15 Feb 2020

जय जय वो प्रेमळे



सोमवार दि.२५ फेब्रुवारी २०१९, माघ कृष्ण सप्तमी, श्रीशके १९४०. 
नेहमीप्रमाणे दिवस उगवला. माझ्याकडे मुख्य मंदिरातली पूजा असल्याने मी पहाटे स्नान करून मंदिरात गेलो, देवांचा जयजयकार होऊन सहा वाजता काकडेआरती सुरू झाली. भूपाळी म्हणून झाल्यावर काकडेआरती ओवाळणे चालू असताना अचानक माझ्या हातातला काकडा खाली पडून शांत झाला. गेल्या दहा वर्षात एकदाही असे कधीच घडले नव्हते. मला वाईट वाटले, पण लगेच मी तो काकडा उचलून पुन्हा पेटवला व आरती पूर्ण केली. नंतरच्या पूजेत मी ते विसरूनही गेलो. 
पूजेनंतर देवांची आरती झाल्यावर तबकातून निरांजन काढून ठेवताना, कसा कोण जाणे पण तबकाला धक्का लागला व ते निरांजन जमिनीवर पालथे पडले, दिवा शांत झाला. सकाळपासून असे काय होते आहे काहीच कळेना. मी क्षमा मागून ते निरांजन पुन्हा पेटवले व कट्ट्यावर ठेवून दिले. दोन वेळा असे विचित्र घडल्यामुळे जरा अस्वस्थ झालो होतो.
पूजेनंतरच्या नित्याच्या वाचनात, प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे ओवीबद्ध चरित्र असलेल्या 'श्रीगुरुसाहस्री'चा ओघाने नेमका शेवटचा, पंचविसावा अध्याय आला. प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या देहत्यागाचे वर्णन करणाऱ्या त्या अध्यायाने नित्य पारायणाची समाप्ती झाली.
त्या दिवशी सोमवार असल्याने श्रीक्षेत्र दत्तधामचे मंदिर दर्शनासाठी बंद होते. सकाळी ११ च्या सुमारास पुण्यातून काही लोक दर्शनासाठी आले. त्यांना बाहेरच फक्त प्रसाद दिला व त्यांच्याशी बोलत होतो. त्यातील एका भगिनींनी पू.सौ.ताईंची खूप आठवण काढली व त्यांना भेटण्याची खूप वर्षांपासून तीव्र इच्छा असल्याचे सांगितले. त्यानंतर पुण्यातील एका साधक भगिनींचा फोन आला, त्याही पू.सौ.ताईंबद्दलच बोलल्या. एकूण काय, प.पू.सौ.ताईंची आठवण त्या दिवशी सारखीच निघत होती.
या सर्व गोष्टी नक्की काही विशेष संकेतच करीत होत्या, पण माझ्या अल्पबुद्धीने तो ग्रहण केला नाही. संध्याकाळी पावणेपाच वाजता त्या संकेतांचा खुलासा झाला. प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचा फोन आला व त्यांनी सांगितले, "प.पू.सौ.ताईंनी चार वाजता देह ठेवला !" अंगावर वीज कोसळावी तसे झाले. एकदम सुन्नच व्हायला झाले होते.  
आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. काळ किती भरभर जातो ना !
भक्तवत्सल भक्ताभिमानी प.पू.सद्गुरु मातु:श्री सौ.शकुंतलाताई आगटे !!!!
प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या थोर उत्तराधिकारी, भक्तिशास्त्रातल्या साक्षात् नगाधिराज हिमालय आणि अलौकिक, अद्भुत अशा दैवी विभूतिमत्वाच्या धनी असणाऱ्या प.पू.सौ.ताई या प्रत्यक्ष चालता-बोलता चमत्कारच होत्या. महद्भाग्याने व श्रीभगवंतांच्या असीम दयाकृपेने आम्हां लेकरांना त्यांचा पावन सहवास लाभला. 
आत्मसंस्थ महात्म्यांची शास्त्र-संत-कथित सर्व दैवी लक्षणे ज्यांच्या ठायी पूर्ण बहरलेली होती अशा आमच्या प.पू.सौ.ताईंचे व्यक्तिमत्व अत्यंत लोभस होते. त्यांच्या संपर्कात एखादी व्यक्ती एकदा जरी आली तरी ती कायमचीच त्यांची होऊन जात असे. त्यांच्या विषयी प्रत्येकालाच इतका प्रेमजिव्हाळा वाटायचा की आपले आपल्यालाही त्याचे अप्रूप वाटावे. 
प्रचंड ऊर्जेने भारलेले, सतत कार्यमग्न असणारे, कधीच किंचितही नकारात्मक न होणारे, समोरच्याला सदैव आपलेसे करून वागविणारे, कोणताही आप-परभाव नसणारे, अतीव नम्र तरीही करारी असणारे, खोटेपणाला कधीच कसलाही थारा न देणारे, अखंड श्रीभगवंतांशी एकरूप होऊन वावरणारे आणि परमप्रेमाने ओसंडून वाहणारे प.पू.सौ.ताईंचे सोज्ज्वळ, सात्त्विक विभूतिमत्व अद्वितीय-उत्तमच होते !
म्हणूनच तर, पू.सौ.ताईंनी देहत्याग केल्याची बातमी ऐकून, विविध जाती-धर्मांचे, विभिन्न पंथ-संप्रदायांचे जगभरातील अक्षरश: हजारो आबालवृद्ध स्त्रीपुरुष व्याकूळ झाले, सैरभैर झाले, हमसाहमशी रडले. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली, श्रीसंत तुकाराम महाराज, समर्थ श्री रामदास स्वामी महाराज यांसारख्या थोर महात्म्यांच्या देहत्यागानंतर त्यावेळच्या भाविक लोकांची जशी स्थिती झाली असेल, अगदी तशीच स्थिती पू.सौ.ताईंच्या देहविसर्जनानंतर झाली होती. लोकांना कित्येक दिवस लागले त्यातून बाहेर पडायला. पू.सौ.ताई नेहमी एक वाक्य सांगत असत की, "पू.श्री.मामा म्हणायचे, 'आपल्या मागे लोकांना भांडायला काही ठेवू नये, रडायला ठेवावे'." पू.सौ.ताईंनी आपल्या श्रीसद्गुरूंचे हे वाक्य शब्दश: खरे करून दाखवले.
जन्मसिद्ध अवतारी महात्मे हे श्रीभगवंतांसारखे सर्व दैवी सद्गुणांनी संपन्नच असतात. श्रीभगवंतांच्याच मुखाने श्री माउली याचे रहस्य सांगताना म्हणतात, 
मी जैसा अनंतानंद । जैसाचि सत्यसंध ।
तैसेचि ते भेद । उरेचि ना ॥ज्ञाने.१४.२.५४॥
"पार्था, मी जसा अनंत आहे, अखंड आनंदस्वरूप आहे, जसा सत्यसंकल्प आहे, तसेच माझ्याशी सर्वभावे एकरूप झालेले ते महात्मेही अनंतानंदरूप व सत्यसंकल्प असतात. माझ्याशी पूर्णपणे मिसळून गेल्याने तेही परिपूर्ण होऊन ठाकलेले असतात. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कसलाच भेद उरलेला नसतो !" आमच्या प.पू.सद्गुरु सौ.ताई देखील अशा अंतर्बाह्य भगवत्स्वरूपच होत्या. म्हणून तर त्यांच्या कर्तुमकर्तुम् सामर्थ्याचे अक्षरश: लक्षावधी अनुभव पूर्वी असंख्य भक्तांनी घेतलेले आहेत, आजही घेत आहेत व उद्याही घेणार आहेतच. हे त्यांच्या ठायीच्या भगवद्-अवतारित्वाचे सम्यक दर्शनच म्हणायला हवे.
प.पू.सौ.ताईंच्या स्वभावाचा निखळ प्रेम हाच स्थायीभाव होता. त्यांना समोरच्यावर निरपेक्ष आणि अपरंपार प्रेम करणेच केवळ माहीत होते. त्यांनी जरी समोरच्या व्यक्तीचे दोष जावेत, त्याच्या परमार्थाच्या आड येणाऱ्या सवयी सुटाव्यात म्हणून क्वचित् प्रसंगी लटक्या रागाचा आविर्भाव धारण केला, तरी त्यातही मूळचा भाव प्रेमाचाच असे. सद्गुरु श्री माउली म्हणतात ना, "मातेच्या कोपी थोकले । प्रेम दिसे ॥" अगदी तसेच. आईने कृतक् कोपाने लेकराला धपाटा जरी घातला, तरी त्यात त्याचे हितच तर तिला अपेक्षित असते ना ! 
