6 Feb 2020

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती



श्रीक्षेत्र गोंदवले !  हे नाव नुसते उच्चारले तरी डोळ्यांसमोर उभी राहते ती स्वानंदमग्न अशी गौरकाय, भव्य कपाळ, त्यावर वैष्णव गंध, हातात माळ, अंगावर लंगोटी लावलेली दिव्य आणि तेजस्वी आकृती ! आज त्याच थोर सत्पुरुष, प्रत्यक्ष श्रीमारुतिरायांचे अवतार, नामयोगी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची १७५ वी जयंती आहे !
श्रीमहाराजांनी त्याकाळी फार मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. हजारो लोकांना भगवद्भक्तीचा, रामनामाचा उपदेश करून सन्मार्गाला लावले. अक्षरशः अगणित अन्नदान करून लाखो गोर-गरीबांचा सांभाळ केला. दुष्काळात लोकोपयोगी रोजगाराची कामे काढून त्या बदल्यात पोटभर अन्न देण्याचा अभिनव उपक्रम राबविणारे श्रीमहाराज हे पहिले समाजसुधारक ! त्यांचे समग्र चरित्र अत्यंत विलक्षण घटनांनी भरलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले या गावी राहणाऱ्या श्री.रावजी व सौ.गीताबाई घुगरदरे या सात्त्विक दांपत्याच्या पोटी माघ शुद्ध द्वादशीला इ.स.१८४५ साली श्रीमहाराजांचा जन्म झाला. प्रत्यक्ष श्रीमारुतिरायांनीच हा अवतार धारण केला होता. या घराण्यात नित्याची पंढरीची वारी होतीच. भजन-कीर्तनाचे तर अखंड सत्र चालूच असे. एकादशीचा जागर संपून आरती चालूच होती, तेवढ्यात सकाळी श्रीमहाराजांचा जन्म झाला.
स्वभाव-वैशिष्ट्ये -
श्रीमहाराजांचे एक वैशिष्ट्य अगदी लहानपणापासून दिसे, ते म्हणजे ते अत्यंत मनमोहक होते. त्यांचे बोलणे, त्यांचे पाहणे समोरच्या माणसाच्या हृदयाचा ठावच घेत असे. आपल्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला सहज आपलासा करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्यापाशी होती. ते जसे अतिशय प्रेमळ आणि कोमल अंत:करणाचे  होते तसेच त्यांचे बोलणे नर्म विनोदी देखील होते. त्यांना बालपणी सगळे 'गणू' या नावाने संबोधत असत.
श्रीमहाराज लहानपणी अतिशय खेळकर होते. त्यांच्या वरकरणी भव्य, स्थूल शरीरात इतकी चपळता होती की ते वयाच्या पासष्टाव्या वर्षी देखील पळू लागले तर तरुण मुलेही सोबत पळू शकत नसत. ते खो-खो, आट्यापाट्यासारखे खेळ आवडीने खेळत, घोड्यावर बसण्याची कला त्यांना उत्तम अवगत होती. कसलेही खोडकर जनावर ते सुतासारखे सरळ आणीत. त्याचा लाडका 'बत्ताशा' नावाचा घोडा होता.
श्रीमहाराज स्वभावाने खूप सरळ होते. त्यांना क्रोध फारसा नव्हताच. कोणी त्यांच्या तोंडावर जरी त्यांची निंदा केली तरी ते कमालीचे शांत राहात. पण जर का कोणी भगवंतांविषयी, संतांविषयी किंवा नामाविषयी अनुद्गार काढले तर त्यांचे पित्त खवळत असे. मग ते हिरिरीने भांडावयास उठत.
श्रीमहाराज खूपच सुसंस्कृत होते. शास्त्रमर्यादांचे नेहमी पालन करीत. स्त्रियांविषयी आदराने बोलत. अपत्यांमध्ये मुलगा-मुलगी असा केलेला भेद त्यांना अजिबात आवडत नसे. त्यांची राहणी साधी, गरीबीची असली तरी अंत:करण राजाचेच होते. ते वागण्या बोलण्यातून कधीच कोणाचे मिंधे राहिले नाहीत. त्यांनी कायम लोकांवर उपकारच केले.
श्रीमहाराजांकडे मूळचीच श्रीमंती होती. तसाच त्यांचा हातही उदार होता. वैभव, ऐश्वर्य, अधिकार, मोठेपणा, मधुर वाणी, नम्रता, लीनता अशा असंख्य सद्गुणांचा सुरेख संगम त्यांच्याठायी होता. ते कायमच सगळ्यांशी लीनतेने वागत. त्यांनी आयुष्यात कधीही उद्धटपणाने वागणे-बोलणे केले नाही. "आपला अभिमान नष्ट होण्यासाठी लीनतेसारखे दुसरे साधन नाही. म्हणून भगवंतांच्या नामाला लीनतेची जोड द्यावी", असे ते आवर्जून सांगत असत आणि त्यांचे स्वत:चे आचरणही तसेच होते.
येहेळगांवचे श्रीसंत तुकामाई हे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या शिष्य परंपरेतील थोर सत्पुरुष होते. श्री तुकामाईंचा रामदासी परंपरेशीही हृद्य संबंध होता.  त्यांचा अनुग्रह श्री गोंदवलेकर महाराजांना बालपणीच लाभला. त्यांनी खडतर परीक्षा घेऊन या हिऱ्याला सुंदर पैलू पाडले. तुकामाईंची भेट होण्यापूर्वी लहानग्या गणुबुवांनी संपूर्ण भारतभर गुरुशोधार्थ भ्रमण केले होते. त्या दरम्यान त्यांना राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराज, श्रीसंत माणिकप्रभू महाराज, श्री रामकृष्ण परमहंस इत्यादी महान संतांची दर्शने व कृपाप्रसाद लाभला. श्री माउलींच्या कृपापरंपरेतील महायोगाचे अंतरंग साधन व रामदासी परंपरेतील उपासना यांचा सुंदर समन्वय श्री गोंदवलेकर महाराजांच्या ठायी झालेला दिसतो. श्रीमहाराज स्वत:ला प्रेमाने रामदासी म्हणवून घेत असत. ते सही 'ब्रह्मचैतन्यबुवा रामदासी' अशीच करीत असत. ते खरोखरीचे 'रामदास'च होते !
श्रीमहाराजांचा एक विलक्षण पैलू म्हणजे गोसेवा. त्यांचे गाईंवर उत्कट प्रेम होते. अगदी लहानपणापासून ते रांगत रांगत गोठ्यात जाऊन बसत असत. त्यांनी आपल्या आयुष्यात शेकडो गाईंची कसायांकडून सुटका केली. त्यांचे गोप्रेम इतके विलक्षण होते की, त्यांच्या आसपास एखाद्या गाईवर जबरदस्ती केली, मारझोड केली तर त्यांच्या घशात घास अडकत असे किंवा ते कासावीस होत. ते गोंदवल्याच्या जवळपासच्या गावांमध्ये जाऊन पैसे देऊन गाई सोडवून आणत आणि त्यांची उत्तम देखभाल करीत. महाराज समोर दिसताच सगळ्या गाई देखील दावे तोडून त्यांच्याकडे धावत येत. श्रीमहाराजांना आळसाचा आणि आळशी माणसांचा तिटकारा होता. सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत त्यांचे काम चालूच असे. "आळसाने आयुष्य फुकट जाते. आळस, दैन्यपणा आणि कपटीपणा या तीन करंटेपणाच्या खुणा आहेत. त्यांच्यापासून माणसाने दूर राहावे", असे ते आवर्जून सांगत.
सोपे तत्त्वज्ञान -
श्रीमहाराजांचे तत्त्वज्ञान अगदी सोपे ; अखंड रामनाम घ्यावे आणि भक्तवत्सल रामरायाला शरण जाऊन, आपला कर्तेपणा टाकून तो ठेवील तसे राहावे, ही त्यांची सोपी मांडणी. नाम हाच श्वास झाला पाहिजे, असे त्यांचे सांगणे होते. एखादा नाम घेतो म्हणाला तर ते त्याला हवे तसे वागत, काय पाहिजे ते देत, पण रामरायाचे प्रेमाने नाम घे असे म्हणत असत. त्यांनी भारतभर प्रचंड भ्रमंती करून अनेक मंदिरांची स्थापना केली. उपासना चालू करून दिली. त्यांनी लावलेले ते रामनामाचे सुवर्णबीज आज उभ्या जगाला सावली देणाऱ्या महाकाय वटवृक्षात परिणत झालेले आपल्याला पाहायला मिळते.
संत हेच खरे लोकशिक्षक असतात. समाजाची नाडी पारखून जसे व जेवढे रुचेल-पचेल तेवढेच ते लोकांच्या गळी उतरवतात व सहज बोलून, प्रेमाने आपलेपणा निर्माण करून  समाजाचा उद्धार करतात. श्रीमहाराज देखील असेच परिपूर्ण लोकशिक्षक होते. समर्थ श्री रामदास स्वामींना अभिप्रेत असणारी सर्व महंत लक्षणे त्यांच्याठिकाणी पूर्ण बहरलेली होती. त्यांनी प्रेमाने रूजवलेले रामनामाचे, गोरक्षणाचे आणि अन्नदानाचे रोपटे दीडशे वर्षे झाली, मोठ्या भव्य-दिव्य स्वरूपात गोंदवल्यात आजही नांदते आहे. यावरून त्यांच्या दूरदृष्टीची आणि त्यामागच्या अथक प्रयत्नांची कल्पना करता येईल.
श्रीमहाराज निरूपण फार छान करीत. त्यांची प्रेमळ वाणी रामनामाच्या अखंड अनुसंधानाने प्रभावी झालेली होती. ते अनेक मार्मिक गोष्टींची सुरेख योजना करीत करीत आपले म्हणणे श्रोत्यांच्या मनावर बिंबवत असत. सोपी भाषा वापरून आणि वेदान्ताची विद्वज्जड शब्दरचना टाळून केलेले सहज समजेल-उमजेल असे त्यांचे निरूपण विलक्षण प्रभावी ठरे. त्यांच्या अभंगरचनाही अत्यंत सुंदर आहेत. ते 'दीनदास' या नाममुद्रेने अभंगरचना करीत असत. त्यांनी आजन्म रामनामाचा आणि रामभक्तीचा प्रचार - प्रसार निरलसपणे केला.
श्रीमहाराजांची संकलित केलेली प्रवचने ही इतकी लोकप्रिय होण्याचे श्रेय त्यांच्या सोपेपणातच आहे. आज त्या ग्रंथाच्या असंख्य आवृत्त्या निघालेल्या असून सोशल मिडियावरूनही हजारो ग्रूप्स मध्ये ही प्रवचने दररोज वाचली जातात. कोणत्याही संप्रदायाचा माणूस असो, जो ही प्रवचने आवडीने वाचतो त्या प्रत्येकाला आपापल्या साधनेत व दैनंदिन जीवनात त्यांचा खूप लाभ होतो, अशीच या प्रवचनांची खासियत आहे.
( http://rohanupalekar.blogspot.in )
श्रीमहाराजांच्या चरित्राचा विशेष म्हणजे, रामरायाला पूर्ण शरणागत होऊन राहिल्यामुळे प्राप्त होणारा अद्भुत विश्वास आणि अलौकिक पारमार्थिक अधिकार यांचे साक्षात् दर्शन ! त्यांनी एवढे प्रचंड कार्य केले. लाखो लोकांना राम भजनाला लावले. अनेकांचे संसार चालवले. गोशाळा बांधल्या, मंदिरे स्थापली ; पण या कशाचेही कणभरही श्रेयही त्यांनी कधीच घेतले नाही. ही सगळी रामरायाची आणि आपले सद्गुरु श्री तुकामाईंचीच कृपा आहे, अशीच त्यांची आजन्म सप्रेम भावना होती.
काही विलक्षण हकिकती -
श्रीमहाराजांचे समग्र चरित्र अत्यंत अद्भुतच आहे. महासागरातील रत्नांची गणना कशी करणार ? पण तरीही त्या देदीप्यमान रत्नांमधील एक-दोन रत्ने पाहिली तरी समाधान तेवढेेच लाभते. या न्यायाने आपण महाराजांच्या अतिशय बोधप्रद अशा दोन हकिकती पाहूया.
एकदा महाराजांची दाढी करता करता त्यांचे नाभिक त्यांना म्हणाले, "महाराज, तुमची आठवण म्हणून ही चांदीची वाटी मला जवळ ठेवावीशी वाटते." क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी दाढीचे पाणी ठेवण्याची ती चांदीची वाटी डाव्या हातानेच उचलून त्याला देऊन टाकली. महाराजांनी वाटी डाव्या हाताने दिली याचे त्या नाभिकांना वाईट वाटले. त्यांनी नाराजी व्यक्त करताच श्रीमहाराज म्हणाले, "अरे, मनाचा भरवंसा कसा द्यावा ? डाव्या बाजूची वाटी उजव्या हाताने घेऊन देईपर्यंत जर माझ्या मनाने विचार बदलला तर ? म्हणून मी देण्याचे मनात आल्याबरोबर तात्काळ देऊन टाकली ती वाटी !" महात्म्यांचे अंतःकरण किती विलक्षण असते आणि दानशूरतेसारखे त्यांचे दैवी सद्गुुणही किती पराकोटीचे असतात, त्याचा हा फार उत्तम नमुना म्हणायला हवा.
अखंड कसलीतरी काळजी करत बसणे, हा मनुष्यस्वभावच आहे. संतांचे काम मात्र यापेक्षा वेगळे असते. त्यांचा भगवंतांवर दांडगा विश्वास असल्याने त्यांना कधीच कसलीच काळजी नसते. त्या विश्वासापायी भगवंतच त्यांची सर्व काळजी वाहत असतात. या संदर्भातच एकदा श्रीमहाराजांचे व भक्त मंडळींचे बोलणे चालू होते. शेवटी असे ठरले की, उद्या स्वयंपाक करायचाच नाही, पण शंभर जोडपी जेवायला घालायचा संकल्प सोडायचा, पाहू रामराया काय करतो ते ! महाराज या परीक्षेला लगेच तयार झाले.
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी लोक मंदिरात जमले. श्रीमहाराजांचे प्रवचन झाले, बारा वाजले, एक वाजला, लोकांची चुळबुळ सुरू झाली. महाराज निश्चिंत मनाने नामस्मरण करीत बसलेले होते. दुपारी दोनच्या सुमारास एक बैलगाडी दारासमोर येऊन थांबली व त्यातून एक भक्त उतरले. महाराजांकडे येऊन म्हणाले, "मी आपल्याला नवस केला होता की, यावेळी जर मला मुलगा झाला तर रामरायाला दोनशे माणसांचा नैवैद्य करीन. त्यानुसार मला मुलगा झाला. पण त्या आनंदात नवस फेडायचा मी विसरूनच गेलो. काल बायकोने आठवण करून दिली व आज सगळे सामान घेऊन आलो आहे. तेवढा नैवेद्य आज करायला सांगा." त्याचे बोलणे ऐकताच महाराज उठले आणि 'जानकीजीवनस्मरण जय जय राम ।' म्हणत त्यांनी रामरायाला दंडवत घातला.
लोकांनी सामान उतरवून स्वयंपाक केला आणि बोलावलेली शंभर जोडपी सुग्रास जेवली. आदल्या दिवशीची मंडळी खजील होऊन म्हणाली, "धन्य आहे तुमची आणि तुमच्या निष्ठेची, खरोखरीच रामरायालाच सगळी काळजी असते !" इतकी अनन्य निष्ठा असेल तर भगवंतच त्या भक्ताचा योगक्षेम वाहतात. भगवद् गीतेत त्यांनी तसे वचनच देऊन ठेवलेले आहे.
श्रीमहाराजांनी अखंड रामनाम घेतले आणि लाखो भक्तांना घ्यायला लावले. आजही त्यांचे ते कार्य चालूच आहे. त्यांचा जन्म नामासाठी झाला आणि त्यांनी नामच श्वास मानून त्या नामातच अखंड वास्तव्य केले. आपल्या त्या चिरंतन अस्तित्वाने ते भक्तांचा सर्वतोपरी सांभळ करीत आहेत व पुढेही करीत राहतीलच. आपले भगवत्प्रदत्त कार्य करून, मार्गशीर्ष कृष्ण दशमी, दि.२२ डिसेंबर १९१३ रोजी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी, "जेथे नाम तेथे माझे प्राण ।" असे म्हणून या अलौकिक अवतारी विभूतिमत्वाने आपला देह ठेवला. लौकिक देहत्यागानंतरही त्यांचे भक्तोद्धाराचे कार्य अक्षुण्णपणे आजही चालू आहे व पुढेही चालू राहीलच.
आमच्या परंपरेतील सर्व महात्म्यांना ; प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज, प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज, प.पू.सद्गुरु सौ.शकाताई आगटे आणि प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे या सर्वांना सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराजांबद्दल अतीव प्रेमादराची भावना आहे. प.पू.श्री.मामा प्रतिवर्षी महाराजांच्या पुण्यतिथीला गोंदवल्याला दर्शनाला जात असत. पू.श्री.मामांनी देहत्याग केल्यानंतरही ते दर्शनाला गेल्याची विलक्षण हकिकत 'स्मृतिप्रसंग' ग्रंथात नोंदवलेली आहे. प.पू.सौ.शकाताईंना श्रीमहाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिले होते, दहिवडीपर्यंत बसमधून सोबत प्रवासही केला होता. ही रोमांचकारी हकिकत पू.सौ.ताईंच्याच श्रीमुखाने आम्ही काहीजणांनी ऐकलेली आहे. हा प्रसंग 'अमृतबोध' मासिकातून पूर्वी प्रकाशितही झालेला आहे. या सर्व महात्म्यांच्या प्रवचनसेवांमध्ये वारंवार श्रीमहाराजांच्या कथा सांगितल्या गेलेल्या आहेत.
सद्गुरु श्रीसंत गोंदवलेकर महाराजांच्या श्रीचरणीं आजच्या या जयंतीदिनी अनंत दंडवत प्रणाम !!
जयाचा जनीं जन्म नामार्थ झाला ।
जयाने सदा वास नामात केला ।
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

18 comments:


  1. छान लिहिलेत ,शुभेच्छा 💐💐💐

    ReplyDelete
  2. Very nice article. Extremely informative

    ReplyDelete
  3. श्रीमहाराजांच्या इतका नामाचा प्रसार इतर कोणताही संताने केला नसावा. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत!💐💐

    ReplyDelete
  4. खुपच सुंदर लेख रोहनजी,
    श्रीराम जय राम जय जय राम,
    श्री गोंदवलेकर स्वामी महाराज की जय.

    ReplyDelete
  5. खूप आवडला लेख

    ReplyDelete
  6. फारच सुंदर लेख.

    ReplyDelete
  7. शकाताईंचे चरित्र कुठे वाचायला मिळेल??

    ReplyDelete
    Replies
    1. श्रीवामनराज प्रकाशन पुणे यांच्याशी संपर्क करा 02024356919

      Delete
    2. अजून त्यांचे चरित्र प्रकाशित झालेले नाही, पण त्यांच्यावर श्रीवामनराज त्रैमासिकात व अमृतबोध मासिकात लेख येत असतात. दोन्ही नियतकालिकांनी त्यांच्यावर विशेषांकही प्रकाशित केलेले आहेत. माझ्या मोबाईलवर संपर्क केल्यास बाकी माहिती सांगीन

      Delete
  8. फारच छान लेख.

    ReplyDelete
  9. खूप सुंदर लेख!🙏🏻

    ReplyDelete
  10. मीरा मोहन शेटे.
    श्री महाराजांचे असेच अनुभव आजही अनेकाना येत आहेत.
    जय जय रघुवीर समर्थ.

    ReplyDelete
  11. श्री राम जय राम जय जय राम... 🙏🌹

    ReplyDelete
  12. श्रीराम जयराम जय जय राम

    ReplyDelete
  13. महाराजांना शतशः दंडवत

    ReplyDelete
  14. खूप छान माहिती आणि महती कळली . अनेकना खूप चांगले अनुभव आले आहेत. त्यांचे संकलन करता येईल का? किंवा आपल्या तर्फे प्रकाशित झालेले लेख एकत्रित करून पुस्तक रूपाने प्रकाशित करता येतील का? आवश्य विचार करावा

    ReplyDelete
  15. I श्रीराम जयराम जय जय राम II🙏🌹🙏 फार छान लेख. धन्यवाद. श्रीराम समर्थ.

    ReplyDelete