26 Dec 2016

गुरुवरा ओवाळू आरती

आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे कनिष्ठ बंधू व शिष्योत्तम, साक्षात् ब्रह्मदेवांचे अवतार सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांची समाधी तिथी. श्रीसंत तुकोबारायांच्या चौदा टाळक-यांपैकी त्यांचे एक शिष्य श्री संताजी महाराज जगनाडे-तेली यांचीही आज पुण्यतिथी. श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्व महान शक्तिपाताचार्य योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांची आज जयंती. आजची तिथी मोठी पुण्यपावनच आहे !
सद्गुरु श्री सोपानदेव महाराज हे श्री माउलींचे धाकटे बंधू व शिष्य. त्यांचा जन्म इ.स. १२७७ मध्ये कार्तिक पौर्णिमेला आळंदीत झाला. त्यांनी देखील गीतेवर 'सोपानदेवी' या नावाची टीका रचलेली आहे. त्यांचे काही अभंगही उपलब्ध आहेत. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांचे स्वभाववैशिष्ट्य श्री नामदेवराय सांगतात, "न ये पां एकांत सोपानाचा ॥" सगळ्यांमध्ये राहूनही आंतरिक एकांत साधणे व त्या स्थितीत सदैव राहणे हे श्री सोपानदेवांचे वैशिष्ट्य होते.
आजच्याच तिथीला त्यांनी सासवड येथे क-हामाईच्या काठी सोमेश्वरांच्या मंदिरालगत समाधी घेतली. त्यांच्या समाधिवर्णनाच्या अभंगांमध्ये श्री नामदेवराय म्हणतात, " निशिदिनी कीर्तन केले द्वादशी । वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष ॥३॥ भोगावती केले अवघ्यांनी स्नान । चालिले सोपान समाधीसी ॥ना.गा.११३२.४॥" श्री सोपानदेवांच्या स्नानासाठी प्रत्यक्ष श्रीपांडुरंगांनी सर्व तीर्थांना आवाहन केले. त्यावेळी त्रैलोक्यातील यच्चयावत् सर्व तीर्थे क-हेच्या काठावरील एका कुंडात प्रकटली व त्या पावन जलाने सोपानदेवांना स्वत: भगवंतांनी स्नान घातले. ते कुंड आजही सासवड येथे मंदिरासमोरच पाहायला मिळते. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांच्या चरणीं साष्टांग दंडवत.
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या थोर शिष्यांपैकी एक, देहूनजीकच्या सुदुंब्रे येथील तेली समाजातील श्री संताजी महाराज जगनाडे यांचीही आज पुण्यतिथी असते. संताजी महाराजांनी स्वहस्ते लिहिलेला श्री तुकोबारायांचा गाथा आजही पाहायला मिळतो. श्री तुकाराम महाराजांच्या चौदा निष्ठावंत टाळकरी मंडळींमध्ये संताजी महाराजही होते. त्यांच्याही श्रीचरणीं सादर दंडवत.
श्रीदत्त संप्रदायातील महान विभूतिमत्व, प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच अपरस्वरूप योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांची आज १३० वी जयंती. आजच्याच तिथीला, २३ डिसेंबर १८८६ रोजी, कोल्हापूर संस्थानातील राधानगरी तालुक्यातील कुडुत्री या छोट्याशा खेड्यात रात्री ८.१९ मिनिटांनी वे. शा. सं. दत्तंभट व सौ. उमाबाई या सात्त्विक दांपत्याच्या पोटी श्रीमहाराजांचा जन्म झाला. गुळवणी घराणे हे श्रीनृसिंहवाडीच्या प.प.श्री.नारायणस्वामींचे कृपांकित होते व त्यांच्याच कृपेने हा वंश चालला होता.
श्रीमहाराजांची राहणी अतिशय साधी होती. स्वच्छता, टापटीप व वक्तशीरपणा हे त्यांचे अंगभूत सद्गुण होते. त्यांनी आजन्म शास्त्र मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले. अपरंपार करुणा, ऋजुता, विनम्रता, प्रेमळपणा, प्रसिध्दिपराङ्मुखता, कमालीचे अमानित्व, कोणत्याही प्रसंगी न ढळणारी अद्भुत शांती, नैष्ठिक ब्रह्मचर्य, निस्पृहता, श्रीगुरुचरणीं अात्यंतिक निष्ठा, विलक्षण योगसामर्थ्य, महायोग-शक्तिपात शास्त्रातील अलौकिक अधिकार इत्यादी शेकडो दैवी सद्गुणांचे ते साक्षात् भांडारच होते ! श्रीमहाराजांनी कधी प्रवचने केली नाहीत की पुस्तके लिहिली नाहीत. पण त्यांनी जगभरातील हजारो साधकांना आपल्या विलक्षण कृपेने परमार्थ मार्गावर अग्रेसर केले.
श्री गुळवणी महाराजांच्या चरित्रलीला वाचताना, त्यात जाणवणारे त्यांचे सर्वच दैवी सद्गुण आपल्याला आश्चर्यचकित करतात. पण त्यांची करुणा व ऋजुता हे विशेषत्वाने जाणवतात. श्री महाराज म्हणजे अमानित्वाचे व अदंभित्वाचे मूर्तिमंत स्वरूप होते. साक्षात् श्रीदत्तप्रभूच असूनही त्यांनी कधीही चुकूनसुद्धा कोणाला त्याची कल्पना येऊ दिली नाही. कायम आपले माहात्म्य झाकूनच ठेवले. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज त्यांना प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू म्हणूनच वंदन करीत असत.
श्री महाराज भक्तवत्सल होते. आपल्या भक्तांचा अपार कळवळा होता त्यांना. २६ डिसेंबर १९६९ ते २६ एप्रिल १९७० या चार महिन्यांच्या काळात त्यांनी एक पुरश्चरण केले होते. त्याकाळात ते कोणालाही भेटणार नाहीत, अशी सूचना लावलेली होती आश्रमात. त्यांच्या एका भक्तांनी त्यांना प्रेमळपणे विनवले की, " या काळात तुम्हांला कोणीच भेटणार नाही का?" त्यावर महाराज म्हणाले, " दोन जण भेटतील, जेवणाचे ताट सरकवायला येतील तेव्हा." त्यावर ते भक्त म्हणाले, " मग आम्हीच काय पाप केले आहे? तुम्हांला बघायला काय हरकत आहे? तुम्ही ठरावीक वेळी तुमच्या सवडीने खाली येऊन देवघरात बसत जा. ग्रीलच्या बाहेरून आम्ही दर्शन घेऊन जात जाऊ." श्री महाराजांनी त्यांचे म्हणणे लगेच मान्य केले. त्याकाळात ते रोज सकाळी साडेनऊ ते दहा या वेळात खाली येऊन बसत व भक्त त्यांचे दर्शन घेऊन जात. " ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभावीण प्रीती ॥" हे श्री गुळवणी महाराजांचे यथार्थ स्वरूपवर्णनच आहे.
आजच्या या पावन दिनी योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत प्रणाम !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481*
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

0 comments:

Post a Comment