24 Sept 2024

प्रणमत गोविन्दं परमानन्दम्

प.पू.सद्गुरु. श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी विशेष लेख

एक उमदा, देखणा, तरुण डॉक्टर. सैन्यातला चांगला अधिकारी, मानमरातबाचे सुखवस्तु जीवन, सुंदर पत्नी, एक मुलगा, परदेशातली नोकरी, रॉयल आर्मीच्या मेरिटोरियस सर्व्हिस अवॉर्डचा मानकरी; अचानक वैराग्य बळावून आपल्या नोकरीचा राजीनामा देतो काय, एका लौकिकार्थाने अडाणी, साध्याशा दिसणाऱ्या सावळ्या महापुरुषाच्या चरणीं शरण जातो काय; आणि सर्वस्वाचा त्याग करून त्या अशिक्षित परंतु अंतरंगीच्या ब्रह्मानुभवाने, आपल्या अलौकिक सेवाव्रताने श्रीमंत झालेल्या महात्माच्या सेवेत स्वतःला पूर्णतः झोकून देतो. एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी ही सत्यघटनाच एका महान विभूतिमत्त्वाच्या जडण-घडणीचे बीज ठरलेली आहे ! तो वरकरणी अशिक्षित दिसणारा महात्मा म्हणजेच पुसेसावळी येथील विदेही स्थितीतले सत्पुरुष सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज होत. त्यांचा शिष्योत्तम म्हणजेच पूर्वीचे रॉयल इंडियन आर्मीमधील सर्जन आणि नंतरच्या काळात जगप्रसिद्ध झालेले प.पू.सद्गुरु श्री.डॉ.गोविंद रामचंद्र उपळेकर तथा प.पू.श्री.काकासाहेब उपळेकर महाराज हे होत ! आज दि.२४ सप्टेंबर रोजी प.पू.श्री.काकांच्या पन्नासाव्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
अलौकिक अशा श्रीसंत काकासाहेब उपळेकर महाराजांचे अवघे चरित्रही अलौकिकतेच्याच कोटीचे आहे. आपल्या ८७ वर्षाच्या प्रदीर्घ जीवनात त्यांनी केलेले अजोड कार्य आणि निर्मिलेली ग्रंथसंपदा पाहिली की अक्षरशः स्तिमित व्हायला होते. संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या प.पू.डॉ.काकासाहेबांनी आपल्या श्रीगुरुपरंपरेने आलेल्या तुरीयातीत-अवधूत अवस्थेच्या स्वरुपस्थितीत रममाण होऊनच आपली समग्र ग्रंथसंपदा निर्मिलेली आहे. तो त्यांच्या अद्वयानंदानुभवाचा सहज उद्गार आहे. सर्वसामान्यांना काहीशी दुर्बोध किंवा आकलनास कठीण वाटली तरी, त्यांची सर्वच ग्रंथसंपत्ती अतीव माधुर्याने, भगवत्कृपाप्रसादाच्या नैसर्गिक सौंदर्याने आणि स्वाभाविक अमृतमयतेने सर्वांगी आतबाहेर नटलेली आहे !
उपळेकर घराणे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावचे राहणारे. आडनाव क्षीरसागर, गोत्र वसिष्ठ आणि कुलदैवत श्रीक्षेत्र नीरानृसिंहपूरचे भगवान श्रीनृसिंह होत. गावाचे कुलकर्णपण असल्यामुळे कुलकर्णी आडनाव लावू लागले आणि गाव सोडून आल्यामुळे उपळाईकर नाव रूढ झाले. प.पू.श्री.काकांचे वडील रामचंद्र उपळेकर हे वकील होते. माळेगाव संस्थानच्या जाधवराव सरदारांच्या पदरी नोकरीला होते. जाधवरावांची कन्या फलटण संस्थानच्या श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकरांची पत्नी झाली. तेव्हापासून उपळेकर मंडळी फलटणला स्थायिक झाली. पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा जन्म माघ शुद्ध द्वितीया, दिनांक १५ जानेवारी १८८८ रोजी माळेगाव येथे झाला. त्यांचे बालपण फलटणला व्यतीत झाले. फलटण संस्थानच्या हायस्कूलमध्ये शिक्षण झाल्यावर ते पुण्याच्या नू.म.वि. मध्ये दाखल झाले. १९०९ साली ते बी.जे.मेडिकल कॉलेजमधून एल.सी.पी अँड एस. ही पदवी संपादन करून लगेचच रॉयल इंडियन आर्मीमध्ये सर्जन पदावर रुजू झाले. १९१३ साली वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांचा विवाह श्री.शिवछत्रपतींचे राजकीय गुरु दादोजी कोंडदेव यांच्या वंशातील कु.दुर्गा हिच्याशी झाला. डॉ.गोविंद आणि चि.सौ.का. रुक्मिणी यांचा जोडा शोभून दिसत होता.
डॉ.गोविंद यांचे पोस्टिंग वायव्य भारतातील रावळपिंडी येथे होते. काही काळ ते आफ्रिकेत नैरोबी येथेही होते. पहिल्या महायुद्धात बजावलेल्या उत्तम कामगिरीसाठी त्यांना 'मेरिटोरियस सर्व्हिस अवॉर्ड' तसेच दोन सुवर्णपदके आणि तीन रौप्यपदकेही मिळाली होती. पहिल्या महायुद्धाची धामधूम संपल्यावर श्रीभगवंतांच्याच इच्छेने डॉ.गोविंद उपळेकरांच्या चित्त तीव्रतेने अंतर्मुख होऊ लागले. आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे ? आपल्याला काय मिळवायचे आहे ? याचे विचार त्यांना अस्वस्थ करू लागले. त्याच सुमारास त्यांना एका तेजस्वी दिगंबर साधूचे अधून-मधून दिव्य दर्शन होऊ लागले. त्यामुळे त्यांच्या अंतर्मुखतेत आणखी भर पडली. त्यांच्या मनात वैराग्य दृढ होऊ लागले. त्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर १९२० साली काही दिवसांची सुट्टी घेऊन फलटणला आले. ही सुट्टी त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली !
श्रीभगवंतांच्याच संकल्पाने डॉ.गोविंद उपळेकर यांचे खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे जाणे येणे झाले. तेथे अचानकच त्यांची भेट एका विलक्षण अवलियाशी झाली आणि अंतरीची खूण पटल्याने त्यांची अस्वस्थता पूर्ण शमली. हेच ते राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील झाकलेले माणिक म्हणावेत असे विदेही सत्पुरुष सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज परीट होत. आपल्याला वारंवार दर्शन देणारे हेच ते साधू अशी जाणीव झाल्याने डॉ.गोविंद त्यांच्या चरणीं शरण गेले. सद्गुरु श्रीकृष्णदेवांनी देखील, "गोविंदा; किती उशीर केलास ? वाट पाहत होतो तुझी !" अशा गोड शब्दांत आपल्या शिष्याचे स्वागत केले.
डॉ.गोविंद उपळेकरांना आपल्या जीवनाचे यथार्थ ध्येय समजले. त्यांनी निश्चयाने आपल्या मानमरातबाच्या नोकरीचा त्याग केला आणि घरच्यांचा विरोध पत्करून त्या वेडगळ दिसणाऱ्या, वागणाऱ्या महान अवलियाच्या सेवेत स्वतःला पूर्ण झोकून दिले. हे गुरुसेवाव्रत फार कठीण होते. देहाचे ममत्व जावे, देहबुद्धीचा निरास व्हावा म्हणून अवलंबिलेली ती खडतर तपश्चर्या शेवटास नेण्यासाठी किती निर्धार हवा ? अहो, अतिशय सुखवस्तू स्थितीतून एकदम जंगलातच जाऊन उघड्यावर राहण्यासारखेच होते ते. श्रीकृष्णदेव महाराज तासन् तास ओढ्याच्या तापलेल्या वाळूत शांतपणे पडून राहात. दिवस दिवस एका पायावर आत्ममग्न होऊन उभे राहत. दिवसरात्र रानांवनात, काट्याकुट्यात भटकत सुकुमार श्री.गोविंदानेही श्रीगुरूंचे अनुकरण करायला सुरुवात केली.
तीन वर्षांच्या अत्यंत कठीण तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या श्रीसद्गुरुमाउलींचा कृपाघन अपरंपार बरसला आणि त्यामुळे डॉ.गोविंद ब्रह्मानंदीच्या आनंदसागरात निमग्न झाला. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांची ही अवघी शिष्यशाखा अवलिया, विदेही महात्म्यांचीच आहे. चौतीस वर्षांचे डॉ.गोविंदरावही आपल्या श्रीगुरूंसारखेच 'देहीच असोनि विदेही' अवस्थेस प्राप्त झाले.
१९२३ सालच्या मध्यात श्रीगुरु कृष्णदेवांनी लाडक्या गोईंदाला फलटणला पाठवून दिले आणि संसारात राहूनच परमार्थ चालविण्याची आज्ञा दिली. आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाल्याचे जाणून ८ ऑक्टोबर १९२३, भाद्रपद कृष्ण त्रयोदशीला सद्गुरु श्रीकृष्णदेवांनी जलसमाधी घेऊन नश्वर देहाचा त्याग केला. इकडे फलटणी गोविंदरावांना हे दुःखद वृत्त समजले. ते लोटांगणे घालीत पुसेसावळीला गेले. श्रीसद्गुरूंच्या समाधीवर ठेवलेले मस्तक त्यांनी तीन दिवसांनीच वर उचलले. त्यांच्या हृदयात एक निर्धार पक्का झालेला होता. आपल्या श्रीसद्गुरूंचे लीलाचरित्र आणि त्यांच्या कृपेने आलेल्या दिव्य आत्मानुभूतीला शब्दरूप देण्याचे त्यांनी ठरविले. पुसेसावळी गावाबाहेरच्या ओढ्याकाठी असणाऱ्या आपल्या श्रीसद्गुरूंच्या समाधीपाशी बसून त्यांनी साडेचारशे पृष्ठांचा 'श्रीकृष्णदेव' हा ग्रंथराज लिहून काढला. मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांमधून एकाच वेळी लिहिलेला हा ग्रंथ श्रीसद्गुरुपरंपरेने लाभलेली अतिदिव्य आणि अनेकांगी अवधूती मौज सर्वार्थाने प्रकट करविणारा ठरला !
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या साहित्यसृष्टीतील हे पहिले कमलपुष्प ठरले. आपल्या ८७ वर्षांच्या आयुष्यात प.पू.श्री.काकांनी बत्तीसपेक्षा जास्त ग्रंथ लिहिले आणि अक्षरशः विनामूल्य वाटले. त्यांच्या कोणत्याही ग्रंथांच्या बदल्यात त्यांनी कधीही कसलेच मूल्य घेतले नाही. आपल्या हयातीत तीन-चार लाख रुपयांची ग्रंथसंपदा त्यांनी विनामूल्य वाटली. पाऊणशे वर्षांपूर्वी या तीन-चार लक्ष रुपयांचे लौकिक मूल्य प्रचंड होते. पू.श्री.काकांची समग्र ग्रंथसंपदा जवळपास पाच हजार पेक्षाही जास्त पृष्ठे भरतील एवढी अफाट आहे !
श्रीसद्गुरुकृपेने आणि सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या प्रेमाशीर्वादांनी पू.श्री.काकांचा श्रीज्ञानेश्वरीच्या अंतरंगात प्रवेश झाला होता. श्रीकृपेने अनुभवलेल्या श्रीज्ञानेश्वरीचा अमृतरस त्यांनी 'श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनी' या भाष्याच्या माध्यमातून समग्रतेने प्रकट केला आहे. संपूर्ण श्रीज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांवरचे हे भाष्य अडीच हजार पृष्ठांपेक्षाही मोठे आहे. यातील अनेक अध्यायांची प.पू.श्री.काकांच्या हयातीतच पंजाबी, तेलुगू, तमिळ, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, कानडी, मल्याळम इत्यादी भाषांमध्ये भाषांतरे देखील प्रकाशित होऊन विनामूल्य वितरित केली गेली.
