7 Dec 2016

प्रसन्न कृपाछाया,'श्रीस्वामीतनया'

श्रीसद्गुरु परंपरा ही साक्षात् शक्तिरूपच असते. श्रीभगवंतांची आदिशक्ती भगवती देवात्मशक्तीच परंपरेच्या माध्यमातून श्रीगुरूंचा सगुण आविर्भाव धारण करून प्रकट होत असते व योग्य वेळ आलेल्या जीवांवर कृपा करून त्यांना साधनेत अग्रेसर करीत असते. म्हणूनच श्रीभगवंतांपासून सुरू झालेल्या श्रीगुरुपरंपरेतील सर्व महात्मे हे सच्चिदानंद स्वरूपच असतात. भगवान श्री माउली अशा महात्म्यांविषयी सांगतात,
तयाचे बिसाट शब्द ।
सुखें म्हणो येती वेद ।
सदेह सच्चिदानंद ।
कां नोहावे ते ॥
ज्ञाने.१८.७८.१६४६॥
अशा भगवत्स्वरूप झालेल्या महात्म्यांच्या मुखातून आलेले सहज शब्दही वेदतुल्य असतात. त्यांचा देह आपल्याला पांचभौतिक दिसत असला तरी, प्रत्यक्षात ते त्या देहानेही सच्चिदानंद स्वरूपच झालेले असतात. म्हणूनच या महात्म्यांनी केलेली ग्रंथरचना किंवा उपदेशिलेला बोध आणि त्यांचे अद्भुत चरित्रग्रंथ देखील त्यांच्याच प्रमाणे दिव्य असतात व ते श्रद्धावंत अभ्यासकाला व उपासकाला परब्रह्मस्वरूप करणारेही असतात !
आता या प्रस्तावनेचे कारण सांगतो. नाथ-दत्त-भागवत संप्रदायांचे अध्वर्यू, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातुःश्री व सद्गुरु,  स्वनामधन्य प.पू.पार्वतीदेवी देशपांडे या साक्षात् श्रीस्वामीतनयाच होत्या. आज त्यांचा अमृतमहोत्सवी पुण्यतिथी उत्सव आहे. राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या कृपा परंपरेतील अलौकिक अधिकारसंपन्न विभूतिमत्व म्हणजे पूजनीय पार्वतीदेवी ! त्यांचे चरित्र हा साधक सद्भक्तांना निरंतर मार्गदर्शन करणारा अजरामर, रत्नखचित बोध-ठेवाच आहे. श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या या लाडक्या तनयेचे दिव्यपावन चरित्र, प.पू.श्री.मामासाहेबांच्या तितक्याच अधिकारसंपन्न कन्येने; प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी लिहिलेले असावे, हा निव्वळ योगायोग मुळीच नाही ! श्रीवामनराज प्रकाशनाचे बावीसावे ग्रंथपुष्प असणाऱ्या *'श्रीस्वामीतनया'* या रसाळ चरित्राची आज सहावी आवृत्ती संपत आलेली आहे; यातच त्याच्या उपयोगितेचे व अपूर्वतेचे मर्म स्पष्ट होते.
या चरित्राच्या ठिकाणी त्रिवेणीसंगम झालेला आहे. श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या मांडीवर खेळलेल्या, त्यांचे अलौकिक कृपाछत्र लाभलेल्या श्रीस्वामीतनया पू.पार्वतीदेवींचे चरित्र, त्याच परंपरेतल्या, श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्याच परमकृपांकित पू.सौ.शकाताईंनी लिहावे आणि त्यातून पुन्हा श्रीस्वामीकृपेचीच त्रिभुवनपावनी गंगा खळाळून वाहावी; हा किती मनोहर योग आहे ना ! या दिव्य ग्रंथाच्या 'सच्चिदानंदमयते'चे अजून काय प्रमाण द्यावे?
या पुण्यप्रद चरित्रग्रंथाची माझी एक विशेष अनुभूती मुद्दामच येथे देत आहे. आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला, दिनांक ७ डिसेंबर रोजी, प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवींची पंच्चाहत्तरावी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या या चरित्रगायनाने मी श्रीस्वामीतनयेच्या श्रीचरणीं मनोभावे भावपुष्पांजली अर्पितो.
२००९ साली भाद्रपद महिन्यात श्रीक्षेत्र दत्तधामहून मी फलटणला चाललेलो होतो. बसच्या प्रवासात माझी एका कुलकर्णी नावाच्या सरकारी अधिकारी गृहस्थांशी ओळख झाली. ते कोयनानगरला काही कामानिमित्त आले होते. बोलता बोलता मी त्यांना श्रीक्षेत्र दत्तधाम ची माहिती सांगितली. ते स्वतः कोणा सत्पुरुषांचे अनुगृहीत असून साधना करणारे होते. म्हणून त्यांना आमच्या  स्थानाविषयी आपुलकी वाटली व त्यांनी दर्शनाला येण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे ते पुढच्याच आठवड्यात दर्शनाला आले देखील. त्यावेळी मी त्यांना 'श्रीस्वामीतनया' या ग्रंथाची एक प्रत भेट म्हणून दिली.
सुमारे महिन्याभरानंतर ते पुन्हा दर्शनाला आले. मी त्यावेळी सहजच 'श्रीस्वामीतनया' वाचलेत का ? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून मला खूप आश्चर्य आणि समाधानही वाटले. ते म्हणाले, "अहो काय सुंदर पुस्तक आहे ! ते वाचल्यापासून माझी, ' साधनेला वेळ मिळत नाही ' ही अडचणच पार गेली. आता माझी साधना नियमाने होते व त्यातून खूप आनंदही मिळतो !" संतांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये त्यांची कृपाशक्ती ओतप्रोत भरून राहिलेली असते; याचे सुरेख प्रत्यंतर वरील उत्तरातून जाणवते.
प.पू.मातु:श्री पार्वतीदेवींचे अवघे चरित्र हा स्वतंत्र स्वामी-लीलाविलासच आहे. त्यातून साधक म्हणून आपल्याला मिळणारी विशेष ऊर्जा कल्पनातीत आहे. संतांचे वर्तन हे आपल्याला असंख्य बाबींमध्ये अचूक मार्गदर्शन करणारे असते. म्हणूनच आपण नेहमी संतांची चरित्रे डोळसपणे अभ्यासली पाहिजेत. आणि या दृष्टीने, पू. पार्वतीदेवींचे चरित्र तर, कोणत्याही परिस्थितीतला भक्कम आधार म्हणून आयुष्यभर अगदी जवळ बाळगावे, इतके जबरदस्त आहे.
पू.पार्वतीदेवींचा जन्म अक्कलकोटातलाच, १८७५ सालचा. त्यावेळी साक्षात् परब्रह्मच राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने तेथे अलौकिक लीला करीत होते. पू. पार्वतीदेवींचे पिताश्री, पू. नारायणभट्ट सोनटक्के हे अक्कलकोट संस्थानात वाकनिस होते. ते श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त व पूर्ण कृपांकित महात्मेच होते. त्यांच्या पोटी पू. बाई तथा पू.पार्वतीदेवींचा जन्म झाला व त्यांना परमभाग्याने लीलावतार श्री स्वामी महाराजांच्या मांडीवर खेळण्याचे सौभाग्य लाभले. श्री स्वामी महाराजांनीच लहानग्या बाईला मांडीवर घेऊन, तिच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवून, स्वमुखाने सांगितले होते, " ही आमची पोर आहे ! " श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या या शब्दाची जिवंत प्रचिती 'श्रीस्वामीतनया' वाचताना आपल्याला वारंवार येते. खरोखरीच, पू.पार्वतीदेवी या परिपूर्ण श्रीस्वामीतनयाच होत्या !
श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेने अवघ्या सातव्या वर्षी पू.बाईंवर पू. नारायणभट्टांनी परंपरेच्या बीजमंत्रासहित शक्तिपातपूर्वक कृपानुग्रह केला. दीक्षा झाल्याक्षणीच पू.बाई प्रगाढ समाधीत गेल्या. त्यांचा जन्मजात अधिकारच तेवढा अद्भुत होता.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह नसरापुरच्या देशपांडे घराण्यातील पू.दत्तोपंतांशी झाला. पू.दत्तोपंत प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांचे पूर्णकृपांकित शिष्य होते. हा लक्ष्मी-नारायणाचा जोडा परमार्थाच्या दृष्टीनेही संपन्न होता. त्यांच्यासारखा अलौकिक संसार क्वचितच पाहायला मिळेल. त्याही दृष्टीने हे चरित्र अभ्यास करण्याजोगे आहे. पतीनिधनानंतर आलेल्या प्रारब्धाच्या गंभीर परीक्षेतही त्या पुरेपूर उतरल्या. एके दिवशी श्री स्वामी महाराज त्यांच्यासमोर प्रकटले व म्हणाले, " बये, तुला दुर्दैवाचे दशावतार माहीत आहेत का?" त्यावर त्या स्मितहास्य करून म्हणाल्या, " महाराज, आपले छत्र असताना दुर्दैव कसे बरे पाहायला मिळेल?" त्यावर पुन्हा श्री स्वामी महाराज म्हणाले, " तुला आता दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागणार आहेत, तयारीत राहा. " त्यावर आदराने त्यांनी विचारले, " त्या काळात आपण आणि माझे भगवंत माझ्यासोबत असणार ना?" श्री स्वामी महाराज प्रसन्नपणे उत्तरले, " बये, बाप कधी लेकीला सोडून जातो का? आम्ही कायमच तुझ्यासोबत आहोत, काळजी करू नकोस! " त्याक्षणी मोठ्या खंबीरपणे पू.पार्वतीदेवी उत्तरल्या, " महाराज, मग मी दुर्दैवाचे दशावतारच काय, शतावतारही आनंदाने सहन करीन! " आपल्या लेकीचा हा दृढविश्वास पाहून श्री स्वामी महाराजांना काय आनंद झाला असेल, याची कल्पनाही करवत नाही.
प.पू.मामांचे पिताश्री प.पू.श्री.दत्तोपंत देशपांडे १९२८ साली ६ मे रोजी श्रीदत्तचरणीं लीन झाले. त्यावेळेपासूनच दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. १८०० एकर जमिनीची मालकी असणा-या पू.दत्तोपंतांची इस्टेट त्यांच्या दत्तक गेलेल्या सख्या भावाने हडपली व पू.पार्वतीदेवींना नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढले. एरवी पायलीने मोती व दाग-दागिने मोजणा-या पू.पार्वतीबाई जेवढ्या निस्पृहपणे संपन्नता उपभोगत होत्या, तेवढ्याच शांतपणे त्यांनी दारिद्र्यही उपभोगले. चित्ताची केवढी समता हवी हे सहन करायला! श्रीस्वामीतनयेचे जीवन असे बावनकशी लखलखीत सोनेच आहे. पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्ये स्वामीमहाराजांनी पुन्हा अवतार धारण करण्यासाठी म्हणून पू.पार्वतीदेवींचीच पावन कूस निवडली, यात नवल ते काय?
पू.दत्तोपंतांच्या देहत्यागापासूनच प.पू.मातुःश्री पार्वतीदेवींनी झोपेचा पूर्ण त्याग केला होता. आयुष्यातली शेवटची बारा वर्षे त्या चुकूनही जमिनीला पाठ लावून झोपल्या नाहीत. रात्रभर त्या साधनेत असत किंवा दोन साधनांमधील वेळात फेऱ्या मारत माळ घेऊन जप करीत. पण त्यांनी जमिनीला पाठ म्हणून टेकवली नाही. त्यांचा परमार्थ केव्हाच पूर्णत्वाला गेलेला होता, तरीही त्यांनी आपली साधना कधीच सोडली नाही. साधना हेच त्यांचे कर्तव्य होते आणि तेच त्यांचे औषधही !
त्यांच्या चरित्रातील याच गुणवैशिष्ट्याचा उल्लेख करून त्या कुलकर्णींनी मला वरील उत्तर दिले होते. ते म्हणाले की, मातु:श्रींना इतक्या भयानक परिस्थितीतही एवढा वेळ साधनेला देता येत होता, मग मी कोणत्या तोंडाने म्हणू की मला साधनेला वेळच मिळत नाही? माझी तर परिस्थिती देवदयेने किती चांगली आहे. हे पुस्तक वाचल्यापासून माझी मलाच इतकी लाज वाटायला लागली की बस. आणि आपोआपच माझ्याकडून साधना न चुकवण्याचा निर्धार झाला व सद्गुरुकृपेने साधना निर्विघ्नपणे दररोज घडूही लागली. शिवाय साधनेचे प्रेमही एवढे वाढले की, आता ती साधनाच हळूहळू माझी प्राथमिकता होत आहे ! सतत श्रीगुरूंनी दिलेल्या साधनेत रममाण असणाऱ्या, साधनाच ज्यांचा ध्यास आहे, सर्वस्व आहे अशा पू.मातुःश्री पार्वतीदेवींच्या पावन चरित्राने कुलकर्णींवर केलेली ही अमोघ कृपाच नाही का? ब्रह्मस्वरूप झालेल्या संतांची चरित्रे देखील 'अक्षरब्रह्म' बनून साधकांना साधनेतही अग्रेसर करतात; त्या महात्म्यांप्रमाणेच 'आपणासारिखे करिती तात्काळ ।' असे दैवी सामर्थ्य बाळगून असतात, हेच त्रिवार सत्य आहे !
पू.पार्वतीदेवी या निष्णात ज्योतिषी व वैद्यही होत्या. त्यांनी आपल्या या दोन्ही दैवी विद्यांचा लोकांच्या भल्यासाठी भरपूर वापर केला. ज्योतिषाचा किंवा औषधांचा त्यांनी कधीच कसल्याही प्रकारचे मोबदला घेतला नाही. त्यांनी आपल्या परंपरेने आलेल्या दोन्ही विद्या देऊन पू.मामांनाही त्या शास्त्रांमध्ये निष्णात केले होते.
पू.पार्वतीदेवींच्या काळातील थोर थोर सत्पुरुष त्यांचा अधिकार जाणून त्यांच्याशी अतीव प्रेमादराने वागत असत. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज, श्रीसंत गोंदवलेकर महाराज, श्रीसंत नारायण महाराज केडगांवकर, श्री शंकर महाराज यांसारख्या अनेक विभूतींचा व पू.पार्वतीदेवींचा दृढ स्नेहबंध होता. श्री शंकर महाराज तर आवर्जून पू.पार्वतीदेवींकडे येत, त्यांच्या हातचे अन्न खात व मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांच्याशी वागत.
प.पू.सौ.शकाताईंनी अतीव रसाळ भाषेत वर्णिलेली पू. मातुःश्री पार्वतीदेवींची ही चरित्रागाथा मनोहर आहे. त्या चरित्राला इतका सुंदर ओघ आहे की हातात घेतल्यावर पूर्ण वाचून झाल्याशिवाय कोणी खाली ठेवणारच नाही ! त्यातील शब्द न् शब्द आपल्या काळजाला हात घालतात. मातुःश्रींची उत्कट गुरुभक्ती, जगावेगळे गुरुप्रेम, कष्टी जनांविषयीचा अपरंपार कळवळा, साधनेची प्रगाढ निष्ठा, त्यांच्यातील कणखर आणि खंबीर पारमार्थिक महात्मा व तळमळीचा शिक्षक, त्यांचे स्वयंसिद्ध गुरुत्व आणि सर्वात महत्त्वाची अशी त्यांची परमशांती; असे त्यांचे असंख्य सद्गुण आपल्याला वेडावून टाकतात. भारावून जाणे म्हणजे काय? हे ज्याला सप्रेम अनुभवायचे असेल, त्याने हे चरित्र एकदातरी आवर्जून वाचावेच !
प.पू.मातुःश्री पार्वतीदेवी व प.पू.श्री.मामा या मायलेकांचे गूळपीठ तर अद्भुत आहे. त्यांच्यातला तो प्रेमबंध वाचताना, वाचत वाचत अनुभवताना, आपलेही हृदय प्रेमपडिभराने सुस्नात होते. काय सुरेख पद्धतीने त्यांनी प.पू.श्री. मामांना घडवलेले आहे; लाजवाब ! बालसंगोपनाच्या, शिष्यघडणीच्या विद्यापीठाचे अनभिषिक्त कुलगुरुपद भूषवावे ते मातुःश्री पार्वतीदेवींनीच ! पालकांना, शिक्षकांना चिरंतन मार्गदर्शन करण्याचे विलक्षण सामर्थ्य या ग्रंथात लीलया सामावलेले आहे !
मातुःश्री पार्वतीदेवींच्या चरित्राचे आणखी एक अद्वितीय वैशिष्ट्य सांगतो. मातुःश्री पार्वतीदेवी या प.पू.मामांच्या नुसत्या जन्मदात्रीच नव्हत्या, तर त्या त्यांच्या मोक्षगुरूही होत्या. आई ही पहिली गुरु असतेच. पण येथे ही पहिली गुरूच मोक्षगुरूही आहे. शिवाय त्यांनी अगदी शेवटपर्यंत आपले गुरुत्व सांभाळलेले आहे. श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या आज्ञेने त्यांनी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला, २६ नोव्हेंबर १९४१ रोजी पहाटे, पू.श्री.मामांवर शक्तिपातपूर्वक कृपानुग्रह केला. त्याच दिवशी; मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी (तारखेने २७ नोव्हेंबर) त्यांनी आपले शिष्य पू. मामांना समोर बसवून, 'भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेले महात्म्यांचे प्रयाण कसे असते ते पाहा', असे सांगून शांतपणे देहत्याग केला. किती अद्भुत महाप्रयाण आहे हे ! असा प्रसंग जगाच्या आजवरच्या इतिहासात एकमेवाद्वितीयच आहे ! शेवटच्या श्वासापर्यंत शिष्याला सप्रमाण, सोदाहरण बोध देण्याची ही घटना आजवर दुसरी न ऐकली न पाहिली व पुढेही कधी घडेल असे वाटत नाही.
आपल्या आचरणाने व अपूर्व आत्मप्रचितीने साक्षात् परिपूर्णब्रह्म राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांची कूस धन्य ठरविणाऱ्या, महासिध्दांनाही मार्गदर्शक ठरलेल्या सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी देशपांडे तथा श्रीस्वामीतनया यांच्या श्रीचरणीं अमृत महोत्सवी पुण्यतिथी निमित्त सादर वंदन. हे आई, आम्हांलाही आमची साधना 'सर्वस्व' वाटावी; अशी करुणाकृपा कराल ना आमच्यावर?
प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे यांचे समग्र जीवनचरित्र व कार्य, पू. सौ. शकाताईंनी रचलेल्या त्यांच्या आरतीत फार सुंदर शब्दांत आलेले आहे. आज त्यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यतिथी दिनी, ती आरती गाऊन आपण राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या लाडक्या कन्येच्या, श्रीस्वामीतनया पू.पार्वतीदेवींच्या श्रीचरणीं सादर दंडवत करून धन्य होऊया  !!
आरती स्वामीतनयेची ।
सद्गुरु माय पार्वतीची ॥ध्रु.॥
स्वामी अंकी बैसविती।
'अमुची पोर' असे वदती ।
त्या तुज अन्य काय उपमा ।
आम्हां न कळे तव महिमा ॥१॥
धन्य तव आत्मतेज धीर ।
धन्य तप शांती ज्ञान थोर ।
घेई नवनीत करकमळी ।
प्रेमे अंकित वनमाळी ॥२॥
प्रकटले दत्तकृपाबीज ।
वोळले श्रीपादा सहज ।
ऐसे दिधले गुरुचरण ।
अंतरी शकुंतला लीन ॥३॥
(  'श्रीस्वामीतनया' ग्रंथ मूल्य ₹ ४०/-, सवलतीत मिळण्यासाठी  02024356919 या क्रमांकावर संपर्क करावा.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

6 comments:

  1. दंडवत मातेच्या चरणी

    ReplyDelete
  2. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता,
    नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

    ReplyDelete
  3. गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  4. मातोश्रींच्या चरणी साष्टांग दंडवत। लेख अप्रतिम। श्री स्वामी समर्थ।

    ReplyDelete