प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या दैवी प्रेमाच्या अमृतस्पर्शाने अनेकांची जीवने धन्य झाली, असंख्यांच्या परमार्थाचा मार्ग प्रशस्त झाला आणि हजारो भक्तांच्या हृदयात श्रीभगवंतांचे अधिष्ठान स्थिर झाले. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक जीव काही अंशी श्रीभगवंतांना सन्मुख झाला, श्रीभगवंतांच्या जवळ गेला हे नि:संशय. आज त्यांच्या नुसत्या आठवणीनेही भक्तांचे भगवद्-अनुसंधान वाढते आहे, यातच त्यांच्या कार्याचे अलौकिकत्व समजून येते.
प.पू.सौ.ताईंचे जीवन हा एक विलक्षण चमत्कारच आहे. फार पूर्वी एकदा त्या मला म्हणाल्या होत्या, "अरे रोहन, एखादा चमत्कार पाहायला मिळाला म्हणून त्याचे काही अप्रूप वाटून घेऊ नकोस. देवांच्या, सद्गुरूंच्या राज्यात क्षणोक्षणी असे चमत्कार घडतच असतात. त्यांची सवय लावून घे !" गेल्या वीस वर्षांच्या काळात मला लाभलेल्या त्यांच्या पावन सहवासातील प्रत्येक दिवसाला एकाहून एक भन्नाट चमत्कार आम्ही अनेकांनी समोर अनुभवलेले आहेत. केवळ आम्हीच नाही तर आमच्या श्रीक्षेत्र दत्तधामच्या कणाकणाने असे अद्भुत चमत्कार असंख्य वेळा अनुभवलेले आहेत. पू.सौ.ताईंच्या हातातच पाने फुटलेल्या कांडीपासून तयार झालेला, मंदिरामागे लावलेला कुंद त्याची साक्ष देत अजूनही भरभरून फुलतोय. हा एकच नाही, अनेक चमत्कार आहेत असे. खरोखरीच, त्यांच्या सहवासातला प्रत्येक क्षण हा एक चमत्कारच होता. हीच अनुभूती जगभरातले त्यांच्या संपर्कात आलेले लाखो लोक नेहमीच सांगतात.
ध्रुवीय प्रांतातील अतिशीत ग्रीनलँड, फिनलँड सारख्या दूरच्या देशांपासून ते पार दक्षिणेतील ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पर्यंत, तसेच संपूर्ण अमेरिका, अाफ्रिका, युरोप, जपान, सिंगापूर, दुबई, मस्कत अशा अगणित देशांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये पू.सौ.ताई निर्भयतेने वावरल्या. हजारो साधकांना त्यांनी परमार्थाचे मार्गदर्शन केले, शेकडो प्रवचनसेवा करून विशुद्ध परमार्थाचा प्रसार केला, वेळ आलेल्या जीवांना दीक्षा देऊन परमार्थपथावर अग्रेसर केले. आजमितीस जगभरातील असंख्य साधकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या पू.सौ.ताईंनी खरोखरीच लाखो लोक अत्यंत प्रेमाने जोडलेले होते. इतक्या सर्वांशी निर्मळ स्नेहसंबंध असूनही त्या कशातही गुंतलेल्या नव्हत्या, कायम अलिप्तच होत्या. कारण त्या सदैव, अखंडितपणे श्रीभगवंतांशीच जोडलेल्या होत्या, त्यांच्याशीच अंतर्बाह्य एकरूप झालेल्या होत्या.
प.पू.सौ.ताई अतिशय खिलाडू वृत्तीच्या होत्या. त्या शाळा-कॉलेजच्या काळात स्वीमिंग आणि टेनिसच्या नॅशनल चँपियन होत्या. त्यांना व्यायामाची मनस्वी आवड होती. अगदी वयाच्या पासष्ठाव्या वर्षी देखील हलासनासारखी अवघड आसने करताना मी त्यांना समक्ष पाहिलेले आहे. हीच खेळकर वृत्ती त्यांनी जन्मभर जोपासली. परमार्थ करायचा म्हणजे गंभीर असावे, तोंड पाडूनच बसावे वगैरे त्यांना कधीच मान्य नव्हते. त्यांनी स्वत: अतिशय आनंदात परमार्थ केला व तसाच इतरांनाही करायला शिकवला. त्यांचे विचार सदैव सकारात्मकच असायचे. त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्यांच्याही मनाची मरगळ तत्क्षणी निघून जात असे.
प.पू.सौ.ताईंची निरूपणशैली अत्यंत हृद्य आणि सहजसोपी आहे. त्या जड शब्द कधीही वापरत नाहीत. घरगुती, दैनंदिन जीवनातली उदाहरणे देऊन विषय समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांची आजवर प्रकाशित झालेली चौतीस पुस्तके वाचताना आपल्याला याचा उत्तम प्रत्यय येतो. त्यांच्या वाङ्मयाचा विशेष म्हणजे त्या सांगत असलेल्या 'व्रजकथा' होय ! आजवरच्या इतर कोणत्याही संतसाहित्यात या व्रजकथा आलेल्या नाहीत. त्यांनी स्वत: अनुभवलेल्या भगवान श्रीकृष्ण, भगवती श्रीराधाजी आणि गोपगोपींच्या त्या अनवट आणि मनोहर कथांमुळे पू.सौ.ताईंचे वाङ्मय अत्यंत अद्भुत व रमणीयच ठरते. शिवाय त्यांची संतवाङ्मयाचा योगार्थ, गूढार्थ विशद करण्याची हातोटी तर एकमेवाद्वितीयच म्हणावी लागेल. श्रीवामनराज प्रकाशनाने पू.सौ.ताईंचे समग्र वाङ्मय प्रकाशित करून तुम्हां-आम्हां भाविकांवर, संतवाङ्मयाच्या अभ्यासकांवर प्रचंड मोठे ऋणच केलेले आहे, यात तीळमात्र शंका नाही. परमार्थ मार्गावरील पथिकांसाठी प.पू.सौ.ताईंचे वाङ्मय ही अनुपमेय अशी संपत्तीच आहे !
प.पू.सौ.ताई म्हणजे करुणेची साक्षात् श्रीमूर्तीच होत्या. या लेखासोबत शेयर केलेले त्यांचे छायाचित्र पाहावे, त्यांच्या नेत्रांमध्ये तीच अपरंपार करुणा घनावलेली स्पष्ट दिसते. सद्गुरु श्री माउलींनी तेराव्या अध्यायात अहिंसेचे वर्णन करताना, डोळ्यांच्या माध्यमातून साकारणाऱ्या अहिंसेचे सुरेख वर्णन केले आहे. प.पू.सौ.ताईंच्या नेत्रांकडे पाहिले की मला त्या सर्व ओव्या जणू तेथे प्रत्यक्ष साकारल्या सारख्याच वाटतात. त्यांची अपरंपार करुणा आम्हां लेकरांवर भरभरून बरसली आणि यापुढेही बरसेल ह्याची मला खात्री आहे.
पू.सौ.ताई अतिशय प्रसिद्धिपराङ्मुख होत्या. त्यांनी आपल्या हयातीत कधीच स्वत:चे माहात्म्य वाढू दिले नाही. श्रीदत्तसंप्रदायाचे जगभर एवढे प्रचंड कार्य केले, पण कधीच कुठे त्याची वाच्यता केली नाही. कधी चुकून सुद्धा आपला सत्कार करून घेतला नाही की पाद्यपूजा करून घेतल्या नाहीत. सर्वकाळी श्रीसद्गुरूंचेच माहात्म्य त्यांनी वाढवले, पण स्वत:ला पूर्ण झाकूनच ठेवले. त्यांच्या महासमाधीनंतर 'श्रीवामनराज' त्रैमासिकाने व 'अमृतबोध' मासिकाने त्यांच्यावर विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्या अंकांमधून आपल्याला त्यांचा अतिशय भव्य-दिव्य आणि कल्पनेतही न मावणारा मोठेपणा स्पष्टपणे जाणवतो. त्यातील एकेक प्रसंग वाचून आपण अक्षरश: विस्मयचकित होऊन नतमस्तकच होतो. खरोखर हे सर्व विशेषांक संग्रही ठेवावेत व वारंवार वाचावेत असेच अद्भुत झालेले आहेत. याहीवर्षी प.पू.सौ.ताईंवरचा अमृतबोध मासिकाचा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. तोही वाचनीय, मननीय आहे.
प.पू.सौ.ताईंनी दोन वर्षे आधीच आपल्या देहत्यागाची तारीख, वार, वेळ सांगून ठेवली होती. त्यांना श्रीसद्गुरूंचा इच्छा मरणाचा आशीर्वादच होता. त्यानुसार त्यांनी सांगितलेल्या वेळी स्वइच्छेने आपल्या नश्वर देहाचा त्याग केला व त्या विश्वरूप झाल्या. या लेखात त्यांच्याबद्दल लिहिताना क्रियापदांचे भूतकाळाचे रूप वापरताना खरंच खूप क्लेश होत आहेत. त्या देहात असतानाही भगवत्स्वरूपच होत्या, त्यामुळे देह ठेवून वेगळे काही घडलेले नाही, त्या आजही आहेतच. हे जरी सर्व खरे असले व मनाला पटत असले, तरीही त्यांचे ते सगुण रूप आज आपल्या समोर नाही, हेही दाहक वास्तवच आहे ना ! आपल्या तना-मनावर मायेची फुंकर घालणारी, कौतुकाने पाठीवरून हात फिरवणारी, काही चुकल्यास कान पकडून चूक दाखवून देणारी, हाताला धरून वेगवेगळ्या गोष्टी प्रेमाने शिकवणारी त्यांची ती अपार वात्सल्यमय मातृमूर्ती आज आपल्या पुढे नाही, ह्याची बोचरी जाणीव खूपच असह्य आहे !
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा आपल्या 'श्रीगुरुसाहस्री' ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायात म्हणतात, 
कलश जरी सुवर्णाचा । ग्रास करी कां सागराचा ।
तैसी गुरुवर्णना वाचा । पुरे केवी ॥२५.४८॥
श्रीसद्गुरूंच्या यशाचे, त्रिभुवनाला पावन करण्याऱ्या त्यांच्या गुणमाहात्म्याचे वर्णन करणे जिथे प्रत्यक्ष शब्दब्रह्मालाही शक्य नाही, तिथे आपली काय कथा ? प.पू.सौ.ताईंच्या बाबतीतही तेच पूर्णसत्य आहे. म्हणून मीही आता त्यांच्या श्रीचरणीं दंडवतपूर्वक शरण जाऊन मौनावतो !
माघ कृष्ण सप्तमी हा श्रीसंत गजानन महाराजांचा प्रकटदिन. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज ज्यांना गुरुस्थानी मानीत, त्या फलटण जवळील लाटे या गावातील महायोगिनी प.पू.आईसाहेब महाराज यांची हीच पुण्यतिथी आहे. प.पू.सौ.शकुंतलाताईंनी याच तिथीला देह विसर्जन केल्याने, माघ कृष्ण सप्तमी ही आपल्यासाठी परमश्रेष्ठ पुण्य-तिथी बनलेली आहे. 
अनुत्तरभट्टारिका महारासेश्वरी प.पू.सद्गुरु मातु:श्री सौ.शकुंतलाताई आगटे यांच्या श्रीचरणीं प्रथम पुण्यतिथी निमित्त अनंतकोटी साष्टांग दंडवत प्रणाम !! 
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी, प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या अद्वितीय माहात्म्याचे यथायोग्य वर्णन आपल्या 'प्रेमसुमनांजली' मधून केलेले आहे. त्याच अतीव मधुर अशा रचनेने माझ्या या अल्पशा शब्दपूजेची सांगता करतो आणि प.पू.सद्गुरु.सौ.ताईंच्या श्रीचरणीं "दया पांघुरवी माते" अशीच कळकळीची प्रार्थना करतो !
जय जय वो प्रेमळे । श्रीकृष्णरस वेल्हाळे ।
निजभक्तप्रतिपाळे । मातृमूर्ते ॥१॥
जय जय वो सुधन्ये । सद्गुरुराजकन्ये ।
गोपगोपांगनामन्ये । सौख्यमूर्ते ॥२॥
जय जय वो सुखदे । परमपतिप्रमदे ।
सकलगुणसंपदे । शांतिमूर्ते ॥३॥
जय जय वो राधिके । प्रपंचभ्रमछेदिके ।
स्वात्मसुखवर्धिके । भक्तिमूर्ते ॥४॥
जय जय वो सुनंदे । श्यामरतिवरकंदे ।
परापरिश्रुतछंदे । रासमूर्ते ॥५॥
जय जय वो अमृते । गोपालहृदयस्थिते ।
दया पांघुरवी माते । विश्वमूर्ते ॥६॥
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातु:श्री शकुंतलाताई की जय ।
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment