31 May 2017

आनंद म्हणे मज झाले समाधान, गेलो ओवाळून जीवेभावे

राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या प्रभावळीत फार फार मौल्यवान रत्ने, श्रीस्वामी कृपेनेच लाभलेल्या अपार तेजाने तळपताना दिसतात. या अनर्घ्य रत्नांपैकी, एक अलौकिक विभूतिमत्व म्हणजेच, सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज हे होत.
श्रीआनंदनाथ महाराज हे तळकोकणातील वालावल गांवचे, म्हणून त्यांचे आडनाव पडले वालावलकर. पुढे ते वेंगुर्ले कॅम्प परिसरात स्वामी महाराजांचे मंदिर बांधून राहू लागले. तिथेच त्यांनी १९०३ साली आजच्याच तिथीला, ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला जिवंत समाधी घेतली. त्यांची आज ११४ वी पुण्यतिथी आहे.
श्री स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून श्री आनंदनाथ महाराज अक्कलकोटी दर्शनासाठी निघाले. इकडे श्री स्वामीमाउलीलाही आपले लाडके लेकरू कधी एकदा भेटते असे झाले होते. म्हणून श्री स्वामीराज महाराज स्वत:च अक्कलकोटाबाहेर येऊन एका झाडावर वाट पाहात बसले होते. श्री आनंदनाथ महाराज नेमके तेथेच येऊन जरा विसावले. झाडावरून श्री स्वामीराजांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना खूण दाखवली. आपली साक्षात् परब्रह्ममाउली समोर उभी राहिलेली पाहून श्री आनंदनाथांनी गहिवरून त्यांचे श्रीचरण हृदयी कवटाळले. श्री स्वामीरायांनीही आपल्या या अनन्यदासाच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून पूर्ण कृपादान केले. तसेच तोंडातून कफाचा बेडका काढून ओंजळीत टाकला. त्या बेडक्यात इवल्याशा श्रीचरणपादुका स्पष्ट दिसत होत्या. हेच श्रीस्वामीमहाराजांनी श्री आनंदनाथांना प्रसाद म्हणून दिलेले 'आत्मलिंग' होय. आजही ते दिव्य आत्मलिंग वेंगुर्ले येथे पाहायला मिळते.
श्री आनंदनाथांनी जवळपास सहा वर्षे अक्कलकोटात श्रीस्वामीसेवेत व्यतीत केली व त्यानंतर स्वामीआज्ञेने ते प्रचारार्थ बाहेर पडले. येवल्याजवळ सावरगांव येथेही त्यांनी एक आश्रम स्थापन केला. पण त्यांचे वेंगुर्ले येथेच जास्त वास्तव्य होते.
श्री आनंदनाथ महाराज हे सिद्धहस्त लेखक व कवी होते. त्यांच्या श्रीस्वामी महाराजांवरील अप्रतिम रचना 'स्तवनगाथा' मधून प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे 'श्रीगुरुस्तवन स्तोत्र' तर असंख्य स्वामीभक्तांच्या नित्यपठणात आहे.
शिर्डीच्या श्री साईबाबांना जगासमोर आणण्याची श्री स्वामीरायांची आज्ञा श्री आनंदनाथांनीच पूर्ण केली. श्री साईबाबा हा साक्षात् हिरा आहे, हे त्यांनीच प्रथम लोकांना दाखवून दिले.
श्री आनंदनाथांचा स्तवनगाथा फार सुरेख, भावपूर्ण आणि स्वामीस्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारा आहे. आज त्यांच्या पावनदिनी त्यातील काही रचना आपण मुद्दाम अभ्यासूया. आपल्या एकूण २२८८ अभंगरचनांमधून त्यांनी स्वामीस्वरूप व स्वामीनामाचे अलौकिक माहात्म्य सुरेख आणि मार्मिक अशा शब्दांत स्पष्ट करून सांगितलेले आहे. त्यांच्या अपार प्रेमाने भारलेल्या या रचना वाचताना आपल्याही अंत:करणात स्वामीप्रेम दाटून येते व हेच त्यांना अपेक्षितही होते. "श्रीस्वामी पवाडा गाण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे", हे ते वारंवार सांगतात. त्यांच्याच रचना आज शतकापेक्षाही जास्त काळ झाला तरी स्वामीभक्तांच्या ओठी रंगलेल्या आहेत, हीच त्यांच्या अद्भुत स्वामीसेवेची पावती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
श्रीस्वामी महाराजांच्या विलक्षण अवताराचे माहात्म्य सांगताना ते म्हणतात,
अक्कलकोटीचा व्यवहारी ।
केली कलीवरी स्वारी ॥१॥
पायी खडाव गर्जती ।
भक्तवत्सल कृपामूर्ती ॥२॥
दंड कमंडलु करी ।
आला दासाचा कैवारी ॥३॥
कटी कौपीन मेखला ।
ज्याची अघटित हो लीला ॥४॥
करी दुरिताचा नाश ।
नामे तोडी माया पाश ॥५॥
आनंद म्हणे श्रीगुरुराणा ।
आला भक्ताच्या कारणा ॥११४.६॥

"अक्कलकोटातील लीलावतारी श्रीस्वामीब्रह्म हे कलियुगावर स्वारी करण्यासाठी आलेले आहेत. पायी खडावा, हाती दंड कमंडलू घेणारी ही भक्तवत्सल कृपामूर्ती दासांचा कैवार घेण्यासाठीच आलेली आहे. कटी कौपीन धारण करणारे हे साक्षात् दत्तदिगंबर अत्यंत अघटित लीला करीत भक्तांचा सांभाळ करतात, त्यांचे भक्तिप्रेम पुरेपूर आस्वादतात. या श्रीस्वामीनामाच्या निरंतर उच्चाराने सर्व पापे नष्ट होतात व भक्तांवर मायेचा प्रभावच उरत नाही. आनंदनाथ म्हणतात की, आमचा हा परब्रह्मस्वरूप श्रीगुरुराणा भक्तांसाठीच अवतरलेला आहे. म्हणून जो यांची भक्ती करील, नाम घेईल, तो या कळिकाळातही सुखरूपच राहील !"
राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या अलौकिक नामाचे अद्भुत माहात्म्य सांगताना श्री आनंदनाथ महाराज म्हणतात,
स्वामी नेमधर्म उपासना कर्म ।
नामाचें तें वर्म वेगळेंची ॥१॥
जीवेंभावें ज्यानें धरियेलें नाम ।
साधे सर्व कर्म तयालागी ॥२॥
अनंत जन्मींच्या पापांचा संहार ।
नामाचा उच्चार एक वेळ ॥३॥
सर्व ते मनोरथ पूर्ण हेचि होती ।
स्वामीनामीं प्रीती ठेविलिया ॥४॥
आनंद म्हणे ऐसे धरा हें बळकट ।
नको खटपट आणिक ती ॥५॥

"विविध उपासना, नित्यनेम व धार्मिक कर्मांपेक्षाही सद्गुरुमुखाने लाभलेल्या श्री स्वामी महाराजांच्या दिव्यनामाचे वर्म वेगळेच आहे. असे श्रीगुरूंनी दिलेले स्वामीनाम जो जीवेभावे धारण करतो, प्रेमाने घेतो, त्यालाच इतर सर्व कर्मांच्या परिपूर्णतेचे सौभाग्य लाभते.
सद्गुरु स्वामीराजांचे नाम एकवेळ जरी प्रेमाने घेतले, तरी अनंत जन्मांमधील असंख्य पापांचा तत्काळ संहार होतो. स्वामीनामावर परमप्रेम बसल्यावर त्या साधकाचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. नव्हे नव्हे, त्याचे मन मनोरथ करणेच विसरून जाते. ते मनच उन्मन होऊन जाते.
म्हणूनच स्वामीशिष्य श्री आनंदनाथ सांगतात की, इतर सर्व खटपटी सोडून तुम्ही सर्वांनी हे परमदिव्य स्वामीनाम बळकट धरा, सदैव त्या नामाचेच अनुसंधान करा, यातच खरे हित आहे !"
अशा सहजसुंदर आणि अपार प्रेमभावयुक्त रचना करून जगात स्वामीनामाचा, स्वामीकीर्तीचा डंका पिटून, अवघा स्वामीभक्तिरंग उधळणा-या, सद्गुरु स्वामीचरणीं स्वत:लाच सर्वभावे ओवाळून टाकल्याने पूर्ण समाधानी झालेल्या, या स्वनामधन्य श्रीस्वामीशिष्य श्री आनंदनाथ महाराजांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग प्रणिपात.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

21 comments:

  1. लौकिक गुरू शिष्य प्रेमपरंपर !!!

    ReplyDelete
  2. Il अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज सदगुरू समर्थ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय 'll
    🙏🙏🙏💐💐💐

    ReplyDelete
  3. या अलौकिक विभूतीला साष्टांग प्रणिपात!💐💐💐

    ReplyDelete
  4. अप्रतिम. खूप माहिती मिळाली.

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ! 🙏

    ReplyDelete
  6. बहुत सुंदर ! श्री अनंत कोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महारसज की जय🙏🙏

    ReplyDelete
  7. या अलौकिक विभूतीला साष्टांग प्रणिपात!🙏🙏

    Reply

    ReplyDelete
  8. रोहन, खूप छान वर्णन केलं

    ReplyDelete
  9. वेंगुर्ल्यातील प.पु.आनंदनाथ महाराजांबद्दल खूप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद!🙏

    ReplyDelete
  10. खुप सुंदर रोहनजी.प.पु.आनंदनाथ महाराज की जय।

    ReplyDelete
  11. Swami om swami om swami om

    ReplyDelete
  12. खुपच सुंदर

    ReplyDelete
  13. खूपच छान माहिती मिळाली, रोहन

    ReplyDelete
  14. खूप छान माहिती आहे.श्री आनंद नाथ महाराजांचे चरणी अनेकानेक शिर साष्टांग नमस्कार

    ReplyDelete
  15. अतिशय सुंदर रचना !! श्रीस्वामी महाराजांचे शिष्योत्तम श्री आनंदनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात🙏

    ReplyDelete
  16. श्री स्वामी समर्थ ! 💐💐

    ReplyDelete
  17. श्री स्वामी समर्थ …🙏

    ReplyDelete