17 Aug 2020

भक्तवत्सल भगवान श्रीबेणेश्वर महादेव



देवाधिदेव भगवान श्रीशिवशंकर हे 'आशुतोष' म्हणून प्रसिद्ध आहेत. कारण ते प्रार्थना केल्याक्षणी प्रसन्न होणारे आहेत. हा परमात्मा 'महाकाल' आहे, सकल चराचर व्यापून राहिलेला अाहे, दिसायला अतिशय उग्र, भयंकर आहे, प्राप्त होण्यासाठी अत्यंत दुर्मिळ मानलेला आहे ; पण भक्ताच्या अत्यल्पही भक्तीवर प्रसन्न मात्र 'तत्काल' होणारा आहे. भगवान आदिदेव श्रीमहाकालेश्वरांचे स्वरूप किती भीषण आहे पाहा. धूसर पांढुरक्या वर्णाच्या शरीरावर गजचर्म, व्याघ्रचर्म परिधान केलेले आहे, गळा कालकूटामुळे निळा झालेला आहे, पिंगट रंगाच्या जटा अस्ताव्यस्त सोडलेल्या आहेत, गळ्यात विषारी नागांची आभूषणे व नरमुंडमाला आहे, तिन्ही डोळ्यांतून क्रोधाच्या ज्वाला बाहेर पडत आहेत, तीक्ष्ण त्रिशूल हाती धरलेला आहे, भव्य नंदी शेजारी उभा आहे ; हे रूप केवढे भयंकर दिसत असेल ! पाहूनच भीती दाटणार आपल्या मनात. पण रूप कितीही भयंकर दिसत असले तरी या देवाधिदेवांच्या हृदयात मात्र करुणेची खळाळती अजस्र गंगाच अवतीर्ण झालेली आहे. त्यांची करुणाकृपा इतकी दिव्यपावन आहे की ती त्यांच्या ठायीच्या अपरंपार उग्रत्वालाही पुरून उरते. या अद्भुत कृपागंगेमुळेच तर ते आशुतोष म्हणून विख्यात आहेत !
भगवान श्रीविश्वनाथांनी आजवर असंख्य भक्तांची जगावेगळी व भयंकर परीक्षाही पाहिली आहे आणि त्या प्रसंगातील त्यांच्या अनन्यतेवर दिलखुलास प्रसन्न होऊन त्यांना जगावेगळे कृपादानही केलेले आहे. चिलया बाळ, उपमन्यू, उज्जैनचा गोपबालक, भक्तवर शबर-शबरी.. किती म्हणून उदाहरणे द्यावीत ? भगवान श्रीमहादेवांचे सारे काही अलौकिकच आहे ; त्यांचे वागणेही अलौकिक आणि त्यांचे देणेही अलौकिकच ! अशीच एक प्रत्यक्ष घडलेली हकिकत व जिथे घडली त्या अपरिचित पण जागृत शिवस्थानाचे माहात्म्य, आजच्या श्रावण मासातील शेवटच्या सोमवारी या लेखाद्वारे आपल्या समोर ठेवीत आहे.
२००७ साली प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्या पावन सान्निधात आम्हां तरुण मंडळींची द्वारका-सोमनाथ-गिरनार भक्तियात्रा संपन्न झाली होती. त्या यात्रेच्या दरम्यान भगवान श्रीसोमनाथांच्या दर्शनानंतर एका अद्भुत व अप्रसिद्ध शिवस्थानाच्याही दर्शनाचा सुयोग जुळून आला. दि.२१ फेब्रुवारी २००७ रोजी श्रीसोमनाथांच्या भव्यदिव्य शिवलिंगाचे दर्शन घेऊन व पूजा करून आम्ही दुपारी परत फिरलो. श्रीसोमनाथांच्या मंदिराजवळ प्रदूषण करणारी वाहने जाऊ देत नसल्याने, आमच्या मोठ्या गाड्या गावाबाहेर पार्किंगमध्ये लावलेल्या होत्या. गाडीचा ड्रायव्हर म्हणाला की, येथे जवळच एक सुंदर स्थान आहे, तिथे दर्शनाला जायचे का ? प.पू.श्री.दादांनी लगेच होकार दिल्याने आम्ही त्या पार्किंगच्या पिछाडीला साधारण एक-दीड कि.मी.वर असलेल्या, घनदाट वृक्षराजीने वेढलेल्या, अतिशय सुरम्य व शांत शिवमंदिराजवळ आलो. 
( https://rohanupalekar.blogspot.com )
जंगलातील त्या विलक्षण स्थानाला 'बेणेश्वर महादेव' म्हणतात. अगदीच अपरिचित असणाऱ्या या स्थानाची आख्यायिका मोठी अद्भुत आहे. श्रीसोमनाथ क्षेत्राच्या राजाची मुलगी या स्थानावर नित्य पूजेसाठी येत असे. यवनांच्या आक्रमणाच्या काळात, या शिवस्थानावर दर्शनासाठी आलेल्या त्या सुस्वरूप राजकन्येच्या पाठीमागे एकदा दुष्ट गझनीचे सैनिक लागले. त्यांची ती खराब नियत पाहून आणि पुढे वाढून ठेवलेल्या प्रसंगाचे गांभीर्य जाणून, त्या राजकन्येने भगवान श्रीआशुतोषांची कळवळून प्रार्थना केली आणि तेही अगदी नावाप्रमाणे तात्काळ प्रसन्न झाले. ते बेणेश्वर महादेवांचे प्रचंड शिवलिंग अचानक दुभंगले आणि त्या राजकन्येला आपल्यात सामावून घेऊन, पुन्हा सांधले गेले. त्या घडामोडीत राजकन्येची वेणी मात्र बाहेरच राहिली. आजही भगवंतांच्या भक्ताभिमानी भक्तरक्षक ब्रीदाची, त्यांच्या भक्तत्राण स्वभावाची प्रत्यक्ष साक्ष असणारी ती वेणी, शिवलिंगाच्या मागच्या बाजूला स्पष्ट दिसते. तसेच हे भव्य शिवलिंग खालच्या बाजूने भंगल्याची चीर व खड्डे देखील दिसतात. त्या राजकन्येला केवळ आपल्यात कायमचे सामावून घेऊन देव थांबले नाहीत, तर त्यावेळी शिवलिंगातून प्रचंड प्रमाणात भुंगे बाहेर पडले व त्या महादुष्ट सैनिकांच्या मागे लागले. त्या भुंग्यांनी त्यांना अक्षरश: पळवून लावले व ते सर्व भुंगे पुन्हा त्या शिवलिंगातच प्रविष्ट झाले. त्या घटनेची खूण म्हणून तयार झालेली काही छिद्रे देखील त्या शिवलिंगाच्या खालच्या बाजूला आजही स्पष्ट दिसतात.
भगवान श्रीचंद्रशेखरांच्या अद्भुत लीलेची ही प्रासादिक आख्यायिका ऐकून, भारावलेल्या मनाने आम्ही त्या नित्यजागृत श्रीबेणेश्वर महादेवांचे दर्शन घेतले. जवळपास तीन फुटांचा व्यास व चार फूट उंची असलेले ते भव्य शिवलिंग पाहून सर्वांच्या डोळ्यांत पाणीच आले. प.पू.श्री.शिरीषदादा देखील या स्थानाचे दर्शन घेऊन अतिशय आनंदित झाले होते.  त्यांना श्रीभगवंतांच्या या अपरिमित भक्तवात्सल्याच्या दर्शनाने भरून आले होते. भगवान श्रीशिवप्रभूंचे हे किती मंगलमय, करुणामय लीलानाटक आहे ना ! 
भगवान श्री ज्ञानेश्वर माउली श्रीभगवंतांच्या भक्तप्रेमाविषयी, भक्तवात्सल्याविषयी सांगताना म्हणतात ; 
पैं रंक एक आडलेपणें ।
काकुळती धांव गा धांव म्हणे ।
तरी तयाचिये ग्लानी धांवणें ।
काय न घडे मज ॥१२८॥
तिहीं जे वेळीं मी स्मरावा ।
ते वेळीं स्मरिला कीं पावावा ।
तो आभारही जीवा ।
साहवेचि ना ॥ज्ञाने.८.१४.१३०॥
श्रीभगवंतांच्या कुसुमकोमल हृदयात आपल्या अनन्य भक्तांविषयी एवढा अपार प्रेमभाव असतो की, त्या भक्तांनी स्मरण केल्याक्षणी ते धावत जाऊन तेथे प्रकट होतात, त्या भक्तांचे संरक्षण करतात, त्यांची मनोभावे सेवा करतात. भक्तच कशाला, एखादा संकटात पडलेला भक्तिहीन गरीब माणूस काकुळतीला येऊन, कळवळून प्रार्थना करू लागला, तरीही हे दयाळू भगवंत तातडीने त्याच्यासाठी धावून जातात व त्याची त्या संकटातून सोडवणूक करतात. कारण त्यांच्या मनात आपपर भावच नसतो. भगवान श्रीबेणेश्वर महादेवांची ही भक्तत्राण-लीला श्री माउलींच्या या ओव्यांचे जणू प्रात्यक्षिकच आहे असे म्हणायला हवे.
भगवान श्रीसोमनाथांच्या दर्शनाला कधी गेलात, तर आवर्जून या श्रीबेणेश्वर महादेवांचेही दर्शन घेऊन या बरं का !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment