8 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ५


प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

"तुझ्याकडे ती देशपांड्यांची मुलगी आहे ना, तिला बोलाव. तिला सांग बघायला !" हे बोल आहेत प.पू.सद्‍गुरु श्री.उपळेकर काकांचे. त्यावेळी मी डॉ.विनायक सिधयेंच्या हॉस्पिटलमध्ये 'सिस्टर इन्चार्ज' म्हणून काम करायचे. हॉस्पिटल पासून प.पू.श्री.काकांचे घर दोन मिनिटांच्या अंतरावर होते. डॉ.सिधयेंच्याकडे प.पू.श्री.काकांचे येणे असायचेच. दर गुरुवारी तर नक्कीच. डॉक्टर गुरुवारी पुण्याला जात, पण प.पू.श्री.काका येऊन जाणारच. 
त्यावेळी ती.सौ.मामी म्हणजे प.पू.श्री.काकांच्या पत्नी बरेच दिवस आजारी होत्या. डॉक्टर अधून मधून त्यांना तपासण्यासाठी जात. आता साल आठवत नाही, पण त्या दिवशी सकाळीच प.पू.श्री.काकांचा निरोप आला आणि डॉक्टर आणि सीताराम कंपाउंडर ती.सौ.मामींना तपासण्यासाठी गेले. मी माझे हॉस्पिटलचे काम करीत होते. ती.सौ.रुक्मिणीदेवी उपळेकर आईसाहेबांना सर्वजण मामीच म्हणत. त्या माझ्या आईच्या मैत्रीणही होत्या. त्या भेटल्या की मी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारत असे. पण उगीचच भीत होते प.पू.श्री.काकांना ! 
थोड्याच वेळात सीताराम आला व मला म्हणाला, "डॉक्टरांनी पू.काकांकडे तुम्हांला बोलावले आहे." मी आधी भ्यालेच. सीतारामला सांगितले, "तू माझ्याबरोबर राहा हं." सकाळची वेळ. प.पू.श्री.काका अंघोळ वगैरे करून, कपाळी गंध बुक्का लावून, देवघरात मांडी घालून शांत बसलेले होते. धोतर नेसलेल्या आणि जानवे घातलेल्या प.पू.काकां मी नमस्कार केला. तेव्हाही प.पू.काका एकदम शांतच होते. 
मला डॉक्टरांनी सांगितले, "आत जावून ती.सौ.मामींची PV करून बघा. काही वाटले तर मला बोलवा." मी आत गेले. मला पाहून ती.सौ.मामी गोड हसल्या. माझा हात त्यांनी हातात घेतला. त्यांना मला पाहून बरे वाटले असावे. त्यांच्या सूनबाई, कै.सौ.सुशीलाकाकू जवळ उभ्या होत्या. ती.सौ.मामींनी लाज वाटून आपले दुखणे कुणाला सांगितलेच नव्हते. मी तपासणी केली आणि डॉक्टरांना बोलावले. ती.सौ.मामींना सांगितले, "तुम्ही लाजू नका, घाबरू नका, मी आहे इथे. तोंडावर पांघरूण घेऊन शांत झोपा." बिचाऱ्यांनी ऐकले. डॉक्टरांनी पाहिले व आम्ही हात धुवून प.पू.श्री.काकांच्या खोलीत आलो. खरंतर आम्ही काही सांगण्याची गरजच नव्हती. ती माउली आधीच सर्व जाणत होती. 
तरीही डॉक्टरांनी ती.सौ.मामींच्या आजाराची सर्व कल्पना प.पू.श्री.काकांना दिली. तेव्हा देखील किंचितही विचलित न होता प.पू.काका धीरगंभीर व शांतच बसलेले होते. मी गुडघे टेकून त्यांना नमस्कार केला. त्या परिस्थितीतही त्यांनी मला खडीसाखरेचा प्रसाद दिला व प्रेमाने पाठीवर हात ठेवला. मी खरोखर त्या दिवशी धन्य झाले. कारण ती.सौ.मामी आणि प.पू.श्री.काकांचा मला एकाच वेळी आशीर्वाद मिळाला. ती.मामींचे दुखणे जवळजवळ थर्ड स्टेजला गेले होते. त्यांना तपासायला डॉक्टरांना न सांगता प.पू.काकांनी मला सांगितले ; ह्यातच मला प.पू.काकांकडून सर्व काही मिळाले. त्यांचे कृपाशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत.
अशीच प.पू.सद्गुरु श्री.गोविंद काकांची आणखी फार सुंदर व हृद्य आठवण सांगते. प.पू.काकांच्या आणखी एक सूनबाई सौ.सुनिती वहिनी गरोदर होत्या. त्यावेळी दर महिन्याला तपासणी, महिन्याचे औषध-पाणी आणि सातव्या व आठव्या महिन्यात धनुर्वाताचे इंजेक्शन, सोनोग्राफी फाईल करणे असले प्रकार नव्हते. नऊ महिने सरले, पोटात दुखायला लागले की पेशंट दवाखान्यात भरती होत असत. त्याप्रमाणे सौ.वहिनींचे दिवस भरले, पोटात दुखू लागले. त्या हॉस्पिटलला आल्या. त्यांची तपासणी करून त्यांना भरती करून घेतले. बहुतेक रात्री बाळंतपण होईल असा आमचा अंदाज होता. दुपारची सुट्टी झाल्यावर पुन्हा चार वाजता मी पेशंट पाहिला. ठीक होते सगळे. संध्याकाळी ६ च्या सुमारास प.पू.श्री.काका स्वत: दवाखान्यात आले, खोलीत जाऊन सौ.वहिनींना त्यांनी पाहिले व डॉक्टरांची गाठ घेऊन निघून गेले. 
माझी ड्युटी संध्याकाळी सात वाजता संपत असे. माझ्या दोघी बहिणी सिंधुताई व इंदुताई मला न्यायला येत. थोडे फिरून आम्ही घरी जात असू. त्यादिवशी दोघी आल्यावर माझे काम आवरून मी डॉक्टरांना घरी जाऊ का विचारले. कारण बाळंतपणाची केस असली तर डॉक्टर स्वत: डिलिव्हरी करत. बाळंतपण करण्यात वाकबगार असणाऱ्या आया आणि डॉक्टरांच्या पत्नी देखील मदत करीत. पण त्यादिवशी डॉक्टर म्हणाले, "बाई, उपळेकर वहिनींची डिलिव्हरी तुम्ही करून जा. प.पू.श्री.काकांनीच तसे मला सांगितले आहे." प.पू.श्री.काकांनी सांगितले आहे म्हटल्यावर मी गप्प झाले व मला खूप आनंद पण झाला ! कारण हा प.पू.काकांचा माझ्यासाठी मोठा आशीर्वादच होता  
रात्री नऊच्या सुमारास उपळेकर वहिनी बाळंतीण झाल्या. मी एकटीने त्यांची डिलिव्हरी केली. डॉक्टर अजिबात तिकडे फिरकले नव्हते. नॉर्मल डिलिव्हरी झाली. मला खूप आनंद झाला. सौ.उपळेकर वहिनींना सुंदर कन्यारत्न झाले होते. नाळ कापून मी बाळाला दूर ठेवत होते, इतक्यात लेबर रूमचा बंद असलेला दरवाजा हळूच उघडला गेला. दाराच्या बाहेर स्वतः प.पू.श्री.काका, कै.श्री.निवृत्तिनाथ मेळवणे काका आणि बाळाचे बाबा उभे होते. प.पू.श्री.काका गोड हसत म्हणाले, "पौर्णिमा, पौर्णिमा !" माझ्याकडे आशीर्वादाचा हात करत प.पू.श्री.काका लगेच निघूनही गेले. सौ.वहिनी खूप आनंदाने माझा हात हातात घेऊन म्हणाल्या, "ती.काका स्वतः येऊन गेले. माझे बाळ धन्य झाले." मी वहिनींना म्हणाले "अहो, तुम्ही सगळे प.पू.काकांचेच आहात. ही तर त्यांची नात आहे. तिचे नाव तुम्ही 'पौर्णिमा'च ठेवा. प.पू.श्री.काकांचा आशीर्वाद आहे हा !" आणि विशेष म्हणजे त्या दिवशी पौर्णिमाच होती. ९ वाजता आकाशात हा सुवर्णक्षण पाहायला पूर्णचंद्रही उपस्थित होता. 
विशेष म्हणजे सौ.वहिनींची पहिली खेप असून बाळंतपण नॉर्मल झाले. बाळंतपण करायला मी एकटी. डॉक्टरांची अजिबात उपस्थिती नाही आणि बाळ जन्मल्याबरोबर साक्षात् प.पू.श्री.काका तिथे आशीर्वादाचा हात घेऊन उभे. महत्भाग्यच आहे हे !
असे हे आमचे प.पू.सद्गुरु श्री.काका आणि त्यांना मनोमन मानणारा पण उगीचच भिणारा माझ्यासारखा एक भक्त. मला प.पू.श्री.काकांबद्दल लहानपणापासूनच फार आकर्षण होते. रोज जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे असे सारखे वाटायचे. पण काही माणसांनी उगीचच त्यांच्याबद्दल आमच्या मनात गैरसमज करून दिले. दुर्दैवाने त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात भीती राहून गेली. म्हणून त्यांच्यापासून मी कायम दूरच राहिले. पण योगायोग पाहा, मी डॉ.सिधयेंकडे नोकरी करीत असताना प.पू.श्री.काका दर गुरुवारी दवाखान्यात येत असत. त्यामुळे त्यांचे दर्शन आपोआप मला होत असे. अनेक वेळा दर्शन झाले. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल भीती मात्र कायमच होती. 
एकदा मी पेशंटला इंजेक्शन देऊन ओ.पी.डी.मध्ये परतत होते. माझा उजवा पाय उंबर्‍यावर होता. त्याचवेळी अचानक प.पू.श्री.काका समोर आले आणि त्यांनी आपला उजवा पाय माझ्या उंबर्‍यावरच्या पायावर ठेवला. मी प्रचंड घाबरले. प.पू.श्री.काका म्हणाले, "घाबरू नकोस !" आणि गोड हसत माझ्या ओठावर उजवा हात ठेवून म्हणाले, "हे बंद ठेव. खूप हुशार आहेस. तुला कधी काहीही कमी पडणार नाही !" मी घाबरतच मनोमन प.पू.श्री.काकांना नमस्कार केला.
गंमत म्हणजे मी डॉ.सिधयेंच्यात नोकरी करत होते तेव्हा आणि नंतर माझ्या भावाच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होते तेव्हाही, माझ्या हातून सर्व नॉर्मल बाळंतपणेच झाली. कधीच कोणतीही केस क्रिटिकल झाली नाही. आजही जुने पेशंट आपल्या लेकीसुनांना घेऊन तपासण्यासाठी येतात, सल्ला घेतात. ही सर्व प.पू.श्री.काकांचीच कृपा आहे, त्यांच्याच आशीर्वादांचे फळ आहे. त्यामुळे आज मला काहीही कमी नाही, आम्ही सुखात आहोत. 
मी स्वतःला आणि आमच्या घराण्याला खूप भाग्यवान समजते. पू.श्री.काकांचे पुतणे कै.श्री.श्रीपादराव उपळेकर यांची पत्नी कै.सौ.मालतीबाई उपळेकर या माझ्या चुलत बहीण होत्या. अशाप्रकारे प.पू.श्री.काकांशी आमचे नातेही होते. आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद देखील आम्हांला सदैव मिळाले व आजही मिळत आहेत !
- बेबीताई गणेश देशपांडे, फलटण.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment