4 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- १

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज पुण्यस्मरण सप्ताह
आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- १

फलटण येथील थोर सत्पुरुष प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हे विसाव्या शतकातील लोकोत्तर विभूतिमत्व होते. आपली 'ब्रह्मबैसका' कधीही न सुटलेले हे अवधूत अवलिया, सदैव त्याच ब्रह्मभावात विचरण करीत असत. त्यांची ती सहजसमाधी अवस्था कोणत्याही प्रसंगी आणि कोणत्याही स्थितीत कधीच भंगली नाही. त्यामुळे त्यांचे लौकिक व्यवहारही त्याच ब्रह्मानंदावस्थेत घडत असत. त्यांच्या काळातील ते नि:संशय अद्वितीय आणि विलक्षण असे सत्पुरुष होते यात काहीच शंका नाही ! 
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांवर, राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील अवधूत महात्मे, पुसेसावळी येथील सत्पुरुष सद्गुरु श्री श्रीकृष्णदेव महाराजांची पूर्णकृपा झालेली होती. इ.स.१९२० साली दैवी प्रेरणेने प.पू.श्री.काका आपल्या प्रथितयश लष्करीसेवेचा राजीनामा देऊन प.पू.सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांना शरण गेले. त्याच वर्षी त्यांच्यावर श्रीसद्गुरुकृपेचा वर्षाव झाला व ते अलौकिक आनंदात नाहून निघाले. यावर्षी त्या दिव्य घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणूनच प्रस्तुत पुण्यस्मरण सप्ताह आपण या "अनुग्रह शताब्दी वर्षा"चे औचित्य साधून विशेषत्वाने साजरा करणार आहोत. त्यानिमित्त आजवर कधीच प्रकाशात न आलेल्या प.पू.श्री.काकांच्या काही हृद्य आठवणी व भक्तांना आलेल्या दिव्य अनुभूती आपण या लेखमालेद्वारे जाणून घेऊ या. आजपासून ते भाद्रपद कृष्ण अष्टमी, दि.१० सप्टेंबर पर्यंत दररोज एकेका लेखामधून प.पू.श्री.काकांच्या अद्भुत अनुभूती उलगडल्या जातील. आपण सर्वांनी मनोभावे यांचा आनंदास्वाद घ्यावा व आपल्या सुहृदांनाही या पोस्ट पाठवून त्यांचा जास्तीतजास्त प्रसार करावा ही सादर विनंती.
- रोहन विजय उपळेकर

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- १

माझ्या माहेरी, फलटण येथील फणसे यांच्या घरावर प.पू.डॉ.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांची कृपा आहे. माझे वडील कै.श्री.विश्वनाथ फणसे हे खूपच धार्मिक होते व प.पू.श्री.गोविंदकाकांचे परमभक्त होते. त्यांच्यामुळे आम्ही घरातील सर्वजण प.पू.श्री.काकांचे भक्त होतो, आजही आहोत. प.पू.श्री.काका कधी कधी आमच्या घरी येत व झोपाळ्यावर बसून उंच झोका घेत. माझे वडील सांगत असत की, "पहिल्यांदा असे प.पू.श्री.काका एकदा घरी येऊन बसले व त्यांनी मोठा झोका घेतला, तेव्हापासूनच फणसे कुटुंबाचा उत्कर्ष झाला. त्या प्रसंगानंतरच आपल्या घरात श्रीमंती आली. ही नि:संशय प.पू.श्री.काकांचीच आपल्या घराण्यावरची कृपा आहे !"
माझे लग्नही प.पू.श्री.काकांनीच ठरवलेले आहे. मी तेव्हा सातवी मध्ये असेन, वय होते बारा वर्षे. मला पाहण्यासाठी कऱ्हाडहून कै.श्री.दत्तात्रेय मोटे आले होते. पाहुण्यांना घेऊन माझे वडील प.पू.काकांच्या दर्शनाला गेले. प.पू.श्री.काकांच्या 'श्रीगुरुकृपा' वास्तूतील हरिपाठाच्या खोलीत तेव्हा भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची गादी होती. दर्शन झाल्यावर प.पू.श्री.काकांनी गादीवरील एक पेढा घेतला व त्याचे दोन तुकडे केले. मग हात क्रॉस करून त्यातला अर्धा पेढा श्री.मोटे यांना दिला व अर्धा माझ्या वडिलांना दिला ; आणि "जावा" एवढेच शब्द त्यावेळी प.पू.श्री.काका बोलले. सोयरीक जमल्याचीच ही खूण होती व माझ्या वडिलांनी ती नीट लक्षात ठेवली होती.
पुढे एक वर्ष झाले तरी मोट्यांच्याकडून काही निरोप आला नाही. त्यावेळी माझ्यासाठी इतर ठिकाणच्या मागण्या येऊ लागल्या. माझे वडील पुण्याच्या एका स्थळाशी माझे लग्न करण्याचे ठरवत होते. पण संतांचा आशीर्वाद कधीच खोटा होत नाही, याचा अनुभव आम्हांला त्यावेळी आला. या बैठकीस जाण्यासाठी आमच्या दुसऱ्या पाहुण्यांना घ्यायला वडील गेले. तेव्हा ते म्हणाले, "थांबा, आपण कऱ्हाडला जाऊन आधी मोट्यांशी बोलू या." त्याप्रमाणे वडील व ते पाहुणे कऱ्हाडला गेले ; आणि माझे लग्न पुण्यात न ठरता मोटे यांचेकडेच ठरले. श्री.वसंतराव मोटे यांच्याशी मी वयाच्या तेराव्या वर्षी विवाहबद्ध झाले. अशाप्रकारे प.पू.श्री.काकांचा आशीर्वाद खरा ठरला व याचे सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले. आज मी वयाची पंचाहत्तरी पार केली आहे व प.पू.श्री.काकांच्याच आशीर्वादांनी माझा संसार सुख-समाधानात झालेला आहे.
लग्नानंतर मला बरेच दिवस मूल झाले नव्हते. माझे वडील प.पू.श्री.काकांना नेहमी विचारीत ; "काका, कधी होणार माझ्या मुलीला मूल ?" त्यावर प.पू.श्री.काका सांगत ; "काळजी करू नकोस, होणार आहे. थोडा धीर धर !" त्यानंतर पुढे दहा वर्षांनी मला मुलगा झाला. त्याला प.पू.श्री.काकांच्या पायावर ठेवले. बाळाला त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्यावेळी ते म्हणाले ; "याची दृष्ट काढत जा. हा घराण्याचे नाव काढेल !" आज त्यांचे शब्द खरे झालेले आहेत. त्याचवेळी ते मला म्हणाले होते की ; "तुला अजून एक मुलगी होईल !" हेही त्यांचे शब्द पुढे खरे ठरले.
माझे वडील प.पू.काकांच्या दर्शनाला रोज जात असत. एकेदिवशी त्यांनी लिहिलेल्या श्री ज्ञानेश्वरीची एक प्रत माझ्या वडिलांना दिली व सांगितले ; "विश्वनाथ, ही पोथी डोक्यावर घेऊन भगवान श्रीपांडुरंगांच्या पायाशी ठेव !" माझे वडील लगेच ती प्रत घेऊन पंढरपूरला श्रीपांडुरंग दर्शनाला गेले. नामदेव पायरीपासून ती प्रत डोक्यावर घेऊन ते चालू लागल्यावर, दोन्ही बाजूच्या  लोकांनी भराभरा बाजूला सरकून त्यांना  जागा करून दिली. ते सरळ श्रीभगवंतांच्या समोर जाऊन उभे राहिले व त्यांच्या पायी प्रेमादरपूर्वक दंडवत घालून त्यांनी ती प्रत चरणांवर अर्पण केली. प.पू.श्री.काकांच्या कृपेने त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष देवांचे दर्शन झाले, असे ते नेहमी सांगत असत. त्या प्रसंगानंतर अखेरपर्यंत ते एका एकादशीला पंढरपूरची व दुसऱ्या एकादशीला आळंदीची वारी करीत होते. 
आम्हां फणसे कुटुंबियांवर प.पू.श्री.काकांचा वरदहस्त सदैव होता व आजही आहे. माझ्या देवघरात प.पू.श्री.काकांचा फोटो नित्यपूजेत आहे. मी फलटणला गेल्यावर प.पू.श्री.काकांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय परत येत नाही. प.पू.श्री.काकांच्याच आशीर्वादांनी आम्हां दोघांना व मुलांना प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे यांच्याकडून दीक्षा लाभली. तसेच प.पू.सौ.ताई व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचे दर्शन, सहवास व सेवा लाभली व आजही लाभत आहे. आज या वयातही दररोजची साधना, उपासना व श्रीक्षेत्र दत्तधाम येथे दर्शन व सेवा नियमाने घडत आहे. हे सर्व नि:संशय प.पू.श्री.काकांच्याही आशीर्वादांचे सुफलित आहे, असे मी मनापासून मानते. प.पू.श्री.काकांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !
- श्रीमती शशिकला वसंतराव मोटे, पाटण.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment