आपले पुण्य कामी येते ना आपले साधन. निरंतरकरुणामय श्रीराधाजींची ती देवदुर्लभ करुणाच असे अत्यद्भुत प्रेमदान देऊ शकते. म्हणूनच महात्म्यांनी त्यांना 'स्वसंवेद्य' म्हटलेले आहे. भक्तिप्रांतात त्यांच्या करुणाकृपेला कसलेही परिमाण नाही नि कोणतेही उपमान नाही. यास्तव एकमेवाद्वितीय अलौकिक असे श्रीराधातत्त्वच सर्वश्रेष्ठ, सर्वत्रवरिष्ठ म्हटलेले आहे.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
श्रीभगवंतांची अविरत, अखंड वाहणारी प्रेमगंगा म्हणजे श्रीराधा ! कृष्णप्रेम'धारा' हीच लीलेस्तव 'राधा' झालेली आहे. म्हणूनच राधा हे पुराणातले काल्पनिक पात्र आहे असे म्हणणा-या क्षुद्र दुर्बुद्धी जीवांची करावी तेवढी कीव कमीच आहे. अत्यंत दिव्य अशा राधाकृष्ण-प्रेमाचा, लौकिक व शारीरिक प्रेमाच्या स्तरावर विचार करणारे महाभागही त्याच लायकीचे. बरोबरच आहे म्हणा, काविळ झाली की जग पिवळेच दिसणार ! आपल्या श्री माउली-नामदेव-एकनाथ-तुकारामादी सर्व संतांनी काय उगीचच काल्पनिक श्रीराधाजींचे वर्णन केलेले आहे काय? अहो, जे बोलतील ते खरे करून दाखविण्याचे जबरदस्त सामर्थ्य या सर्वांच्या अंगी जन्मत:च आहे, ते कशाला खोटे बोलतील? आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहेच.
मग श्रीराधाजींचा श्रीमद् भागवतात उल्लेख का नाही? याही आक्षेपाचे सविस्तर खंडन पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या 'म्हाराँ रि गिरधर गोपाल' या ग्रंथात केलेले आहे. ज्यांचा 'काम' शरीराची मर्यादाच सोडू शकत नाही असे 'सकाम' जीव, सेवन करणा-यांच्या चित्तातली समूळ कामना व कामभावनाही नष्ट करणारा, श्रीराधा-दामोदरांचा अशरीरी परमप्रेममय असा हा अलौकिक 'काम' काय जाणू शकणार? ते त्यांचे कामच नव्हे ! श्री माउली म्हणतात त्याप्रमाणे, 'बकाकरवी चांदणे चरवू पाहण्या'सारखाच प्रकार ठरणार हा. असो, आपल्याला काय घेणे-देणे त्या स्वहित न जाणणा-यांशी? आपण श्रीकृपेने लाभलेले हे प्रेमास्वादन कसल्याही परिस्थितीत थांबवू नये हेच इष्ट.
श्रीराधा-मधुसूदनांचे प्रेम समजण्यासाठी पूर्णत: निर्वासन होणे आधी आवश्यक आहे. त्यामुळेच आजवरच्या सर्व प्रेमरंगी रंगलेल्या महात्म्यांनी ह्या विशुद्ध प्रेमलीलेची चर्चा किंवा विवेचन उघडपणे केलेले दिसत नाही. जो विषय आकलनाच्या बाहेरचा आहे, तो अनधिकारी लोकांना उगीचच समजावत बसण्याचा व्यर्थ खटाटोप हे पूर्णज्ञानी महात्मे चुकूनही करत नाहीत. म्हणूनच श्रीराधाजींचा उल्लेखही पूर्वीच्या वाङ्मयात अभावानेच केलेला आढळतो. केवळ श्रीमद् देवीभागवतातच भगवती श्रीराधाजींच्या तात्त्विक स्वरूपाचा सुरेख ऊहापोह केलेला दिसून येतो.
श्रीराधातत्त्वाच्या दिव्य प्रेमलीलेचा सर्वांगीण विचार करावयाचा झाल्यास, प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचा "म्हाराँ रि गिरधर गोपाल" हा ग्रंथराज; आणि प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांची, अाजवर कधीही न ऐकलेल्या अपूर्व व्रजकथांचा अनोखा खजिना पोटी मिरवणारी विविध अभंग निरूपणे अभ्यासणेे आवश्यकच आहे. या ग्रंथांतून जे अद्भुत व अफाट असे श्रीराधातत्त्व आणि त्या तत्त्वाची एकरस कृष्णप्रेमलीला आपल्यासमोर प्रकटते, ती अंतर्बाह्य स्तिमित करणारी, मोहवून टाकणारीच आहे. ती मधुमधुर प्रेमगोडी आपल्याही चित्तात तत्काळ निर्माण करण्याचे लोकविलक्षण सामर्थ्य या ग्रंथांमध्ये पुरेपूर भरलेले आहे; हाही एक 'श्रीराधामाधव लीलाविलास'च म्हणायला हवा.
भगवती श्रीराधाजींनीच, पूर्वेला श्रीकृष्णचैतन्य महाप्रभू, पश्चिमेला श्रीकृष्णप्रेमप्रिया श्रीमीराबाई, दक्षिणेत श्रीसंत आंदाळदेवी तथा कोदई, असे अनेक अवतार धारण करून श्रीकृष्णप्रेमाचा अलौकिक प्रसाद भाविकभक्तांना प्रदान केला. चतुर्थ श्रीदत्तावतार श्रीसंत माणिकप्रभू महाराजांच्या ठायी देखील याच श्रीराधातत्त्वाचा प्रसन्न आविष्कार पाहायला मिळतो. श्री हनुमानप्रसादजी पोद्दार यांनी आपल्या 'श्रीराधामाधव चिंतन' या सुरेख ग्रंथामधूनही श्रीराधा-मधुसूदन प्रेमलीलेचा मनोहर आस्वाद घेतलेला आहे.
श्रीमन्निम्बार्क महामुनींद्रांनी रचलेले श्रीराधाष्टकम् हे सुंदर स्तोत्र श्रीराधाजींच्या महिम्याने ओतप्रेत भरलेले आहे, अतीव गोड आहे. ते म्हणतात, "हे राधिके, भगवान मुकुंदांना आपल्या प्रेमरज्जूने आपण असे बांधले आहे की ते सदैव आपल्याच भोवती अनुभ्रमण करीत असतात. दुराराध्य असे श्रीकृष्णप्रभू आपण आपल्या महाप्रेमाने पूर्णत: वश करून घेतलेले आहेत, त्या अद्भुत आराधनेमुळेच आपण 'राधा' झालेल्या आहात. आपल्या या प्रेममय सच्चिदानंद रूपाला माझे अनंत दंडवत असोत !"
श्रीनिम्बार्क प्रार्थना करतात,
सदा राधिकानाम जिव्हाग्रतो स्यात्सदा राधिका रूपमक्ष्यग्र आस्ताम् ।
श्रुतौ राधिकाकीर्तिरन्त:स्वभावे गुणा राधिकाया: श्रिया एतदीहे ॥८॥
"भगवती श्रीराधिके, आपले पावन नामच सदैव माझ्या जिव्हाग्रावर वसावे, आपले हे पावन रूपच सदैव माझ्या नेत्रांसमोर असावे, आपल्या पुण्यप्रद कीर्तिश्रवणाने माझे कान सदैव पावन व्हावेत आणि आपल्या गुणांच्या, लीलेच्या अखंड चिंतनाने माझे अंत:करण संपन्न व्हावे, हीच आपल्या श्रीचरणीं कळकळीची प्रार्थना !"
भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंच्या या अलौकिक व परम अद्भुत श्रीअर्धांगिनी रूपाचे, कृष्णाभिन्ना श्रीराधाजींचे श्रीचरण हेच, खरी भक्ती प्राप्त व्हावी असे वाटणा-या आपल्यासारख्या सर्वांसाठी निरंतर आराधनायोग्य, सेवनयोग्य आहेत. पण तेथेच सतत रममाण होऊन राहण्यासाठीही त्यांचीच कृपा हवी. म्हणून तीच पराभक्तिप्राप्तीची प्रेमप्रार्थना आजच्या परमपावन श्रीराधाष्टमी पर्वावर आपण आदरपूर्वक श्रीराधाकृष्ण नामाच्या जयघोषात श्रीराधागोविंद-युगुल श्रीचरणीं करूया व धन्य होऊया !!
मनुआ भूल मत जैयो राधारानीके चरण ।
राधारानीके चरण महारानीके चरण ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


14 comments:

  1. अतिशय सुंदर व प्रेममय लेख, डोळे भरून आले, राधे राधे 🙏🌺🌸

    ReplyDelete
  2. अतिशय भावस्पर्शी लेख...
    राधे राधे 🙏🙏🙏💐💐💐

    ReplyDelete
  3. धन्य ती राधा जिला साक्षात परब्रह्म कृष्णाचे अपूर्व दिव्य प्रेम आणि सहवास लाभला,त्याना त्रिवार वन्दन

    ReplyDelete
  4. खूप सुंदर माहिती.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  5. खूप छान शब्दालंकारांनी नटलेला लेख.
    जय राधे.

    ReplyDelete
  6. शब्दालंकारांनी नटलेला खूप सुंदर लेख.
    जय राधे!

    ReplyDelete
  7. खूप छान लेख आहे

    ReplyDelete
  8. प.पू.श्रीकांत आणि श्रीराधाजींच्या परम पावन सुकोमल चरणी साष्टांग दंडवत. तुझे सर्व लेख वाचनीय, नवीन माहितीपूर्ण, उद्बोधक,आचरणात आणायलाच पाहिजेत असे आहेत.

    ReplyDelete
  9. अंजू अत्रे

    ReplyDelete
  10. खूप छान निरूपण, त्यामुळे श्रीराधा ही संकल्पना स्पष्ट झाली

    ReplyDelete