6 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ३



प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

माझ्या आईला, कै.नलिनी देशपांडे हिला प.पू.श्री.काकांच्या दर्शनाची आवड होती. ती नेहमी त्यांच्या दर्शनाला जात असे. त्यामुळे महद् भाग्याने मलाही वयाच्या दहाव्या वर्षापासून प.पू.श्री.काकांचे दर्शन लाभत आलेले आहे. त्यावेळी त्यांच्या हातून खडीसाखरेचा प्रसाद आणि आशीर्वाद कायमच मिळायचे. त्यांच्याच दिव्य आशीर्वादांमुळे आज मी समाधानात आहे.
प.पू.श्री.काकांचा मला आलेला एक विशेष अनुभव येथे सांगत आहे. मी त्यावेळी अठरा वर्षाचा होतो. फलटणवरून जाऊन येऊन रोज बारामतीच्या टी.सी.कॉलेजमध्ये मी प्री-डिग्री कॉमर्स करत होतो. फलटणच्या ब्राह्मण आळीतील प.पू.दादामहाराज देशपांडे (ग्वाल्हेरकर) यांच्या वाड्यात आम्ही त्यावेळी राहात होतो. श्रीसंत हरिबुवा महाराजांवर आमच्या घराण्याची अतीव श्रद्धा होती. त्यामुळे रोज सकाळी मी सायकलवरून श्रीसंत हरिबुवा महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनाला जात असे. माझ्या वडिलांना १९७३ साली देवाज्ञा झाली होती आणि आमची परिस्थिती त्यावेळी अगदीच हलाखीची होती.
तो दिवस १९७४ सालच्या फेब्रुवारी महिन्याचा पहिला रविवार असावा. नेहमीप्रमाणे अकराच्या दरम्यान मी श्रीसंत हरिबुवा महाराजांच्या मंदिरात दर्शनास गेलो. मी गाभार्‍यात प्रवेश केला आणि मला प.पू.श्री.काका समाधीच्या मागे असलेल्या श्रीसंत हरिबुवा महाराजांच्या मूर्ती जवळ उभे असलेले दिसले. प.पू.श्री.काकांच्या बरोबर आलेल्या एकाने मला समर्थ मिठाई केंद्रातून पावशेर पेढे आणण्यासाठी पैसे दिले. मी लगेच सायकलवरून जाऊन पेढे घेऊन आलो. प.पू.श्री.काकांनी स्वत: सद्गुरु श्री.हरिबुवा महाराजांच्या समाधीस पेढ्याचा नैवेद्य दाखवला. त्यातला एक पेढा मला त्यांनी स्वहस्ते प्रसाद म्हणून दिला. मी त्यांना मनोभावे नमस्कार केला. हेच मला झालेले प.पू.श्री.काकांचे शेवटचे दर्शन ठरले. त्यानंतर काही महिन्यांनी, दि.८ ऑक्टोबर १९७४ रोजी प.पू.श्री.काकांनी समाधी घेतली.
खरोखर त्या प्रसाद पेढ्याने आमच्या आयुष्यात प्रचंड बदल झाले. त्यांच्या त्या अमोघ आशीर्वादांमुळे, खायची भ्रांत असलेल्या परिस्थितीतून सुधारणा होत होत आज अत्यंत समाधानी आणि सधन आयुष्य आम्ही व्यतीत करीत आहोत. हा नि:संशय प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज यांचाच कृपाप्रसाद आहे !
प.पू.काकांच्याच कृपेने आता बँकेतून निवृत्त झाल्यावर मला श्री ज्ञानेश्वरीच्या व संतवाङ्मयाच्या अभ्यासाची इच्छा व गोडी निर्माण झाली आहे. प.पू.श्री.काकांच्या 'श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनी'चे जे अध्याय पीडीएफ स्वरूपात नेटवर उपलब्ध करून दिलेले आहेत, ते मी डाऊनलोड करून त्यांचा अभ्यास करू लागलो आहे. त्यांच्या कृपेने आता या अभ्यासातही गती आणि आनंद लाभावा हीच सप्रेम प्रार्थना करून, प.पू.श्री.उपळेकर काकांच्या श्रीचरणीं विनम्र दंडवत घालतो !
- श्री.बजरंग देशपांडे, पुणे.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment