30 Sept 2018

दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी

आज भाद्रपद कृष्ण षष्ठी,  श्रीज्ञानेश्वरी जयंती !
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी शके १२१२ अर्थात् इ. स.१२९०-९१ मध्ये श्रीक्षेत्र नेवासे येथील श्रीमोहिनीराजाच्या मंदिरात श्री ज्ञानेश्वरी प्रथम सांगितली. पण ती कोणत्या तिथीला लिहायला सुरवात केली व कोणत्या तिथीला पूर्ण केली हे इतिहासाला ज्ञात नाही. पण त्यावेळचे काही प्रसंग मात्र नोंदवलेले आहेत.
शके १२१२ मधील पौष अमावास्येला (साधारणपणे १२९० चा डिसेंबर किंवा ९१ चा जानेवारी महिना ) पैठण येथे अर्धोदय पर्वणी होती. त्याचवेळी माउलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले होते. तो रेडा सलग पाच दिवस अखंड वेद म्हणत होता. माघ शुद्ध पंचमीला त्याने वेदपठण थांबवले. हा अलौकिक चमत्कार पाहून पैठणच्या तत्कालीन ब्रह्मवृंदाने माउलींना 'शुद्धिपत्र' अर्पण केले. यात एकूण सव्वीस श्लोक असून त्यात माउलींचे तोवर घडलेले चमत्कार नोंदवलेले आहेत. या शुद्धिपत्रावर बोपदेव व रामशास्त्री आदी इतर पंडितांच्या सह्या आहेत. त्यानंतर पैठणात काही दिवस राहून माउली व बाकीची भावंडे आळंदीकडे निघाली. त्यावेळी त्यांचे माता पिता देखील बरोबर होते. नेमके गोदावरीच्या तीरावर सद्गुरु श्री रामानंदस्वामी उपस्थित झाले. त्यांना भगवान श्रीपांडुरंगांनी स्वत:च्या गळ्यातील तुळसीमाळा देऊन पैठणला पाठविले होते. ती माळ माउलींच्या गळ्यात घालून भक्तिप्रसार करण्याची आपली आज्ञा त्यांना पोचती करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी माउलींना तुळसीमाळ घालून आज्ञा दिली. विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना बदरीकाश्रमात जाऊन उर्वरित आयुष्य साधनेत व्यतीत करण्यास तात्काळ पाठवून दिले व स्वत: काशीला परत निघून गेले. 
तेथून मग ही भावंडे मजल दरमजल करीत नेवासे येथे आली. त्या जागी प्रवरा नदीच्या तीरावरील मोहिनीराजाच्या मंदिरातील खांबाला टेकून बसून, भगवान पंढरीनाथांच्या आज्ञेनुसार भक्तिप्रसार करण्याच्या उद्देशाने, सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथांची अनुज्ञा घेऊन माउलींनी श्री ज्ञानेश्वरी सांगितली. त्यावेळी तेथील ज्या सच्चिदानंदबाबा थावरे या देशस्थ ब्राह्मणाला माउलींनी मेलेला जिवंत केले होते, त्यांनी ती ज्ञानेश्वरी लिहून घेण्याचे कार्य केले. श्री ज्ञानेश्वरी रचनेचा हा प्रसंग शके १२१२ मधील माघ व फाल्गुन म्हणजेच इ.स. १२९१ च्या जानेवारी - फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये घडलेला आहे. पण तिथीची नेमकी नोंद उपलब्ध नाही.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
पुढे कालौघात ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये पाठांतरामुळे अशुद्धी निर्माण झाली. ते शोधून मूळ शुद्ध प्रत तयार करण्याचे कार्य सद्गुरु श्री माउलींच्या आज्ञेने श्रीसंत एकनाथ महाराजांनी शके १५१२ म्हणजे इ.स.१५९१ साली आजच्याच तिथीला, कपिलाषष्ठीच्या सुमुहूर्तावर गोदावरीच्या काठी पैठण क्षेत्री पूर्ण केले. म्हणून आजच्या तिथीला "श्रीज्ञानेश्वरी जयंती" म्हणतात. ( श्री माउलींनी ज्ञानेश्वरी आजच्या तिथीला सांगितलेली नाही, हे लक्षात घ्यावे.) काही प्रतींमध्ये शके १५०६ मध्ये हे शुद्धिकार्य केले असाही उल्लेख आहे. परंतु बहुसंख्य लोक शके १५१२ हेच साल मानतात.
'श्री ज्ञानेश्वरी' हा भगवान श्री माउलींचा साक्षात् 'वाङ्मय-विग्रह' आहे. माउलीच श्री ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुम्हां-आम्हां भक्तांवर कृपा करण्यासाठी अतिशय सुलभ होऊन प्रकटलेले आहेत. म्हणून जो श्रद्धेने व निष्ठेने जशी जमेल तशी भगवती श्री ज्ञानदेवीची सेवा करेल तो हमखास उद्धरून जाईलच, यात तिळमात्र शंका नाही. तसा प्रत्यक्ष श्रीगुरु निवृत्तिनाथ महाराजांचा आशीर्वादच आहे या दिव्य-पावन ग्रंथाला.
श्री ज्ञानेश्वरी ही साक्षात् भगवती पराम्बिका आहे. श्रीसंत जनाबाई तर श्री ज्ञानेश्वरीला 'माय माहेश्वरी'  म्हणतात. भगवान श्रीमहेश्वरांपासून चालत आलेल्या कृपासंप्रदायाचे परिपूर्ण प्रकटीकरण या अलौकिक ग्रंथात माउलींनी उदार अंत:करणाने करून ठेवलेले आहे. वेदोपनिषदादी सर्व वाङ्मय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सहज सोपे शब्दरूप घेऊन प्रकटल्याने, सर्वांनाच त्या आत्मानंदाचा सुखलाभ शक्य झालेला आहे. श्री ज्ञानेश्वरी हा भगवान श्री माउलींचा तुम्हां-आम्हां भक्तांवरचाच नव्हे तर उभ्या जगावरचा कधीही आणि कोणत्याही उपायाने न फिटणारा अद्वितीय उपकार आहे.
भगवती श्री ज्ञानदेवीला माउली स्वत:च 'भावार्थदीपिका' म्हणतात. ही ज्ञानेश्वरी भगवान श्रीकृष्णांचे हृद्गत जसेच्या तसे, भावपूर्ण शब्दांमध्ये साकारणारी, अलौकिक तेजाने तळपणारी, अकल्पनाख्य कल्पतरुसम फल देणारी सुवर्ण-सुगंधी दीपकलिका आहे. पूजनीय श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'श्रीज्ञानदेवांची शब्दकळा' या अद्भुत रसपूर्ण ग्रंथात म्हणतात, "या 'भावार्थदीपिका' नामक अद्भुत उद्यानातील हे एक एक असे शब्दशिल्प, अनंत दैवी वोडंबरीकळा स्वतःमध्ये सामावून स्थिरावलेले आहे. हे शिल्प नेत्रांना सुखविते, कर्णांना रिझविते, जिव्हेला तृप्ती आणते, त्वचेला हळुवारपणे गोंजारते आणि घ्राणेंद्रियाला दिव्यगंधानुभूतीच्या उत्तुंग झुल्यावर अनिवार आकर्षणाचे हिंदोळे देऊ लागते. हे शब्दशिल्पांचे उद्यान म्हणूनच सजीवांनाही संजीवनी देणारे आहे, अनाथांच्या शिरी अखंड स्वानंद मातृसाउली धरणारे आहे; आणि साक्षात् सरस्वतीलाही 'माउली होऊन' आपल्या निगूढार्थओटीच्या पाळण्यात जोजविणारे आहे ! सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांची अमृतवाणी वेदांनाही फिके पाडणारी आहे. श्रीभगवंतांची नित्यानंद-वर्षिणी प्रेमशक्तीच या वाणीच्या रूपाने प्रसन्न होऊन, सगुण-साकार झालेली आहे !"
यच्चयावत् सर्व संतांनी एकमुखाने श्री ज्ञानेश्वर महाराजांना 'माउली' म्हणून गौरविलेले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणेच त्यांचे अभिन्न-स्वरूप असणारी श्री ज्ञानेश्वरी देखील त्यांचे 'माउलीपण' समर्थपणे मिरविते. पूजनीय शिरीषदादा म्हणतात, "माउलींचे माउलीपण, त्यांच्या लेकरांच्या हृदयात मृदुस्पर्शाने जागविणारी ही अक्षरकिमया, अक्षरशः अंतःकरण भारावून, वेडावून टाकणारी आहे; आस्वादकालाच निरपेक्षतेने मातृहृदय बहाल करणारी आहे. एवढे दातृत्वाने बहरून दरवळलेले मातृत्व या पोरक्या जगाने कधी अनुभवलेच नव्हते."
भगवान श्री माउली स्वतःच श्रीगीता-ज्ञानेश्वरी विषयी म्हणतात,
म्हणौनि मनें कायें वाचा ।
जो सेवक होईल इयेचा ।
तो स्वानंदसाम्राज्याचा ।
चक्रवर्ती करी ॥ज्ञाने.१८.७८.१६६८॥
"जो सद्भक्त मनाने, शरीराने व वाणीने भगवती पराम्बिका श्री ज्ञानेश्वरीचा अनन्य सेवक होईल, तो तिच्या परमकृपेने स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राटच होऊन ठाकतो !"
हे सेवकपण देखील विविधांगी आहे. श्री ज्ञानेश्वरीला साक्षात् माउलींचे स्वरूप जाणून तिची प्रेमभावे पूजा करणे, तिला उच्चासनावर ठेवून प्रदक्षिणा घालणे, तिला प्रेमादरपूर्वक वंदन करणे, दररोज क्रमाने ओव्या स्वहस्ते लिहून काढणे, जमतील तेवढ्या ओव्या वाचणे, त्यांचे चिंतन करणे, ओव्यांचा किंवा ओवीगटांचा जप करणे, वारंवार म्हणणे, पारायणे करणे ही सर्व श्री ज्ञानेश्वरी-सेवेच्याच संतांनी सांगितलेल्या विविध पद्धती आहेत. या सर्व सेवनाने माउलींची परमकृपा होऊन तो भक्त ज्ञानेश्वरीरूपी अमृताच्या आस्वादनाने अखंड आनंदमयच होऊन जातो. म्हणून आपण सर्वांनी या सेवा-पद्धतींचा अवलंब करून आपले परमकल्याण साधणेच इष्ट आहे.
श्री ज्ञानेश्वरी ही अत्यंत अद्भुत आहे, ती काय अनुभव देईल हे सांगता येत नाही. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी समक्ष पाहिलेली एक घडलेली हकिकत सांगतो. श्री माउलींचे पूर्णकृपांकित सत्पुरुष पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांकडे एकदा एक गृहस्थ आले व म्हणाले की, "माझे एका स्त्रीवर प्रेम आहे. ती मला प्राप्त होईल का?" पू.मामांनी गंभीरपणे त्यांच्याकडे पाहिले व म्हणाले, "तुझी तशी इच्छा राहिली तर होईल प्राप्त." तो म्हणाला, "उपाय काय त्यासाठी?" पू.मामा म्हणाले, "ज्ञानेश्वरी वाच ! " मग त्यांनी कशा पद्धतीने वर्षभर वाचायची तेही सांगितले. सहा महिन्यांनीच ते गृहस्थ पू.मामांसमोर येऊन ढसढसा रडू लागले. पू.मामांनी विचारले, "काय झाले रे, वाचतोस ना ज्ञानेश्वरी?" ते म्हणाले, "वाचतो ना. पण आता ती वासनाच शिल्लक राहिलेली नाही." पू.मामा मिश्किलपणे म्हणाले, "अरे, वाटोळेच झाले की तुझे. आता काय करणार तू?" त्यावर ते म्हणाले, "आता मी जन्मभर ज्ञानेश्वरीच वाचणार !" हे ऐकून पू.मामांना गहिवरून आले, त्यांच्या नेत्रांमधून प्रेमाश्रू वाहू लागले व ते म्हणाले, "पोरा, आमच्या माउलींनी कृपा केली बघ तुझ्यावर !" पूजनीय श्री.शिरीषदादा सांगतात, "पू.मामांनी केवळ 'ज्ञानेश्वरी वाच' असे सांगून आयुष्याचे कल्याण झालेली अनेक उदाहरणे आम्ही पाहिलेली आहेत. ज्ञानेश्वरीची ही किमया आहे की, ती अंतःकरणच बदलून टाकते. ऐहिक वासनाही नष्ट होऊन ते साधक विनासायास मोक्षप्रत जातात. ज्ञानेश्वरीला मनापासून शरण जाऊन तिला साक्षात् माउलींचेच स्वरूप मानून सेवा केल्यास ती शाश्वत कल्याणच करते !"
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
श्री ज्ञानेश्वरीबद्दल प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या चरित्रपर श्रीगुरुसाहस्री या पोथीत प.पू.श्री.शिरीषदादा म्हणतात,
ज्ञानेश्वरी माउली माय ।
एक पुस्तकी ग्रंथालय ।
ब्रह्मसाम्राज्य निलय ।
मामा म्हणती ॥१३.१७॥
श्री ज्ञानेश्वरी हे एकपुस्तकी ग्रंथालयच आहे, त्यामुळे यच्चयावत् सर्व गोष्टी ज्ञानेश्वरीत सापडतात. ब्रह्मसाम्राज्याचे प्रत्यक्ष विश्रांतिस्थानच असणारी ही ज्ञानेश्वरी, शरणागत भक्ताला परिपूर्ण ब्रह्मानुभूती देणारी अत्यंत अद्भुत आणि अलौकिक अशी साक्षात् मायमाउलीच आहे !
अशा या अद्वितीय ग्रंथाची निर्मितीच माउलींनी जगाविषयीच्या अपार करुणेने केलेली आहे. कलियुगात भयंकर परिस्थिती आल्यावर जीवांनी करायचे तरी काय? त्यांचा उध्दार कसा व्हावा? असा आपल्या मनीचा कळवळा माउलींनी श्रीसद्गुरूंकडे व्यक्त केला. त्यावर श्री निवृत्तिनाथ महाराजांनी हा ग्रंथ रचण्याची आज्ञा केली. माउलींनी जीवांच्या करुणेने याद्वारे जगाची कायमचीच सोय करून ठेवली. म्हणून श्री ज्ञानेश्वरी ही साक्षात् श्रीगुरुकृपाच आहे. तिला शरण जाऊन निष्काम भावनेने जो तिची सेवा करेल, त्याचे सर्वार्थाने कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही !
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचेही श्री ज्ञानेश्वरीवर निरतिशय प्रेम होते. त्यांनी आजन्म ज्ञानेश्वरीचे चिंतन केले. ते सदैव हातात ज्ञानेश्वरी घेऊन पेन्सिलने खुणा करीत चिंतन-मनन करीत बसलेले असायचे. नुसते चिंतनच नाही तर त्यांचे प्रत्येक आचरणही त्यानुसारच होते. ते प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी जगत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी आपल्या हयातीत अनेक भक्तांना ज्ञानेश्वरीची गोडी लावून तिची सेवा करायला लावली व त्यांचे जीवन धन्य केले.
आज श्री ज्ञानेश्वरी जयंतीच्या या पावन प्रसंगी, भगवती श्री ज्ञानदेवीचे प्रेम हृदयात सर्वांगांनी निर्माण होऊन, तिच्या सेवेची अाणि सेवनाची सुबुध्दी प्राप्त होऊन अंतिमतः अपार आनंदाची सर्वांना अनुभूती येवो; अशी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या आणि त्यांचेच अभिन्न स्वरूप असणा-या या करुणावरुणालय श्री ज्ञानेश्वरी-माउलीच्या श्रीचरणीं सर्वांच्या वतीने मी सादर प्रार्थना करतो !!
भाव धरूनियां वाची ज्ञानेश्वरी ।
कृपा करी हरी तयावरी ॥१॥
तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे ।
भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥
एका जनार्दनीं संशय सांडोनी ।
दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

25 Sept 2018

स्वानंदचक्रवर्ती

फलटणचे थोर सत्पुरुष प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हे विसाव्या शतकातील एक महान विभूतिमत्त्व. राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील विलक्षण अधिकाराचे एक विदेही स्थितीतील महात्मे म्हणून प.पू.श्री.काका सर्वज्ञात आहेत. त्यांचे अलौकिक चरित्र व अर्थपूर्ण वाङ्मय हा अभ्यासकांसाठी मोठा खजिनाच आहे.
प.पू.श्री.काकांची सात चरित्रे आजवर प्रकाशित झाली, परंतु त्यातील एक सोडता बाकीची सर्वच अनुपलब्ध आहेत. म्हणून पू.काकांचे अल्पचरित्र व काही भक्तांच्या आजवर प्रकाशित न झालेल्या हृद्य आठवणी, अनोख्या चमत्कारसदृश अनुभूती आणि प्रेमादराच्या काही हकिकती एकत्रित स्वरूपात स्वानंदचक्रवर्ती या ग्रंथाच्या माध्यमातून पू.काकांच्या पुण्यतिथी दिनी, दि.२ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशित करीत आहोत. तसेच पू.काकांच्या अमृतमय वचनांवरील विवरणात्मक लघुलेखही याच ग्रंथात समाविष्ट आहेत.
संतवाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक व श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेचे अध्वर्यू प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांची, पू.काकांच्या मनोहर अंतरंग स्थिती आणि माहात्म्याचा यथार्थ परामर्श घेणारी सुरेख प्रस्तावना ग्रंथाला लाभलेली आहे. तसेच यात समाविष्ट केलेली पू.काकांची काही चित्ताकर्षक छायाचित्रेही ग्रंथाची शोभा वाढविणारी ठरतील.
एकूण ११२ पृष्ठांचा हा ग्रंथ अवघ्या पन्नास रुपये एवढ्या छापील मूल्यात सेवा म्हणून उपलब्ध करून दिला जात आहे. प्रकाशनाच्या निमित्ताने विशेष सवलतीत सदर ग्रंथ ₹ ४० /- मध्ये भाविकांना उपलब्ध होईल.  मंगळवार दि.२ ऑक्टोबर रोजी फलटण येथील प.पू.श्री.काकांच्या समाधिमंदिरात सकाळी ९.३० वाजता होणा-या प्रकाशनाच्या कार्यक्रमास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती. स्वानंदचक्रवर्ती हा ग्रंथ प्रकाशनानंतर मंदिरात विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच कुरियर अथवा पोस्टानेही ग्रंथ मागवता येऊ शकेल. ज्यांना ग्रंथ पोस्टाने/कुरियरने हवा आहे, त्यांनी कृपया खालील व्हॉटसप क्रमांकांवर आपला पत्ता व फोननंबर मेसेज करून माहिती घ्यावी ही प्रार्थना.
संतचरित्रे साधकांबरोबरच सर्वसामान्य जनांनाही बोधप्रद असतात, मार्गदर्शक ठरतात. म्हणूनच परमार्थ करू इच्छिणा-या साधकांनी संतचरित्रांचे वारंवार मनन-चिंतन करीत राहावे असे सांगितले जाते. या दृष्टीने स्वानंदचक्रवर्ती महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आम्हांला मनापासून खात्री वाटते.
ग्रंथासाठी संपर्क :
रोहन उपळेकर : 8888904481
प्रसाद पत्की : 9922507547

22 Sept 2018

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची

आरती म्हणजे भक्तहृदयाचा प्रसन्न आविष्कार. आपल्या आराध्याची अतीव प्रेमादराने गायलेली स्तुती म्हणजे आरती. 'रती' म्हणजे तीव्र अनुराग, प्रेम. म्हणून, अतीव प्रेमादराने केलेली क्रिया ही आरती होय. भक्ताच्या हृदयातील सघन प्रेम ज्या प्रक्रियेने तो आपल्या आराध्यदेवतेला अर्पण करतो त्याला आरती म्हणतात ! आपल्याकडील भक्तिउपचारांमध्ये म्हणूनच आरतीला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे.
भगवान श्रीगणपती ही सर्वादिपूज्य देवता. त्यामुळे आरतीही त्यांचीच प्रथम म्हटली जाते. मराठी संतकवींपैकी समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्याच सर्वात जास्त प्रचलित आहेत. आपल्या अंगभूत रसाळता, अर्थघनता, मार्मिकता आणि गेयता आदी गुणांमुळेच श्री समर्थांच्या आरत्या सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी रचलेली सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची । ही सर्वच मराठी जनांच्या नित्यपठणात असणारी गणपतीची आरती अतीव सुंदर आहे. आपण रोजच म्हणत असलेल्या आरतीचा अर्थ नीट समजला तर म्हणताना अधिक आनंद लाभतो; म्हणूनच हा लेखनप्रपंच.
बुद्धी व ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असणाऱ्या भगवान श्रीगणेशांच्या देखण्या स्वरूपाचे अत्यंत सुरेख वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात,
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची ।
नुरवी पुरवी प्रेमकृपा जयाची ।
सर्वांगीं सुंदर उटी शेंदूराची ।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मनःकामना पुरती ॥ध्रु.॥
भगवान श्रीगणेश सुखकर्ते आणि दुःखहर्ते आहेत. आपल्या भक्तांची सर्व प्रकारची दुःखे, ते केवळ आपल्या एका कृपाकटाक्षाने दूर करतात आणि शाश्वत सुख त्याच्या आयुष्यात निर्माण करतात. ज्यांची प्रेमकृपा दुःखांची वार्ताही नि:शेष नष्ट करते; त्या भगवान श्रीगणपतींनी सर्वांगी भक्तवात्सल्याच्या शेंदराची उटी चर्चिलेली असून, भक्तप्रेमरूपी मोत्यांची तेजस्वी माळ गळ्यात घातलेली आहे. अशा अखिल विश्वाचे मंगल करणा-या मंगलमूर्ती देवाधिदेव विघ्नहर श्रीगणपतींचा जयजयकार असो ! त्यांच्या नुसत्या दर्शनानेही भक्तांच्या अखिल मनोकामना पूर्ण होतात.
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरें चरणीं घागरिया ॥२॥
अनर्घ्य रत्नांनी जडवलेले सुंदर पदक गौरीकुमरा आपल्याला शोभा देत आहे. तुम्ही सर्वांगी ल्यालेली केशरयुक्त लालसर सुगंधी चंदनउटी मोहक दिसत आहे. तुमच्या मस्तकावरचा हिरेजडित मुकुट तेजाने तळपत असून पायातील घागऱ्या, पैंजण मधुर ध्वनी करीत भक्तांच्या हृदयात आल्हाद निर्माण करीत आहेत. तुमचे हे मनोहर रूप तुमच्या भक्तांच्या चित्तवृत्तींना अंतर्बाह्य वेध लावून, भुंग्याप्रमाणे त्यांना तुमच्या चरणकमलीच खिळवून ठेवत आहे.
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकष्टीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना ॥३॥
हे पीतांबर नेसलेल्या लंबोदरा, कंबरेला नागाचे बंधन धारण करणाऱ्या, सरळ सोंड व वाकड्या मुखाच्या गणराया, तीन नेत्र असलेल्या श्रीगजानना, हा रामाचा दास तुमची आपल्या घरी आतुरतेने वाट पाहात आहे. तुम्ही त्याच्या प्रेमप्रार्थनेचा स्वीकार करून त्याच्या अंत:करणरूपी घरी लवकर प्रकट व्हावे आणि त्याचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करून त्याचा आणि त्याच्या रामभक्तीचा शेवटपर्यंत सांभाळ करावा. श्रेष्ठ देव-देवताही ज्यांना वंदन करतात अशा श्रीगणेशा, या रामदासाची प्रेमार्ती स्वीकारून तुम्ही आता भरभरून कृपा करावी !
श्री समर्थ संप्रदायात यातील पहिले आणि तिसरे अशी दोनच कडवी म्हटली जातात. ‘रत्नखचित फरा..’ हे कडवे म्हणत नाहीत. ते प्रक्षिप्त मानले जाते. परंतु सर्वत्र ते प्रचलित असल्यामुळे मी येथे त्याचाही अर्थ दिलेला आहे.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
काही अभ्यासकांचा, शेवटच्या चरणातील ‘संकष्टी का संकटी’ यावर मतभेद आहे. या दोन्ही पाठभेदांचा अर्थ एकच होतो. संकष्टी पावावें म्हणजे संकटांमध्ये पावावे. संकष्टी चतुर्थीचा याच्याशी काहीही संबंध नाही. जुन्या काळातील मराठीत संकष्ट असाही शब्दप्रयोग होता; त्यामुळे संकटी पावावे आणि संकष्टी पावावे हे दोन्ही पाठ अर्थदृष्ट्या बरोबरच आहेत. संकष्ट म्हणजे तीव्र कष्ट, मोठी दु:खे. आणि अशा संकटांच्या वेळी तर विघ्नहर्ताच स्वाभाविकपणे आठवणार ना !
काही ठिकाणी ‘दर्शनमात्रे मन स्मरणेमात्रे मन:कामना पुरती’ आणि ...जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती असे म्हणतात. ते मात्र पूर्ण चूक आहे. कोणाच्याही मूळ रचनेत पदरचे शब्द घालणे, हे साधुसंतांनी चुकीचे म्हणूनच सांगितलेले आहे. त्यामुळे मूळची आरती जशी आहे तशीच, शुद्ध शब्दोच्चार करीत म्हणायला हवी; स्वतःचे कोणतेही शब्द त्यात न घालता. संतांच्या शब्दांना जसे सामर्थ्य असते तसे आपल्या शब्दांना कधीच नसते; आणि म्हणूनच संतांच्या वाङ्मयात जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने होणारी ही पदरची भर आपण सर्वांनी कायमच टाळली पाहिजे.
मनोभावे आणि प्रेमाने केलेली आरती, स्तुतिप्रिय अशा श्रीभगवंतांच्या मनात आपल्याविषयी करुणा उत्पन्न होण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणूनच, कसलीही घाईगडबड न करता प्रेमाने आणि मनापासून, आरतीतील शब्दांचा सुयोग्य अर्थ जाणून, त्यातील भावना आपल्या अंतःकरणात रुजवून आरती म्हटली पाहिजे. जर आपण या गणेशोत्सवातच नाही तर रोजच्या पूजेतही अशाच प्रकारे आरती म्हटली, तर त्यातून अधिक आनंद तर लाभेलच; शिवाय भक्तांवर निरतिशय प्रेम करणारे भगवंत देखील प्रसन्न होऊन आपल्या सर्व दुःखांचा समूळ नाश करून आपले आयुष्य सुखसमाधानाने भरून टाकतील यात तिळमात्रही शंका नाही !
लेखक: रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष: 8888904481