आपल्याला लाभलेला अपूर्व ब्रह्मानंदानुभव प.पू.श्री.काकांनी 'प्रास्ताविक', 'आमोद', 'सामोपचार परिहार' आणि 'ज्योतिज्योति' या चार लघुनिबंध वजा ग्रंथांमधून प्रकट केलेला आहे. तसेच श्रीज्ञानेश्वरीत आलेले महत्त्वाचे सिद्धांत आणि त्यावरील श्रीमाउलींच्या ओव्यांचे संकलन 'श्रीसिद्धांत ज्ञानेश्वरी' ग्रंथाच्या चार खंडांमधून प्रकाशित झाले. सर्वसामान्य वाचक आणि अभ्यासकांसाठी हा फारच मोठा ठेवा ठरला. सिद्धांतांच्या ओव्या आणि त्यांचा सुबोध सरलार्थ एकत्रित मिळाल्याने अभ्यासकांची चांगली सोय झालेली आहे. श्रीज्ञानेश्वरीच्या दैनंदिन अभ्यासासाठी हे चार खंड अत्यंत उपयुक्त आहेत.
सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या अठ्ठावीस अभंगांच्या 'श्रीहरिपाठ' या लघुग्रंथावर प.पू.श्री.काकांची अपरंपार श्रद्धा, भक्ती होती. त्यांनी आयुष्यभर हरिपाठाचे पठण आणि भजन केले. ते सर्वांना हरिपाठाचीच उपासना देत असत. हरिपाठावरील आपले चिंतन त्यांनी 'हरिपाठ सांगाती' या ग्रंथाच्या रूपाने प्रकाशित केलेले आहे. अतिशय अचूक, उत्तम आणि मार्गदर्शक असे हे ५२८ पृष्ठांचे बृहद् संकलन श्रीहरिपाठप्रेमी सज्जनांनी प्रेमादराने गौरविलेले आहे. श्रीज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या आणि त्यांचा अर्थ आणि निवडक संतांचे अभंग यांचे सुरेख संकलन या ग्रंथात करण्यात आलेले आहे. या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निवेदनात प.पू.श्री.काका म्हणतात, "हरिपाठ कीर्ती मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा । एवढे ज्या हरिपाठाचे माहात्म्य आहे. तो हरिपाठ भाषिकांपुढे शृंगारून मांडण्याचा प्रयत्न आहे. हरिपाठ हा एक महान मंत्र आहे व त्याच्या सततच्या पाठाने अनेक साधकांनी आपली उन्नती करून घेतली आहे. हा मंत्र जगाला देणारे श्रीज्ञानदेव यांच्या श्रीज्ञानेश्वरीच्या भूमिकेवरून श्रीहरिपाठाचे अवलोकन व्हावे हा 'श्रीहरिपाठ सांगाती'च्या मागील उद्देश आहे. श्रीज्ञानेश्वरीच्या कोंदणात शोभणारे हे देदीप्यमान रत्न आहे. हरिपाठ सांगातीच्या संगतीमध्ये जे हरिपाठाचा नित्यपाठ करतील, त्यांना मोक्षसुखाचा लाभ सहजासहजी मिळेल.”
पू.श्री.काका हे सदैव जीवन्मुक्त दशेतच वावरणारे त्यांच्या काळातील एक अद्वितीय संतरत्न होते. परंपरेने आलेली अवधूती मौज पूर्ण पचवून आपल्या स्मरणानंदात अखंड विचरण करणारे हे पराभक्तीचे महान आचार्य विलक्षण अशा विभूतिमत्त्वाचे धनी होते. प.पू.श्री.काकांच्या स्वरूप स्थितीचे अगदी चपखल वर्णन करताना, 'स्वानंद चक्रवर्ती' या ग्रंथाच्या प्राक्कथनात संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "सद्गुरु भगवान श्रीदत्तात्रेय प्रभूंनी 'जीवन्मुक्त गीते'त असे म्हटले आहे की; 'आपल्या आत्म्याचे शिवशक्तीरूप, परब्रह्मस्वरूप जाणून, तसेच आपल्या पिंडाचे, शरीराचे ब्रह्मांडस्वरूप समजून घेऊन जो हृदयातील मोह चिदाकाशात विलीन करून असतो, तोच जीवन्मुक्त म्हटला जातो !"
प.पू.श्री.काकांची अक्षरशः तशीच नित्य अंतरंग स्थिती होती. त्या परमबोधावस्थेत सतत रममाण राहणारे काका, संतत्वाचा उत्तुंग आदर्श होते. ते स्वानंदसाम्राज्याचे अनभिषिक्त चक्रवर्ती होते. अनेक आर्तांना त्यांनी कळवळा येऊन दुःखमुक्त केले, अनेक जिज्ञासूंना जिव्हाळ्याने यथायोग्य मार्गदर्शन करुन भक्तिमार्गावर अग्रेसर केले; आणि त्यांच्या मर्जीला उतरलेल्या निवडक शरणागत मुमुक्षूंना अमोघ कृपादान देऊन ब्राह्मीस्थितीत प्रतिष्ठापित केले. 
प.पू.श्री.काकांचे यथार्थ दर्शन श्रीज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील ज्ञानीभक्ताच्या सद्गुरु भगवान श्रीमाउलींनी निरूपिलेल्या गुणसंपत्ती लक्षणांनीच होऊ शकतो. प्राप्त पुरुषांची ती समग्र दैवी सुलक्षणे त्यांच्या ठायी सुखाने, आपलेपणाने तिन्ही त्रिकाल नांदत होती. सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांच्या पूर्णकृपेने अंगीच पराभक्तीचे अधिष्ठान झालेल्या काकांचे ते आत्मसौंदर्य अत्यंत विलक्षण, पाहणाऱ्याला खिळवून ठेवणारे होते.
आत्ममग्न स्वानंदसुखावस्थतेतूनच सगळी ग्रंथनिर्मिती झाल्याने पू.श्री.काकांची शैली आणि त्यांचे शब्दवैभव काहीसे निगूढच आहे. त्यांच्या देवदुर्लभ 'आत्मबोधप्रशस्ती'चा तो सहज अनुकार असल्यानेच त्यांची वाक्यरचनाही लफ्फेदार आणि प्रौढ आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना त्यामुळेच दुर्बोध आणि आकलनास जरा कठीण वाटणारी पू.श्री.काकांची ग्रंथरचना आत्मानुभवी महात्म्यांना मात्र अगदी सहजसुंदर आणि मनोहरच जाणवते. पुन्हा पुन्हा वाचून, त्यांच्या मोठ्या वाक्यातील नेमका आशय समजून उमजून घेतल्याशिवाय त्यातील अमृतगोडी चटकन आपलीशी होत नाही. असे असले तरीही, प.पू.श्री.काकांच्या स्वरूपमग्न शैलीला लाभलेला एक नैसर्गिक गोडवा आणि श्रीसद्गुरुकृपेचा, सद्गुरु श्री माउलींच्या परमकृपेचा दिव्यस्पर्श, सामान्य वाचकालाही भावविभोर करण्याचे अद्भुत सामर्थ्य अंगी मिरविताना दिसतो. सद्गुरु श्री.माउलींनी श्रीसद्गुरुकृपेने 'पिकलेल्या सारस्वताच्या संपन्नते'चा, त्यामागील सद्गुरुकृपेच्या 'साउली'चा केलेला यथार्थ गौरव पू.श्री.काकांच्या वाङ्मयात मूर्त झालेला पाहायला मिळतो !
प.पू.श्री.काकांनी साधकांच्या उपासनेला पूरक ठरावे असेही काही लघुग्रंथ प्रकाशित केले. 'नित्यपाठ', 'प्रसन्नमाधवी' आणि 'श्रीज्ञानेश्वर प्रशस्ती' असे ते तीन लघुग्रंथ विविध महात्म्यांची प्रभावी स्तोत्रे, अभंग आणि पदांचे सुरेख संकलन आहेत. 'प्रसन्नमाधवी' आणि 'श्रीज्ञानेश्वर प्रशस्ती' हे पू.श्री.काका स्वतः अनुसरत असलेल्या दररोजच्या हरिपाठ उपासनेच्या नित्यक्रमाचे ग्रंथरूप आहे. आज जवळपास पाऊणशे वर्षे झाली, त्यांनी घालून दिलेल्या पद्धतीने दररोज हरिपाठ उपासना त्यांच्या मंदिरात संपन्न होत आहे. हेही सद्गुरु श्रीमाउलींच्या कृपेने एक महान आश्चर्यच म्हणायला हवे.
सद्गुरु श्री.काकांचा आणखी एक ग्रंथ म्हणजे 'विभूती'. फलटण येथे गेल्या शतकात होऊन गेलेल्या सद्गुरु श्री हरिबुवा महाराज आणि त्यांच्या शिष्या सद्गुरु श्री आईसाहेब महाराज या दोन अलौकिक विभूतिमत्त्वांचे अतिशय रसाळ, ज्ञानवर्धक आणि बोधप्रद असे गद्यचरित्र 'विभूती' ग्रंथाच्या रूपाने प्रकाशित झाले. यातही चरित्रभागाव्यतिरिक्त उत्तरार्धात तत्त्वचिंतनाचा, साधकांच्यासाठी उपयुक्त असा 'विविध विषय' नावाचा बोधप्रद भाग पू.श्री.काकांनी लिहिलेला आहे. पू.श्री.काकांच्या समग्र साहित्य संपदेचा सविस्तर विचार करणे विस्तारभयास्तव अशक्य असल्याने प्रस्तुत 'विभूती' ग्रंथाचा अल्पसा परिचय करून देतो.
संतचरित्रांचे रचनाकार संतच असायला हवेत अशी सर्वमान्यता आहे. 'अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती l' या श्रीसमर्थ वचनाचा तसेच 'तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण l तरीच महिमान येईल कळो ll' या संतवचनांचा भावार्थ हाच आहे. संतत्वाचा अनुभव असल्याशिवाय संतचरित्रांचे यथार्थ मर्म मांडणे शक्यच होत नाही. पू.श्री.काकांचे अतीव आदराचे स्थान असणारे श्रीसंत हरिबुवा आणि श्रीसंत आईसाहेब या दोन्ही विभूतींचे रसाळ आणि मनोवेधक चरित्र त्यांनी भाविकांवर मोठे उपकारच करून ठेवलेले आहेत. प.पू.श्री.काकांना दोन्ही विभूतींचा सहवास आणि कृपाप्रसाद लाभलेला होता. त्यामुळे या चरित्राला झालेला आत्मीयतेच्या, प्रेमभावाचा विशेष स्पर्श वाचकाला शेवटपर्यंत सतत जाणवत राहतो. किंबहुना, पू.श्री.काकांच्या अंतरंगी वसत असलेली या महात्म्यांच्या विषयीची अपरंपार श्रद्धाभक्तीच चरित्ररूपाने साकारलेली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
'विभूती' या ग्रंथात पूर्वार्धात सुरुवातीला श्रीसंत हरिबुवांचे चरित्र घेतलेले आहे. या चरित्र विभागांमध्ये प.पू.श्री.काकांनी श्रीसंत हरिबुवा आणि श्रीसंत आईसाहेब महाराजांच्या जीवनात घडलेले असंख्य अनोखे चमत्कार आणि त्यांच्या कृपाप्रसादाने घडलेल्या अतर्क्य घटनांचा लेखाजोगा भावपूर्ण शब्दांत मांडलेला आहे. ग्रंथाच्या उत्तरार्धात 'विचार दोहन', 'अमृत बिंदु' आणि 'विविध विषय' अशा तीन शीर्षकांचे विभाग आहेत. हे सारेच चरित्रवर्णन रसमय असून वाचकाच्या मनात या दोन्ही विभूतींविषयी अपार प्रेमादर निर्माण करणारेच आहे. या चरित्रासंबंधात आपल्या प्रस्तावनेत पू.श्री.काका म्हणतात, "श्रीहरिबाबांच्या लीला अत्यंत हृदयंगम आहेत हें जितके खरें, तितकाच त्यांनी श्रीआईसाहेब (लाटे) यांच्यावर केलेला अनुग्रह उल्लेखनीय आहे. नुकतीच लग्न झालेली ६-७ वर्षांची मुलगी, श्रीहरिबाबांचे नजरेस - ते लाटे येथे गेले असताना पडते काय व तिला जवळ बोलावून ते तिच्या मस्तकीं हस्त ठेवतात काय - अनेक वर्षे प्रयत्न करूनहि जें साधकांना मिळवता येत नाहीं - ते त्यांनी लीलेने श्रीआईसाहेबांच्या पदरांत टाकले. श्रीआईसाहेब देहभान विसरल्या व एक लोकोत्तर अवतारी व्यक्ती म्हणून जगांत नांदू लागल्या." एवढ्यावरूनच प्रस्तुत ग्रंथात किती अलौकिक आणि अद्भुत चरित्रलीला वाचायला मिळणार आहेत, याचा सुज्ञ वाचकांना अंदाज येऊ शकतो. 'विचार दोहन' या विभागात पू.श्री.काकांनी मार्मिक असे विचार मांडले आहेत. साधकांना उपयुक्त ठरावेत, चिंतन-मननात साहाय्यक व्हावेत असेच हे विचार आहेत. यातच एका विचारात ते 'सद्गुरुतत्त्वा'ची चौदा लक्षणे सांगतात. या अतिशय मननीय अशा चौदा व्याख्याच आहेत. त्यापुढील 'अमृत बिंदु' विभागाचे शीर्षकच किती बोलके आहे पाहा. 'भक्तहृदयांस ज्ञानसिंधु करणारे मननीय अमृतबिंदु' मधून पू.श्री.काकांनी सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली, श्रीनामदेव, श्रीएकनाथ, श्रीतुकाराम आणि श्रीकृष्णसुत या संतांचे मार्मिक व सुंदर अभंग दिलेले आहेत. त्या अभंगांना अन्वर्थक शीर्षकेही आहेत.
ग्रंथाच्या शेवटच्या 'विविध विषय' नामक संकलनात, श्रीज्ञानेश्वरीतील काही निवडक ओव्यांचे वेचे, श्रीमदाद्य शंकराचार्यांची काही स्तोत्रे, प्रवासवर्णन इत्यादी चित्ताकर्षक व बोधप्रद गोष्टी आहेत. पू.श्री.काकांच्या इतर वाङ्मयासारखा 'विभूती' हा ग्रंथ दुर्बोध आणि आकलनास कठीण अजिबात नाही.
पू.श्री.काकांची समग्र ग्रंथसंपदा त्या काळातच विनामूल्य वितरित झाल्याने आजमितीस फारसे ग्रंथ उपलब्ध नाहीत. काही ग्रंथांच्या दोन - तीन आवृत्त्याही निघाल्या. पण आता मात्र ते उपलब्ध होत नाहीत. म्हणून आम्ही त्यातील काही ग्रंथ स्कॅन करून त्यांच्या पीडीएफ उपलब्ध करून देत आहोत. ज्यांना हव्या असतील त्यांनी माझ्याशी संपर्क करावा ही विनंती.
लोकोत्तरतेच्या कोटीतील एका ज्ञानी भक्ताचे, पराभक्तीचे अधिष्ठान झालेल्या एका सहृदय, श्रीगुरु-हरिभक्ताचे हे समस्त वाङ्मय जणू त्यांची 'वाङ्मयीमूर्ती'च आहे. आजही त्या रूपाने प.पू.श्री.काका अखंड विराजमान आहेत. जो - जितका या अगाध अमृतसागरात अवगाहन करील तो तितकाच अमृतमय होऊन ठाकेल, यात तिळमात्र शंका नाही !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
प.पू.सद्गुरु श्री.काकांच्या समाधी मंदिरात आजच्या दिनी केलेली सुंदर सजावट. तसेच श्रींच्या सुवर्णपादुकांचे दर्शन !!