10 Sept 2020

श्रीसंत गोविंदकाका उपळेकर महाराज यांच्या चरित्रावरील व्हिडियो


आज फलटण येथील थोर  विभूती श्रीसंत गोविंदकाका उपळेकर महाराजांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त सोबत दिलेल्या लिंकद्वारे त्यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात परिचय करून घेऊया. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करणारे शिल्पकार यांच्या चरित्रासंबंधी व्हिडीओद्वारे  माहिती देणारा  महाराष्ट्र नायक हा _विवेकचा_ एक उत्तम प्रकल्प आहे. याच प्रकल्पांतर्गत श्रीसंत गोविंदकाका महाराज उपळेकर यांच्या जीवन चरित्रावर हा अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. 
आजवर श्रीकाका महाराजांविषयी ज्याच्या लेख आणि स्वानंदचक्रवर्ती या पुस्तकाद्वारे आपण भरभरून वाचलंय, तो रोहनदादा उपळेकर या व्हिडीओमध्ये पू.श्री.काकांबद्दल माहिती देताना दिसतोय, ही विशेष आनंदाची बाब आहे !! सर्वांनी अवश्य बघा आणि इतरांनाही पाठवा !!
   https://youtu.be/cQYesNTf4hM

9 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ६



प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

इ.स.१९५४ सालचा हा प्रसंग आहे. त्यावेळी मी इरिगेशन खात्यात वर्कचार्जवर 'ब्लॉक मोजणीदार' या पदावर काम करीत होतो. त्याकाळात असे काम संपले की वर्कचार्जवरील माणसे कमी केली जात होती. माझ्या बरोबरीची चार माणसे कमी केली होती व महिना-दोन महिन्यात मलाही घरी बसावे लागणार होते. आता पुढे काय करायचे ?  या विवंचनेत मी होतो. 
त्यावेळी आम्ही लाटकर वाड्यात भाड्याने राहात होतो. त्या वाड्यासमोर एक मोठे पिंपळाचे झाड होते, त्याला छान दगडी पार देखील होता. एके दिवशी मी बाहेरून घरी येत असताना, त्या पारावर बसलेले प.पू.सद्गुरु श्री.उपळेकर काका व त्यांचे नेहमीचे चार-पाच लोक मी पाहिले. मी त्यांना नमस्कार केला व म्हणालो ; "आपण याल का चहा घ्यायला घरी ?" माझ्या महद्भाग्याने प.पू.श्री.काका त्या सर्व मंडळींसह आमच्या घरी आले. 
घरी आल्यावर त्यांनी "कुठले राहणार ?" वगैरे चौकशी केली. "आम्ही मूळ बार्शीकडचे आहोत असे मी सांगितले. त्यावर लगेच, "ओ भगवान बार्शी, भगवान बार्शी, भगवान बार्शी" असे प.पू.श्री.काका म्हणाले आणि मला आज्ञा केली ; "तुम्ही तरडगावच्या मारुतीचे दर्शन घेऊन या !" मी विचारले, "मुद्दाम जाऊन दर्शन घेऊन येऊ का ?" त्यावर "मुद्दाम नको पण कामानिमित्त गेलात तर दर्शन घ्या !" असे त्यांनी सांगितले.
आश्चर्य म्हणजे दोन-चार दिवसांनी साहेबांनी मला ऑफिसात बोलावले व म्हणाले ; "तुम्हाला आता ब्रेक द्यावा लागणार. तेव्हा तुम्ही महाड-पंढरपूर रोडवर डांबरीकरणाचे काम चालू आहे, तेथे हजर व्हा." त्याप्रमाणे मी त्या कामावर हजर झालो. नेमके त्याच वेळी काळज व तरडगावच्या मध्येच चालू होते. मी कामावर हजर झालो व शुक्रवारी घरी फलटणला न येता काळजला मुक्काम केला. सकाळी मंदिराच्याच आडावर आंघोळ केली आणि तरडगावच्या श्री मारुतिरायांचे दर्शन घेतले. 
प.पू.सद्गुरु श्री.काकांनी अत्यंत करुणेने स्वत:हूनच सांगितलेल्या या उपायामुळे, नोकरीत मला ब्रेक लागला नाही आणि 'मोजणीदार' या पदावर माझी कायमस्वरूपी नियुक्ती झाली. आज मी नव्वदी पार केली आहे, रिटायर्ड होऊन मला बत्तीस वर्षे झाली आहेत ; पण तो पारावरचा प्रसंग जसाच्या तसा आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. प.पू.श्री.काकांच्या या अलौकिक वाचासिद्धीने माझे जीवन कृतार्थ झाले अशी माझी पक्की धारणा आहे. त्यांच्याच कृपेने या वयातही मी समाधी मंदिरात नियमाने जातो आणि मनोभावे प.पू.सद्गुरु श्री.काकांचे दर्शन घेऊन समाधान पावतो !
- श्री.वासुदेव गुंडोपंत इंगळे, फलटण.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