21 Sept 2018

ऐक तू येवढे चंदन पाखरा

आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, श्रीवामनद्वादशी !
भगवान श्रीमहाविष्णूंचे पाचवे अवतार आणि माता अदिती व महर्षी कश्यपांचे पुत्र भगवान श्रीवामनांची आज जयंती ! भाद्रपद शुद्ध द्वादशीला, मध्यान्ह समयी अभिजित् मुहूर्तावर श्रीवामनांचा जन्म झाला होता.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचा नातू विष्णुभक्त बलिराजाने स्वर्गलोकावर स्वारी करून देवांचा पराभव करून इंद्रपद बळकावले. बलिराजा असुर असूनही अत्यंत सत्त्वशील, सत्यवचनी व दानशूर भगवद्भक्त होता. त्याने नर्मदेच्या किना-यावरील भृगुकृच्छ म्हणजेच आजचे भडोच येथे मोठमोठे यज्ञ करायला सुरुवात केली. त्याचे सत्त्व हरण करून त्याने बळकावलेले इंद्रपद त्याच्याकडून पुन्हा काढून घेण्यासाठी, त्यातील एका यज्ञात बटू रूपात प्रकट होऊन श्रीभगवंतांनी त्याला तीन पाऊले जमीन मागितली.
श्रीवामनांच्या दिव्य रूपाने मोहित झालेल्या बलिराजाने दानाचा संकल्प केल्यावर ते आपले वामनरूप टाकून प्रचंड मोठ्या स्वरूपात प्रकट झाले. त्यांनी दोन पावलात स्वर्गलोक व मृत्युलोक व्यापला. आता तिसरे पाऊल कुठे ठेवू ? असे विचारल्यावर बलिराजाने आपले मस्तक झुकवले व श्रीवामनांना मस्तकावर पाऊल ठेवायची विनंती केली. श्रीवामनांनी त्याच्या मस्तकावर आपला श्रीचरण ठेवून त्याला सप्तपाताळातील सुतललोकात जाण्याची आज्ञा केली. शिवाय त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन स्वत: त्याचे द्वारपाल होऊन ते राहिलेले आहेत.
बलिराजा हा सप्तचिरंजीवांपैकी एक असल्याने आजही सुतललोकाचा अधिपती म्हणून तो कार्यरत आहे. त्याच्या द्वारी प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णू गदा घेऊन संरक्षणासाठी उभे असतात. श्रीमद् भागवताच्या आठव्या स्कंधातील अध्याय क्रमांक पंधरा ते तेवीस या नऊ अध्यायांमधून श्री शुक महामुनींनी फार सुंदर आणि भावमधुर शब्दांत श्रीवामनावताराची व बलीच्या उद्धाराची लीला वर्णिलेली आहे. या नऊ अध्यायांमधून भक्तिशास्त्रातले अतिशय महत्त्वाचे सिद्धांत ते स्पष्ट करून सांगतात. विशेषत: भक्ताचे अंत:करण कसे असायला हवे ? भक्तीचे आणि भगवन्नामाचे माहात्म्य काय ? अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा त्यांनी यात विशेष ऊहापोह केलेला आहे. आवर्जून वाचावेत, अभासावेत असे हे नऊही अध्याय अत्यंत महत्त्वाचेच आहेत. भागवतकार असुर असूनही बलिराजाची यथार्थ स्तुती करतात. कारण बलिराजा हा सर्व वैष्णवांसाठी प्रात:स्मरणीय असा महान वैष्णव आहे. त्यामुळेच बलिराजाचे चरित्र आपल्यासारख्या भक्तांसाठी सदैव आदर्श आहे. सद्गुरु श्री माउली देखील बलिराजाच्या कथेचा उल्लेख करून श्रीवामन भगवंतांचे माहात्म्य सांगताना म्हणतात, *"दान मागोनि दारवंठेकार । जाहालासी बळीचा ॥ ज्ञाने.११.४.१०६॥"* "देवाधिदेवा, तुमचे औदार्य जगावेगळेच आहे, तुमच्या अपका-यांवरही तुम्ही उपकारच करता, पात्रापात्र न पाहता उदारपण दाखवता. अहो, बळीच्या घरी तीन पावले जमिनीचे दान मागायला काय गेलात; त्याने सर्वस्वच तुम्हांला अर्पण केले म्हणून प्रसन्न होऊन आजही त्याच्या द्वारी द्वारपाल म्हणून तिष्ठत उभे आहात ! देवा, तुमच्यासारखे तुम्हीच, अत्यंत अद्भुत आणि अपूर्व !"
रूपाने सान पण कीर्ती-गुणांनी महान अशा भगवान श्रीवामनांच्या रूपात प्रकटलेल्या भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीमहाविष्णूंच्या श्रीचरणी सादर दंडवत प्रणाम !
आजच्याच पावन तिथीला भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे निस्सीम भक्त व थोर अवतारी सत्पुरुष प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज माधानकर यांची पुण्यतिथी असते. सोमवार दि.२० सप्टेंबर १९१५ रोजी पुणे मुक्कामी आपल्या देहाची खोळ सांडून श्री महाराज माउलीरूप झाले होते.
स्वत:ला भगवान "श्री माउलींची कन्या" म्हणवून घेणारी ही "पंचलतिका" गोपी अत्यंत अलौकिकच आहे. त्यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात केलेले कार्य हा अद्भुत चमत्कारच आहे. त्यांनी एवढ्या थोड्या काळात १३२ ग्रंथ रचलेले आहेत, विश्वास बसणार नाही आपला. श्री गुलाबराव महाराज स्वत: चालता बोलता चमत्कारच होते, यात शंका नाही.
आज श्रीगुलाबराव महाराजांच्या पुण्यतिथी दिनी, त्यांच्या एका भावपूर्ण अभंगावरील चिंतनाद्वारे त्यांचे पुण्यप्रद संस्मरण करू या.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
माहेर !!
कोणत्याही स्त्रीची अत्यंत जिव्हाळ्याची ठेव असते. माहेर म्हणजे मायेची उबदार कूस, पित्याचा प्रेममय आश्वासक स्पर्श, सख्या-सुहृदांचा आधाराचा हात आणि बरेच काही. हृदयाच्या अगदी आतल्या गाभ्यात, नित्य-सुगंधित कुपीत जपलेल्या, वेध लावणाऱ्या मनोहर आठवणी म्हणजे माहेर. प्रेमाचा खळाळता झरा म्हणजे माहेर. मुळात स्त्री ही भगवंताची ममतामूर्ती ; तिचे ममत्व जिथे प्रकर्षाने जडलेले असते ते म्हणजे माहेर. अशा माहेराची नुसती सय जरी आली तरी, वैशाख वणव्याने होरपळलेल्या झाडावर श्रावणमेघाने मनसोक्त वर्षाव करावा तशीच काहीशी प्रत्येक स्त्रीची अवस्था होऊन जाते. सासुरवासाचा शीण, घालून पाडून बोललेल्या टोमण्यांचा कढ जिथे निःशेष नाहीसा  होतो, ते विश्रांतीचे, आधाराचे स्थान म्हणजे माहेर !!
माहेर शब्दातला ' मा ' हा 'माय' या जिव्हाळ्याचा नात्याचा द्योतक आहे. जिथे आपले मायबाप राहतात ते माहेर. लौकिक जगातली ही पद्धत संतांनी आपल्या आध्यात्मिक जगतातही वापरलेली दिसून येते श्रीपंढरीनाथ भगवंत हे संतांचे माय-बाप म्हणून मग पंढरी हे त्यांचे माहेर ! "जाईन  गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेर आपुलिया ॥" अशी प्रेमभावना भगवान श्री माउली व्यक्त करतात . "माझे माहेर पंढरी । " हा संत एकनाथांचा अभंग तर सुप्रसिद्धच आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजही म्हणतात की, "प्रवृत्ति सासुर  निवृत्ती माहेर । तेथे निरंतर मन माझे ॥" अशा या अविनाशी माहेराची  सर्व संतांना कायमच ओढ लागून राहिलेली असते.
अर्वाचीन काळातील एक फार थोर अवतारी सत्पुरुष, प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराजांनी, अवघ्या चौतीस वर्षाच्या आपल्या आयुष्यात केलेली ग्रंथनिर्मिती आणि जगदुद्धाराचे कार्य इतके भव्य-दिव्य आहे की आश्चर्यालाही आश्चर्य वाटेल. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींना आपले पिता मानून ही "ज्ञानेश्वरकन्या" त्यांच्या श्रीचरणांचे निरंतर अनुगमन करीत राहिली. माउलींचे पितृत्व पुरेपूर सार्थ ठरवीत या 'पंचलतिका' नावाच्या कृष्णप्रिया गोपीने स्वतंत्र 'श्रीज्ञानेश्वर मधुराद्वैत दर्शना'ची स्थापना केली. लौकिक अर्थाने बालपणीच दोन्ही डोळ्यांचे अंधत्व प्राप्त झालेल्या या प्रज्ञाचक्षू  महात्म्याची अलौकिक दृष्टी जगाच्याही पल्याडचे सारे बसल्याजागी पाहू शकत होती. किती आणि काय बोलणार? आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, दि. २१ सप्टेंबर रोजी श्रीसंत गुलाबराव महाराजांची १०३ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्त आपल्या प्रेमळ माहेराचे  वर्णन करण्याऱ्या त्यांच्या एका नितांतसुंदर पदाचा सप्रेम आपण आस्वाद घेऊ या.
स्त्री जरी देहाने सासरी वावरत असली तरी मनाच्या एका कोपऱ्यात तिचे माहेरपण तिने जपलेलेच असते. मनाने ती माहेरी जाऊन क्षेमसमाधान मिळवत असते. या नित्याच्या पण अव्यक्त सुखानुभूतीला शब्दरूप देत मनरूपी पक्ष्याला विनंती करताना श्रीगुलाबराव महाराज म्हणतात ;
ऐक तू येवढे चंदन पाखरा ।
निरोप माहेरा नेई माझा ॥१॥
पुण्याहुनि आहे गांव सहा कोस ।
पुसत वाटेस जाय तेथे ॥२॥
लक्षिजे दुरूनी सोन्याचा पिंपळ ।
बैसे अळुमाळ तया मुळी ॥३॥
माझिये मायेस सांगावे एकांती ।
माझी ही विनंती प्रेमभरे ॥४॥
तुझिया कन्येस सासुरवास मोठा ।
येऊं द्यावी पोटा कृपा कांही ॥५॥
कितीवेळ तुज माझा ये आठव ।
कांही गुप्तभाव पुसे सख्या ॥६॥
केव्हा धाडशी लवकरी मूळ ।
घेऊनी सकळ भाक येई ॥७॥
तुझे पक्षीराजा वंदिते मी पाय ।
ज्ञानेश्वरमाय भेटवावी ॥८॥
पूर्वी संदेशवहनाचे काम पक्षी करीत. त्याला अनुसरून श्री गुलाबराव महाराज ही 'चंदन पाखरा' रचना करीत आहेत. या पक्ष्याचे रूपक खरे तर त्यांनी आपल्या चित्तावर, मनावरच रचलेले आहे. श्रीसद्गुरुकृपेने साधना घडल्याने चित्त शुद्ध होत आलेले आहे. त्याला विवेक आणि वैराग्य असे दोन पंख असून त्यांना साधनेने बळकटी मिळालेली आहे. आता तो चिदाकाशात उंच भरारी मारून, मुक्त संचार करीत परमात्म्याच्या, श्रीसद्गुरूंच्या ठिकाणी जाऊन त्यांचे दर्शन घेऊ शकतो, हे जाणून श्रीमहाराज त्या मनरूपी पक्षीराजाला मोठया प्रेमादराने 'चंदनपाखरा' म्हणून विनंती करीत आहेत. चंदन जसे सर्वांगी शुद्ध, सोज्ज्वळ आणि सुगंधी, तसेच हे चित्तही साधनेने शुद्ध झालेले आहे. प्रापंचिक वासना, कामना नष्ट झाल्यामुळे आणि सद्गुरुकृपेने भगवत्प्रेमाची प्राप्ती झाल्यामुळे त्या मनाला दैवी सुगंध येऊ लागलेला आहे.म्हणूनच महाराज मनाला चंदनपाखरा म्हणत आहेत. अशा हळवारलेल्या मनाकरवी श्रीमहाराज आपल्या श्रीगुरुमायेला निरोप पाठवत आहेत.
"अरे चंदनपाखरा, तू माझे जरा ऐकतोस का ? माझा एक निरोप माझ्या माहेरी पोहचव ना ! माझे माहेर आळंदी, ते पुण्याहून सहा कोस आहे. तू वाटेत विचारत विचारत जा आळंदीला. तिथे जवळ पोहोचलास की, तुला देदीप्यमान असा सुवर्ण पिंपळ लांबूनच दिसेल. तो माझ्या माहेराची वैभवसंपन्न खूणच आहे. त्यांच्या मुळाशी जरा विसावा घे. तिथे बसल्यावर तुझा प्रवासाचा शीण क्षणात नष्ट होईल. ताजातवाना झालास की, माझ्या परमप्रेमळ श्री ज्ञानेश्वरमायेस जाऊन भेट. अतीव प्रेमभराने माझा हा निरोप तिला एकांतात सांग.
माझ्या ज्ञानाईस सांग की, "तुझ्या या कन्येस खूप कठीण सासुरवास भोगावा लागत आहे. प्रपंचरूपी सासरी खूप कष्ट करावे लागत आहेत. या कन्येसाठी तुझ्या पोटी काही माया येऊ देत. तुझ्या प्रेमकृपेशिवाय ही व्यथा कोण हरण करणार ? माझ्या आईला विचार की, तुला किती वेळा आपल्या लेकीची आठवण येते ? मला तर अखंडच तुझी सय येत असते. पक्षीराजा, तिला जरा अशा काही गुप्त गोष्टी विचार. कारण तिला जरी माझी आठवण येत असली तरी वरवर ती ते दाखवणार नाही. म्हणून लोकांपासून तिने गुप्त ठेवलेली ही गोष्ट तू मात्र प्रेमाने तिला विचारून जाणून घे व मला येऊन सांग. माझ्या आईला माझी आठवण येते , हे ऐकून मी किती सुखावेन काय सांगू तुला !
खूप दिवस, वर्ष झाली आईची भेट नाही, माहेरी जाणे झालेली नाही. माझ्या प्रेमार्द्र ज्ञानमातेस विचार की, ती मला माहेरी येण्यासाठी कधी मूळ पाठवणार आहे ? मी चातकासारखी वाट पाहत आहे. माहेरून असे मूळवणे आल्याशिवाय मला सासरचे लोक सोडणार नाहीत. म्हणून हे पक्षीराजा, तू माझ्या कोमल हृदयाच्या अलंकापुरस्वामिनीस सगळ्या गोष्टी नीट विचारून तिचे आश्वासन माझ्यासाठी घेऊनच परत ये !
हे माझ्या प्रिय पक्षीराजा, तू माझी आणि माझ्या ज्ञानेश्वरमायेची भेट लवकरात लवकर घडवून आण. मी तिच्या विरहाने कशी दिवस कंठते आहे ते तू पाहतोच आहेस. बा पक्षीराजा, मी तुझ्या पायी वंदन करते पण तू माझा एवढा निरोप माझ्या परमप्रिय मातेला जाऊन सांग आणि तिचे आधाराचे शब्द मला ऐकवून सुखी कर !"
माहेरच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या आणि आपल्या आईला भेटण्यासाठी आतुर झालेल्या सासुरवाशिणीचे अंतरंग अगदी मोजक्या पण चपखल शब्दांमध्ये श्रीसंत गुलाबराव महाराजांनी येथे मांडले आहे. ही केवळ त्यांची कविकल्पना नाही, तर प्रत्यक्ष आपला स्वानुभवच त्यांनी येथे साकार केला आहे. या ज्ञानेश्वरकन्येचे अंतःकरणही आपल्या जगद्वंद्य मायमाउलीसारखे कुसुम-कोमल आहे, हळवे आहे.
श्रीमहाराजांच्या हृदयी विलसणा-या अपरंपार करुणेची प्रसन्न श्रीमूर्तीच या पदामधून शब्दरूप सुरेख गर्भरेशमी पैठणी ल्येऊन आपल्यासमोर उभी ठाकते. त्या राजस पैठणीचा पोत, तेजस्वी रंग, पदरावरचे नाजूक मोरपंखी नक्षीकाम, सोनेरी जरीचा पैठणीकाठ आणि निरभ्र आकाशात नक्षत्रे विखुरल्यासारखे तिच्या अंगावरचे देखणे बुट्टे पाहता पाहता आतून-बाहेरून मोहरून गेलेलो आपण, या ज्ञानेश्वरकन्येच्या चिरंतन-माहेरी, अलंकापुरनिवासिनी ज्ञानमाउलीच्या उबदार आणि आश्वासक मायकुशीत कधी विसावतो ते आपले आपल्यालाही कळत नाही. उरते ती केवळ उन्मन करणारी त्या अत्यद्भुत प्रेमकृपेची नित्यसुगंधी स्पर्शजाणीव ; आपल्याही मनाचे चंदनपाखरू करणारी, सतत हवीहवीशी वाटणारी आणि अंतर्बाह्य सुखविणारी !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


17 Sept 2018

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा

श्रीसद्गुरुकृपेने माझ्याकडून सज्जनगड मासिकात लिहिल्या गेलेल्या युवातरंग लेखमालेतील अठरा लेख जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा या शीर्षकाने पुण्याच्या सृजनरंग प्रकाशनामार्फत पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित होत आहेत. भाद्रपद कृष्ण अष्टमी, प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज पुण्यतिथी दि.२ ऑक्टोबर रोजी या ग्रंथाचे प्रकाशन फलटण येथील प.पू.श्री.काकांच्या समाधिमंदिरात करण्याचा विचार आहे.
पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ तयार झालेले असून, आतील छपाईचे काम चालू आहे. ग्रंथास प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांची आशीर्वादस्वरूप प्रस्तावना लाभलेली आहे. त्यामध्ये पू.श्री.शिरीषदादांनी अत्यंत नेमक्या शब्दांमध्ये श्री समर्थांचे माहात्म्य आणि वेगळेपण अधोरेखित केले असून प्रस्तुत पुस्तकातील विषयांचाही आढावा घेतलेला आहे. श्री समर्थांना अभिप्रेत असलेला अध्यात्माच्या अभ्यासाचा शास्त्रोचित क्रमच सदर पुस्तकाच्या परिशीलनाने अभ्यासकांना लाभेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
विचारी आणि विवेकी, साक्षेपी आणि दक्ष असे तारुण्य हे खरे वैभव असून, तेच अवघ्या आयुष्याला धन्य करणारे आहे. असे वागणारा जागृत व आदर्श तरुणच सर्वोत्तमाचा दास म्हणून जीवनात धन्यता पावतो.
ही धन्यता मिळवण्यासाठीची उत्तमोत्तम आणि स्वानुभूत साधने समर्थ श्री रामदासादि जनहितैषी संतांनी आपल्या वाङ्मयात ठायी ठायी सांगितलेली आहेत. अशा अनेक उपायांचा सांगोपांग विचार या ग्रंथात सहजसोप्या संवादात्मक शैलीत केलेला आहे. संतांनी सांगून ठेवलेले हे 'लाभाचे उपाय' प्रयत्नपूर्वक आचरून, आयुष्य सुखी-समाधानी करून जगी धन्यतेचा अनुभव कसा घेता येतो; याचा वस्तुपाठच प्रस्तुत ग्रंथातील अठरा लेखांमधून सविस्तर मांडलेला आहे !
ग्रंथाची पृष्ठसंख्या ११२ असून मूल्य ₹ ११० /- आहे. प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास ग्रंथ ₹ ९० /- मध्ये मिळेल. खालील क्रमांकांवर आपला पूर्ण पत्ता व फोन नंबर देऊन नोंदणी करता येईल. योग्य ते शुल्क आकारून ग्रंथ कुरियरने/रजिस्टर पार्सलने परगावीही पाठवला जाईल.
आपणां सर्व वाचकांचा माझ्या लेखनाला आजवर प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहेच, तसाच या माझ्या पहिल्या ग्रंथाला देखील लाभेल याची मला खात्री आहे. ग्रंथ वाचल्यावर आपला बहुमोल अभिप्रायही जरूर कळवावा ही विनंती.
याच ग्रंथासोबत प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे अद्भुत चरित्र व अलौकिक आठवणींवर आधारलेला स्वानंदचक्रवर्ती नावाचा एक मौलिक ग्रंथही प्रकाशित होणार आहे. त्याचीही सविस्तर माहिती लवकरच देईन.
 रोहन विजय उपळेकर
ग्रंथ नोंदणी साठी संपर्क क्रमांक
रोहन उपळेकर : 8888904481
सौ.स्मिता भागवत : 9923004118

बिन राधा कृष्ण आधा

नमस्कार, आज श्रीराधाष्टमी !!
अनुत्तरभट्टारिका, व्रजनंदिनी, महारासेश्वरी, कृष्णमन्त्राधिदेवता श्रीकृष्णवल्लभा आदिशक्ती भगवती श्री श्रीराधाजींची जयंती !
बिन राधा कृष्ण आधा । असे महात्मे आवर्जून सांगतात. नुसते सांगतात नव्हे तर ती वस्तुस्थितीच आहे. शक्तीशिवाय 'शिव'ही 'शव'रूप होऊन जातात, असे भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजही म्हणतात.
पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंची आल्हादिनी दिव्यशक्ती म्हणजे अपर-श्रीकृष्णस्वरूपा भगवती श्रीराधा !
रा शब्दोच्चारणादेव स्फीतो भवति माधव: ।
धा शब्दोच्चारणादेव धावत्यैव ससम्भ्रम: ।
एखाद्याने अत्यंत प्रेमाने "राधा" नाम घ्यायचे ठरवून त्यातले नुसते "रा" उच्चारले की, भगवान श्रीकृष्णप्रभू अत्यंत उल्हासित, आनंदित होतात आणि पुढे "धा" म्हटल्याबरोबर त्या भक्ताच्या मागे मागे धावू लागतात, इतके त्यांचे श्रीराधाजींवर प्रेम आहे.
भगवान श्रीकृष्ण व भगवती श्रीराधाजी, हे जगातील अनादी-आद्य दांपत्य आहे. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली श्रीअनुभवामृताच्या पहिल्या ओवीत शिवशक्ती म्हणून यांनाच नमन करताना म्हणतात,
ऐसीं हे निरुपाधिके ।
जगाची जिये जनकें ।
तिये मियां वंदिली मूळिकें ।
देवोदेवी ।।अमृ.१.१।।
जगाच्या या आद्य माय-बापांच्या श्रीचरणीं सादर दंडवत प्रणाम घालून ते आपला अमृतानुभव कथन करीत आहेत; कारण तो यांच्याच अलौकिक प्रेमलीलेचा विलास आहे. ही प्रेमलीलाच खरा अमृतानुभव असून तोच अद्वितीय रसानंद माउली श्रीसद्गुरुकृपेने निरंतर आस्वादत आहेत व मोठ्या करुणेने त्यांनी तोच आपल्यालाही कथन केला आहे.
"श्रीराधा" हे श्रीभगवंतांइतकेच अगम्य, बोलाबुद्धीच्या पलीकडले चिरंतन तत्त्व आहे. श्रीभगवंतांची माया सर्व ठिकाणी कार्यरत आहे, पण केवळ राधा या एकाच ठिकाणी ती टिकत नाही. उलट मायेचे साक्षात् अधिपती असणारे भगवंतही ज्या मायेने मोहित होतात, ती "स्वमोहिनी माया" म्हणजेच श्रीकृष्णप्रेमस्वरूपा श्रीराधाजी होत. म्हणूनच त्यांच्या समोर श्रीभगवंतांचे देखील काहीही चालत नाही.
श्रीभगवंतांची साक्षात् कृपाशक्ती म्हणजे श्रीराधा !  म्हणून श्रीराधाजींची कृपा झाल्याशिवाय श्रीकृष्णस्वरूपाचे कधीच पूर्ण आकलन होऊ शकत नाही, असे महात्मे म्हणतात. राधातत्त्व हे मानवी बुद्धीच्या कक्षेत कधी मावणारच नाही, तेवढी झेपच नाही आपल्या कोत्या बुद्धीची. या दिव्यपावन तत्त्वाची सद्गुरुकृपेने अनुभूती नक्की येते, पण या तत्त्वाचे कोणालाही कधीही पूर्णपणे आकलन होऊ शकत नाही.
भक्तिशास्त्रामध्ये वर्णिलेला, सर्व सात्त्विक भावांचा परमोत्कर्ष असणारा महाभाव अतीव दुर्लभ  म्हणून सांगितलेला आहे. श्रीकृष्णप्रेमाराधिका श्रीराधाजी या साक्षात् महाभावरूपिणीच आहेत. त्या विलक्षण महाभावावर केवळ श्रीराधाजीच एकमेव आरूढ होऊन निरंतर ती प्रेमलीला आस्वादतात.
श्रीकृष्णप्रेमाचे ऊर्जस्वल लखलखीत सगुणसाकार रूप म्हणजे श्रीराधा ! प्रेममयता हेच त्यांचे स्वरूप आहे आणि तेच अनन्य व विशुद्ध प्रेम हे त्यांच्यापर्यंत पोचण्याचे एकमात्र साधनही आहे. शिवाय त्या प्रेमाची प्राप्ती व्हायला देखील त्यांचीच कृपा व्हावी लागते. तिथे ना आपले पुण्य कामी येते ना आपले साधन. निरंतरकरुणामय श्रीराधाजींची ती देवदुर्लभ करुणाच असे अत्यद्भुत प्रेमदान देऊ शकते. म्हणूनच महात्म्यांनी त्यांना 'स्वसंवेद्य' म्हटलेले आहे. भक्तिप्रांतात त्यांच्या करुणाकृपेला कसलेही परिमाण नाही नि कोणतेही उपमान नाही. यास्तव एकमेवाद्वितीय अलौकिक असे श्रीराधातत्त्वच सर्वश्रेष्ठ, सर्वत्रवरिष्ठ म्हटलेले आहे.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
श्रीभगवंतांची अविरत, अखंड वाहणारी प्रेमगंगा म्हणजे श्रीराधा ! कृष्णप्रेम'धारा' हीच लीलेस्तव 'राधा' झालेली आहे. म्हणूनच राधा हे पुराणातले काल्पनिक पात्र आहे असे म्हणणा-या क्षुद्र दुर्बुद्धी जीवांची करावी तेवढी कीव कमीच आहे. अत्यंत दिव्य अशा राधाकृष्ण-प्रेमाचा, लौकिक व शारीरिक प्रेमाच्या स्तरावर विचार करणारे महाभागही त्याच लायकीचे. बरोबरच आहे म्हणा, काविळ झाली की जग पिवळेच दिसणार ! आपल्या श्री माउली-नामदेव-एकनाथ-तुकारामादी सर्व संतांनी काय उगीचच काल्पनिक श्रीराधाजींचे वर्णन केलेले आहे काय? अहो, जे बोलतील ते खरे करून दाखविण्याचे जबरदस्त सामर्थ्य या सर्वांच्या अंगी जन्मत:च आहे, ते कशाला खोटे बोलतील? आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहेच.
मग श्रीराधाजींचा श्रीमद् भागवतात उल्लेख का नाही? याही आक्षेपाचे सविस्तर खंडन पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या 'म्हाराँ रि गिरधर गोपाल' या ग्रंथात केलेले आहे. ज्यांचा 'काम' शरीराची मर्यादाच सोडू शकत नाही असे 'सकाम' जीव, सेवन करणा-यांच्या चित्तातली समूळ कामना व कामभावनाही नष्ट करणारा, श्रीराधा-दामोदरांचा अशरीरी परमप्रेममय असा हा अलौकिक 'काम' काय जाणू शकणार? ते त्यांचे कामच नव्हे ! श्री माउली म्हणतात त्याप्रमाणे, 'बकाकरवी चांदणे चरवू पाहण्या'सारखाच प्रकार ठरणार हा. असो, आपल्याला काय घेणे-देणे त्या स्वहित न जाणणा-यांशी? आपण श्रीकृपेने लाभलेले हे प्रेमास्वादन कसल्याही परिस्थितीत थांबवू नये हेच इष्ट.
श्रीराधा-मधुसूदनांचे प्रेम समजण्यासाठी पूर्णत: निर्वासन होणे आधी आवश्यक आहे. त्यामुळेच आजवरच्या सर्व प्रेमरंगी रंगलेल्या महात्म्यांनी ह्या विशुद्ध प्रेमलीलेची चर्चा किंवा विवेचन उघडपणे केलेले दिसत नाही. जो विषय आकलनाच्या बाहेरचा आहे, तो अनधिकारी लोकांना उगीचच समजावत बसण्याचा व्यर्थ खटाटोप हे पूर्णज्ञानी महात्मे चुकूनही करत नाहीत. म्हणूनच श्रीराधाजींचा उल्लेखही पूर्वीच्या वाङ्मयात अभावानेच केलेला आढळतो. केवळ श्रीमद् देवीभागवतातच भगवती श्रीराधाजींच्या तात्त्विक स्वरूपाचा सुरेख ऊहापोह केलेला दिसून येतो.
श्रीराधातत्त्वाच्या दिव्य प्रेमलीलेचा सर्वांगीण विचार करावयाचा झाल्यास, प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचा "म्हाराँ रि गिरधर गोपाल" हा ग्रंथराज; आणि प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांची, अाजवर कधीही न ऐकलेल्या अपूर्व व्रजकथांचा अनोखा खजिना पोटी मिरवणारी विविध अभंग निरूपणे अभ्यासणेे आवश्यकच आहे. या ग्रंथांतून जे अद्भुत व अफाट असे श्रीराधातत्त्व आणि त्या तत्त्वाची एकरस कृष्णप्रेमलीला आपल्यासमोर प्रकटते, ती अंतर्बाह्य स्तिमित करणारी, मोहवून टाकणारीच आहे. ती मधुमधुर प्रेमगोडी आपल्याही चित्तात तत्काळ निर्माण करण्याचे लोकविलक्षण सामर्थ्य या ग्रंथांमध्ये पुरेपूर भरलेले आहे; हाही एक 'श्रीराधामाधव लीलाविलास'च म्हणायला हवा.
भगवती श्रीराधाजींनीच, पूर्वेला श्रीकृष्णचैतन्य महाप्रभू, पश्चिमेला श्रीकृष्णप्रेमप्रिया श्रीमीराबाई, दक्षिणेत श्रीसंत आंदाळदेवी तथा कोदई, असे अनेक अवतार धारण करून श्रीकृष्णप्रेमाचा अलौकिक प्रसाद भाविकभक्तांना प्रदान केला. चतुर्थ श्रीदत्तावतार श्रीसंत माणिकप्रभू महाराजांच्या ठायी देखील याच श्रीराधातत्त्वाचा प्रसन्न आविष्कार पाहायला मिळतो. श्री हनुमानप्रसादजी पोद्दार यांनी आपल्या 'श्रीराधामाधव चिंतन' या सुरेख ग्रंथामधूनही श्रीराधा-मधुसूदन प्रेमलीलेचा मनोहर आस्वाद घेतलेला आहे.
श्रीमन्निम्बार्क महामुनींद्रांनी रचलेले श्रीराधाष्टकम् हे सुंदर स्तोत्र श्रीराधाजींच्या महिम्याने ओतप्रेत भरलेले आहे, अतीव गोड आहे. ते म्हणतात, "हे राधिके, भगवान मुकुंदांना आपल्या प्रेमरज्जूने आपण असे बांधले आहे की ते सदैव आपल्याच भोवती अनुभ्रमण करीत असतात. दुराराध्य असे श्रीकृष्णप्रभू आपण आपल्या महाप्रेमाने पूर्णत: वश करून घेतलेले आहेत, त्या अद्भुत आराधनेमुळेच आपण 'राधा' झालेल्या आहात. आपल्या या प्रेममय सच्चिदानंद रूपाला माझे अनंत दंडवत असोत !"
श्रीनिम्बार्क प्रार्थना करतात,
सदा राधिकानाम जिव्हाग्रतो स्यात्सदा राधिका रूपमक्ष्यग्र आस्ताम् ।
श्रुतौ राधिकाकीर्तिरन्त:स्वभावे गुणा राधिकाया: श्रिया एतदीहे ॥८॥
"भगवती श्रीराधिके, आपले पावन नामच सदैव माझ्या जिव्हाग्रावर वसावे, आपले हे पावन रूपच सदैव माझ्या नेत्रांसमोर असावे, आपल्या पुण्यप्रद कीर्तिश्रवणाने माझे कान सदैव पावन व्हावेत आणि आपल्या गुणांच्या, लीलेच्या अखंड चिंतनाने माझे अंत:करण संपन्न व्हावे, हीच आपल्या श्रीचरणीं कळकळीची प्रार्थना !"
भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंच्या या अलौकिक व परम अद्भुत श्रीअर्धांगिनी रूपाचे, कृष्णाभिन्ना श्रीराधाजींचे श्रीचरण हेच, खरी भक्ती प्राप्त व्हावी असे वाटणा-या आपल्यासारख्या सर्वांसाठी निरंतर आराधनायोग्य, सेवनयोग्य आहेत. पण तेथेच सतत रममाण होऊन राहण्यासाठीही त्यांचीच कृपा हवी. म्हणून तीच पराभक्तिप्राप्तीची प्रेमप्रार्थना आजच्या परमपावन श्रीराधाष्टमी पर्वावर आपण आदरपूर्वक श्रीराधाकृष्ण नामाच्या जयघोषात श्रीराधागोविंद-युगुल श्रीचरणीं करूया व धन्य होऊया !!
मनुआ भूल मत जैयो राधारानीके चरण ।
राधारानीके चरण महारानीके चरण ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


15 Sept 2018

नमो अनन्ताय संकर्षणाय

आज भाद्रपद शुद्ध षष्ठी, भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान श्रीबलरामांची जयंती !
भगवान श्रीकृष्ण व त्यांचेच अंश असणारे भगवान शेषांचे अवतार भगवान श्रीबलराम हे जगाच्या कल्याणासाठी अवतरले होते. देवकीमातेचा सातवा गर्भ श्रीभगवंतांच्या योगमायाशक्तीने देवकीच्या गर्भातून काढून गोकुळात राहणा-या वसुदेवांच्या दुस-या पत्नीच्या, रोहिणीमातेच्या गर्भात स्थापन केला होता. तेच रोहिणी-वसुदेवांचे पुत्र भगवान बलराम होत. देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषांना 'संकर्षण' म्हणतात. त्यांनी लोकांचे रंजन केले म्हणून त्यांना 'राम' म्हणतात आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्याने त्यांना 'बल' असेही म्हणतात. नांगर हे त्यांचे आयुध असल्याने त्यांना 'हलधर' किंवा 'हलायुध' देखील म्हणतात. आपल्या बलाचा अतिशय नेटकेपणे व चांगल्याच कार्यासाठी, सात्त्विक गोष्टींसाठीच ते सदैव वापर करतात म्हणून त्यांना 'बलभद्र' असेही म्हणतात.
श्रीबलराम नावाप्रमाणेच अत्यंत बलवान होते. ते युद्धनीती, मल्लविद्या, मुष्टियुद्ध आदी विद्यांचे महान ज्ञाते मानले जातात. दक्षिण भारतामध्ये श्रीविष्णूंच्या दशावतारांमध्ये नवव्या बुद्धावताराच्या जागी भगवान बलरामांचीच गणना होते. 'द्वापरे रामकृष्णायां' या श्लोकातूनही बलराम-श्रीकृष्णांनाच द्वापर युगातील अवतार म्हटलेले आहे.
वैष्णव संप्रदायांमध्ये 'चतुर्व्यूह' अशी एक संकल्पना आहे. श्रीरामोपासक वैष्णव श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांना चतुर्व्यूह म्हणतात तर श्रीकृष्णोपासक श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न व अनिरुद्ध यांना चतुर्व्यूह म्हणतात. ह्या चारही रूपात भगवंतच साकारलेले आहेत, अशी वैष्णवांची धारणा आहे. परमपावन श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रात 'चतुर्व्यूह' (नाम क्र.१३८), 'भुजगोत्तम' (१९३), 'धरणीधर' (२३५) 'संकर्षणोऽच्युत' (५५२), 'हलायुध' (५६२), 'धराधर' (७५६), 'चतुर्व्यूह' (७६७), 'अनन्त' (८८६) इत्यादी नामांमधून भगवान शेषस्वरूप श्रीबलरामांचाच उल्लेख करण्यात आलेला आहे.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
श्रीभगवंतांनी अघासुराचा उद्धार केल्यानंतर ब्रह्मदेव चिडले. कारण देवांनी प्रत्यक्ष पापाचाच उद्धार केला होता. त्यावेळी ब्रह्मदेवांनी गोपबालक व गाई-वासरे अदृश्य करून गुहेत नेऊन ठेवली. तेव्हा त्यांचा गर्व हरण करण्यासाठी श्रीभगवंतांनी स्वत:पासून सर्व पुन्हा निर्माण केले. तेच त्या सर्वांच्या रूपात नटले व असे वर्षभर त्यांची लीला चालू होती. त्यावेळी केवळ श्रीबलरामांनाच कळले की ही गायीवासरे वेगळी आहेत. कारण भगवान बलराम हे साक्षात् श्रीकृष्णांचेच अंश होते. गोकुळातल्या इतर कोणालाही देवांची ही लीला कळली नाही.
भगवान श्रीकृष्ण रंगाने सावळे व पीतांबर धारण करीत तर श्रीबलराम गौरवर्णाचे व नीलांबर धारण करीत. सर्व गोपबालक या दोन्ही अवतारांसोबत अत्यंत आनंदित होऊन व्रजात गोचारणादी लीला-क्रीडा करीत असत. श्रीबलरामांचा विवाह आनर्त देशाच्या रैवत नावाच्या राजाच्या रेवती नामक कन्येशी झालेला होता. दुर्योधन हा बलरामांचा युद्धशास्त्रातला शिष्य होता. त्यांना आपली बहीण सुभद्रेचे त्याच्याशी लग्न लावून द्यायचे होते. पण श्रीकृष्णांना ते मान्य नसल्याने, त्यांनी अर्जुनाला त्रिदंडी संन्यास घ्यायला लावून सुभद्रेचे अपहरण करायला लावले व त्यांचा विवाह लावून दिला. महाभारत युद्धाच्या काळात बलराम तीर्थयात्रेला निघून गेले होते. त्यांनी युद्धात भाग घेतला नव्हता. भगवान बलरामांच्याही अशा अनेक लीलांचे सुरेख वर्णन श्रीमद् भागवतील दशमस्कंधात आलेले आहे. मोक्षपुरी द्वारकेमधील श्रीद्वारकाधीश मंदिराच्या आवारातच भगवान श्रीबलरामांचेही सुरेख मंदिर आहे. तेथील श्रीबलरामांची श्रीमूर्ती अतीव देखणी आहे. श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथेही श्रीबलभद्रांचा सुरेख विग्रह आहे.
भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचेच स्वरूप आणि प्रधान लीलासहचर असणा-या भगवान श्रीबलरामदादांच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त साष्टांग दंडवत !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


