17 Feb 2020

श्रीदासनवमी



आज श्रीदासनवमी ! 
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांची ३३८ वी पुण्यतिथी. 
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज हे आपले परमादर्श आहेत. विवेक विचाराच्या साहाय्याने नेटका प्रपंच करीतच, आतून मात्र परमार्थाची भूमिका पक्की करण्याचा मोलाचा उपदेश त्यांनी केला. आपल्या या बोधानुसार वर्तन करणाऱ्या महंतांची व शिष्यांची मोठी फौज तयार करून समाजात सद्धर्माची स्थापना केली. मोगलांच्या अत्याचारांनी पिडलेल्या जनतेला स्वराज्याचे महत्त्व पटवून दिले आणि त्याचवेळी रामकथेचा कल्लोळही केला. प्रत्येक कार्याला श्रीभगवंतांचे अधिष्ठान हवेच, हेही सर्वांना पटवून दिले. किती वैविध्यपूर्ण कार्य केले आहे श्री समर्थांनी. खरोखर त्यांच्यासारखे तेच, अद्वितीय !
_'स्वत:बरोबरच इतरांचेही कल्याण साधण्यास तत्पर असणाऱ्या जागृत तरुणांस समर्थ श्री रामदासादि संतांनी केलेल्या मार्मिक बोधाचे विवेचन'_ करणाऱ्या माझ्या 'जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा' या ग्रंथाच्या 'प्राक्कथना'त प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "महाराष्ट्राच्या संतमांदियाळीत समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचे स्वत:चे असे एक स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्ण आणि स्फूर्तिदायक स्थान आहे. शिवकालापासून आजपर्यंत होऊन गेलेल्या प्रत्येक पिढीला त्यांच्या ओजस्वी विचारांनी प्रभावित केलेले आहे. त्यांच्या इतके अचूक, व्यावहारिक बाजूंनीही नेटके असे कालोचित मार्गदर्शन परमार्थाच्या प्रांतात क्वचितच बघायला  मिळते. आजच्या काळातही त्यांच्या तेजस्वी विचारांची, प्रखर ध्येयवादाची आणि राष्ट्रकेंद्रित चळवळीची योग्य दिशा दाखविणाऱ्या सर्वांगीण चिंतनाची युवावर्गाला तेवढीच गरज आहे. श्री समर्थांचा तळमळीचा उपदेश हे सर्वार्थांनी 'यत्नोपनिषद'च आहे. श्री समर्थांच्या वाङ्मय महासागरातून असंख्य तेजोमय विचाररत्ने अभ्यासकांच्या हाती येऊ शकतात, त्यांचे वाङ्मय हे आयुष्याच्या यथायोग्य, मजबूत आणि सुसंस्कृत जडणघडणीला सर्व बाजूंनी साह्य करू शकते !"
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे वर सांगतात त्याप्रमाणे, समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांच्या मौलिक उपदेशानुसार आपण सदैव चाललो, वागलो तर ; 
मनाची शतें ऐकतां दोष जाती ।
मतीमंद ते साधना योग्य होती ।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगीं 
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ॥२०५॥
ही श्री मनोबोधाची फलश्रुती आपल्याही बाबतीत सत्य ठरेल आणि आपलाही जन्म धन्य होईल !
आज सद्गुरु श्री समर्थांना श्रीदासनवमीच्या पुण्य पर्वावर मनोभावे सादर दंडवत घालून त्यांच्या श्रीचरणीं, "आम्हांला सद्गुरुप्रदत्त साधनेसाठी सामर्थ्य प्रदान करावे", अशी कळकळीची प्रार्थना करू या आणि सद्गुरुस्मरणात झडझडून प्रयत्नांना लागू या !!
सद्गुरु श्री समर्थांच्या चरित्र आणि कार्यावरील अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे. त्या लिंकवर जाऊन प्रस्तुत लेख आजच्या पावन दिनी आवर्जून वाचावा ही प्रार्थना !!
राम तोचि रामदास
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment