14 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु -तुलसीपत्र दुसरे

तुलसीपत्र दुसरे - श्रीनृसिंहपुराण परिचय

महर्षी वेदव्यास प्रणीत उपपुराण म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीनृसिंह पुराण हे भक्तिशास्त्रातील अतिशय मार्मिक सिद्धांत कथन करणारे महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण फारसे प्रचलित नसल्याने यावर अभ्यासकांनी त्या मानाने काम केलेले नाही. पण तरीही ह्या पुराणाचे माहात्म्य वादातीत आहे.
आज उपलब्ध असणारी श्रीनृसिंह पुराणाची संहिता ही महर्षी लोमहर्षण सूतमुनी आणि भरद्वाजादी ऋषी यांच्या संवादात्मक आहे. या पुराणात एकूण अडुसष्ट अध्याय आहेत. बाकीच्या पुराणग्रंथांप्रमाणेच यातही सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित या गोष्टींचा ऊहापोह केलेला दिसून येतो. हे पुराण प्रामुख्याने भगवान श्रीविष्णूंच्या अवतारांच्या लीलाकथांचे विवरण करते. श्रीनृसिंह सोडता इतर अवतारांपैकी प्राधान्याने भगवान श्रीरामरायांच्या लीलाचरित्राचे विवरण यात आलेले आहे. या पुराणात आलेली 'यमगीता', सहस्रानीक चरित्र, सावित्री-ब्रह्मचारी संवादातील पतिव्रता महिमा आणि मातृसेवेचे महत्त्व, 'ॐ नमो नारायणाय' या अष्टाक्षर मंत्राचे माहात्म्य, श्रीनृसिंह चरित्र आणि प्रल्हाद माहात्म्य तसेच हारीत स्मृती हे अतिशय महत्त्वाचे बोधप्रद भाग आहेत. 
श्री सूतमहर्षींनी सदुसष्टाव्या अध्यायात या पुराणाची परंपरा सांगितली आहे की, हे पुराण सर्व प्रथम भगवान ब्रह्मदेवांनी मरीचि आदि आपल्या मानसपुत्रांना, सप्तर्षींना कथन केले. त्यांतील भृगु ऋषींनी ते पुढे श्री मार्कंडेयांना सांगितले. मार्कंडेय मुनींनी ते सहस्रानीक नावाच्या भगवद्भक्त राजाला सविस्तर कथन केले. पुढे भगवान श्रीनृसिंहांच्या कृपेने या पुराणाची प्राप्ती महर्षी वेदव्यासांना झाली. व्यासजींनी ते लोमहर्षणांना कथन केले व लोमहर्षणांनी प्रयाग क्षेत्री ऋषिमुनींना त्याचे विवरण करून सांगितले. तीच आज उपलब्ध असलेली संहिता आहे. 
(https://rohanupalekar.blogspot.com)
श्रीमद् भागवत पुराणाप्रमाणेच याही पुराणात प्रसंगविशेषी फार सुंदर स्तोत्ररचना निर्माण झालेल्या आहेत. अकालमृत्युहारक 'मृत्युञ्जय स्तोत्र', 'यमगीता', 'यमाष्टक', तीर्थस्नानफलदायक विष्णुस्तोत्र, मार्कंडेय कृत विष्णुलोकप्रदायक 'शेषशायी भगवत्स्तुती', भगवान श्रीशिवांनी श्री नारदांना सांगितलेले 'विष्णुस्तवराज', विश्वकर्मा रचित 'सूर्याष्टोत्तरशतनाम', इक्ष्वाकू विरचित 'श्रीविनायक स्तोत्र', ध्रुव कृत 'विष्णुस्तुती', श्रीमहादेव रचित 'श्रीविष्णुशतनाम स्तोत्र', श्रीब्रह्मदेव कृत 'विष्णुस्तुती', श्रीब्रह्मदेव कृत 'श्रीकृष्णस्तुती', शुक्राचार्य कृत दृष्टिदायक 'विष्णुस्तुती', प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णूंनी सांगितलेले आपल्या अडुसष्ट नामांचे 'विष्णुवल्लभ स्तोत्र' इत्यादी अनेक उत्तमोत्तम आणि प्रभावी स्तोत्ररचना या पुराणात आलेल्या आहेत. हे श्रीनृसिंह पुराणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
श्रीनृसिंह पुराणाच्या वाचन-मनन-कथनाचे सुफल सांगताना लोमहर्षणजी म्हणतात, "या पुराणाचे प्रेमादराने श्रवण केल्यास माघमासात प्रयागस्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. जो हे पुराण साधुसज्जनांना, भगवद्भक्तांना कथन करतो त्याला सर्व तीर्थांच्या स्नानाचे फळ लाभून विष्णुलोकाची प्राप्ती होते. हे पुराण समस्त पापांचा तत्काल नाश करणारे असून भगवान श्रीनृसिंहांचा कृपाप्रसाद सहजतेने करविणारे आहे. रोज सकाळी या पुराणाचे वीस श्लोक जो पठण करेल त्याला ज्योतिष्टोम यज्ञाचे फळ लाभून अंती विष्णुलोकाची प्राप्ती होते. हे पुराण सर्व कामनासिद्धी करणारे, मोक्षदायक आणि मुख्यत: भक्तिप्रदायक मानलेले आहे. म्हणूनच भगवद्भक्तांनी प्रयत्नपूर्वक नित्यनियमाने या पुराणाचे श्रवण-मनन करावे !"
संतवाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि महायोग परंपरेतील थोर विभूतिमत्त्व प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली श्रीवामनराज प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेल्या श्रीनृसिंह कोशाच्या पहिल्या व दुसऱ्या खंडात ह्या पुराणाची संस्कृत संहिता तसेच मराठी भाषांतर प्रकाशित झाले होते. परंतु ते खंड आता उपलब्ध नाहीत. गोरखपूरच्या गीताप्रेसने हिंदी अनुवादासह प्रकाशित केलेले 'श्रीनरसिंहपुराण' (प्रकाशन क्र.१११३) आजमितीस उपलब्ध आहे. त्यातील भाषांतर अतिशय चांगले व अभ्यासपूर्ण असून अवश्य संग्रही ठेवावा असाच हा ग्रंथ आहे.
( छायाचित्र संदर्भ : श्रीक्षेत्र कोळे नृसिंहपूर येथील भगवान श्रीज्वालानृसिंह ! )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष : 8888904481

2 comments: