18 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु - तुलसीपत्र पाचवे

तुलसीपत्र पाचवे - यमाष्टक

चौथ्या तुलसीपत्रात आपण श्रीभगवन्नामाचे अलौकिक माहात्म्य सांगणारी 'यमगीता' पाहिली. यमगीतेचा उपदेश केल्यानंतर आपल्या किंकरांना याच संदर्भात अधिक मार्गदर्शन करण्याचा विचार यमदेवांच्या मनात आला. तेवढ्यात त्यांनी हातात पाश घेऊन कोणत्यातरी जीवाचे प्राण हरण करायला निघालेले आपले दूत पाहिले. त्यांना उद्देशून श्री यमदेवांनी जो मौलिक उपदेश केला, त्याला 'यमाष्टक' म्हणतात. हे अष्टक श्रीनृसिंह पुराणाच्या नवव्या अध्यायात आले आहे. 
श्री यमदेव म्हणाले, "दूतांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, भगवान मधुसूदनांना शरण गेलेल्या जीवांना तुम्ही सोडून द्या. त्यांच्या पुण्यपापांचा हिशोब आपण करायची गरज नाही. कारण यम म्हणून माझी सत्ता केवळ सामान्य जीवांवरच चालते. वैष्णवांच्यावर माझा अधिकार चालत नाही. जे जीव श्रीभगवंत आणि श्रीगुरूंना विमुख आहेत, त्यांनाच मी शासन करू शकतो. या उलट वैष्णवांना, भगवद्भक्तांना मी वंदनच करतो. कारण मलाही माझी उत्तम गती व्हावी अशी इच्छा आहे. मी भगवान श्रीविष्णूंच्याच अधिपत्याखाली कार्य करत आहे. 
विष कधी अमृत होऊ शकत नाही, लोखंड शंभर वर्षे अग्नीत तापवले तरी ते सोने होऊ शकत नाही, परप्रकाशित चंद्र कधीच स्वयंप्रकाशित सूर्य होऊ शकत नाही, तसेच श्रीभगवंतांना विमुख असणारे जीव कधीच सिद्धी (मुक्ती) प्राप्त करून घेऊ शकत नाहीत.  परंतु श्रीभगवंतांच्या चिंतनात सतत रममाण झालेला मलिन शरीराचा सामान्य जीव देखील शोभायमान ठरतो. म्हणून ज्याला या संसारचक्रातून आपली सुटका व्हावी असे वाटते त्याने श्रीभगवंतांच्या श्रीचरणांचाच दृढ आश्रय घेतला पाहिजे ! 
अनंत पुण्ये गाठीशी असल्यामुळे भाग्याने मिळालेले हे मनुष्य शरीर मोक्षासाठी प्रयत्न न करता केवळ सुखोपभोगांमध्ये व्यर्थ घालवणे म्हणजे राखेसाठी मौल्यवान चंदनकाष्ठे जाळण्याचा मूर्खपणा करणे होय. तुम्ही आपला दुर्लभ मनुष्यजन्म वाया घालवू नका, वेळीच जागे व्हा !
महान देवदेवता ज्यांच्या श्रीचरणांना वारंवार वंदन करण्यात धन्यता मानतात त्या भवजन्मनाशक जगत्प्रभू सनातन पुरुष भगवान श्रीविष्णूंना मी पुन:पुन्हा नमस्कार करतो !"
भगवान श्रीव्यासदेव या 'यमाष्टका'चे माहात्म्य सांगतात की, "जो नित्यनियमाने या स्तोत्राचे पठण करतो तो सर्व पापांमधून मुक्त होऊन विष्णुलोकी जातो. त्याच्या हृदयात विष्णुभक्ती पैसावते !"
मागचे लेख वाचून काही जणांना शंका आली असेल की, मार्कंडेयांचे आख्यान तर शिवपुराणात आहे. ते शिवभक्त होते, शिवपिंडीला घट्ट मिठी मारून बसल्याने त्यांना यमदूत स्पर्श करू शकले नाहीत, इत्यादी कथा आम्ही ऐकलेल्या आहेत. मार्कंडेय विष्णुभक्त असल्याची कथा आज पहिल्यांदाच वाचतो आहोत. 
ही शंका रास्त आहे. मुळात अशा पौराणिक कथा वाचताना आपण त्यांतील सारगर्भ उपदेशच लक्षात ठेवायचा असतो. कथेतील इतर लौकिक संदर्भ सोडून द्यायचे. ज्या देवतेचे पुराण असेल त्यांच्याच कथा प्राधान्याने त्यात येणार, हे उघडच आहे. गणेश पुराण वाचले की गणेश सर्वश्रेष्ठ वाटतात, शिव पुराण वाचले की शिव थोर जाणवतात. वास्तविक शिव-गणेश-विष्णू हा भेदच काल्पनिक आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे
ही सृष्टी आजवर हजारो वेळा निर्माण झाली व तितक्याच वेळा नष्टही झालेली आहे. प्रत्येक कल्पात हे सर्व अवतार झालेले आहेत. त्यातील एका कल्पात मार्कंडेय हे विष्णुभक्त होते तर दुसऱ्या कल्पात ते शिवभक्त होते. ज्या त्या कल्पातील प्रसंग महात्म्यांनी ध्यानावस्थेत जसा पाहिला तसा त्यांनी नोंदवून ठेवला. त्यामुळे या सर्व कथा कल्पभेदाने सत्यच आहेत, यात खोटे काहीही नाही. भगवान श्रीशिव आणि भगवान श्रीविष्णू ही रूपे जरी भिन्न असली तरी ते मूळचे परब्रह्माचेच अवतार आहेत; आणि त्यामुळेच ते पूर्णत: एकच आहेत, हे आपण विसरता कामा नये.
भगवान श्रीविष्णू, भगवान श्रीशिव, भगवान श्रीसूर्य, भगवान श्रीगणेश आणि भगवती श्रीजगदंबा हे पाच परब्रह्मस्वरूप पंचायतन आहे. भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी पंचायतनपूजेचा प्रचार करून या पाचांच्या अनुयायांमधला भेदभाव नष्ट केला. कारण मुळातच ही पाच रूपे परब्रह्मस्वरूपच आहेत, त्यामुळेच एकच आहेत. आपापल्या आवडीनुसार जो तो ज्या त्या देवाची उपासना करतो. सर्व भक्त शेवटी एकाच अफूट, अनंत परब्रह्मात जाऊन मिळतात. त्यामुळेच देवांमधील भेद खरा नाही; आणि तो भेद सत्य नाही हे ज्याला अनुभवाने पटते तोच खरा भक्तश्रेष्ठ मानला जातो !
भगवान श्रीनारायणांच्या, भगवान श्रीनृसिंहांच्या परमपावन नामाचे जो सदैव मनापासून स्मरण, चिंतन करतो, तो नि:संशय यमाच्या तावडीतून सुटतो. सद्गुरु श्री माउली हरिपाठात सांगतात तसे, "ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचें शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥हरि.२०.४॥" प्रेमभावे हरिनामस्मरण करणाऱ्या सभाग्य भक्ताचे कुळगोत्रच उद्धरून जाते, यम त्यांच्या वाट्यालाही जात नाही !
( छायाचित्र संदर्भ : हिरण्यकश्यपू दैत्याचे विदारण करणारी भगवान श्रीनृसिंहांची श्रीमूर्ती. )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment