15 Jan 2019

मकर संक्रांतीची हृद्य आठवण

आज मकर संक्रांती. भरपेट तीळगूळ खाऊन तोंडभर गोड बोलण्याच्या या उत्सवाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा !
संक्रांत म्हटली की माझी एक फार हृद्य आठवण पुन्हा ताजी होते. मी कॉलेजसाठी १९९९ साली पुण्यात आल्यावर मायबाप सद्गुरु श्री माउलींच्या दर्शनासाठी माझे आळंदीला वारंवार जाणे होऊ लागले. आळंदीला गेले की माहेराला आल्यासारखेच वाटायचे. त्यामुळे आळंदीची ओढ स्वस्थ बसू देत नसे. गुरुवार रात्रीच्या पालखीला ब-याचवेळा जाणे होई. एरवी पण कोणताही सणवार असला की निघालोच आळंदीला आम्ही. काहीही कारणच तर मिळायचा अवकाश असायचा फक्त.
असेच एकेवर्षी संक्रांतीला संध्याकाळी मी व सचिन प्रभुणे आळंदीला गेलो होतो दर्शनाला. आळंदीला सद्गुरु श्री माउलींना वोवसायला माताभगिनींची प्रचंड गर्दी असते. संपूर्ण देऊळवाडा कुंकवाने लालभडक झालेला असतो व वाणवशाच्या सामानाने भरलेला असतो. संध्याकाळी गर्दी ओसरल्यावर संस्थानचे कर्मचारी सर्व परिसर झाडून काढतात, जास्त चिकट झालेला भाग धुवून काढतात. आम्ही दोघे गेलो तेव्हा हेच काम चालू होते. सद्गुरु माउलींच्या समाधीवर मस्तक टेकवून मनसोक्त दर्शन झाले व प्रदक्षिणा घालून नित्याच्या शिरस्त्याप्रमाणे अजानाच्या बनात जपाला बसायला गेलो. तिथे तर सगळा राडाच झालेला होता. तिथेही लोक स्वच्छता करीत होते.
मी हळूच जवळ जाऊन त्यातल्या एका माणसाला विचारले, "मी पण काही सेवा करू का ?" त्याने लगेच होकार दिला. मी व सचिनने झाडू घेऊन झाडायला सुरुवात केली. तासभर ही सेवा मिळाली. मला कोण आनंद झाला होता. लहानपणी फलटणला मी प.पू.श्री.काकांच्या मंदिरात कोणाकडून ऐकले असावे, पण ते माझ्या मनात घट्ट बसलेले होते की, आपण प्रेमाने देऊळ झाडले तर, त्याच्याबदल्यात देव आपल्या मनातले दोष, विकार, आपले पाप झाडून टाकतात. हे पक्के ठसलेले असल्याने मी कायम झाडलोट करण्याची सेवा मनापासून करीत असे. तशात आयुष्यात पहिल्यांदाच, तेही संक्रांतीच्या पर्वावर, हृदयसिंहासनाधीश्वर सद्गुरु भगवान श्री माउलींच्या मंदिरात झाडलोट करायला मिळाली, याचाच मला प्रचंड आनंद झाला होता. 'आता माउली स्वत: माझ्या मनातली जळमटे झाडणार' , हाच त्यामागचा सर्वात मोठा फायदा मला खुणावत होता. माझ्या दृष्टीने तेच खरे 'मकर संक्रमण' होते !
पुढे सद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या परमकृपेने आळंदीच्या समाधीस्थानाची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करण्याचे बरेच योग आले. संस्थान कमिटीच्या ग्रंथालयाच्या समितीवर दोन वर्षे सेवा करता आली. वारीतला दवाखाना तर होताच. माउलींनी माझे हे लळे भरपूर पुरवले आणि आजही तितक्याच प्रेमाने पुरवीत आहेत. पण ती संक्रांत विसरू नाही शकत. कारण तो तशा प्रकारच्या समाधी मंदिरातल्या सेवेचा अगदी पहिलाच प्रसंग होता.
आज संक्रांतीवर काही लिहायची दिवसभरात इच्छाच झाली नाही. पण ही आठवण आली आणि वाटले की हीच का सर्वांसोबत शेयर करू नये ? म्हणून मग तीच लिहून काढली. वैयक्तिक असली तरी त्याचा आनंद तुम्ही देखील अनुभवू शकाल, असे वाटले म्हणूनच लिहिले.
मकर संक्रमण हे खरेतर श्रीभगवंतांच्या दिशेने, त्यांच्याकडे आपले पाऊल पडणेच आहे. आपण स्वत:हूनच धरून ठेवलेल्या दु:खदायक प्रपंचाचे उगीचच बाळगलेले बंधन आपणच प्रयत्नपूर्वक ढिले करून, श्रीभगवंतांच्या दिशेने, काही ना काही निमित्ताने, कोणत्यातरी माध्यमातून पुन्हा पुन्हा अग्रेसर होणे, हाच साधक म्हणून आपल्यासाठी संक्रमणाचा मथितार्थ आहे.
सद्गुरु श्री माउलींनी आपल्या अपार करुणेने ह्या अल्पशा सेवेच्या रूपाने आमचे संक्रमणच घडवले व तेही आपल्याच महाद्वारात. स्वर्गीय देवदेवतांच्या भाग्यानेही सौभाग्य मानावे, अशी ती सेवा त्यांच्याच करुणाकृपेने आम्हां अज्ञ लेकरांना सहजगत्या मिळाली. सद्गुरु श्री माउलींना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अतीव प्रेमादराने "करुणाब्रह्म" म्हणत असत. ते किती सार्थ आहे, हे अशाच प्रसंगांनी वारंवार मनापासून पटते. म्हणून आजच्या या मकर संक्रांतीच्या पुण्यपर्वावर, त्रिलोकात अतुलनीय असे अतीव गोड बोलणा-या आमच्या करुणाब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या श्रीचरणीं मनोभावे दंडवत घालून, तुम्हां सर्व सुहृदांना पुनश्च एकवार तोंडभर हार्दिक शुभेच्छा देतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
मकर संक्रमणावरील पूर्वीचे अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे, तेही आवर्जून वाचावे ही विनंती !
साधला हा पर्वकाळ
https://rohanupalekar.blogspot.com/2017/01/blog-post_14.html?m=1

0 comments:

Post a Comment