1 Feb 2022

हा महासिद्ध ज्ञानी, वेद वदवी महिषमुखातुनी


आज पौष अमावास्या. ह्याच तिथीला, सातशे एकतीस वर्षांपूर्वी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली होती. ही घटना आपल्या सर्वांना माहीत आहे, पण याची तिथी मात्र आपण विसरून गेलो आहोत. आजच्याच तिथीला पावन करीत, पैठणच्या पुण्यतोया गोदागंगेच्या तीरी, भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांनी 'ज्ञान्या' नावाच्या एका रेड्याच्या मुखातून प्रत्यक्ष वेद वदविले होते. 
शके १२१२ अर्थात् इ.स.१२९१ साली (पौष, माघ व फाल्गुन या तीन महिन्यांसाठी शालिवाहन शकात ७९ मिळवावे लागतात, बाकीच्या महिन्यांसाठी ७८ मिळवले की इसवी सन येते.) पौष अमावास्येला अर्धोदय पर्वणी होती. त्यानिमित्ताने गोदातीरी पर्वस्नानासाठी जमलेल्या ब्रह्मवृंदासमोर श्री.विठ्ठलपंत यांनी मुलांच्या मुंजीसंदर्भातले आपले गाऱ्हाणे मांडले. ब्रह्मवृंदाने त्यांची यथेच्छ चेष्टा केली. तेवढ्यात एका ब्राह्मणाने समोरून येणाऱ्या ज्ञान्या नावाच्या पखालीच्या रेड्याची व ज्ञानदेवांची तुलना केली. "तुम्हां दोघांचे नाव 'ज्ञानी'च आहे, म्हणजे तुम्ही सारखेच झालात की !" असा उपहास करून ब्रह्मवृंद हसू लागले. त्यावर शांतपणे श्री ज्ञानदेव उद्गारले, 
चल अचल पदार्थांत । एकचि ब्रह्म ओतप्रोत ।
या महिषाच्या देहात । माझ्यातहि एक असे ॥श्रीज्ञा.वि.७.२९॥
या सत्यवचनावर क्रोधित होऊन तो ब्राह्मण म्हणाला, "तुम्ही दोघे एकच आहात ना, मग मी या रेड्याला चाबकाचे फटके मारतो, त्याचे दु:ख तुला झाले पाहिजे !" श्री माउलींनी मान डोलावल्यावर त्याने रेड्याला चाबकाचे तीन फटके मारले. त्या रेड्याला काहीच वेदना झाल्या नाहीत, पण त्याचे रक्ताळलेले वळ श्री माउलींच्या कुसुमकोमल पाठीवर मात्र तत्काळ उमटले.
तरीही शंकेखोर मंडळींचे समाधान झाले नाहीच. ते म्हणाले, "हा नजरबंदीचा खेळ कशावरून नाही ? हे दोघे एक आहेत तर यांचे ज्ञानही एकच असायला हवे. वेदान्त सांगणाऱ्या ज्ञानदेवांप्रमाणे या रेड्यानेही वेदपठण केले पाहिजे. तरच आम्ही मान्य करू !"
परमकरुणामय श्री ज्ञानदेव माउलींनी सद्गुरु श्री निवृत्तिनाथांची आज्ञा घेऊन विप्रांचे म्हणणे मान्य केले व त्या रेड्याला प्रेमाने जवळ बोलाविले. त्याच्या मस्तकी हात ठेवून त्याला वेदपठण करण्याची आज्ञा केली. त्यासरशी त्या महिषाच्या सर्वांगांतून अलौकिक वेदध्वनी प्रकट झाला. सद्गुरु श्री निवृत्तिनाथांनी श्री माउलींना सांगितले, "ज्ञानेशा ! श्रुतिमातेचा उच्चार मुखानेच व्हायला हवा. शरीराच्या इतर रंध्रांतून झाल्यास तो अधर्म ठरेल !" म्हणून मग श्री माउलींच्या आज्ञेने त्या रेड्याने मुखानेच सस्वर वेदऋचा म्हणायला सुरुवात केली. 
(https://rohanupalekar.blogspot.com)
प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी आपल्या "श्रीज्ञानदेव विजय" या अप्रतिम महाकाव्याच्या सातव्या अध्यायात ही रोमहर्षक कथा सविस्तर वर्णिलेली आहे. त्यात ते म्हणतात, 
शके बाराशे बारा साली । पौषी अमावास्येच्या सकाळी ।
वेदपठणास सुरुवात झाली । महिषाच्या मुखातुनी ॥५९॥
ऋग्वेदादि वेद चारी । महिष सस्वर उच्चारी ।
विप्रमंडळी झडकरी । पोथ्या सुधारिती आपुल्या ॥६०॥
पाच दिन रात्रंदिवस । वेदपठण करी महिष ।
माघ शुद्ध पंचमीस । वेदपठण संपले ॥६१॥
पौष अमावास्येच्या सकाळी महिषाच्या मुखातून सुरू झालेले वेदपठण पाच दिवसांनी वसंतपंचमीस थांबले. असा 'न भूतो न भविष्यति' चमत्कार घडल्याने सद्गुरु भगवान श्री माउलींचे अवतारित्व पैठणच्या ब्रह्मवृंदाने सहर्ष मान्य केले आणि ते म्हणू लागले, 
हा आहे महासिद्ध ज्ञानी । जो वेद वदवी महिषमुखातुनी ।
अघटित याची दिव्य-करणी । परमेश्वरी अवतार हा ॥६४॥
या जगावेगळ्या व अद्भुत चमत्काराने भारावून जाऊन, सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे सर्वश्रेष्ठत्व पैठणच्या विप्रांनी एकमुखाने मान्य केले आणि त्यांना सन्मानपूर्वक शुद्धिपत्र प्रदान केले !
पुढे सद्गुरु भगवान श्री माउली आणि भावंडे मजल दरमजल करीत नेवाश्याला आली. तिथे मृत सच्चिदानंद थावरे यांना श्री माउलींनी जिवंत केले आणि प्रवरेच्या काठी परमपावन श्री ज्ञानेश्वरी सांगितली. हे दिव्य प्रसंग इ.स.१२९१ सालच्या माघ-फाल्गुन या दोन महिन्यांत घडलेले आहेत. त्या पुण्यवान रेड्याने सद्गुरु श्री माउलींच्या समक्षच १२९१ सालच्या चैत्र कृष्ण एकादशीला आळे या गावी देह त्यागला. त्या रेड्याचे समाधिमंदिर आळे गावी आपल्याला आजही पाहायला मिळते.
रेड्याच्या मुखातून वेद वदविण्याचा सद्गुरु भगवान श्री माउलींनी लीलया घडविलेला हा आजवरच्या इतिहासातला एकमेवाद्वितीय चमत्कार आहे. प्रस्तुत दिव्य प्रसंग आजच्याच तिथीला घडला होता. म्हणून या पावन पर्वावर आपण त्या प्रसंगाचे प्रेमादरपूर्वक स्मरण करीत एकमेवाद्वितीय अवतार अशा करुणाब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या अम्लान श्रीचरणारविंदीं कोटिकोटी दंडवत घालून त्यांचा जयजयकार करू या !
सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय । 
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
(या लेखासोबत दिलेला फोटो, श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयातील सभागृहात लावलेल्या या प्रसंगाचे दर्शन घडविणाऱ्या सुरेख थ्रीडी म्यूरलचा आहे.)

3 comments:

  1. माऊली म्हणजे अवतारी पुरुषच🙏🙏🙏 त्यांना सहस्र दंडवत

    ReplyDelete
  2. दंडवत

    ReplyDelete
  3. जय ज्ञानेश्वर माउली

    ReplyDelete