14 Jun 2016

ते त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पांडुसुता



आज गंगा दशहरा ! भगवती श्रीगंगेच्या अवतरणाचा दिवस. आजच्या पावन तिथीला हस्त नक्षत्र, व्यतिपात योग, मंगळवार या योगावर भगवती श्रीगंगेचे पृथ्वीतलावर अवतरण झाले. म्हणून ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून आज दशमी पर्यंत " गंगा दशहरा " महोत्सव साजरा करून आजच्या दिवशी गंगास्नान करून गंगापूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. गंगा दशहराच्या दहा दिवसात गंगेचे स्मरण, पूजन, वंदन, स्नान आणि स्तुती केल्याने दहा प्रकारची कायिक, वाचिक आणि मानसिक पापे नष्ट होतात.
भगवान श्रीमाउली म्हणतात,
कां गौतमाचेनि मिषें ।
कळिकाळ ज्वरितोद्देशें ।
पाणिढाळ गिरीशें ।
गंगेचा केला ॥
ज्ञाने.१८.७८.१६८९॥
गौतम ऋषींकडून चुकून गोहत्या झाली, त्याचे प्रायश्चित्त म्हणून इतर ऋषींनी त्यांना गंगेला पृथ्वीवर आणण्याची आज्ञा केली. गौतमांनी भगवान शिवांना प्रसन्न करून परमपावनी गंगा पृथ्वीवर आणली. त्यावेळी खरेतर कळिकाळरूपी तापाने आजारी पडलेल्या सर्व जीवांच्या कळवळ्याने भगवान शिवांनी गौतमांचे निमित्त करून गंगा पाठवली, असे श्रीमाउली म्हणतात.
गंगेच्या स्नान, दर्शन, स्मरण, वंदन, पूजन, तीर्थपान आणि स्तवन या सात प्रकारच्या उपासनेने सुख-समाधान तर लाभतेच पण दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. भगवान श्रीमाउली म्हणतात,
जोडे अमृताची सुरसरी ।
तैं प्राणांतें अमर करी ।
स्नाने पाप ताप वारी ।
गोडीही दे ॥
ज्ञाने.१७.१५.२१९ ॥
गंगेच्या सेवेने हरिभक्तीची खरी गोडी, आवडही निर्माण होते, असा या ओवीत श्रीमाउलींचा गर्भित अभिप्राय आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे.
जगन्नाथ पंडितांची ' गंगालहरी ' आणि आद्य शंकराचार्यांची दोन गंगास्तोत्रे फार प्रसिद्ध आणि सुंदर आहेत. या दशहरा महोत्सवात यांचे पठण करण्याची पद्धत आहे.
भगवती गंगा ही अत्यंत परोपकारी आहे. भगवान माउली " गंगा काजेवीण चाले " अर्थात् ती पूर्णपणे नि:स्वार्थपणे वाहते, असे म्हणतात. तिच्यात स्नान करणा-यांचे पाप-ताप ती नष्ट करते, पूजन करणा-यांना पुण्य प्रदान करते आणि समाधान देते. या तिच्या उपकारांमागे तिचा कोणताच स्वार्थ नाही की अन्य उद्देश नाही. म्हणूनच गंगेला आपण पूजनीय माता, देवता म्हणतो, गंगामैया म्हणतो. तिला फक्त कल्याणच करणे माहीत आहे. केवळ स्नान, पूजनच नाही, तर नुसते स्मरण केले तरी तेच फळ लाभते. यासाठी आपल्याकडे लहानपणीपासूनच अंघोळीचा पहिला तांब्या अंगावर घेतला की " हर गंगे भागीरथी " असे म्हणायला शिकवले जात असे. आजच्या पिढीलाही हे शिकवायलाच पाहिजे.
गंगा भारतीयांच्या मनी-मानसी अशी स्थिरावलेली आहे, आपले अंगांग व्यापून राहिलेली आहे. त्यामुळे आपल्या साध्या साध्या उपमांमध्येही गंगेचा संदर्भ येतोच. " झाले गेले गंगेला मिळाले " हे एक उदाहरण. गंगेला मिळाले म्हणजे साजरे झाले किंवा सार्थक झाले, वाया नाही गेले, अशी आपली त्यामागची भावना असते.
या परमपावनी पुण्यसरितेची स्तुती करताना भगवान श्रीमाउली म्हणतात,
कां फेडीत पाप ताप ।
पोखित तीरींचे पादप ।
समुद्रा जाय आप ।
गंगेचें जैसें ॥
ज्ञाने.१६.३.१९९ ॥
लोकांचे पाप-ताप फेडीत, तीरावरच्या वृक्षांचे पोषण करीत गंगेचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. " म्हणूनच जगाच्या कल्याणा भगवंतांची गंगा विभूती " असे आपण आदराने, प्रेमाने म्हणून गंगामैयाच्या चरणीं नतमस्तक होऊया !!
भगवान महाविष्णूंनी बळीराजाच्या उद्धारासाठी श्रीवामन अवतार धारण केला. त्यावेळी बळीच्या यज्ञशाळेत प्रकट होताना त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने ब्रह्मांडाचे कवच भेदले गेले आणि ब्रह्मांडाच्या बाहेरची जलधारा त्यांच्या चरणांना स्नान घालून आत आली. त्यांच्या चरणांवर लावलेल्या केशरामुळे तिचा रंग लाल झाला. हीच ती त्रिलोकपावनी भगवती गंगा होय. तिलाच ' भगवत्पदी / विष्णुपदी ' देखील म्हणतात. या धारेचा नुसता स्पर्श जरी झाला तरी संसारातील सर्व पापे नष्ट होतात.
राजा भगीरथाने आपल्या शापाने मृत झालेल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी प्रचंड तपश्चर्या करून भगवान श्रीशिवांना प्रसन्न करून घेऊन गंगा पृथ्वीतलावर आणली. त्यामुळे तिला ' भागीरथी ' असेही म्हणतात. पुढे एकदा जन्हू ऋषींचा यज्ञ गंगाप्रवाहात सापडला. त्यामुळे त्यांनी आपल्या तपोबलाने हा गंगाप्रवाह संपूर्ण गिळून टाकला. नंतर त्यांची मांडी फाडून ती पुन्हा प्रकट झाली. त्यामुळे जन्हूंची कन्या म्हणून तिचे नाव ' जान्हवी ' असे पडले.
या भगवती गंगेच्या पावन जलाला, भक्तश्रेष्ठ ध्रुव, सप्तर्षी, सनकादिक महात्मे , ' तपश्चर्येची आत्यंतिक फलश्रृती ' म्हणून मस्तकी धारण करतात. ही गंगानदी स्वर्गलोकातून मग हिमालयावर उतरून भारतवर्षाला पावन करीत समुद्राला जाऊन मिळते. सर्वश्रेष्ठ तपोनिधी भगवान शिवशंकर देखील , आपल्या आराध्य भगवान श्रीविष्णूंचे चरणोदक म्हणून या गंगामातेला नित्य आपल्या मस्तकावर धारण करतात. म्हणून भगवान श्रीमाउली आदिनाथ भगवान शिवांचा गौरव करताना म्हणतात की,
करितां तापसांची कडसणी ।
कवण जवळां ठेविजे शूळपाणि ।
तोही अभिमान सांडूनि पायवणी ।
माथां वाहे ॥
ज्ञाने.९.२५.३७२ ॥
तपश्चर्या म्हणावी तर शिवशंकरांच्या तोडीचा दुसरा कोणी नाही जगात, पण तेही अतीव प्रेमादराने आपल्या देवाचे चरणतीर्थ म्हणून गंगामैयाला मस्तकी धारण करतात. आपल्याकडे प्रत्येक जलस्रोताला गंगाच म्हणण्याचा प्रघात आहे. आम्हां भारतीयांच्या हृदयी गंगेचे जे अनन्यसाधारण स्थान जन्मजात दृढ झालेले आहे, त्याचेच हे द्योतक आहे. आम्हां भारतीयांसाठी गंगामैया ही केवळ नदी नाही. ती आमची पूजनीय देवता, आमची जीवनरेखा आहे. तिच्या नुसत्या सप्रेम स्मरणानेही आमची पापे नष्ट होतात अशी आमची अढळ श्रद्धा आहे. म्हणूनच मृत्युसमयी तिच्या तीर्थाचा एक थेंब तरी पोटात जावा यासाठी आम्ही भारतीय धडपडतो.
भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचेही गंगामैयावर नितांत प्रेम आहे. म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी गंगेसंबंधी अतिशय सुंदर उपमा दिलेल्या आहेत. आज आपण माउलींच्या काही निवडक मनोहर उपमांचा वापर करून या लेखाच्या माध्यमातून भगवती श्रीगंगेची ' शब्दपूजा ' बांधून हरिपदपाद्य गंगातीर्थाने पुण्यपावन होत आहोत.
भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंनी गीतेच्या दहाव्या अध्यायात आपल्या पंच्चाहत्तर विभूती सांगितलेल्या आहेत. त्यात ते सर्व वाहणा-या ओघांमध्ये गंगा ही माझी विभूती आहे असे म्हणतात.
भगवान श्री माउली त्यावर भाष्य करताना म्हणतात,
पैं समस्तांही वोघां - ।
मध्यें जे भगीरथें आणिली गंगा ।
जन्हूनें गिळिली मग जंघा - ।
फाडूनि दिधली ॥
ज्ञाने. १०.३१.२५६ ॥
ते त्रिभुवनैकसरिता ।
जान्हवी मी पांडुसुता ।
जळप्रवाहा समस्तां - ।
माझारीं जाणें ॥ २५७ ॥
समस्त जळ प्रवाहांमध्ये, राजा भगीरथाने मोठी तपश्चर्या करून आणलेली आणि राजा जन्हूने गिळून आपली मांडी फाडून बाहेर काढलेली, स्वर्ग-मृत्यू-पाताळ अशा तिन्ही लोकांना पावन करणारी भगवती गंगा ही माझीच विभूती जाण, असे भगवंत अर्जुनाला सांगतात.
" गंगावतरण " ही नुसती कथा नाही. त्यात गूढ योगार्थही आहे. त्यावर भाष्य करताना प. पू. श्री. शिरीषदादा कवडे आपल्या ' साधनजिज्ञासा ' या ग्रंथात म्हणतात, " गंगेच्या अवतरणाचे जे हे प्रतीक आहे ते सद्गुरुतत्त्वाचेच कार्य-रूपक आहे. श्रीभगवंतांच्या चरणांतून निघालेली त्यांची कृपाशक्तिरूपी गंगा हीच ते शिवरूप सद्गुरुतत्त्व धारण करते; आणि तेथून मग ती लोकांच्या पापक्षालनासाठी प्रवाहित होते.
भगवान शिवांनी त्या मूळ कृपाशक्तीचा ओघ लीलया धारण केलेला असतो; व त्यासाठी ते सद्गुरूच केवळ समर्थ असतात. श्रीभगवंतांच्या चरणांपासून ती शक्ती भगवान शिवांपाशी येते. ती त्यांच्या जटेत जाऊन नंतर त्यांच्या हृदयात प्रकटते; आणि त्यांच्या हृदयातून निघून ती सर्व प्राणिमात्रांचे कल्याण करते. गंगावतरणाचे हे रूपक श्रीसद्गुरुतत्त्वाचे रहस्य आहे व हीच शक्तिपात दीक्षेचीही एक निगूढ पद्धत देखील आहे  !"
आज मंगळवार, हस्त नक्षत्र व दशमी या गंगा दशह-याच्या  पर्वावर श्रीगंगामैयाच्या पुण्यपावन स्मरणात तिच्या चरणीं नतमस्तक होऊया आणि मनानेच तिचे स्नान करून, भगवान श्रीशंकराचार्य आपल्या गंगास्तोत्रात जी प्रार्थना करतात की, " हरिहराद्वैतात्मिका शाश्वत भक्ती आमच्या हृदयात हे गंगे, तुझ्या कृपेने प्रकट होऊन स्थिर होवो व तुझ्या तीरावरच हरिस्मरणात शेवटचा श्वास घेऊन माझा देहपात होवो, " तीच मनोभावे व्यक्त करून, ' जयगंगे जय मातर्गंगे जय जय जान्हवी करुणापाङ्गे ' असा गजर करून पावन होऊया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment