24 Sept 2024

प्रणमत गोविन्दं परमानन्दम्

प.पू.सद्गुरु. श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी विशेष लेख

एक उमदा, देखणा, तरुण डॉक्टर. सैन्यातला चांगला अधिकारी, मानमरातबाचे सुखवस्तु जीवन, सुंदर पत्नी, एक मुलगा, परदेशातली नोकरी, रॉयल आर्मीच्या मेरिटोरियस सर्व्हिस अवॉर्डचा मानकरी; अचानक वैराग्य बळावून आपल्या नोकरीचा राजीनामा देतो काय, एका लौकिकार्थाने अडाणी, साध्याशा दिसणाऱ्या सावळ्या महापुरुषाच्या चरणीं शरण जातो काय; आणि सर्वस्वाचा त्याग करून त्या अशिक्षित परंतु अंतरंगीच्या ब्रह्मानुभवाने, आपल्या अलौकिक सेवाव्रताने श्रीमंत झालेल्या महात्माच्या सेवेत स्वतःला पूर्णतः झोकून देतो. एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी ही सत्यघटनाच एका महान विभूतिमत्त्वाच्या जडण-घडणीचे बीज ठरलेली आहे ! तो वरकरणी अशिक्षित दिसणारा महात्मा म्हणजेच पुसेसावळी येथील विदेही स्थितीतले सत्पुरुष सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज होत. त्यांचा शिष्योत्तम म्हणजेच पूर्वीचे रॉयल इंडियन आर्मीमधील सर्जन आणि नंतरच्या काळात जगप्रसिद्ध झालेले प.पू.सद्गुरु श्री.डॉ.गोविंद रामचंद्र उपळेकर तथा प.पू.श्री.काकासाहेब उपळेकर महाराज हे होत ! आज दि.२४ सप्टेंबर रोजी प.पू.श्री.काकांच्या पन्नासाव्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
अलौकिक अशा श्रीसंत काकासाहेब उपळेकर महाराजांचे अवघे चरित्रही अलौकिकतेच्याच कोटीचे आहे. आपल्या ८७ वर्षाच्या प्रदीर्घ जीवनात त्यांनी केलेले अजोड कार्य आणि निर्मिलेली ग्रंथसंपदा पाहिली की अक्षरशः स्तिमित व्हायला होते. संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या प.पू.डॉ.काकासाहेबांनी आपल्या श्रीगुरुपरंपरेने आलेल्या तुरीयातीत-अवधूत अवस्थेच्या स्वरुपस्थितीत रममाण होऊनच आपली समग्र ग्रंथसंपदा निर्मिलेली आहे. तो त्यांच्या अद्वयानंदानुभवाचा सहज उद्गार आहे. सर्वसामान्यांना काहीशी दुर्बोध किंवा आकलनास कठीण वाटली तरी, त्यांची सर्वच ग्रंथसंपत्ती अतीव माधुर्याने, भगवत्कृपाप्रसादाच्या नैसर्गिक सौंदर्याने आणि स्वाभाविक अमृतमयतेने सर्वांगी आतबाहेर नटलेली आहे !
उपळेकर घराणे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावचे राहणारे. आडनाव क्षीरसागर, गोत्र वसिष्ठ आणि कुलदैवत श्रीक्षेत्र नीरानृसिंहपूरचे भगवान श्रीनृसिंह होत. गावाचे कुलकर्णपण असल्यामुळे कुलकर्णी आडनाव लावू लागले आणि गाव सोडून आल्यामुळे उपळाईकर नाव रूढ झाले. प.पू.श्री.काकांचे वडील रामचंद्र उपळेकर हे वकील होते. माळेगाव संस्थानच्या जाधवराव सरदारांच्या पदरी नोकरीला होते. जाधवरावांची कन्या फलटण संस्थानच्या श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकरांची पत्नी झाली. तेव्हापासून उपळेकर मंडळी फलटणला स्थायिक झाली. पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा जन्म माघ शुद्ध द्वितीया, दिनांक १५ जानेवारी १८८८ रोजी माळेगाव येथे झाला. त्यांचे बालपण फलटणला व्यतीत झाले. फलटण संस्थानच्या हायस्कूलमध्ये शिक्षण झाल्यावर ते पुण्याच्या नू.म.वि. मध्ये दाखल झाले. १९०९ साली ते बी.जे.मेडिकल कॉलेजमधून एल.सी.पी अँड एस. ही पदवी संपादन करून लगेचच रॉयल इंडियन आर्मीमध्ये सर्जन पदावर रुजू झाले. १९१३ साली वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांचा विवाह श्री.शिवछत्रपतींचे राजकीय गुरु दादोजी कोंडदेव यांच्या वंशातील कु.दुर्गा हिच्याशी झाला. डॉ.गोविंद आणि चि.सौ.का. रुक्मिणी यांचा जोडा शोभून दिसत होता.
डॉ.गोविंद यांचे पोस्टिंग वायव्य भारतातील रावळपिंडी येथे होते. काही काळ ते आफ्रिकेत नैरोबी येथेही होते. पहिल्या महायुद्धात बजावलेल्या उत्तम कामगिरीसाठी त्यांना 'मेरिटोरियस सर्व्हिस अवॉर्ड' तसेच दोन सुवर्णपदके आणि तीन रौप्यपदकेही मिळाली होती. पहिल्या महायुद्धाची धामधूम संपल्यावर श्रीभगवंतांच्याच इच्छेने डॉ.गोविंद उपळेकरांच्या चित्त तीव्रतेने अंतर्मुख होऊ लागले. आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे ? आपल्याला काय मिळवायचे आहे ? याचे विचार त्यांना अस्वस्थ करू लागले. त्याच सुमारास त्यांना एका तेजस्वी दिगंबर साधूचे अधून-मधून दिव्य दर्शन होऊ लागले. त्यामुळे त्यांच्या अंतर्मुखतेत आणखी भर पडली. त्यांच्या मनात वैराग्य दृढ होऊ लागले. त्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर १९२० साली काही दिवसांची सुट्टी घेऊन फलटणला आले. ही सुट्टी त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली !
श्रीभगवंतांच्याच संकल्पाने डॉ.गोविंद उपळेकर यांचे खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे जाणे येणे झाले. तेथे अचानकच त्यांची भेट एका विलक्षण अवलियाशी झाली आणि अंतरीची खूण पटल्याने त्यांची अस्वस्थता पूर्ण शमली. हेच ते राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील झाकलेले माणिक म्हणावेत असे विदेही सत्पुरुष सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज परीट होत. आपल्याला वारंवार दर्शन देणारे हेच ते साधू अशी जाणीव झाल्याने डॉ.गोविंद त्यांच्या चरणीं शरण गेले. सद्गुरु श्रीकृष्णदेवांनी देखील, "गोविंदा; किती उशीर केलास ? वाट पाहत होतो तुझी !" अशा गोड शब्दांत आपल्या शिष्याचे स्वागत केले.
डॉ.गोविंद उपळेकरांना आपल्या जीवनाचे यथार्थ ध्येय समजले. त्यांनी निश्चयाने आपल्या मानमरातबाच्या नोकरीचा त्याग केला आणि घरच्यांचा विरोध पत्करून त्या वेडगळ दिसणाऱ्या, वागणाऱ्या महान अवलियाच्या सेवेत स्वतःला पूर्ण झोकून दिले. हे गुरुसेवाव्रत फार कठीण होते. देहाचे ममत्व जावे, देहबुद्धीचा निरास व्हावा म्हणून अवलंबिलेली ती खडतर तपश्चर्या शेवटास नेण्यासाठी किती निर्धार हवा ? अहो, अतिशय सुखवस्तू स्थितीतून एकदम जंगलातच जाऊन उघड्यावर राहण्यासारखेच होते ते. श्रीकृष्णदेव महाराज तासन् तास ओढ्याच्या तापलेल्या वाळूत शांतपणे पडून राहात. दिवस दिवस एका पायावर आत्ममग्न होऊन उभे राहत. दिवसरात्र रानांवनात, काट्याकुट्यात भटकत सुकुमार श्री.गोविंदानेही श्रीगुरूंचे अनुकरण करायला सुरुवात केली.
तीन वर्षांच्या अत्यंत कठीण तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या श्रीसद्गुरुमाउलींचा कृपाघन अपरंपार बरसला आणि त्यामुळे डॉ.गोविंद ब्रह्मानंदीच्या आनंदसागरात निमग्न झाला. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांची ही अवघी शिष्यशाखा अवलिया, विदेही महात्म्यांचीच आहे. चौतीस वर्षांचे डॉ.गोविंदरावही आपल्या श्रीगुरूंसारखेच 'देहीच असोनि विदेही' अवस्थेस प्राप्त झाले.