8 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ५


प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

"तुझ्याकडे ती देशपांड्यांची मुलगी आहे ना, तिला बोलाव. तिला सांग बघायला !" हे बोल आहेत प.पू.सद्‍गुरु श्री.उपळेकर काकांचे. त्यावेळी मी डॉ.विनायक सिधयेंच्या हॉस्पिटलमध्ये 'सिस्टर इन्चार्ज' म्हणून काम करायचे. हॉस्पिटल पासून प.पू.श्री.काकांचे घर दोन मिनिटांच्या अंतरावर होते. डॉ.सिधयेंच्याकडे प.पू.श्री.काकांचे येणे असायचेच. दर गुरुवारी तर नक्कीच. डॉक्टर गुरुवारी पुण्याला जात, पण प.पू.श्री.काका येऊन जाणारच. 
त्यावेळी ती.सौ.मामी म्हणजे प.पू.श्री.काकांच्या पत्नी बरेच दिवस आजारी होत्या. डॉक्टर अधून मधून त्यांना तपासण्यासाठी जात. आता साल आठवत नाही, पण त्या दिवशी सकाळीच प.पू.श्री.काकांचा निरोप आला आणि डॉक्टर आणि सीताराम कंपाउंडर ती.सौ.मामींना तपासण्यासाठी गेले. मी माझे हॉस्पिटलचे काम करीत होते. ती.सौ.रुक्मिणीदेवी उपळेकर आईसाहेबांना सर्वजण मामीच म्हणत. त्या माझ्या आईच्या मैत्रीणही होत्या. त्या भेटल्या की मी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारत असे. पण उगीचच भीत होते प.पू.श्री.काकांना ! 
थोड्याच वेळात सीताराम आला व मला म्हणाला, "डॉक्टरांनी पू.काकांकडे तुम्हांला बोलावले आहे." मी आधी भ्यालेच. सीतारामला सांगितले, "तू माझ्याबरोबर राहा हं." सकाळची वेळ. प.पू.श्री.काका अंघोळ वगैरे करून, कपाळी गंध बुक्का लावून, देवघरात मांडी घालून शांत बसलेले होते. धोतर नेसलेल्या आणि जानवे घातलेल्या प.पू.काकां मी नमस्कार केला. तेव्हाही प.पू.काका एकदम शांतच होते. 
मला डॉक्टरांनी सांगितले, "आत जावून ती.सौ.मामींची PV करून बघा. काही वाटले तर मला बोलवा." मी आत गेले. मला पाहून ती.सौ.मामी गोड हसल्या. माझा हात त्यांनी हातात घेतला. त्यांना मला पाहून बरे वाटले असावे. त्यांच्या सूनबाई, कै.सौ.सुशीलाकाकू जवळ उभ्या होत्या. ती.सौ.मामींनी लाज वाटून आपले दुखणे कुणाला सांगितलेच नव्हते. मी तपासणी केली आणि डॉक्टरांना बोलावले. ती.सौ.मामींना सांगितले, "तुम्ही लाजू नका, घाबरू नका, मी आहे इथे. तोंडावर पांघरूण घेऊन शांत झोपा." बिचाऱ्यांनी ऐकले. डॉक्टरांनी पाहिले व आम्ही हात धुवून प.पू.श्री.काकांच्या खोलीत आलो. खरंतर आम्ही काही सांगण्याची गरजच नव्हती. ती माउली आधीच सर्व जाणत होती. 
तरीही डॉक्टरांनी ती.सौ.मामींच्या आजाराची सर्व कल्पना प.पू.श्री.काकांना दिली. तेव्हा देखील किंचितही विचलित न होता प.पू.काका धीरगंभीर व शांतच बसलेले होते. मी गुडघे टेकून त्यांना नमस्कार केला. त्या परिस्थितीतही त्यांनी मला खडीसाखरेचा प्रसाद दिला व प्रेमाने पाठीवर हात ठेवला. मी खरोखर त्या दिवशी धन्य झाले. कारण ती.सौ.मामी आणि प.पू.श्री.काकांचा मला एकाच वेळी आशीर्वाद मिळाला. ती.मामींचे दुखणे जवळजवळ थर्ड स्टेजला गेले होते. त्यांना तपासायला डॉक्टरांना न सांगता प.पू.काकांनी मला सांगितले ; ह्यातच मला प.पू.काकांकडून सर्व काही मिळाले. त्यांचे कृपाशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत.
अशीच प.पू.सद्गुरु श्री.गोविंद काकांची आणखी फार सुंदर व हृद्य आठवण सांगते. प.पू.काकांच्या आणखी एक सूनबाई सौ.सुनिती वहिनी गरोदर होत्या. त्यावेळी दर महिन्याला तपासणी, महिन्याचे औषध-पाणी आणि सातव्या व आठव्या महिन्यात धनुर्वाताचे इंजेक्शन, सोनोग्राफी फाईल करणे असले प्रकार नव्हते. नऊ महिने सरले, पोटात दुखायला लागले की पेशंट दवाखान्यात भरती होत असत. त्याप्रमाणे सौ.वहिनींचे दिवस भरले, पोटात दुखू लागले. त्या हॉस्पिटलला आल्या. त्यांची तपासणी करून त्यांना भरती करून घेतले. बहुतेक रात्री बाळंतपण होईल असा आमचा अंदाज होता. दुपारची सुट्टी झाल्यावर पुन्हा चार वाजता मी पेशंट पाहिला. ठीक होते सगळे. संध्याकाळी ६ च्या सुमारास प.पू.श्री.काका स्वत: दवाखान्यात आले, खोलीत जाऊन सौ.वहिनींना त्यांनी पाहिले व डॉक्टरांची गाठ घेऊन निघून गेले. 
माझी ड्युटी संध्याकाळी सात वाजता संपत असे. माझ्या दोघी बहिणी सिंधुताई व इंदुताई मला न्यायला येत. थोडे फिरून आम्ही घरी जात असू. त्यादिवशी दोघी आल्यावर माझे काम आवरून मी डॉक्टरांना घरी जाऊ का विचारले. कारण बाळंतपणाची केस असली तर डॉक्टर स्वत: डिलिव्हरी करत. बाळंतपण करण्यात वाकबगार असणाऱ्या आया आणि डॉक्टरांच्या पत्नी देखील मदत करीत. पण त्यादिवशी डॉक्टर म्हणाले, "बाई, उपळेकर वहिनींची डिलिव्हरी तुम्ही करून जा. प.पू.श्री.काकांनीच तसे मला सांगितले आहे." प.पू.श्री.काकांनी सांगितले आहे म्हटल्यावर मी गप्प झाले व मला खूप आनंद पण झाला ! कारण हा प.पू.काकांचा माझ्यासाठी मोठा आशीर्वादच होता  
रात्री नऊच्या सुमारास उपळेकर वहिनी बाळंतीण झाल्या. मी एकटीने त्यांची डिलिव्हरी केली. डॉक्टर अजिबात तिकडे फिरकले नव्हते. नॉर्मल डिलिव्हरी झाली. मला खूप आनंद झाला. सौ.उपळेकर वहिनींना सुंदर कन्यारत्न झाले होते. नाळ कापून मी बाळाला दूर ठेवत होते, इतक्यात लेबर रूमचा बंद असलेला दरवाजा हळूच उघडला गेला. दाराच्या बाहेर स्वतः प.पू.श्री.काका, कै.श्री.निवृत्तिनाथ मेळवणे काका आणि बाळाचे बाबा उभे होते. प.पू.श्री.काका गोड हसत म्हणाले, "पौर्णिमा, पौर्णिमा !" माझ्याकडे आशीर्वादाचा हात करत प.पू.श्री.काका लगेच निघूनही गेले. सौ.वहिनी खूप आनंदाने माझा हात हातात घेऊन म्हणाल्या, "ती.काका स्वतः येऊन गेले. माझे बाळ धन्य झाले." मी वहिनींना म्हणाले "अहो, तुम्ही सगळे प.पू.काकांचेच आहात. ही तर त्यांची नात आहे. तिचे नाव तुम्ही 'पौर्णिमा'च ठेवा. प.पू.श्री.काकांचा आशीर्वाद आहे हा !" आणि विशेष म्हणजे त्या दिवशी पौर्णिमाच होती. ९ वाजता आकाशात हा सुवर्णक्षण पाहायला पूर्णचंद्रही उपस्थित होता. 
विशेष म्हणजे सौ.वहिनींची पहिली खेप असून बाळंतपण नॉर्मल झाले. बाळंतपण करायला मी एकटी. डॉक्टरांची अजिबात उपस्थिती नाही आणि बाळ जन्मल्याबरोबर साक्षात् प.पू.श्री.काका तिथे आशीर्वादाचा हात घेऊन उभे. महत्भाग्यच आहे हे !
असे हे आमचे प.पू.सद्गुरु श्री.काका आणि त्यांना मनोमन मानणारा पण उगीचच भिणारा माझ्यासारखा एक भक्त. मला प.पू.श्री.काकांबद्दल लहानपणापासूनच फार आकर्षण होते. रोज जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे असे सारखे वाटायचे. पण काही माणसांनी उगीचच त्यांच्याबद्दल आमच्या मनात गैरसमज करून दिले. दुर्दैवाने त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात भीती राहून गेली. म्हणून त्यांच्यापासून मी कायम दूरच राहिले. पण योगायोग पाहा, मी डॉ.सिधयेंकडे नोकरी करीत असताना प.पू.श्री.काका दर गुरुवारी दवाखान्यात येत असत. त्यामुळे त्यांचे दर्शन आपोआप मला होत असे. अनेक वेळा दर्शन झाले. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल भीती मात्र कायमच होती. 
एकदा मी पेशंटला इंजेक्शन देऊन ओ.पी.डी.मध्ये परतत होते. माझा उजवा पाय उंबर्‍यावर होता. त्याचवेळी अचानक प.पू.श्री.काका समोर आले आणि त्यांनी आपला उजवा पाय माझ्या उंबर्‍यावरच्या पायावर ठेवला. मी प्रचंड घाबरले. प.पू.श्री.काका म्हणाले, "घाबरू नकोस !" आणि गोड हसत माझ्या ओठावर उजवा हात ठेवून म्हणाले, "हे बंद ठेव. खूप हुशार आहेस. तुला कधी काहीही कमी पडणार नाही !" मी घाबरतच मनोमन प.पू.श्री.काकांना नमस्कार केला.
गंमत म्हणजे मी डॉ.सिधयेंच्यात नोकरी करत होते तेव्हा आणि नंतर माझ्या भावाच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होते तेव्हाही, माझ्या हातून सर्व नॉर्मल बाळंतपणेच झाली. कधीच कोणतीही केस क्रिटिकल झाली नाही. आजही जुने पेशंट आपल्या लेकीसुनांना घेऊन तपासण्यासाठी येतात, सल्ला घेतात. ही सर्व प.पू.श्री.काकांचीच कृपा आहे, त्यांच्याच आशीर्वादांचे फळ आहे. त्यामुळे आज मला काहीही कमी नाही, आम्ही सुखात आहोत. 
मी स्वतःला आणि आमच्या घराण्याला खूप भाग्यवान समजते. पू.श्री.काकांचे पुतणे कै.श्री.श्रीपादराव उपळेकर यांची पत्नी कै.सौ.मालतीबाई उपळेकर या माझ्या चुलत बहीण होत्या. अशाप्रकारे प.पू.श्री.काकांशी आमचे नातेही होते. आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद देखील आम्हांला सदैव मिळाले व आजही मिळत आहेत !
- बेबीताई गणेश देशपांडे, फलटण.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

7 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ४

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ४

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

माझे वडील कै.श्री.भास्कर गजानन खळे तथा श्री.अण्णा हे योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांचे अनुगृहीत होते. प.पू.श्री.गुळवणी महाराज आमच्या घरी चेंबूरला नेहमी येत असत. आमच्या घरी श्रीसंत साईबाबांच्या मूर्तीची पू.श्री.गुळवणी महाराजांच्या हस्ते स्थापना झालेली आहे. मलाही श्रीमहाराजांकडूनच दीक्षा झाली. माझे वडील पुण्याला श्रीमहाराजांच्या दर्शनाला वारंवार जात असत. श्रीमहाराजांचे अतीव प्रेम आम्ही सर्वांनी असंख्य वेळा अनुभवलेले आहे.
फलटणचे थोर सत्पुरुष प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज आणि प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांचे अत्यंत हृद्य संबंध होते. दोघेही एकमेकांना फार मानीत असत आणि आपल्या भक्तमंडळींना आवर्जून एकमेकांच्या दर्शनाला पाठवीत असत. ९ जून १९७१ रोजी प.पू.श्री.उपळेकर महाराज पुण्याच्या 'श्रीवासुदेव निवास' आश्रमात प.पू.श्री.गुळवणी महाराजांच्या भेटीसाठी आले होते. प.पू.श्री.उपळेकर महाराजांच्या भेटीने प.पू.श्री.गुळवणी महाराजांना खूप आनंद झाला होता. त्यानंतर लगेचच माझे वडील पुण्यास श्रीमहाराजांकडे गेले होते.  
तेव्हा माझ्या वडिलांना सद्गुरु श्री.गुळवणी महाराज म्हणाले ; "खळे ; ह्या वेळेस फलटणला जाऊन प.पू.श्री.उपळेकर महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय मुंबईस परत जाऊ नका. प.पू.श्री.उपळेकर काका हे अखंड ब्रह्मानंद स्थितीतील एक महापुरुष आहेत !" 
श्रीगुरु महाराजांची आज्ञा झाल्यावर लगेच ती.अण्णा पुण्याहून एस.टी.ने फलटणला गेले. स्टँडवर उतरून पत्ता विचारत पू.श्री.उपळेकर काकांच्या घरी गेले. तिथे गेल्यावर दारातच कोणीतरी त्यांना सांगितले ; "प.पू.काकांची तब्येत बरी नाही, त्यामुळे दर्शन होणार नाही !" ती.अण्णा त्या गृहस्थांशी बोलत होते तेवढ्यातच पू.श्री.काका महाराज स्वत: बाहेर आले व म्हणाले ; "कोण म्हणतो बरे नाही मला ? या, या, आत या बरे ! " आणि प.पू.श्री.काकांनी ती.अण्णांना आपल्या मागून बैठकीच्या खोलीत यायला सांगितले. 
खोलीत गेल्यावर प.पू.श्री.काका स्वत:च्याच स्वानंदस्थितीत गोड हसत म्हणाले, "असे पायावर डोके ठेवा बरे. हार आणला आहे ना, तोही घाला !" प.पू.श्री.काकांचे हे प्रेमाचे अगत्य पाहून ती.अण्णा एकदम हरखूनच गेले. पटकन् खाली बसून त्यांनी प.पू.श्री.काकांचे चरण दोन्ही हातात धरून त्यावर डोके ठेवले, त्यांच्या गळ्यात हार घातला. लगेच प.पू.काका म्हणाले ; "बसा असे, वरती खुर्चीवर बसा." वडील म्हणाले ; "नको खालीच बसतो." त्यावर आग्रहाने प.पू.श्री.काका म्हणाले ; "नाही नाही. असे खुर्चीवरच बसा !" त्यांनी घरातून चहा मागवला, प्रेमाने ती.अण्णांना दिला आणि खूप आनंदाने त्यांच्याशी संवाद केला. सर्व कुटुंबाची विचारपूस केली. "कसे आलात ? गाडी घेऊन आलात का स्वत:ची ?" असेही विचारले. ती.अण्णा परत निघाले तेव्हा प.पू.श्री.काका म्हणाले ; "मी एक पत्ता देतो, तिथे जाऊन जेवण करूनच पुण्यास जायचे. जेवल्याशिवाय जाऊ नका !" त्यांनी दिलेला तो पत्ता होता एका हॉटेलचा, ज्याचे त्याच दिवशी उद्घाटन झाले होते. तिथे गेल्यावर ती.अण्णांना आमरसासहित पंचपक्वान्नांचे जेवण दिले गेले. गंमत म्हणजे देण्याचा प्रयत्न करून सुद्धा त्या हॉटेल मालकाने जेवणाचे पैसेच घेतले नाहीत. घरी आल्यावर ती.अण्णा माझ्या सौ.आईला म्हणाले ; "अगं कुसुम, आज श्रीमहाराजांच्या कृपेने मला एका थोर अवतारी महापुरुषाचे दर्शन झाले !" 
ती.अण्णा तेव्हा म्हणाले होते की, "ज्याअर्थी आज प.पू.श्री.काकांनी, "स्वत:च्या गाडीने आलात का ?" असे विचारले, त्याअर्थी आपण कधीतरी नक्कीच गाडी घेणार !" नंतरच्या काळात खरोखरीच माझ्या भावाने गाडी घेतली.
माझ्या वडिलांना प.पू.श्री.गुळवणी महाराजांनीच फलटणला दर्शनासाठी पाठवले होते. प.पू.श्री.गुळवणी महाराजांविषयी प.पू.श्री.काकांना इतका प्रेमादर होता की, त्यांनी पाठवले म्हणून ती.अण्णांना प.पू.श्री.काकांनी अतिशय आपुलकीने, प्रेमाने वागवले आणि पंचपक्वान्नांचे भोजन करूनच पाठवले. ती.अण्णा हे श्रीमहाराजांचे शिष्य आहेत, म्हणजे आपल्याच घरातले आहेत ; एवढ्या आपुलकीने प.पू.श्री.काका त्यांच्याशी वागले. "साधू दिसती वेगळाले । परि ते स्वरूपी मिळाले ।"* हे समर्थ श्री रामदास स्वामींचे वचन यथार्थच आहे !
- श्री.प्रशांत भास्कर खळे, नेरुळ - नवी मुंबई.
(छायाचित्र : प.पू.सद्गुरु श्री.गोविंद काका उपळेकर महाराज आणि प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराज यांचे फलटणच्या पू.श्री.काकांच्या 'श्रीगुरुकृपा' वास्तूच्या समोर काढलेले छायाचित्र.)
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

6 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ३



प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

माझ्या आईला, कै.नलिनी देशपांडे हिला प.पू.श्री.काकांच्या दर्शनाची आवड होती. ती नेहमी त्यांच्या दर्शनाला जात असे. त्यामुळे महद् भाग्याने मलाही वयाच्या दहाव्या वर्षापासून प.पू.श्री.काकांचे दर्शन लाभत आलेले आहे. त्यावेळी त्यांच्या हातून खडीसाखरेचा प्रसाद आणि आशीर्वाद कायमच मिळायचे. त्यांच्याच दिव्य आशीर्वादांमुळे आज मी समाधानात आहे.
प.पू.श्री.काकांचा मला आलेला एक विशेष अनुभव येथे सांगत आहे. मी त्यावेळी अठरा वर्षाचा होतो. फलटणवरून जाऊन येऊन रोज बारामतीच्या टी.सी.कॉलेजमध्ये मी प्री-डिग्री कॉमर्स करत होतो. फलटणच्या ब्राह्मण आळीतील प.पू.दादामहाराज देशपांडे (ग्वाल्हेरकर) यांच्या वाड्यात आम्ही त्यावेळी राहात होतो. श्रीसंत हरिबुवा महाराजांवर आमच्या घराण्याची अतीव श्रद्धा होती. त्यामुळे रोज सकाळी मी सायकलवरून श्रीसंत हरिबुवा महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनाला जात असे. माझ्या वडिलांना १९७३ साली देवाज्ञा झाली होती आणि आमची परिस्थिती त्यावेळी अगदीच हलाखीची होती.
तो दिवस १९७४ सालच्या फेब्रुवारी महिन्याचा पहिला रविवार असावा. नेहमीप्रमाणे अकराच्या दरम्यान मी श्रीसंत हरिबुवा महाराजांच्या मंदिरात दर्शनास गेलो. मी गाभार्‍यात प्रवेश केला आणि मला प.पू.श्री.काका समाधीच्या मागे असलेल्या श्रीसंत हरिबुवा महाराजांच्या मूर्ती जवळ उभे असलेले दिसले. प.पू.श्री.काकांच्या बरोबर आलेल्या एकाने मला समर्थ मिठाई केंद्रातून पावशेर पेढे आणण्यासाठी पैसे दिले. मी लगेच सायकलवरून जाऊन पेढे घेऊन आलो. प.पू.श्री.काकांनी स्वत: सद्गुरु श्री.हरिबुवा महाराजांच्या समाधीस पेढ्याचा नैवेद्य दाखवला. त्यातला एक पेढा मला त्यांनी स्वहस्ते प्रसाद म्हणून दिला. मी त्यांना मनोभावे नमस्कार केला. हेच मला झालेले प.पू.श्री.काकांचे शेवटचे दर्शन ठरले. त्यानंतर काही महिन्यांनी, दि.८ ऑक्टोबर १९७४ रोजी प.पू.श्री.काकांनी समाधी घेतली.
खरोखर त्या प्रसाद पेढ्याने आमच्या आयुष्यात प्रचंड बदल झाले. त्यांच्या त्या अमोघ आशीर्वादांमुळे, खायची भ्रांत असलेल्या परिस्थितीतून सुधारणा होत होत आज अत्यंत समाधानी आणि सधन आयुष्य आम्ही व्यतीत करीत आहोत. हा नि:संशय प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज यांचाच कृपाप्रसाद आहे !
प.पू.काकांच्याच कृपेने आता बँकेतून निवृत्त झाल्यावर मला श्री ज्ञानेश्वरीच्या व संतवाङ्मयाच्या अभ्यासाची इच्छा व गोडी निर्माण झाली आहे. प.पू.श्री.काकांच्या 'श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनी'चे जे अध्याय पीडीएफ स्वरूपात नेटवर उपलब्ध करून दिलेले आहेत, ते मी डाऊनलोड करून त्यांचा अभ्यास करू लागलो आहे. त्यांच्या कृपेने आता या अभ्यासातही गती आणि आनंद लाभावा हीच सप्रेम प्रार्थना करून, प.पू.श्री.उपळेकर काकांच्या श्रीचरणीं विनम्र दंडवत घालतो !
- श्री.बजरंग देशपांडे, पुणे.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

5 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- २

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- २

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे आमच्या घरावर कृपाछत्र आहे. त्यांच्या कृपादृष्टीचे अनेक अनुभव आम्हां सर्वांना नेहमीच येत असतात. माझ्या आई-वडिलांचे अनुभव मी येथे कथन करीत आहे.
साधारण १९७० सालची ही गोष्ट आहे. माझे वडील कै.श्री.मल्हारराव रामचंद्र घाडगे हे फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यात रोखपाल (cashier) म्हणून काम करीत होते. ते नेहमी श्री ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनाला जायचे. तेव्हा शेजारीच राहात असलेल्या प.पू.श्री.काकांचेही दर्शन आवर्जून घ्यायचे. त्यावेळी आमची परिस्थिती तशी खूप बेताचीच होती. आम्ही तीन बहिणी, दोन भाऊ व आईवडील असे सात जणांचे कुटुंब होते. कसातरी खर्च भागत असे. वडिलांना सारखे वाटायचे, मुलांच्या शाळेचा खर्च भागला पाहिजे, घरात सर्व काही सुव्यवस्थित हवे, तेव्हा चालू नोकरी बरोबरच मला अजून दोन ठिकाणी नोकरी केली पाहिजे, तरच सर्वांचे व्यवस्थित चालेल. 
अशा विचारांच्या ओघातच एकेदिवस ते प.पू.श्री.काकांच्या दर्शनाला गेले. तेव्हा प.पू.श्री.काका या पाटावरून त्या पाटावर जात हरिपाठ म्हणत होते. माझ्या वडिलांनी दर्शन घेतल्यावर प.पू.श्री.काकांनी एक मोठे हरिपाठाचे पुस्तक दिले व दोन पेढे त्यांच्या हातावर ठेवले. माझ्या वडिलांनी, ती.तात्यांनी घरी येऊन खूप आनंदाने ही गोष्ट ती.आईला सांगितली. आपल्या मनात चालू असलेल्या विचारांसाठी ही गोष्ट त्यांना खूपच पूरक वाटली, जणू प.पू.श्री.काकांचा आशीर्वादच मिळाला असे त्यांना मनोमन जाणवले.
प.पू.श्री.काकांनी दोन पेढे व हरिपाठाचे पुस्तक दिल्यानंतर माझ्या वडिलांना फलटण येथील श्रीसंत हरिबाबा महाराज मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात सेक्रेटरी म्हणून दुसरी नोकरी लागली. त्याशिवाय श्रीदेव मारुती मंदिर येथेही सेक्रेटरी म्हणून अजून एक काम लागले. त्यांनी खूप वर्षे प्रामाणिकपणे या सर्व नोकऱ्या केल्या. प.पू.श्री.काकांच्या अमोघ आशीर्वादांमुळे कसलीही अडचण न येता आमचे सर्वांचे शिक्षण वगैरे नीट होऊन अगदी भले झाले.
प.पू.श्री.काकांची सहज कृती किती सूचक होती पाहा. हरिपाठाचे पुस्तक दिले ; पहिली नोकरी श्री हरिबाबा मंदिरातच लागली. दोन पेढे दिले ; त्यांना खरोखर दोन जास्तीच्या नोकऱ्या लागल्या. पेढेच दिले याचा अर्थ समाधान लाभेल, सर्वकाही गोड होईल. प.पू.श्री.काकांसारख्या अवधूतावस्थेतील अवलिया संतांचे सहज वागणे-बोलणे देखील अतिशय सूचक व नेटके असते !
माझी आई श्रीमती सुमन मल्हारराव घाडगे रोज प.पू.श्री.उपळेकर काकांच्या मंदिरात दर्शनाला जात असे. पुण्यतिथी सप्ताहातील श्री ज्ञानेश्वरी पारायणालाही बसत असे. १९९२ साली एकेदिवशी समाधीचे दर्शन घेऊन ती मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या, प.पू.श्री.काकांच्या घराशेजारच्या एका तगरीच्या झाडाची फुले तोडायला गेली. त्या झाडाखाली एक मोठा चौकोनी दगड होता. त्या दगडावर ती चढली व फुले तोडत असताना, एकदम तोल जाऊन त्या दगडावरून खाली पडली. त्या धक्क्याने तिचा हात खांद्यापासून खाली आला, निखळला. निखळलेल्या हाताचे दुखणे खूपच असह्य असते. ती घाबरून जाऊन जोरात ओरडली ; "काका, मला वाचवा !" आश्चर्य म्हणजे त्याक्षणी तिचा निखळलेला हात स्वतःचा स्वत:च एकदम खटकन् आवाज होऊन जागेवर बसला. निखळलेला हात आपला आपण कधीही बसू शकत नाही, तो दुसऱ्या जाणकाराने विशिष्ट प्रकारे जोर देऊन बसवावा लागतो. पण त्यावेळी तिथे माझी आई एकटीच होती, आसपास कोणीही नव्हते.
मुळात तिचा स्वभाव अतिशय भित्रा पण खूप श्रद्धाळू होता. त्यामुळे प.पू.श्री.काकांनीच स्वतः तिचा हात बसवला यात काहीच शंका नाही. तसेही प.पू.श्री.काका डॉक्टरच तर होते ना ! हा खूप मोठा चमत्कार प.पू.श्री.काकांच्या कृपेने आम्हांला अनुभवायला मिळाला. तिने लगेच घरी येऊन सांगितले की ; "प.पू.श्री.काकांनीच माझा हात बसवला !" त्या प्रसंगानंतर तिच्या हाताला कुठेही सूज वगैरे आली नाही किंवा दुसरा काहीच त्रासही झाला नाही.  
मी आणि माझी बहीण सुवर्णा मल्हारराव घाडगे दोघीही प.पू.श्री.काकांचे नेहमी स्मरण करतो, वेळ होईल तसे समाधी मंदिरात दर्शनालाही जातो. प.पू.श्री.काकांसारख्या थोर महात्म्यांचे आपल्यावर कृपाछत्र आहे, त्यांची कृपादृष्टी आहे, याचे समाधान अवर्णनीयच असते !
- श्रीमती मंगला शिवाजी पवार, फलटण.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

4 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- १

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज पुण्यस्मरण सप्ताह
आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- १

फलटण येथील थोर सत्पुरुष प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हे विसाव्या शतकातील लोकोत्तर विभूतिमत्व होते. आपली 'ब्रह्मबैसका' कधीही न सुटलेले हे अवधूत अवलिया, सदैव त्याच ब्रह्मभावात विचरण करीत असत. त्यांची ती सहजसमाधी अवस्था कोणत्याही प्रसंगी आणि कोणत्याही स्थितीत कधीच भंगली नाही. त्यामुळे त्यांचे लौकिक व्यवहारही त्याच ब्रह्मानंदावस्थेत घडत असत. त्यांच्या काळातील ते नि:संशय अद्वितीय आणि विलक्षण असे सत्पुरुष होते यात काहीच शंका नाही ! 
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांवर, राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील अवधूत महात्मे, पुसेसावळी येथील सत्पुरुष सद्गुरु श्री श्रीकृष्णदेव महाराजांची पूर्णकृपा झालेली होती. इ.स.१९२० साली दैवी प्रेरणेने प.पू.श्री.काका आपल्या प्रथितयश लष्करीसेवेचा राजीनामा देऊन प.पू.सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांना शरण गेले. त्याच वर्षी त्यांच्यावर श्रीसद्गुरुकृपेचा वर्षाव झाला व ते अलौकिक आनंदात नाहून निघाले. यावर्षी त्या दिव्य घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणूनच प्रस्तुत पुण्यस्मरण सप्ताह आपण या "अनुग्रह शताब्दी वर्षा"चे औचित्य साधून विशेषत्वाने साजरा करणार आहोत. त्यानिमित्त आजवर कधीच प्रकाशात न आलेल्या प.पू.श्री.काकांच्या काही हृद्य आठवणी व भक्तांना आलेल्या दिव्य अनुभूती आपण या लेखमालेद्वारे जाणून घेऊ या. आजपासून ते भाद्रपद कृष्ण अष्टमी, दि.१० सप्टेंबर पर्यंत दररोज एकेका लेखामधून प.पू.श्री.काकांच्या अद्भुत अनुभूती उलगडल्या जातील. आपण सर्वांनी मनोभावे यांचा आनंदास्वाद घ्यावा व आपल्या सुहृदांनाही या पोस्ट पाठवून त्यांचा जास्तीतजास्त प्रसार करावा ही सादर विनंती.
- रोहन विजय उपळेकर

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- १

माझ्या माहेरी, फलटण येथील फणसे यांच्या घरावर प.पू.डॉ.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांची कृपा आहे. माझे वडील कै.श्री.विश्वनाथ फणसे हे खूपच धार्मिक होते व प.पू.श्री.गोविंदकाकांचे परमभक्त होते. त्यांच्यामुळे आम्ही घरातील सर्वजण प.पू.श्री.काकांचे भक्त होतो, आजही आहोत. प.पू.श्री.काका कधी कधी आमच्या घरी येत व झोपाळ्यावर बसून उंच झोका घेत. माझे वडील सांगत असत की, "पहिल्यांदा असे प.पू.श्री.काका एकदा घरी येऊन बसले व त्यांनी मोठा झोका घेतला, तेव्हापासूनच फणसे कुटुंबाचा उत्कर्ष झाला. त्या प्रसंगानंतरच आपल्या घरात श्रीमंती आली. ही नि:संशय प.पू.श्री.काकांचीच आपल्या घराण्यावरची कृपा आहे !"
माझे लग्नही प.पू.श्री.काकांनीच ठरवलेले आहे. मी तेव्हा सातवी मध्ये असेन, वय होते बारा वर्षे. मला पाहण्यासाठी कऱ्हाडहून कै.श्री.दत्तात्रेय मोटे आले होते. पाहुण्यांना घेऊन माझे वडील प.पू.काकांच्या दर्शनाला गेले. प.पू.श्री.काकांच्या 'श्रीगुरुकृपा' वास्तूतील हरिपाठाच्या खोलीत तेव्हा भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची गादी होती. दर्शन झाल्यावर प.पू.श्री.काकांनी गादीवरील एक पेढा घेतला व त्याचे दोन तुकडे केले. मग हात क्रॉस करून त्यातला अर्धा पेढा श्री.मोटे यांना दिला व अर्धा माझ्या वडिलांना दिला ; आणि "जावा" एवढेच शब्द त्यावेळी प.पू.श्री.काका बोलले. सोयरीक जमल्याचीच ही खूण होती व माझ्या वडिलांनी ती नीट लक्षात ठेवली होती.
पुढे एक वर्ष झाले तरी मोट्यांच्याकडून काही निरोप आला नाही. त्यावेळी माझ्यासाठी इतर ठिकाणच्या मागण्या येऊ लागल्या. माझे वडील पुण्याच्या एका स्थळाशी माझे लग्न करण्याचे ठरवत होते. पण संतांचा आशीर्वाद कधीच खोटा होत नाही, याचा अनुभव आम्हांला त्यावेळी आला. या बैठकीस जाण्यासाठी आमच्या दुसऱ्या पाहुण्यांना घ्यायला वडील गेले. तेव्हा ते म्हणाले, "थांबा, आपण कऱ्हाडला जाऊन आधी मोट्यांशी बोलू या." त्याप्रमाणे वडील व ते पाहुणे कऱ्हाडला गेले ; आणि माझे लग्न पुण्यात न ठरता मोटे यांचेकडेच ठरले. श्री.वसंतराव मोटे यांच्याशी मी वयाच्या तेराव्या वर्षी विवाहबद्ध झाले. अशाप्रकारे प.पू.श्री.काकांचा आशीर्वाद खरा ठरला व याचे सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले. आज मी वयाची पंचाहत्तरी पार केली आहे व प.पू.श्री.काकांच्याच आशीर्वादांनी माझा संसार सुख-समाधानात झालेला आहे.
लग्नानंतर मला बरेच दिवस मूल झाले नव्हते. माझे वडील प.पू.श्री.काकांना नेहमी विचारीत ; "काका, कधी होणार माझ्या मुलीला मूल ?" त्यावर प.पू.श्री.काका सांगत ; "काळजी करू नकोस, होणार आहे. थोडा धीर धर !" त्यानंतर पुढे दहा वर्षांनी मला मुलगा झाला. त्याला प.पू.श्री.काकांच्या पायावर ठेवले. बाळाला त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्यावेळी ते म्हणाले ; "याची दृष्ट काढत जा. हा घराण्याचे नाव काढेल !" आज त्यांचे शब्द खरे झालेले आहेत. त्याचवेळी ते मला म्हणाले होते की ; "तुला अजून एक मुलगी होईल !" हेही त्यांचे शब्द पुढे खरे ठरले.
माझे वडील प.पू.काकांच्या दर्शनाला रोज जात असत. एकेदिवशी त्यांनी लिहिलेल्या श्री ज्ञानेश्वरीची एक प्रत माझ्या वडिलांना दिली व सांगितले ; "विश्वनाथ, ही पोथी डोक्यावर घेऊन भगवान श्रीपांडुरंगांच्या पायाशी ठेव !" माझे वडील लगेच ती प्रत घेऊन पंढरपूरला श्रीपांडुरंग दर्शनाला गेले. नामदेव पायरीपासून ती प्रत डोक्यावर घेऊन ते चालू लागल्यावर, दोन्ही बाजूच्या  लोकांनी भराभरा बाजूला सरकून त्यांना  जागा करून दिली. ते सरळ श्रीभगवंतांच्या समोर जाऊन उभे राहिले व त्यांच्या पायी प्रेमादरपूर्वक दंडवत घालून त्यांनी ती प्रत चरणांवर अर्पण केली. प.पू.श्री.काकांच्या कृपेने त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष देवांचे दर्शन झाले, असे ते नेहमी सांगत असत. त्या प्रसंगानंतर अखेरपर्यंत ते एका एकादशीला पंढरपूरची व दुसऱ्या एकादशीला आळंदीची वारी करीत होते. 
आम्हां फणसे कुटुंबियांवर प.पू.श्री.काकांचा वरदहस्त सदैव होता व आजही आहे. माझ्या देवघरात प.पू.श्री.काकांचा फोटो नित्यपूजेत आहे. मी फलटणला गेल्यावर प.पू.श्री.काकांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय परत येत नाही. प.पू.श्री.काकांच्याच आशीर्वादांनी आम्हां दोघांना व मुलांना प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे यांच्याकडून दीक्षा लाभली. तसेच प.पू.सौ.ताई व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचे दर्शन, सहवास व सेवा लाभली व आजही लाभत आहे. आज या वयातही दररोजची साधना, उपासना व श्रीक्षेत्र दत्तधाम येथे दर्शन व सेवा नियमाने घडत आहे. हे सर्व नि:संशय प.पू.श्री.काकांच्याही आशीर्वादांचे सुफलित आहे, असे मी मनापासून मानते. प.पू.श्री.काकांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !
- श्रीमती शशिकला वसंतराव मोटे, पाटण.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481