कांची परमाचार्य श्रीमद् जगद्गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथी
भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या कांची सर्वज्ञ पीठाचे अडुसष्टावे आचार्य, प्रत्यक्ष भगवान श्रीशिवशंकरच असे श्रीमद् जगद्गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज तथा श्री परमाचार्य यांची आज तिसावी पुण्यतिथी आहे. आजच्याच तारखेला आणि तिथीलाही, दि.८ जानेवारी १९९४, मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी रोजी दुपारी तीन वाजता वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली होती.
श्री परमाचार्य हे महान विभूतिमत्त्व होते. ते साक्षात् भगवान श्रीशिवच आहेत, याची असंख्य भाविकांना जागती प्रचिती लाभलेली आहे. त्यांच्या सर्वच लीला अतीव मधुर व विलक्षण आहेत. प.पू.योगिराज श्री.गुळवणी महाराज व प.पू.योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा श्री परमाचार्यांशी अत्यंत दृढ स्नेहभाव होता. श्री परमाचार्य प.पू.श्री.मामांना श्री.टेंब्येस्वामी असेच संबोधून बोलत असत.
कांची कामकोटी पीठाचे अडुसष्टावे आचार्य म्हणून श्रीमज्जगद्गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष भगवान श्रीशंकरांनीच अवतार धारण केला होता अशी मान्यता आहे. विशुद्ध धर्माचीच श्रीमूर्ती असणारे श्रीमद् चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी तथा श्री परमाचार्य यांचा अलौकिक जीवनपट नजरेखालून घातल्यास, त्यांच्या रूपाने प्रत्यक्ष श्रीभगवंतच अवतरले होते यावर आपलाही पूर्ण विश्वास बसतो. श्री परमाचार्यांचा शंभर वर्षांचा आयुष्यक्रम अक्षरशः विलक्षण आणि दिव्य घटनांनी भरलेला आहे.
श्री कांची परमाचार्यांचे दैवी विभूतिमत्त्व, त्यांचे अगाध ज्ञान आणि अलौकिक चरित्र पाहून त्यांना 'महापेरियावा' म्हणजे ‘महान विभूतिमत्त्व’ असे सार्थ नामाभिधान देण्यात आले आहे. तसेच त्यांना जनमानसाने उत्स्फूर्तपणे मोठ्या आदराने 'नाडुमाडु देव' म्हणजे 'चालता बोलता परमेश्वर' (Walking God ) असेही संबोधिलेले आहे.
चिपळूणहून प्रकाशित होणाऱ्या 'अमृतबोध' मासिकाच्या डिसेंबर २०२२ अंकातील 'जवळिकेंची सरोवरे' या लेखमालेत श्री परमाचार्यांचे दिव्य चरित्र आणि लीला, तसेच श्रीदत्तसंप्रदायाच्या आमच्या श्रीगुरुपरंपरेतील अवतारी महात्म्यांशी असलेल्या त्यांच्या भावपूर्ण स्नेहसंबंधांबद्दल मी सविस्तर लेख लिहिला होता. जिज्ञासूंनी आवर्जून तो लेख वाचावा ही विनंती. त्या लेखातील एकच अद्भुत लीला येथे उद्धृत करीत आहे.
श्री परमाचार्य १९८०-८१ साली साताऱ्याला अकरा महिने राहिले होते. त्यावेळी प.पू.सद्गुरु श्री.मामा, आपल्या उत्तराधिकारी शिष्या प.पू.सौ.शकाताई आगटे यांच्या सोबत दर्शनाला गेले होते. प.पू.श्री.मामा दर्शनाच्या रांगेत उभे होते. तेवढ्यात स्वतः श्री परमाचार्यांनी आतून एका शिष्याला; “बाहेर टेंब्येस्वामी उभे आहेत, त्यांना सन्मानाने आत घेऊन ये !” असे सांगून पाठविले. तो बाहेर येऊन बघू लागला. त्याला कोणीच संन्यासी रांगेत न दिसल्याने त्याने परत जाऊन तसे सांगितले. त्यावर हसून श्री परमाचार्य म्हणाले, "अरे, त्यांना आता टेंब्येस्वामी म्हणत नाहीत, 'मामा' असे म्हणतात. तू मामा कोण म्हणून विचार. "
त्या शिष्याने बाहेर येऊन चौकशी केल्यावर प.पू.श्री.मामा पुढे झाले. त्याने आदराने प.पू.श्री.मामांना आत नेले. श्रीशिवावतार श्री परमाचार्यांनी अत्यानंदाने श्रीदत्तावतार प.पू.श्री.मामांचे स्वागत केले, त्यांना क्षेमालिंगन दिले व दोघेही अस्खलित संस्कृतमधून खूप वेळ बोलत बसले. लौकिकार्थाने प.पू.श्री.मामा संस्कृत भाषा शिकलेले नव्हते. आश्चर्य म्हणजे, श्री परमाचार्य पूर्णवेळ त्यांना श्री टेंब्येस्वामी म्हणूनच संबोधत होते. प.पू.श्री.मामांप्रमाणेच त्यांचे दोन्ही उत्तराधिकारी प.पू.सौ.शकाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे या दोघांशीही श्री परमाचर्यांचा फार स्नेहबंध होता.
परमवंदनीय कांची जगद्गुरु श्रीमद् चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांच्या अम्लान श्रीचरणीं आजच्या तारीख व तिथी अशा दोन्ही पुण्यतिथीच्या पावन पर्वावर साष्टांग दंडवत !!
(https://rohanupalekar.blogspot.com)
लेखन - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
0 comments:
Post a Comment