25 Aug 2021

श्रीक्षेत्र आळंदीतील अत्यंत देखणी आणि ग्रंथसमृद्ध वास्तू - श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय

पुराणकाळापासून पुण्यभूमी म्हणून प्रसिद्ध असणारी श्रीक्षेत्र अलंकापुरी अर्थात् देवाची आळंदी हे महान तीर्थक्षेत्र आहे. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी याच क्षेत्री संजीवन समाधी घेतली. थोर स्वातंत्र्यसैनिक व विश्वविख्यात संत, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांवर सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांची पूर्णकृपा होती. श्री माउलींच्या कृपाप्रेरणेने  प.पू.श्री.मामांनी स्थापन केलेल्या 'श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान' या संस्थेच्या वतीने आळंदीच्या वैभवात मोठी भर घालणारा एक प्रकल्प येथे आकारास आला आहे. 'श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय' हाच तो भव्य प्रकल्प. महाराष्ट्रातील समृद्ध ग्रंथालयांच्या परंपरेतील एक उत्तम ग्रंथालय म्हणजेच श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय होय ! श्रीक्षेत्र आळंदीतील एक अत्यंत देखणी वास्तू म्हणून नावलौकिक मिळालेले हे ग्रंथालय तुम्हां-आम्हां सर्वांनी आवर्जून भेट द्यावे असेच आहे.

या सर्वांगसुंदर आणि भव्य वास्तूला चार मजले आहेत. तळमजल्यावरील मुख्य प्रवेशद्वारातून आत गेले की समोर प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेली सिद्धबेट येथील श्री माउलींच्या स्मारकाची सुंदर प्रतिकृती दिसते. अद्भुत सौंदर्यदृष्टीने घडविलेले ते देखणे लेणे पाहताना आपले हात कधी जोडले जातात ते आपल्यालाही कळत नाही. त्याशेजारीच आपल्या डाव्या बाजूला प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या पूर्णाकृती चित्राची स्थापना केलेली आहे. या वास्तूला आत-बाहेर व्यापणाऱ्या चोखंदळ सौंदर्यदृष्टीची आपली दैवी अनुभूती येथूनच खरा आकार घेऊ लागते, ती तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात जाईपर्यंत अलौकिक समाधानाच्या परिपूर्णतेला प्राप्त होते ! 

या वास्तूच्या तळमजल्यावर वृत्तपत्र वाचनाचा कक्ष, ग्रंथ देवघेव विभाग आणि ग्रंथपालांचे कार्यालय आहे. मोठ्या जागेचा केलेला तितकाच सुयोग्य वापर येथे आपल्या नजरेत भरतो. श्रीवामनराज प्रकाशनाचा अतिशय सौंदर्यपूर्णतेने साकारलेला पुस्तक विक्री विभाग देखील येथेच आहे.

वरच्या मजल्यांकडे जाणारा जिना प्रशस्त तर आहेच, शिवाय ते एक स्वतंत्र कलादालनही आहे. सिद्धहस्त छायाचित्रकारांच्या शंभरपेक्षा जास्त देखण्या निसर्ग-छायाचित्रांची विशेष प्रदर्शनी या पायऱ्यांवर साकारलेली आहे. नजाकतीने लावलेले हे सर्व फोटो पाहण्याच्या ओघात जिने चढण्याचे श्रम आपल्याला जाणवतच नाहीत. ज्यांना पायऱ्या चढणे शक्य नाही त्यांच्यासाठी लिफ्टची व्यवस्थाही केलेली आहे.

बऱ्याच वेळा पुस्तक देवघेव केंद्र इतकीच ग्रंथालयाची ओळख असते. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय मात्र याला अपवाद आहे. हे नुसते ग्रंथालय नसून एक संपन्न अभ्यासकेंद्रही आहे. दुर्मिळ व प्राचीन ग्रंथांचे जतन करण्याचे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाने अडीच लाख ग्रंथसंख्येचे उद्दिष्ट ठेवलेले असून लवकरच ते पूर्णत्वाला जाईल. 

