7 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ४

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ४

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

माझे वडील कै.श्री.भास्कर गजानन खळे तथा श्री.अण्णा हे योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांचे अनुगृहीत होते. प.पू.श्री.गुळवणी महाराज आमच्या घरी चेंबूरला नेहमी येत असत. आमच्या घरी श्रीसंत साईबाबांच्या मूर्तीची पू.श्री.गुळवणी महाराजांच्या हस्ते स्थापना झालेली आहे. मलाही श्रीमहाराजांकडूनच दीक्षा झाली. माझे वडील पुण्याला श्रीमहाराजांच्या दर्शनाला वारंवार जात असत. श्रीमहाराजांचे अतीव प्रेम आम्ही सर्वांनी असंख्य वेळा अनुभवलेले आहे.
फलटणचे थोर सत्पुरुष प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज आणि प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांचे अत्यंत हृद्य संबंध होते. दोघेही एकमेकांना फार मानीत असत आणि आपल्या भक्तमंडळींना आवर्जून एकमेकांच्या दर्शनाला पाठवीत असत. ९ जून १९७१ रोजी प.पू.श्री.उपळेकर महाराज पुण्याच्या 'श्रीवासुदेव निवास' आश्रमात प.पू.श्री.गुळवणी महाराजांच्या भेटीसाठी आले होते. प.पू.श्री.उपळेकर महाराजांच्या भेटीने प.पू.श्री.गुळवणी महाराजांना खूप आनंद झाला होता. त्यानंतर लगेचच माझे वडील पुण्यास श्रीमहाराजांकडे गेले होते.  
तेव्हा माझ्या वडिलांना सद्गुरु श्री.गुळवणी महाराज म्हणाले ; "खळे ; ह्या वेळेस फलटणला जाऊन प.पू.श्री.उपळेकर महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय मुंबईस परत जाऊ नका. प.पू.श्री.उपळेकर काका हे अखंड ब्रह्मानंद स्थितीतील एक महापुरुष आहेत !" 
श्रीगुरु महाराजांची आज्ञा झाल्यावर लगेच ती.अण्णा पुण्याहून एस.टी.ने फलटणला गेले. स्टँडवर उतरून पत्ता विचारत पू.श्री.उपळेकर काकांच्या घरी गेले. तिथे गेल्यावर दारातच कोणीतरी त्यांना सांगितले ; "प.पू.काकांची तब्येत बरी नाही, त्यामुळे दर्शन होणार नाही !" ती.अण्णा त्या गृहस्थांशी बोलत होते तेवढ्यातच पू.श्री.काका महाराज स्वत: बाहेर आले व म्हणाले ; "कोण म्हणतो बरे नाही मला ? या, या, आत या बरे ! " आणि प.पू.श्री.काकांनी ती.अण्णांना आपल्या मागून बैठकीच्या खोलीत यायला सांगितले. 
खोलीत गेल्यावर प.पू.श्री.काका स्वत:च्याच स्वानंदस्थितीत गोड हसत म्हणाले, "असे पायावर डोके ठेवा बरे. हार आणला आहे ना, तोही घाला !" प.पू.श्री.काकांचे हे प्रेमाचे अगत्य पाहून ती.अण्णा एकदम हरखूनच गेले. पटकन् खाली बसून त्यांनी प.पू.श्री.काकांचे चरण दोन्ही हातात धरून त्यावर डोके ठेवले, त्यांच्या गळ्यात हार घातला. लगेच प.पू.काका म्हणाले ; "बसा असे, वरती खुर्चीवर बसा." वडील म्हणाले ; "नको खालीच बसतो." त्यावर आग्रहाने प.पू.श्री.काका म्हणाले ; "नाही नाही. असे खुर्चीवरच बसा !" त्यांनी घरातून चहा मागवला, प्रेमाने ती.अण्णांना दिला आणि खूप आनंदाने त्यांच्याशी संवाद केला. सर्व कुटुंबाची विचारपूस केली. "कसे आलात ? गाडी घेऊन आलात का स्वत:ची ?" असेही विचारले. ती.अण्णा परत निघाले तेव्हा प.पू.श्री.काका म्हणाले ; "मी एक पत्ता देतो, तिथे जाऊन जेवण करूनच पुण्यास जायचे. जेवल्याशिवाय जाऊ नका !" त्यांनी दिलेला तो पत्ता होता एका हॉटेलचा, ज्याचे त्याच दिवशी उद्घाटन झाले होते. तिथे गेल्यावर ती.अण्णांना आमरसासहित पंचपक्वान्नांचे जेवण दिले गेले. गंमत म्हणजे देण्याचा प्रयत्न करून सुद्धा त्या हॉटेल मालकाने जेवणाचे पैसेच घेतले नाहीत. घरी आल्यावर ती.अण्णा माझ्या सौ.आईला म्हणाले ; "अगं कुसुम, आज श्रीमहाराजांच्या कृपेने मला एका थोर अवतारी महापुरुषाचे दर्शन झाले !" 
ती.अण्णा तेव्हा म्हणाले होते की, "ज्याअर्थी आज प.पू.श्री.काकांनी, "स्वत:च्या गाडीने आलात का ?" असे विचारले, त्याअर्थी आपण कधीतरी नक्कीच गाडी घेणार !" नंतरच्या काळात खरोखरीच माझ्या भावाने गाडी घेतली.
माझ्या वडिलांना प.पू.श्री.गुळवणी महाराजांनीच फलटणला दर्शनासाठी पाठवले होते. प.पू.श्री.गुळवणी महाराजांविषयी प.पू.श्री.काकांना इतका प्रेमादर होता की, त्यांनी पाठवले म्हणून ती.अण्णांना प.पू.श्री.काकांनी अतिशय आपुलकीने, प्रेमाने वागवले आणि पंचपक्वान्नांचे भोजन करूनच पाठवले. ती.अण्णा हे श्रीमहाराजांचे शिष्य आहेत, म्हणजे आपल्याच घरातले आहेत ; एवढ्या आपुलकीने प.पू.श्री.काका त्यांच्याशी वागले. "साधू दिसती वेगळाले । परि ते स्वरूपी मिळाले ।"* हे समर्थ श्री रामदास स्वामींचे वचन यथार्थच आहे !
- श्री.प्रशांत भास्कर खळे, नेरुळ - नवी मुंबई.
(छायाचित्र : प.पू.सद्गुरु श्री.गोविंद काका उपळेकर महाराज आणि प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराज यांचे फलटणच्या पू.श्री.काकांच्या 'श्रीगुरुकृपा' वास्तूच्या समोर काढलेले छायाचित्र.)
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment