16 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु - तुलसीपत्र चौथे

तुलसीपत्र चौथे - यमगीता

श्री मार्कंडेय मुनींचा प्राण हरण करण्यासाठी गेलेले पण विष्णुदूतांच्या भीतीने पळून आलेले मृत्युदेव आणि यमदूत श्री यमदेवांपाशी जाऊन रडत रडत तक्रार करू लागले; "हे यमदेवा, आम्ही आपल्या आज्ञेने जीवांना त्यांच्या कर्मगतीनुसार येथे घेऊन येतो. नेहमीप्रमाणे त्या मार्कंडेय मुनींना घ्यायला गेलो तेव्हा ते एकाग्रचित्ताने कोणत्यातरी देवतेचे ध्यान करत होते. आम्ही त्यांचा प्राण हरण करण्यासाठी त्यांच्या जवळ गेल्याबरोबर महाकाय व तेजस्वी अशा पुरुषांनी आम्हांला मुसळाने मारले. मृत्युदेवांनाही त्यांचा मार खावा लागला. ते ब्राह्मण कोण आहेत ? ते कोणते असे तप करीत आहेत ? हे कृपया आपण आम्हांला सांगा !"
सूर्यपुत्र श्री यमदेवांनी क्षणभर ध्यान लावून सर्व जाणून घेतले व ते सांगू लागले, "माझ्या दूतांनो, लक्षपूर्वक ऐका. ते ब्राह्मण भृगुऋषींचे नातू मार्कंडेय आहेत. भृगूंच्या आज्ञेनुसार मृत्यूला जिंकण्यासाठीच ते भगवान श्रीविष्णूंची आराधना करीत आहेत. त्यांनी भगवान केशवांना हृदयात धारण केले आहे. वैष्णवी महादीक्षेमुळेच त्यांना हे बल प्राप्त झाले आहे. श्रीभगवंतांना सर्वस्वाने शरणागत झालेल्या भाग्यवंताला जगात कोणीही कसलाही अपाय करू शकत नाही, हे पक्के लक्षात ठेवा. त्यामुळेच तुम्ही त्यांना स्पर्शही करू शकला नाहीत. तुम्हांला ज्यांनी मार दिला ते महाकाय पुरुष पराक्रमी विष्णुदूत आहेत. ते दयाळू आहेत म्हणून तुम्ही जिवंत तरी राहिलात. विष्णुध्यानात तत्पर असणाऱ्या भक्ताचा प्राण हरण करायला जाणे हे तुमचेच महापाप आहे. आजपासून हे कायम लक्षात ठेवा की, भगवान श्रीनृसिंहांच्या, भगवान श्रीविष्णूंच्या प्रिय भक्तांच्या तुम्ही कधीही वाटेला सुद्धा जात जाऊ नका !"
श्रीविष्णुस्मरणाने भावुक झालेल्या यमदेवांचे लक्ष तेवढ्यात नरकात खितपत पडलेल्या पापी जीवांकडे गेले. त्यांची ती दुर्दशा पाहून कळवळ्याने यमदेव त्या दु:खी जीवांना म्हणाले, "हे पापी जीवांनो, जेव्हा खरोखर वेळ होती तेव्हाच तुम्ही क्लेशहारक भगवान श्रीकेशवांची भक्ती का केली नाहीत ? पूजेसाठी कोणतीही सामग्री जवळ नसताना सद्भावनेने केवळ सहज उपलब्ध असणारे पाणी अर्पण केले तरी ते भगवान श्रीविष्णू प्रसन्न होतात. अशा परमदयाळू भगवंतांची तुम्ही कधीही पूजा केली नाहीत. प्रेमाने नुसते स्मरण केले तरी समस्त पापांपासून, दु:खांपासून मुक्ती देणाऱ्या भगवान श्रीनृसिंहांचे तुम्ही कधीच स्मरण केले नाहीत, पूजाअर्चा केली नाहीत. त्याचेच हे भयंकर फळ आता भोगत आहात !"
(https://rohanupalekar.blogspot.com)
पुन्हा आपल्या किंकरांकडे वळून यमदेव म्हणाले, "भगवान श्रीविष्णूंनी पूर्वी देवर्षी नारदांना सांगितलेले उत्तम वचन मी तुम्हांला सांगतो. 
हे कृष्ण कृष्ण कृष्णेति यो मां स्मरति नित्यश: ।
जलं भित्त्वा यथा पद्मं नरकादुद्धराम्यहम् ॥२७॥
पुण्डरीकाक्ष देवेश नरसिंह त्रिविक्रम ।
त्वामहं शरणं प्राप्त इति यस्तं समुद्धरे ॥२८॥
त्वां प्रपन्नोऽस्मि शरणं देवदेव जनार्दन ।
इति य: शरणं प्राप्तस्तं क्लेशादुद्धराम्यहम् ॥२९॥
"हे नारदा, कृष्ण कृष्ण कृष्ण असे म्हणून जे माझे नित्य स्मरण करतात त्यांना मी, ज्याप्रमाणे अथांग जलाला भेदून कमळाचे फूल वर येतेच, तसाच घोर नरकातून बाहेर काढतो. 'पुण्डरीकाक्ष, नरसिंह, त्रिविक्रम' इत्यादी माझी नामे घेऊन मला सर्वभावे शरण येतात त्यांचा मी उद्धार करतोच. मी त्यांना सर्व क्लेशांपासून, सर्व दु:खांपासून मुक्त करतो !"
यमदेवांचे हे मधुर शब्द नरकातील पापी जीवांनी देखील ऐकले. त्यासरशी ते 'कृष्ण कृष्ण नरसिंह' असा भगवन्नामांचा जयघोष करू लागले. जसजसा ते नामघोष करू लागले तसतसा त्यांच्या हृदयात भक्तिप्रेमाचा आविर्भाव झाला. ते सद्गदित होऊन श्रीभगवंतांची स्तुती करू लागले, "ज्यांचे नामकीर्तन केले असता नरकातील भयंकर ज्वाला तत्काल शांत होतात, त्या आदिमूर्ती यज्ञपती भगवान श्रीविष्णूंना नमस्कार असो. वेदांनी ज्यांचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनन्त अप्रमेय शंखचक्रगदाधारी भगवान श्रीनृसिंहांना वारंवार नमस्कार असो. मत्स्यकूर्मादी दशावतार धारण करून दुष्टांचे निर्दालन व भक्तांचे पालन करणाऱ्या महान श्रीगोविंदांना नमस्कार असो. आमचा या नरकयातनांमधून उद्धार करा !"
नरकातील त्या अभागी जीवांनी अशी स्तुती करायला सुरुवात केल्याबरोबर चमत्कार घडावा तशी त्यांची नरकपीडा शमली. त्यांचे दुर्गंधीयुक्त शरीर सुगंधी झाले, त्यांच्या शरीरावरील व्रण नाहीसे झाले आणि उत्तमोत्तम वस्त्रालंकारांनी त्यांची शरीरे सुशोभित झाली. ते जीव कृष्णस्वरूप दिसू लागले. तेव्हा विष्णुदूतांनी येऊन त्यांना दिव्य विमानांमध्ये बसवून विष्णुलोकाला नेले. 
श्रीभगवन्नामोच्चाराने घडलेली ही अद्भुत लीला पाहून सद्गदित झालेले यमदेव हात जोडून पुन:पुन्हा वंदन करू लागले, "ज्यांच्या नामकीर्तनाने नरकात पडलेले जीवही विष्णुलोकी गेले, त्या गुरुदेव भगवान श्रीनृसिंहांना मी सदैव प्रणाम करतो. अमिततेजस्वी भगवान श्रीनृसिंहांना प्रेमाने नमस्कार करणाऱ्या भाग्यवान जीवांनाही मी यमदेव वारंवार वंदन करून धन्य होतो !"
श्रीनृसिंह पुराणाच्या आठव्या अध्यायातील या कथाभागाला 'यमगीता' असे म्हणतात. श्रीभगवंतांच्या परमपावन नामाचे महत्त्व आणि माहात्म्य यथार्थतेने सांगणाऱ्या  यमगीतेतील बोध आपण हृदयात धारण करून, सद्गुरु श्री माउली म्हणतात तसे, प्रेमादरपूर्वक झडझडून नामस्मरण करून आपला उद्धार करून घेतला पाहिजे !

( छायाचित्र संदर्भ : भगवान श्रीनृसिंहांचे 'निटिलाक्ष' असे एक नाम आहे. या नामाचा अर्थ 'मोठे टपोरे गोलाकार डोळे असणारे' असा होतो. आपल्या मोठाल्या आणि अखंड दयेचा वर्षाव करणाऱ्या डोळ्यांनी हे भगवान श्रीनृसिंहप्रभू समस्त ब्रह्मांडांमधील आपल्या भक्तांवर कृपाकटाक्ष टाकत असतात. श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील निटिलाक्ष भगवान श्रीनृसिंहांचे कृपावर्षाव करणारे असेच परमप्रेमळ नेत्रकमल या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहेत ! )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment