25 Feb 2020

दया पांघुरवी माते विश्वमूर्ते



आज २५ फेब्रुवारी २०२०.
परमाराध्या प.पू.मातु:श्री सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे यांना देहत्याग करून आज तारखेने एक वर्ष पूर्ण झाले. दिवस किती भरभर जातात हे त्या ओघात कळतच नाही, पण नंतर त्या गेलेल्या दिवसांची जाणीव झाली की कसेसेच होते.
प.पू.सौ.ताईंनी पूर्वसूचना देऊन २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली. महात्मे देहात असतानाच भगवत्स्वरूप झालेले असल्याने, देह सोडल्यावर उलट त्या देहाच्या सर्व मर्यादांचा त्याग करून विश्वरूप होतात. देहात असताना त्यांना आपले कर्तुमकर्तुम् सामर्थ्य प्रकटपणे वापरता येत नाही, पण तेच देहाची खोळ सांडल्यावर अधिक वेगाने व पूर्ण प्रभावाने त्यांच्या कार्याला सुरुवात होते. हा शास्त्रांचा नियमच असल्याने, प.पू.सौ.ताईंच्या बाबतीतही हेच पाहायला मिळाले. 
प.पू.सौ.ताईंचे लोभस व्यक्तिमत्व इतके प्रभावी व जबरदस्त होते की, त्यांच्या स्मरणाशिवाय एकही दिवस जात नाही. पदोपदी त्यांची आठवण येतेच आणि मनातले काहूर अजून दाटून येते. लौकिकातल्या त्यांच्या पावन सहवासाला अंतरल्याची दुखरी जाणीव आतून फार क्लेश देते. 
संतांचे चिन्मय अस्तित्व हे त्यांच्या वाङ्मयातून आणि स्मरणातून, त्यांच्या लीलाकथांमधून अजरामर झालेले असतेच. "न तस्य प्राणा: उत्क्रामन्ति ।" हे उपनिषद् वचन खरेच आहे. त्या भगवत्स्वरूप झालेल्या महात्म्यांचे प्राण उत्क्रान्त होत नाहीत. कारण त्यांचे प्राण देहत्यागापूर्वीच त्या प्राणांचे जन्मस्थान असलेल्या भगवती शक्तीमध्ये विलीन झालेले असतात. म्हणूनच, प.पू.सौ.ताईंच्या नुसत्या स्मरणानेही अनेकांचे अष्टसात्त्विक भाव जागे होतात, अचानक दिव्य सुगंधाची अनुभूती येऊ लागते, आतूनच आनंदाच्या अविरत ऊर्मी येऊ लागतात आणि बरेच काही अनुभव येतात. असे दिव्य अनुभव गेल्या वर्षभरात जगभरातील असंख्य भाविकभक्तांनी घेतलेले आहेत. हीच प.पू.सौ.ताईंच्या चिन्मय अस्तित्वाची जागती प्रचिती आहे !
आज पू.सौ.ताईंच्या तारखेने प्रथम स्मृतिदिनानिमित्त, आपणही त्यांच्या पावन स्मरणगंगेत प्रेमपूर्वक अवगाहन करू या, त्यांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक दया-प्रार्थना करू या आणि त्यांच्या श्रीचरणांच्या सादर स्मरणाने, सप्रेम वंदनाने पावन होऊ या !

[ प.पू.सौ.ताईंच्या प्रथम पुण्यतिथी दिनी, माघ कृष्ण सप्तमीला, त्यांच्यावर लिहिलेला जय जय वो प्रेमळे हा लेख खालील लिंकवर वाचता येईल. ज्यांनी तो आधी वाचलेला नाही, त्यांनी आवर्जून वाचावा ही विनंती.
जय जय वो प्रेमळे

आमच्या अमृतबोध मासिकाचा फेब्रुवारी २०२०चा अंक हा 'प.पू.सद्गुरु.सौ.शकुंतलाताई आगटे प्रथम पुण्यतिथी विशेषांक' म्हणून प्रकाशित झालेला आहे. या सर्वांगसुंगदर अंकाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रस्तुत अंकात प.पू.सौ.ताईंच्या अप्रतिम बोधावर आधारलेला एक लघुलेख मी लिहिला आहे. तो "संस्कारांची शिदोरी" हा लघुलेख आजच्या पुण्यदिनी आपल्यासोबत शेयर करीत आहे. हा संपूर्ण अंक तर उत्तम आहेच, पण एकूणच अमृतबोध मासिक हे भाविकभक्तांनी सदैव मनन-चिंतनात ठेवावे असे वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे आहे.

*** *संस्कारांची शिदोरी* ***
श्रीक्षेत्र दत्तधाम येथे प.पू.सद्गुरु सौ.ताई असतानाचा प्रसंग आहे. दिवसभराची सेवा झाल्यावर सगळे स्वयंसेवक प.पू.सौ.ताईंच्या समवेत चहापानासाठी जमले होते. हे रोजचे चहापान हा अनौपचारिक असे शंकासमाधानच असायचे. त्याद्वारे प.पू.सौ.ताई व प.पू.श्री.दादा सर्वांच्या मनावर विविध प्रसंगांच्या माध्यमातून, संतांच्या कथांच्या माध्यमातून साधनेचे महत्त्व ठसवत असत.
एकदा 'मुलांवर संस्कार कसे करायचे ?' असा विषय चालू होता. प.पू.सौ.ताई म्हणाल्या, "संस्कार हे प्रयत्नपूर्वक वेगळे करायची गरज नाही. आपण एखादी गोष्ट निष्ठेने, मनापासून व सातत्याने करीत राहिलो की, आपल्या मुलांवर आपोआपच त्याचे उत्तम संस्कार होतात आणि असे झालेले संस्कारच पुढे टिकूनही राहतात. 
तुम्हांला मी एक घडलेले उदाहरणच सांगते. एकदा एका अमेरिकेतील साधकभगिनींनी मला प्रश्न विचारला, "अहो ताई, मी माझ्या मुलालाही परमार्थाचे प्रेम लागावे यासाठी काय प्रयत्न करू ?" त्यावर मी तिला सांगितले की, अशी जबरदस्ती करून कधीच संस्कार होत नाहीत. त्यापेक्षा तू न चुकता व प्रेमाने स्वत: परमार्थ करीत राहा, आपोआपच त्याच्यावर ते संस्कार होतील. 
तिला प्रथमत: माझे म्हणणे पटले नसावे, पण तिने मी सांगितले ते निष्ठेन पाळले. ती रोज न चुकता देवांची पूजा व साधना करीत असे. पुढे तिचा मुलगा मोठा झाल्यावर दुसरीकडे राहायला गेला. तो त्या घरी जाताना आईकडे आला व म्हणाला, "आई, तू रोज पूजा करतेस ती श्रीगणपतींची मूर्ती मला देशील का ? मी पण नव्या घरी तुझ्यासारखीच त्या मूर्तीची रोज पूजा करीत जाईन." 
मुलाचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यांत पाणी आले, तिनेही आनंदाने ती मूर्ती त्याला दिली. त्यानंतर तिने मला फोन करून हा सर्व प्रसंग सांगितला व म्हणाली, "ताई, तुम्ही जसे म्हणाला होतात तसेच घडले. मी तुमच्या सांगण्यानुसार रोज प्रेमाने पूजा करीत असे. त्याचा सुयोग्य संस्कार, काहीही न बोलता व कसलेही वेगळे प्रयत्न न करता माझ्या मुलावरही बरोबर झाला आणि आता तोही रोज पूजा करू लागला आहे. मनापासून धन्यवाद ताई !"
पाहा, संस्कार हे असे होत असतात. ते काही मारून-मुटकून करायचे नसतात. आपण प्रेमाने एखादी गोष्ट करीत राहिलो की आपले पाहून पुढे आपली मुलेही तसेच करतात. आपल्याच उपासनेतल्या सातत्याचा, आळस न करता केलेल्या साधनेचा असे संस्कार हाच सुपरिणाम असतो !" 
प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या या मौलिक उपदेशाने, समोर उपस्थित आम्हां सर्वांच्या अंत:करणात संस्कारांच्या शिदोरीची एक सुखद अनुभूती निर्माण झालेली होती ! 
प.पू.सौ.ताईंचे अद्भुत वाङ्मय हे त्यांचे अपररूपच आहे आणि तेही त्यांच्याच इतके वात्सल्यपूर्ण आहे. जो त्यांच्या या दैवी कृपावैभवसंपन्न वाङ्मयरूपाला अनन्य शरणागत होईल, त्याचा सर्वार्थाने सांभाळ करण्यासाठी हे मातृप्रेमरूप वाङ्मय कटिबद्ध आहेच. वानवा आहे ती अनन्य शरणागत भक्तांचीच. आता ती अनन्यता आपल्याला कशी साधेल, हे मात्र आपणच पाहायला हवे आणि त्यासाठीच सतत प्रयत्नशील राहायला हवे. 
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातु:श्री सौ.शकुंतलाताई की जय ।
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment