3 Dec 2017

वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम्

भगवान श्रीदत्तप्रभू हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत. जगन्नियंत्या श्रीभगवंतांचे अभिन्न गुरुस्वरूप म्हणजे श्रीदत्तप्रभू. म्हणूनच त्यांना ' जगद्गुरु ' म्हणतात. आज मार्गशीर्ष पौर्णिमा हे भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीचे पावन पर्व आहे.
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अवताराचे रहस्य सांगताना प.पू.योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीदत्तात्रेय अवतार ' हा चिरंजीव का आहे? तर, ' अज्ञान ' नावाचा राक्षस मारल्याशिवाय श्रीदत्तगुरूंना जाता येणार नाही; व अज्ञान हे अनंत काळापर्यंत राहणार. म्हणून हा अवतार चिरंजीव आहे. "
अज्ञान नष्ट करणे हेच श्रीगुरुतत्त्वाचे प्रधान कार्य आहे. या अज्ञानामुळेच जीव आपले मूळचे ब्रह्मस्वरूप विसरून मायेच्या कचाट्यात सापडून दु:ख भोगत असतो. दु:खी कष्टी जीवांचा कळवळा येऊन श्रीभगवंतच श्रीदत्तप्रभूंच्या रूपाने प्रकट होतात व योग्य वेळ आलेल्या जीवांवर कृपा करून त्याना आत्मबोध करतात. या कार्यासाठी श्रीदत्तप्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्रीगुरु म्हणून पुन्हा पुन्हा अवतरित होतात. ही परंपरा आजही अक्षुण्ण चालूच आहे.
श्रीभगवंतांचे अवतार ज्या कार्यासाठी होतात, ते कार्य पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात विलीन होऊन जातात. पण श्रीदत्तप्रभूंच्या अवताराचे तसे नाही. जोवर माया आहे तोवर अज्ञान आहेच व तोपर्यंत श्रीदत्तप्रभूंचे कार्य पूर्ण झालेले नसल्याने ते कार्यरत राहणारच. म्हणूनच प.पू.श्री.मामा श्रीदत्तप्रभूंना ' चिरंजीव अवतार ' म्हणतात. आज याच चिरंजीव अवताराचा प्रकटदिन होय !
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अलौकिक स्वरूपाची काही विलक्षण वैशिष्ट्ये आहेत. श्रीदत्तप्रभू हे भगवान ब्रह्मा, विष्णू व महेशांचे एकत्रित स्वरूप आहेत. त्यांच्या सहा हातांमध्ये तिघांची प्रत्येकी दोन आयुधे मिळून सहा आयुधे आहेत. त्यांच्या हातांचे व त्यातील शस्त्रांचे मार्मिक रहस्य सांगताना प.पू.श्री.मामा म्हणतात, " भगवान श्रीदत्तात्रेयांचे सहा हात हे सहा शास्त्रांचे निदर्शक आहेत. हातातील माळ - जपासाठी, डमरू - व्याकरण आदी शास्त्रे शिकवण्यासाठी, शंख - ज्ञान देण्यासाठी. "
श्रीदत्तप्रभूंचे तीन हात भक्तांसाठी आहेत तर तीन हात अभक्तांसाठी, शत्रूंसाठी आहेत. भक्तांसाठी असलेल्या उजवीकडील तीन हातांपैकी, सर्वात खालच्या हातात त्यांनी ब्रह्मदेवांचे आयुध असणारी जपाची 'माळ' धारण केलेली आहे. आपल्या भक्तांना सतत नामस्मरण करण्याचा त्याद्वारे श्रीदत्तप्रभू बोध करतात.
मधल्या हातात 'डमरू' हे शिवांचे आयुध आहे. त्याचा वापर व्याकरणादी शास्त्रे शिकवण्यासाठी होतो. व्याकरण शास्त्राची मूळ सूत्रे भगवान शिवांनी डमरूच्या नादातूनच निर्माण केलेली आहेत.
सर्वात वरच्या हातात भगवान विष्णूंचे 'शंख' हे आयुध आहे. या शंखाच्या स्पर्शाने भगवंत शिष्यांना ज्ञानदान करतात. ध्रुवबाळाच्या गालाला आपल्या हातातील शंखाचा स्पर्श करून श्रीभगवंतांनी ज्ञान दिल्याचा उल्लेख भागवतात व श्री ज्ञानेश्वरीत आहे.
या तिन्ही हातांचा व त्यातील आयुधांचा, जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभू आपल्या शरणागत शिष्यांवर कृपाप्रसाद करण्यासाठीच उपयोग करतात. 
जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभूंचे सहा हात हे सहा शास्त्रांचे, षड्दर्शनांचे प्रतीक आहेत. कपिलमुनींचे सांख्य, कणादांचे वैशेषिक, पतंजलींचे योग, न्याय, मीमांसा व वेदान्त ही सहा दर्शने अथवा शास्त्रे आहेत. साक्षात् परब्रह्म भगवान श्रीदत्तप्रभू हे जगद्गुरु असल्याने ही सर्व शास्त्रे जणू त्यांच्या पावन देहाचे अवयवच आहेत.
या सहा हातांपैकी, उजवीकडील तीन हात हे भक्तांसाठी अाहेत. उजवी बाजू आपल्याकडे पवित्र मानली जाते. तसे भक्तांना देवांकडे प्रथम मान आहे, म्हणून त्यांना उजवी बाजू दिलेली आहे. तर डावीकडील तीन हात हे अभक्तांसाठी, दुष्टांसााठी आहेत. या तिन्ही हातांतील शस्त्रे ही दुष्टांना शासन करण्यासाठी आहेत. यांचे रहस्य सांगताना प.पू.श्री.मामा म्हणतात, " भगवान श्रीदत्तात्रेयांचे डावीकडील तीन हात अभक्तांसाठी, दुष्टांसाठी आहेत. कमंडलू - पाणी मारून वैरी नाशासाठी, त्रिशूळ - दूर असलेल्‍या शत्रूला मारण्यासाठी, चक्र - फारच दूरच्या दुष्ट शक्तींना मारण्यासाठी."
श्रीदत्तप्रभूंनी डावीकडील सर्वात खालच्या हातात ब्रह्मदेवांचे 'कमंडलू' हे आयुध धारण केलेले आहे. यातील पाणी मारून ते धर्माचे व सज्जनांचे तसेच भक्तांचे  वैर करणारे, त्यांना अकारण त्रास देणारे शत्रू मारून टाकतात. मधल्या हातात त्यांनी भगवान शिवांचे 'त्रिशूल' हे आयुध धारण केलेले आहे. हे त्रिशूल फेकून दूरचे शत्रू ते नष्ट करतात. सर्वात वरच्या हातात त्यांनी भगवान श्रीविष्णूंचे 'चक्र' हे आयुध धारण केलेले आहे. फारच दूरच्या दुष्ट शक्तींचा नि:पात करण्यासाठी त्या चक्राचा ते उपयोग करतात.
भगवान श्रीदत्तप्रभू हे भक्तवत्सल भक्ताभिमानी व दुष्टनिर्दालन करणारे आहेत.
श्रीदत्तप्रभूंच्या ब्रीदांचे द्योतक असणा-या त्यांच्या या सहा हातांचा व त्यांतील आयुधांचा हा विलक्षण गूढार्थ, आजवर पहिल्यांदाच, प.पू.श्री.मामांनीच सर्वांना समजेल असा शब्दांमध्ये प्रकट केलेला आहे. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे ऋण आहे. या रहस्याचा अभ्यास करण्याने आपल्याला श्रीदत्तप्रभूंच्या अवतारामधील अज्ञात असणारा विलक्षण भाग नीट समजून येईल. आजच्या श्रीदत्तात्रेय जयंतीच्या पावन पर्वावर या प.पू.श्री.मामांच्या या मार्मिक बोधाचे चिंतन करून आपणही भगवान श्रीदत्तप्रभूंच्या श्रीचरणी ही स्मरणांजली सादर समर्पूया व धन्य होऊया !!
( छायाचित्र : योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी स्वत: रेखाटलेले भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंचे मनोहारी षड्भुज रूप ! )
( https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )


0 comments:

Post a Comment