बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु
तुलसीपत्र पहिले
आज वैशाख शुद्ध षष्ठी, भक्तवत्सल भक्ताभिमानी प्रल्हादवरद भगवान श्रीनृसिंहप्रभूंच्या नवरात्रीचा पहिला दिवस. या नवरात्रीच्या पावन पर्वकालात भगवान श्रीनरहरीरायांच्या स्तुतिगायनात काही क्षण व्यतीत करावेत, त्यांचे गुणवर्णन करून धन्यता अनुभवावी, त्यांचे परमप्रेमाने पूजन करून समाधान प्राप्त करावे अशी जाणत्या वैष्णवांची आज्ञा आहे. आपणही यथाशक्य ही सेवा साधू या !
गेली काही वर्षे भगवान श्रीनरहरीरायांच्या परमकृपेने नवरात्रात लेखनसेवा घडली. ते सगळे लेख माझ्या ब्लॉगस्पॉटवर उपलब्ध आहेत. मागे घडलेली सर्व लेखनसेवा परिवर्धित स्वरूपात श्रीसद्गुरुकृपेच्या बळावर गेल्या वर्षी 'विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंभ' या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशितही झाली. जाणत्या वाचकांनी या पुस्तकाचे भरभरून स्वागत केले. आनंदाची गोष्ट अशी की, वर्षभरातच 'विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंभ'ची प्रथमावृत्ती जवळपास संपली आहे. मोजक्या प्रतीच आता शिल्लक आहेत. ही नि:संशय श्रीसद्गुरुदेवांची करुणाकृपाच म्हणावी लागेल.
गेल्या वर्षीच्या नवरात्रीत पुस्तकाच्या कामामुळे नवीन काही लेखनसेवा घडली नव्हती. याही वर्षी नवीन लेखनासंदर्भात कोणताच विचार केलेला नव्हता. परंतु श्रीभगवंतांचीच सेवा करवून घ्यायची इच्छा असावी. आज दुपारी सहज म्हणून एक संदर्भ पाहण्यासाठी श्रीनृसिंह पुराण हाती घेतले आणि वेळेकडे लक्ष न जाता वाचतच गेलो. श्रीनृसिंह पुराणाचे माहात्म्यच असे आहे की, त्यातून दर वेळी श्रीनृसिंहचरित्राचा काही ना काही नवीन आयाम नजरेसमोर येतो आणि अक्षरश: हरखून जायला होते. वाचता वाचता असे वाटले की श्रीनृसिंह पुराणावरच अल्पशी लेखनसेवा करावी. त्याद्वारे या पर्वकालात एकप्रकारे श्रीनृसिंह चरित्राची आणि पर्यायाने परमाराध्य भगवान श्रीनरहरीरायांचीच शब्दपूजा बांधली जाईल !
श्रीनृसिंह पुराण हे पुराणग्रंथांमधील एक उपपुराण म्हणून गणले जाते. पुराणांच्या कालाबद्दल विद्वान अभ्यासकांमध्ये अनेक मतवाद आहेत. आपल्याला त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही; पण एवढे नक्की की श्रीनृसिंह पुराण बरेच प्राचीन आहे. भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी आपल्या श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या भाष्यात श्रीनृसिंहपुराणाचा नामोल्लेख करून त्यातील संदर्भ घेतलेला आहे. त्याअर्थी हे पुराण अडीच हजार वर्षांपूर्वी प्रसिद्ध होते यात शंका नाही. म्हणूनच प्रस्तुत पुराण प्राचीन आहे असा निर्वाळा देता येतो.
श्रीनृसिंह पुराण हे भगवान श्री वेदव्यास प्रणीत मानले जाते. एकदा गंगा-यमुना-सरस्वती या महान नद्यांच्या संगमावरील प्रयाग क्षेत्रात परमपावन अशा माघमासात हिमालयातील अनेक ऋषिमुनी तीर्थस्नानासाठी जमले होते. स्नान करून ते सर्व प्रयागक्षेत्रात राहणाऱ्या ऋषिवर भरद्वाजांच्या आश्रमात गेले. परस्परांचा सन्मान करून झाल्यावर त्यांची भगवच्चर्चा चालू असताना अचानकच परमज्ञानी महर्षी लोमहर्षण सूतमुनी तिथे उपस्थित झाले. अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान आणि पुराणांचे ज्ञाते असे श्री लोमहर्षण मुनी हे महर्षी वेदव्यासांचे शिष्य होते.
श्री लोमहर्षणमुनी आलेले पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला. त्यांचा यथायोग्य सन्मान करून भरद्वाजमुनी त्यांना म्हणाले, "मुनिवर, मागे शौनकांच्या यज्ञात आपण वाराहसंहिता कथन केली होती. आम्ही सर्व जण आता आपल्याकडून श्रीनृसिंह पुराण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. कृपया आपण आमची ही इच्छा पूर्ण करावी !"
सूतमुनी मुळातच परमवैष्णव होते. त्यामुळे त्यांना भगवत्कथा सांगण्याची मनस्वी आवड होतीच. आवडीचे कार्य करण्याची सुवर्णसंधी, प्रयागासारखे महाक्षेत्र आणि ऐकण्यासाठी समोर उपस्थित असलेले ज्ञानी, भक्तिमान श्रोते असा अभिनव त्रिवेणीसंगम झालेला पाहून प्रसन्नता पावलेल्या सूतजींनी सद्गुरुवंदन करून श्री वेदव्यासांकडून जाणून घेतलेली श्रीनृसिंहकथा सांगायला सुरुवात केली.
भगवान श्रीनरहरीरायांच्या कृपाप्रसादाने आपण सर्वजणही 'श्रीनृसिंहपुराणा'च्या या परमपावन गंगौघात आजपासून नऊ दिवस दररोज क्रमाक्रमाने सुस्नात होऊ या आणि श्रीनृसिंहकृपा संपादन करून धन्य होऊ या !
(लेखासोबतचे छायाचित्र : भगवान श्रीनृसिंहराज प्रभूंचे आजचे दर्शन, श्रीक्षेत्र नीरानरसिंहपूर.)
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
0 comments:
Post a Comment