22 Nov 2020

मैं कैलास का रहनेवाला हूं


आज कार्तिक शुद्ध अष्टमी, गोपाष्टमी. आजच्याच तिथीला पावन करीत इ.स.१७८५ साली नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर या ग्रामी, पहाटेच्या वेळेस एक दिव्य बालक प्रकट झाले. शिवभक्त श्री.नारायणराव अंतापूरकर व त्यांच्या पत्नीला या दैवी बालकाच्या रूपाने पुत्र लाभला आणि त्याच 'शंकर' नावाच्या बालकाने पुढे जाऊन अनंत जीवांचा उद्धार केला व आजही करीत आहेत.
"मैं कैलास का रहनेवाला हूं ।" असे स्पष्ट सांगणारे, प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. साक्षात् राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज देखील त्यांच्यासारखेच अखंड अवधूती मौजेमध्ये राहात असत. त्यांच्या लोकविलक्षण लीला वाचताना आश्चर्यालाही चमत्कार वाटावा, अशी आपली परिस्थिती होऊन जाते. 
सद्गुरु श्री शंकर महाराज अष्टावक्र होते, त्यांचा डावा पाय मोठा तर उजवा पाय लहान होता. ते म्हणत की, डावा पाय स्वामींचा व उजवा पाय माझा आहे. ते सद्गुरु श्रीस्वामींना 'आई' म्हणत असत व सांगत, " खरोखरीच स्वामीआईने मला मांडीवर घेऊन आपले दूध पाजलेले आहे !" राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे हे परमप्रिय शिष्योत्तम खरोखरीच श्रीस्वामी समर्थ महाराजांसारखेच अद्भुत आणि अतर्क्य लीलाविहारी होते. 
आमच्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा व सद्गुरु श्री शंकर महाराजांचा खूप दृढ स्नेह होता. या दोघांही महात्म्यांचा जिव्हाळ्याचा समान विषय श्री ज्ञानेश्वरी हाच होता.
सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या असंख्य लीला प्रचलित आहेत, पण त्यांचे श्री ज्ञानेश्वरीप्रेम त्यामानाने जास्त प्रचलित नाही. 
नगर ला सरदार मिरीकरांकडे एकदा चालू प्रवचनात स्वत: श्री शंकर महाराजांनी श्री माउलींच्या एकाच ओवीचे पन्नास वेगवेगळे अर्थ सांगून लोकांना आश्चर्यचकित केले होते. पुण्याला रावसाहेब मेहेंदळे यांच्या वाड्यात नेहमी चालणाऱ्या ज्ञानेश्वरी चिंतनास श्री शंकर महाराज उपस्थित असत. त्यावेळीच काही प्रसंगी तेथे प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजही उपस्थित होते. रावसाहेब मेहेंदळे हे प.पू.श्री.काकांचे नू.म.वि.शाळेतील मित्र होते. बहुदा १९४४ साली श्री शंकर महाराज फलटणला येऊन गेले होते. पण त्यावेळी प.पू.श्री.काकांची व त्यांची भेट झाली होती का ? हे आजतरी कोणाला माहीत नाही. प.पू.श्री.शंकर महाराज व प.पू.श्री.उपळेकर काकांच्या भेटीचा मेहेंदळे वाड्यात घडलेला एक प्रसंग मी स्वत: श्री.ज्ञाननाथजी रानडे यांच्या तोंडून ऐकलेला आहे.
श्री शंकर महाराजांनी आपले शिष्य डॉ.धनेश्वर यांच्याकडून श्री ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करवून घेतला होता. वरकरणी महाराजांचे वागणे-बोलणे वाटत विचित्र असले, तरी तो केवळ दिखावा होता लोकांना टाळण्यासाठी. त्यांचे मद्यपान, धूम्रपान सर्वकाही केवळ नाटक होते. आतून ते सदैव पूर्ण आत्मरंगी रंगलेले व परमज्ञानी असे विलक्षण भक्तश्रेष्ठ होते.
प.पू.श्री.काकांचे उत्तराधिकारी प.पू.श्री.बागोबा महाराज कुकडे हे श्री शंकर महाराजांचेही लाडके होते व त्यांच्या नवरत्न दरबारापैकी एक रत्न होते. श्री शंकर महाराजांचा नवरत्न दरबाराचा फोटो उपलब्ध आहे, त्यात पू.श्री.बागोबा बसलेले पाहायला मिळतात. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी, "श्री शंकर महाराज व आम्ही एकच आहोत", अशी विशेष अनुभूती एका भक्ताला काही वर्षांपूर्वी दृष्टांताने दिली होती. खरोखर हे दोन्ही महात्मे अतिशय विलक्षण असे अवधूतच होते.
प.पू.योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचेही सद्गुरु श्री शंकर महाराजांशी हृद्य नाते होते. प.पू.श्री.मामांच्या मातु:श्री व राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पूर्णकृपांकित कन्या प.पू.पार्वतीदेवी देशपांडे यांच्याकडे श्री शंकर महाराज आवर्जून येत असत. ते मोठ्या प्रेमाने पू.मातु:श्रींच्या हातचे सुग्रास अन्न ग्रहण करीत. नंतर त्यावेळी तरुण असलेल्या पू.श्री.मामांच्या सायकलवर बसून त्यांना हवे तिथे नेऊन सोडायला सांगत असत. प.पू.श्री.मामांना श्रीस्वामी समर्थ महाराज 'सख्या' म्हणत असत. त्यामुळेच पू.मातु:श्री व श्री शंकर महाराजही पू.मामांना 'सख्या' याच नावाने संबोधत असत. 
सद्गुरु श्री शंकर महाराज अक्षरश: काहीही लीला करू शकत असत. त्यांचे अचाट सामर्थ्य पाहून आपण स्तिमितच होऊन जातो. पण दुर्दैवाने म्हणा किंवा कलियुगाच्याच प्रभावाने म्हणा, आजच्या घडीला अनेक भोंदू महाराज, 'आमच्यामध्ये श्री शंकर महाराजांचा संचार होतो किंवा त्यांचे आदेश होतात' असे सांगून लोकांची फसवणूक करताना दिसत आहेत. "संतांचे कधीही संचार होत नसतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहे." भूतपिशाचे किंवा देवतांच्या गणांचे संचार होत असतात, देवांचे किंवा संतांचे कधीही संचार होत नसतात. ते पूर्णत: शास्त्रविरुद्ध आहे. त्यामुळे श्रीस्वामी समर्थ महाराज, श्री गोरक्षनाथ महाराज, श्री शंकर महाराज, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज इत्यादी महान संतांचे नाव घेऊन जर कोणी संचार झाल्याचे सांगत असेल, तर ते धादांत खोटे आहे हे स्पष्ट समजावे. तिथे दुसरेच एखादे पिशाच त्या नावाने संचार करीत असते किंवा ती व्यक्ती लोकांना लुबाडण्यासाठी संचाराचा खोटाच बनाव रचत असते, हे स्पष्ट समजून जावे. एखादा पुरुष गर्भार राहणे जितके अशक्य आहे, तितकाच संतांचा संचार होणे अशक्य आहे. गेल्या शतकातील थोर नाथयोगी संत श्री.गजानन महाराज गुप्ते यांनी आपल्या 'आत्मप्रभा' नावाच्या ग्रंथात असल्या भोंदूगिरीवर प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत. तेही स्पष्ट सांगतात की, "संतांना कोणाच्याही शरीरामध्ये संचार करण्याची काहीही आवश्यकता नाही."
लोकांच्या असहाय्यतेचा, प्रापंचिक संकटांनी पिडलेल्या जनतेचा ही भोंदू मंडळी पुरेपूर गैरफायदा घेऊन आपला  धंदा वाढवीत असतात. आपल्या कष्टदायक परिस्थितीत काहीतरी आशेचा किरण मिळेल या भाबड्या विचाराने लोकही मग त्यांच्या नादी लागतात व आगीतून अजून फुपाट्यात पडतात. तेव्हा चुकूनही असल्या संचारवाल्या बाया-बाबांच्या भानगडीत कधीही पडू नये, ही नम्र विनंती.
शास्त्रानुसार संतांचे शक्त्यावेश होत असतात, संचार नाही. शक्त्यावेश म्हणजे संतांच्या शक्तीचा काही काळासाठी झालेला दिव्य आवेश. असा शक्त्यावेश होण्यासाठी तो देहही तेवढ्याच तयारीचा लागतो. सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या अवतारकालात, त्यांच्या समक्षही असे शक्त्यावेश झालेले पाहायला मिळतात, पण ते काही क्षणांसाठीच होते. तसेच त्यांच्या अवतारकालानंतर नाशिकच्या श्री.कुलकर्णी मास्तरांमध्ये असलेला त्यांचा शक्त्यावेश अनेक भक्तांनी समक्ष पाहिलेला, अनुभवलेला आहे. तो मात्र खरा शक्त्यावेश होता व आजीवन राहिलेला होता. म्हणूनच तर त्या रूपातील श्री शंकर महाराजांना, विडणीला समाधिस्थ झालेले श्री शंकर महाराजांचे शिष्योत्तम श्री.शिवाजी महाराजही आपली आई म्हणूनच संबोधत असत. परंतु दुर्दैवाने आजमितीस मात्र श्री शंकर महाराजांचा संचार झाल्याचे दाखवून किंवा त्यांनी आदेश दिल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणारेच फार झालेले आहेत. शेवटी 'कालाय तस्मै नम: ।' हेच खरे.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे स्नेही व परमश्रेष्ठ योगिराज सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या महन्मंगल श्रीचरणीं प्रकट दिनानिमित्त सादर साष्टांग दंडवत !!
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment