11 Feb 2020

नमन गुरुराया स्वामी लोकनाथ सदया



नमस्कार मंडळी,
आज माघ कृष्ण तृतीया, थोर वारकरी सत्पुरुष श्रीसंत नरहरी सोनार महाराज व शक्तिपात परंपरेतील थोर विभूती, प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांची पुण्यतिथी  !!
मूळचे अभिमानी, कट्टर शैव असणाऱ्या श्रीसंत नरहरी सोनार महाराजांना भगवान श्रीपंढरीनाथांनी अलौकिक लीला करून 'हरिहरा नाही भेद' हे पूर्णत: पटवून दिले. पंढरपुरात तेही अगदी श्रीविठ्ठल मंदिराजवळ राहूनही कधीच ते श्रीपंढरीनाथांच्या दर्शनाला जात नसत. ते आपल्या घरासमोरील मंदिरातल्या भगवान श्रीमल्लिकार्जुनांची उपासना करीत. 
एकदा एका ग्राहकाला भगवान पंढरीनाथांना सोन्याचा कंबरपट्टा बनवायचा होता. त्यासाठी श्री नरहरी महाराजांनी माप घेऊन आणून द्यायला सांगितले. पण देवांनाच लीला दाखवायची असल्याने, त्या मापांचा कधीच नीट उपयोग झाला नाही. दुसऱ्याने घेतलेल्या मापांनुसार बनवलेला कंबरपट्टा घट्ट नाहीतर सैल होत असे, योग्य मापात बसतच नसे. अनेकवेळा असेच झाल्यावर, शेवटी त्यांना स्वत:ला अजिबात इच्छा नसतानाही मंदिरात माप घ्यायला जावेच लागले. "मी कट्टर शैव असल्याने विठ्ठलांचे तोंडही पाहणार नाही" , अशी त्यांची दृढ भावना होती. म्हणून मग त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून माप घेतले. पण पांडुरंगांच्या मूर्तीला स्पर्श केल्यावर त्यांना तेथे शिवपिंडच लागली. त्यांनी खसकन् डोळ्यांवरची पट्टी काढली तर समोर साजिरे गोजिरे समचरण रूप दिसले. पुन्हा पट्टी बांधून माप घेतले. हाच प्रकार दोन तीनदा झाल्यावर ते विचारात पडले. श्रीभगवंतांच्या या अद्भुत लीलेनंतर मात्र त्यांचा भेदभ्रम दूर झाला व ते विठ्ठलभक्त झाले. पुढे त्यांनी भगवान श्रीपंढरीनाथांची मोठी सेवा केली व विपुल अभंगरचनाही केली. श्रीसंत नरहरी महाराजांचे समाधी मंदिर पंढरपुरात महाद्वाराच्या समोरच चंद्रभागेकडे तोंड केल्यावर उजव्या हाताला आहे.
देवा तुझा मी सोनार ।
तुझे नामाचा व्यवहार ॥
हा नामाचे माहात्म्य सांगणारा त्यांचाच सुप्रसिद्ध अभंग आहे. नाममाहात्म्य सांगणारे त्यांचे आणखीही काही अभंग प्रसिद्ध आहेत. नाथ संप्रदायातून अनुगृहीत असलेल्या श्री नरहरी महाराजांनी (आज उपलब्ध असलेल्या त्यांच्या अगदी मोजक्याच अभंगांमधून,) सांप्रदायिक सिद्धांत व स्वत:ची गुह्य योगानुभूती फार सुंदर शब्दांमध्ये व्यक्त केलेली आहे.
आपल्या एका सुंदर अभंगातून, श्रीसद्गुरुकृपेने लाभलेली आत्मस्थिती कथन करताना ते म्हणतात,
नाशिवंत देह मनाचा निश्चय ।
सद्गुरूचे पाय हृदयीं असो ॥१॥
कलीमध्यें फार सद्गुरु हा थोर ।
नामाचा उच्चार मुखीं असो ॥२॥
भजनाचा गजर नामाचा उच्चार ।
हृदयीं निरंतर नरहरीचें ॥१७.३॥
हा देह आणि त्यासंबंधीच्या सर्व गोष्टी नाशिवंत आहेत, हा मनाचा पक्का निश्चय श्रीगुरुकृपेने आता माझ्या अंतरात ठसावला आहे ; आणि म्हणूनच मी अविनाशी असे श्रीसद्गुरुपाय हृदयी घट्ट धरून ठेवलेले आहेत. ते श्रीचरण सदैव तेथेच असोत ही प्रार्थना. या भयंकर कलियुगामध्ये श्रीसद्गुरु हे एकमेव तत्त्व सर्वश्रेष्ठ आहे, तेच तारक आहे. त्यांनी कृपावंत होऊन शक्ती-युक्तीसह दिलेले नामच माझ्या हृदयी सतत असो, मला त्याचा कधीही विसर न पडो. सदैव माझ्या मुखात तेच दिव्यनाम वसो. श्रीसद्गुरूंची व श्रीभगवंतांची प्रेमभक्ती आणि त्यांनी दिलेल्या नामाचा, त्यांनी जसा करायला सांगितला आहे तसाच गजर, त्यांच्याच कृपेने अखंडितपणे मी माझ्या हृदयगाभाऱ्यात करीत आहे !"
श्रीसंत नरहरी सोनार महाराज येथे आपल्या स्थितीचे कथन करण्याच्या मिषाने, तुम्हां-आम्हां साधकांना "काय केले असता निश्चितपणे कल्याण होते" याचे सुरेख मार्गदर्शनच करीत आहेत. "श्रीसद्गुरूंचे पाय धरून राहण्यात आणि त्यांनी जशी सांगितली आहे अगदी तशी साधना प्रेमाने करण्यातच आपले खरे हित आहे", हा त्यांच्या सांगण्याचा मथितार्थ आहे.
श्रीसंत नरहरी सोनार महाराज हे भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या प्रभावळीतले मोठे अधिकारी महात्मे होते. त्यांनी आजच्याच तिथीला, शके १२३५ म्हणजे इ.स.१३१४ साली पंढरीत समाधी घेतली. श्रीसंत नरहरी महाराजांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !
( http://rohanupalekar.blogspot.in )
आजच्याच तिथीला, दि.९ फेब्रुवारी १९५५ च्या मध्यरात्री काशी क्षेत्री प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. आज त्यांची ६५ वी पुण्यतिथी आहे. योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज ज्यांना गुरुस्थानी मानीत असत असे प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज हे शक्तिपात संप्रदायातील एक विलक्षण अधिकारी विभूतिमत्व होते. यांच्याकडूनच वेधदीक्षेची एक परंपराशाखा सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांकडे आली.
प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचा जन्म दि.८ मे १८९२ रोजी वैशाख शुद्ध द्वादशीला चक्रवर्ती या भगवती ढाकेश्वरी मातेच्या पुजारी घराण्यात, बांगलादेशाची राजधानी ढाका येथे झाला. त्यांचे नाव श्री.योगेशचंद्र चक्रवर्ती असे होते.
बालपणापासून त्यांचा ओढा परमार्थाकडेच होता. मोक्षप्राप्तीसाठी तरुणपणी घरादाराचा त्याग करून देवीने दिलेल्या दृष्टांतानुसार ते पू.आत्मप्रकाश ब्रह्मचारी यांना शरण गेले. त्यांच्याकडून ब्रह्मचर्यव्रतासह शक्तिपातदीक्षा लाभून त्यांची साधना सुरू झाली. आपल्या श्रीगुरूंनी संन्यास घेतल्यावर लगोलग, १९१४ साली वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी त्यांनीही संन्यास घेतला. त्यांचे संन्यासनाम 'श्री.चिन्मयानंद सरस्वती' असे होते. पुढे दंडग्रहणानंतर ते 'प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज' म्हणून ओळखले जाऊ लागले. 
संन्यास नियमांच्या बाबतीत ते फार काटेकोर होते. लहान मुलासारखा सहज निर्मळ स्वभाव, तेजस्वी व तप:पूत चेहरा, मधुर बोलणे, अतीव कोमल अंत:करण आणि कडक शास्त्राचरण हे त्यांचे काही विशेष सद्गुण होते. पुण्यात प.पू.श्री.गुळवणी महाराजांकडे त्यांचे नेहमी येणे होई व बराचकाळ मुक्कामही असे. त्यांचा गळा खूप गोड होता व ते फार प्रेमाने अभंग म्हणत असत.
प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांच्या मुखावर एक विलक्षण तेज विलसत असे. कडकडीत ब्रह्मचर्याचे ते तेज होते. त्यांच्या नजरेला नजर देण्याची कोणाची हिंमत होत नसे. कोणाचाही खोटेपणा, मतलबीवृत्ती व लबाडी त्यांना खपत नसे. ते अतिशय कर्मठ तरीही ऋजू स्वभावाचे होते. त्यांना प्रवासाची आवड होती. त्यांचे हस्ताक्षर सुवाच्य आणि सुंदर होते. ते आलेल्या पत्रांना तत्परतेने उत्तरे लिहीत असत.
प.प.श्रीस्वामी महाराज अत्यंत निस्पृह होते. त्यांचे एक शिष्य श्री.शंकरराव मार्कंड यांनी त्यांना काशीमध्ये एक वास्तू बांधून दिली होती. प.प.श्रीस्वामी महाराजांची खरेतर इच्छा नव्हती, पण शंकररावांचा आग्रह पाहून त्यांनी होकार दिला. ते काशीला जात तेव्हा त्याच वास्तूमध्ये राहात असत. पण श्रीस्वामी महाराजांना त्या वास्तूचा काहीच मोह नव्हता. पुढे प्रारब्धवशात् शंकररावांची परिस्थिती खूप खालावली. ते पाहून स्वामी महाराज काशीला गेले, त्यांनी लगेच ती वास्तू विकून टाकली व आलेले सर्व पैसे श्री.शंकरराव मार्कंडांच्या स्वाधीन करून मोकळे झाले. ते पराकोटीचे निस्पृह व अनासक्त महात्मे होते.
प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचा शास्त्राचरणावर फार कटाक्ष होता. त्यांना कोणी थोडेही शास्त्रविरुद्ध वागले-बोललेले खपत नसे. ते स्वत:ही अगदी बिनचूक वागत असत. शक्तिपात दीक्षा देण्याच्या बाबतीत ते अत्यंत कठोर होते. आधी सव्वालाख गायत्री जप करायला लावत आणि मगच ते एखाद्याचा दीक्षेसाठी विचार करीत असत. कोणतेही विधिनिषेध न बाळगता, सरसकट दीक्षा दिलेल्या त्यांना अजिबात आवडत नसत. दीक्षा ही "लेने देने की नही होने पाने की बात है ।" असे ते नेहमी म्हणत असत. शक्तीची आज्ञा असल्याशिवाय दीक्षाच होत नाही, म्हणून कोणीही आपल्याच मनाने दीक्षा देऊन चालतच नाही, असे ते वारंवार सांगत असत. "मुझे दल बढाना नहीं है । दीक्षा क्या सस्ती चीज है जो मैं बाँटता फिरू?" असे ते स्पष्ट सांगत असत.
दुर्दैवाने त्यांना मनस्वी खेद होईल असे चुकीचे वर्तन आजमितीस शक्तिपातदीक्षेच्या नावाखाली सर्वत्र बोकाळले आहे. जो उठतो तो शक्तिपात दीक्षाच द्यायला लागतो सध्या. त्यात फेसबुक व व्हॉटसपवर देखील दिवसागणिक नवनवीन दीक्षाधिकारी महाराज जन्माला यायला लागले आहेत. अशा भोंदूंकडून दीक्षा झालेल्या एकाही व्यक्तीला कसलाही पारमार्थिक अनुभव आलेला ऐकिवात नाही. केवळ मानसिक स्तरावरील भ्रमांनाच हे तथाकथित गुरु अनुभव असे गोंडस नाव देऊन भोळ्या भाबड्या साधकांची दिशाभूल करीत असतात. हा सगळा खोटारडेपणा आहे, लोकांची शुद्ध फसवणूक आहे, हे पक्के ध्यानात ठेवावे. आज श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज देहात असते तर अशा दीक्षेचा बाजार मांडणाऱ्या भोंदू मंडळींवर त्यांनी अक्षरश: कोरडे ओढले असते. कारण दीक्षेच्या बाबतीत ते अत्यंत काटेकोर व कर्मठच होते. पण शेवटी 'कालाय तस्मै नम: ।' हेच खरे.
वयाच्या बासष्ठाव्या वर्षी, माघ कृष्ण तृतीया, दि.९ फेब्रुवारी १९५५ रोजी मध्यरात्री काशीक्षेत्रामध्ये प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यांनीच पूर्वसूचना देऊन ठेवल्याप्रमाणे त्यांचे पार्थिव दगडी पेटीमध्ये घालून गंगार्पण करण्यात आले. प.प.श्री.लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचे चरित्र आणि त्यांचा उपदेश साधकजनांसाठी सदैव मार्गदर्शक आहे. म्हणून आपण त्यांच्या चरित्राचा डोळस अभ्यास करणे अगत्याचे आहे.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

1 comments:

  1. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज चरित्र सुधारित अवतरणिका https://ramkrishnahari24.blogspot.com/2021/05/blog-post.html

    ReplyDelete