25 Jul 2020

श्रीसंत दासराम महाराज केळकर पुण्यतिथी



आज दि.२५ जुलै, श्रावण शुद्ध षष्ठी ; याच तिथी आणि तारखेला एकोणीस वर्षांपूर्वी सांगली येथील थोर अधिकारी महात्मे, चिमड संप्रदायातील ज्ञानी सत्पुरुष प.पू.श्री.रामराय गोविंद तथा प.पू.श्री.दासराम महाराज केळकर यांनी आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली. त्याही दिवशी सूर्योदयाला नागपंचमी असून संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी, त्यांच्या देहत्यागसमयी षष्ठी लागलेली होती. आज त्यांच्या एकोणिसाव्या पुण्यतिथीला तेच सर्व योग जुळून आलेले आहेत. शिवाय अजून एक विशेष योग म्हणजे, यंदाचे वर्ष हे श्रीसंत दासराम महाराजांचे जन्मशताब्दीचे वर्ष आहे.
श्रीसंत दासराम महाराजांच्या 'चैतन्याचा महामेरू' या जन्मशताब्दी गौरवग्रंथातील 'तत्त्वार्थींचा देखणा पायाळू' या आपल्या सर्वांगसुंदर लेखात, श्रीसंत दासराम महाराजांचा गौरव करताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "वेळोवेळी घडून आलेल्या सर्व दर्शनभेटींमधून प.पू.श्री.दादांचे संतत्व, चित्तावर नि:संशयपणे वज्रलेपासारखे ठसत गेले. त्या सर्व मंगलस्मृतींनी आजही सात्त्विक भाव अंत:करणात दाटून येतात. प.पू.श्री.दादांचे सारे व्यक्तिमत्व हे शास्त्रोक्त 'संतपदवी'चेच एक मूर्तिमंत उदाहरण होते. ते उत्तम कवी, लेखक, वक्ते होते. अनेक सद्गुण त्यांच्या ठायी दाटीवाटीने वस्तीला राहिलेले होते. आत्यंतिक साधेपणा, आत्यंतिक विनम्रता आणि अपार सद्गुरुप्रेम, भगवत्प्रेम यांनी ते नखशिखांत विनटलेले असत. त्यांचा सहवास भाविकाला शांत, तृप्त करून सोडणारा असे ; मग भले ते त्याच्याशी काही बोलोत अगर न बोलोत. त्यांची दृष्टी नेहमी अंतर्मुख असे. देहाच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव नसे. आपल्याच आनंदात ते जेव्हा मधूनच हसत, तेव्हा त्या हास्यातूनही त्यांच्या अंत:करणातील  भगवत्प्रेम बाहेर पाझरत असे. त्यांची सगळी देहबोलीच ज्ञानी भगवद्भक्ताची होती. खरोखरीच असे महात्मे दुर्मिळ ; हल्ली तर दृष्टीस पडणेही कठीण !
प.पू.श्री.दादांनी आयुष्यभर सर्वभावे सद्गुरुसेवा केली. त्याचबरोबर निष्ठापूर्वक सद्गुरुप्रदत्त साधनाही केली. त्यामुळे श्रीमहाभारतात म्हटल्याप्रमाणे 'ज्ञान' आणि 'शांती' या दोहोंची सहजप्राप्ती त्यांना झालेली होती.  प.पू.श्री.दादा महाराजांनी सद्गुरुआज्ञेनुसार सांगली नगरीत ज्ञानगंगा अखंड प्रवाहित ठेवून या नगरीला पुण्यभूमी केलेले आहे. अनेक श्रांतांना, क्लांतांना प्रेमाचा आधार देऊन शांतविले आहे. आपल्या अखंड, सप्रेम कीर्तनसेवेने सद्गुरुपरंपरेला व श्रीभगवंतांना तोषविले आहे. प.पू.श्री.दादा हे आधुनिक काळातील ज्ञानोत्तर भक्तीचे श्रेष्ठ, सर्वज्ञ, सामर्थ्यसंपन्न असे आचार्यच होते !"
सांगलीच्या केळकर घराण्यात पूर्वापार भगवद्भक्तीचा आणि संतसेवेचा उत्तम वसा जोपासलेला आहे. पू.श्री.दासराम महाराजांचे आजोबा श्री.अंताजीपंत केळकर परमशिवभक्त होते. त्यांना श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी प्रसाद म्हणून दिलेला रुपया आजही केळकरांच्या देवघरात पूजिला जातो. तर आजी सौ.लक्ष्मीबाई केळकर या श्रीसंत ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अनुगृहीत होत्या. पू.श्री.दासराम महाराजांचे वडील, पू.श्री.गोविंदराव तथा पू.मामामहाराज केळकर हे चिमड संप्रदायातील आदरणीय सत्पुरुष होते. सांगलीतील श्रीसंत तात्यासाहेब कोटणीस महाराजांकडील अखंड कीर्तनसेवेने प्रभावीत होऊन, पू.श्री.मामा केळकरांनीही १९२४ साली अखंड कीर्तनसेवेचा वसा घेतला. ईशकृपेने तो आज ९५ वर्षे झाली केळकरांच्या तीन पिढ्यांनी अव्याहत चालू ठेवलेला आहे. 
पू.श्री.मामा महाराज केळकर व पू.सौ.इंदिराबाई या दांपत्याच्या पोटी अधिक श्रावण कृष्ण षष्ठी, दि.६ ऑगस्ट १९२० रोजी कुरुंडवाड मुक्कामी पू.श्री.दासराम महाराजांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या चौदाव्या दिवशी श्रीसंत तात्यासाहेब कोटणीस महाराजांनी मांडीवर घेऊन या लहानग्या बाळाच्या मस्तकावर हस्तस्पर्श करून आपल्या कृपेची छाया घातली. "हा बाळ आमचाच असून लहानपणापासूनच कीर्तन करील. याचे नाव 'राम' ठेवा !" असा आशीर्वादही बाळाला मिळाला. 
लहानग्या रामरायाची दिव्य लक्षणे सर्वांना लवकरच पाहायला मिळाली. वयाच्या पाचव्या वर्षापासून रामराया कीर्तनसेवा करू लागले. सातव्या वर्षी त्यांना काव्यस्फूर्ती होऊ लागली. नवव्या वर्षी 'रामदासबोध' नावाचा १३ समास व १६९ ओव्यांचा लघुग्रंथ त्यांच्याकडून निर्माण झाला. पुढे मग आयुष्यात त्यांच्याकडून असंख्य आरत्या, संतचरित्रे, पदे व अभंग रचले गेले. 'श्रीदासराम गाथा' या ग्रंथात अशा विविध प्रसंगी त्यांच्याकडून रचल्या गेलेल्या १९५२ रचना प्रकाशित झाल्या आहेत. याशिवाय अनेक ओवीबद्ध ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.
पू.श्री.दासराम महाराजांच्या बालपणीचा एक प्रसंग फारच बोलका आहे. लहानगा रामराया आपल्या वडिलांना एकदा म्हणाला की, "मला रामरायाचे दर्शन घडवा !" पू.श्री.मामा महाराज म्हणाले, "येत्या शनिवारी रामदर्शन घडेल !" हे ऐकल्यावर रामराया एकदम खूश झाला व त्याने 'रामप्रभू येणार' म्हणून सगळे घर सजवायला घेतले. शनिवारी एक वानर दारात आले. त्याला पाहून पू.मामा म्हणाले, "वानरसेना आली, आता रामराया पण येणार". आणि खरोखर पू.श्री.मामामहाराजांनी बाल रामरायाला आकाशात श्रीरामदर्शन करविले. आपल्या वडिलांच्या शब्दावर विश्वासून बाल रामरायाने श्रीरामदर्शनाच्या उत्कंठेने सगळी तयारी सुद्धा केली होती. मग श्रीरामप्रभू का बरे मागे राहतील ? निष्ठेचे फळ त्यांनीही मग प्रेमाने प्रदान केले. संत हे असे सुरुवातीपासूनच अलौकिक असतात.
पू.श्री.दासराम महाराजांवर भगवान श्री निंबरगीकर महाराजांचा विशेष कृपालोभ होता. श्रीगुरुलिंगजंगम निंबरगी महाराजांनी विविध प्रसंगी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन ; कानडी, संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषेतील अभंग, आरत्या, श्लोक तसेच पदे अशा माध्यमातून बोध केला होता. ही सर्व पदे श्री.दासराम महाराजांना 'श्रुत' झाली, म्हणजे ऐकावयास मिळाली. १९८५ पर्यंत ह्या पदांची एकूण संख्या २२८ एवढी झाली. ती सर्व पदे 'श्रीगुरुलिंगगीता' या नावाने प्रकाशित झालेली आहेत. निंबरगी संप्रदायाच्या मूल तत्त्वज्ञानचे समग्र दर्शन त्यातून होते.
पू.श्री.दासराम महाराजांना सगळे 'दादा' म्हणत असत. त्यांच्या स्वभावात अपार मार्दव होते, ते कधीच कोणावर चिडत नसत. सदैव आपल्याच आनंदात रममाण होऊन राहात असत. ते पूर्ण निरहंकार महात्मे होते. त्यांच्याठायी अनन्य गुरुभक्ती आणि अलौकिक नम्रता पूर्ण पैसावलेली होती. त्यांना संतसेवेची फार आवडी होती. त्यांच्या 'श्रीरामनिकेतन' या वास्तूत कोणी साधुसंत आले की ते स्वत: प्रेमार्द्र होऊन, "साधु गृहाप्रति आले । भले सार्थक झाले ॥" हा अभंग म्हणून त्यांचे स्वागत करीत असत. 
आमच्या प.पू.श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे व प.पू.श्री.दासराम महाराजांचे अगदी सख्ख्या बंधूंसारखे प्रेमसंबंध होते. पू.श्री.मामा सांगलीला जाणाऱ्या आपल्या शिष्यांना आवर्जून पू.श्री.दासराम महाराजांचे दर्शन घेऊन यायला सांगत असत. तसेच पू.श्री.दासराम महाराजही आपल्या शिष्यांना पुण्याला पू.श्री.मामांकडे पाठवीत असत. पू.श्री.दासराम महाराजांनी पू.श्री.मामांवर रचलेली "आरती श्रीपादा, जयजया प्रसिद्धा । दत्तप्रभू जन्म घेती, नवल हे बहुसिद्धा ॥" ही सुंदर आरती आमच्या श्रीपाद सेवा मंडळाच्या 'नित्यउपासनाक्रमा'त समाविष्ट केलेली आहे.
माझे पणजोबा, प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांबद्दलही पू.श्री.दासराम महाराजांना फार प्रेमादराची भावना होती. मी १९९७ साली सांगलीला पू.श्री.दासराम महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. तेव्हा पू.श्री.गोविंदकाकांचा पणतू म्हणून त्यांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून मला भरभरून आशीर्वाद दिले होते. त्यावेळी गहिवरून येऊन, अतीव प्रेमादराने ते प.पू.श्री.काकांविषयी दोन शब्द बोललेही होते.
पू.श्री.दासराम महाराजांचे पन्नासच्या वर प्रकाशित झालेले ग्रंथ सांगलीच्या त्यांच्या निवासस्थानी उपलब्ध आहेत. www.dasram.org या संकेतस्थळावर त्यातले काही ग्रंथ आपण पाहू शकता. आत्मानुभूतीचा प्रसन्न आविष्कार असणारे हे सर्व ग्रंथ साधकांना परमार्थाचे मौलिक मार्गदर्शन करणारे दीपस्तंभच आहेत. 
दि.२५ जुलै २००१, श्रावण शुद्ध षष्ठीला सायंकाळी पू.श्री.दासराम महाराजांनी कृतार्थतेने आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली. घेतलेला कीर्तनसेवेचा वसा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मनापासून सांभाळला. आजही सांगलीच्या गांवभागातील 'श्रीराम निकेतन' या पवित्र वास्तूच्या कणाकणात त्यांचे चिन्मय अस्तित्व भरून राहिलेले आहे, भाविक-भक्तांना आपला अमोघ कृपाप्रसाद प्रेमाने प्रदान करीत आहे. 
ज्ञानोत्तरभक्तीचे थोर आचार्य असणाऱ्या श्रीसंत रामराय गोविंद तथा प.पू.श्री.दासराम महाराज केळकर यांच्या पावन श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग प्रणिपात.
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment