22 Sept 2019

सद्गुरु श्री गोविंदकाका उपळेकर महाराज पुण्यतिथी

आज भाद्रपद कृष्ण अष्टमी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज यांची ४५ वी पुण्यतिथी !
राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील महान विभूतिमत्व आणि भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे पूर्णकृपांकित सत्पुरुष, सद्गुरु श्री.गोविंदकाका महाराज उपळेकर हे फार विलक्षण महात्मे होते. सदैव आपल्याच अवधूती अवस्थेत रममाण असणारे प.पू.श्री.काका श्री माउलींच्या श्री ज्ञानेश्वरीची ओवीन् ओवी अक्षरश: जगत होते.
गेल्या वर्षी आजच्याच तिथीला, प.पू.श्री.काकांच्या पावन स्मृतिकथा व चरित्रावर आधारित स्वानंदचक्रवर्ती हे सुंदर पुस्तक प्रकाशित झाले. त्याबरोबर तरुणांसाठी संतांनी केलेल्या मौलिक उपदेशांवर आधारित जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा हेही पुस्तक प.पू.काकांच्या समाधी समोर प्रकाशित झाले. वर्षभरात या दोन्ही ग्रंथांची आवृत्ती जवळपास संपत आलेली आहे. वाचकांनी या दोन्ही ग्रंथांचे मनापासून स्वागत व कौतुक केले, ही माझ्यावर बरसलेली श्रीसद्गुरुकृपाच आहे !
स्वानंदचक्रवर्ती ग्रंथाच्या प्रस्तावनेत प.पू.सद्गुरु श्री.काकांचे माहात्म्य यथार्थ शब्दांत सांगताना, श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.श्री.शिरीषदादा कवडे लिहितात, "विसाव्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या अग्रगण्य भगवद् विभूतींमध्ये पू.उपळेकर काकांची गणना होते. पू.काका संतत्वाचा उत्तुंग आदर्श होते. लौकिकातल्या कुठल्याही प्रसंगांत त्यांच्या अंत:करणाची ब्रह्मबैसका सुटलेली दिसत नसे. ते स्वानंदसाम्राज्याचे चक्रवर्ती सम्राटच होते. प्राप्त पुरुषाची ती समग्र दैवी सुलक्षणे त्यांच्या ठायी सुखाने, आपलेपणाने तिन्ही त्रिकाळ नांदत होती. सहज, अखंड समाधीचे शांभवी वैभव त्यांच्या सर्व लीलाव्यवहारांमधून सदैव ओसंडत असे. हे पुस्तक चित्ताकर्षक झालेले असून वाचकाला भावविभोर व अंतर्मुख करणारे आहे. एकंदरीत स्वानंदचक्रवर्ती हे समग्र पुस्तकच अत्यंत वेल्हाळ, वाचनीय आणि मननीय झालेले आहे !"
[ प.पू.सद्गुरु श्री.काकांचे दिव्य चरित्र आणि कार्य यावरील लेख खालील लिंकवर जाऊन आपण वाचवा. त्याद्वारे आजच्या पावन तिथीला प.पू.काकांच्या चरणीं आपण सप्रेम आदरांजली वाहू या !
तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं चूडारत्न
https://rohanupalekar.blogspot.com/2016/04/blog-post.html ]
प.पू.श्री.काकांनी मंगळवार दि.८ ऑक्टोबर १९७४ रोजी आजच्याच तिथीला सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यापूर्वी साधारणपणे दीड-दोन महिने आधी फलटणला एक प्रसंग घडला. पू.काकांच्या दर्शनाला कै.श्री.ज्ञाननाथजी रानडे व काही मंडळी फलटणला आली होती. प.पू.काका आपल्याच अवस्थेत असले तरी फार सूचक वाक्ये बोलून जात. तसेच त्यावेळी क्रिकेट खेळाचा संदर्भ घेऊन प.पू.काका अचानक उद्गारले, "कशी झाली मॅच ? खेळाडू धावपट्टीवर येतो, खेळतो. जेवढा दम असेल तेवढी फटकेबाजी करून धावा काढतो. त्यातही प्रेक्षकांना आपली कलाकुसर दाखवतो. बॉल टाकल्यावर त्याचा झेल देऊन आऊट होणे चांगले. स्टंप मारून किंवा उडून आऊट (क्लीन बोल्ड) होण्यात काय मजा आहे ? हा चेंडू-फळीचा खेळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापासून तो श्रीकृष्णदेवांपर्यंत (प.पू.काकांचे सद्गुरु) आम्ही खेळत आलेलो आहोत. खेळ खेळ म्हणून खेळायचा, त्याला भ्यायचे नाही. हाच खेळ सर्व संत मंडळींसमवेत खेळत राहावयाचा आहे ! खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई हो ।"
वरकरणी अतिशय गूढ वाटणारे हे पू.श्री.काकांचे बोल अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यातून त्यांनी आपल्या दैवी जन्मकर्माचे व अलौकिक देहत्यागाचे रहस्यच सांगून टाकलेले आहे. या संदर्भात मी प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्याशी बोललो होतो. त्यांनी प.पू.काकांच्या या वाक्यांचा अद्भुत अर्थ सांगितला होता. तो असा की, "प.पू.श्री.काका हे श्रीभगवंतांच्या आज्ञेने लोकांच्या उद्धारासाठीच जन्माला आलेले होते. "आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी ।" ह्या श्री तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पू.काकाही पृथ्वीतलावर कार्यासाठीच आलेले होते. त्याअर्थाने ते भगवान श्रीकृष्णांचे खेळ-सवंगडीच होते. क्लीन बोल्ड होणे म्हणजे काळाने टाकलेल्या बॉलवर आऊट होणे, यमाच्या इच्छेने मृत्यू येणे. पण काळाच्या बॉलवर झेल (कॅच) देणे म्हणजे त्या काळाला फाट्यावर मारून स्वत:च्या इच्छेने देहत्याग करणे. ह्या प्रक्रियेत संत निष्णातच असतात. ते कधीच काळाच्या अधीन नसतात. एरवी दुर्लंघ्य असा काळ त्यांच्यासमोर मात्र कायमच हतबल असतो. आम्ही म्हणू तेव्हा आम्ही जाऊ, काळ आला म्हणून आम्ही आमची विकेट टाकणार नाही, असेच संत म्हणतात. ते यमाची बॉलिंग तर चोपूनच काढत असतात. त्यांची विकेट काढायची कोणाची ताकद आहे ?"
प.पू.श्री.काकांनी देखील असा आपल्या इच्छेने ठरवूनच देहत्याग केला होता. त्यामागचे कारणही खूप विशेष आहे. ८ ऑक्टोबर ही त्यांच्या सद्गुरूंची, प.पू.श्रीकृष्णदेव महाराजांची देहत्यागाची तारीख होती. ८ ऑक्टोबर १९२३ रोजी सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांनी देहत्याग केला होता. म्हणूनच परम गुरुभक्त असणाऱ्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी देखील आधी ठरवून ८ ऑक्टोबर याच तारखेला, आपल्याच इच्छेने नश्वर देहाची खोळ सांडली. आपल्या इच्छामरणाचाच सूचक संकेत प.पू.श्री.काकांनी क्रिकेटच्या संदर्भाने आलेल्या वरील वाक्यांत दिलेला नाही का ?
सद्गुरु श्री गोविंदकाका महाराज की जय !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( स्वानंदचक्रवर्ती व जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा या ग्रंथांसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा हा विनंती.)

0 comments:

Post a Comment