28 Jun 2016

*** लागला टकळा पंढरीचा *** ‪#‎साठवणीतीलवारी‬ - १

*** लागला टकळा पंढरीचा ***
उन्हाळ्याची आग ओकणारी झळ निसर्गचक्रानुसार जसजशी कमी होऊ लागते, तसतसे ज्येष्ठ महिन्यात आकाशात एक दोन चुकार ढगही दिसू लागतात. अगदी त्याच सुमारास एक हवीहवीशी वाटणारी भावपूर्ण आठवण मनात गर्दी करू लागते. होय, वारीचीच आठवण ती !
रिमझिमत्या पावसात माउलींसंगे होणारी पंढरीची वारी खरोखरीच अवर्णनीय आहे. शब्दांनी कधी तिचे वर्णनच होऊ शकत नाही. तो डोळे मिटून हृदयाच्या गाभ्याने अनुभवायचा विषय आहे. म्हणून तर संतश्रेष्ठ श्रीतुकोबाराय म्हणतात, " पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ॥ "
मोठ्या भाग्याने माझा जन्म भगवान श्रीमाउलींच्या वाटेवरच्या फलटण गावातील उपळेकरांच्या घरात झाला. पूजनीय डॉ. गोविंदकाका उपळेकर महाराजांचे कृपाशीर्वाद लाभून पावन झालेले हे घराणे, त्यात घरासमोरच श्रीमाउली आणि पू. काकांची मंदिरे, त्यामुळे सोन्याला सुगंधच म्हणायचा तो. वारीच्या वाटेवर गाव असल्याने नकळत वारीचा संस्कार मनात दृढावला, अगदी कळतंय तेव्हापासूनच. मला आठवतंय, आमच्या फलटणच्या घडसोली मैदानावरच माउलींच्या पालखीचा मुक्काम असे. त्यावरच आमची शाळा पण होती. मी आईबरोबर दर्शनाला जायचो. बुटका असल्याने पालखीपर्यंतही हात पोचत नसे. मग मला माउलींची पालखी ठेवलेल्या टेबलावर कोणीतरी उचलून ठेवी. मग मी बरोबर आणलेली घरच्या झाडांची तगरीची फुले, बेल व तुळशी मनसोक्त माउलींच्या श्रीचरणपादुकांवर वाहत असे आणि त्या पादुकांवर डोके टेकवून नमस्कार करीत असे. कसला अद्भुत आनंद दाटत असे मनात, काय सांगू? माउलींच्या पादुकांवर कितीही वेळा डोके ठेवले तरी मन आजही भरत नाही, कमीच वाटते ते. त्या लहान वयात, माउलींच्या फलटणमधील एक किंवा दोन दिवसांच्या मुक्कामात मला किती वेळा त्यांचे दर्शन घ्यायला मिळाले, हे फार अभिमानाने मी सगळ्यांना सांगत असे.
गंमत म्हणजे पालखी येण्याच्या दोनतीन दिवस आधीपासून मी तगरीच्या झाडाजवळ अनेकवेळा जाऊन किती कळ्या आल्यात ते पाही. झाडाला भरपूर फुले येऊ देत म्हणून सांगत पण असे. आज मागे वळून पाहताना जाणवतंय की, ते झाड तेव्हा नक्कीच माझ्या विनवणीला प्रतिसाद देऊन भरभरून फुलत असले पाहिजे. आज ते झाड नाही, पण वारी आली की त्याची आठवण हटकून होतेच मला. बहुदा या आठवणीद्वारे ते झाड आजही आपली फुले माउलीचरणीं अर्पून सुखी होत असावे. " वारी चुको नेदी हरि । " ही त्याचीही धारणा असेलच की !
वारीचे, दिंडीचे आणि भजनाचे एक आगळे प्रेम मला कायम वाटत आले आहे. वारीचे दिवस जवळ आले की बऱ्याचवेळा मला कुठूनतरी टाळमृदंगाचा आवाज ऐकू येतोय असा भास होई. असा आवाज आला की, मी हातातले सगळे सोडून त्या आवाजाच्या दिशेने धावत जात असे. आजही माझी ही आवड जशीच्या तशी टिकून आहे. दिंडीत रंगून भजन करणारे वारकरी पाहणे हा माझ्यासाठी फार मोठा स्वर्गीय आनंद असे. एकदा प्राथमिक शाळेतील दुसरीच्या वर्गात सर शिकवत असताना असा आवाज आला म्हणून मी धावत वर्गाबाहेर आलो होतो दिंडी पाहायला, हे मला आजही लख्ख आठवते.
