बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु - तुलसीपत्र तिसरे
तुलसीपत्र तिसरे - श्रीमार्कंडेयाख्यान
श्रीनृसिंह पुराणाच्या सातव्या अध्यायात श्रीमार्कंडेयांचे आख्यान आलेले आहे. भगवान श्रीब्रह्मदेवांनी अनुसर्गात सप्तर्षी, प्रचेता, भृगू आणि नारद यांना निर्माण केले. हे दहा विधात्याचे मानसपुत्र मानले जातात. 'भृगू' ऋषींचा विवाह 'ख्याती' नावाच्या दक्ष प्रजापतीच्या कन्येशी झाला. त्यांना 'मृकण्डू' नावाचा पुत्र झाला. मृकण्डू आणि त्यांची पत्नी 'सुमित्रा' यांना 'मार्कंडेय' नावाच्या पुत्र झाला. भृगुऋषींचे नातू मार्कंडेय हे जात्याच अत्यंत बुद्धिमान होते.
मार्कंडेय लहान असतानाच एका ज्योतिषाने सांगितले की, "हा मुलगा बारा वर्षे पूर्ण झाल्यावर मृत्यू पावेल !" हे ऐकून मार्कंडेयांच्या आईवडिलांना अतीव दु:ख झाले. ते सदैव त्याच दु:खात वावरू लागले. थोडे मोठे झाल्यावर गुरुगृही राहून गुरुसेवापूर्वक वेदाध्ययन पूर्ण करून मार्कंडेय घरी परत आले. त्यांनी आपल्या मातापित्यांना दु:खाचे कारण विचारले. आपल्याला बाराव्या वर्षी मृत्युयोग आहे हे जाणूनही मार्कंडेय शांतपणे म्हणाले, "तुम्ही निश्चिंत असा, मी तपश्चर्या करून माझा मृत्युयोग नक्कीच टाळीन !"
यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी मार्कंडेय वल्लीवट स्थानी आपल्या आजोबांकडे आले. ज्योतिषाची भविष्यवाणी सांगून त्यांनी त्यासाठी उपाय विचारला. महामती भृगू म्हणाले, "बाळा; अतिशय खडतर तपश्चर्या करून भगवान श्रीनारायणांची कृपा संपादन केल्याशिवाय मृत्यू टाळला जात नाही. म्हणून तू अजन्मा अविनाशी अशा भगवान श्रीनरसिंहांना शरण जाऊन मनोभावे त्यांचे पूजन करून 'ॐ नमो भगवते वासुदेवाय ।' या द्वादशाक्षरी महामंत्राचा जप कर. या मंत्राचा जप करणाऱ्यावर भगवान श्रीविष्णू त्वरित प्रसन्न होतात. त्यासाठी तू सह्यपर्वतात उगम पावणाऱ्या तुङ्गभद्रा नदीच्या तीरावरील 'भद्रवट' नावाच्या महान वटवृक्षाखाली भगवान श्रीकेशवांची मूर्ती स्थापून तेथेच या मंत्राची मी सांगितल्याप्रमाणे उपासना कर. तुझे कल्याण होईल !"
(https://rohanupalekar.blogspot.com)
मार्कंडेयांनी अतिशय निष्ठेने मंत्रजप केला. परिणामस्वरूप ते भगवान श्रीविष्णूंच्या स्वरूपात लीन झाले. बारा वर्षे पूर्ण झाल्यावर यमदूत त्यांचा प्राण न्यायला आले खरे, पण हरिस्वरूपात लीन झालेल्या मार्कंडेयांचे सर्व बाजूंनी संरक्षण करणाऱ्या विषणुदूतांनी त्या यमदूतांना पळवून लावले. दूतांना पळवून लावले म्हणून साक्षात् यमदेव तेथे आले. तेही विष्णुदूतांच्या भयाने मार्कंडेयांच्या जवळही जाऊ शकले नाहीत. त्याच वेळी भगवान श्रीविष्णूंनी मार्कंडेयांच्या कानात एक दिव्य स्तोत्र सांगितले. त्या स्तोत्रानेच मग मार्कंडेयांनी श्रीविष्णूंची स्तुती केली.
या स्तोत्राला 'मृत्युञ्जय स्तोत्र' असे म्हणतात. हे आठ श्लोकांचे स्तोत्र अतिशय सुंदर, गेय व सहजसोपे असून त्याचे 'किं मे मृत्यु: करिष्यति ।' हे पालुपद आहे. प्रत्येक श्लोकाच्या उत्तरार्धात भगवान श्रीनारायणांच्या एका नामाचा उल्लेख असून, "मी त्यांना शरण गेलो आहे, आता मृत्यू मला काहीही करू शकत नाही !" असे मार्कंडेयजी छातीठोकपणे सांगत आहेत.
या स्तोत्राचा पहिला श्लोक असा आहे,
*नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनम् ।*
*प्रणतोऽस्मि हृषीकेशं किं मे मृत्यु: करिष्यति ॥१॥*
अत्यंत प्रभावी असे हे स्तोत्र व त्यातील गर्भितार्थ ऐकून घाबरलेल्या यमदेवांनी तेथून पळ काढला, पुन्हा कधीच ते मार्कंडेयांकडे आले नाहीत. भगवान श्रीनृसिंहांच्या कृपेने अशा प्रकारे मार्कंडेय मुनी अमर झाले. पुराण सांगते की, प्रलयातही मार्कंडेय मुनींना मृत्यू येत नाही. मार्कंडेय प्रलयकालातल्या त्या एकार्णवात एकटेच पोहत राहतात असे श्री माउलींनी देखील सांगितले आहे. "जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पोहे मार्कंडेय एकाकी । (ज्ञाने.११.९.१८७)" ही अमरत्वाची स्थिती त्यांना भगवान श्रीविष्णूंच्या कृपेने आणि तपश्चर्येने प्राप्त झालेली आहे. भगवन्नामातच केवळ मृत्यूलाही पार करण्याचे अचाट सामर्थ्य आहे, हाच सुबोध या कथेच्या माध्यमातून श्रीनृसिंहपुराण आपल्याला करवून देत आहे !
या 'मृत्युञ्जय स्तोत्रा'चे पवित्र चित्ताने दररोज प्रात:काली, मध्यान्ही व सायंकाली मनोभावे पठण केल्यास अकालमृत्यू पासून सुटका होते आणि भगवान श्रीनारायणांची कृपा लाभते, असे याचे माहात्म्य श्रीनृसिंह पुराणात कथन केलेले आहे.
( छायाचित्र संदर्भ : श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील भगवान श्रीनृसिंह ! )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
धन्यवाद
ReplyDelete