14 Sept 2018

ऋषिस्मरण



आज ऋषिपंचमी !!
भारतीय संस्कृती ही ऋषिसंस्कृती आहे. म्हणून आपल्या वैभवसंपन्न व एकमेवाद्वितीय संस्कृतीचे प्रणेते व संवर्धक असणा-या ऋषी-मुनींचे आपण प्रेमादरपूर्वक स्मरण करून, त्यांनी घालून दिलेल्या हितकर व श्रेयस्कर मार्गावरून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सृष्टी उत्पत्ती करताना भगवान ब्रह्मदेवांनी सुरुवातीला आपल्या या सात पुत्रांना निर्माण करून त्यांना पुढे उत्तम संतती निर्माण करण्याची आज्ञा केली. मरीचि, अत्रि, आंगिरस, पुलह, पुलस्त्य, क्रतु व वसिष्ठ हेच ते सात प्रथम ब्रह्मपुत्र सप्तर्षी होत. यांच्यापासूनच पुढे सर्व प्रजा निर्माण झाली, म्हणून हे मानववंशाचे मूळ जनक होत. काही ठिकाणी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, विश्वामित्र, कश्यप व जमदग्नि यांनाही सप्तर्षी म्हटले जाते. सप्तर्षी हे तर आपली अजरामर संस्कृती निर्माण करणा-या हजारो महान आत्मज्ञानी, संशोधक, शास्त्रज्ञ आणि बरेच काही असणा-या ऋषींचे केवळ प्रतिनिधी मानलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आजवरच्या सर्व ऋषींचे सादर स्मरण करायचे आहे आपल्याला. म्हणूनच सप्तर्षी हे आजवरच्या सर्व ऋषींचे, चरक-सुश्रुतादी, वामदेव-व्यासादी, पाणिनी-पतंजली, याज्ञवल्क्य-कश्यपादी सर्व महानुभावांचे उपलक्षण आहे. त्यामुळे नावांच्या वादात न पडता आपण कृतज्ञतेने या सर्वच महान ऋषींचे स्मरण करू या.
याच ऋषींनीच सुरुवातीला आपली देवदत्त अलौकिक प्रज्ञा वापरून विविध प्रयोग करून ही पृथ्वी राहण्या-खाण्यायोग्य केली, मानववंशाचे सर्वतोपरि भले कसे होईल ? याचा सूक्ष्म विचार करून नियम बनवले व अभ्युदय-नि:श्रेयसरूपी धर्म व अध्यात्मशास्त्र श्रृति-स्मृतींच्या रूपाने प्रचलित केले. या सर्व ऋषींचे आपल्यावर अत्यंत मोठे उपकार आहेत, हे आपण कधीच विसरता कामा नये. त्यांनी जर कष्ट केले नसते तर आज मनुष्य व इतर प्राण्यांमध्ये काहीच भेद नसता, असे मला मनापासून वाटते. सध्या समाजाची व मानवाची चालू असलेली अवनती पाहिली की हे फार जाणवते. जेव्हा आम्ही आमच्या अतिशहाणपणाने ऋषींचा अपमान करून, त्यांनी घालून दिलेले अत्यंत योग्य असे आदर्श, मागासलेपणाच्या नावाखाली पायदळी तुडवायला सुरुवात केली, कसलाही विचार न करता त्यांची टिंगलटवाळी करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच आमची भयंकर अवनती सुरू झाली हे सत्य नाकारता येणार नाही. ऋषींनी सगळ्याच गोष्टींना एक योग्य मर्यादा घालून दिलेली आहे. ती आपण मोडली की कुटुंबात, समाजात व पर्यायाने मानवजातीत काय उत्पात होतात, हे वेगळे दाखवायची आज गरजच नाही. रोज आपण पाहातोच आहोत उघड्या डोळ्यांनी. म्हणून वेळीच जागे होऊन आपण आपल्या या परमज्ञानी ऋषिमुनींच्या मार्गदर्शनाचे चिंतन मनन करून अखंड सुखी व्हायला पाहिजे. अशी ही भान-जाणीव निर्माण होऊन टिकावी, यासाठीच आजच्या ऋषिपंचमीचे औचित्य आहे.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
श्रीनाथ संप्रदायातील प्रथम नाथयोगी, साक्षात् कविनारायणांचे अवतार असणा-या भगवान श्री मत्स्येंद्रनाथ महाराजांचा जन्म हा आजच्याच पावन तिथीला झालेला आहे.
याच तिथीला शेगाव येथील श्रीसंत गजानन महाराजांनी पूर्वसूचना देऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. श्रीसंत गजानन महाराज हे राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या परंपरेतील थोर अवतारी विभूतिमत्त्व होते. त्यांचे शेगांव येथील समाधी मंदिर संस्थान हे भारतातील काही मोजक्या आदर्श संस्थानांपैकी एक आहे. श्री दासगणू महाराजांनी रचलेल्या 'श्रीगजानन विजय' या त्यांच्या प्रासादिक चरित्रग्रंथाचे अतर्क्य अनुभव आजही असंख्य भाविकभक्तांना नेहमीच येत असतात.
ऋषिपंचमीचे आणखी एक विशेष म्हणजे, बेळगांव येथील थोर विभूती, श्रीसंत कलावती आई यांचा जन्मदिन याच तिथीला असतो. श्री कलावती आईंनी लाखो लोकांना भजनमार्गाचे पथिक बनवून फार मोठा भक्तिप्रसार केलेला आहे. आजही त्यांच्या जगभर पसरलेल्या हरिमंदिर शाखांमार्फत मोठ्या प्रमाणावर उपासना चालते. त्यांच्या शिष्या विशालाक्षी यांनी लिहिलेले "परमपूज्य आई" हे त्यांचे चरित्र परमार्थ मार्गावर चालू इच्छिणा-या भक्तांसाठी निरंतर मार्गदर्शक आहे. प्रत्येक साधकाने या चरित्राचे वारंवार मनन-चिंतन करावे इतके ते विशेष आहे. परमार्थ अंगी मुरावा असे ज्याला वाटते, त्याने अशी दिव्य संतचरित्रे नित्यवाचनातच ठेवली पाहिजेत.
आजच्या पावन दिनी सर्व ऋषिमुनींच्या व संत मंडळींच्या श्रीचरणीं विनम्रतापूर्वक दंडवत घालून आपण त्यांचे कृतज्ञता-स्मरण करू या व त्यांना अभिप्रेत असणा-या आदर्श जीवनपद्धतीनुसार आचरण करण्याचा मन:पूर्वक संकल्प करून तसे निष्ठेने वागू या. हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

13 Sept 2018

श्रीपादराजं शरणं प्रपद्ये


आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्रीगणेश चतुर्थी. कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, सद्गुरु भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जयंती !
भगवान श्रीदत्तप्रभू अपळराजांच्या घरी दर्शश्राद्धाच्या दिवशी, क्षण दिलेले ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा मागायला आले व अखंडसौभाग्यवती सुमतीमातेकडून भिक्षा घेऊन संतुष्ट झाले. तिचा हात प्रेमभराने आपल्या हाती घेऊन, "जननी, काय हवे ते माग !" असे प्रसन्नतापूर्वक म्हणाले. सुमतीमातेचे पुण्य फळाला आलेले असल्याने तिने, "स्वामी, हेच बोल सत्य करा !" असेच मागितले. भगवान श्रीदत्तप्रभूंनी तिला जननी म्हटल्यामुळे तेच आजच्या पावनदिनी, सूर्योदय समयी पीठापूरमध्ये, श्री.अपळराज व सौ.सुमतीमातेच्या पोटी अवतरित झाले. भविष्यपुराणात, "कलियुगात अवधूत होतील", असा जो उल्लेख येतो तो भगवान श्री श्रीपादांचाच अाहे. म्हणूनच श्रीदत्त संप्रदायातील नमनात "कलौ श्रीपादवल्लभ: ।" असे मोठ्या प्रेमाने म्हटले जाते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप असे नित्य अवतार असून त्यांचे वय कायमच सोळा वर्षांच्या किशोराएवढे असते. भगवान श्रीदत्तात्रेयांची कलियुगातील श्रीगुरुपरंपरा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांपासूनच सुरू होते. भगवान श्री श्रीपादांचे सारे चरित्र अत्यंत अलौकिक असून आजही भक्तांना त्यांची प्रचिती अखंड येत असते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ब्रह्मचारी होते, त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता. अनेक भाग्यवान भक्तांना त्यांचे एकमुखी षड्भुज अशा मूळरूपात दर्शन झालेले आहे. आपल्या श्रीगुरूंच्या, प.प.श्री.थोरल्या महाराजांच्या हृदयात झालेल्या त्याच दर्शनानुसार योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे सुंदर चित्र काढलेले आहे. तसेच एक भव्य तैलचित्र प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या पुण्यातील 'माउली' आश्रमात आहे. त्याचाच फोटो या लेखासोबत शेयर केलेला आहे.
त्यांनी सोळाव्या वर्षी पीठापूरहून प्रयाण करून बदरिकाश्रमातील साधूंना मार्गदर्शन केले. तिथून भ्रमण करीत ते श्रीनृसिंहवाडी, गोकर्ण महाबळेश्वर, तिरुपती करून कृष्णा काठावरील कुरवपूर या तीर्थक्षेत्री आले. तेथे त्यांनी चौदा वर्षे राहून अनेक दिव्य लीला केल्या.
भगवान श्री श्रीपाद स्वामी महाराजांनीच कुरवपूर परिसरातील पंचदेव पहाडी येथील आपल्या दरबारात एके दिवशी, भक्तांवर परमकृपा करण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम *"दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।"* हा श्रीदत्त संप्रदायाचा महामंत्र स्वमुखाने उपदेशिला. हा संप्रदायाचा उघडा महामंत्र असून अत्यंत प्रभावी आहे. पुढे प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी ब्रह्मावर्तच्या चातुर्मास्यात, प्लेगपासून संरक्षण व्हावे म्हणून सात नाम सप्ताह करवून घेतले होते. त्यांपैकी एका सप्ताहात पुन्हा याच महामंत्राचा सर्वांना उपदेश करून " दिगंबरा..." महामंत्र सर्वत्र प्रचलित केला.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी श्रीगुरुद्वादशी तिथीला आपला देह कुरवपूर येथे कृष्णामाईत अदृश्य केला, पण त्यांनी देहत्याग केलेला नाही, हे लक्षात घ्यावे. कारण हा श्रीदत्तप्रभूंचा "नित्य अवतार" आहे. अजूनही त्यांचे भक्तोद्धाराचे कार्य त्याच रूपातून चालू असून अनंत कालपर्यंत चालूच राहणार आहे.
http://rohanupalekar.blogspot.in ]
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या काही लीला श्रीगुरुचरित्रात वर्णिलेल्या असून "श्रीपादचरित्रामृतम्" ग्रंथात त्यांचे सविस्तर चरित्र वर्णन केलेले आहे. श्रीनृसिंहवाडी स्थानावर त्यांचेही वास्तव्य झालेले आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव(जामोद) येथेही त्यांचे काही काळ वास्तव्य झाले होते. आज त्याजागी श्रीपाद सेवा मंडळाने त्यांचे भव्य मंदिर उभारलेले आहे. त्या जागृत स्थानी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची बालरूपातील श्रीमूर्ती असून, तेथूनही त्यांच्या अद्भुत लीला आजही सतत चालू असतात.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना कुरवपूर क्षेत्री, १९५४ सालच्या श्रीगुरुद्वादशीच्या पावन दिनी स्वत: भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी बिल्वदलासह दिव्य पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. त्या सोन्यासारख्या दिसत असत, पण प्रत्यक्षात कशापासून बनलेल्या होत्या हे ज्ञात नाही. कारण ते श्रीभगवंतांच्या संकल्पानेच निर्माण झालेले साक्षात् आत्मलिंगच होते. त्या पादुका सदैव पू.मामांच्या सोबत असत. पू.मामांच्या देहत्यागानंतर त्या पादुका त्यांच्या मुखात ठेवल्या गेल्या. त्याबरोबर त्या जशा प्रकटल्या होत्या तशाच पुन्हा अदृश्य झाल्या. त्या दिव्य पादुकांच्या तीर्थाला अद्भुत सुगंध येत असे आणि त्या तीर्थाने असंख्य भक्तांचे रोग, पिशाचबाधा व अडचणी दूर होत असत. आजच्या पावन दिनी त्या पादुकांचे सर्वांना दर्शन व्हावे म्हणून या लेखासोबत त्यांचाही फोटो शेयर करीत आहे.
साजुक तुपातला शिरा, माठाची/राजगि-याची पालेभाजी व वांग्याची भाजी या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या काही आवडत्या गोष्टी आहेत. मनापासून आणि विशुद्ध प्रेमभावाने अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना आवडते. वस्तुत: आवड - नावड यांचा या श्रीपादरूप परमशुद्ध ब्रह्मचैतन्याशी काहीही संबंधच नसतो. भक्ताचा निर्मळ प्रेमभाव हीच त्यांची आवड व तेच त्यांच्या प्राप्तीचे एकमात्र साधन आहे !
आजच्या परम पावन दिनी, भगवान भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणी सादर साष्टांग दंडवत प्रणाम !
विमला: कीर्तयो यस्य श्रीदत्तात्रेय एव स: ।
कलौ श्रीपादरूपेण जयति स्वेष्टकामधुक् ॥
"ज्यांची यश-कीर्ती अत्यंत उज्ज्वल आहे असे साक्षात् श्रीदत्तप्रभूच कलियुगामध्ये भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे अद्भुत असे श्रीपादरूप धारण करून निरंतर कार्य करीत आहेत !"
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


2 Sept 2018

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् -सप्तम पुष्प

सप्तम पुष्प
आज श्रीजन्माष्टमी !
पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू आणि त्यांचेच अपरस्वरूप भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराज यांच्या दिव्य आविर्भावाचा पुण्यपावन दिन !
भगवान श्रीकृष्णच ज्ञानाची पुन्हा स्थापना करण्यासाठी सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या रूपाने अगदी तेच सर्व तिथी, योग साधून श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला बरोबर मध्यरात्री श्रीक्षेत्र आळंदी येथे अवतरले. या दोन्ही अवतारवरिष्ठांच्या एकरूपत्वाचे हे प्रत्यक्ष प्रमाणच म्हणायला हवे !
भगवान श्री माउलींची पूर्णकृपा लाभलेले सत्पुरुष श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज श्री माउलींच्या अवतारामागची एक अनोखी हकिकत सांगत असत. ही फारशी ज्ञात नसलेली, अप्रसिद्ध अशी गोष्ट आजच्या दिवसाचे औचित्य साधून मुद्दामच आपल्यासमोर ठेवीत आहे.
एकदा सगळी सृष्टी जलमय झालेली असताना भगवंत बालरूप धारण करून एका वडाच्या पानावर आपला पायांचा अंगठा चोखत पहुडले होते. नेमके ' नारायण नारायण ' करीत श्री नारदमुनी तेथे आले व भगवान बालमुकुंदांचे ते त्रिभुवनमोहक रूप पाहून गालातल्या गालात हसू लागले. देवांनी देखील वेडाचे पांघरुण घेऊन हसण्याचे कारण विचारले. नारद म्हणाले, "अहो देवा, तुम्ही या जगाचे पालक आणि असे बाललीला करता आहात, मग हसू येणारच ना ?" त्यावर बालमुकुंद प्रभू उत्तरले, "पण तू कारण नाही विचारलेस त्याचे ?" नारदजी म्हणाले, "विचारणारच होतो, पण तुमचे हे रूप पाहून हसूच फुटले त्याआधी."  
श्रीभगवंत म्हणाले, "गड्या, मी जेव्हा जेव्हा अवतार घेऊन येतो तेव्हा हजारो भक्त याच श्रीचरणांवर डोके ठेवून धन्य होतात. मला कळत नाही की एवढी काय जादू आहे या पायांमध्ये ? सहज मनात आले, आपण अंगठा चोखून पाहावा की खरोखरच तो एवढा गोड आहे का ? म्हणून......" 
यावर नारदमुनी आणखी जोरात हसले व म्हणाले, "देवा, आता मी काय सांगावे आपल्याला, पण भक्तमंडळींना जे सुख मिळते, गोडवा लाभतो तो काय अंगठा चोखून थोडीच कळणार आहे ? त्यासाठी आपले मस्तक दुस-याच्या पायांवर ठेवावे लागेल. तेव्हाच कळेल." एवढे बोलून नारायण उच्चार करीत नारदमुनी निघून गेले. हे ऐकून देवही विचारात पडले.    
पुन्हा सृष्टी निर्माण झाली. मत्स्य, कूर्म, वराह आदी अवतार झाले. नंतर श्रीभगवंत नववा बौद्ध अवतार घेऊन पंढरीत विटेवर प्रकटले. पुढे कलियुग सुरू झाल्यावर पुन्हा भगवंतच साक्षात् माउलींच्या रूपाने अवतरले. काही काळाने ते पंढरपूर येथे आपल्या भावंडांसमवेत दर्शनाला गेले. त्यावेळी माउलींनी श्रीपांडुरंगांच्या समचरणांवर मस्तक ठेवल्याबरोबर त्यांना त्या श्रीचरणांच्या अपूर्व गोडीचा अनुभव प्रथमत: आला व त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, "मुक्ते, अगं, तो वटपत्री शयन करणारा बालमुकुंद भगवंत आणि हा समचरण साजिरा पांडुरंग एकच आहे हो ! त्याच्या चरणांची गोडी मोठीच विलक्षण आहे !" त्याच आनंदानुभवातून माउलींना त्यांचा आयुष्यातला पहिला अभंग स्फुरला,
रूप पाहाता लोचनी ।
सुख जाले हो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥२॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनी विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचे आगर ।
बापरखुमादेविवर ॥४॥
अशी ही आपलीच अलौकिक श्रीचरणगोडी भगवंतांना अनुभवायला मिळाली ती माउलींच्या अवतारामध्ये !
भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू आणि त्यांचेच परिपूर्ण अवतार भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींचा आज जन्मदिवस ! तुम्हां आम्हां हरिभक्तांसाठी महान पर्वणी. ज्यांच्या संगतीत अवघी संत मांदियाळी विसावली; ज्ञानाने, आनंदाने भरून पावली व वारंवार नतमस्तक झाली; ज्यांची 'वाङ्मयी श्रीमूर्ती' असणारी भगवती श्री ज्ञानेश्वरी अनन्य भक्तांचे लळे आजही मायेच्या प्रेमाने निरंतर पुरवीत आहे; जे आपले "माउलीपण" आजही क्षणोक्षणी सार्थ ठरवीत आहेत, त्या ज्ञानियांचे राजे, कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींचे तुम्ही आम्ही पाईक आहोत, त्यांच्या 'अक्षर' शब्दब्रह्माची सुख-वाट चोखाळत परमार्थ करीत आहोत, हे आपले सर्वोत्तम परमभाग्य आहे ! या थोर भाग्याची इतर कशाशी कधीही तुलनाच होऊ शकत नाही !
http://rohanupalekar.blogspot.in ]
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्याशी एकदा अशीच चर्चा चालू असताना त्यांनी मला माउलींच्या प्रेमावेगाने एक अतीव मधुर गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले, "अरे, मंत्रशास्त्रात अक्षरांनाही लिंग असते. अ,आ हे पुल्लिंगी आहेत तर उ,ई हे स्त्रीलिंगी. त्यानुसार 'आई' या शब्दात दोन्ही ५०% येतात, तर 'माउली' या शब्दातही मातृत्वाचा डबलडोस आहे, तिथे पितृत्व ३३% आणि मातृत्व ६६% आहे. सद्गुरु श्री माउलींचे नामही असे मातृत्वाने परिपूर्ण आहे बघ !" आमच्या सद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या या अगाध मातृत्वावरून अवघे जग ओवाळून टाकले ना, तरी ते कमीच पडेल !
सद्गुरु श्रीमाउलींच्या "ज्ञानदेव" या चतुराक्षरी ब्रह्मनामाचे माहात्म्य सांगताना श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात, "ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो । वासुदेवचि होतो अखंड वदनी वदे तो ॥" मनोभावे, प्रेमादरे ज्ञानदेव नामजप करणा-याला साक्षात् देवच ज्ञान देऊन कृतार्थ करतात आणि जो त्याहीउपर ते नाम प्रेमपडिभराने सतत घेतच राहतो, तो सर्वांगाने वासुदेवच होऊन ठाकतो. काय अलौकिक आहे पाहा ज्ञानदेव-नाममहिमा !!!
थोर माउली-कृपांकित सत्पुरुष प.पू.डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे श्री माउली हे सर्वस्वच होते. ते कायम अतीव प्रेमादराने माउलींना "जगज्जीवन" या मधुर संबोधनाने गौरवीत. ते स्पष्ट म्हणत असत की, "कलियुगात एकमात्र देव म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज !" ते नुसतेच असे म्हणत नसत, तर त्यांच्या प्रत्येक कृतीत, विचारांत श्री माउलीच सर्वस्वाने भरून राहिलेले होते. सद्गुरु  श्री माउलींचीही आपल्या या लाडक्या दासावर अपार प्रेमकृपा होती. म्हणून तर त्यांची वाङ्मयी श्रीमूर्ती असणारी श्री ज्ञानदेवी प.पू.श्री.काका अक्षरश: जगत होते. त्यांनी आपले उत्तराधिकारी पू.बागोबा कुकडे यांना एकदा भावावेशात सांगितले होते की, "बागबा, या गोविंदाने माउलींची ओवी न् ओवी अनुभवलेली आहे !" माउलींच्या कृपेने पू.काका असे अंतर्बाह्य ज्ञानदेवमय होऊन ठाकलेले होते.
भगवान श्री माउलींच्या अलौकिक शब्दब्रह्माचे चपखल वर्णन करताना संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक व माउलींच्या कृपापरंपरेतील थोर सत्पुरुष प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या "श्रीज्ञानदेवांची शब्दकळा" या अप्रतिम ग्रंथात म्हणतात, "माउलींच्या वाणीला भगवती गंगेचा अवखळ ओघ आहे, यमुनेचे प्रेमातुर गांभीर्य आहे, हिमालयाची गूढरम्य शांतता आणि सकलतीर्थांचे अम्लान पावित्र्य आहे. या भौतिकतेतही, अलौकिकाची दीपावली साधकहृदयात उजळविणारी ही चित्कला केवळ अनुपमेय आहे. श्रीज्ञानेश्वरी, श्रीअनुभवामृत आदी सारस्वतातून, त्याच वाणीचा अमृतस्पर्श अपार वात्सल्यमय होऊन, आपल्या तान्हुल्यांना सुखपान्हा चोजवीत असतो. आमच्या मायमराठीचे केवढे हे भाग्य; की या वाणीने तिची वस्त्रभूषा स्वीकारून धन्य केली !
*या शब्दाला 'शब्द' तरी कसे म्हणावे? 'शब्दब्रह्म' म्हणूनही त्याचे अतर्क्य सामर्थ्य अस्पर्शच राहून जाईल. हा तर साक्षात् श्रीभगवंतांचाच करुणावतार !! या शब्दाला अनन्यगतिक होऊन भजणारा, तनुमनु-प्राणांची त्यावरून कुर्वंडी करणारा कुणी जर माउलींच्याच स्नेहमय अस्तित्वाचाच अविभाज्य अवयव होऊन राहिला; तर त्यात नवल ते कोणते ?*
अहो सद्गुरु माउलीराया ! अशा अमूर्त, अत्यद्भुत सृष्टीची रचना-संकल्पनाही जेव्हा विचारांच्या चौकटीत मावेनाशी होते, तेव्हा स्वत:च्या कोतेपणाची जाणीव होऊन कळते की आमची उंची तर जेमतेम आपली पवित्रमंगल श्रीचरणधुली मस्तकी घेण्याइतपतच आहे. हे परमसौभाग्य तरी थोडे कसे म्हणावे ?"
सद्गुरु श्री माउलींची कन्या होण्याचे महद्भाग्य लाभलेले प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज आपल्या एका नमनाच्या श्लोकात म्हणतात,
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम् ।
पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् ॥
"परमशांतीचेच स्वरूप असणारे साक्षात् पूर्णब्रह्म आणि निखिल आनंदस्वरूप अशा आळंदीपती भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांना सदैव नमन असो !"
भगवान श्री ज्ञानराज माउलींचे असे एकमेवाद्वितीयत्व पुरेपूर जाणल्यामुळेच, अत्यंत प्रेमादराने भगवान सद्गुरु श्रीमाउलींची फार भावपूर्ण स्तुती करताना श्री तुकोबाराय जणू आपल्याच सगळ्यांचे हृद्गत मांडतात की,
ज्ञानियांचा राजा गुरुमहाराव ।
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥
मज पामरा हें काय थोरपण ।
पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥
ब्रह्मादिक जेथें तुम्हां वोळगणें ।
इतर तुळणें काय पुढें ॥३॥
तुका म्हणे नेणें युक्तीची ते खोली ।
म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥
"सर्व ज्ञानियांचे श्रेष्ठ राजे असणारे गुरूणां गुरु श्री ज्ञानदेव माउली हे साक्षात् ज्ञानाचे देवच आहेत. आपल्यासमोर मजसारख्या पामरांनी काय थोरपण मिरवावे ? पायीच्या वहाणेने पायी राहावे, यातच भले असते. अहो देवा, ब्रह्मादिक देवताही जेथे तुमची सेवाचाकरी करण्यात धन्यता मानतात, तिथे इतरांची काय तुलना करावी ? तुमच्या युक्तीची व ज्ञानाची खोली जाणणे आमच्यासारख्यांच्या अवाक्याबाहेरचेच आहे, तेव्हा त्या फंदात न पडता मी आपला तुमच्या श्रीचरणीं अनन्यभावे मस्तक ठेवतो हेच बरे !"
खरोखरीच माउलीचरणीं अनन्यगतिक होऊन निरंतर दंडवत घालण्यातच अखिल जगाची दौलत सामावलेली आहे. त्यांचा कृपावरद कर पाठीवर फिरण्याच्या सौभाग्यासमोर तर परमेष्ठीपदही तुच्छ आहे. "माउलीमाये, कधी दया येणार गं तुला आमची ? तुझ्याशिवाय अंतरी कालवाकालव होते आहे फार ! लवकर ये आणि पदराखाली घे, भुकेने जीव व्याकूळ झाला आहे. ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायी । धांवोनिया येई दुडदुडा ॥"
पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू व त्यांचे अपरस्वरूप करुणाब्रह्म भगवान श्री ज्ञानेश्वर माउली यांच्याच करुणाकृपेने गेले सात दिवस आपण त्यांच्या गुणवर्णनाची सेवा करू शकलो आहोत. ही सर्व त्यांनीच करवून घेतलेली शब्दसेवा त्यांच्याच सकलतीर्थास्पद अम्लान श्रीचरणीं श्रीजन्माष्टमीदिनी, 'महाराज ज्ञानेश्वर माउली' या नामाच्या गजरात समर्पितो आणि अनंत अनंत दंडवत घालून तेथेच विसावतो !
सरतेशेवटी सद्गुरु श्री.शिरीषदादांच्याच वाणीचा आश्रय घेऊन श्री माउलींच्या श्रीचरणीं सर्वांच्या वतीने मनोभाव विदित करतो,
सागराची गाज शोभे तयापाशी ।
थेंबुटे आवेशी कोण काजा ॥१॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हांपुढे केवी ।
वाचाळी करावी लेकराने ॥२॥
बोबड्या उत्तरे रिझें जरी तात ।
अज्ञानाची मात कवणासी ॥३॥
मी तो अज्ञ पोर अंध पंगु मुके ।
उच्छिष्ट भातुके द्यावे माते ॥४॥
अमृतेसी काही ठावे नाही आन ।
मर्यादेचे मौन भले मानी ॥५॥
देवा माउलीराया, आपल्या श्रीचरणकृपेचे भातुके देऊन आपले  स्मरण सदैव राहावे एवढेच आमच्या मनीचे कोड पुरवावे हीच कळकळीची प्रार्थना !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली ।