वारी हा माझ्या हृदयीचा चिरंतन आनंदठेवा आहे. त्याची नुसती आठवणही मला तत्काळ त्या वारीचा सुखद अनुभव देते, अगदी कुठेही असलो तरी. भगवान श्रीमाउलींच्या कृपेने सलग अकरा वर्षे वारीत मी अतिशय हृद्य आणि चिरस्मरणीय प्रसंग अनुभवलेले आहेत. सर्व प्रसंगांवर लिहायचे ठरवले तर नक्कीच पुस्तक तयार होईल. पण या वर्षी त्यातील काही भावपूर्ण स्मृतिचित्रांचे तुम्हां सुहृदांसाठी प्रदर्शन मांडण्याची व त्याद्वारे स्मृतिकुपीतले तेच आनंदप्रसंग पुन्हा पुन्हा भरभरून अनुभवण्याची मला मनापासून इच्छा होत आहे. माझ्या या कथनात वारंवार माझा ' मी ' येईल, पण तो अहंकाराने नाही, केवळ सांगणा-याच्या भूमिकेतून येईल, हे कृपया ध्यानात घ्यावे, ही नम्र विनंती.
१९८९ साली, मी आठ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी पशुखाद्य बनविण्याचा कारखाना तांबमाळावर सुरू केला. त्याच्या शेजारीच फलटण दूधसंघ होता. त्याचे चेयरमन श्री. सुभाषराव शिंदे होते. सद्गुरु श्रीमाउलींचा दिव्य पालखी सोहळा याच रस्त्यावरून फलटणकडे जात असल्याने, दूधसंघाच्या वतीने वारक-यांना मोफत सुगंधी दूध वाटप, माउलींच्या पालखीवर पुष्पवृष्टी व पूजा होत असे. बहुदा त्याच वर्षीपासून मी देखील दूधसंघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागलो. रथावर चढून पूजा देखील करीत असे मी त्यावेळी. मी वयाने बराच लहान असल्याने सर्वांना माझे तेव्हा खूप कौतुक वाटे व त्यामुळेच मलाही सगळीकडे फर्स्ट प्रेफरन्स मिळत असे, जो मला तेव्हा हवाच असे. अशाच एका वर्षी काढलेला फेटा वगैरे बांधलेला माझा बालपणीचा फोटो अमित मुजुमदार व जाई हुबळीकर या माझ्या बालमित्रांनी आवर्जून मला गेल्या वर्षी पाठवला. तो फोटो पाहिल्याबरोबर माझे मन पुन्हा त्या स्मृतिकक्षात जाऊन बसले आणि वारीचे शेकडो प्रसंग चित्रपटासारखे डोळ्यांसमोरून झरझर जाऊ लागले. त्यातलेच काही " #साठवणीतीलवारी " या लेखमालेतून तुम्हां सर्वांसाठी आणि खरेतर स्वांत:सुखाय मांडत आहे.
वारीची आठवण जरी झाली ना, तरी आपले मन, पावसाच्या आगमनाने हरखून गेलेला आणि भारदस्त पिसारा फुलवून मस्तीत नाचणारा मोरच होऊन जाते. ज्याने वारी केलेली आहे ना, त्यालाच यातला खरा आनंद कळणार. माउलींच्या छत्रछायेत पंढरीची वाट चालणे, हा फार फार अद्भुत सोहळा असतो. ज्ञानियांचा राजा, कैवल्यसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट ' माउली ' होऊन वारीच्या वाटेवर तुम्हां आम्हां सर्वसामान्य वारक-यांसोबत चालतो, आपले सुखदु:ख समजून घेऊन, मायेची फुंकर मारून आपल्याला गोंजारतो आणि भरभरून प्रेमकृपादान देऊन आपले अवघे जीवनच भारून टाकतो. हा दैवी सुखानुभव कोणत्या शब्दांत सांगता येईल बरे? शब्दांच्या कुबड्या, हो कुबड्याच त्या, त्यांचा काहीही लाभ होत नाही या वारीच्या वाटेवर. इथे फक्त नि:शब्द अनुभूतीच बोलते, ती देखील एका अगम्य वाणीत, जी फक्त वारीवर जीवापेक्षा जास्त प्रेम करणारा सच्चा वारकरीच समजून घेऊ शकतो !
आज मायमाउली जगज्जीवन सद्गुरु श्रीज्ञानोबारायांच्या पालखीचे प्रस्थान, म्हणजे वारीच्या अद्भुत, अलौकिक आणि अतुलनीय आनंदसोहळ्याची सुरुवात. चला तर, आपणही श्रीमाउलींच्या या प्रेमरसात चिंब चिंब भिजून अखंड आनंदमय होऊया !! ( क्रमश:)
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.in

14 Jun 2016

ते त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पांडुसुता



आज गंगा दशहरा ! भगवती श्रीगंगेच्या अवतरणाचा दिवस. आजच्या पावन तिथीला हस्त नक्षत्र, व्यतिपात योग, मंगळवार या योगावर भगवती श्रीगंगेचे पृथ्वीतलावर अवतरण झाले. म्हणून ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून आज दशमी पर्यंत " गंगा दशहरा " महोत्सव साजरा करून आजच्या दिवशी गंगास्नान करून गंगापूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. गंगा दशहराच्या दहा दिवसात गंगेचे स्मरण, पूजन, वंदन, स्नान आणि स्तुती केल्याने दहा प्रकारची कायिक, वाचिक आणि मानसिक पापे नष्ट होतात.
भगवान श्रीमाउली म्हणतात,
कां गौतमाचेनि मिषें ।
कळिकाळ ज्वरितोद्देशें ।
पाणिढाळ गिरीशें ।
गंगेचा केला ॥
ज्ञाने.१८.७८.१६८९॥
गौतम ऋषींकडून चुकून गोहत्या झाली, त्याचे प्रायश्चित्त म्हणून इतर ऋषींनी त्यांना गंगेला पृथ्वीवर आणण्याची आज्ञा केली. गौतमांनी भगवान शिवांना प्रसन्न करून परमपावनी गंगा पृथ्वीवर आणली. त्यावेळी खरेतर कळिकाळरूपी तापाने आजारी पडलेल्या सर्व जीवांच्या कळवळ्याने भगवान शिवांनी गौतमांचे निमित्त करून गंगा पाठवली, असे श्रीमाउली म्हणतात.
गंगेच्या स्नान, दर्शन, स्मरण, वंदन, पूजन, तीर्थपान आणि स्तवन या सात प्रकारच्या उपासनेने सुख-समाधान तर लाभतेच पण दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. भगवान श्रीमाउली म्हणतात,
जोडे अमृताची सुरसरी ।
तैं प्राणांतें अमर करी ।
स्नाने पाप ताप वारी ।
गोडीही दे ॥
ज्ञाने.१७.१५.२१९ ॥
गंगेच्या सेवेने हरिभक्तीची खरी गोडी, आवडही निर्माण होते, असा या ओवीत श्रीमाउलींचा गर्भित अभिप्राय आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे.
जगन्नाथ पंडितांची ' गंगालहरी ' आणि आद्य शंकराचार्यांची दोन गंगास्तोत्रे फार प्रसिद्ध आणि सुंदर आहेत. या दशहरा महोत्सवात यांचे पठण करण्याची पद्धत आहे.
भगवती गंगा ही अत्यंत परोपकारी आहे. भगवान माउली " गंगा काजेवीण चाले " अर्थात् ती पूर्णपणे नि:स्वार्थपणे वाहते, असे म्हणतात. तिच्यात स्नान करणा-यांचे पाप-ताप ती नष्ट करते, पूजन करणा-यांना पुण्य प्रदान करते आणि समाधान देते. या तिच्या उपकारांमागे तिचा कोणताच स्वार्थ नाही की अन्य उद्देश नाही. म्हणूनच गंगेला आपण पूजनीय माता, देवता म्हणतो, गंगामैया म्हणतो. तिला फक्त कल्याणच करणे माहीत आहे. केवळ स्नान, पूजनच नाही, तर नुसते स्मरण केले तरी तेच फळ लाभते. यासाठी आपल्याकडे लहानपणीपासूनच अंघोळीचा पहिला तांब्या अंगावर घेतला की " हर गंगे भागीरथी " असे म्हणायला शिकवले जात असे. आजच्या पिढीलाही हे शिकवायलाच पाहिजे.
गंगा भारतीयांच्या मनी-मानसी अशी स्थिरावलेली आहे, आपले अंगांग व्यापून राहिलेली आहे. त्यामुळे आपल्या साध्या साध्या उपमांमध्येही गंगेचा संदर्भ येतोच. " झाले गेले गंगेला मिळाले " हे एक उदाहरण. गंगेला मिळाले म्हणजे साजरे झाले किंवा सार्थक झाले, वाया नाही गेले, अशी आपली त्यामागची भावना असते.
या परमपावनी पुण्यसरितेची स्तुती करताना भगवान श्रीमाउली म्हणतात,
कां फेडीत पाप ताप ।
पोखित तीरींचे पादप ।
समुद्रा जाय आप ।
गंगेचें जैसें ॥
ज्ञाने.१६.३.१९९ ॥
लोकांचे पाप-ताप फेडीत, तीरावरच्या वृक्षांचे पोषण करीत गंगेचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. " म्हणूनच जगाच्या कल्याणा भगवंतांची गंगा विभूती " असे आपण आदराने, प्रेमाने म्हणून गंगामैयाच्या चरणीं नतमस्तक होऊया !!
भगवान महाविष्णूंनी बळीराजाच्या उद्धारासाठी श्रीवामन अवतार धारण केला. त्यावेळी बळीच्या यज्ञशाळेत प्रकट होताना त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने ब्रह्मांडाचे कवच भेदले गेले आणि ब्रह्मांडाच्या बाहेरची जलधारा त्यांच्या चरणांना स्नान घालून आत आली. त्यांच्या चरणांवर लावलेल्या केशरामुळे तिचा रंग लाल झाला. हीच ती त्रिलोकपावनी भगवती गंगा होय. तिलाच ' भगवत्पदी / विष्णुपदी ' देखील म्हणतात. या धारेचा नुसता स्पर्श जरी झाला तरी संसारातील सर्व पापे नष्ट होतात.
राजा भगीरथाने आपल्या शापाने मृत झालेल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी प्रचंड तपश्चर्या करून भगवान श्रीशिवांना प्रसन्न करून घेऊन गंगा पृथ्वीतलावर आणली. त्यामुळे तिला ' भागीरथी ' असेही म्हणतात. पुढे एकदा जन्हू ऋषींचा यज्ञ गंगाप्रवाहात सापडला. त्यामुळे त्यांनी आपल्या तपोबलाने हा गंगाप्रवाह संपूर्ण गिळून टाकला. नंतर त्यांची मांडी फाडून ती पुन्हा प्रकट झाली. त्यामुळे जन्हूंची कन्या म्हणून तिचे नाव ' जान्हवी ' असे पडले.
या भगवती गंगेच्या पावन जलाला, भक्तश्रेष्ठ ध्रुव, सप्तर्षी, सनकादिक महात्मे , ' तपश्चर्येची आत्यंतिक फलश्रृती ' म्हणून मस्तकी धारण करतात. ही गंगानदी स्वर्गलोकातून मग हिमालयावर उतरून भारतवर्षाला पावन करीत समुद्राला जाऊन मिळते. सर्वश्रेष्ठ तपोनिधी भगवान शिवशंकर देखील , आपल्या आराध्य भगवान श्रीविष्णूंचे चरणोदक म्हणून या गंगामातेला नित्य आपल्या मस्तकावर धारण करतात. म्हणून भगवान श्रीमाउली आदिनाथ भगवान शिवांचा गौरव करताना म्हणतात की,
करितां तापसांची कडसणी ।
कवण जवळां ठेविजे शूळपाणि ।
तोही अभिमान सांडूनि पायवणी ।
माथां वाहे ॥
ज्ञाने.९.२५.३७२ ॥
तपश्चर्या म्हणावी तर शिवशंकरांच्या तोडीचा दुसरा कोणी नाही जगात, पण तेही अतीव प्रेमादराने आपल्या देवाचे चरणतीर्थ म्हणून गंगामैयाला मस्तकी धारण करतात. आपल्याकडे प्रत्येक जलस्रोताला गंगाच म्हणण्याचा प्रघात आहे. आम्हां भारतीयांच्या हृदयी गंगेचे जे अनन्यसाधारण स्थान जन्मजात दृढ झालेले आहे, त्याचेच हे द्योतक आहे. आम्हां भारतीयांसाठी गंगामैया ही केवळ नदी नाही. ती आमची पूजनीय देवता, आमची जीवनरेखा आहे. तिच्या नुसत्या सप्रेम स्मरणानेही आमची पापे नष्ट होतात अशी आमची अढळ श्रद्धा आहे. म्हणूनच मृत्युसमयी तिच्या तीर्थाचा एक थेंब तरी पोटात जावा यासाठी आम्ही भारतीय धडपडतो.
भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचेही गंगामैयावर नितांत प्रेम आहे. म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी गंगेसंबंधी अतिशय सुंदर उपमा दिलेल्या आहेत. आज आपण माउलींच्या काही निवडक मनोहर उपमांचा वापर करून या लेखाच्या माध्यमातून भगवती श्रीगंगेची ' शब्दपूजा ' बांधून हरिपदपाद्य गंगातीर्थाने पुण्यपावन होत आहोत.
भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंनी गीतेच्या दहाव्या अध्यायात आपल्या पंच्चाहत्तर विभूती सांगितलेल्या आहेत. त्यात ते सर्व वाहणा-या ओघांमध्ये गंगा ही माझी विभूती आहे असे म्हणतात.
भगवान श्री माउली त्यावर भाष्य करताना म्हणतात,
पैं समस्तांही वोघां - ।
मध्यें जे भगीरथें आणिली गंगा ।
जन्हूनें गिळिली मग जंघा - ।
फाडूनि दिधली ॥
ज्ञाने. १०.३१.२५६ ॥
ते त्रिभुवनैकसरिता ।
जान्हवी मी पांडुसुता ।
जळप्रवाहा समस्तां - ।
माझारीं जाणें ॥ २५७ ॥
समस्त जळ प्रवाहांमध्ये, राजा भगीरथाने मोठी तपश्चर्या करून आणलेली आणि राजा जन्हूने गिळून आपली मांडी फाडून बाहेर काढलेली, स्वर्ग-मृत्यू-पाताळ अशा तिन्ही लोकांना पावन करणारी भगवती गंगा ही माझीच विभूती जाण, असे भगवंत अर्जुनाला सांगतात.
" गंगावतरण " ही नुसती कथा नाही. त्यात गूढ योगार्थही आहे. त्यावर भाष्य करताना प. पू. श्री. शिरीषदादा कवडे आपल्या ' साधनजिज्ञासा ' या ग्रंथात म्हणतात, " गंगेच्या अवतरणाचे जे हे प्रतीक आहे ते सद्गुरुतत्त्वाचेच कार्य-रूपक आहे. श्रीभगवंतांच्या चरणांतून निघालेली त्यांची कृपाशक्तिरूपी गंगा हीच ते शिवरूप सद्गुरुतत्त्व धारण करते; आणि तेथून मग ती लोकांच्या पापक्षालनासाठी प्रवाहित होते.
भगवान शिवांनी त्या मूळ कृपाशक्तीचा ओघ लीलया धारण केलेला असतो; व त्यासाठी ते सद्गुरूच केवळ समर्थ असतात. श्रीभगवंतांच्या चरणांपासून ती शक्ती भगवान शिवांपाशी येते. ती त्यांच्या जटेत जाऊन नंतर त्यांच्या हृदयात प्रकटते; आणि त्यांच्या हृदयातून निघून ती सर्व प्राणिमात्रांचे कल्याण करते. गंगावतरणाचे हे रूपक श्रीसद्गुरुतत्त्वाचे रहस्य आहे व हीच शक्तिपात दीक्षेचीही एक निगूढ पद्धत देखील आहे  !"
आज मंगळवार, हस्त नक्षत्र व दशमी या गंगा दशह-याच्या  पर्वावर श्रीगंगामैयाच्या पुण्यपावन स्मरणात तिच्या चरणीं नतमस्तक होऊया आणि मनानेच तिचे स्नान करून, भगवान श्रीशंकराचार्य आपल्या गंगास्तोत्रात जी प्रार्थना करतात की, " हरिहराद्वैतात्मिका शाश्वत भक्ती आमच्या हृदयात हे गंगे, तुझ्या कृपेने प्रकट होऊन स्थिर होवो व तुझ्या तीरावरच हरिस्मरणात शेवटचा श्वास घेऊन माझा देहपात होवो, " तीच मनोभावे व्यक्त करून, ' जयगंगे जय मातर्गंगे जय जय जान्हवी करुणापाङ्गे ' असा गजर करून पावन होऊया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

10 Jun 2016

* श्रीस्वामीकृपेचे खणखणीत नाणे : श्रीआनंदनाथ महाराज *



राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या प्रभावळीत फार फार मौल्यवान रत्ने, श्रीस्वामीकृपेनेच लाभलेल्या अपार तेजाने तळपताना दिसतात. या अनर्घ्य रत्नांपैकी, एक अलौकिक विभूतिमत्व म्हणजेच, सद्गुरु श्रीआनंदनाथ महाराज हे होत.
श्रीआनंदनाथ महाराज हे तळकोकणातील वालावल गांवचे, म्हणून त्यांचे नाव पडले वालावलकर. पुढे ते वेंगुर्ले कॅम्प परिसरात स्वामी महाराजांचे मंदिर बांधून राहू लागले. तिथेच त्यांनी १९०३ साली आजच्याच तिथीला, ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला जिवंत समाधी घेतली. त्यांची आज ११३ वी पुण्यतिथी आहे.
श्रीस्वामी महाराजांची कीर्ती ऐकून श्रीआनंदनाथ महाराज अक्कलकोटी दर्शनासाठी निघाले. इकडे श्रीस्वामीमाउलीलाही आपले लाडके लेकरू कधी एकदा भेटते असे झाले होते. म्हणून श्रीस्वामीराज महाराज स्वत:च अक्कलकोटाबाहेर येऊन एका झाडावर वाट पाहात बसले होते. श्रीआनंदनाथ महाराज नेमके तेथेच येऊन जरा विसावले. झाडावरून उडी टाकून श्रीस्वामीराजांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना खूण दाखवली. आपली साक्षात् परब्रह्ममाउली समोर उभी राहिलेली पाहून श्रीआनंदनाथांनी गहिवरून त्यांचे श्रीचरण हृदयी कवटाळले. श्रीस्वामीरायांनीही आपल्या जन्मजन्मांतरीच्या या लाडक्या निजदासाच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून पूर्ण कृपादान केले. तसेच तोंडातून कफाचा बेडका काढून त्यांच्या ओंजळीत टाकला. त्या बेडक्यात इवल्याशा श्रीचरणपादुका स्पष्ट दिसत होत्या. हेच श्रीस्वामीमहाराजांनी श्रीआनंदनाथांना प्रसाद म्हणून दिलेले ' आत्मलिंग ' होय. आजही ते दिव्य आत्मलिंग वेंगुर्ले येथे नित्यपूजेत असून दर गुरुवारी भक्तांना त्याचे दर्शन मिळते.
श्रीआनंदनाथांनी जवळपास सहा वर्षे अक्कलकोटात श्रीस्वामीसेवेत व्यतीत केली व नंतर श्रीस्वामीआज्ञेने ते प्रचारार्थ बाहेर पडले. येवल्याजवळ सावरगांव येथेही त्यांनी आश्रम स्थापन केला. मात्र पुढे ते वेंगुर्ले येथेच स्थायिक झाले.
श्रीआनंदनाथ महाराज हे सिद्धहस्त लेखक व कवी होते. त्याच्या श्रीस्वामी महाराजांवरील अप्रतिम रचना ' स्तवनगाथा ' मधून प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे " श्रीगुरुस्तवन स्तोत्र " तर असंख्य स्वामीभक्तांच्या नित्यपठणात आहे. त्यांनी रचलेला श्रीस्वामीपाठ देखील प्रासादिक असून स्वामीभक्तांनी नित्यपठणात ठेवावा, इतका महत्त्वाचा आहे. श्रीआनंदनाथ महाराजांवर श्रीस्वामी समर्थ महाराजांची पूर्णकृपा असल्याने त्यांचे सर्व वाङ्मय प्रासादिक, महिमाशाली व अतीव मधुर आहे.
शिर्डीच्या श्रीसाईबाबांना सर्वप्रथम, जगासमोर आणण्याची श्रीस्वामीरायांची आज्ञा श्रीआनंदनाथांनी पूर्ण केली. साईबाबा हा साक्षात् हिरा आहे, हे त्यांनीच प्रथम लोकांना दाखवून दिले.
श्रीआनंदनाथांचा स्तवनगाथा फार सुरेख, भावपूर्ण आणि स्वामीस्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारा आहे. आज त्यांच्या पावनदिनी त्यातील काही रचना आपण मुद्दाम अभ्यासूया. आपल्या दोन हजारांहून जास्त अभंगरचनांमधून त्यांनी श्रीस्वामीस्वरूप व श्रीस्वामीनामाचे अलौकिक माहात्म्य सुरेख, भावपूर्ण आणि मार्मिक अशा शब्दांत स्पष्ट करून सांगितलेले आहे. त्यांच्या अपार प्रेमाने भारलेल्या या रचना वाचताना आपल्याही अंत:करणात स्वामीप्रेम दाटून येते व हेच त्यांना अपेक्षितही होते. " श्रीस्वामी पवाडा गाण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे, " हे ते वारंवार सांगतात. त्यांच्या दिव्य  रचना आज शतकापेक्षाही जास्त काळ झाला तरी स्वामीभक्तांच्या ओठी रंगलेल्या आहेत, हीच त्यांच्या अद्भुत स्वामीसेवेची पावती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
श्रीस्वामी महाराजांच्या विलक्षण अवताराचे माहात्म्य सांगताना ते म्हणतात,
अक्कलकोटीचा व्यवहारी ।
केली कलीवरी स्वारी ॥१॥
पायी खडाव गर्जती ।
भक्तवत्सल कृपामूर्ती ॥२॥
दंड कमंडलु करी ।
आला दासाचा कैवारी ॥३॥
कटी कौपीन मेखला ।
ज्याची अघटित हो लीला ॥४॥
करी दुरिताचा नाश ।
नामे तोडी माया पाश ॥५॥
आनंद म्हणे श्रीगुरुराणा ।
आला भक्ताच्या कारणा ॥११४.६॥
अक्कलकोटातील लीलावतारी श्रीस्वामीब्रह्म हे कलियुगावर स्वारी करण्यासाठी आलेले आहेत. पायी खडावा, हाती दंड कमंडलू घेणारी ही भक्तवत्सल कृपामूर्ती दासांचा कैवार घेण्यासाठीच आलेली आहे. कटी कौपीन धारण करणारे हे साक्षात् दत्तदिगंबर अत्यंत अघटित लीला करीत भक्तांचा सांभाळ करतात, त्यांचे भक्तिप्रेम आस्वादतात. श्रीस्वामीनामाच्या निरंतर उच्चाराने सर्व पापे नष्ट होतात व भक्तांवर मायेचा प्रभावच उरत नाही. आनंदनाथ म्हणतात की, आमचा हा परब्रह्मस्वरूप श्रीगुरुराणा भक्तांसाठीच अवतरलेला आहे. म्हणून जो यांची भक्ती करील, नाम घेईल, तो या कळिकाळातही सुखरूपच राहील.
श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पंचदशाक्षरी ब्रह्मनामाच्या प्रेमभावे केलेल्या जपाचे महत्त्व सांगताना श्रीआनंदनाथ महाराज म्हणतात,
स्वामीनाम गाता मग भय नाही ।
सांगतसे पाही निजछंदे ॥१॥
निजछंदे बोल माझे हे अमोल ।
तारक ते खोल जगालागी ॥२॥
आनंद म्हणे वाणी सुखाच्या कारणी ।
बोलिलो निधानी एकोत्तरशे हो ॥३.३॥
श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पावन नाम सतत गायले असता त्या भक्ताला जगात कसलेच भय शिल्लक राहात नाही, हे मी माझ्या स्वानुभवाने खात्रीशीर सांगू शकतो. म्हणून हे अमोल असे तारक स्वामीनाम अतीव प्रेमाने निरंतर जपा. ते खोलवर मुरते आणि मग सर्वत्र त्या परमानंदमय स्वामीरूपाचीच प्रचिती येत राहाते. असे हे बहुगुणी स्वामीनामच सुखाचे एकमात्र कारण आहे. म्हणून आपली वाणी दुस-या कशातही न गुंतवता फक्त श्रीस्वामीनामातच गुंतवावी, म्हणजे मग आपले साधनही निर्विघ्नपणे पूर्णत्वास जाते.
श्रीआनंदनाथ महाराज अवघ्या बत्तीस ओव्यांच्या आपल्या श्रीस्वामीपाठात श्रीस्वामीनामाचे माहात्म्य फार चपखल शब्दांत सांगतात. या स्वामीपाठाला आशीर्वाद आहे की, जो याचा नित्य नियमाने पाठ करेल त्याच्यावर श्रीस्वामींची कृपा होईल व श्रीस्वामीमहाराज त्याच्या घरी निरंतर वास करतील. तो पाठ मुद्दामच येथे पूर्ण देत आहे, म्हणजे नित्यपठणासाठी सोपे जाईल.
ll श्रीस्वामीपाठ ll
श्रीगुरुनामाने तरती हे जन ll
वाचे नित्यनेम ठेविलीया ll१ll
ठेविल्याने खरे चुकती हे फेरे ll
गर्भवास तो रे नाही तया ll२ll
नाही तया काही आणिक उपाधी ll
दूर होय व्याधी दुरिताची ll३ll
दुरिताचा नाश तोडी भवपाश ll
जाहलिया दास समर्थाचा ll४ll
समर्थाचा दास भवाचा हा नाश ll
तोडी मायापाश नाम गातां ll५ll
नाम गातां जन तरतील जाण ll
वचन प्रमाण कलयुगी ll६ll
कलयुगी माझे तारक नेमाचे ll
बोलणे हे साचे माना तुम्ही ll७ll
माना तुम्ही जन सोडा अभिमान ll
दुरिता कारण करू नका ll८ll
करू नका तुम्ही फुका ही धुमाळी ll
आयुष्याची होळी होत असे ll९ll
होत असे खरी नरदेह हानी ll
तारक निशाणी देतो तुम्हा ll१०ll
देतो तुम्हा घ्या रे अमोल मोलाचे ll
भवालागी साचे कामा येत ll११ll
कामा येत तुम्हां जडासी तारील ll
दु:खासी हारील शरण गेल्या ll१२ll
शरण गेल्या प्राणी वाया नाही गेला ll
पुरातन दाखला पाहा तुम्ही ll१३ll
पहावे तुम्ही तरी आत्मा निर्मळ ll
साधू हा व्याकुळ तुम्हांलागी ll१४ll
तुम्हांलागी बा हे नेतो भवपार ll
दंभाचा संसार करू नका ll१५ll
संसारासी जाणा कारण त्या खुणा ll
वेद तो प्रमाणा बोलियेला ll१६ll
बोलियेल्या तरी श्रुती निर्धारी ll
मौन्य झाले चारी म्हणोनिया ll१७ll
म्हणोनिया तुम्हा सांगतसे वाचे ll
प्रेम ते जीवाचे सोडू नका ll१८ll
सोडू नका तुम्ही आत्मींचा हा राम ll
श्रीगुरु आराम करी तुम्हां ll१९ll
करी तुम्हां खरे ब्रह्म निर्मळ ll
मग तो व्याकुळ जीव कैचा ll२०ll
जीव कैचा उरे आत्म एक पहा रे ll
ब्रह्म ते गोजिरे देखियेले ll२१ll
देखियेले डोळा आपणा आपण ll
झाले समाधान तया लागी ll२२ll
तया लागी नाही नाही भवचिंता ll
हरियेली व्यथा भ्रममाया ll२३ll
भ्रममाया सरे श्रीगुरू उच्चारे ll
चुकतील फेरे गर्भवास ll२४ll
गर्भवास नाही तयांसी हा जाण ll
तारक प्रमाण जीवालागी ll२५ll
जीवालागी जाहला तोचि तारावया ll
सद्गुरू माया जोडीयेली ll२६ll
दयेचे कारण शांतीते प्रमाण ll
विवेक विज्ञान जोडे तेथे ll२७ll
जोडे तेथे जोड ब्रह्मींची ही खुूण ll
देतो आठवण जगालागी ll२८ll
जगालागी माझी हिताची सूचना ll
तारक प्रमाणा कलयुगी ll२९ll
कलयुगी खरी हीच भवतरी ll
भावासी उतरी प्रेमछंदे ll३०ll
प्रेमछंदे घ्या रे वाचुनिया पहा रे ll
कुळ त्याचे तरे भवालागी ll३१ll
आनंद म्हणे तरी नित्यपाठ करा ll
स्वामी त्याच्या घरा वसतसे ll३२ll
अशा एकाहून एक सुंदर आणि अपार प्रेमभावयुक्त रचना करून जगात श्रीस्वामीनामाचा, श्रीस्वामीकीर्तीचा डंका पिटून अवघा स्वामीभक्तिरंग उधळणा-या या स्वनामधन्य श्रीस्वामीशिष्य-शिरोमणी श्रीआनंदनाथ महाराजांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग प्रणिपात.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा सर्व माहितीपूर्ण पोस्ट्स साठी कृपया खालील पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/profile.php?id=139539956212450 )

7 Jun 2016

*** अज्ञात खजिना - १ ***



#अज्ञातपणमाहीतअसावेअसेमौलिक


सासवड येथील श्रीसंत सोपानदेव समाधी मंदिरातील हे विशेष शिल्प आहे. मंदिराजवळील जुन्या वाड्यात खोदकाम करताना सापडले, अशी माहिती मला मिळाली होती. या शिल्पात एका बाजूला श्रीज्ञानेश्वर माउली व भावंडे भिंतीवर बसलेली दिसत आहेत. त्यांच्या चौघांच्याही पायाशी एक एक भोक आहे व भिंतीच्या खाली हात जोडून एक माणूस बसलाय, ते योगिराज चांगदेव आहेत. त्यांचा वाघही शेजारी आहे. शिल्पाच्या दुस-या बाजूला अनेक छोट्या छोट्या मूर्ती आहेत. उजवीकडील वरच्या कोप-यात एक शिवपिंड असून त्याखाली शेषशायी भगवान लक्ष्मीविष्णू आहेत. त्या लिंगावर जर पाणी टाकले तर शिल्पाच्या आतून तयार केलेल्या मार्गाने ते पाणी दुस-या बाजूला येऊन या चारही भावंडांच्या पायांना स्पर्श करून खाली बसलेल्या चांगदेवांच्या अंगावर पडते. तसेच शिवलिंग ज्या बाजूला आहे, त्याखालील भोकांमधून कारंज्यासारखे देखील बाहेर पडते. अतिशय सुंदर शिल्प असूनही हे तसे बेवारसच आहे. मंदिर समितीने एक चौथरा करून त्यावर ते स्थापलेले आहे. दर्शनाला येणारे लोक त्यावर हळदकुंकू, खडीसाखर वगैरे वाहतात व नमस्कार करतात. पण या सुरेख शिल्पाविषयी अजून संशोधन करून त्याचे यथायोग्य जतन करणे गरजेचे आहे. पुण्याहून जवळच आहे, कृपया ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून पाहून यावे, ही विनंती.
( कृपया ही माहिती शेयर करावी, पण माझ्या नावासह....चोरीचा धंदा बरा नाही. ;-) )
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481.