ग्रंथ अभ्यासण्यासाठी येणाऱ्या सन्माननीय अभ्यासकांसाठी या वास्तूच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर विश्रामिका आहेत. पहिल्या मजल्यावरच एक कॉन्फरन्स रूम देखील आहे. या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य असणाऱ्या अत्यंत दुर्मिळ अशा संदर्भग्रंथांचा तसेच हस्तलिखितांचा प्रचंड मोठा संग्रह पहिल्या मजल्यावर निगुतीने सांभाळलेला आहे. 

श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाच्या वतीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे. दुर्मिळ व महत्त्वाच्या ग्रंथांचे स्कॅनिंग करून ते सर्व ग्रंथ अभ्यासकांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध देण्यात येणार आहेत. त्यासाठी उत्तमोत्तम दर्जाचे स्कॅनर, प्रिंटर घेतलेले असून, अनेक ग्रंथांचे डिजिटायझेशन पूर्ण झालेले आहे व अजूनही चालू आहे. संस्थेचे अनेक स्वयंसेवक सेवाभावी वृत्तीने हे काम करीत असतात. स्कॅनिंगचे हे सर्व कार्य पहिल्या मजल्यावर चालते. 

संस्थेच्या 'श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठा'च्या वतीने धर्म, संस्कृती, अध्यात्म आणि संतवाङ्मयासंदर्भातील विविध विषयांवरील अभ्यासक्रम घेतले जातात. अनेक अभ्यासक आणि जिज्ञासू साधक या अभ्यासक्रमांचा सहर्ष लाभ घेत आहेत. या अभ्यासक्रमांसाठी दोन वर्ग खोल्या (classrooms) व अध्ययनासाठी आवश्यक त्या इतर सुविधा दुसऱ्या मजल्यावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्रकल्प व्यवस्थापकांचे कार्यालयही या दुसऱ्या मजल्यावरच आहेत. या मजल्याच्या सौंदर्य आणि पावित्र्यात येथे लावलेल्या विविध संत-महात्म्यांच्या अप्रतिम रंगचित्रांमुळे शतपटीने वाढ झाल्याचे जाणवते.

या वास्तूच्या तिसऱ्या मजल्यावरचे 'श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज सभागृह' अत्यंत देखणे आहे. यात साधारणपणे एक हजारहून जास्त माणसे एकावेळी बसून कार्यक्रमांचा विनाव्यत्यय आस्वाद घेऊ शकतात. या सभागृहाच्या व्यासपीठामागे उभारलेले, भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या आयुष्यातील महत्त्वाचे पाच प्रसंग जिवंत करणारे तीस फुटांचे भव्य थ्रीडी शिल्प देखण्या प्रकाश योजनेमुळे अतिशय उठून दिसते. या शिल्पाच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज व भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रसन्न प्रतिमा सभागृहाच्या सात्त्विक वातावरणात मोठी भर घालतात. 

या सभागृहात एकही खांब नसल्याने व्यासपीठावरील वक्ता किंवा कलाकार सभागृहाच्या सर्व कोपऱ्यांतून दिसतो. त्याचबरोबर वक्त्याचा आवाज सभागृहात घुमणार नाही अशीही विशेष व्यवस्था येथे केलेली आहे. प्रतिध्वनी किंवा गोंगाटाचा कोणताही त्रास होणार नाही अशाप्रकारे ध्वनिशास्त्र (Acoustics) साधलेले आहे. मान्यवरांसाठी आणि कलाकारांसाठी व्यासपीठाच्या मागे एक छोटा विश्रांतिकक्षही आहे.

ग्रंथालयाला समृद्ध करण्यासाठी अनेकांचे मोठे कष्ट लागतात. ते काही सोपे काम नाही. या ग्रंथालयासही अनेक मान्यवर अभ्यासकांचे ग्रंथसंग्रह प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये सरदार आबासाहेब मुजुमदार, वामन गणेश खाजगीवाले, डॉ.अहिरराव तसेच संस्कृतचे अभ्यासक श्री.आपटे यांच्या ग्रंथ संग्रहांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मराठी मॅन्युस्क्रिप्ट सेंटरने सुमारे अकराशे हस्तलिखित ग्रंथ/पोथ्या मोठ्या विश्वासाने या संस्थेला दिल्या आहेत. हे सर्व ग्रंथवैभव अभ्यासकांसाठी अनमोल खजिनाच आहे. उत्तमोत्तम ग्रंथांची दिवसागणिक त्यात वाढ होत आहे. 

ग्रंथांवर मनस्वी प्रेम करण्याऱ्या प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली हे ग्रंथालय उत्तम वाटचाल करीत आहे. नवनवीन उपक्रमांसह वाचकांना, अभ्यासकांना ज्ञानसमृद्ध करण्याचा सेवावसा घेऊन सतत कार्यरत आहे. ग्रंथालय आणि परिसराची स्वच्छता, टापटिपीने केलेली सर्व मांडणी तर आपल्या मनात घर करतेच, पण या वास्तूत एक अलौकिक सात्त्विकता, देवदुर्लभ पावित्र्य भरून राहिलेले आहे असेही स्पष्ट जाणवते. कारण या स्थानाला प्रत्यक्ष भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा पावन पदस्पर्श झालेला आहे. ज्या भूमीवर सद्गुरु श्री माउलींनी ज्ञानदानाचे कार्य संपन्न केले, तेथेच हे समृद्ध ग्रंथालय साकारले जावे; आणि तेही सद्गुरु श्री माउलींच्या प्राणप्रिय श्रीसद्गुरूंच्या, श्रीसंत निवृत्तिनाथ महाराजांच्या नावाने; हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. ही तर करुणाब्रह्म सद्गुरु भगवान श्री माउलींची विशेष करुणाकृपाच म्हणायला हवी !!

मी आपल्याला मनापासून विनंती करतो की, आता पुन्हा जेव्हा श्रीक्षेत्र आळंदीला दर्शनासाठी जाल, तेव्हा श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाची ही देखणी वास्तू आणि अद्भुत कार्य पाहण्यासाठी मुद्दाम तास-दोन तासांचा वेळ राखीव ठेवूनच जा. अपूर्व सौदर्यदृष्टीने साकारलेला एक विशेष महत्त्वाकांक्षी प्रकल्प पाहिल्याचे दैवी समाधान आपल्याला मिळेल यात मला तीळमात्र शंका नाही. कोरोनाचे नियम पाळून ही वास्तू पाहण्यासाठी संस्थेने परवानगी दिलेली आहे. तेव्हा या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.


'श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय'

सर्व्हेनं. ४७/१, वडगांव (घेणंद) रोड,

ज्ञानसागर मंगल कार्यालयासमोर,

आळंदी देवाची, ता.खेड, जि.पुणे - ४१२१०५

ग्रंथालयाच्या वेळा :

सकाळी ९.३० ते १२.३०

सायंकाळी ४.०० ते ७.००

साप्ताहिक सुट्टी - सोमवार.

संपर्कासाठी दूरध्वनी :

ग्रंथपाल सौ.जयश्री पानसे : 7350122192

प्रकल्प व्यवस्थापक श्री.जयंत साठे : 9833995313

(लेखासोबत श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाच्या नयनसुंदर वास्तूचे आणि अंतरंगाचे दर्शन घडविणारी छायाचित्रे देत आहे. त्यावरून या वैभवसंपन्न प्रकल्पाच्या देखणेपणाची अल्पशी कल्पना नक्कीच येईल !)

- रोहन विजय उपळेकर.