7 Oct 2018

हा देवांचाही देव जाणिजे

साक्षात् परब्रह्म राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या शिष्य-परंपरांमध्ये फार तयारीचे महात्मे होऊन गेलेले आहेत. आपल्या अवधूती आनंदामध्ये स्वच्छंद विहार करणारे हे सर्व स्वामीशिष्य अलौकिक अधिकाराचे धनी होते. या श्रेयनामावलीमध्ये पूर्णत: अप्रसिद्ध असे एक थोर विभूतिमत्त्व म्हणजे, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावचे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज हे होत. हेच प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे सद्गुरु ! आज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, ७ ऑक्टोबर रोजी त्यांची ९५ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या अद्भुत चरित्राचे हे सादर स्मरण !  
शके १७७९ म्हणजे इ.स.१८५७ साली पुसेसावळी येथील राक्षे आडनावाच्या परीट घराण्यात पूजनीय श्रीकृष्णदेवांचा जन्म झाला. वयाच्या ८-१० व्या वर्षी गावातील एक भीषण प्रसंग पाहून त्यांची वृत्ती एकदम पालटली व ते घरदार सोडून, दिगंबर अवस्थेत जंगलात राहू लागले. त्यांच्या वृत्ती अंतर्मुख झाल्या. त्याच सुमारास पलूस येथील सद्गुरु श्री.धोंडीबुवांनी स्वत: येऊन एके दिवशी श्रीकृष्णदेवांना अनुग्रह केला. त्यानंतरच ते पूर्णपणे नि:संग होऊन खडतर तपश्चर्येत निमग्न झाले. बालोन्मत्त वृत्तीने राहू लागले. एका पायावर तासन् तास उभे राहणे, तीन तीन तास पाण्याखाली बसून राहणे, दिवस दिवस तापलेल्या वाळूत पडून राहणे अशा कठीण साधनांचा अवलंब करून त्यांनी आपल्या देहाचे ममत्व संपूर्णपणे टाकून दिले. या खडतर साधनेने अंतरात प्रकटलेल्या वैराग्यअग्नीने त्यांचे अंत:करण सोन्यासारखे शुद्ध झाले. सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेने लाभलेल्या कृपाशक्तीच्या अनुसंधानामुळे त्यांचे साधन पूर्णत्वाला जाऊन ते सदैव आत्मस्वरूपी निमग्न राहू लागले. सद्गुरु श्री.धोंडीबुवांनी आपल्या भक्तांना सांगून ठेवले होते की, "आमच्या पश्चात् पुसेसावळीच्या कृष्णाला आमच्या गादीवर बसवा व आमचेच स्वरूप मानून त्याची सेवा करा !" त्याप्रमाणे श्री धोंडीबुवांनी देह ठेवल्यावर १९०८ साली त्यांच्या भक्तांनी सद्गुरु श्रीकृष्णदेवांना समारंभपूर्वक पलूसच्या गादीवर बसवले. पण अवघ्या दोनच दिवसात सद्गुरु श्रीकृष्णदेव ते वैभव सोडून रात्रीच पुन्हा पुसेसावळीला निघूून आले. ते परत कधी त्या गादीकडे गेलेच नाहीत. त्यांच्या परम वैराग्य-स्थितीला तो संपन्न सरंजाम थोडीच मानवणार होता ?
श्रीकृष्णदेव महाराज अत्यंत मृदू बोलत. ते खूप कमी बोलत, पण बोललेच तर ऐकणा-याला कानांवर अमृत पडते आहे असेच वाटे. रोज सकाळी ओढ्यावर स्नान झाल्यावर ते चराचराला सद्गुरुरूप मानून वंदन करीत. स्नानही दोन दोन तास चाले. त्याआधी मातीचे ढेकूळ घेऊन ते दात घासायला बसत. पूर्ण ढेकूळ संपेपर्यंत दात घासणे चालूच राही. लौकिक क्रियांमधूनही त्यांचे आतून श्रीभगवंतांशी अनुसंधान लागलेले असे. त्यामुळे बाह्यत: ते वेडगळपणा करीत आहेत असे वाटले, तरी तेही त्यांचे एक प्रकारचे साधनच होते. कोणी काही दिले तर मुकाट्याने खात, पण स्वत:हून कोणाकडे मागत नसत. आयाचित, सुडके इत्यादी भक्तांच्या घराच्या पडवीत रात्रीचा मुक्काम करीत. बाकी दिवसभर आपल्याच तंद्रीत फिरत असत. कुळथाचे माडगे त्यांना विशेष आवडत असे.
ब-याचवेळा गावातील मारुतीच्या मंदिरात बसून ते हनुमंतरायांशी प्रेमसंवाद करीत असत. वेळ असला तर मंगळवारी औंधच्या श्रीयमाईच्या दर्शनालाही जात. त्यांचा उपलब्ध एकमेव फोटो हा औंध संस्थानच्या घोड्याच्या पागेत एका झाडाखाली बसून काढलेला आहे. श्रीकृष्णदेव महाराज चांगले उंचपुरे, राकट व श्यामवर्णाचे होते. चेह-यावर बालसुलभ प्रेमळ भाव असत. त्यांच्या सा-या हालचाली अवधूती मस्तीत, आपल्याच आनंदात घडत असत.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज १९२० साली प्रथम त्यांच्या सेवेत रुजू झाले तेव्हा देवांना भगेंद्र झाले होते. त्या जखमेत किडे झालेले, पण देवांना त्यांचे काहीच सोयरसुतक नव्हते. देहाचेच जिथे भान नाही, तिथे व्यथा वेदना कळणार तरी कशा ? पू.काका तर निष्णात डॉक्टर, त्यांना ते बघवत नसे. ते देवांना पाठुंगळीवर घेऊन सरकारी दवाखान्यात नेत व ड्रेसिंग करीत. देव प्रचंड विरोध करीत, प्रसंगी पू.काकांना चोपही देत. म्हणत, "त्यांनी माझे अंग खाल्ले तर तुझे काय जाते ? खाऊ देत त्यांना, नाहीतरी कधीतरी जाणारच आहे हे !" पण पू.काकांनी निष्ठेने सेवा करून त्या दुखण्यातून देवांना बाहेर काढले. हीच त-हा पायाला झालेल्या नारूची पण होती. देहबुद्धीचा पूर्ण निरास झाल्याने, सदैव परमहंस स्थितीत विचरण करणारे श्रीकृष्णदेव महाराज हे खरोखरीच मोठे विलक्षण विभूतिमत्त्व होते.
पूजनीय गोविंदकाका उपळेकर महाराजांनी आपल्या या अद्भुत सद्गुरूंचे, 'श्रीकृष्णदेव' या नावाचे फार सुंदर चरित्र लिहिलेले आहे. त्यातील सर्व हकिकती वाचताना आपल्याला आतूनच भरून येते. 
श्रीकृष्णदेव महाराजांच्या दिव्य अधिकाराची एक गोष्ट पू.काका सांगतात. एकेदिवशी परळीचे बापू महाराज आपला सर्व लवाजमा घेऊन पुसेसावळीला आले होते. त्यांनी श्रीकृष्णदेवांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. खूप शोधूनही श्रीकृष्णदेव काही सापडलेच नाहीत. पण नंतर कुठूनतरी अचानक देव त्यांच्यासमोर आले व मांडी घालून खाली मान घालून स्वस्थ बसून राहिले. बापू महाराजांनी दोन तीनदा विचारले, "देवा, कुठे पाहता?" पण श्रीकृष्णदेवांनी काहीच उत्तर दिले नाही. पुन्हा तेच विचारल्यावर एकदम जोरात म्हणाले, "कुणीकडे बघतोय ? पड्याल बघतोय पड्याल !" हे उत्तर ऐकल्यावर बापू महाराजांनी श्रीकृष्णदेवांना दंडवत घातला व लोकांना त्यांच्या वाक्याचा अर्थ सांगितला की, "पड्याल म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या चार वाणींच्या पलीकडे असणा-या, अनिर्वचनीय परब्रह्मतत्त्वाचे दर्शन-चिंतन करतोय ! " केवढा मोठा अधिकार होता पहा श्रीकृष्णदेव महाराजांचा !!
आपल्याच ब्रह्मानंदात अखंड निमग्न असणारे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील तेजस्वी रत्न होते. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांवर कृपा करण्याचे आपले कार्य पूर्ण झाल्यावर त्यांनी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी, भाद्रपद कृष्ण त्रयोदशी दि.८ ऑक्टोबर १९२३ रोजी गावाजवळच्या ओढ्यात मध्यान्ही जलसमाधी घेतली. आदल्या दिवशीच त्यांनी, "उद्या आमचा महाळ करा" , असे निकटच्या लोकांना सांगून ठेवले होतेच. त्यांच्या पावन देहाला ओढ्याच्या काठाजवळच समाधी देण्यात आली. आज त्यावर सुरेख मंदिर बांधलेले असून ते भक्तांवर मायेची कृपासावली घालीत आहे. याच वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून, आता मंदिराला फार देखणे रूप आलेले आहे.
एक अत्यंत आश्चर्याची गोष्ट म्हणजे प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी देखील त्यानंतर बरोबर ५१ वर्षांनी, ८ ऑक्टोबर १९७४ रोजीच आपला देह त्यागला. पू. काकांनी आधी ठरवून आपल्या श्रीसद्गुरूंच्याच तारखेला देहत्याग करून आपली अद्भुत गुरुभक्तीच जणू श्रीगुरुचरणीं समर्पित केलेली दिसून येते. हे दोघेही गुरु-शिष्य फारच विलक्षण होते.
आज सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांच्या ९५ व्या समाधिदिनी, ही चरित्रस्मरणरूपी सेवा आपण त्यांच्या श्रीचरणीं समर्पून धन्य होऊ या.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


8 comments:

  1. प पू कृष्णदेव माहाराजाना शतदा दंडवत

    ReplyDelete
  2. अदभुत

    ReplyDelete
  3. श्री सद् गुरवे नमः

    ReplyDelete
  4. अतिशय उत्तम लेख

    ReplyDelete
  5. अद्भुत

    ReplyDelete
  6. रोहन, छान स्मरण निबंध. श्रीपरमगुरू कृष्ण देव तथा सद्गुरू काकांना सादर दंडवत//

    ReplyDelete