1 Sept 2018

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - षष्ठम पुष्प

षष्ठम पुष्प
सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या सा-याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी "संजीवन समाधी" घेतलेली आहे.
सामान्यत: लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात. वस्तुत: संजीवन समाधी ही जिवंत समाधी पेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो. परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथसंप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरुकृपेने ज्ञात असली तरी, श्रीभगवंतांच्याच आज्ञेने या जगात केवळ श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतलेली आहे. सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माउलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे, असे म्हणा हवे तर.
संजीवन समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्रीसंत नामदेव महाराजांनी माउलींच्या समाधिवर्णनाच्या आपल्या अभंगांत केलेला आहे. श्री नामदेवरायांच्या गाथ्यात "श्रीज्ञानदेव समाधिमहिमा" नावाचे आणखी एक स्वतंत्र प्रकरण आहे. यात प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथच, संतांच्या प्रेमळ विनंतीवरून श्री माउलींचे व त्यांच्या समाधीचे माहात्म्य कथन करीत आहेत. या प्रकरणातही काही विशेष संदर्भ मिळतात. त्यात श्री सोपानदेवांच्या समाधीचा उल्लेख करताना श्रीपांडुरंग म्हणतात की, "त्यावेळी हा ज्ञानदेवही दिव्यदेहाने आमच्यासारखाच सासवडला येईल तुझ्या समाधीसाठी." माउलींच्या संजीवन समाधीत त्यांचा देहत्याग घडलेला नाही, हेच देवही येथे सूचित करीत आहेत.
सद्गुरु श्री माउलींच्या संजीवन समाधीबद्दलची विशेष माहिती प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनीच प्रथमत: आपल्या एका प्रवचनात अगदी सविस्तर दिलेली आहे. त्यांच्या "श्रीज्ञानदेवी चिंतन : द्वितीय खंड" या ग्रंथातील "मजमाजि सूनि चित्त" या प्रवचनात हा सगळा भाग प्रकाशित झालेला आहे. जिज्ञासूंनी तो मुळातून वाचावा ही विनंती. विस्तारभयास्तव त्यातील महत्त्वाचे काही संदर्भ फक्त आजच्या या लेखात आपण पाहू या.
सद्गुरू श्री माउलींनी श्रीभगवंतांना समाधीची परवानगी मागितल्यावर, देवांनीच त्यांना आळंदीच्या त्यांच्या स्थानाची माहिती दिली. म्हणजे माउलींना ते माहीत नव्हते असे नाही, पद्धत म्हणून त्यांनी देवांना त्याबद्दल विचारले. आळंदीच्या सिध्देश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधिविवर हेच माउलींचे अनादिस्थान आहे. तेथेच त्यांनी या पूर्वी एकशेआठ वेळा समाधी घेतलेली असून ही त्यांची एकशेनववी वेळ होती समाधी घेण्याची, असे नामदेवराय सांगतात. तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात. देवांच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खालचे विवर मोकळे झाले. नामदेवरायांच्या चारही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथ-यावर मृगाजिन वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता केली.
आदल्या दिवशी, कार्तिक कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष श्रीभगवंतांनी स्वहस्ते दिव्य अन्न तयार करून माउलींना स्वत: भोजन वाढले होते. त्याचे गूढ कारणही पू.दादांनी प्रवचनात सविस्तर सांगितलेले आहे. त्या अमृतमय अन्नामुळे माउलींच्या आत शरीरभर अमृतच तयार झाले.
कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माउलींची पूजा झाल्यावर, एकीकडून श्री निवृत्तिनाथ व एकीकडून श्रीभगवंतांनी हाताला धरून माउलींना त्या समाधिविवराच्या आत नेले. तेथील आसनावर बसून माउलींनी डोळे मिटून तीन वेळा नमस्कार केला, भीममुद्रा लावली आणि ते 'संजीवन समाधी'त गेले. त्यानंतर श्रीपांडुरंग व श्री निवृत्तिनाथ बाहेर आले.
संजीवन समाधी साधण्यासाठी तत्त्वांचा तत्त्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो. सद्गुरु श्री माउलींनी समाधीविवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्त्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर, ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वीतत्त्वाचा जलतत्त्वात, जलाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाशतत्त्वात लय झाला. आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी, चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माउलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी व जलतत्त्वाचा लय झाल्यावर माउलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्याजागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. तेजतत्त्वही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नादरूपाने प्रचिती शिल्लक राहिली. ते वायूतत्त्वही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माउलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले.
पुढे प.पू.श्री.दादा स्पष्ट सांगतात की, "संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की, माउलींनी देहत्याग केला. याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते. मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील." संजीवन सामाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत.
[  http://rohanupalekar.blogspot.in ]
जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच फार मोठा फरक आहे. 'जातस्यहि ध्रुवो मृत्यु:' या नियमानुसार जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पांचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो, कारण तो असा तत्त्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो. ही माहिती नसल्यामुळेच सामान्यपणे लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी म्हणतात. परंतु आजवर केवळ आणि केवळ भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनीच अशी संजीवन समाधी घेतलेली आहे. म्हणूनच सद्गुरु श्री माउलींची ही संजीवन समाधी एकमेवाद्वितीय म्हटली जाते ! इथे कोणाही महात्म्यांची मी श्री माउलींशी तुलना करत नाहीये. जिवंत समाधी घेतलेले सर्व महात्मे श्री माउलींसारखेच थोर आणि पूजनीयच आहेत. फक्त जो वास्तविक भेद आहे दोन्हीतला तेवढाच मी येथे मांडत आहे. कृपया कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
श्रीसंत गुलाबराव महाराज यासाठीच श्रीक्षेत्र आळंदीला व सद्गुरु श्री माउलींच्या समाधीला "नित्यतीर्थ" म्हणतात. हे कधीच नष्ट न होणारे असे कालजयी तीर्थ आहे, म्हणूनच ते नित्यतीर्थ होय. श्री माउलींचे समाधीविवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे. तेथे पांचभौतिकताच नाही कसलीही. त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी आपला हा पांचभौतिक देह उपयोगाचा नसतो. तेथे केवळ दिव्य देहानेच प्रवेश होऊ शकतो. या समाधीविवराला कालाचा स्पर्शच नाहीये. तिथे काळ कार्यच करीत नसल्याने, त्यावेळी आत वाहिलेली फुले आजही जशीच्या तशी टवटवीत आहेत. त्यावेळी ठेवलेला पंचखाद्याचा नैवेद्यही साडेसातशे वर्षे उलटली तरी जसाच्या तसाच आहे.
सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने या समाधिविवराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आजवर केवळ चार सत्पुरुषांनाच लाभलेले आहे. किंवा तेवढीच नावे आपल्याला ज्ञात आहेत, असेही म्हणता येईल. पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शब्दश: एकच आहे. माउलींच्या समाधिसोहळ्यास श्रीसंत जनाबाई उपस्थित नव्हत्या. म्हणून त्या जेव्हा त्यानंतर पहिल्यांदा आळंदीला आल्या, त्यावेळी माउलींनी त्यांना संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्यदृष्टीने पुन्हा दाखवला होता. श्री माउलींचे त्यांच्यावर पुत्रवत् प्रेम होते, म्हणूनच जनाबाईंसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली.
श्रीसंत एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच. माउलींच्या गळ्याला टोचणारी अजानवृक्षाची मुळी कापण्यासाठी ते या समाधीविवरात गेले होते. त्यानंतर साधारणपणे दोनशे वर्षांपूर्वी, श्री चिदंबर महास्वामींच्या शिष्या श्रीसंत विठाबाई महाराजांना श्री माउलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभले. त्या जनाबाईंच्याच अवतार असल्याने माउलींची त्यांच्यावर पूर्णकृपा होतीच. त्यानंतर प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा एका विशिष्ट प्रसंगी माउलींच्या कृपेने या विवरात प्रवेश झाला होता. त्याचे सर्व वर्णन त्यांनी पू.दादांना तेव्हाच सांगून ठेवलेले होते, जे आज आपल्याला पू.शिरीषदादांच्या ग्रंथात वाचायला मिळते. या चार महात्म्यांशिवाय अन्य कोणी हे विवर आतून पाहिलेले सध्यातरी आपल्याला ज्ञात नाही.
गंमत म्हणजे श्रीसंत विठाबाईंचे अभंग मला काही वर्षांपूर्वी वाचायला मिळाले होते. त्यातले वर्णन वाचून मी चकितच झालो. कारण प.पू.श्री.शिरीषदादांच्या प्रवचनात वाचलेल्या व नंतरही एकदा त्यांच्या श्रीमुखातून ऐकलेल्या समाधिविवराच्या वर्णनाशी ते जसेच्या तसे जुळले. वेगळ्या काळातील दोन महात्मे अचूक एकच वर्णन करत आहेत, हेच त्या गोष्टीच्या सत्यतेचे द्योतक म्हणावे लागेल.
सद्गुरु श्री ज्ञानदेवांच्या समाधिस्थ स्वरूपाविषयी आपल्या "श्रीज्ञानदेव विजय" ग्रंथात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात,
ज्ञानेशांची समाधिस्थिती ।
पुनश्च येणे देहावरती ।
याची घेतली प्रचिती ।
त्रिशतकोत्तर नाथांनी ॥१५.६३॥
पूर्वजांनी जया पाहिले ।
तया नाथांनीही देखिले ।
आजही तैसेचि संचले ।
समाधिस्थ ज्ञानेश्वर ॥१५.६५॥
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्यअवतार असल्याने, आजही त्याच रूपाने समाधिस्थ राहून ते आपल्या भक्तांवर कृपाप्रसाद करीत आहेत. हीच अनेक महात्म्यांची साक्षात् अनुभूती आहे. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज नेहमी म्हणत की, "कलियुगात देव एक ज्ञानेश्वर महाराजच आहेत." प.पू.श्री.काका भगवान श्री माउलींच्या चरणी इतके अनन्य होते की ते माउलींच्याशिवाय अन्य भगवंत जाणतच नव्हते. या अनन्यतेमुळेच श्री माउलींची पूर्णकृपा त्यांच्यावर झालेली होती.
सद्गुरु श्री माउली हे जसे एकमेवाद्वितीय ( Unique ) अवतार आहेत, तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीयच आहे. त्यांच्यासारखे केवळ तेच ! अलौकिक, अद्भुत, अनिर्वचनीय आणि अपरंपार कनवाळू !! त्यांचे पावन नाम घेण्याची, त्यांच्या दिव्य चरित्राचे अनुसंधान राखण्याची आणि त्यांचेच स्वरूप असणारे त्यांचे वाङ्मय वाचण्याची, त्याचे मनन-चिंतन करण्याची संधी व सद्बुद्धी दोन्ही आपल्याला लाभत आहे, हेच माउलींची आपल्यावर अद्भुत कृपा असल्याचे प्रतीक आहे, यात शंकाच नाही ! या देवदुर्लभ भाग्यासाठी परमकनवाळू करुणाब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीचरणीं, सर्वांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी दंडवत प्रणाम करून त्याच अनुपम-सुखदायक श्रीचरणीं, त्यांच्या महन्मंगल जयंतीपर्वाच्या पूर्वसंध्येला तुलसीदल रूपाने विसावून धन्य होतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली ।