24 May 2017

जीव ऋणवंत होई त्यांचा

आज वैशाख कृष्ण चतुर्दशी !
सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या शिष्यपरिवारासाठी ही अतीव महत्त्वपूर्ण तिथी आहे. या तिथीचे औचित्य म्हणजे, प.पू.श्री.मामांचे उत्तराधिकारी, प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे या दोन्ही महात्म्यांची हीच जन्मतिथी आहे. एकाच परंपरेतील एकाच काळात कार्यरत असलेल्या दोन अधिकारी सद्गुरूंची जन्मतिथी एकच असणे हा किती विशेष योग आहे ! प.पू.सौ.शकाताईंचा जन्म २० मे १९४७ रोजी पुणे येथे झाला, तर प.पू.श्री.शिरीषदादांचा जन्म १३ मे १९६१ रोजी विदर्भात, बुलढाणा जिल्ह्यात जळगांव(जामोद) येथे झाला.
प.पू.सौ.शकाताईंनी स.प.महाविद्यालयातून रसायनशास्त्रात पदवी घेऊन पुढे पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ फर्ग्युसनमध्ये व बराच काळ स.प.महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्य केले. त्याहीनंतर त्या अभिनव अभियांत्रिकी व संगणक केंद्रात अध्यापन करीत होत्या. पुढे प.पू.श्री.मामांच्या परंपरेच्या कार्यानिमित्त त्यांचे अक्षरश: जगाच्या पाचही खंडांमध्ये प्रचंड भ्रमण झाले. त्यांनी आजवर जगभरातील चाळीस हजारांहून अधिक परदेशी नागरिकांना आपल्या विलक्षण अध्यात्मसाधनेची महती पटवून साधनारत केलेले आहे. आपल्या संतवाङ्मयाचा प्रचार-प्रसार करून प.पू.श्री.मामांच्या परंपरेनुसार साधना देऊन हजारो साधकांना परमार्थपथावर अग्रेसर केलेेले आहे. पूर्णपणे अनोळखी प्रांतात जाऊन, तिथे संतवाङ्मयावर प्रवचने करून त्या लोकांना परमार्थ करण्यास प्रवृत्त करणे, हे कार्य किती कठीण असेल, याची साधी कल्पनाही आपण करू शकत नाही. पण सद्गुरुकृपेने हे अवघड शिवधनुष्य पू.सौ.ताईंनी समर्थपणे पेललेले आहे.
पू.सौ.ताईंवर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा आहे. तसेच भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंचाही अपार प्रेमलोभ त्या निरंतर, क्षणोक्षणी अनुभवत असतात. त्यांचे अवघे भावविश्व श्रीसंत मीराबाईंच्या जातकुळीचे आहे, तितकेच वैभवसंपन्न आहे. विशेष म्हणजे त्यांची काव्य नाममुद्राही 'मीरा'च आहे. हा केवळ योगायोग नव्हे, हे तर भक्तिप्रांतातील एक अद्भुत वास्तवच !
प.पू.श्री.शिरीषदादांचे सुरुवातीचे शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे झाले. त्यांनी क-हाडच्या शासकीय इंजिनियरींग कॉलेज मधून बी.ई. केले. पुढे त्यांनी एम.ई. पदवी देखील मिळवली. त्याच काळात त्यांची व प.पू.श्री.मामांची भेट झाली व पौष कृष्ण षष्ठी, दि.२६ जानेवारी १९८१ रोजी श्रीनृसिंहवाडी मुक्कामी त्यांना पू.मामांकडून कृपानुग्रह व परंपरेचे उत्तराधिकारही प्राप्त झाले. पू.दादांना बालवयातच ज्योतिषादी विद्यांची सिद्धी होतीच, त्यात कालौघात असंख्य गूढविद्यांचीही भर पडली. परंतु पू.मामांच्या कृपेने त्यांचे विश्व पूर्णत:च बदलून गेले. सद्गुरुकृपेने त्या परमअद्भुत पराविद्येचेच आकलन झाल्यावर, या इतर अपरा-विद्यांची काय मिरास उरणार?
पू.मामांच्या आज्ञेने पू.दादांनी त्यावेळी नवीनच प्रकाशित होऊ घातलेल्या 'श्रीवामनराज' नावाच्या त्रैमासिकाचे संपादन करायला सुरुवात केली. तिथूनच त्यांच्या जगावेगळ्या संतवाङ्मयीन सेवाकार्यास सुरुवात झाली. आजमितीस पू.दादांच्या संपादित तसेच लिखित ग्रंथसंपदेने सव्वाशेचा आकडा पार केलेला असून, या ग्रंथांची एकत्रित पृष्ठसंख्या साधारणपणे वीस हजारांहूनही जास्तच आहे. मराठी संतसाहित्य विभागात पू.शिरीषदादा कवडे यांचे नाव त्यामुळेच सर्वाग्रणी आहे. त्यांच्या काव्याचे, अभंगांचेही संग्रह प्रकाशित झालेेले आहेत.
प.पू.श्री.शिरीषदादा आपल्या *'हंसा उडहूँ अगम को देस'* या पदसंग्रहातील एका अभंगात संतांचा महिमा सुरेख व नेमक्या शब्दांत व्यक्त करताना म्हणतात,
जाणोनी संतांचे उपकार अनंत ।
जीव ऋणवंत, होई त्यांचा ॥१॥
अनुभव चोख ठेवला बोलोनी ।
भाग्य कडसणी, साधकांसी ॥२॥
जनांचिये संगे चित्तासी अपाय ।
होती, तव पाय, तारक ते ॥३॥
धरोनिया हात, कृपे चालविती ।
अमृते प्रचिती, आली साच ॥४॥
संतांनी ग्रंथांच्या माध्यमातून आपला चोख स्वानुभवच स्पष्ट सांगून ठेवलेला आहे. हे त्यांचे अनंत उपकार पाहून आपला जीव जन्मजन्मांतरी त्यांचा ऋणवंत होतो. साधकांच्या कळवळ्याने त्यांनी किती सोपी पायवाट केलेली आहे ना ! एवढेच नाही तर, जनसंसर्गात असताना जेव्हा आपल्या चित्ताची परमार्थभूमिका गढूळ होऊ लागते, ते चित्त पुन्हा पुन्हा प्रपंचात गुंतू लागते तेव्हा हेच संतपाय आपल्यासाठी तारक ठरतात. त्यांच्या चरणीं शरण गेलेल्या जीवाला ते निगुतीने, अगदी प्रेमाने, त्याचा हात धरून आपल्या अमोघ कृपेने चालवीत जीवघेण्या प्रपंचाच्या पलीकडे सहजतेने नेतात. सद्गुरूंचे हे अद्भुत कृपापसाय सप्रेम अनुभवून 'अमृतमय' झालेली 'अमृता' (अर्थात् पू.श्री.शिरीषदादा) आपल्याला संतांचा हा विलक्षण महिमा कथन करीत आहे.
मी मुद्दाम हाच अभंग घेतला कारण, प.पू.सौ.शकाताई व प.पू.श्री.शिरीषदादा यांचेच जसेच्या तसे वर्णन यात आलेले आहे. आज बावीस वर्षे मी या दोन्ही विभूतींच्या जवळून संपर्कात आहे, त्यांची कृपा अनुभवतो आहे आणि त्यांच्या अपरंपार प्रेमवर्षावात अक्षरश: सुस्नान होत आहे. माझा हा अहंकार नव्हे, पण स्पष्ट सांगतो, या कृपाप्रेमामुळे मी खरोखरीच गर्भश्रीमंत झालेलो आहे; ही श्रीमंती कधीही कमी न होणारी आहे, कारण ती साक्षात् श्रीभगवंतांचीच शाश्वत कृपालक्ष्मी आहे !
पू.सौ.ताई व पू.श्री.दादांची समग्र ग्रंथसंपदा हे साधकांचे लळे पुरविणारे मधुर पाथेयच आहे. या पाथेयाच्या आस्वादनात साधनापथ सहजतेने आक्रमिला जातो, आजवर अनेकांचा हाच अनुभव आहे, उद्याही असणारच आहे. कारण या दोन्ही विभूतींनी आपला रोकडा स्वानुभवच मोठ्या  कळवळ्याने ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे. त्यामुळे त्यातून मिळणारी ऊर्जा ख-या साधकासाठी संजीवनीच ठरणार यात नवल नाही.
संतांचे वाङ्मय हे श्रीगुरुकृपेचे अलौकिक, अजर, अमर लेणे असते. त्यामुळे ते समजून घेण्यासाठी ती श्रीगुरुकृपा हेच अत्यंत आवश्यक साधनही असते. या दोन्ही विभूतींनी आपल्या प्रचंड  साहित्यातून तुम्हां-आम्हां भाविक अभ्यासकांना संतवाङ्मयाच्या आस्वादनाची ही आगळी वेगळी श्रीगुरुकृपादृष्टीच उलगडून दाखवलेली आहे. हे त्यांचे ऋण आपण कधीही फेडूच शकणार नाही, जन्मजन्मांतरी त्यांच्या त्या ऋणात राहण्यातच उलट आपले खरे हित आहे.
आज माझ्या या परमप्रेमळ सद्गुरुद्वयीचा पुण्यपावन जन्मदिन आहे. त्यांचे कृपाऋण हेच माझे अनर्घ्य वैभव आहे आणि तीच माझी मिराशी देखील ! देवा, आम्हां लेकरांवर असाच आपला कृपावर्षाव निरंतर होत राहो, हीच आपल्या महन्मंगल श्रीचरणीं सादर प्रार्थना !
जन्मदिवस जरी या महात्म्यांचा असला, तरी त्याचे बक्षीस तुम्हां-आम्हां लेकरांनाच मिळणार आहे. म्हणून सरतेशेवटी प.पू.श्री.दादांच्याच शब्दांत, श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणीं पसायदान मागतो.
खंड पडो नेदी चालविल्या नेमा ।
अगा मेघश्यामा, पांडुरंगा ॥१॥
संधिकालामाजी कृपेचे साधन ।
कीर्तन पूजन, निरंतरी ॥२॥
अतिथीसंतोष ब्राह्मणा आदर ।
सेवेसी तत्पर, संतांचिया ॥३॥
बांधव भगिनी, श्रीगुरु सेवका ।
वाढो एकमेका, प्रेमभाव ॥४॥
नामाचा विसर, नको क्षणभरी ।
अमृते पदरी, नित्यदान ॥५॥
खरेतर पू.सौ.ताई व पू.श्री.दादांना त्यांची स्तुती केलेली अजिबात आवडणार नाही, हे माहीत असूनही ही शब्द पुष्पांजली मी अर्पण करतोय. अहो, दोघांचेही एवढे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, पण एकातही त्यांची बोटभरसुद्धा वैयक्तिक माहिती नाही की फोटो नाहीत. त्यांनी जन्मभर आपल्या सद्गुरूंचाच उदोकार केलेला आहे आणि त्यातच त्यांना अपरंपार आनंद आहे. *"माझे असतेपण लोपो । नामरूप हारपो ।"* ही सद्गुरु श्री माउलींची श्रुती पू.सौ.ताई व पू.श्री.दादांचे ब्रीदवाक्यच आहे जणू. तरीही माझ्या मायबापांचे गुणगान करण्याचा माझा हक्क आहे आणि कर्तव्य देखील. शिवाय आजचा दिवसही मोठा भाग्याचा आहे. म्हणून मी धारिष्ट्य करून ही अनधिकार सेवा समर्पित करीत आहे. माउली म्हणतातच ना, बाळ बोबडे बोलले, वाकडे विचके चालले तरी त्याचा मायबापांना आनंदच होतो, त्याचे कौतुकच केले जाते. म्हणून त्याच आधारावर ही सेवा आपल्या श्रीचरणारविंदी विदित करतोय; देवा, गोड मानून घ्यावी व मज लेकराला, *"करीन तळहात साउली ।"* असाच वरप्रसाद द्यावा हीच आजच्या परमपावन पुण्यदिनी कळकळीची प्रार्थना !!
श्रीसद्गुरुनाथ महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

39 comments:

  1. सद्गुरूंबद्दल कधीही न वाचलेली किंवा ऐकलेली माहिती आज वाचायला मिळाली, धन्यवाद दादा🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विक्रांत. सद्गुरूंचीच कृपा आहे ही सर्व.

      Delete
  2. दादा खूप खूप मस्त लेख
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  3. आपण प्रकाशित केलेली सद्गुरूद्वयाची माहिती व महती आम्हाला आपण प्राप्त करून दिलीत! याबद्दल आणि आपल्या प्रतिभासंपन्न प्रासादिक
    शब्दसंभारात न्हाऊ घातल्याबद्दल आपणांसही मनःपूर्वक नमस्कार!!

    ReplyDelete
  4. सुंदर .गुरुदेव दत्त रोहनजी

    ReplyDelete
  5. खूप खूप आभार छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  6. वाचून दिव्यानन्द झाला ! शतशः दंडवत !

    ReplyDelete
  7. पूजनीय रोहनदादा,
    काल कोणीतरी मला हा ब्लॉग पाठवला.खूप वर्षानंतर अधाशासारखा वाचून काढला. अतिशय सुंदर नेमका.आधी ही तुम्ही व्यासंगपूर्ण व उत्तम लिहायचे. पण आता ही "लेखणी" ""रसप्रसवा""होवू लागली आहे. निःशंक हा श्रीसद्गुरूव्दयींचाच क्रुपाप्रसाद आहे.आम्हा सगळ्यांचाच भावनांना तुम्ही शब्दरुप लेणे चढवून त्या प्रकट केल्या बद्दल तुमचे अंतःकरण पूर्वक शतःश धन्यवाद। माऊलींच्याच शब्दात
    इया गुरु चरणसेवा। हो पात्र तया दैवा।जे सकलार्थमेळावा। पाटू बांधे।
    श्रीसद्गुरूक्रुपेने असेच सकलार्थ मेळावे तुम्ही बांधत राहावे हिच त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना।
    तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप शुभेच्छा।
    जाता जाताः प.पू श्रीदादांच्या अभंगात माऊलींचेच शब्दवैशिष्ट्ये दिसून येतात उदाःया अभंगातील "कडसणी"
    डॉ. आनंद कवडे

    ReplyDelete
    Replies
    1. शंभर टक्के सहमत

      Delete
  8. खुप सुंदर लेख...आम्हा साधकांच्या मनातील अव्यक्त भावनांना सुरेख शब्दरूप देणारा...आरशासारखा ...👍🏼👌🏼👌🏼
    प.पु.सदगुरु मातोश्री ताई महाराजांच्या चरणी सप्रेम सा.नमस्कार 🙏🏼🌷🌺🌷
    प.पु.सदगुरु श्री दादा महाराजांच्या चरणी सप्रेम सा.नमस्कार 🙏🏼🌷🌺🌷

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर लेख !! डाॅ. आनंद दादांचे या लेखावरचे भाष्य म्हणजे आम्हां सर्व साधकांचे जणू हृद्गतच; या लेखावर कळस चढवला आहे. धन्यवाद रोहनजी, धन्यवाद आनंददादा !!

    ReplyDelete
  10. आम्ही शब्द धन वाचून कृपा वंत झालो

    ReplyDelete
  11. आदरणीय रोहनदादा,
    अतिशय सुंदर, भावपूर्ण, रसाळ व माहिती पूर्ण असा हा लेख.
    सदगुरू न्ना व त्यांच्या प्रचंड कार्याला समजून घेणं तसे आमच्या सामान्य माणसाच्या बुद्धी पलीकडचेच... पण, हा आपला लेख वाचून श्री सदगुरू न्चे श्री चरणी वारंवार मस्तक ठेवावे, असे वाटते..
    खूप खूप धन्यवाद..

    ReplyDelete
  12. खूप सुंदर लेख,खरोखरीच सद्गुरू द्वायिंचे कार्य अलौकिक आहे ,आपले नशीब थोर म्हणूनच या जन्मी ते सद्गुरू म्हणून लाभले, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा, या दिवसाने सद्गुरू दिले असलेल्याला!

    ReplyDelete
  13. रोहनजी !
    नमस्कार!
    आपला लेख वाचला व आपल्या सद्गुरूद्वयांची महति शतगुणी झाली.
    मला असं वाटतंय की ह्या सद्गुद्वयांचं विस्तृत चरित्र लिखित रूपाने प्रकाशात यावे. ते कार्य तुमच्याकडून होवो असं वाटतंय. बाकी मग सद्गुरूंची इच्छा !

    ReplyDelete
  14. अनमोल लेख वाचायला मिळाला. कृतार्थ झालो.

    ReplyDelete
  15. अनमोल लेख वाचायला मिळाला. कृतार्थ झालो.

    ReplyDelete
  16. पुन्हा एकवार वाचून खूप आनंद मिळाला.परमपूज्य श्रीदादा व परमपूज्य श्री ताईं यांचे चरणी साष्टांग नमस्कार.

    ReplyDelete
  17. कै ताई आणि प पू दादा, ही दोघेही लौकिकार्थाने विज्ञान प्रांतात उच्च विद्याविभूषित असूनही अध्यात्मिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलं हा चमत्कारच
    आहे, दोन्ही विभूतींना साष्टांग दंडवत

    ReplyDelete
  18. तस्मै श्रीगुरवे नमः।
    सद्गुरुद्वयांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम।

    ReplyDelete
  19. दादा मी हा आपला पहिलाच लेख वाचला आणि अंगावर रोमांच आले की आपण किती भाग्यवान आहोत.

    ReplyDelete
  20. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

    ReplyDelete
  21. प.पू.सद्गुरुद्वयांचे पुण्यपावन चरणी साष्टांग दंडवत!
    तसेच नित्य साधुसंतांचे चरित्र आमच्यापर्यंत पोचवणार्‍या पू.रोहनदादांचे चरणी दंडवत!

    ReplyDelete
  22. 🙏🙏||श्री सदगुरु परंपरा स्मरणं।। भक्तवत्सल भक्ताभिमाणी सदगुरु मातुःश्री ताईंच्या चरणीं साष्टांग नमस्कार. परमपूज्य सदगुरु श्री दादांच्या चरणीं साष्टांग दंडवत.🙏🙏

    ReplyDelete
  23. अप्रतिम रोहन दादा 🙏🙏🙏

    ReplyDelete
  24. श्री. रोहन उपळेकर, हा लेख वाचून खूपच आनंद झाला. सदगुद्वयांची ही माहिती मला नव्यानेच मिळाली. खरं म्हणजे आज सकाळपासूनच तुझ्या लेखाची वाट पहात होतो
    धन्यवाद

    ReplyDelete
  25. Rohan Ji
    फारच भावपूर्ण व रसाळ
    धन्यवाद

    ReplyDelete
  26. खूपच भावूक , प्रेममय, रसाळ लेख हृदयाला भावला. सुरेख

    ReplyDelete
  27. खूप खूप धन्यवाद. छान लेख. एकदम भावला.

    ReplyDelete
  28. खुप छान रोहनजी अगदी प्रचिती आलेला अनुभव तुम्ही मांडलेला आहे.प.पु.सदगुरुद्वयांच्या चरणीं साष्टांग दंडवत.

    ReplyDelete
  29. खुपच सुंदर
    प्रासादिक लिखान !

    ReplyDelete
  30. खूप छान. श्री सदगुरू शरणं.सदगुरू चरणी नतमस्तक साष्टांग नमस्कार

    ReplyDelete
  31. खूप छान लेख. परम पूज्य सद्गुरू द्वायांच्या चरणी कोटी कोटी दंडवत

    ReplyDelete
  32. परम पूज्य श्री सद्गुरू दोन्ही च्या चरणी साष्टांग दंडवत

    ReplyDelete
  33. प पू श्री सद्गुरु यांना शि सा नमस्कार कोटी कोटी प्रणाम

    ReplyDelete
  34. Sadgurucha charni koti koti shastang namaskar🙏🙏🙏

    ReplyDelete
  35. श्रीराम समर्थ. सुंदर लेख. दोन्ही गुरुद्वयांच्या चरणी शिर साष्टांग दंडवत.

    ReplyDelete