१९२३ सालच्या मध्यात श्रीगुरु कृष्णदेवांनी लाडक्या गोईंदाला फलटणला पाठवून दिले आणि संसारात राहूनच परमार्थ चालविण्याची आज्ञा दिली. आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाल्याचे जाणून ८ ऑक्टोबर १९२३, भाद्रपद कृष्ण त्रयोदशीला सद्गुरु श्रीकृष्णदेवांनी जलसमाधी घेऊन नश्वर देहाचा त्याग केला. इकडे फलटणी गोविंदरावांना हे दुःखद वृत्त समजले. ते लोटांगणे घालीत पुसेसावळीला गेले. श्रीसद्गुरूंच्या समाधीवर ठेवलेले मस्तक त्यांनी तीन दिवसांनीच वर उचलले. त्यांच्या हृदयात एक निर्धार पक्का झालेला होता. आपल्या श्रीसद्गुरूंचे लीलाचरित्र आणि त्यांच्या कृपेने आलेल्या दिव्य आत्मानुभूतीला शब्दरूप देण्याचे त्यांनी ठरविले. पुसेसावळी गावाबाहेरच्या ओढ्याकाठी असणाऱ्या आपल्या श्रीसद्गुरूंच्या समाधीपाशी बसून त्यांनी साडेचारशे पृष्ठांचा 'श्रीकृष्णदेव' हा ग्रंथराज लिहून काढला. मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांमधून एकाच वेळी लिहिलेला हा ग्रंथ श्रीसद्गुरुपरंपरेने लाभलेली अतिदिव्य आणि अनेकांगी अवधूती मौज सर्वार्थाने प्रकट करविणारा ठरला !
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या साहित्यसृष्टीतील हे पहिले कमलपुष्प ठरले. आपल्या ८७ वर्षांच्या आयुष्यात प.पू.श्री.काकांनी बत्तीसपेक्षा जास्त ग्रंथ लिहिले आणि अक्षरशः विनामूल्य वाटले. त्यांच्या कोणत्याही ग्रंथांच्या बदल्यात त्यांनी कधीही कसलेच मूल्य घेतले नाही. आपल्या हयातीत तीन-चार लाख रुपयांची ग्रंथसंपदा त्यांनी विनामूल्य वाटली. पाऊणशे वर्षांपूर्वी या तीन-चार लक्ष रुपयांचे लौकिक मूल्य प्रचंड होते. पू.श्री.काकांची समग्र ग्रंथसंपदा जवळपास पाच हजार पेक्षाही जास्त पृष्ठे भरतील एवढी अफाट आहे !
श्रीसद्गुरुकृपेने आणि सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या प्रेमाशीर्वादांनी पू.श्री.काकांचा श्रीज्ञानेश्वरीच्या अंतरंगात प्रवेश झाला होता. श्रीकृपेने अनुभवलेल्या श्रीज्ञानेश्वरीचा अमृतरस त्यांनी 'श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनी' या भाष्याच्या माध्यमातून समग्रतेने प्रकट केला आहे. संपूर्ण श्रीज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांवरचे हे भाष्य अडीच हजार पृष्ठांपेक्षाही मोठे आहे. यातील अनेक अध्यायांची प.पू.श्री.काकांच्या हयातीतच पंजाबी, तेलुगू, तमिळ, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, कानडी, मल्याळम इत्यादी भाषांमध्ये भाषांतरे देखील प्रकाशित होऊन विनामूल्य वितरित केली गेली.
आपल्याला लाभलेला अपूर्व ब्रह्मानंदानुभव प.पू.श्री.काकांनी 'प्रास्ताविक', 'आमोद', 'सामोपचार परिहार' आणि 'ज्योतिज्योति' या चार लघुनिबंध वजा ग्रंथांमधून प्रकट केलेला आहे. तसेच श्रीज्ञानेश्वरीत आलेले महत्त्वाचे सिद्धांत आणि त्यावरील श्रीमाउलींच्या ओव्यांचे संकलन 'श्रीसिद्धांत ज्ञानेश्वरी' ग्रंथाच्या चार खंडांमधून प्रकाशित झाले. सर्वसामान्य वाचक आणि अभ्यासकांसाठी हा फारच मोठा ठेवा ठरला. सिद्धांतांच्या ओव्या आणि त्यांचा सुबोध सरलार्थ एकत्रित मिळाल्याने अभ्यासकांची चांगली सोय झालेली आहे. श्रीज्ञानेश्वरीच्या दैनंदिन अभ्यासासाठी हे चार खंड अत्यंत उपयुक्त आहेत.
सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या अठ्ठावीस अभंगांच्या 'श्रीहरिपाठ' या लघुग्रंथावर प.पू.श्री.काकांची अपरंपार श्रद्धा, भक्ती होती. त्यांनी आयुष्यभर हरिपाठाचे पठण आणि भजन केले. ते सर्वांना हरिपाठाचीच उपासना देत असत. हरिपाठावरील आपले चिंतन त्यांनी 'हरिपाठ सांगाती' या ग्रंथाच्या रूपाने प्रकाशित केलेले आहे. अतिशय अचूक, उत्तम आणि मार्गदर्शक असे हे ५२८ पृष्ठांचे बृहद् संकलन श्रीहरिपाठप्रेमी सज्जनांनी प्रेमादराने गौरविलेले आहे. श्रीज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या आणि त्यांचा अर्थ आणि निवडक संतांचे अभंग यांचे सुरेख संकलन या ग्रंथात करण्यात आलेले आहे. या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निवेदनात प.पू.श्री.काका म्हणतात, "हरिपाठ कीर्ती मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा । एवढे ज्या हरिपाठाचे माहात्म्य आहे. तो हरिपाठ भाषिकांपुढे शृंगारून मांडण्याचा प्रयत्न आहे. हरिपाठ हा एक महान मंत्र आहे व त्याच्या सततच्या पाठाने अनेक साधकांनी आपली उन्नती करून घेतली आहे. हा मंत्र जगाला देणारे श्रीज्ञानदेव यांच्या श्रीज्ञानेश्वरीच्या भूमिकेवरून श्रीहरिपाठाचे अवलोकन व्हावे हा 'श्रीहरिपाठ सांगाती'च्या मागील उद्देश आहे. श्रीज्ञानेश्वरीच्या कोंदणात शोभणारे हे देदीप्यमान रत्न आहे. हरिपाठ सांगातीच्या संगतीमध्ये जे हरिपाठाचा नित्यपाठ करतील, त्यांना मोक्षसुखाचा लाभ सहजासहजी मिळेल.”
पू.श्री.काका हे सदैव जीवन्मुक्त दशेतच वावरणारे त्यांच्या काळातील एक अद्वितीय संतरत्न होते. परंपरेने आलेली अवधूती मौज पूर्ण पचवून आपल्या स्मरणानंदात अखंड विचरण करणारे हे पराभक्तीचे महान आचार्य विलक्षण अशा विभूतिमत्त्वाचे धनी होते. प.पू.श्री.काकांच्या स्वरूप स्थितीचे अगदी चपखल वर्णन करताना, 'स्वानंद चक्रवर्ती' या ग्रंथाच्या प्राक्कथनात संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "सद्गुरु भगवान श्रीदत्तात्रेय प्रभूंनी 'जीवन्मुक्त गीते'त असे म्हटले आहे की; 'आपल्या आत्म्याचे शिवशक्तीरूप, परब्रह्मस्वरूप जाणून, तसेच आपल्या पिंडाचे, शरीराचे ब्रह्मांडस्वरूप समजून घेऊन जो हृदयातील मोह चिदाकाशात विलीन करून असतो, तोच जीवन्मुक्त म्हटला जातो !"
प.पू.श्री.काकांची अक्षरशः तशीच नित्य अंतरंग स्थिती होती. त्या परमबोधावस्थेत सतत रममाण राहणारे काका, संतत्वाचा उत्तुंग आदर्श होते. ते स्वानंदसाम्राज्याचे अनभिषिक्त चक्रवर्ती होते. अनेक आर्तांना त्यांनी कळवळा येऊन दुःखमुक्त केले, अनेक जिज्ञासूंना जिव्हाळ्याने यथायोग्य मार्गदर्शन करुन भक्तिमार्गावर अग्रेसर केले; आणि त्यांच्या मर्जीला उतरलेल्या निवडक शरणागत मुमुक्षूंना अमोघ कृपादान देऊन ब्राह्मीस्थितीत प्रतिष्ठापित केले. 
प.पू.श्री.काकांचे यथार्थ दर्शन श्रीज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील ज्ञानीभक्ताच्या सद्गुरु भगवान श्रीमाउलींनी निरूपिलेल्या गुणसंपत्ती लक्षणांनीच होऊ शकतो. प्राप्त पुरुषांची ती समग्र दैवी सुलक्षणे त्यांच्या ठायी सुखाने, आपलेपणाने तिन्ही त्रिकाल नांदत होती. सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांच्या पूर्णकृपेने अंगीच पराभक्तीचे अधिष्ठान झालेल्या काकांचे ते आत्मसौंदर्य अत्यंत विलक्षण, पाहणाऱ्याला खिळवून ठेवणारे होते.
आत्ममग्न स्वानंदसुखावस्थतेतूनच सगळी ग्रंथनिर्मिती झाल्याने पू.श्री.काकांची शैली आणि त्यांचे शब्दवैभव काहीसे निगूढच आहे. त्यांच्या देवदुर्लभ 'आत्मबोधप्रशस्ती'चा तो सहज अनुकार असल्यानेच त्यांची वाक्यरचनाही लफ्फेदार आणि प्रौढ आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना त्यामुळेच दुर्बोध आणि आकलनास जरा कठीण वाटणारी पू.श्री.काकांची ग्रंथरचना आत्मानुभवी महात्म्यांना मात्र अगदी सहजसुंदर आणि मनोहरच जाणवते. पुन्हा पुन्हा वाचून, त्यांच्या मोठ्या वाक्यातील नेमका आशय समजून उमजून घेतल्याशिवाय त्यातील अमृतगोडी चटकन आपलीशी होत नाही. असे असले तरीही, प.पू.श्री.काकांच्या स्वरूपमग्न शैलीला लाभलेला एक नैसर्गिक गोडवा आणि श्रीसद्गुरुकृपेचा, सद्गुरु श्री माउलींच्या परमकृपेचा दिव्यस्पर्श, सामान्य वाचकालाही भावविभोर करण्याचे अद्भुत सामर्थ्य अंगी मिरविताना दिसतो. सद्गुरु श्री.माउलींनी श्रीसद्गुरुकृपेने 'पिकलेल्या सारस्वताच्या संपन्नते'चा, त्यामागील सद्गुरुकृपेच्या 'साउली'चा केलेला यथार्थ गौरव पू.श्री.काकांच्या वाङ्मयात मूर्त झालेला पाहायला मिळतो !
प.पू.श्री.काकांनी साधकांच्या उपासनेला पूरक ठरावे असेही काही लघुग्रंथ प्रकाशित केले. 'नित्यपाठ', 'प्रसन्नमाधवी' आणि 'श्रीज्ञानेश्वर प्रशस्ती' असे ते तीन लघुग्रंथ विविध महात्म्यांची प्रभावी स्तोत्रे, अभंग आणि पदांचे सुरेख संकलन आहेत. 'प्रसन्नमाधवी' आणि 'श्रीज्ञानेश्वर प्रशस्ती' हे पू.श्री.काका स्वतः अनुसरत असलेल्या दररोजच्या हरिपाठ उपासनेच्या नित्यक्रमाचे ग्रंथरूप आहे. आज जवळपास पाऊणशे वर्षे झाली, त्यांनी घालून दिलेल्या पद्धतीने दररोज हरिपाठ उपासना त्यांच्या मंदिरात संपन्न होत आहे. हेही सद्गुरु श्रीमाउलींच्या कृपेने एक महान आश्चर्यच म्हणायला हवे.
सद्गुरु श्री.काकांचा आणखी एक ग्रंथ म्हणजे 'विभूती'. फलटण येथे गेल्या शतकात होऊन गेलेल्या सद्गुरु श्री हरिबुवा महाराज आणि त्यांच्या शिष्या सद्गुरु श्री आईसाहेब महाराज या दोन अलौकिक विभूतिमत्त्वांचे अतिशय रसाळ, ज्ञानवर्धक आणि बोधप्रद असे गद्यचरित्र 'विभूती' ग्रंथाच्या रूपाने प्रकाशित झाले. यातही चरित्रभागाव्यतिरिक्त उत्तरार्धात तत्त्वचिंतनाचा, साधकांच्यासाठी उपयुक्त असा 'विविध विषय' नावाचा बोधप्रद भाग पू.श्री.काकांनी लिहिलेला आहे. पू.श्री.काकांच्या समग्र साहित्य संपदेचा सविस्तर विचार करणे विस्तारभयास्तव अशक्य असल्याने प्रस्तुत 'विभूती' ग्रंथाचा अल्पसा परिचय करून देतो.
संतचरित्रांचे रचनाकार संतच असायला हवेत अशी सर्वमान्यता आहे. 'अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती l' या श्रीसमर्थ वचनाचा तसेच 'तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण l तरीच महिमान येईल कळो ll' या संतवचनांचा भावार्थ हाच आहे. संतत्वाचा अनुभव असल्याशिवाय संतचरित्रांचे यथार्थ मर्म मांडणे शक्यच होत नाही. पू.श्री.काकांचे अतीव आदराचे स्थान असणारे श्रीसंत हरिबुवा आणि श्रीसंत आईसाहेब या दोन्ही विभूतींचे रसाळ आणि मनोवेधक चरित्र त्यांनी भाविकांवर मोठे उपकारच करून ठेवलेले आहेत. प.पू.श्री.काकांना दोन्ही विभूतींचा सहवास आणि कृपाप्रसाद लाभलेला होता. त्यामुळे या चरित्राला झालेला आत्मीयतेच्या, प्रेमभावाचा विशेष स्पर्श वाचकाला शेवटपर्यंत सतत जाणवत राहतो. किंबहुना, पू.श्री.काकांच्या अंतरंगी वसत असलेली या महात्म्यांच्या विषयीची अपरंपार श्रद्धाभक्तीच चरित्ररूपाने साकारलेली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
'विभूती' या ग्रंथात पूर्वार्धात सुरुवातीला श्रीसंत हरिबुवांचे चरित्र घेतलेले आहे. या चरित्र विभागांमध्ये प.पू.श्री.काकांनी श्रीसंत हरिबुवा आणि श्रीसंत आईसाहेब महाराजांच्या जीवनात घडलेले असंख्य अनोखे चमत्कार आणि त्यांच्या कृपाप्रसादाने घडलेल्या अतर्क्य घटनांचा लेखाजोगा भावपूर्ण शब्दांत मांडलेला आहे. ग्रंथाच्या उत्तरार्धात 'विचार दोहन', 'अमृत बिंदु' आणि 'विविध विषय' अशा तीन शीर्षकांचे विभाग आहेत. हे सारेच चरित्रवर्णन रसमय असून वाचकाच्या मनात या दोन्ही विभूतींविषयी अपार प्रेमादर निर्माण करणारेच आहे. या चरित्रासंबंधात आपल्या प्रस्तावनेत पू.श्री.काका म्हणतात, "श्रीहरिबाबांच्या लीला अत्यंत हृदयंगम आहेत हें जितके खरें, तितकाच त्यांनी श्रीआईसाहेब (लाटे) यांच्यावर केलेला अनुग्रह उल्लेखनीय आहे. नुकतीच लग्न झालेली ६-७ वर्षांची मुलगी, श्रीहरिबाबांचे नजरेस - ते लाटे येथे गेले असताना पडते काय व तिला जवळ बोलावून ते तिच्या मस्तकीं हस्त ठेवतात काय - अनेक वर्षे प्रयत्न करूनहि जें साधकांना मिळवता येत नाहीं - ते त्यांनी लीलेने श्रीआईसाहेबांच्या पदरांत टाकले. श्रीआईसाहेब देहभान विसरल्या व एक लोकोत्तर अवतारी व्यक्ती म्हणून जगांत नांदू लागल्या." एवढ्यावरूनच प्रस्तुत ग्रंथात किती अलौकिक आणि अद्भुत चरित्रलीला वाचायला मिळणार आहेत, याचा सुज्ञ वाचकांना अंदाज येऊ शकतो. 'विचार दोहन' या विभागात पू.श्री.काकांनी मार्मिक असे विचार मांडले आहेत. साधकांना उपयुक्त ठरावेत, चिंतन-मननात साहाय्यक व्हावेत असेच हे विचार आहेत. यातच एका विचारात ते 'सद्गुरुतत्त्वा'ची चौदा लक्षणे सांगतात. या अतिशय मननीय अशा चौदा व्याख्याच आहेत. त्यापुढील 'अमृत बिंदु' विभागाचे शीर्षकच किती बोलके आहे पाहा. 'भक्तहृदयांस ज्ञानसिंधु करणारे मननीय अमृतबिंदु' मधून पू.श्री.काकांनी सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली, श्रीनामदेव, श्रीएकनाथ, श्रीतुकाराम आणि श्रीकृष्णसुत या संतांचे मार्मिक व सुंदर अभंग दिलेले आहेत. त्या अभंगांना अन्वर्थक शीर्षकेही आहेत.
ग्रंथाच्या शेवटच्या 'विविध विषय' नामक संकलनात, श्रीज्ञानेश्वरीतील काही निवडक ओव्यांचे वेचे, श्रीमदाद्य शंकराचार्यांची काही स्तोत्रे, प्रवासवर्णन इत्यादी चित्ताकर्षक व बोधप्रद गोष्टी आहेत. पू.श्री.काकांच्या इतर वाङ्मयासारखा 'विभूती' हा ग्रंथ दुर्बोध आणि आकलनास कठीण अजिबात नाही.
पू.श्री.काकांची समग्र ग्रंथसंपदा त्या काळातच विनामूल्य वितरित झाल्याने आजमितीस फारसे ग्रंथ उपलब्ध नाहीत. काही ग्रंथांच्या दोन - तीन आवृत्त्याही निघाल्या. पण आता मात्र ते उपलब्ध होत नाहीत. म्हणून आम्ही त्यातील काही ग्रंथ स्कॅन करून त्यांच्या पीडीएफ उपलब्ध करून देत आहोत. ज्यांना हव्या असतील त्यांनी माझ्याशी संपर्क करावा ही विनंती.
लोकोत्तरतेच्या कोटीतील एका ज्ञानी भक्ताचे, पराभक्तीचे अधिष्ठान झालेल्या एका सहृदय, श्रीगुरु-हरिभक्ताचे हे समस्त वाङ्मय जणू त्यांची 'वाङ्मयीमूर्ती'च आहे. आजही त्या रूपाने प.पू.श्री.काका अखंड विराजमान आहेत. जो - जितका या अगाध अमृतसागरात अवगाहन करील तो तितकाच अमृतमय होऊन ठाकेल, यात तिळमात्र शंका नाही !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
प.पू.सद्गुरु श्री.काकांच्या समाधी मंदिरात आजच्या दिनी केलेली सुंदर सजावट. तसेच श्रींच्या सुवर्णपादुकांचे दर्शन !!

18 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु - तुलसीपत्र पाचवे

तुलसीपत्र पाचवे - यमाष्टक

चौथ्या तुलसीपत्रात आपण श्रीभगवन्नामाचे अलौकिक माहात्म्य सांगणारी 'यमगीता' पाहिली. यमगीतेचा उपदेश केल्यानंतर आपल्या किंकरांना याच संदर्भात अधिक मार्गदर्शन करण्याचा विचार यमदेवांच्या मनात आला. तेवढ्यात त्यांनी हातात पाश घेऊन कोणत्यातरी जीवाचे प्राण हरण करायला निघालेले आपले दूत पाहिले. त्यांना उद्देशून श्री यमदेवांनी जो मौलिक उपदेश केला, त्याला 'यमाष्टक' म्हणतात. हे अष्टक श्रीनृसिंह पुराणाच्या नवव्या अध्यायात आले आहे. 
श्री यमदेव म्हणाले, "दूतांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, भगवान मधुसूदनांना शरण गेलेल्या जीवांना तुम्ही सोडून द्या. त्यांच्या पुण्यपापांचा हिशोब आपण करायची गरज नाही. कारण यम म्हणून माझी सत्ता केवळ सामान्य जीवांवरच चालते. वैष्णवांच्यावर माझा अधिकार चालत नाही. जे जीव श्रीभगवंत आणि श्रीगुरूंना विमुख आहेत, त्यांनाच मी शासन करू शकतो. या उलट वैष्णवांना, भगवद्भक्तांना मी वंदनच करतो. कारण मलाही माझी उत्तम गती व्हावी अशी इच्छा आहे. मी भगवान श्रीविष्णूंच्याच अधिपत्याखाली कार्य करत आहे. 
विष कधी अमृत होऊ शकत नाही, लोखंड शंभर वर्षे अग्नीत तापवले तरी ते सोने होऊ शकत नाही, परप्रकाशित चंद्र कधीच स्वयंप्रकाशित सूर्य होऊ शकत नाही, तसेच श्रीभगवंतांना विमुख असणारे जीव कधीच सिद्धी (मुक्ती) प्राप्त करून घेऊ शकत नाहीत.  परंतु श्रीभगवंतांच्या चिंतनात सतत रममाण झालेला मलिन शरीराचा सामान्य जीव देखील शोभायमान ठरतो. म्हणून ज्याला या संसारचक्रातून आपली सुटका व्हावी असे वाटते त्याने श्रीभगवंतांच्या श्रीचरणांचाच दृढ आश्रय घेतला पाहिजे ! 
अनंत पुण्ये गाठीशी असल्यामुळे भाग्याने मिळालेले हे मनुष्य शरीर मोक्षासाठी प्रयत्न न करता केवळ सुखोपभोगांमध्ये व्यर्थ घालवणे म्हणजे राखेसाठी मौल्यवान चंदनकाष्ठे जाळण्याचा मूर्खपणा करणे होय. तुम्ही आपला दुर्लभ मनुष्यजन्म वाया घालवू नका, वेळीच जागे व्हा !
महान देवदेवता ज्यांच्या श्रीचरणांना वारंवार वंदन करण्यात धन्यता मानतात त्या भवजन्मनाशक जगत्प्रभू सनातन पुरुष भगवान श्रीविष्णूंना मी पुन:पुन्हा नमस्कार करतो !"
भगवान श्रीव्यासदेव या 'यमाष्टका'चे माहात्म्य सांगतात की, "जो नित्यनियमाने या स्तोत्राचे पठण करतो तो सर्व पापांमधून मुक्त होऊन विष्णुलोकी जातो. त्याच्या हृदयात विष्णुभक्ती पैसावते !"
मागचे लेख वाचून काही जणांना शंका आली असेल की, मार्कंडेयांचे आख्यान तर शिवपुराणात आहे. ते शिवभक्त होते, शिवपिंडीला घट्ट मिठी मारून बसल्याने त्यांना यमदूत स्पर्श करू शकले नाहीत, इत्यादी कथा आम्ही ऐकलेल्या आहेत. मार्कंडेय विष्णुभक्त असल्याची कथा आज पहिल्यांदाच वाचतो आहोत. 
ही शंका रास्त आहे. मुळात अशा पौराणिक कथा वाचताना आपण त्यांतील सारगर्भ उपदेशच लक्षात ठेवायचा असतो. कथेतील इतर लौकिक संदर्भ सोडून द्यायचे. ज्या देवतेचे पुराण असेल त्यांच्याच कथा प्राधान्याने त्यात येणार, हे उघडच आहे. गणेश पुराण वाचले की गणेश सर्वश्रेष्ठ वाटतात, शिव पुराण वाचले की शिव थोर जाणवतात. वास्तविक शिव-गणेश-विष्णू हा भेदच काल्पनिक आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे
ही सृष्टी आजवर हजारो वेळा निर्माण झाली व तितक्याच वेळा नष्टही झालेली आहे. प्रत्येक कल्पात हे सर्व अवतार झालेले आहेत. त्यातील एका कल्पात मार्कंडेय हे विष्णुभक्त होते तर दुसऱ्या कल्पात ते शिवभक्त होते. ज्या त्या कल्पातील प्रसंग महात्म्यांनी ध्यानावस्थेत जसा पाहिला तसा त्यांनी नोंदवून ठेवला. त्यामुळे या सर्व कथा कल्पभेदाने सत्यच आहेत, यात खोटे काहीही नाही. भगवान श्रीशिव आणि भगवान श्रीविष्णू ही रूपे जरी भिन्न असली तरी ते मूळचे परब्रह्माचेच अवतार आहेत; आणि त्यामुळेच ते पूर्णत: एकच आहेत, हे आपण विसरता कामा नये.
भगवान श्रीविष्णू, भगवान श्रीशिव, भगवान श्रीसूर्य, भगवान श्रीगणेश आणि भगवती श्रीजगदंबा हे पाच परब्रह्मस्वरूप पंचायतन आहे. भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी पंचायतनपूजेचा प्रचार करून या पाचांच्या अनुयायांमधला भेदभाव नष्ट केला. कारण मुळातच ही पाच रूपे परब्रह्मस्वरूपच आहेत, त्यामुळेच एकच आहेत. आपापल्या आवडीनुसार जो तो ज्या त्या देवाची उपासना करतो. सर्व भक्त शेवटी एकाच अफूट, अनंत परब्रह्मात जाऊन मिळतात. त्यामुळेच देवांमधील भेद खरा नाही; आणि तो भेद सत्य नाही हे ज्याला अनुभवाने पटते तोच खरा भक्तश्रेष्ठ मानला जातो !
भगवान श्रीनारायणांच्या, भगवान श्रीनृसिंहांच्या परमपावन नामाचे जो सदैव मनापासून स्मरण, चिंतन करतो, तो नि:संशय यमाच्या तावडीतून सुटतो. सद्गुरु श्री माउली हरिपाठात सांगतात तसे, "ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचें शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥हरि.२०.४॥" प्रेमभावे हरिनामस्मरण करणाऱ्या सभाग्य भक्ताचे कुळगोत्रच उद्धरून जाते, यम त्यांच्या वाट्यालाही जात नाही !
( छायाचित्र संदर्भ : हिरण्यकश्यपू दैत्याचे विदारण करणारी भगवान श्रीनृसिंहांची श्रीमूर्ती. )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

16 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु - तुलसीपत्र चौथे

तुलसीपत्र चौथे - यमगीता

श्री मार्कंडेय मुनींचा प्राण हरण करण्यासाठी गेलेले पण विष्णुदूतांच्या भीतीने पळून आलेले मृत्युदेव आणि यमदूत श्री यमदेवांपाशी जाऊन रडत रडत तक्रार करू लागले; "हे यमदेवा, आम्ही आपल्या आज्ञेने जीवांना त्यांच्या कर्मगतीनुसार येथे घेऊन येतो. नेहमीप्रमाणे त्या मार्कंडेय मुनींना घ्यायला गेलो तेव्हा ते एकाग्रचित्ताने कोणत्यातरी देवतेचे ध्यान करत होते. आम्ही त्यांचा प्राण हरण करण्यासाठी त्यांच्या जवळ गेल्याबरोबर महाकाय व तेजस्वी अशा पुरुषांनी आम्हांला मुसळाने मारले. मृत्युदेवांनाही त्यांचा मार खावा लागला. ते ब्राह्मण कोण आहेत ? ते कोणते असे तप करीत आहेत ? हे कृपया आपण आम्हांला सांगा !"
सूर्यपुत्र श्री यमदेवांनी क्षणभर ध्यान लावून सर्व जाणून घेतले व ते सांगू लागले, "माझ्या दूतांनो, लक्षपूर्वक ऐका. ते ब्राह्मण भृगुऋषींचे नातू मार्कंडेय आहेत. भृगूंच्या आज्ञेनुसार मृत्यूला जिंकण्यासाठीच ते भगवान श्रीविष्णूंची आराधना करीत आहेत. त्यांनी भगवान केशवांना हृदयात धारण केले आहे. वैष्णवी महादीक्षेमुळेच त्यांना हे बल प्राप्त झाले आहे. श्रीभगवंतांना सर्वस्वाने शरणागत झालेल्या भाग्यवंताला जगात कोणीही कसलाही अपाय करू शकत नाही, हे पक्के लक्षात ठेवा. त्यामुळेच तुम्ही त्यांना स्पर्शही करू शकला नाहीत. तुम्हांला ज्यांनी मार दिला ते महाकाय पुरुष पराक्रमी विष्णुदूत आहेत. ते दयाळू आहेत म्हणून तुम्ही जिवंत तरी राहिलात. विष्णुध्यानात तत्पर असणाऱ्या भक्ताचा प्राण हरण करायला जाणे हे तुमचेच महापाप आहे. आजपासून हे कायम लक्षात ठेवा की, भगवान श्रीनृसिंहांच्या, भगवान श्रीविष्णूंच्या प्रिय भक्तांच्या तुम्ही कधीही वाटेला सुद्धा जात जाऊ नका !"
श्रीविष्णुस्मरणाने भावुक झालेल्या यमदेवांचे लक्ष तेवढ्यात नरकात खितपत पडलेल्या पापी जीवांकडे गेले. त्यांची ती दुर्दशा पाहून कळवळ्याने यमदेव त्या दु:खी जीवांना म्हणाले, "हे पापी जीवांनो, जेव्हा खरोखर वेळ होती तेव्हाच तुम्ही क्लेशहारक भगवान श्रीकेशवांची भक्ती का केली नाहीत ? पूजेसाठी कोणतीही सामग्री जवळ नसताना सद्भावनेने केवळ सहज उपलब्ध असणारे पाणी अर्पण केले तरी ते भगवान श्रीविष्णू प्रसन्न होतात. अशा परमदयाळू भगवंतांची तुम्ही कधीही पूजा केली नाहीत. प्रेमाने नुसते स्मरण केले तरी समस्त पापांपासून, दु:खांपासून मुक्ती देणाऱ्या भगवान श्रीनृसिंहांचे तुम्ही कधीच स्मरण केले नाहीत, पूजाअर्चा केली नाहीत. त्याचेच हे भयंकर फळ आता भोगत आहात !"
(https://rohanupalekar.blogspot.com)
पुन्हा आपल्या किंकरांकडे वळून यमदेव म्हणाले, "भगवान श्रीविष्णूंनी पूर्वी देवर्षी नारदांना सांगितलेले उत्तम वचन मी तुम्हांला सांगतो. 
हे कृष्ण कृष्ण कृष्णेति यो मां स्मरति नित्यश: ।
जलं भित्त्वा यथा पद्मं नरकादुद्धराम्यहम् ॥२७॥
पुण्डरीकाक्ष देवेश नरसिंह त्रिविक्रम ।
त्वामहं शरणं प्राप्त इति यस्तं समुद्धरे ॥२८॥
त्वां प्रपन्नोऽस्मि शरणं देवदेव जनार्दन ।
इति य: शरणं प्राप्तस्तं क्लेशादुद्धराम्यहम् ॥२९॥
"हे नारदा, कृष्ण कृष्ण कृष्ण असे म्हणून जे माझे नित्य स्मरण करतात त्यांना मी, ज्याप्रमाणे अथांग जलाला भेदून कमळाचे फूल वर येतेच, तसाच घोर नरकातून बाहेर काढतो. 'पुण्डरीकाक्ष, नरसिंह, त्रिविक्रम' इत्यादी माझी नामे घेऊन मला सर्वभावे शरण येतात त्यांचा मी उद्धार करतोच. मी त्यांना सर्व क्लेशांपासून, सर्व दु:खांपासून मुक्त करतो !"
यमदेवांचे हे मधुर शब्द नरकातील पापी जीवांनी देखील ऐकले. त्यासरशी ते 'कृष्ण कृष्ण नरसिंह' असा भगवन्नामांचा जयघोष करू लागले. जसजसा ते नामघोष करू लागले तसतसा त्यांच्या हृदयात भक्तिप्रेमाचा आविर्भाव झाला. ते सद्गदित होऊन श्रीभगवंतांची स्तुती करू लागले, "ज्यांचे नामकीर्तन केले असता नरकातील भयंकर ज्वाला तत्काल शांत होतात, त्या आदिमूर्ती यज्ञपती भगवान श्रीविष्णूंना नमस्कार असो. वेदांनी ज्यांचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनन्त अप्रमेय शंखचक्रगदाधारी भगवान श्रीनृसिंहांना वारंवार नमस्कार असो. मत्स्यकूर्मादी दशावतार धारण करून दुष्टांचे निर्दालन व भक्तांचे पालन करणाऱ्या महान श्रीगोविंदांना नमस्कार असो. आमचा या नरकयातनांमधून उद्धार करा !"
नरकातील त्या अभागी जीवांनी अशी स्तुती करायला सुरुवात केल्याबरोबर चमत्कार घडावा तशी त्यांची नरकपीडा शमली. त्यांचे दुर्गंधीयुक्त शरीर सुगंधी झाले, त्यांच्या शरीरावरील व्रण नाहीसे झाले आणि उत्तमोत्तम वस्त्रालंकारांनी त्यांची शरीरे सुशोभित झाली. ते जीव कृष्णस्वरूप दिसू लागले. तेव्हा विष्णुदूतांनी येऊन त्यांना दिव्य विमानांमध्ये बसवून विष्णुलोकाला नेले. 
श्रीभगवन्नामोच्चाराने घडलेली ही अद्भुत लीला पाहून सद्गदित झालेले यमदेव हात जोडून पुन:पुन्हा वंदन करू लागले, "ज्यांच्या नामकीर्तनाने नरकात पडलेले जीवही विष्णुलोकी गेले, त्या गुरुदेव भगवान श्रीनृसिंहांना मी सदैव प्रणाम करतो. अमिततेजस्वी भगवान श्रीनृसिंहांना प्रेमाने नमस्कार करणाऱ्या भाग्यवान जीवांनाही मी यमदेव वारंवार वंदन करून धन्य होतो !"
श्रीनृसिंह पुराणाच्या आठव्या अध्यायातील या कथाभागाला 'यमगीता' असे म्हणतात. श्रीभगवंतांच्या परमपावन नामाचे महत्त्व आणि माहात्म्य यथार्थतेने सांगणाऱ्या  यमगीतेतील बोध आपण हृदयात धारण करून, सद्गुरु श्री माउली म्हणतात तसे, प्रेमादरपूर्वक झडझडून नामस्मरण करून आपला उद्धार करून घेतला पाहिजे !

( छायाचित्र संदर्भ : भगवान श्रीनृसिंहांचे 'निटिलाक्ष' असे एक नाम आहे. या नामाचा अर्थ 'मोठे टपोरे गोलाकार डोळे असणारे' असा होतो. आपल्या मोठाल्या आणि अखंड दयेचा वर्षाव करणाऱ्या डोळ्यांनी हे भगवान श्रीनृसिंहप्रभू समस्त ब्रह्मांडांमधील आपल्या भक्तांवर कृपाकटाक्ष टाकत असतात. श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील निटिलाक्ष भगवान श्रीनृसिंहांचे कृपावर्षाव करणारे असेच परमप्रेमळ नेत्रकमल या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहेत ! )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष : 8888904481

15 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु - तुलसीपत्र तिसरे

तुलसीपत्र तिसरे - श्रीमार्कंडेयाख्यान

श्रीनृसिंह पुराणाच्या सातव्या अध्यायात श्रीमार्कंडेयांचे आख्यान आलेले आहे. भगवान श्रीब्रह्मदेवांनी अनुसर्गात सप्तर्षी, प्रचेता, भृगू आणि नारद यांना निर्माण केले. हे दहा विधात्याचे मानसपुत्र मानले जातात. 'भृगू' ऋषींचा विवाह 'ख्याती' नावाच्या दक्ष प्रजापतीच्या कन्येशी झाला. त्यांना 'मृकण्डू' नावाचा पुत्र झाला. मृकण्डू आणि त्यांची पत्नी  'सुमित्रा' यांना 'मार्कंडेय' नावाच्या पुत्र झाला. भृगुऋषींचे नातू मार्कंडेय हे जात्याच अत्यंत बुद्धिमान होते.
मार्कंडेय लहान असतानाच एका ज्योतिषाने सांगितले की, "हा मुलगा बारा वर्षे पूर्ण झाल्यावर मृत्यू पावेल !" हे ऐकून मार्कंडेयांच्या आईवडिलांना अतीव दु:ख झाले. ते सदैव त्याच दु:खात वावरू लागले. थोडे मोठे झाल्यावर गुरुगृही राहून गुरुसेवापूर्वक वेदाध्ययन पूर्ण करून मार्कंडेय घरी परत आले. त्यांनी आपल्या मातापित्यांना दु:खाचे कारण विचारले. आपल्याला बाराव्या वर्षी मृत्युयोग आहे हे जाणूनही मार्कंडेय शांतपणे म्हणाले, "तुम्ही निश्चिंत असा, मी तपश्चर्या करून माझा मृत्युयोग नक्कीच टाळीन !"
यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी मार्कंडेय वल्लीवट स्थानी आपल्या आजोबांकडे आले. ज्योतिषाची भविष्यवाणी सांगून त्यांनी त्यासाठी उपाय विचारला. महामती भृगू म्हणाले, "बाळा; अतिशय खडतर तपश्चर्या करून भगवान श्रीनारायणांची कृपा संपादन केल्याशिवाय मृत्यू टाळला जात नाही. म्हणून तू अजन्मा अविनाशी अशा भगवान श्रीनरसिंहांना शरण जाऊन मनोभावे त्यांचे पूजन करून 'ॐ नमो भगवते वासुदेवाय ।' या द्वादशाक्षरी महामंत्राचा जप कर. या मंत्राचा जप करणाऱ्यावर भगवान श्रीविष्णू त्वरित प्रसन्न होतात. त्यासाठी तू सह्यपर्वतात उगम पावणाऱ्या तुङ्गभद्रा नदीच्या तीरावरील 'भद्रवट' नावाच्या महान वटवृक्षाखाली भगवान श्रीकेशवांची मूर्ती स्थापून तेथेच या मंत्राची मी सांगितल्याप्रमाणे उपासना कर. तुझे कल्याण होईल !"
(https://rohanupalekar.blogspot.com)
मार्कंडेयांनी अतिशय निष्ठेने मंत्रजप केला. परिणामस्वरूप ते भगवान श्रीविष्णूंच्या स्वरूपात लीन झाले. बारा वर्षे पूर्ण झाल्यावर यमदूत त्यांचा प्राण न्यायला आले खरे, पण हरिस्वरूपात लीन झालेल्या मार्कंडेयांचे सर्व बाजूंनी संरक्षण करणाऱ्या विषणुदूतांनी त्या यमदूतांना पळवून लावले. दूतांना पळवून लावले म्हणून साक्षात् यमदेव तेथे आले. तेही विष्णुदूतांच्या भयाने मार्कंडेयांच्या जवळही जाऊ शकले नाहीत. त्याच वेळी भगवान श्रीविष्णूंनी मार्कंडेयांच्या कानात एक दिव्य स्तोत्र सांगितले. त्या स्तोत्रानेच मग मार्कंडेयांनी श्रीविष्णूंची स्तुती केली. 
या स्तोत्राला 'मृत्युञ्जय स्तोत्र' असे म्हणतात. हे आठ श्लोकांचे स्तोत्र अतिशय सुंदर, गेय व सहजसोपे असून त्याचे 'किं मे मृत्यु: करिष्यति ।' हे पालुपद आहे. प्रत्येक श्लोकाच्या उत्तरार्धात भगवान श्रीनारायणांच्या एका नामाचा उल्लेख असून, "मी त्यांना शरण गेलो आहे, आता मृत्यू मला काहीही करू शकत नाही !" असे मार्कंडेयजी छातीठोकपणे सांगत आहेत. 
या स्तोत्राचा पहिला श्लोक असा आहे, 
*नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनम् ।*
*प्रणतोऽस्मि हृषीकेशं किं मे मृत्यु: करिष्यति ॥१॥*
अत्यंत प्रभावी असे हे स्तोत्र व त्यातील गर्भितार्थ ऐकून घाबरलेल्या यमदेवांनी तेथून पळ काढला, पुन्हा कधीच ते मार्कंडेयांकडे आले नाहीत. भगवान श्रीनृसिंहांच्या कृपेने अशा प्रकारे मार्कंडेय मुनी अमर झाले. पुराण सांगते की, प्रलयातही मार्कंडेय मुनींना मृत्यू येत नाही. मार्कंडेय प्रलयकालातल्या त्या एकार्णवात एकटेच पोहत राहतात असे श्री माउलींनी देखील सांगितले आहे. "जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पोहे मार्कंडेय एकाकी । (ज्ञाने.११.९.१८७)" ही अमरत्वाची स्थिती त्यांना भगवान श्रीविष्णूंच्या कृपेने आणि तपश्चर्येने प्राप्त झालेली आहे. भगवन्नामातच केवळ मृत्यूलाही पार करण्याचे अचाट सामर्थ्य आहे, हाच सुबोध या कथेच्या माध्यमातून श्रीनृसिंहपुराण आपल्याला करवून देत आहे !
या 'मृत्युञ्जय स्तोत्रा'चे पवित्र चित्ताने दररोज प्रात:काली, मध्यान्ही व सायंकाली मनोभावे पठण केल्यास अकालमृत्यू पासून सुटका होते आणि भगवान श्रीनारायणांची कृपा लाभते, असे याचे माहात्म्य श्रीनृसिंह पुराणात कथन केलेले आहे.
( छायाचित्र संदर्भ : श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील भगवान श्रीनृसिंह ! )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष : 8888904481

14 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु -तुलसीपत्र दुसरे

तुलसीपत्र दुसरे - श्रीनृसिंहपुराण परिचय

महर्षी वेदव्यास प्रणीत उपपुराण म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीनृसिंह पुराण हे भक्तिशास्त्रातील अतिशय मार्मिक सिद्धांत कथन करणारे महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण फारसे प्रचलित नसल्याने यावर अभ्यासकांनी त्या मानाने काम केलेले नाही. पण तरीही ह्या पुराणाचे माहात्म्य वादातीत आहे.
आज उपलब्ध असणारी श्रीनृसिंह पुराणाची संहिता ही महर्षी लोमहर्षण सूतमुनी आणि भरद्वाजादी ऋषी यांच्या संवादात्मक आहे. या पुराणात एकूण अडुसष्ट अध्याय आहेत. बाकीच्या पुराणग्रंथांप्रमाणेच यातही सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित या गोष्टींचा ऊहापोह केलेला दिसून येतो. हे पुराण प्रामुख्याने भगवान श्रीविष्णूंच्या अवतारांच्या लीलाकथांचे विवरण करते. श्रीनृसिंह सोडता इतर अवतारांपैकी प्राधान्याने भगवान श्रीरामरायांच्या लीलाचरित्राचे विवरण यात आलेले आहे. या पुराणात आलेली 'यमगीता', सहस्रानीक चरित्र, सावित्री-ब्रह्मचारी संवादातील पतिव्रता महिमा आणि मातृसेवेचे महत्त्व, 'ॐ नमो नारायणाय' या अष्टाक्षर मंत्राचे माहात्म्य, श्रीनृसिंह चरित्र आणि प्रल्हाद माहात्म्य तसेच हारीत स्मृती हे अतिशय महत्त्वाचे बोधप्रद भाग आहेत. 
श्री सूतमहर्षींनी सदुसष्टाव्या अध्यायात या पुराणाची परंपरा सांगितली आहे की, हे पुराण सर्व प्रथम भगवान ब्रह्मदेवांनी मरीचि आदि आपल्या मानसपुत्रांना, सप्तर्षींना कथन केले. त्यांतील भृगु ऋषींनी ते पुढे श्री मार्कंडेयांना सांगितले. मार्कंडेय मुनींनी ते सहस्रानीक नावाच्या भगवद्भक्त राजाला सविस्तर कथन केले. पुढे भगवान श्रीनृसिंहांच्या कृपेने या पुराणाची प्राप्ती महर्षी वेदव्यासांना झाली. व्यासजींनी ते लोमहर्षणांना कथन केले व लोमहर्षणांनी प्रयाग क्षेत्री ऋषिमुनींना त्याचे विवरण करून सांगितले. तीच आज उपलब्ध असलेली संहिता आहे. 
(https://rohanupalekar.blogspot.com)
श्रीमद् भागवत पुराणाप्रमाणेच याही पुराणात प्रसंगविशेषी फार सुंदर स्तोत्ररचना निर्माण झालेल्या आहेत. अकालमृत्युहारक 'मृत्युञ्जय स्तोत्र', 'यमगीता', 'यमाष्टक', तीर्थस्नानफलदायक विष्णुस्तोत्र, मार्कंडेय कृत विष्णुलोकप्रदायक 'शेषशायी भगवत्स्तुती', भगवान श्रीशिवांनी श्री नारदांना सांगितलेले 'विष्णुस्तवराज', विश्वकर्मा रचित 'सूर्याष्टोत्तरशतनाम', इक्ष्वाकू विरचित 'श्रीविनायक स्तोत्र', ध्रुव कृत 'विष्णुस्तुती', श्रीमहादेव रचित 'श्रीविष्णुशतनाम स्तोत्र', श्रीब्रह्मदेव कृत 'विष्णुस्तुती', श्रीब्रह्मदेव कृत 'श्रीकृष्णस्तुती', शुक्राचार्य कृत दृष्टिदायक 'विष्णुस्तुती', प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णूंनी सांगितलेले आपल्या अडुसष्ट नामांचे 'विष्णुवल्लभ स्तोत्र' इत्यादी अनेक उत्तमोत्तम आणि प्रभावी स्तोत्ररचना या पुराणात आलेल्या आहेत. हे श्रीनृसिंह पुराणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
श्रीनृसिंह पुराणाच्या वाचन-मनन-कथनाचे सुफल सांगताना लोमहर्षणजी म्हणतात, "या पुराणाचे प्रेमादराने श्रवण केल्यास माघमासात प्रयागस्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. जो हे पुराण साधुसज्जनांना, भगवद्भक्तांना कथन करतो त्याला सर्व तीर्थांच्या स्नानाचे फळ लाभून विष्णुलोकाची प्राप्ती होते. हे पुराण समस्त पापांचा तत्काल नाश करणारे असून भगवान श्रीनृसिंहांचा कृपाप्रसाद सहजतेने करविणारे आहे. रोज सकाळी या पुराणाचे वीस श्लोक जो पठण करेल त्याला ज्योतिष्टोम यज्ञाचे फळ लाभून अंती विष्णुलोकाची प्राप्ती होते. हे पुराण सर्व कामनासिद्धी करणारे, मोक्षदायक आणि मुख्यत: भक्तिप्रदायक मानलेले आहे. म्हणूनच भगवद्भक्तांनी प्रयत्नपूर्वक नित्यनियमाने या पुराणाचे श्रवण-मनन करावे !"
संतवाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि महायोग परंपरेतील थोर विभूतिमत्त्व प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली श्रीवामनराज प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेल्या श्रीनृसिंह कोशाच्या पहिल्या व दुसऱ्या खंडात ह्या पुराणाची संस्कृत संहिता तसेच मराठी भाषांतर प्रकाशित झाले होते. परंतु ते खंड आता उपलब्ध नाहीत. गोरखपूरच्या गीताप्रेसने हिंदी अनुवादासह प्रकाशित केलेले 'श्रीनरसिंहपुराण' (प्रकाशन क्र.१११३) आजमितीस उपलब्ध आहे. त्यातील भाषांतर अतिशय चांगले व अभ्यासपूर्ण असून अवश्य संग्रही ठेवावा असाच हा ग्रंथ आहे.
( छायाचित्र संदर्भ : श्रीक्षेत्र कोळे नृसिंहपूर येथील भगवान श्रीज्वालानृसिंह ! )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष : 8888904481

13 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु


तुलसीपत्र पहिले

आज वैशाख शुद्ध षष्ठी, भक्तवत्सल भक्ताभिमानी प्रल्हादवरद भगवान श्रीनृसिंहप्रभूंच्या नवरात्रीचा पहिला दिवस. या नवरात्रीच्या पावन पर्वकालात भगवान श्रीनरहरीरायांच्या स्तुतिगायनात काही क्षण व्यतीत करावेत, त्यांचे गुणवर्णन करून धन्यता अनुभवावी, त्यांचे परमप्रेमाने पूजन करून समाधान प्राप्त करावे अशी जाणत्या वैष्णवांची आज्ञा आहे. आपणही यथाशक्य ही सेवा साधू या ! 
गेली काही वर्षे भगवान श्रीनरहरीरायांच्या परमकृपेने नवरात्रात लेखनसेवा घडली. ते सगळे लेख माझ्या ब्लॉगस्पॉटवर उपलब्ध आहेत. मागे घडलेली सर्व लेखनसेवा परिवर्धित स्वरूपात श्रीसद्गुरुकृपेच्या बळावर गेल्या वर्षी 'विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंभ' या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशितही झाली. जाणत्या वाचकांनी या पुस्तकाचे भरभरून स्वागत केले. आनंदाची गोष्ट अशी की, वर्षभरातच 'विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंभ'ची प्रथमावृत्ती जवळपास संपली आहे. मोजक्या प्रतीच आता शिल्लक आहेत. ही नि:संशय श्रीसद्गुरुदेवांची करुणाकृपाच म्हणावी लागेल. 
गेल्या वर्षीच्या नवरात्रीत पुस्तकाच्या कामामुळे नवीन काही लेखनसेवा घडली नव्हती. याही वर्षी नवीन लेखनासंदर्भात कोणताच विचार केलेला नव्हता. परंतु श्रीभगवंतांचीच सेवा करवून घ्यायची इच्छा असावी. आज दुपारी सहज म्हणून एक संदर्भ पाहण्यासाठी श्रीनृसिंह पुराण हाती घेतले आणि वेळेकडे लक्ष न जाता वाचतच गेलो. श्रीनृसिंह पुराणाचे माहात्म्यच असे आहे की, त्यातून दर वेळी श्रीनृसिंहचरित्राचा काही ना काही नवीन आयाम नजरेसमोर येतो आणि अक्षरश: हरखून जायला होते. वाचता वाचता असे वाटले की श्रीनृसिंह पुराणावरच अल्पशी लेखनसेवा करावी. त्याद्वारे या पर्वकालात एकप्रकारे श्रीनृसिंह चरित्राची आणि पर्यायाने परमाराध्य भगवान श्रीनरहरीरायांचीच शब्दपूजा बांधली जाईल !
श्रीनृसिंह पुराण हे पुराणग्रंथांमधील एक उपपुराण म्हणून गणले जाते. पुराणांच्या कालाबद्दल विद्वान अभ्यासकांमध्ये अनेक मतवाद आहेत. आपल्याला त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही; पण एवढे नक्की की श्रीनृसिंह पुराण बरेच प्राचीन आहे. भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी आपल्या श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या भाष्यात श्रीनृसिंहपुराणाचा नामोल्लेख करून त्यातील संदर्भ घेतलेला आहे. त्याअर्थी हे पुराण अडीच हजार वर्षांपूर्वी प्रसिद्ध होते यात शंका नाही. म्हणूनच प्रस्तुत पुराण प्राचीन आहे असा निर्वाळा देता येतो.
श्रीनृसिंह पुराण हे भगवान श्री वेदव्यास प्रणीत मानले जाते. एकदा गंगा-यमुना-सरस्वती या महान नद्यांच्या संगमावरील प्रयाग क्षेत्रात परमपावन अशा माघमासात हिमालयातील अनेक ऋषिमुनी तीर्थस्नानासाठी जमले होते. स्नान करून ते सर्व प्रयागक्षेत्रात राहणाऱ्या ऋषिवर भरद्वाजांच्या आश्रमात गेले. परस्परांचा सन्मान करून झाल्यावर त्यांची भगवच्चर्चा चालू असताना अचानकच परमज्ञानी महर्षी लोमहर्षण सूतमुनी तिथे उपस्थित झाले. अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान आणि पुराणांचे ज्ञाते असे श्री लोमहर्षण मुनी हे महर्षी वेदव्यासांचे शिष्य होते.
श्री लोमहर्षणमुनी आलेले पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला. त्यांचा यथायोग्य सन्मान करून भरद्वाजमुनी त्यांना म्हणाले, "मुनिवर, मागे शौनकांच्या यज्ञात आपण वाराहसंहिता कथन केली होती. आम्ही सर्व जण आता आपल्याकडून श्रीनृसिंह पुराण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. कृपया आपण आमची ही इच्छा पूर्ण करावी !"
सूतमुनी मुळातच परमवैष्णव होते. त्यामुळे त्यांना भगवत्कथा सांगण्याची मनस्वी आवड होतीच. आवडीचे कार्य करण्याची सुवर्णसंधी, प्रयागासारखे महाक्षेत्र आणि ऐकण्यासाठी समोर उपस्थित असलेले ज्ञानी, भक्तिमान श्रोते असा अभिनव त्रिवेणीसंगम झालेला पाहून प्रसन्नता पावलेल्या सूतजींनी सद्गुरुवंदन करून श्री वेदव्यासांकडून जाणून घेतलेली श्रीनृसिंहकथा सांगायला सुरुवात केली. 
भगवान श्रीनरहरीरायांच्या कृपाप्रसादाने आपण सर्वजणही 'श्रीनृसिंहपुराणा'च्या या परमपावन गंगौघात आजपासून नऊ दिवस दररोज क्रमाक्रमाने सुस्नात होऊ या आणि श्रीनृसिंहकृपा संपादन करून धन्य होऊ या !
(लेखासोबतचे छायाचित्र : भगवान श्रीनृसिंहराज प्रभूंचे आजचे दर्शन, श्रीक्षेत्र नीरानरसिंहपूर.)
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

22 Jan 2024

राजाधिराज भगवान श्रीरामचंद्र महाराज की जय !!

जय श्रीराम !!!!!!

पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली. सूर्यवंशभूषण राजाधिराज महाराज श्रीरामचंद्र भगवान आपल्या राजप्रासादात आज विराजमान झाले आहेत !! 
हा अत्यंत सद्भाग्याचा क्षण आपण याचि देही अनुभवतो आहोत, लौकिकार्थाने यापेक्षा मोठे भाग्य ते काय ? जन्मभर ही स्मृती जपून ठेवावी, मरेपर्यंत पुन:पुन्हा कौतुकाने कथन करावी असाच हा भाग्ययोग आहे. भगवान श्रीरामरायांच्या जयजयकारात आम्ही हा क्षण पाहून धन्य ठरलो !
'ठकाराचे ठाण' अर्थात् दैवी सौंदर्याची खाण असणाऱ्या भगवान श्रीरामरायांची आज प्रतिष्ठापित झालेली अतिशय रेखीव, देखणी, विलोभनीय श्रीमूर्ती व तिचे सुहास्य वदन पाहून ऊर भरून आला. सुरेख सजविलेले भव्य-दिव्य श्रीराम मंदिर डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या ना त्या प्रकारे ज्या ज्या सर्वांचे हात या कार्यात लागले त्या त्या सर्वांची कृतज्ञतेने स्मरणवंदना करतो !
स्वकर्तृत्वाने भाग्यवान ठरलेल्या ज्या लक्षावधी भक्तांनी आजवर ही भूमी परत मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांना ते जिथे कुठे असतील तिथे आज केवढा आनंद होत असेल याचा आपण विचारही करू शकत नाही; केवळ त्यांच्या पायी दोन अश्रू ढाळून कृतज्ञता मात्र व्यक्त करू शकतो. ही कृतज्ञत व्यक्त करणे हे तमाम भारतीयांचे कर्तव्यच आहे. 
पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही कृतज्ञतापूर्वक अभिनंदन. कोणी काहीही बरळो, मोदीजींच्या टीमनेच हे अशक्य वाटणारे कृत्य सत्यात उतरवलेले आहे, यात शंका नाही. 
आजचा दिवस अवघ्या भारताने अत्यंत आनंदात, मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे. अयोध्येतील लाईव्ह प्रक्षेपण एकेका लिंकवर दोन-दोन लाख लोक एकावेळी पाहात होते. आपला अवघा देश श्रीराममय होऊन गेला आहे. आज संध्याकाळी देशभर खरोखर दुसरी दिवाळीच साजरी होणार आहे. जनसामान्यांचा हा उत्साह, हा आनंदच आमची एकात्मता, आमची अस्मिता आणि आमचे आदर्श जगासमोर उच्चरवाने उद्घोषित करतो आहे. हे पुढेही असेच टिकू दे आणि सनातन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन होऊ दे रे रामराजा !!
यतो धर्मस्ततो जय: । हे शाश्वत सत्यच आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दृग्गोचर झाले आहे. भगवान श्रीराम हे धर्माची साक्षात् श्रीमूर्ती आहेत; आणि कितीही अडचणी आल्या तरी, जसे खोल पाण्यातूनही कमलपुष्प वर येऊनच उमलते, तसे आज कमलपुष्पावर उभे असलेले मनमोहक भगवान श्रीराम प्रतिष्ठापित झाले आहेत. एक ना एक दिवस अधर्माचा समूळ विनाश होऊन धर्माचाच विजय होत असतो !
जिथे भगवान श्रीरामराय आणि त्यांचे दासोत्तम वीरवर श्रीहनुमान प्रकटतात, तिथली भूतप्रेतपिशाचे पाय लावून पळून जातात, ही वस्तुस्थिती आहे. 'पळे भूतबाधा भेणे तेथे ।' असे श्रीमाउलींनी म्हटलेले आहेच. त्यामुळे ज्यांना आजच्या या अद्वितीय सोहळ्यामुळे पोटशूळ उठला, ज्यांची झोप उडाली, मती भ्रष्ट होऊन जे निरर्थक बडबडू लागले, त्या समस्त राजकीय, अराजकीय पुरोगामट्या-भामट्या भूतप्रेतपिशाचांच्या विचकट नाचाकडे आपण दुर्लक्ष करून आपला आनंद दणक्यात साजरा करू या. आपल्या गगनभेदी "जय श्रीराम" घोषणांनी त्यांचा जीव असाही जाणारच आहे यात शंका नाही.
आजच्या तारखेचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांची आज तारखेने पुण्यतिथी आहे. त्यांनी माघ कृष्ण नवमी, दि.२२ जानेवारी १६८२ रोजी सज्जनगडी देहत्याग केला होता. श्री समर्थांच्या देहत्याग तारखेलाच, त्यानंतर ३४२ वर्षांनी आज श्रीरामराय आपल्या स्वत:च्या प्रासादात पुनर्स्थापित होत आहेत. 
पुन्हा एकदा "जय श्रीराम - सियावर रामचंद्र की जय !" अशी ललकारी देऊ आणि आनंदात निमग्न होऊ या !!
- रोहन विजय उपळेकर.

8 Jan 2024

कांची परमाचार्य श्रीमद् जगद्गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथी



भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या कांची सर्वज्ञ पीठाचे अडुसष्टावे आचार्य, प्रत्यक्ष भगवान श्रीशिवशंकरच असे श्रीमद् जगद्गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज तथा श्री परमाचार्य यांची आज तिसावी पुण्यतिथी आहे. आजच्याच तारखेला आणि तिथीलाही, दि.८ जानेवारी १९९४, मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी रोजी दुपारी तीन वाजता वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली होती. 
श्री परमाचार्य हे महान विभूतिमत्त्व होते. ते साक्षात् भगवान श्रीशिवच आहेत, याची  असंख्य भाविकांना जागती प्रचिती लाभलेली आहे. त्यांच्या सर्वच लीला अतीव मधुर व विलक्षण आहेत. प.पू.योगिराज श्री.गुळवणी महाराज व प.पू.योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा श्री परमाचार्यांशी अत्यंत दृढ स्नेहभाव होता. श्री परमाचार्य प.पू.श्री.मामांना श्री.टेंब्येस्वामी असेच संबोधून बोलत असत.
कांची कामकोटी पीठाचे अडुसष्टावे आचार्य म्हणून श्रीमज्जगद्गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष भगवान श्रीशंकरांनीच अवतार धारण केला होता अशी मान्यता आहे. विशुद्ध धर्माचीच श्रीमूर्ती असणारे श्रीमद् चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी तथा श्री परमाचार्य यांचा अलौकिक जीवनपट नजरेखालून घातल्यास, त्यांच्या रूपाने प्रत्यक्ष श्रीभगवंतच अवतरले होते यावर आपलाही पूर्ण विश्वास बसतो. श्री परमाचार्यांचा शंभर वर्षांचा आयुष्यक्रम अक्षरशः विलक्षण आणि दिव्य घटनांनी भरलेला आहे. 
श्री कांची परमाचार्यांचे दैवी विभूतिमत्त्व, त्यांचे अगाध ज्ञान आणि अलौकिक चरित्र पाहून त्यांना 'महापेरियावा' म्हणजे ‘महान विभूतिमत्त्व’ असे सार्थ नामाभिधान देण्यात आले आहे. तसेच त्यांना जनमानसाने उत्स्फूर्तपणे मोठ्या आदराने 'नाडुमाडु देव' म्हणजे 'चालता बोलता परमेश्वर' (Walking God ) असेही संबोधिलेले आहे. 
चिपळूणहून प्रकाशित होणाऱ्या 'अमृतबोध' मासिकाच्या डिसेंबर २०२२ अंकातील 'जवळिकेंची सरोवरे' या लेखमालेत श्री परमाचार्यांचे दिव्य चरित्र आणि लीला, तसेच श्रीदत्तसंप्रदायाच्या आमच्या श्रीगुरुपरंपरेतील अवतारी महात्म्यांशी असलेल्या त्यांच्या भावपूर्ण स्नेहसंबंधांबद्दल मी सविस्तर लेख लिहिला होता. जिज्ञासूंनी आवर्जून तो लेख वाचावा ही विनंती. त्या लेखातील एकच अद्भुत लीला येथे उद्धृत करीत आहे.
श्री परमाचार्य १९८०-८१ साली साताऱ्याला अकरा महिने राहिले होते. त्यावेळी प.पू.सद्गुरु श्री.मामा, आपल्या उत्तराधिकारी शिष्या प.पू.सौ.शकाताई आगटे यांच्या सोबत दर्शनाला गेले होते. प.पू.श्री.मामा दर्शनाच्या रांगेत उभे होते. तेवढ्यात स्वतः श्री परमाचार्यांनी आतून एका शिष्याला; “बाहेर टेंब्येस्वामी उभे आहेत, त्यांना सन्मानाने आत घेऊन ये !” असे सांगून पाठविले. तो बाहेर येऊन बघू लागला. त्याला कोणीच संन्यासी रांगेत न दिसल्याने त्याने परत जाऊन तसे सांगितले. त्यावर हसून श्री परमाचार्य म्हणाले, "अरे, त्यांना आता टेंब्येस्वामी म्हणत नाहीत, 'मामा' असे म्हणतात. तू मामा कोण म्हणून विचार. "
त्या शिष्याने बाहेर येऊन चौकशी केल्यावर प.पू.श्री.मामा पुढे झाले. त्याने आदराने प.पू.श्री.मामांना आत नेले. श्रीशिवावतार श्री परमाचार्यांनी अत्यानंदाने श्रीदत्तावतार प.पू.श्री.मामांचे स्वागत केले, त्यांना क्षेमालिंगन दिले व दोघेही अस्खलित संस्कृतमधून खूप वेळ बोलत बसले. लौकिकार्थाने प.पू.श्री.मामा संस्कृत भाषा शिकलेले नव्हते. आश्चर्य म्हणजे, श्री परमाचार्य पूर्णवेळ त्यांना श्री टेंब्येस्वामी म्हणूनच संबोधत होते. प.पू.श्री.मामांप्रमाणेच  त्यांचे दोन्ही उत्तराधिकारी प.पू.सौ.शकाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे या दोघांशीही श्री परमाचर्यांचा फार स्नेहबंध होता.
परमवंदनीय कांची जगद्गुरु श्रीमद् चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांच्या अम्लान श्रीचरणीं आजच्या तारीख व तिथी अशा दोन्ही पुण्यतिथीच्या पावन पर्वावर साष्टांग दंडवत !!
(https://rohanupalekar.blogspot.com)
लेखन - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

Page 1 of 435123»