5 Feb 2020

माघी वारी : श्री हरिबुवा एकादशी


आज माघ शुद्ध एकादशी, पंढरपूरची माघी वारी !
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज ज्यांना गुरुस्थानी मानत असत, त्या फलटण नगरीच् भूषण महायोगी श्रीसंत हरिबाबा महाराजांची आज १२२ वी पुण्यतिथी ! 
श्रीसंत हरिबाबा महाराज हे अवलिया सत्पुरुष होते. त्यांच्या जन्मापासूनचे पूर्ववृत्त काहीच माहीत नाही. इ.स.१८७५ साली अाश्विन महिन्याच्या शुद्ध द्वादशीला ते फलटणच्या उघड्या मारुती मंदिरात प्रथम प्रकटले. त्याआधी काही काळ ते नातेपुते, शिखरशिंगणापूर, माळेगाव, पणदरे इत्यादी गावांमधून राहात होते. मात्र इ.स.१८७५ पासून त्यांचे २४ वर्षे याच पुण्यभूमीत वास्तव्य झाले. त्यांच्या चरित्रातील हकिकती अत्यंत अलौकिक असून भक्तांची श्रद्धा वाढविणाऱ्या आहेत. आजही श्रीसंत हरिबुवा महाराजांच्या कृपेचे अद्भुत अनुभव भाविकांना येत असतात. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी श्रीहरिबाबांचे "विभूती" नावाने अप्रतिम चरित्र लिहिलेले आहे. त्याची लिंक खाली देत आहे. हे सुरेख चरित्र सर्वांनी आवर्जून वाचावे ही विनंती. 
श्रीसंत हरिबाबा महाराजांनी इ.स.१८९८ मध्ये आजच्या तिथीला समाधी घेतली. त्यांचे भव्य समाधी मंदिर फलटणला बाणगंगा नदीच्या काठावर उभे आहे. प.पू.श्री.काका दररोज या मंदिरात दर्शनाला जात असत व आपल्याकडे आलेल्या सर्व भक्तांनाही आवर्जून श्री हरिबुवा महाराजांच्या दर्शनाला पाठवीत असत. प.पू.श्री.काकांनी श्रीसंत हरिबुवा महाराजांची सुरेख पितळी मूर्ती बनवून घेऊन त्यांच्या समाधीच्या मागे तिची स्वहस्ते स्थापना केलेली आहे. लेखासोबतच्या फोटोमध्ये त्याच श्रीमूर्तीचे आपल्याला दर्शन होत आहे.
आजच्या एकादशीला फलटण पंचक्रोशीत मोठ्या आदराने "हरिबुवांची एकादशी" असे संबोधले जाते. त्यांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी आज प्रचंड गर्दी असते. राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य परंपरेतील महान अवधूत विभूतिमत्व श्रीसंत हरिबाबा यांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
'विभूती' चरित्राची लिंक'
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment