आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- २
आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- २
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह
सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे आमच्या घरावर कृपाछत्र आहे. त्यांच्या कृपादृष्टीचे अनेक अनुभव आम्हां सर्वांना नेहमीच येत असतात. माझ्या आई-वडिलांचे अनुभव मी येथे कथन करीत आहे.
साधारण १९७० सालची ही गोष्ट आहे. माझे वडील कै.श्री.मल्हारराव रामचंद्र घाडगे हे फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यात रोखपाल (cashier) म्हणून काम करीत होते. ते नेहमी श्री ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनाला जायचे. तेव्हा शेजारीच राहात असलेल्या प.पू.श्री.काकांचेही दर्शन आवर्जून घ्यायचे. त्यावेळी आमची परिस्थिती तशी खूप बेताचीच होती. आम्ही तीन बहिणी, दोन भाऊ व आईवडील असे सात जणांचे कुटुंब होते. कसातरी खर्च भागत असे. वडिलांना सारखे वाटायचे, मुलांच्या शाळेचा खर्च भागला पाहिजे, घरात सर्व काही सुव्यवस्थित हवे, तेव्हा चालू नोकरी बरोबरच मला अजून दोन ठिकाणी नोकरी केली पाहिजे, तरच सर्वांचे व्यवस्थित चालेल.
अशा विचारांच्या ओघातच एकेदिवस ते प.पू.श्री.काकांच्या दर्शनाला गेले. तेव्हा प.पू.श्री.काका या पाटावरून त्या पाटावर जात हरिपाठ म्हणत होते. माझ्या वडिलांनी दर्शन घेतल्यावर प.पू.श्री.काकांनी एक मोठे हरिपाठाचे पुस्तक दिले व दोन पेढे त्यांच्या हातावर ठेवले. माझ्या वडिलांनी, ती.तात्यांनी घरी येऊन खूप आनंदाने ही गोष्ट ती.आईला सांगितली. आपल्या मनात चालू असलेल्या विचारांसाठी ही गोष्ट त्यांना खूपच पूरक वाटली, जणू प.पू.श्री.काकांचा आशीर्वादच मिळाला असे त्यांना मनोमन जाणवले.
प.पू.श्री.काकांनी दोन पेढे व हरिपाठाचे पुस्तक दिल्यानंतर माझ्या वडिलांना फलटण येथील श्रीसंत हरिबाबा महाराज मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात सेक्रेटरी म्हणून दुसरी नोकरी लागली. त्याशिवाय श्रीदेव मारुती मंदिर येथेही सेक्रेटरी म्हणून अजून एक काम लागले. त्यांनी खूप वर्षे प्रामाणिकपणे या सर्व नोकऱ्या केल्या. प.पू.श्री.काकांच्या अमोघ आशीर्वादांमुळे कसलीही अडचण न येता आमचे सर्वांचे शिक्षण वगैरे नीट होऊन अगदी भले झाले.
प.पू.श्री.काकांची सहज कृती किती सूचक होती पाहा. हरिपाठाचे पुस्तक दिले ; पहिली नोकरी श्री हरिबाबा मंदिरातच लागली. दोन पेढे दिले ; त्यांना खरोखर दोन जास्तीच्या नोकऱ्या लागल्या. पेढेच दिले याचा अर्थ समाधान लाभेल, सर्वकाही गोड होईल. प.पू.श्री.काकांसारख्या अवधूतावस्थेतील अवलिया संतांचे सहज वागणे-बोलणे देखील अतिशय सूचक व नेटके असते !
माझी आई श्रीमती सुमन मल्हारराव घाडगे रोज प.पू.श्री.उपळेकर काकांच्या मंदिरात दर्शनाला जात असे. पुण्यतिथी सप्ताहातील श्री ज्ञानेश्वरी पारायणालाही बसत असे. १९९२ साली एकेदिवशी समाधीचे दर्शन घेऊन ती मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या, प.पू.श्री.काकांच्या घराशेजारच्या एका तगरीच्या झाडाची फुले तोडायला गेली. त्या झाडाखाली एक मोठा चौकोनी दगड होता. त्या दगडावर ती चढली व फुले तोडत असताना, एकदम तोल जाऊन त्या दगडावरून खाली पडली. त्या धक्क्याने तिचा हात खांद्यापासून खाली आला, निखळला. निखळलेल्या हाताचे दुखणे खूपच असह्य असते. ती घाबरून जाऊन जोरात ओरडली ; "काका, मला वाचवा !" आश्चर्य म्हणजे त्याक्षणी तिचा निखळलेला हात स्वतःचा स्वत:च एकदम खटकन् आवाज होऊन जागेवर बसला. निखळलेला हात आपला आपण कधीही बसू शकत नाही, तो दुसऱ्या जाणकाराने विशिष्ट प्रकारे जोर देऊन बसवावा लागतो. पण त्यावेळी तिथे माझी आई एकटीच होती, आसपास कोणीही नव्हते.
मुळात तिचा स्वभाव अतिशय भित्रा पण खूप श्रद्धाळू होता. त्यामुळे प.पू.श्री.काकांनीच स्वतः तिचा हात बसवला यात काहीच शंका नाही. तसेही प.पू.श्री.काका डॉक्टरच तर होते ना ! हा खूप मोठा चमत्कार प.पू.श्री.काकांच्या कृपेने आम्हांला अनुभवायला मिळाला. तिने लगेच घरी येऊन सांगितले की ; "प.पू.श्री.काकांनीच माझा हात बसवला !" त्या प्रसंगानंतर तिच्या हाताला कुठेही सूज वगैरे आली नाही किंवा दुसरा काहीच त्रासही झाला नाही.
मी आणि माझी बहीण सुवर्णा मल्हारराव घाडगे दोघीही प.पू.श्री.काकांचे नेहमी स्मरण करतो, वेळ होईल तसे समाधी मंदिरात दर्शनालाही जातो. प.पू.श्री.काकांसारख्या थोर महात्म्यांचे आपल्यावर कृपाछत्र आहे, त्यांची कृपादृष्टी आहे, याचे समाधान अवर्णनीयच असते !
- श्रीमती मंगला शिवाजी पवार, फलटण.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
0 comments:
Post a Comment