10 Jan 2019

मूठभर पोह्यांमागचे अमर्याद प्रेम



पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे अत्यंत विलक्षण अवतार आहेत. त्यांची प्रत्येक गोष्टच विशेष आहे. त्यांचे रूप अद्भुत, त्यांचे नामही अलौकिक, त्यांची लीला बोलाबुद्धीच्या पलीकडची तर त्यांचा पराक्रम, त्यांचे राजकारणही विशेषच. भगवान श्रीकृष्णप्रभूंचे प्रेम अवर्णनीय तसेच त्यांचे भक्तवात्सल्यही मनोहर. खरोखरीच त्यांच्या प्रत्येक गोष्टीत एक सतत हवीहवीशी वाटणारी जगावेगळी अलौकिकताच आहे !
श्रवण-कीर्तनादी नवविधा भक्ती हे श्रीभगवंतांच्या पर्यंत जाण्याचे राजमार्गच आहेत. आजवर असंख्य पुण्यवान भक्तांनी या नऊ मार्गांचा अवलंब करून श्रीभगवंतांशी एकरूपत्व साधलेले आहे. श्रीभगवंतांचेही ब्रीद आहे, "ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।(भ.गी.४.११)" जो जसा मला भजतो मीही तसाच त्याला भजतो, असे ते स्वमुखानेच सांगतात. म्हणूनच, श्रीभगवंतांनाच खरे भक्तराज म्हटले जाते. आपल्या भक्तांची सर्वात जास्त प्रेमाने व अनन्यतेने तेच भक्ती करीत असतात. श्री नाथ महाराजांच्या घरची श्रीखंड्याची लीला हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. सर्वच महात्म्यांच्या चरित्रात श्रीभगवंतांच्या अशा लीला दिसतातच.
भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंच्या लीलावतारात बालपणापासून पाहिले तर त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे, प्रेमाचे तीन सखे होते. बालपणी गुरुगृही असताना सुदामा नावाचा एक ब्राह्मण, पुढे वृष्णिकुलातलाच बंधू उद्धव आणि नंतर आत्याचा मुलगा असणारा धनुर्धर अर्जुन ; हे तीन त्यांचे जीवाभावाचे मित्र होते. उद्धव व अर्जुन हे त्यांचे अनुगृहीत, कृपांकित शिष्यही होते. या तिन्ही सख्यांच्या प्रेमाविषयी श्रीमद् भागवत, एकनाथी भागवत व श्री ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर रितीने वर्णन आले आहे. वाचताना आपणही भावविभोर होतो इतके ते सुरेख आहे.
यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने, महाराष्ट्र टाईम्सच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्या दीपावली अंकात श्रीभगवंत आणि त्यांच्या या तीन जिवलगांवर अल्पसे लेखन झाले. तोच लेख आपणां सर्वांना आज सादर करीत आहे. प्रेमब्रह्म श्रीभगवंतांच्या कोणत्याही प्रेमलीलेचे थोडेसे आस्वादन देखील आपल्याला अंतर्बाह्य प्रेममयच करणारे असते, याचा प्रत्यय हे वाचून नक्की येईलच याची खात्री आहे. म्हणूनच, 'मूठभर पोह्यांमागचे अमर्याद प्रेम'चाखण्यासाठी आपणां सर्वांना हार्दिक आमंत्रण !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment