26 Feb 2019

भाग्य आम्हीं ताई देखियेल्या



जे थोर महात्मे देहातच ब्रह्मस्वरूप झालेले असतात, त्यांच्या कोणत्याच लीला पांचभौतिक राहिलेल्या नसतात. मग तो देह सोडण्याचा का प्रसंग असेना, ती देखील त्यांची एक लीलाच ठरते. कालच्या माघ कृष्ण सप्तमीला पुनश्च पावन करीत, राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या पूर्णकृपांकित व प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी, भक्तिमार्गातील परमोच्च आणि अद्वितीय अधिकार असलेल्या, परमाराध्य प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे यांनी अशीच ७२ वर्षांची एक अद्भुत लीला साकारून, गोलोकधामातील आपल्या नित्यलीलेत पुन्हा प्रवेश केला.
सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात,
कां झाकलिये घटींचा दिवा ।
नेणिजे काय जाहला केव्हां ।
या रीती जो पांडवा ।
देह ठेवी ॥ ज्ञाने.८.१०.९८ ॥
"घटात झाकून ठेवलेला एखादा दिवा जसा आतल्या आत केव्हा शांत झाला हे बाहेर कळतही नाही, अगदी तशाच प्रकारे, घंटेचा नाद त्या घंटेतच पुन्हा लय पावावा, विरून जावा, तसा देहातच ब्रह्मस्वरूपच झालेला महात्मा आपल्या नश्वर देहाचा त्याग करून ब्रह्मरूप होऊन जातो !"
प.पू.सौ.शकाताईंच्या परमदिव्य गुरुपरंपरेचेच हे वैशिष्ट्य म्हणायला हवे. श्रीस्वामीतनया प.पू.सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे, त्यांचे शिष्योत्तम व पुत्र प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज आणि आता प.पू.श्री.मामांच्याच मानसकन्या प.पू.सौ.ताई ; या तिघांनीही झाकलेल्या दिव्याप्रमाणेच आपली मर्त्यलोकातली लीला आवरून घेतली. सद्गुरु श्री माउलींची ओवी न् ओवी प्रत्यक्ष जगून दाखवण्याचीही अद्भुत परंपरा या गुरुपरंपरेत पाहायला मिळते !
या मृत्युलोकात आलेले सर्वच आपले देह इथेच सोडून जातात, कोणीच अपवाद नाहीत. प्रत्यक्ष श्रीभगवंत देह ठेवतात, तसेच महात्मेही देह ठेवतात ; अगदी कपडे बदलावेत असा. त्यांच्यासाठी जाणे-येणे हे काही वेगळे नसतेच. तीही त्यांची एक सहजलीला. पण पांचभौतिकातच राहणा-या तुम्हां-आम्हां सर्वांसाठी, त्या निर्गुणब्रह्माचेच सर्व गुण अंगी मिरवणा-या आपल्या श्रीसद्गुरूंच्या सगुण स्वरूपाचे नाहीसे होणे क्लेशदायकच ठरते. आपले सद्गुरु कुठेही गेलेले नाहीत, मुळात ते गेलेलेच नाहीत, ते सदैव आपल्या हृदयात, स्मरणात साक्षात् आहेतच ; हे जरी मनोमन पटत असले तरीही ; ज्या दिव्यपावन देहातून त्यांनी आपल्यावर कृपेचा वर्षाव केला, आपले लाड पुरवले, गोड आवाजात अनेकवेळा हाक मारली, प्रसंगी लटका राग दाखवून आपल्या दोषांची जाणीव करून दिली, भरभरून निखळ आणि निरपेक्ष प्रेम केले, सेवा करवून घेतली, सहज घडणा-या प्रसंगांमधून देखील अध्यात्माची गूढगहन तत्त्वे समजावून सांगितली, मायेने पाठीवरून हात फिरवला, वात्सल्याने गोंजारले, समजूत काढली, मनस्थिती बिघडलेली असताना आतून बाहेरून सावरले, परमार्थाला लावले, कर्माने समोर येणा-या प्रत्येक प्रसंगांतून श्रीभगवंतांच्या जवळ कसे जावे हे शिकवले, प्रत्येक गोष्टीतून भगवंतांचेच सौंदर्य कसे पाहावे याचा स्वत:च्या वर्तनातून वस्तुपाठ घालून दिला, अगदी हाताला धरून भाजी चिरण्यापासून ते पुरणपोळी करण्यापर्यंत सर्वकाही हातचे काहीही न राखता शिकवले, जीवनाचा खरा आनंद उपभोगण्याची दुर्मिळ कला आत्मसात करविली आणि आपल्या देवदुर्लभ प्रेमकृपेचे पांघरूण घालून सर्व बाबतीत संरक्षण केले व अजूनही करीत अाहेत ; तो पांचभौतिक दिसत असला तरी चिन्मयच असणारा देह इथेच ठेवून दिला व आपल्या मूळच्या स्वरूपात पुन्हा कायमचा प्रवेश केला ; हे दु:ख कसे सहन करायचे ? आता तो मायेचा हात दृश्य स्वरूपात पुन्हा कधीच पाठीवरून फिरणार नाही, या जीवघेण्या दुर्दैवाची भळभळती जाणीव कशी घालवायची ?? आता ते त्रिभुवनमोहक वात्सल्यपूर्ण हास्य पुन्हा कधी पाहायला मिळणार ? आणि तो मातृत्वाने भारलेला, करुणेने ओथंबलेला गोड आवाज पुन्हा कधी ऐकायला मिळणार ? यांसारख्या असंख्य अनाकलनीय प्रश्नांची उत्तरे आता मी कोणाला विचारायची ??
श्रीसद्गुरु हे व्यक्ती नसून तत्त्व आहेत ; हे मनोमन पटलेलेही आहे. पण तरीही ते तत्त्व ज्या देहाच्या आश्रयाने समोर होते, तो दिव्य देह आता पुन्हा समोर दिसणार नाही, हा विचारच फार फार भयानक आहे. पण आता ते लीलामय सगुण रूपडे तत्त्वत:च पाहावे लागणार आहे. त्यासाठीचे बळ आता तेच सद्गुरुतत्त्व आम्हां सर्वांना प्रदान करो, ही प्रार्थना.
श्रीभगवंतांच्या परमकृपेने बावीस वर्षे मला प.पू.सौ.ताईंचा पावन सहवास लाभला. श्रीक्षेत्र दत्तधाम येथे दरवर्षी साधारणपणे दोन महिने त्यांच्या बरोबर राहता आले, त्यांची जमेल तशी सेवा करता आली, या महद्भाग्याची खरोखर कशाशीही तुलना करता येणार नाही. सद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, "धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां । भाग्य आम्हीं तुका देखियेला ॥" हाच भाव या क्षणी माझ्या मनात आहे. खरोखर सांगतो, भाग्य आम्हीं ताई देखियेल्या । हेच सत्य आहे. प.पू.सौ.ताईंनी सदैव साधनेचा पुरस्कार केला, साधनेचाच ध्यास धरला, त्याच साधनेचा वसा आणि वारसा त्यांनी स्वत: जोपासून आपल्यालाही प्रदान केला आहे. तो वसा प्राणपणाने जपून आणि त्यांच्या उपदेशानुसार वर्तन करून त्यांना आनंद होईल हे पाहणे, हीच त्यांच्या पुण्यस्मृतीस वाहिलेली खरी आदरांजली ठरणार आहे !
प.पू.सद्गुरु सौ.शकाताईंच्या श्रीचरणीं प्रेमभावपूर्वक श्रद्धा-सुमनांजली समर्पितो आणि अनंतकोटी दंडवत प्रणाम करतो !!
- रोहन विजय उपळेकर
[ लेखासोबतचे चित्र प.पू.सौ.ताईंच्या साधनबोध या ग्रंथातील असून, या प्रसंगावर अतिशय नेमके भाष्य करणारे आहे. ]

6 comments:

  1. प पू सद्गुरू सौ ताईंच्या चरणी शतशः नमन

    ReplyDelete
  2. भावपूर्ण श्रध्दांजली.
    🙏🙏

    ReplyDelete
  3. अप्रतिम
    श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  4. I श्रीराम जयराम जय जय राम II🙏🌹🙏 श्री ताई माऊली 🙏🌹🙏

    ReplyDelete
  5. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete