31 Dec 2016

त्रैलोक्याचा राजा नरहरि तो माझा

आज पौष शुद्ध द्वितीया, कलियुगातील द्वितीय श्रीदत्तावतार, भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती !!
भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराजांनी, कुरवपूरच्या कृष्णानदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच पुढच्या जन्मी अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंनी श्री नरहरी रूपाने तिच्या पोटी, शके १३०० अर्थात् इ.स. १३७८ मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते.  नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले. तेथून मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. तेथून कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले. तेथे एक चातुर्मास्य राहिले. तेथे त्यांच्या स्मरणार्थ पुढे 'विमल पादुका' स्थापन करण्यात आलेल्या आहेत. औदुंबरहून पुढे ते नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले. तेथे श्रींनी आपल्या 'मनोहर पादुका' व अन्नपूर्णामातेची स्थापन केली व मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात  'निर्गुण पादुका' स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. श्रींचा जो अपार्थिव, दिव्य-पावन श्रीविग्रह अशाप्रकारे स्थूलरूप धारण करून कार्यरत होता, तोच आजही गुप्तरूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहे व पुढेही करीत राहीलच.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्याकाळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली. लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला. ते स्वत: अत्यंत कडक आचरण करीत असले तरी, त्यांनी कृपा करण्यात भक्तांचा जात-धर्म कधीच पाहिला नाही. जसे चारही वेदांचे ज्ञानी ब्राह्मण, श्रेष्ठ संन्यासी त्यांचे शिष्य होते, तसेच भक्तराज तंतुक, पर्वतेश्वर शूद्र व बिदरचा मुसलमान बादशहा असे अन्य जाती-धर्मातील हजारो भक्तही त्यांच्या कृपेने धन्य झालेले होते. ते अकारणकृपाळू व परमदयाळूच आहेत. जगाच्या कल्याणासाठी आलेल्या अवतारांना, संतांना जात-धर्म यांच्या चौकटीत बसवणे हा वेडगळपणाच नव्हे काय?
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तृगामी व स्मरणमात्रे संतुष्ट होणारे परमदयाळू व भक्तवत्सल आहेत. प्रेमभराने व निर्मळ अंत:करणाने त्यांना घातलेली साद त्यांच्यापर्यंत पोचतेच पोचते, असा लाखो भक्तांचा आजवरचा रोकडा अनुभव आहे. श्रीदत्तसंप्रदायातील थोर विभूतिमत्व  प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्याकडून ऐकलेले आहे की, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अत्यंत ऋजू अंत:करणाचे परमशांत असे अवतार आहेत. त्यांच्या दयाकृपेला ना अंत ना सीमा. त्यांच्या भक्तवात्सल्य ब्रीदाचे यथार्थ वर्णन करताना श्री गुरुभक्तही हेच म्हणतात,
अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।
संकटिं भक्ता रक्षी नानापरी ।
रुतूं देईना पायी कांटा रे ॥
शरणांगता जना पाठिसी घालुनी ।
कळिकाळासी मारी सोटा रे ॥
अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे. तेथे ते निरंतर राहून भक्तकल्याण करीत असतात. त्यांचेच प्रत्यक्ष अधिष्ठान आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही आहे. " वाडी-गाणगापूर प्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू ", असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वत: प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना दिला होता. त्यांच्या त्या अमृतशब्दांची आजही सतत प्रचिती येत असते.
प.प.श्री.नारायणस्वामी महाराजांचे शिष्योत्तम, वाडीतील ढोबळे पुजारी उपनावाचे व श्री गुरुभक्त ही नाममुद्रा धारण करणारे थोर भक्तवर, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांविषयीचा अापला दृढ प्रेमभाव व्यक्त करताना म्हणतात,
त्रैलोक्याचा राजा ।
नरहरि तो माझा तो माझा ॥ध्रु.॥
नांदे अमरापूर ग्रामीं ।
कृष्णातीरीं यतिवरस्वामी ॥१॥
नृसिंहसरस्वती करुणामूर्ति ।
त्रिभुवनिं गाती ज्याची कीर्ति ॥२॥
श्रीधरविभु निजकैवारी ।
भावें भजतां भवभय वारी ॥३॥

या अखिल ब्रह्मांडांचे नायक असणा-या, भक्तांचे भवभय वारण करणा-या, कृष्णातीरी नित्य नांदणा-या, त्रिभुवनात ज्यांच्या कीर्तीचा डंका सदैव वाजत असतो, त्या परमदयाळू परमकनवाळू महाराजाधिराज श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं, आज जयंतीदिनी प्रेमभराने साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचेच परमपावन नाम घेत त्यांना कृपाप्रसादाची प्रार्थना करूया !!
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

26 Dec 2016

गुरुवरा ओवाळू आरती

आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे कनिष्ठ बंधू व शिष्योत्तम, साक्षात् ब्रह्मदेवांचे अवतार सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांची समाधी तिथी. श्रीसंत तुकोबारायांच्या चौदा टाळक-यांपैकी त्यांचे एक शिष्य श्री संताजी महाराज जगनाडे-तेली यांचीही आज पुण्यतिथी. श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्व महान शक्तिपाताचार्य योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांची आज जयंती. आजची तिथी मोठी पुण्यपावनच आहे !
सद्गुरु श्री सोपानदेव महाराज हे श्री माउलींचे धाकटे बंधू व शिष्य. त्यांचा जन्म इ.स. १२७७ मध्ये कार्तिक पौर्णिमेला आळंदीत झाला. त्यांनी देखील गीतेवर 'सोपानदेवी' या नावाची टीका रचलेली आहे. त्यांचे काही अभंगही उपलब्ध आहेत. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांचे स्वभाववैशिष्ट्य श्री नामदेवराय सांगतात, "न ये पां एकांत सोपानाचा ॥" सगळ्यांमध्ये राहूनही आंतरिक एकांत साधणे व त्या स्थितीत सदैव राहणे हे श्री सोपानदेवांचे वैशिष्ट्य होते.
आजच्याच तिथीला त्यांनी सासवड येथे क-हामाईच्या काठी सोमेश्वरांच्या मंदिरालगत समाधी घेतली. त्यांच्या समाधिवर्णनाच्या अभंगांमध्ये श्री नामदेवराय म्हणतात, " निशिदिनी कीर्तन केले द्वादशी । वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष ॥३॥ भोगावती केले अवघ्यांनी स्नान । चालिले सोपान समाधीसी ॥ना.गा.११३२.४॥" श्री सोपानदेवांच्या स्नानासाठी प्रत्यक्ष श्रीपांडुरंगांनी सर्व तीर्थांना आवाहन केले. त्यावेळी त्रैलोक्यातील यच्चयावत् सर्व तीर्थे क-हेच्या काठावरील एका कुंडात प्रकटली व त्या पावन जलाने सोपानदेवांना स्वत: भगवंतांनी स्नान घातले. ते कुंड आजही सासवड येथे मंदिरासमोरच पाहायला मिळते. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांच्या चरणीं साष्टांग दंडवत.
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या थोर शिष्यांपैकी एक, देहूनजीकच्या सुदुंब्रे येथील तेली समाजातील श्री संताजी महाराज जगनाडे यांचीही आज पुण्यतिथी असते. संताजी महाराजांनी स्वहस्ते लिहिलेला श्री तुकोबारायांचा गाथा आजही पाहायला मिळतो. श्री तुकाराम महाराजांच्या चौदा निष्ठावंत टाळकरी मंडळींमध्ये संताजी महाराजही होते. त्यांच्याही श्रीचरणीं सादर दंडवत.
श्रीदत्त संप्रदायातील महान विभूतिमत्व, प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच अपरस्वरूप योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांची आज १३० वी जयंती. आजच्याच तिथीला, २३ डिसेंबर १८८६ रोजी, कोल्हापूर संस्थानातील राधानगरी तालुक्यातील कुडुत्री या छोट्याशा खेड्यात रात्री ८.१९ मिनिटांनी वे. शा. सं. दत्तंभट व सौ. उमाबाई या सात्त्विक दांपत्याच्या पोटी श्रीमहाराजांचा जन्म झाला. गुळवणी घराणे हे श्रीनृसिंहवाडीच्या प.प.श्री.नारायणस्वामींचे कृपांकित होते व त्यांच्याच कृपेने हा वंश चालला होता.
श्रीमहाराजांची राहणी अतिशय साधी होती. स्वच्छता, टापटीप व वक्तशीरपणा हे त्यांचे अंगभूत सद्गुण होते. त्यांनी आजन्म शास्त्र मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले. अपरंपार करुणा, ऋजुता, विनम्रता, प्रेमळपणा, प्रसिध्दिपराङ्मुखता, कमालीचे अमानित्व, कोणत्याही प्रसंगी न ढळणारी अद्भुत शांती, नैष्ठिक ब्रह्मचर्य, निस्पृहता, श्रीगुरुचरणीं अात्यंतिक निष्ठा, विलक्षण योगसामर्थ्य, महायोग-शक्तिपात शास्त्रातील अलौकिक अधिकार इत्यादी शेकडो दैवी सद्गुणांचे ते साक्षात् भांडारच होते ! श्रीमहाराजांनी कधी प्रवचने केली नाहीत की पुस्तके लिहिली नाहीत. पण त्यांनी जगभरातील हजारो साधकांना आपल्या विलक्षण कृपेने परमार्थ मार्गावर अग्रेसर केले.
श्री गुळवणी महाराजांच्या चरित्रलीला वाचताना, त्यात जाणवणारे त्यांचे सर्वच दैवी सद्गुण आपल्याला आश्चर्यचकित करतात. पण त्यांची करुणा व ऋजुता हे विशेषत्वाने जाणवतात. श्री महाराज म्हणजे अमानित्वाचे व अदंभित्वाचे मूर्तिमंत स्वरूप होते. साक्षात् श्रीदत्तप्रभूच असूनही त्यांनी कधीही चुकूनसुद्धा कोणाला त्याची कल्पना येऊ दिली नाही. कायम आपले माहात्म्य झाकूनच ठेवले. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज त्यांना प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू म्हणूनच वंदन करीत असत.
श्री महाराज भक्तवत्सल होते. आपल्या भक्तांचा अपार कळवळा होता त्यांना. २६ डिसेंबर १९६९ ते २६ एप्रिल १९७० या चार महिन्यांच्या काळात त्यांनी एक पुरश्चरण केले होते. त्याकाळात ते कोणालाही भेटणार नाहीत, अशी सूचना लावलेली होती आश्रमात. त्यांच्या एका भक्तांनी त्यांना प्रेमळपणे विनवले की, " या काळात तुम्हांला कोणीच भेटणार नाही का?" त्यावर महाराज म्हणाले, " दोन जण भेटतील, जेवणाचे ताट सरकवायला येतील तेव्हा." त्यावर ते भक्त म्हणाले, " मग आम्हीच काय पाप केले आहे? तुम्हांला बघायला काय हरकत आहे? तुम्ही ठरावीक वेळी तुमच्या सवडीने खाली येऊन देवघरात बसत जा. ग्रीलच्या बाहेरून आम्ही दर्शन घेऊन जात जाऊ." श्री महाराजांनी त्यांचे म्हणणे लगेच मान्य केले. त्याकाळात ते रोज सकाळी साडेनऊ ते दहा या वेळात खाली येऊन बसत व भक्त त्यांचे दर्शन घेऊन जात. " ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभावीण प्रीती ॥" हे श्री गुळवणी महाराजांचे यथार्थ स्वरूपवर्णनच आहे.
आजच्या या पावन दिनी योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत प्रणाम !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481*
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन

आज मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, पावसच्या स्वामी स्वरूपानंद महाराजांची जयंती !!
श्री.रामचंद्र विष्णू गोडबोले तथा स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, दि. १५ डिसेंबर १९०३ रोजी पावस येथे झाला. स्वामी स्वरूपानंद हे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील सत्पुरुष, पुणे येथील श्री गणेशनाथ तथा बाबामहाराज वैद्य यांचे अनुगृहीत होते. त्यांच्यावर राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचीही कृपा होती. त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी या भगवान श्रीमाउलींच्या ग्रंथांचा सुलभ अभंगानुवाद केलेला असून, त्यांचे ते सर्व ग्रंथ खूप लोकप्रिय देखील आहेत. त्यांच्या अत्यंत मार्मिक व सुरेख अशा अभंगरचना 'संजीवनी गाथा' नावाने प्रसिद्ध झालेल्या आहेत. तरुणपणी पुण्यात विद्याभ्यास करीत असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हिरीरीने भाग घेतलेला होता. परंतु भगवंतांच्याच प्रेरणेने पुढे ते सर्व सोडून रत्नागिरी जवळ पावस येथे येऊन राहिले. येथेच त्यांचे सलग चाळीस वर्षे वास्तव्य होते. पावस सोडून ते कधीच बाहेर गेले नाहीत. आता तेथेच त्यांचे भव्य समाधी मंदिर बांधलेले आहे.
प. पू. गोविंदकाका उपळेकर महाराजांचा त्यांच्याशी अपार स्नेह होता. प. पू. गोविंदकाकांनी त्यांच्या 'हरिपाठ सांगाती' ग्रंथात स्वामींनी संकलित केलेल्या 'ज्ञानेश्वरी नित्यपाठ' या रचनेचा अंतर्भाव केलेला आहे. स्वामींच्या "उदारा जगदाधारा ... " या वरप्रार्थनेला स्वत: प.पू.काकांनी फार सुंदर चाल लावून काही भक्तांना शिकवली होती. पावसला म्हणतात त्यापेक्षा ही चाल वेगळी व अधिक भावपूर्ण आहे. स्वामी स्वरूपानंदांचे शिष्योत्तम स्वामी सत्यदेवानंद सरस्वती व स्वामी अमलानंद नेहमी फलटणला प. पू. श्री.काकांच्या दर्शनाला येत असत. प. पू. काका व स्वामी स्वरूपानंद हे दोघेही एकरूपच आहेत, असा दृष्टांत स्वामींच्या एका दिवेकर नावाच्या शिष्यांना झाला होता. ते दिवेकर पतीपत्नी फलटणलाही नेहमी दर्शनाला येत असत. प. पू. काका व स्वामी स्वरूपानंद आपल्या भक्तांना परस्परांच्या दर्शनाला मुद्दाम पाठवत असत. अशा अनेक भक्तांच्या विलक्षण हकिकती पू.काकांच्या आठवणींच्या संग्रहामध्ये नोंदवलेल्या आहेत. या दोघांचेही आराध्य एकच, भगवान श्री ज्ञानेश्वर माउली;  त्यामुळेही परस्परांची मैत्री अगदी दाट होती.
स्वामी स्वरूपानंदांच्या रचना खूप सुंदर आहेत. त्यांच्या सर्व अभंगांमधून त्यांचे उत्कट सद्गुरुप्रेम प्रकर्षाने जाणवते. " स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन ।सद्गुरुचरण उपासितां ॥" असा आपला रोकडा स्वानुभव ते मांडतात. आपल्या नाथ सांप्रदायिक साधनेचे माहात्म्य सांगताना ते म्हणतात, "स्वामी म्हणे माझा नाथसंप्रदाय । अवघे हरिमय योगबळे ॥" त्यांची 'संजीवनी गाथा' साधकांसाठी खरेखरी 'संजीवनी'च आहे !
श्रीस्वामींनी श्रावण कृष्ण द्वादशीला, दिनांक १५ ऑगस्ट १९७४ रोजी पावस येथे देह ठेवला. त्या घटनेची माहिती प. पू. काकांनी फलटणला बसून सांगितली होती. दर्शनाला आलेल्या ती.अंबुताई फणसे यांनी पू.काकांना एक शाल घातली. त्याबरोबर पू.काका उद्गारले, " अगं, आत्ताच एका काळ्या पुरुषाने आम्हांला अशीच शाल पांघरली. " पू.काकांच्या गूढ बोलण्यातले संदर्भ कधीच पटकन् कळत नसत. ती.अंबुताईंना संध्याकाळी पुण्याला परत आल्यावर कळले की, जेव्हा हा प्रसंग फलटणला घडला, त्याच्या थोडा वेळ आधीच पावसला स्वामींनी देह ठेवला होता. पू.काका व स्वामी स्वरूपानंद या दोन्ही संतांची अंतरंगातील एकरूपताच या प्रसंगाने दृग्गोचर होते.
स्वामी स्वरूपानंदांचे व योगिराज सद्गुरु श्री गुळवणी महाराज व प.पू.मामासाहेब देशपांडे महाराजांचेही स्नेहबंध होते. पू.मामांची व त्यांची नेहमी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर चर्चा चालत असे. कारण दोघेही रंगलेले ज्ञानेश्वरीप्रेमी व उत्तम सखोल अभ्यासकही होतेच. त्यांच्या ओव्यांवरील परस्पर चर्चा किती विलक्षण होत असतील, याची कल्पना करता येत नाही.
आज स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या ११३ व्या जयंतीदिनी, त्यांच्या अम्लान श्रीचरणीं सादर दंडवत  !!
( फोटो  :  स्वामी स्वरूपानंद समाधी, पावस)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

23 Dec 2016

हाचि सुबोध गुरूंचा

आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी, साक्षात् श्रीमारुतीरायांचे अवतार, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची१०३ वी पुण्यतिथी  !!
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला ।
जयाने सदा वास नामात केला ।
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ।।
असे ज्यांचे सार्थ वर्णन केले जाते, त्या प्रत्यक्ष नामावतार श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अवघे चरित्र अलौकिक आणि बोधप्रद आहे.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपापरंपरेतील येहेळगांवच्या सद्गुरु श्री तुकामाई यांनी श्री गोंदवलेकर महाराजांना कृपानुग्रह करून सनाथ केले. श्रीमहाराजांच्या ठायी श्री माउलींचा नाथसंप्रदाय व श्री समर्थांचा रामदासी संप्रदाय यांचा सुरेख समन्वय झालेला होता.
पूर्वी महाराजांनी बालवयातच गुरुशोधार्थ संपूर्ण भारत देश पालथा घातला होता. त्या भ्रमंतीमध्ये त्यांना राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे दर्शन व सान्निध्य लाभले. श्री स्वामींनी देखील या लहानग्या गणूला अतीव ममतेने स्वत:च्या मांडीवर बसवून त्याचे लाड केले. दोन दिवस स्वत:बरोबर ठेवून घेतले व नंतर आशीर्वाद देऊन रवानगी केली. त्यानंतर महाराजांना त्याकाळातील, श्री रामकृष्ण परमहंस, श्री त्रैलंगस्वामी, श्री माणिकप्रभू, श्री देव मामलेदार इत्यादी अनेक थोर संतांची दर्शने झाली. नंतर श्रीतुकामाईंची भेट होऊन, अत्यंत खडतर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पूर्णकृपा लाभली. लहानग्या गणुबुवांचे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज झाले.
महाराजांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथेच असे. पण रामनामाच्या प्रसारासाठी त्यांचा संचार सर्व भारतभर होई. त्यांनी आपल्या हयातीत हजारो लोकांना नाम देऊन सन्मार्गाला लावले. समाधी पश्चात् आजही त्यांच्या कृपेचे अनुभव अक्षरश: लाखो लोक घेत आहेत.
त्यांचे चरित्र परमार्थ साधकांसाठी विशेष बोधप्रद आहे. " भक्ताची रामरायाच्या चरणीं अनन्य निष्ठा कशी असायला हवी?" त्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे श्री महाराज. 'रामच कर्ता' या भावनेच्या बळावर अचाट कार्य करून दाखवण्यातली अलौकिक निस्पृहता म्हणजे श्री महाराज. गुरुचरणीं अनन्य शरणागती म्हणजे श्री महाराज. नि:शंक निर्भय निरहंकार साधुजीवन म्हणजे श्री महाराज. त्यांच्या दिव्य चरित्रलीला वाचताना, प्रेमाचे भरते येऊन कधी नेत्र पाझरू लागतात हे आपल्याला समजतच नाही. खरोखरीच फार विलक्षण विभूतिमत्व होते ते  !!
प.पू.श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांचे परमगुरु, पलूसचे श्री धोंडीबुवा महाराज यांचा व श्री गोंदवलेकर महाराजांचा स्नेह होता. प.पू.काकांनाही श्री महाराजांविषयी अतीव प्रेमादर होता. प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या घरी श्री महाराज येत असत. पू.मामांचे आई-वडील, पू.दत्तोपंत व पू.पार्वतीदेवी यांना श्री महाराजांबद्दल अतीव प्रेमादर होता. महाराजही त्यांना फार मानत असत. पू.दत्तोपंत व श्री महाराज समोर आल्यावर परस्परांना दंडवत घालून दृढ प्रेमालिंगन देत आणि मगच त्याची चर्चा सुरू होई. श्री महाराज एकदा त्यांना म्हणाले होते, " कृपायोगाचे साधनच सर्वश्रेष्ठ आहे. ज्यांना ते देणारे सामर्थ्यवान सद्गुरु लाभले ते धन्य होत. मलाही श्री तुकामाईंकडून हेच साधन मिळाले. पण हे सर्वांनाच देता येत नाही, म्हणून मी त्यांच्याच आदेशानुसार सर्वांना नाम घ्यायला सांगतो ! "
श्रीमहाराजांची प्रवचनेही अत्यंत सोपी व काळजाला हात घालणारी आहेत. रामनामाची व हरिभक्तीची महती त्यांनी फारच सोप्या आणि चटकन् हृदयाला भिडेल अशा समर्पक भाषेत, अधिकारवाणीने सांगितलेली आहे. त्या प्रवचनांचे दररोज नियमितपणे वाचन करून आपला परमार्थ सुकर करणारे लक्षावधी भक्त जगभर आहेत.
आज त्यांच्या १०३ व्या पुण्यदिनी त्यांच्या चरणीं सादर वंदन करूया; व त्यांनी सर्वात शेवटी केलेला बोध, त्यांचा शेवटचा अभंग वाचून, त्यावर चिंतन-मनन करून, त्यांच्या कृपासावलीत आपणही आपला परमार्थमार्ग आनंदाने आक्रमूया !
भजनाचा शेवट आला ।
एक वेळ राम बोला ॥१॥
आज पुण्य पर्वकाळ ।
पुन्हा नाही ऐसी वेळ ॥२॥
राम नाम वाचे बोला ।
आत्मसुखा माजी डोला ॥३॥
दीन दास सांगे निका ।
रामनाम स्वामी शिक्का ॥४॥
" श्रीसद्गुरु मुखातून आलेले व परंपरेने लाभलेले 'दिव्यनाम' हेच जणू 'स्वामी शिक्का' आहे. हा शिक्का ज्याच्या चित्तावर श्रीगुरु उमटवतील, त्याचाच परमार्थात सहज प्रवेश होतो. ही नामरूपी निकी म्हणजेच श्रेष्ठ, शुद्ध कृपा-मोहोर लाभल्यावर मगच साधक ख-या अर्थाने पुनीत होतो. त्या कृपाप्रसादामुळे व आपल्या श्रीगुरूंचा 'दीनदास' बनून  झालेल्या त्या दास्ययुक्त साधनेने मग त्याला आत्मसुखात अखंड डोलण्याचे सौभाग्य लाभते ! त्याचे अवघे जीवनच एक अद्भुत पुण्य पर्वकाळ बनून जाते. त्याच्या पावन संगतीने मग जगाचाही उद्धार होतो. " श्री महाराजांच्या या अंतिम बोधामृतातून जणू त्यांचे आत्मचरित्रच प्रकट झालेले आहे !
या लेखासोबत आज श्री महाराजांच्या प्रतिमेऐवजी त्यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश देत आहे. आपली साधना लवकर पूर्णत्वाला जावी, असे ज्याला मनापासून वाटते, त्या प्रत्येक साधकाने श्री महाराजांचा हा बोध मनाच्या गाभा-या सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा व वारंवार आठवावा इतका महत्त्वपूर्ण आहे. साधकाचे अवघे विश्वच अमृतमय करणारे हे बोधवचन, श्री महाराजांचे हृद्गतच आहे जणू !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

10 Dec 2016

गीता जाणा वाङ्मयी श्रीमूर्ति प्रभूची

मोक्षदा एकादशी !!
आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, आजच्याच पावन तिथीला भगवान श्रीकृष्णांनी भक्तराज अर्जुनाच्या मनात आपणच निर्माण केलेला मोह नष्ट करण्यासाठी श्रीगीतेचा थोडक्यात उपदेश केला. तोच उपदेश पुढे श्री व्यास महर्षींनी महाभारतात सातशे श्लोकांमध्ये ग्रथित करून आपल्याला उपलब्ध करून दिला. पुढे जेव्हा तोही लोकांना समजेनासा झाला, तेव्हा मग भगवान श्रीकृष्णप्रभूंनीच सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या रूपाने अवतरून श्रीगीतेवर ज्ञानेश्वरी हे अद्भुत भाष्य रचले.
श्रीगीता हे साक्षात् भगवान श्रीहरींच्याच मुखातून निर्माण झालेले अजरामर अमृत आहे. वेदही श्रीभगवंतांचीच वाणी आहे, पण ती योगनिद्रेतली वाणी आहे. म्हणूनच वेदांना निश्वसित म्हणतात. ते श्रीभगवंतांचे घोरणे आहे. पण श्रीगीता तशी नाही. शिष्याच्या अपार कळवळ्याने श्रीभगवंतांनी उदार होऊन स्वमुखाने जागेपणी केलेला हा श्रेष्ठ उपदेश आहे ! म्हणूनच श्री माउली गीतेला वेदांहूनही श्रेष्ठ म्हणतात.
श्रीगीतेचे दुसरे प्रधान वैशिष्ट्य म्हणजे, वेदांप्रमाणे ही अनाकलनीय नाही. वेद समजणे महाअवघड. शिवाय त्याचा सर्वांना अधिकारही नाही. पण श्रीगीतेला तसे काहीच नियम नाहीत. येथे यच्चयावत् सर्वांना समान अधिकार आहे.
श्री माउली एका अप्रतिम ओवीत, श्रीमद् भगवद् गीतेचे हे श्रेष्ठत्व सांगताना म्हणतात,
गीता माउलिये कीं नसे ।
जाणें तान्हें ॥ ज्ञाने.१८.७०.१५२८॥

श्रीभगवंतांच्या वाङ्मयी श्रीमूर्तीला, भगवद् गीतेला श्री ज्ञानेश्वर महाराज 'माउली' म्हणतात आणि तिचे वैशिष्ट्य सांगतात की, तिला कसलाही आपपरभाव नाही. जाणते लेकरू व नेणते लेकरू असा भेद न करता ती सर्वांवरच समान कृपा करते. म्हणून वेदांचेही बीज असणा-या, मोहरूपी महिषाला मारणा-या, सातशे श्लोकांद्वारे प्रकटलेल्या, मंत्रप्रतिपाद्य भगवती श्रीगीतेचीच मनाने, शरीराने व वाणीने निरंतर सेवा व सेवन करून स्वानंदसाम्राज्याचे धनी व्हावे, असा श्री माउली आपल्या सर्वांना प्रेमाचा उपदेश करीत आहेत. श्रीसद्गुरुकृपेने या श्रीगीतामाउलीचे प्रेम आपल्या हृदयात निर्माण होणे, हीच आपल्यासाठी खरी 'गीताजयंती' आहे; आणि ती लवकरात लवकर साजरी व्हावी म्हणून आपण श्रीचरणीं कळवळून प्रार्थना करूया !
आज श्रीगीता जयंतीच्या पावन पर्वावर, जशी जमेल तशी व जेवढी जमेल तेवढी गीतासेवा नियमाने करण्याचा संकल्प करून, श्रीभगवंतांच्या या गीतारूप शब्दब्रह्मास सादर साष्टांग दंडवत घालून कृपायाचना करूया व त्याच गीताश्लोकांच्या गजरात श्रीचरणीं ही शब्दसुमनांजली समर्पूया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

7 Dec 2016

प्रसन्न कृपाछाया,'श्रीस्वामीतनया'

श्रीसद्गुरु परंपरा ही साक्षात् शक्तिरूपच असते. श्रीभगवंतांची आदिशक्ती भगवती देवात्मशक्तीच परंपरेच्या माध्यमातून श्रीगुरूंचा सगुण आविर्भाव धारण करून प्रकट होत असते व योग्य वेळ आलेल्या जीवांवर कृपा करून त्यांना साधनेत अग्रेसर करीत असते. म्हणूनच श्रीभगवंतांपासून सुरू झालेल्या श्रीगुरुपरंपरेतील सर्व महात्मे हे सच्चिदानंद स्वरूपच असतात. भगवान श्री माउली अशा महात्म्यांविषयी सांगतात,
तयाचे बिसाट शब्द ।
सुखें म्हणो येती वेद ।
सदेह सच्चिदानंद ।
कां नोहावे ते ॥
ज्ञाने.१८.७८.१६४६॥
अशा भगवत्स्वरूप झालेल्या महात्म्यांच्या मुखातून आलेले सहज शब्दही वेदतुल्य असतात. त्यांचा देह आपल्याला पांचभौतिक दिसत असला तरी, प्रत्यक्षात ते त्या देहानेही सच्चिदानंद स्वरूपच झालेले असतात. म्हणूनच या महात्म्यांनी केलेली ग्रंथरचना किंवा उपदेशिलेला बोध आणि त्यांचे अद्भुत चरित्रग्रंथ देखील त्यांच्याच प्रमाणे दिव्य असतात व ते श्रद्धावंत अभ्यासकाला व उपासकाला परब्रह्मस्वरूप करणारेही असतात !
आता या प्रस्तावनेचे कारण सांगतो. नाथ-दत्त-भागवत संप्रदायांचे अध्वर्यू, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातुःश्री व सद्गुरु,  स्वनामधन्य प.पू.पार्वतीदेवी देशपांडे या साक्षात् श्रीस्वामीतनयाच होत्या. आज त्यांचा अमृतमहोत्सवी पुण्यतिथी उत्सव आहे. राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या कृपा परंपरेतील अलौकिक अधिकारसंपन्न विभूतिमत्व म्हणजे पूजनीय पार्वतीदेवी ! त्यांचे चरित्र हा साधक सद्भक्तांना निरंतर मार्गदर्शन करणारा अजरामर, रत्नखचित बोध-ठेवाच आहे. श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या या लाडक्या तनयेचे दिव्यपावन चरित्र, प.पू.श्री.मामासाहेबांच्या तितक्याच अधिकारसंपन्न कन्येने; प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी लिहिलेले असावे, हा निव्वळ योगायोग मुळीच नाही ! श्रीवामनराज प्रकाशनाचे बावीसावे ग्रंथपुष्प असणाऱ्या *'श्रीस्वामीतनया'* या रसाळ चरित्राची आज सहावी आवृत्ती संपत आलेली आहे; यातच त्याच्या उपयोगितेचे व अपूर्वतेचे मर्म स्पष्ट होते.
या चरित्राच्या ठिकाणी त्रिवेणीसंगम झालेला आहे. श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या मांडीवर खेळलेल्या, त्यांचे अलौकिक कृपाछत्र लाभलेल्या श्रीस्वामीतनया पू.पार्वतीदेवींचे चरित्र, त्याच परंपरेतल्या, श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्याच परमकृपांकित पू.सौ.शकाताईंनी लिहावे आणि त्यातून पुन्हा श्रीस्वामीकृपेचीच त्रिभुवनपावनी गंगा खळाळून वाहावी; हा किती मनोहर योग आहे ना ! या दिव्य ग्रंथाच्या 'सच्चिदानंदमयते'चे अजून काय प्रमाण द्यावे?
या पुण्यप्रद चरित्रग्रंथाची माझी एक विशेष अनुभूती मुद्दामच येथे देत आहे. आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला, दिनांक ७ डिसेंबर रोजी, प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवींची पंच्चाहत्तरावी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या या चरित्रगायनाने मी श्रीस्वामीतनयेच्या श्रीचरणीं मनोभावे भावपुष्पांजली अर्पितो.
२००९ साली भाद्रपद महिन्यात श्रीक्षेत्र दत्तधामहून मी फलटणला चाललेलो होतो. बसच्या प्रवासात माझी एका कुलकर्णी नावाच्या सरकारी अधिकारी गृहस्थांशी ओळख झाली. ते कोयनानगरला काही कामानिमित्त आले होते. बोलता बोलता मी त्यांना श्रीक्षेत्र दत्तधाम ची माहिती सांगितली. ते स्वतः कोणा सत्पुरुषांचे अनुगृहीत असून साधना करणारे होते. म्हणून त्यांना आमच्या  स्थानाविषयी आपुलकी वाटली व त्यांनी दर्शनाला येण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे ते पुढच्याच आठवड्यात दर्शनाला आले देखील. त्यावेळी मी त्यांना 'श्रीस्वामीतनया' या ग्रंथाची एक प्रत भेट म्हणून दिली.
सुमारे महिन्याभरानंतर ते पुन्हा दर्शनाला आले. मी त्यावेळी सहजच 'श्रीस्वामीतनया' वाचलेत का ? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून मला खूप आश्चर्य आणि समाधानही वाटले. ते म्हणाले, "अहो काय सुंदर पुस्तक आहे ! ते वाचल्यापासून माझी, ' साधनेला वेळ मिळत नाही ' ही अडचणच पार गेली. आता माझी साधना नियमाने होते व त्यातून खूप आनंदही मिळतो !" संतांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये त्यांची कृपाशक्ती ओतप्रोत भरून राहिलेली असते; याचे सुरेख प्रत्यंतर वरील उत्तरातून जाणवते.
प.पू.मातु:श्री पार्वतीदेवींचे अवघे चरित्र हा स्वतंत्र स्वामी-लीलाविलासच आहे. त्यातून साधक म्हणून आपल्याला मिळणारी विशेष ऊर्जा कल्पनातीत आहे. संतांचे वर्तन हे आपल्याला असंख्य बाबींमध्ये अचूक मार्गदर्शन करणारे असते. म्हणूनच आपण नेहमी संतांची चरित्रे डोळसपणे अभ्यासली पाहिजेत. आणि या दृष्टीने, पू. पार्वतीदेवींचे चरित्र तर, कोणत्याही परिस्थितीतला भक्कम आधार म्हणून आयुष्यभर अगदी जवळ बाळगावे, इतके जबरदस्त आहे.
पू.पार्वतीदेवींचा जन्म अक्कलकोटातलाच, १८७५ सालचा. त्यावेळी साक्षात् परब्रह्मच राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने तेथे अलौकिक लीला करीत होते. पू. पार्वतीदेवींचे पिताश्री, पू. नारायणभट्ट सोनटक्के हे अक्कलकोट संस्थानात वाकनिस होते. ते श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त व पूर्ण कृपांकित महात्मेच होते. त्यांच्या पोटी पू. बाई तथा पू.पार्वतीदेवींचा जन्म झाला व त्यांना परमभाग्याने लीलावतार श्री स्वामी महाराजांच्या मांडीवर खेळण्याचे सौभाग्य लाभले. श्री स्वामी महाराजांनीच लहानग्या बाईला मांडीवर घेऊन, तिच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवून, स्वमुखाने सांगितले होते, " ही आमची पोर आहे ! " श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या या शब्दाची जिवंत प्रचिती 'श्रीस्वामीतनया' वाचताना आपल्याला वारंवार येते. खरोखरीच, पू.पार्वतीदेवी या परिपूर्ण श्रीस्वामीतनयाच होत्या !
श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेने अवघ्या सातव्या वर्षी पू.बाईंवर पू. नारायणभट्टांनी परंपरेच्या बीजमंत्रासहित शक्तिपातपूर्वक कृपानुग्रह केला. दीक्षा झाल्याक्षणीच पू.बाई प्रगाढ समाधीत गेल्या. त्यांचा जन्मजात अधिकारच तेवढा अद्भुत होता.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह नसरापुरच्या देशपांडे घराण्यातील पू.दत्तोपंतांशी झाला. पू.दत्तोपंत प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांचे पूर्णकृपांकित शिष्य होते. हा लक्ष्मी-नारायणाचा जोडा परमार्थाच्या दृष्टीनेही संपन्न होता. त्यांच्यासारखा अलौकिक संसार क्वचितच पाहायला मिळेल. त्याही दृष्टीने हे चरित्र अभ्यास करण्याजोगे आहे. पतीनिधनानंतर आलेल्या प्रारब्धाच्या गंभीर परीक्षेतही त्या पुरेपूर उतरल्या. एके दिवशी श्री स्वामी महाराज त्यांच्यासमोर प्रकटले व म्हणाले, " बये, तुला दुर्दैवाचे दशावतार माहीत आहेत का?" त्यावर त्या स्मितहास्य करून म्हणाल्या, " महाराज, आपले छत्र असताना दुर्दैव कसे बरे पाहायला मिळेल?" त्यावर पुन्हा श्री स्वामी महाराज म्हणाले, " तुला आता दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागणार आहेत, तयारीत राहा. " त्यावर आदराने त्यांनी विचारले, " त्या काळात आपण आणि माझे भगवंत माझ्यासोबत असणार ना?" श्री स्वामी महाराज प्रसन्नपणे उत्तरले, " बये, बाप कधी लेकीला सोडून जातो का? आम्ही कायमच तुझ्यासोबत आहोत, काळजी करू नकोस! " त्याक्षणी मोठ्या खंबीरपणे पू.पार्वतीदेवी उत्तरल्या, " महाराज, मग मी दुर्दैवाचे दशावतारच काय, शतावतारही आनंदाने सहन करीन! " आपल्या लेकीचा हा दृढविश्वास पाहून श्री स्वामी महाराजांना काय आनंद झाला असेल, याची कल्पनाही करवत नाही.
प.पू.मामांचे पिताश्री प.पू.श्री.दत्तोपंत देशपांडे १९२८ साली ६ मे रोजी श्रीदत्तचरणीं लीन झाले. त्यावेळेपासूनच दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. १८०० एकर जमिनीची मालकी असणा-या पू.दत्तोपंतांची इस्टेट त्यांच्या दत्तक गेलेल्या सख्या भावाने हडपली व पू.पार्वतीदेवींना नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढले. एरवी पायलीने मोती व दाग-दागिने मोजणा-या पू.पार्वतीबाई जेवढ्या निस्पृहपणे संपन्नता उपभोगत होत्या, तेवढ्याच शांतपणे त्यांनी दारिद्र्यही उपभोगले. चित्ताची केवढी समता हवी हे सहन करायला! श्रीस्वामीतनयेचे जीवन असे बावनकशी लखलखीत सोनेच आहे. पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्ये स्वामीमहाराजांनी पुन्हा अवतार धारण करण्यासाठी म्हणून पू.पार्वतीदेवींचीच पावन कूस निवडली, यात नवल ते काय?
पू.दत्तोपंतांच्या देहत्यागापासूनच प.पू.मातुःश्री पार्वतीदेवींनी झोपेचा पूर्ण त्याग केला होता. आयुष्यातली शेवटची बारा वर्षे त्या चुकूनही जमिनीला पाठ लावून झोपल्या नाहीत. रात्रभर त्या साधनेत असत किंवा दोन साधनांमधील वेळात फेऱ्या मारत माळ घेऊन जप करीत. पण त्यांनी जमिनीला पाठ म्हणून टेकवली नाही. त्यांचा परमार्थ केव्हाच पूर्णत्वाला गेलेला होता, तरीही त्यांनी आपली साधना कधीच सोडली नाही. साधना हेच त्यांचे कर्तव्य होते आणि तेच त्यांचे औषधही !
त्यांच्या चरित्रातील याच गुणवैशिष्ट्याचा उल्लेख करून त्या कुलकर्णींनी मला वरील उत्तर दिले होते. ते म्हणाले की, मातु:श्रींना इतक्या भयानक परिस्थितीतही एवढा वेळ साधनेला देता येत होता, मग मी कोणत्या तोंडाने म्हणू की मला साधनेला वेळच मिळत नाही? माझी तर परिस्थिती देवदयेने किती चांगली आहे. हे पुस्तक वाचल्यापासून माझी मलाच इतकी लाज वाटायला लागली की बस. आणि आपोआपच माझ्याकडून साधना न चुकवण्याचा निर्धार झाला व सद्गुरुकृपेने साधना निर्विघ्नपणे दररोज घडूही लागली. शिवाय साधनेचे प्रेमही एवढे वाढले की, आता ती साधनाच हळूहळू माझी प्राथमिकता होत आहे ! सतत श्रीगुरूंनी दिलेल्या साधनेत रममाण असणाऱ्या, साधनाच ज्यांचा ध्यास आहे, सर्वस्व आहे अशा पू.मातुःश्री पार्वतीदेवींच्या पावन चरित्राने कुलकर्णींवर केलेली ही अमोघ कृपाच नाही का? ब्रह्मस्वरूप झालेल्या संतांची चरित्रे देखील 'अक्षरब्रह्म' बनून साधकांना साधनेतही अग्रेसर करतात; त्या महात्म्यांप्रमाणेच 'आपणासारिखे करिती तात्काळ ।' असे दैवी सामर्थ्य बाळगून असतात, हेच त्रिवार सत्य आहे !
पू.पार्वतीदेवी या निष्णात ज्योतिषी व वैद्यही होत्या. त्यांनी आपल्या या दोन्ही दैवी विद्यांचा लोकांच्या भल्यासाठी भरपूर वापर केला. ज्योतिषाचा किंवा औषधांचा त्यांनी कधीच कसल्याही प्रकारचे मोबदला घेतला नाही. त्यांनी आपल्या परंपरेने आलेल्या दोन्ही विद्या देऊन पू.मामांनाही त्या शास्त्रांमध्ये निष्णात केले होते.
पू.पार्वतीदेवींच्या काळातील थोर थोर सत्पुरुष त्यांचा अधिकार जाणून त्यांच्याशी अतीव प्रेमादराने वागत असत. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज, श्रीसंत गोंदवलेकर महाराज, श्रीसंत नारायण महाराज केडगांवकर, श्री शंकर महाराज यांसारख्या अनेक विभूतींचा व पू.पार्वतीदेवींचा दृढ स्नेहबंध होता. श्री शंकर महाराज तर आवर्जून पू.पार्वतीदेवींकडे येत, त्यांच्या हातचे अन्न खात व मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांच्याशी वागत.
प.पू.सौ.शकाताईंनी अतीव रसाळ भाषेत वर्णिलेली पू. मातुःश्री पार्वतीदेवींची ही चरित्रागाथा मनोहर आहे. त्या चरित्राला इतका सुंदर ओघ आहे की हातात घेतल्यावर पूर्ण वाचून झाल्याशिवाय कोणी खाली ठेवणारच नाही ! त्यातील शब्द न् शब्द आपल्या काळजाला हात घालतात. मातुःश्रींची उत्कट गुरुभक्ती, जगावेगळे गुरुप्रेम, कष्टी जनांविषयीचा अपरंपार कळवळा, साधनेची प्रगाढ निष्ठा, त्यांच्यातील कणखर आणि खंबीर पारमार्थिक महात्मा व तळमळीचा शिक्षक, त्यांचे स्वयंसिद्ध गुरुत्व आणि सर्वात महत्त्वाची अशी त्यांची परमशांती; असे त्यांचे असंख्य सद्गुण आपल्याला वेडावून टाकतात. भारावून जाणे म्हणजे काय? हे ज्याला सप्रेम अनुभवायचे असेल, त्याने हे चरित्र एकदातरी आवर्जून वाचावेच !
प.पू.मातुःश्री पार्वतीदेवी व प.पू.श्री.मामा या मायलेकांचे गूळपीठ तर अद्भुत आहे. त्यांच्यातला तो प्रेमबंध वाचताना, वाचत वाचत अनुभवताना, आपलेही हृदय प्रेमपडिभराने सुस्नात होते. काय सुरेख पद्धतीने त्यांनी प.पू.श्री. मामांना घडवलेले आहे; लाजवाब ! बालसंगोपनाच्या, शिष्यघडणीच्या विद्यापीठाचे अनभिषिक्त कुलगुरुपद भूषवावे ते मातुःश्री पार्वतीदेवींनीच ! पालकांना, शिक्षकांना चिरंतन मार्गदर्शन करण्याचे विलक्षण सामर्थ्य या ग्रंथात लीलया सामावलेले आहे !
मातुःश्री पार्वतीदेवींच्या चरित्राचे आणखी एक अद्वितीय वैशिष्ट्य सांगतो. मातुःश्री पार्वतीदेवी या प.पू.मामांच्या नुसत्या जन्मदात्रीच नव्हत्या, तर त्या त्यांच्या मोक्षगुरूही होत्या. आई ही पहिली गुरु असतेच. पण येथे ही पहिली गुरूच मोक्षगुरूही आहे. शिवाय त्यांनी अगदी शेवटपर्यंत आपले गुरुत्व सांभाळलेले आहे. श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या आज्ञेने त्यांनी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला, २६ नोव्हेंबर १९४१ रोजी पहाटे, पू.श्री.मामांवर शक्तिपातपूर्वक कृपानुग्रह केला. त्याच दिवशी; मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी (तारखेने २७ नोव्हेंबर) त्यांनी आपले शिष्य पू. मामांना समोर बसवून, 'भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेले महात्म्यांचे प्रयाण कसे असते ते पाहा', असे सांगून शांतपणे देहत्याग केला. किती अद्भुत महाप्रयाण आहे हे ! असा प्रसंग जगाच्या आजवरच्या इतिहासात एकमेवाद्वितीयच आहे ! शेवटच्या श्वासापर्यंत शिष्याला सप्रमाण, सोदाहरण बोध देण्याची ही घटना आजवर दुसरी न ऐकली न पाहिली व पुढेही कधी घडेल असे वाटत नाही.
आपल्या आचरणाने व अपूर्व आत्मप्रचितीने साक्षात् परिपूर्णब्रह्म राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांची कूस धन्य ठरविणाऱ्या, महासिध्दांनाही मार्गदर्शक ठरलेल्या सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी देशपांडे तथा श्रीस्वामीतनया यांच्या श्रीचरणीं अमृत महोत्सवी पुण्यतिथी निमित्त सादर वंदन. हे आई, आम्हांलाही आमची साधना 'सर्वस्व' वाटावी; अशी करुणाकृपा कराल ना आमच्यावर?
प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे यांचे समग्र जीवनचरित्र व कार्य, पू. सौ. शकाताईंनी रचलेल्या त्यांच्या आरतीत फार सुंदर शब्दांत आलेले आहे. आज त्यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यतिथी दिनी, ती आरती गाऊन आपण राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या लाडक्या कन्येच्या, श्रीस्वामीतनया पू.पार्वतीदेवींच्या श्रीचरणीं सादर दंडवत करून धन्य होऊया  !!
आरती स्वामीतनयेची ।
सद्गुरु माय पार्वतीची ॥ध्रु.॥
स्वामी अंकी बैसविती।
'अमुची पोर' असे वदती ।
त्या तुज अन्य काय उपमा ।
आम्हां न कळे तव महिमा ॥१॥
धन्य तव आत्मतेज धीर ।
धन्य तप शांती ज्ञान थोर ।
घेई नवनीत करकमळी ।
प्रेमे अंकित वनमाळी ॥२॥
प्रकटले दत्तकृपाबीज ।
वोळले श्रीपादा सहज ।
ऐसे दिधले गुरुचरण ।
अंतरी शकुंतला लीन ॥३॥
(  'श्रीस्वामीतनया' ग्रंथ मूल्य ₹ ४०/-, सवलतीत मिळण्यासाठी  02024356919 या क्रमांकावर संपर्क करावा.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )