21 Jun 2018

तेंचि सार जाण योगाचें


विमनस्क होऊन स्वकर्तव्य विसरलेल्या अर्जुनाला बोध करण्याच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या श्रीमद् भगवद् गीतेची भारतीय तत्त्वादर्शांचा प्रमाणग्रंथ म्हणून गणना होते. या ग्रंथात कर्म, ज्ञान, भक्ती, सद्गुण, दैवी-असुरी संपत्ती, आत्मस्वरूप झालेल्या महानुभवांची लक्षणे, योग अशा असंख्य बाबींचा सुरेख ऊहापोह केलेला दिसून येतो. यातील अठरा अध्यायांना 'योग' याच नावाने संबोधले जाते. श्रीगीतेचे माहात्म्यच असे आहे की, स्वजनांशीच लढावे लागणार म्हणून बळावलेला अर्जुनाचा विषाद देखील इथे 'योग' या संज्ञेला पात्र ठरलेला आहे. ही आमच्या भारतीय विचारदर्शनाची प्रगल्भता आहे !
मुळात 'योग' हा शब्दच सर्वसमावेशक आहे. औपनिषदिक तत्त्व-धारेतील सहा प्रमुख दर्शनांमध्ये भगवान पतंजलींच्या योगदर्शनास मोठी मान्यता लाभलेली आहे. योग हा शब्द युज् धातूपासून बनलेला आहे. योग म्हणजे जोडले जाणे ! दोन भिन्न गोष्टींना जोडून एकसंधता निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे योग. वस्तुतः अध्यात्मविद्येचा मुख्य भाग असणारा हा योग आमच्या प्रत्येक जीवन-घटकात सामावलेला आहे. त्यामुळे आमचे अवघे आयुष्य हाही एक 'जीवनयोग'च म्हणायला हवा.
योग हा अध्यात्माचा केंद्रबिंदू आहे स्वतःला अपूर्ण मानणारा जीव पूर्ण असणाऱ्या परमात्म्याशी ज्या प्रक्रियेने पुन्हा एकरूप होतो, तोच 'योग' होय. संतवाङ्मयाचे मर्मज्ञ जाणकार श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, *"जीवाला परमेश्वराशी जोडणे हा योग. कशाने जोडतात ? तर अग्नीने ! वैराग्यरूपी अग्नीने दोघांना जोडता येते."* योग शब्दामधून हाच योग भारतीय शास्त्रांना व संतांना अभिप्रेत आहे. पण लौकिक अर्थाने योग म्हणजे योगासने, प्राणायाम असाच घेतला जातो.
आपण रोजच्या जीवनात योग शब्द अनेक ठिकाणी वापरतो. जसे; भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग. या सर्व योगांमध्ये त्या त्या साधनाने भगवंतांशी जोडले जाणेच अभिप्रेत आहे. म्हणजे जिथे जिथे काही जोडले जाण्याची प्रक्रिया घडते तिथे तिथे योग अनुस्यूत आहेच. याच अर्थाने वर उल्लेख केलेला अर्जुनाचा विषादही पाहता येईल. अर्जुनाला खूप दु:ख झाले म्हणूनच तर त्याचा तो विषाद नष्ट करण्यासाठी भगवंतांनी ज्ञान सांगितले. म्हणजे विषादामुळे ज्ञानाशी तो जोडला गेला, म्हणून तोच विषादयोग म्हटला जातो.
२१ जून हा *'जागतिक योग दिवस'* म्हणून साजरा केला जातो. यंदा त्याचे चौथे वर्ष आहे. जगातील एकूण १५९ देश हा योगदिन साजरा करतात. आजचाच दिवस *'जागतिक संगीत दिवस'* म्हणूनही साजरा होतो. जगभरातील १८ देश तो साजरा करतात. हे त्याचे बत्तीसावे वर्ष आहे. योगायोगानेच योगदिन व संगीतदिन एकाच दिवशी साजरे होत असले, तरी त्यांच्यात एक फार महत्त्वाचा समन्वय आहे. त्या सामायिक दुव्याचाच आपण थोडक्यात विचार करणार आहोत.
*'गीतं वाद्यं तथा नृत्तं त्रयं सङ्गीतमुच्यते।'* अशी भरतमुनींनी संगीताची व्याख्या आपल्या नाट्यशास्रात केलेली आहे. गायकाचे गायन, वादकाचे वादन आणि गातानाचे गायकाचे अल्प पण आवश्यक असे हावभाव, शरीराच्या हालचाली म्हणजेच काही प्रमाणातले नाट्य यांच्या संयोगातून 'संगीत' साकारते. म्हणजे संगीतातही जोडले जाण्याची प्रक्रिया आहेच, हे यातून आपल्या ध्यानात येईल.
संगीत आणि योग यांच्यात एक गोष्ट समान आहे; ती म्हणजे सम किंवा समत्व. संगीतात जितके महत्त्व समेला आहे तितकेच महत्त्व योगात समत्वाला आहे. किंबहुना ही समच संगीत व योगाचे खरे सौंदर्य आहे. सम चुकली तर गायक-वादकाने आपले ज्ञान कितीही कौशल्यपूर्ण दाखवलेले असले, तरी ते रसहीनच ठरते. तसे योगात ( हठयोगात ) शरीरातील अवयवांमधे समप्रमाण जर नसेल तर योगाची सिद्धी होत नाही. चित्ताला समत्व नाही आले तर जीव-ब्रह्माचे ऐक्यही प्रतिष्ठापित होत नाही. म्हणून दोन्हींमध्ये समेला फार महत्त्व आहे. यासाठीच श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
अर्जुना समत्व चित्ताचें ।
तेंचि सार जाण योगाचें ।
जेथ मन आणि बुद्धीचें ।
ऐक्य आथि ॥ज्ञाने.२.५०.२७३॥
मन आणि बुद्धीचे ऐक्य जेथे होते, तेच योगाचे खरे सार आहे. "समत्वं योग उच्यते । " असे गीतेत श्रीभगवंतही त्यामुळेच स्पष्ट करतात.
आपल्या प्रत्येक कर्मामध्ये प्रयत्नपूर्वक सुयोग्य कौशल्य बाणवणे हाही योगच होय. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण कर्मयोग सांगताना एक मार्मिक सिद्धांत सांगतात की, *"योग: कर्मसु कौशलम् ।(भ.गी.२.५०)"* कौशल्याने कर्म करणे हाही योगच आहे. कौशल्य म्हणजे व्यवस्थितपणाने, नेटकेपणाने आणि प्रामाणिकपणे आपल्या सर्व क्षमतांचा पूर्ण वापर करून केलेले कर्म होय. कौशल्य म्हणजे कर्मातला Excellence. हाच आजमितीस दुर्मिळ होत चाललेला आहे. असे कौशल्य अंगी बाणण्यासाठी मनाबरोबरच शरीरही सुदृढ असावे लागते. तन-मनाचे आरोग्य राहण्यासाठीच सूर्यनमस्कार व योगासनांना दैनंदिन जीवनात फार महत्त्व आहे. म्हणजे यातही लौकिक योग आलाच.
सुखी जीवनयोगातील कौशल्याचे नेमके दिग्दर्शन करताना पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, *"आयुष्यात रोगाला बरे करून, भोगाला स्वस्थ करून आणि योगाला अंगीकारून पुढे जायचे असते."* दुर्लक्षित रोग हा आगीसारखा असतो, कळेपर्यंत राखरांगोळी करून मोकळा होतो. म्हणून रोगाला वेळीच प्रयत्नपूर्वक बरे केले पाहिजे.
भोग हा कधीच संतुष्ट न होणारा असल्याने काहीतरी मर्यादा घालून त्याला स्वस्थच केले पाहिजे. हाव वेळीच आवरली तर खरे, नाहीतर ती प्राण घेण्यास कमी करत नाही. हे दोन्ही जमल्यावर योगाचा अंगीकार करून शांतचित्ताने समोर येईल ते आपले कर्तव्यकर्म प्रामाणिकपणे केले तरच जीवन समाधानी व सुखी होईल. शेवटी समाधानच आपले खरे प्राप्तव्य आहे. हे तीन भाग जर नीट कळले व त्यानुसार वागायला जमले, तर जीवनाचे सुरेख नादमय संगीत आतूनच अनुभवायला मिळून आपले आयुष्याचा एक "जीवनयोग" होतो.
जीवनाचा असा योग होण्यासाठी काही आवश्यक असणा-या मुद्द्यांचा विचार मांडताना प.पू.डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराज तीन स्तर सांगतात. त्यांचा नक्कीच सखोल विचार व्हायला हवा.
1. Always act in present.*
2. The service you are in, be taken up and made most and there lies the mandate.
3. Even one molecule in its perfection outweighs the world.
वर्तमानात जगणारा माणूसच यशाचे शिखर गाठू शकतो. यशस्वी होण्यासाठी जन्मजात क्षमताच फक्त लागते असे नाही. आपण जे काही कर्तव्य/कर्म करीत आहोत, त्यातील प्रामाणिकपणा, कष्ट घेण्याची आवड व कामावरील पक्की निष्ठा असेल तर यश हमखास मिळतेच. कौशल्याचा महत्त्वाचा भाग प. पू. उपळेकर महाराज शेवटच्या वाक्यात सांगतात की, योग्य वेळी नेमके व समरसून केलेले प्रयत्न थोडे जरी असले तरी ते फार मोठा प्रभाव दाखवतात, हे विसरता कामा नये. म्हणून आपण जे काही करत असतो त्यातले सर्वोच्च कौशल्य मिळवण्याचा सतत प्रयत्न करायला हवा. हाच प्रामाणिक प्रयत्न आनंददायकही ठरतो व अंतिमत: समाधानकारकही !
योग व संगीतातील हेच समत्व निष्ठेने अंगीकारल्यास ते आपल्या दैनंदिन जीवनात एक प्रकारची सुरेल तान निर्माण करते व ती तान जर आपल्या सुयोग्य प्रयत्नांनी टिकून राहिली, तर मग तेच योगाचे सार म्हणायला हवे. हेच तुम्हां आम्हां सर्वांसाठी सतत मिळवण्याजोगे महत्त्वाचे धनही आहे व तेच त्याचे साधनही आहे ! या तिन्ही स्तरांचा सर्वांगीण विचार करूनच पू.डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराज म्हणतात, "मनुष्यजन्म हा एक महायोग आहे !" श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज देखील 'विवेकचूडामणी'त, श्रीभगवंतांची प्राप्ती होण्यासाठी अत्यावश्यक असणा-या तीन अत्यंत दुर्लभ गोष्टींमध्ये पहिल्या क्रमांकावर मनुष्यजन्माचाच उल्लेख करतात. मनुष्यत्व, मग मुमुक्षुत्व व त्यानंतर महापुरुषसंश्रय अर्थात् सद्गुरुकृपा, याच त्या तीन अत्यंत दुर्लभ गोष्टी होत. जीवनात या तिन्हींचा संयोग झाला की मगच खरा महायोग साकारत असतो.
आपल्या दुर्मिळ अशा या मनुष्यजन्माचा असाच महायोग निरंतर साजरा करण्याचे सौभाग्य सर्वांना लाभो, हीच आजच्या या जागतिक योग व संगीत दिनानिमित्त श्रीचरणीं सादर प्रार्थना !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( पूर्वप्रसिद्धी : 'शब्दीप्ता' जून २०१६ http://rohanupalekar.blogspot.in )
[ छायाचित्र संदर्भ : योगशास्त्रातील समत्वाचे प्रतीक असणारे, महाप्राणरूप गरुड. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या नित्यपूजेतील प्राचीन गरुडमूर्ती. ]


5 comments:

  1. Superb analysis of 💆💪😌🙏Yoga

    ReplyDelete
  2. संगीतातील सम आणि योगातील समत्व यांची परस्पर पूरकता आणि अंतिम सस्वरूपाशी जोडून समरस व्हायचे एकच उद्दिष्ट ,हे आपण अतिशय सुंदर विवेचन करून सांगितलेत, धन्यवाद! युज युनक्ती युंक्ते हा उभयपदी संस्कृत धातू, पण केवढा आशयघन आहे!!

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर विवेचन.

    ReplyDelete
  4. फ़ारच सुंदर रीतीने आपण सांगितले आहे.

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर पध्दतीने आपण योग व संगित यांना एकमेकांशी जोडून त्याच विश्लेषण केलेत, आणि येथे share केलेत, त्याबद्दल आपले मनापासून आभार...🙏🙏

    ReplyDelete