6 Dec 2020

नमन संतचरणीं मनोभावे


आज कार्तिक कृष्ण षष्ठी,
शिवावतार भगवान श्री चिदंबर महास्वामींची जयंती आणि श्रीसंत भाईनाथ महाराज कारखानीस यांची पुण्यतिथी !
सद्गुरु भगवान श्री चिदंबर महास्वामी हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप असे साक्षात् अवतारच होते. राजाधिराज भगवान सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम होते. श्री महास्वामींच्या लीला खरोखर विलक्षण आहेत. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या श्रीचरणीं साष्टांग दंडवतपूर्वक वंदन !
सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे स्नेही आणि श्रीनाथ संप्रदायातील अधिकारी विभूतिमत्व, वेळापूर येथील श्रीसंत डॉ.गणेश त्र्यंबक कारखानीस तथा प.पू.श्री.भाईनाथ महाराज कारखानीस यांची आज २३ वी पुण्यतिथी आहे. नाशिकच्या श्रीसंत गजानन महाराज गुप्ते यांचे शिष्योत्तम असणारे पू.श्री.भाईनाथ महाराज हे अतिशय रंगलेले आणि थोर महात्मे होते. श्रीकृपेने त्यांचे दोन-तीन वेळा मला दर्शन लाभले. सद्गुरु भगवान श्री माउलींची वाङ्मयी श्रीमूर्ती असणाऱ्या श्री ज्ञानेश्वरीवर नितांत प्रेम हा समान धागा असल्याने, पू.श्री.भाईनाथ महाराजांचे प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांशी अतिशय हृद्य स्नेहसंबंध होते. वेळापूरला प.पू.भाईंच्या खोलीत सर्व संतांचे फोटो होते, त्यात पू.श्री.काका व पू.श्री.मामांचाही फोटो होता. मी दर्शनाला गेलो तेव्हा त्यांनी मला स्वत: ते फोटो दाखवले होते.
प.पू.श्री.भाईंचा जन्म कार्तिक कृष्ण एकादशी, दि.२३ नोव्हेंबर १९०५ रोजी झाला. ते मिलिट्रीमध्ये डॉक्टर होते. पू.श्री.गोविंदकाका आणि पू.श्री.भाईंच्या या दोन्ही गोष्टी समान होत्या, दोघेही आर्मीमध्ये डॉक्टर होते. १९४८ साली आर्मीतून रिटायर झाल्यावर, श्री माउलींच्या पालखी वाटेवरचे गाव म्हणून ते वेळापूरला स्थायिक झाले. १९७० च्या सुमारास ते वेळापूर गावाच्या बाहेरील बाजूस देशपांडे यांच्या मळ्यात राहू लागले. तिथेच त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी, कार्तिक कृष्ण षष्ठी, दि.२० नोव्हेंबर १९९७ रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. आता त्यांचे सुंदर समाधी मंदिर मळ्यात उभारलेले आहे. 
१९९६ साली एकदा मी पू.श्री.भाईंच्या दर्शनाला गेलो होतो. त्यांना तेव्हा नुकतेच प्रकाशित झालेले पू.श्री.काकांचे 'साक्षात् परब्रह्म' हे चरित्र मी दिले. त्यावर पू.श्री.काकांचा एक छानसा पण थोडा गंभीर फोटो छापलेला आहे. तेव्हा पू.श्री.भाईंनी मला सांगितले की, 'त्या फोटोवर माझे बोट ठेव.' पू.श्री.भाईंचे वय तेव्हा ९१ वर्षांचे असल्याने त्यांना अंधुक दिसायला लागलेले होते. मी त्यांचे बोट फोटोवर ठेवल्यावर ते अतिशय प्रसन्न हसू लागले व म्हणाले ; "पाहा, आमचे काका किती गोड हसत आहेत !" त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा आनंद ओसंडून वाहताना स्पष्ट दिसत होता. त्यावेळी त्यांचे पू.श्री.काकांशी काय संभाषण वगैरे झाले आम्हांला समजले नाही, पण त्यांना झालेल्या आनंदावरून नक्कीच काहीतरी घडले असावे असे जाणवत होते. ते पू.श्री.काकांविषयी त्यावेळी आमचाशी भरभरून बोलले होते. पू.श्री.भाईंसारख्या महात्म्यांचे दर्शन लाभले हा मोठाच भाग्ययोग म्हणायला हवा. प.पू.श्री.भाईनाथ महाराजांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी दिनी सादर साष्टांग दंडवत !! प.पू.श्री.भाईनाथ महाराज व प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची एक सुरेख भावमुद्रा सोबतच्या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यात कोट-टोपी घातलेले पू.श्री.भाई आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव किती मोहक आणि मधुर आहेत पाहा !
आजच्या पावन दिनी भगवान श्री चिदंबर महास्वामींच्या चरित्र व लीलांवरील अल्पसे चिंतन, खालील लिंकवर क्लिक करून आपण आवर्जून वाचावे ही विनंती.
शिवचिदंबर पाहि माम्
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

22 Nov 2020

मैं कैलास का रहनेवाला हूं


आज कार्तिक शुद्ध अष्टमी, गोपाष्टमी. आजच्याच तिथीला पावन करीत इ.स.१७८५ साली नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर या ग्रामी, पहाटेच्या वेळेस एक दिव्य बालक प्रकट झाले. शिवभक्त श्री.नारायणराव अंतापूरकर व त्यांच्या पत्नीला या दैवी बालकाच्या रूपाने पुत्र लाभला आणि त्याच 'शंकर' नावाच्या बालकाने पुढे जाऊन अनंत जीवांचा उद्धार केला व आजही करीत आहेत.
"मैं कैलास का रहनेवाला हूं ।" असे स्पष्ट सांगणारे, प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. साक्षात् राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज देखील त्यांच्यासारखेच अखंड अवधूती मौजेमध्ये राहात असत. त्यांच्या लोकविलक्षण लीला वाचताना आश्चर्यालाही चमत्कार वाटावा, अशी आपली परिस्थिती होऊन जाते. 
सद्गुरु श्री शंकर महाराज अष्टावक्र होते, त्यांचा डावा पाय मोठा तर उजवा पाय लहान होता. ते म्हणत की, डावा पाय स्वामींचा व उजवा पाय माझा आहे. ते सद्गुरु श्रीस्वामींना 'आई' म्हणत असत व सांगत, " खरोखरीच स्वामीआईने मला मांडीवर घेऊन आपले दूध पाजलेले आहे !" राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे हे परमप्रिय शिष्योत्तम खरोखरीच श्रीस्वामी समर्थ महाराजांसारखेच अद्भुत आणि अतर्क्य लीलाविहारी होते. 
आमच्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा व सद्गुरु श्री शंकर महाराजांचा खूप दृढ स्नेह होता. या दोघांही महात्म्यांचा जिव्हाळ्याचा समान विषय श्री ज्ञानेश्वरी हाच होता.
सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या असंख्य लीला प्रचलित आहेत, पण त्यांचे श्री ज्ञानेश्वरीप्रेम त्यामानाने जास्त प्रचलित नाही. 
नगर ला सरदार मिरीकरांकडे एकदा चालू प्रवचनात स्वत: श्री शंकर महाराजांनी श्री माउलींच्या एकाच ओवीचे पन्नास वेगवेगळे अर्थ सांगून लोकांना आश्चर्यचकित केले होते. पुण्याला रावसाहेब मेहेंदळे यांच्या वाड्यात नेहमी चालणाऱ्या ज्ञानेश्वरी चिंतनास श्री शंकर महाराज उपस्थित असत. त्यावेळीच काही प्रसंगी तेथे प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजही उपस्थित होते. रावसाहेब मेहेंदळे हे प.पू.श्री.काकांचे नू.म.वि.शाळेतील मित्र होते. बहुदा १९४४ साली श्री शंकर महाराज फलटणला येऊन गेले होते. पण त्यावेळी प.पू.श्री.काकांची व त्यांची भेट झाली होती का ? हे आजतरी कोणाला माहीत नाही. प.पू.श्री.शंकर महाराज व प.पू.श्री.उपळेकर काकांच्या भेटीचा मेहेंदळे वाड्यात घडलेला एक प्रसंग मी स्वत: श्री.ज्ञाननाथजी रानडे यांच्या तोंडून ऐकलेला आहे.
श्री शंकर महाराजांनी आपले शिष्य डॉ.धनेश्वर यांच्याकडून श्री ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करवून घेतला होता. वरकरणी महाराजांचे वागणे-बोलणे वाटत विचित्र असले, तरी तो केवळ दिखावा होता लोकांना टाळण्यासाठी. त्यांचे मद्यपान, धूम्रपान सर्वकाही केवळ नाटक होते. आतून ते सदैव पूर्ण आत्मरंगी रंगलेले व परमज्ञानी असे विलक्षण भक्तश्रेष्ठ होते.
प.पू.श्री.काकांचे उत्तराधिकारी प.पू.श्री.बागोबा महाराज कुकडे हे श्री शंकर महाराजांचेही लाडके होते व त्यांच्या नवरत्न दरबारापैकी एक रत्न होते. श्री शंकर महाराजांचा नवरत्न दरबाराचा फोटो उपलब्ध आहे, त्यात पू.श्री.बागोबा बसलेले पाहायला मिळतात. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी, "श्री शंकर महाराज व आम्ही एकच आहोत", अशी विशेष अनुभूती एका भक्ताला काही वर्षांपूर्वी दृष्टांताने दिली होती. खरोखर हे दोन्ही महात्मे अतिशय विलक्षण असे अवधूतच होते.
प.पू.योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचेही सद्गुरु श्री शंकर महाराजांशी हृद्य नाते होते. प.पू.श्री.मामांच्या मातु:श्री व राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पूर्णकृपांकित कन्या प.पू.पार्वतीदेवी देशपांडे यांच्याकडे श्री शंकर महाराज आवर्जून येत असत. ते मोठ्या प्रेमाने पू.मातु:श्रींच्या हातचे सुग्रास अन्न ग्रहण करीत. नंतर त्यावेळी तरुण असलेल्या पू.श्री.मामांच्या सायकलवर बसून त्यांना हवे तिथे नेऊन सोडायला सांगत असत. प.पू.श्री.मामांना श्रीस्वामी समर्थ महाराज 'सख्या' म्हणत असत. त्यामुळेच पू.मातु:श्री व श्री शंकर महाराजही पू.मामांना 'सख्या' याच नावाने संबोधत असत. 
सद्गुरु श्री शंकर महाराज अक्षरश: काहीही लीला करू शकत असत. त्यांचे अचाट सामर्थ्य पाहून आपण स्तिमितच होऊन जातो. पण दुर्दैवाने म्हणा किंवा कलियुगाच्याच प्रभावाने म्हणा, आजच्या घडीला अनेक भोंदू महाराज, 'आमच्यामध्ये श्री शंकर महाराजांचा संचार होतो किंवा त्यांचे आदेश होतात' असे सांगून लोकांची फसवणूक करताना दिसत आहेत. "संतांचे कधीही संचार होत नसतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहे." भूतपिशाचे किंवा देवतांच्या गणांचे संचार होत असतात, देवांचे किंवा संतांचे कधीही संचार होत नसतात. ते पूर्णत: शास्त्रविरुद्ध आहे. त्यामुळे श्रीस्वामी समर्थ महाराज, श्री गोरक्षनाथ महाराज, श्री शंकर महाराज, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज इत्यादी महान संतांचे नाव घेऊन जर कोणी संचार झाल्याचे सांगत असेल, तर ते धादांत खोटे आहे हे स्पष्ट समजावे. तिथे दुसरेच एखादे पिशाच त्या नावाने संचार करीत असते किंवा ती व्यक्ती लोकांना लुबाडण्यासाठी संचाराचा खोटाच बनाव रचत असते, हे स्पष्ट समजून जावे. एखादा पुरुष गर्भार राहणे जितके अशक्य आहे, तितकाच संतांचा संचार होणे अशक्य आहे. गेल्या शतकातील थोर नाथयोगी संत श्री.गजानन महाराज गुप्ते यांनी आपल्या 'आत्मप्रभा' नावाच्या ग्रंथात असल्या भोंदूगिरीवर प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत. तेही स्पष्ट सांगतात की, "संतांना कोणाच्याही शरीरामध्ये संचार करण्याची काहीही आवश्यकता नाही."
लोकांच्या असहाय्यतेचा, प्रापंचिक संकटांनी पिडलेल्या जनतेचा ही भोंदू मंडळी पुरेपूर गैरफायदा घेऊन आपला  धंदा वाढवीत असतात. आपल्या कष्टदायक परिस्थितीत काहीतरी आशेचा किरण मिळेल या भाबड्या विचाराने लोकही मग त्यांच्या नादी लागतात व आगीतून अजून फुपाट्यात पडतात. तेव्हा चुकूनही असल्या संचारवाल्या बाया-बाबांच्या भानगडीत कधीही पडू नये, ही नम्र विनंती.
शास्त्रानुसार संतांचे शक्त्यावेश होत असतात, संचार नाही. शक्त्यावेश म्हणजे संतांच्या शक्तीचा काही काळासाठी झालेला दिव्य आवेश. असा शक्त्यावेश होण्यासाठी तो देहही तेवढ्याच तयारीचा लागतो. सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या अवतारकालात, त्यांच्या समक्षही असे शक्त्यावेश झालेले पाहायला मिळतात, पण ते काही क्षणांसाठीच होते. तसेच त्यांच्या अवतारकालानंतर नाशिकच्या श्री.कुलकर्णी मास्तरांमध्ये असलेला त्यांचा शक्त्यावेश अनेक भक्तांनी समक्ष पाहिलेला, अनुभवलेला आहे. तो मात्र खरा शक्त्यावेश होता व आजीवन राहिलेला होता. म्हणूनच तर त्या रूपातील श्री शंकर महाराजांना, विडणीला समाधिस्थ झालेले श्री शंकर महाराजांचे शिष्योत्तम श्री.शिवाजी महाराजही आपली आई म्हणूनच संबोधत असत. परंतु दुर्दैवाने आजमितीस मात्र श्री शंकर महाराजांचा संचार झाल्याचे दाखवून किंवा त्यांनी आदेश दिल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणारेच फार झालेले आहेत. शेवटी 'कालाय तस्मै नम: ।' हेच खरे.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे स्नेही व परमश्रेष्ठ योगिराज सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या महन्मंगल श्रीचरणीं प्रकट दिनानिमित्त सादर साष्टांग दंडवत !!
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

3 Nov 2020

अभ्यासदर्शन ग्रंथसंच ( प्रत्येक महायोग साधकासाठी अत्यंत महत्त्वाचे व आवर्जून अभ्यासलेच पाहिजे असे वाङ्मयसंचित )



भगवती श्री ज्ञानेश्वरीच्या उपासक-अभ्यासकांसाठी अत्यंत मोलाचे व महत्त्वपूर्ण कार्य श्रीवामनराज प्रकाशन करीत आलेले आहे. विशेषत: श्री ज्ञानेश्वरीचे हृदय समजला जाणारा आणि निगूढ साधनारहस्यांमुळे अद्भुत ठरलेला सहावा अध्याय अर्थात् अभ्यासयोग, महायोग यासंदर्भात जेवढे मौलिक आणि विशुद्ध साहित्य श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केले आहे, तेवढे आजवर इतर कोणीही प्रकाशित केलेले नाही. म्हणूनच महायोग साधनेच्या बाबतीत 'श्रीवामनराज'चे ग्रंथ हाच अंतिम शब्द मानला जातो व ते यथार्थच आहे ! यासाठी नि:संशय प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची दूरदृष्टी व सुनियोजन आणि प.पू.सौ.शकाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचे अपार कष्ट कारणीभूत ठरलेले आहेत. 
'योग' व 'बोध' हे जीवरूपी पक्ष्याचे दोन पंख आहेत. या दोन्हींच्या साहाय्यानेच तो आत्मज्ञानाच्या आकाशात स्वच्छंद विहार करू शकतो. यासाठीच प.पू.सद्गुरु श्री.मामा म्हणतात ; " 'योग' आणि 'बोध' यांची सांगड पडल्याशिवाय ज्ञानाला परिपूर्णता येत नाही !" श्रीसद्गुरुकृपा झाल्यावर साधकाचा 'योग' सुरू होतो ; आणि मग श्रीसद्गुरुपरंपरेच्या वाङ्मयाच्या अभ्यासाने त्याला 'बोध' होत असतो. बोधप्राप्तीसाठी साधकाला मनापासून व जाणीवपूर्वक प्रयत्न करावेच लागतात. 
श्रीसद्गुरूंच्या असीम दयाकृपेचे साक्षात् स्वरूप असणाऱ्या श्रीवामनराज प्रकाशनाचे हेच प्रधान उद्दिष्ट आहे. साधक बोधाच्याही अंगाने 'तयार' व्हावा म्हणूनच गेली अडतीस वर्षे श्रीवामनराज प्रकाशन मोठ्या कष्टाने अखंड कार्यरत आहे. आजमितीस अतिशय मोलाची अशी जवळपास अडीचशे प्रकाशने करून या संस्थेने साधक-वाचकांना बोधामृताचे, ब्रह्मरसाचे आकंठ परगुणेच घातलेले आहे ! 
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली अभ्यासयोगाचे विवरण 'आसनालागोनि स्पष्ट' केल्याचा उल्लेख करतात. कारण, साधनेसाठी आवश्यक असे सुयोग्य स्थान, साधनेसाठीचे योग्य आसन, साधनेची प्रत्यक्ष प्रक्रिया आणि साधनेतील अनुभूती ; या चार विभागांचा साधकाला मुळातून अभ्यास करावा लागतो. याला उद्देशूनच याला 'अभ्यासयोग' अशी संज्ञा आहे. याच अतिशय दुर्लभ मानलेल्या पण अत्यंत प्रभावी अशा 'अभ्यासयोगा'च्या अभ्यासाचे एक पुढचे पाऊल म्हणून, श्रीवामनराज प्रकाशन अत्यंत महत्त्वाचा व मौलिक असा *"अभ्यासदर्शन ग्रंथसंच"* घेऊन आपल्या भेटीसाठी येत आहे.
प्रस्तुत 'अभ्यासदर्शन ग्रंथसंचा'मध्ये वर उल्लेखिलेल्या साधनाभ्यासाच्या चार विभागांचे अतिशय मूलगामी व मार्मिक विवरण करणारे पाच ग्रंथ समाविष्ट आहेत. या पाच ग्रंथांची मिळून पृष्ठसंख्या ८१२ आहे. याशिवाय स्वतंत्र अभ्यासदर्शन सूची १५२ पृष्ठांची आहे. त्यामुळे संचाची एकूण पृष्ठसंख्या ९६४ एवढी झालेली आहे. अतिशय मोठा व महत्त्वपूर्ण असा हा संच, सप्तरंगी आकर्षक बॉक्स व चार देखण्या बुकमार्क्ससह केवळ ₹ ५०० /- या अल्प सवलतमूल्यात साधकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
श्री ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील श्लोक क्रमांक अकरा ते चौदा आणि वीस-एकवीस अशा सहा श्लोकांच्या विवरणात आलेल्या महत्त्वाच्या ओव्यांवरील प.पू.श्री.शिरीषदादांची एकूण सव्वीस प्रवचने ह्या अभ्यासदर्शन ग्रंथसंचात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. एखाद्या विषयाचा सांगोपांग अभ्यास करणारा परिपूर्ण शोधप्रबंध असावा ; तसे प.पू.सद्गुरु श्री.दादांचे हे पाचही ग्रंथ, साधकांसाठी आवश्यक असणारा अभ्यासयोगाचा समग्र चिंतनविषय, अगदी मुळातून, त्यातील सर्व खाचाखोचांचा विचार करीत समजावून सांगतात. 
श्री ज्ञानेश्वरीच्या आजवरच्या साडेसातशे वर्षांच्या इतिहासात, अभ्यासयोगाचे विविधांगी विवेचन करणारा अशा प्रकारचा अत्यंत समृद्ध, देखणा व नि:संशय उपयोगी ग्रंथसंच प्रथमच निर्माण झालेला आहे. या ग्रंथसंचात योगविभवभांडार मानल्या गेलेल्या अभ्यासयोगाचे, महायोगाचे अत्यंत स्वानुभूत आणि साधार असे विलक्षण विवेचन मांडलेले आहे. साधनेचे स्थान, आसन, साधनेची प्रक्रिया आणि साधनेतला अनुभूतिक्रम या सर्वांच्या विषयीच्या इतक्या बारकाव्यांची प.पू.सद्गुरु श्री.दादांनी यात विस्ताराने चर्चा केली आहे, की ते वाचून आपण अक्षरश: स्तिमितच होऊन जातो. विवेचनाच्या ओघात, प.पू.श्री.दादा असंख्य शास्त्रसिद्धांत, साधनेशी संबंधित इतर महत्त्वपूर्ण बाबी आणि प्रक्रिया यांचा अप्रतिम ऊहापोह करतात. एवढे विषय समजून घेण्यासाठी एरवी आपल्याला शेकडो शास्त्रग्रंथांचा सखोल अभ्यास करावा लागेल, जे आपल्यासारखा कोणालाही केवळ अशक्यच आहे. हेच या संचाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल की ; एखाद्या साधकाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी जेवढे म्हणून ज्ञान आवश्यक आहे, तेवढे सोदाहरण, सविवरण या एकाच संचात आपल्याला एकत्र अभ्यासायला मिळत आहे. म्हणूनच हा अभ्यासदर्शन संच महायोगाच्या, कृपायोगाच्या प्रत्येक साधकाने तसेच योगशास्त्राच्या अभ्यासकाने मनापासून व निगुतीने अभ्यासायलाच हवा इतका महत्त्वाचा झालेला आहे.
आपण जी महायोगाची साधना करतो, तिचे श्रेष्ठत्व आणि महत्त्व, त्या साधनेची सुयोग्य प्रक्रिया, त्यांतील Do's आणि Don'ts, साधनेला पूरक ठरणाऱ्या व आवश्यक अशा इतर बाबी, साधकाचा आहार-विहार, साधनेची पथ्ये-कुपथ्ये, साधकांकडून नकळत सर्रास होणाऱ्या चुका व त्यांचे दुष्परिणाम, त्या चुका टाळण्याच्या नेमक्या युक्त्या आणि साधनेचा आनंद वाढविणाऱ्या इतर अनेक गोष्टींचा, या संचात करण्यात आलेला सविस्तर विचार नि:संशय अद्भुतच उतरलेला आहे. महायोग साधनेचे विश्व किती अलौकिक आणि दैवी असते, त्याची यथार्थ जाणीव या संचाच्या सप्रेम अभ्यासाने कोणाही साधकाला नक्कीच येईल. हीच जाणीव जितकी आपल्या मनात अधिकाधिक रुजेल, वाढेल ; तितकीच आपली साधनाही सौख्यदायक होऊन आपल्या आत मुरत जाईल. मग आपला रोजचा, करून करून सवयीचा झालेला निरस प्रपंचही निरतिशय आनंदाची खाणच होऊन जाईल. हा या संचाचा फार मोठा लाभ आहे.
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींचा शब्द हा अभ्यासयोगात 'परम' मानलेला आहे. त्यांच्या इतके परिपूर्ण आणि विलक्षण आजवर कोणीही बोललेले नाही आणि पुढेही कोणी बोलू शकणार नाही. श्री माउलींच्या एकेका शब्दात अर्थाचे आभाळ सामावलेले असते. ते जाणून घेणे श्री माउलींच्या परमकृपेशिवाय केवळ अशक्यच आहे. अभ्यासयोगाच्या बाबतीतले हे गुरुगम्य रहस्य प्रस्तुत अभ्याससंचाच्या रूपाने, प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या माध्यमातून, सद्गुरु श्री माउलींच्या अहैतुकीकृपेने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे.
आपण जी दिव्य साधना करतो आहोत तिच्या श्रेष्ठत्वाची, अलौकिकत्वाची जाणीवच जर आपल्या आत नसेल, तर आपल्याकडून त्या दुर्लभ साधनेची हेळसांड होईल आणि वर्षानुवर्षे कष्ट करूनही आपल्या पदरात काहीच अनुभव पडणार नाहीत. हे टाळण्यासाठी आणि साधना निर्विघ्नपणे पूर्णत्वास जाण्यासाठी, प्रत्येक साधकाने साधनेचे अंतरंग रहस्य समजून-उमजून घेणे अगत्याचेच असते. त्यासाठी प्रस्तुत सहा पुस्तकांचा अभ्यासदर्शन ग्रंथसंच फार मोलाची भूमिका बजावेल यात अजिबात शंका नाही. 
शाळेचा अभ्यास जसा आपण मन लावून, महत्त्वाच्या भागावर खुणा करून, आवश्यक तेथे त्याच्या नोटस् काढून आणि पुन्हा पुन्हा वाचन करून करायचो, तसाच प्रस्तुत ग्रंथसंचातील पाच ग्रंथांचा क्रमाने आणि निष्ठेने अभ्यास केला ; तर महायोगाच्या मूलभूत सर्व अंगांचा उत्तम परिचय होईल. या पाच ग्रंथांपेक्षा वेगळे असे काही समजून घेण्याची मग आवश्यकताच उरणार नाही. साधकांसाठी आवश्यक व मुद्दाम अभ्यासावेत असे सर्व मुद्दे या पाच ग्रंथांमधून सुस्पष्टपणे व पूर्णत्वाने प्रकट झालेले आहेत. 
आता आपण या ग्रंथसंचातील सहा ग्रंथांची थोडक्यात माहिती करून घेऊ या.
१. जो संती वसविला ठावो 
सहाव्या अध्यायातील अकराव्या श्लोकाच्या विवरणातील ओवी क्र.१६४ ते १८० या ओव्यांवरील मार्मिक अशी बारा प्रवचने या ग्रंथात संकलित केलेली आहेत. साधनेच्या स्थानाचा इतका विविधांगी व नेमका परामर्श इतरत्र कुठेही वाचायला मिळणार नाही. या तीनशे छत्तीस पानांच्या ग्रंथात, पू.श्री.दादांनी साधकांसाठी आवश्यक असलेल्या आहार-विहारावरही अतिशय मार्मिक प्रकाश टाकलेला आहे. आपल्या दैनंदिन साधनेत या माहितीचा फार लाभ होईल.
२. होआवें आसन ऐसे
सहाव्या अध्यायातील अकराव्या श्लोकाच्या विवरणातील ओवी क्र.१८१ ते १८५ या पाच ओव्यांवरील गूढार्थ स्पष्ट करणाऱ्या तीन प्रवचनांचे संकलन. आसन संकल्पनेचा सर्वांगीण विचार, आसनांचे प्रकार, आसनक्रमाचे विवरण अशा अनेक विलक्षण गोष्टींचा ऊहापोह या ग्रंथामधून प.पू.श्री.दादांनी फारच बहारीने केलेला आहे.
३. विषयांचा विसर पडे
यथोचित आसनावर बसून केलेल्या साधनेच्या प्रत्यक्ष प्रक्रियेचा भाग सांगणारी बोधप्रद चार प्रवचने. महायोग साधनेत पडणारा विषयांचा विसर आणि घडणारी मनाची घडी यावर विस्तृत आणि विविध शास्त्रीय संज्ञांचे सुरेख विवरण करणारे मर्मग्राही विवेचन. साधना करताना सर्वसामान्यपणे येणाऱ्या अनेक शंकांची सुस्पष्ट उत्तरे यात आलेली आहेत.
४. अभ्यासाची पाखर पडे
साधनाकालात भगवती शक्तीच्या विविध क्रिया घडल्याने शरीर व मनाच्या पातळीवर जी लक्षणे दिसतात, त्यासाठी श्री माउलींनी 'पाखर' असा शब्दप्रयोग केला आहे. साधनेतील या विविध अद्भुत अनुभूतींचा विशेष लेखाजेखा पू.श्री.दादा या ग्रंथातील चार प्रवचनांमधून मांडतात. आपले साधन अधिक डोळसपणे, अधिक जाणीवपूर्वक होण्यासाठी ही 'अभ्यासाची पाखर' शांतपणे समजून घेणे अगत्याचेच आहे.
५. म्हणोनि आसनाचिया गाढिका
हा ग्रंथ म्हणजे साधनेच्या आसनाचे आणखी महत्त्वाचे आणि आजवर कधीच कुठेही प्रकट न झालेले अपूर्व संदर्भ स्पष्ट करणाऱ्या तीन प्रवचनांचे फारच विशेष संकलन आहे. यात आलेले आसनाचे तीन प्रकार, एरवी कुठेही वाचायला न मिळणारी शक्तिपात दीक्षेची प्रत्यक्ष प्रक्रिया, साधनेत अनुभवाला येणारा चक्रशुद्धीचा, मातृकासिद्धीचा क्रम इत्यादी गूढ विषयांचे अद्भुत आणि अलौकिक संदर्भ वाचून आपण अक्षरश: चकितच होऊन जातो. हे पूर्ण गुरुगम्य मानलेले रहस्य आजवर पहिल्यांदाच प्रकाशित होत आहे. त्यामुळे साधनाभ्यासाच्या दृष्टीने हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. सध्याच्या काळात इंटरनेट व सोशलमिडियावर महायोग विषयावर सर्रास फिरणाऱ्या बिनबुडाच्या व अशास्त्रीय माहितीच्या पार्श्वभूमीवर तर विशुद्ध ज्ञान देणाऱ्या या संचाचे महत्त्व मला पुन:पुन्हा अधोरेखित करावेसे वाटते.
६. अभ्यासदर्शन सूची
वरील पाच ग्रंथांमध्ये आलेल्या विविध विषयांच्या एकूण सात प्रकारच्या सूची यात समाविष्ट आहेत. त्यामुळे एखादा विषय कुठल्या ग्रंथात कुठे आलेला आहे, हे चटकन् शोधण्यासाठी ही सूची खूपच उपयुक्त आहे. यातील 'पारिभाषिक शब्द, व्याख्या सूची' व 'विशेष विवरण सूची' या दोन्ही सूचींचा सखोल अभ्यासात महत्त्वाचा हातभार लागेल.
या सहा ग्रंथांसाठी सप्तरंगी आकर्षक असा कार्डबोर्ड बॉक्स व चार सुरेख बुकमार्क्सही देण्यात आलेले आहेत. या ९६४ पानांच्या बृहद् संचाचे मूळ मूल्य ₹ ७२०/- असून, तो सवलतीत केवळ ₹५००/- एवढ्या अल्पमूल्यात साधकांसाठी उपलब्ध आहे.
महायोगाचा, अभ्यासयोगाचा समग्र अभ्यास करण्यासाठी तसेच या निगूढानुभूतींनी भरलेल्या साधनेच्या अथांग आनंदसागरात विहार करण्यासाठी, आधी या अभ्यासदर्शन ग्रंथसंचाचाच नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. महायोगाचा एक साधक म्हणून हे आपले कर्तव्यच नाही का ? तेव्हा त्वरा करावी आणि या दीपावलीच्या पावन पर्वकाली, आपले अंत:करण अद्वितीय बोधप्रकाशाने संपन्न होण्यासाठी प्रस्तुत अभ्यासदर्शन ग्रंथसंच खालील क्रमांकावर संपर्क करून तातडीने मागवून घ्यावा, ही प्रेमळ प्रार्थना !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
( _ग्रंथसंचासाठी संपर्क- श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919_ )

19 Oct 2020

'आत्मप्रभे'चा तेजस्वी आविष्कार - सद्गुरु श्रीसंत गजानन महाराज गुप्ते


अत्यंत अलौकिक अशा श्रीनाथ संप्रदायातील अतिशय विलक्षण व अद्भुत विभूतिमत्व असणाऱ्या, नाशिक येथे समाधिस्थ झालेल्या सद्गुरु श्रीसंत गजानन महाराज गुप्ते यांची आज ७४ वी पुण्यतिथी आहे. आजपासून त्यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यतिथी वर्षास सुरुवात होत आहे. 

सद्गुरु श्रीसंत गजानन महाराज स्वत:ला "वेडी केरसुणी" म्हणवून घेत असत. आपल्या 'आत्मप्रभा' ग्रंथातही त्यांनी याच नावाचा उल्लेख केलेला आहे. अतिशय रंगलेले, सदैव आपल्याच आत्मानंदात विचरण करणारे श्रीसंत गजानन महाराज तयारीचे परमार्थ-शिक्षकही होते. आत्मप्रभा ग्रंथातील त्यांचे परखड व स्पष्ट बोल वाचून आपल्याला हे मनापासून पटते. 

प्रत्येक मुमुक्षूने, साधकाने श्री गजानन महाराजांचा आत्मप्रभा ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे, मननात ठेवलाच पाहिजे, इतके त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अगदी सहजसोप्या आणि पटकन् समजेल अशा भाषेत श्रीमहाराजांनी त्यातून परमार्थाची मूलतत्त्वे स्पष्ट केलेली आहेत. विविध कथांच्या माध्यमातून अवघड विषय त्यात समजावून सांगितलेला आहे.

आजमितीस व्हॉटस्अप व फेसबुकचा बोलबाला आहे. त्यामुळे या सोशलमिडियावर आपले ज्ञान पाजळणारे महाभागही शेकड्याने निर्माण झालेले आहेत. अशा प्रकारचे तथाकथित ज्ञानी लोक कोणत्याही शास्त्रग्रंथांचा प्रत्यक्षात कसलाही अभ्यास किंवा साधनेचा स्वानुभव नसताना, अनुभूती किंवा चिंतनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते खरडून प्रसारित करीत असतात. लोक त्यांच्या शब्दांच्या कसरतीला भुलतात आणि परमार्थाच्या नावाखाली भ्रामक गोष्टी करू लागतात व फसतात. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'म्हणोनि आसनाचिया गाढिका' ग्रंथात म्हणतात ; "समाजात काही असेही 'स्वयंघोषित विद्वान' असतात की ज्यांचा कुठल्याच विषयाचा धड अभ्यास नसतो, त्यांना स्वत:लाच काहीही कळलेले नसते ; पण दुसऱ्याला शिकवण्याची दांडगी हौस त्यांना असते. स्वत:ला काहीही अनुभव नसताना ते दुसऱ्यांना उपदेश करण्यात आघाडीवर असतात. अशा स्वयंघोषित विद्वानांचा वर्ग सध्या Whatsapp वर किंवा Facebook वर क्रियाशील असलेला दिसतो. हा वर्ग परमार्थाच्या उपयोगाचा नसतो.(पृ.७३)" सद्गुरु श्रीसंत गजानन महाराजांनी देखील 'आत्मप्रभा' ग्रंथात अशाच स्वरूपाचे रोखठोक विचार पंचाहत्तर वर्षांपूर्वी सांगून ठेवलेले आहे. अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडून आपल्या श्रद्धेचे किंवा शुद्ध परमार्थ-इच्छेचे वाटोळे होऊ नये, असे ज्यांना मनापासून वाटते त्यांनी आत्मप्रभा ग्रंथाचा अभ्यास करणे म्हणूनच अत्यंत आवश्यक आहे.

"अमुक संत आमच्या अंगात येतात, त्यांचा संचार होतो किंवा ते ध्यानात आदेश देतात त्याप्रमाणे आम्ही वागतो, लोकांना उपदेश करतो", असे सांगून भोळ्या-भाबड्या लोकांना फसवण्याचा नवीन धंदा सध्या सर्वत्र फोफावलेला आहे. प्रत्यक्षात कोणत्याही संतांचे किंवा श्रीभगवंतांचे वारे कधीही कोणाच्याही अंगात येऊ शकत नसते. ते पूर्णत: शास्त्रविरुद्ध आहे. सद्गुरु श्रीसंत गजानन महाराजांनी त्याकाळात यावर विवेचन करून ठेवलेले आहे. आत्मप्रभेत ते म्हणतात ; "हल्ली कांहीं आधुनिक पंडित आमच्या अंगात अमक्या तमक्या संतांचा वा गुरूचा संचार होतो असे म्हणतांना आढळतात. माझे तर असें मत आहें कीं, प्राचीन व आर्वाचीन संत अशाच शरीरात संचरतील व त्यांजकडून उपदेश लिहवितील ही कल्पना मात्र नि:संशय खुळी आहे. संत-महात्म्यांना भूत, पिशाच्च अगर इतर क्षुद्र दैवतांप्रमाणे इतरांच्या देहांत शिरण्याचे किंवा संचार करण्याचे कांहींच प्रयोजन नाहीं. (पृ.१०५-१०६)"

यापुढील विवेचनात श्री गजानन महाराजांनी खऱ्या साधूंची व स्वत:ला महात्मे म्हणवणाऱ्या खोट्या साधूंची लक्षणे स्पष्ट करून सांगितली आहेत. ती सर्व मुळातूनच वाचावीत इतकी महत्त्वाची आहेत. सध्याच्या विचित्र परिस्थितीत बळावलेला खोटा परमार्थ हा नि:संशय त्याज्यच आहे आणि खऱ्या जिज्ञासूने, मुमुक्षूने चुकूनही त्या भानगडीत कधीच पडू नये. हे विचार पक्के होण्यासाठी व यथायोग्य परमार्थाचे नीट आकलन होण्यासाठी सद्गुरु श्रीसंत गजानन महाराजांच्या 'आत्मप्रभा' ग्रंथाचा अभ्यास करणे हिताचे व खूपच आवश्यक आहे.

( 'आत्मप्रभा' ग्रंथ "स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पांवस" यांनी प्रकाशित केला आहे. )

आज सद्गुरु श्रीसंत गजानन महाराजांच्या पावन श्रीचरणीं प्रेमसुमनांजली समर्पित करण्यापूर्वी, खालील लिंकवरील "वेडी केरसुणी" या लेखात मांडलेले त्यांचे अल्पचरित्र देखील आवर्जून वाचावे ही विनंती.

वेडी केरसुणी

https://rohanupalekar.blogspot.com/2019/10/blog-post.html

लेखक : रोहन विजय उपळेकर

भ्रमणभाष : 8888904481

10 Sept 2020

श्रीसंत गोविंदकाका उपळेकर महाराज यांच्या चरित्रावरील व्हिडियो


आज फलटण येथील थोर  विभूती श्रीसंत गोविंदकाका उपळेकर महाराजांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त सोबत दिलेल्या लिंकद्वारे त्यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात परिचय करून घेऊया. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करणारे शिल्पकार यांच्या चरित्रासंबंधी व्हिडीओद्वारे  माहिती देणारा  महाराष्ट्र नायक हा _विवेकचा_ एक उत्तम प्रकल्प आहे. याच प्रकल्पांतर्गत श्रीसंत गोविंदकाका महाराज उपळेकर यांच्या जीवन चरित्रावर हा अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. 
आजवर श्रीकाका महाराजांविषयी ज्याच्या लेख आणि स्वानंदचक्रवर्ती या पुस्तकाद्वारे आपण भरभरून वाचलंय, तो रोहनदादा उपळेकर या व्हिडीओमध्ये पू.श्री.काकांबद्दल माहिती देताना दिसतोय, ही विशेष आनंदाची बाब आहे !! सर्वांनी अवश्य बघा आणि इतरांनाही पाठवा !!
   https://youtu.be/cQYesNTf4hM

9 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ६



प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

इ.स.१९५४ सालचा हा प्रसंग आहे. त्यावेळी मी इरिगेशन खात्यात वर्कचार्जवर 'ब्लॉक मोजणीदार' या पदावर काम करीत होतो. त्याकाळात असे काम संपले की वर्कचार्जवरील माणसे कमी केली जात होती. माझ्या बरोबरीची चार माणसे कमी केली होती व महिना-दोन महिन्यात मलाही घरी बसावे लागणार होते. आता पुढे काय करायचे ?  या विवंचनेत मी होतो. 
त्यावेळी आम्ही लाटकर वाड्यात भाड्याने राहात होतो. त्या वाड्यासमोर एक मोठे पिंपळाचे झाड होते, त्याला छान दगडी पार देखील होता. एके दिवशी मी बाहेरून घरी येत असताना, त्या पारावर बसलेले प.पू.सद्गुरु श्री.उपळेकर काका व त्यांचे नेहमीचे चार-पाच लोक मी पाहिले. मी त्यांना नमस्कार केला व म्हणालो ; "आपण याल का चहा घ्यायला घरी ?" माझ्या महद्भाग्याने प.पू.श्री.काका त्या सर्व मंडळींसह आमच्या घरी आले. 
घरी आल्यावर त्यांनी "कुठले राहणार ?" वगैरे चौकशी केली. "आम्ही मूळ बार्शीकडचे आहोत असे मी सांगितले. त्यावर लगेच, "ओ भगवान बार्शी, भगवान बार्शी, भगवान बार्शी" असे प.पू.श्री.काका म्हणाले आणि मला आज्ञा केली ; "तुम्ही तरडगावच्या मारुतीचे दर्शन घेऊन या !" मी विचारले, "मुद्दाम जाऊन दर्शन घेऊन येऊ का ?" त्यावर "मुद्दाम नको पण कामानिमित्त गेलात तर दर्शन घ्या !" असे त्यांनी सांगितले.
आश्चर्य म्हणजे दोन-चार दिवसांनी साहेबांनी मला ऑफिसात बोलावले व म्हणाले ; "तुम्हाला आता ब्रेक द्यावा लागणार. तेव्हा तुम्ही महाड-पंढरपूर रोडवर डांबरीकरणाचे काम चालू आहे, तेथे हजर व्हा." त्याप्रमाणे मी त्या कामावर हजर झालो. नेमके त्याच वेळी काळज व तरडगावच्या मध्येच चालू होते. मी कामावर हजर झालो व शुक्रवारी घरी फलटणला न येता काळजला मुक्काम केला. सकाळी मंदिराच्याच आडावर आंघोळ केली आणि तरडगावच्या श्री मारुतिरायांचे दर्शन घेतले. 
प.पू.सद्गुरु श्री.काकांनी अत्यंत करुणेने स्वत:हूनच सांगितलेल्या या उपायामुळे, नोकरीत मला ब्रेक लागला नाही आणि 'मोजणीदार' या पदावर माझी कायमस्वरूपी नियुक्ती झाली. आज मी नव्वदी पार केली आहे, रिटायर्ड होऊन मला बत्तीस वर्षे झाली आहेत ; पण तो पारावरचा प्रसंग जसाच्या तसा आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. प.पू.श्री.काकांच्या या अलौकिक वाचासिद्धीने माझे जीवन कृतार्थ झाले अशी माझी पक्की धारणा आहे. त्यांच्याच कृपेने या वयातही मी समाधी मंदिरात नियमाने जातो आणि मनोभावे प.पू.सद्गुरु श्री.काकांचे दर्शन घेऊन समाधान पावतो !
- श्री.वासुदेव गुंडोपंत इंगळे, फलटण.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

8 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ५


प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

"तुझ्याकडे ती देशपांड्यांची मुलगी आहे ना, तिला बोलाव. तिला सांग बघायला !" हे बोल आहेत प.पू.सद्‍गुरु श्री.उपळेकर काकांचे. त्यावेळी मी डॉ.विनायक सिधयेंच्या हॉस्पिटलमध्ये 'सिस्टर इन्चार्ज' म्हणून काम करायचे. हॉस्पिटल पासून प.पू.श्री.काकांचे घर दोन मिनिटांच्या अंतरावर होते. डॉ.सिधयेंच्याकडे प.पू.श्री.काकांचे येणे असायचेच. दर गुरुवारी तर नक्कीच. डॉक्टर गुरुवारी पुण्याला जात, पण प.पू.श्री.काका येऊन जाणारच. 
त्यावेळी ती.सौ.मामी म्हणजे प.पू.श्री.काकांच्या पत्नी बरेच दिवस आजारी होत्या. डॉक्टर अधून मधून त्यांना तपासण्यासाठी जात. आता साल आठवत नाही, पण त्या दिवशी सकाळीच प.पू.श्री.काकांचा निरोप आला आणि डॉक्टर आणि सीताराम कंपाउंडर ती.सौ.मामींना तपासण्यासाठी गेले. मी माझे हॉस्पिटलचे काम करीत होते. ती.सौ.रुक्मिणीदेवी उपळेकर आईसाहेबांना सर्वजण मामीच म्हणत. त्या माझ्या आईच्या मैत्रीणही होत्या. त्या भेटल्या की मी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारत असे. पण उगीचच भीत होते प.पू.श्री.काकांना ! 
थोड्याच वेळात सीताराम आला व मला म्हणाला, "डॉक्टरांनी पू.काकांकडे तुम्हांला बोलावले आहे." मी आधी भ्यालेच. सीतारामला सांगितले, "तू माझ्याबरोबर राहा हं." सकाळची वेळ. प.पू.श्री.काका अंघोळ वगैरे करून, कपाळी गंध बुक्का लावून, देवघरात मांडी घालून शांत बसलेले होते. धोतर नेसलेल्या आणि जानवे घातलेल्या प.पू.काकां मी नमस्कार केला. तेव्हाही प.पू.काका एकदम शांतच होते. 
मला डॉक्टरांनी सांगितले, "आत जावून ती.सौ.मामींची PV करून बघा. काही वाटले तर मला बोलवा." मी आत गेले. मला पाहून ती.सौ.मामी गोड हसल्या. माझा हात त्यांनी हातात घेतला. त्यांना मला पाहून बरे वाटले असावे. त्यांच्या सूनबाई, कै.सौ.सुशीलाकाकू जवळ उभ्या होत्या. ती.सौ.मामींनी लाज वाटून आपले दुखणे कुणाला सांगितलेच नव्हते. मी तपासणी केली आणि डॉक्टरांना बोलावले. ती.सौ.मामींना सांगितले, "तुम्ही लाजू नका, घाबरू नका, मी आहे इथे. तोंडावर पांघरूण घेऊन शांत झोपा." बिचाऱ्यांनी ऐकले. डॉक्टरांनी पाहिले व आम्ही हात धुवून प.पू.श्री.काकांच्या खोलीत आलो. खरंतर आम्ही काही सांगण्याची गरजच नव्हती. ती माउली आधीच सर्व जाणत होती. 
तरीही डॉक्टरांनी ती.सौ.मामींच्या आजाराची सर्व कल्पना प.पू.श्री.काकांना दिली. तेव्हा देखील किंचितही विचलित न होता प.पू.काका धीरगंभीर व शांतच बसलेले होते. मी गुडघे टेकून त्यांना नमस्कार केला. त्या परिस्थितीतही त्यांनी मला खडीसाखरेचा प्रसाद दिला व प्रेमाने पाठीवर हात ठेवला. मी खरोखर त्या दिवशी धन्य झाले. कारण ती.सौ.मामी आणि प.पू.श्री.काकांचा मला एकाच वेळी आशीर्वाद मिळाला. ती.मामींचे दुखणे जवळजवळ थर्ड स्टेजला गेले होते. त्यांना तपासायला डॉक्टरांना न सांगता प.पू.काकांनी मला सांगितले ; ह्यातच मला प.पू.काकांकडून सर्व काही मिळाले. त्यांचे कृपाशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत.
अशीच प.पू.सद्गुरु श्री.गोविंद काकांची आणखी फार सुंदर व हृद्य आठवण सांगते. प.पू.काकांच्या आणखी एक सूनबाई सौ.सुनिती वहिनी गरोदर होत्या. त्यावेळी दर महिन्याला तपासणी, महिन्याचे औषध-पाणी आणि सातव्या व आठव्या महिन्यात धनुर्वाताचे इंजेक्शन, सोनोग्राफी फाईल करणे असले प्रकार नव्हते. नऊ महिने सरले, पोटात दुखायला लागले की पेशंट दवाखान्यात भरती होत असत. त्याप्रमाणे सौ.वहिनींचे दिवस भरले, पोटात दुखू लागले. त्या हॉस्पिटलला आल्या. त्यांची तपासणी करून त्यांना भरती करून घेतले. बहुतेक रात्री बाळंतपण होईल असा आमचा अंदाज होता. दुपारची सुट्टी झाल्यावर पुन्हा चार वाजता मी पेशंट पाहिला. ठीक होते सगळे. संध्याकाळी ६ च्या सुमारास प.पू.श्री.काका स्वत: दवाखान्यात आले, खोलीत जाऊन सौ.वहिनींना त्यांनी पाहिले व डॉक्टरांची गाठ घेऊन निघून गेले. 
माझी ड्युटी संध्याकाळी सात वाजता संपत असे. माझ्या दोघी बहिणी सिंधुताई व इंदुताई मला न्यायला येत. थोडे फिरून आम्ही घरी जात असू. त्यादिवशी दोघी आल्यावर माझे काम आवरून मी डॉक्टरांना घरी जाऊ का विचारले. कारण बाळंतपणाची केस असली तर डॉक्टर स्वत: डिलिव्हरी करत. बाळंतपण करण्यात वाकबगार असणाऱ्या आया आणि डॉक्टरांच्या पत्नी देखील मदत करीत. पण त्यादिवशी डॉक्टर म्हणाले, "बाई, उपळेकर वहिनींची डिलिव्हरी तुम्ही करून जा. प.पू.श्री.काकांनीच तसे मला सांगितले आहे." प.पू.श्री.काकांनी सांगितले आहे म्हटल्यावर मी गप्प झाले व मला खूप आनंद पण झाला ! कारण हा प.पू.काकांचा माझ्यासाठी मोठा आशीर्वादच होता  
रात्री नऊच्या सुमारास उपळेकर वहिनी बाळंतीण झाल्या. मी एकटीने त्यांची डिलिव्हरी केली. डॉक्टर अजिबात तिकडे फिरकले नव्हते. नॉर्मल डिलिव्हरी झाली. मला खूप आनंद झाला. सौ.उपळेकर वहिनींना सुंदर कन्यारत्न झाले होते. नाळ कापून मी बाळाला दूर ठेवत होते, इतक्यात लेबर रूमचा बंद असलेला दरवाजा हळूच उघडला गेला. दाराच्या बाहेर स्वतः प.पू.श्री.काका, कै.श्री.निवृत्तिनाथ मेळवणे काका आणि बाळाचे बाबा उभे होते. प.पू.श्री.काका गोड हसत म्हणाले, "पौर्णिमा, पौर्णिमा !" माझ्याकडे आशीर्वादाचा हात करत प.पू.श्री.काका लगेच निघूनही गेले. सौ.वहिनी खूप आनंदाने माझा हात हातात घेऊन म्हणाल्या, "ती.काका स्वतः येऊन गेले. माझे बाळ धन्य झाले." मी वहिनींना म्हणाले "अहो, तुम्ही सगळे प.पू.काकांचेच आहात. ही तर त्यांची नात आहे. तिचे नाव तुम्ही 'पौर्णिमा'च ठेवा. प.पू.श्री.काकांचा आशीर्वाद आहे हा !" आणि विशेष म्हणजे त्या दिवशी पौर्णिमाच होती. ९ वाजता आकाशात हा सुवर्णक्षण पाहायला पूर्णचंद्रही उपस्थित होता. 
विशेष म्हणजे सौ.वहिनींची पहिली खेप असून बाळंतपण नॉर्मल झाले. बाळंतपण करायला मी एकटी. डॉक्टरांची अजिबात उपस्थिती नाही आणि बाळ जन्मल्याबरोबर साक्षात् प.पू.श्री.काका तिथे आशीर्वादाचा हात घेऊन उभे. महत्भाग्यच आहे हे !
असे हे आमचे प.पू.सद्गुरु श्री.काका आणि त्यांना मनोमन मानणारा पण उगीचच भिणारा माझ्यासारखा एक भक्त. मला प.पू.श्री.काकांबद्दल लहानपणापासूनच फार आकर्षण होते. रोज जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे असे सारखे वाटायचे. पण काही माणसांनी उगीचच त्यांच्याबद्दल आमच्या मनात गैरसमज करून दिले. दुर्दैवाने त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात भीती राहून गेली. म्हणून त्यांच्यापासून मी कायम दूरच राहिले. पण योगायोग पाहा, मी डॉ.सिधयेंकडे नोकरी करीत असताना प.पू.श्री.काका दर गुरुवारी दवाखान्यात येत असत. त्यामुळे त्यांचे दर्शन आपोआप मला होत असे. अनेक वेळा दर्शन झाले. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल भीती मात्र कायमच होती. 
एकदा मी पेशंटला इंजेक्शन देऊन ओ.पी.डी.मध्ये परतत होते. माझा उजवा पाय उंबर्‍यावर होता. त्याचवेळी अचानक प.पू.श्री.काका समोर आले आणि त्यांनी आपला उजवा पाय माझ्या उंबर्‍यावरच्या पायावर ठेवला. मी प्रचंड घाबरले. प.पू.श्री.काका म्हणाले, "घाबरू नकोस !" आणि गोड हसत माझ्या ओठावर उजवा हात ठेवून म्हणाले, "हे बंद ठेव. खूप हुशार आहेस. तुला कधी काहीही कमी पडणार नाही !" मी घाबरतच मनोमन प.पू.श्री.काकांना नमस्कार केला.
गंमत म्हणजे मी डॉ.सिधयेंच्यात नोकरी करत होते तेव्हा आणि नंतर माझ्या भावाच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होते तेव्हाही, माझ्या हातून सर्व नॉर्मल बाळंतपणेच झाली. कधीच कोणतीही केस क्रिटिकल झाली नाही. आजही जुने पेशंट आपल्या लेकीसुनांना घेऊन तपासण्यासाठी येतात, सल्ला घेतात. ही सर्व प.पू.श्री.काकांचीच कृपा आहे, त्यांच्याच आशीर्वादांचे फळ आहे. त्यामुळे आज मला काहीही कमी नाही, आम्ही सुखात आहोत. 
मी स्वतःला आणि आमच्या घराण्याला खूप भाग्यवान समजते. पू.श्री.काकांचे पुतणे कै.श्री.श्रीपादराव उपळेकर यांची पत्नी कै.सौ.मालतीबाई उपळेकर या माझ्या चुलत बहीण होत्या. अशाप्रकारे प.पू.श्री.काकांशी आमचे नातेही होते. आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद देखील आम्हांला सदैव मिळाले व आजही मिळत आहेत !
- बेबीताई गणेश देशपांडे, फलटण.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

7 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ४

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ४

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

माझे वडील कै.श्री.भास्कर गजानन खळे तथा श्री.अण्णा हे योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांचे अनुगृहीत होते. प.पू.श्री.गुळवणी महाराज आमच्या घरी चेंबूरला नेहमी येत असत. आमच्या घरी श्रीसंत साईबाबांच्या मूर्तीची पू.श्री.गुळवणी महाराजांच्या हस्ते स्थापना झालेली आहे. मलाही श्रीमहाराजांकडूनच दीक्षा झाली. माझे वडील पुण्याला श्रीमहाराजांच्या दर्शनाला वारंवार जात असत. श्रीमहाराजांचे अतीव प्रेम आम्ही सर्वांनी असंख्य वेळा अनुभवलेले आहे.
फलटणचे थोर सत्पुरुष प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज आणि प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांचे अत्यंत हृद्य संबंध होते. दोघेही एकमेकांना फार मानीत असत आणि आपल्या भक्तमंडळींना आवर्जून एकमेकांच्या दर्शनाला पाठवीत असत. ९ जून १९७१ रोजी प.पू.श्री.उपळेकर महाराज पुण्याच्या 'श्रीवासुदेव निवास' आश्रमात प.पू.श्री.गुळवणी महाराजांच्या भेटीसाठी आले होते. प.पू.श्री.उपळेकर महाराजांच्या भेटीने प.पू.श्री.गुळवणी महाराजांना खूप आनंद झाला होता. त्यानंतर लगेचच माझे वडील पुण्यास श्रीमहाराजांकडे गेले होते.  
तेव्हा माझ्या वडिलांना सद्गुरु श्री.गुळवणी महाराज म्हणाले ; "खळे ; ह्या वेळेस फलटणला जाऊन प.पू.श्री.उपळेकर महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय मुंबईस परत जाऊ नका. प.पू.श्री.उपळेकर काका हे अखंड ब्रह्मानंद स्थितीतील एक महापुरुष आहेत !" 
श्रीगुरु महाराजांची आज्ञा झाल्यावर लगेच ती.अण्णा पुण्याहून एस.टी.ने फलटणला गेले. स्टँडवर उतरून पत्ता विचारत पू.श्री.उपळेकर काकांच्या घरी गेले. तिथे गेल्यावर दारातच कोणीतरी त्यांना सांगितले ; "प.पू.काकांची तब्येत बरी नाही, त्यामुळे दर्शन होणार नाही !" ती.अण्णा त्या गृहस्थांशी बोलत होते तेवढ्यातच पू.श्री.काका महाराज स्वत: बाहेर आले व म्हणाले ; "कोण म्हणतो बरे नाही मला ? या, या, आत या बरे ! " आणि प.पू.श्री.काकांनी ती.अण्णांना आपल्या मागून बैठकीच्या खोलीत यायला सांगितले. 
खोलीत गेल्यावर प.पू.श्री.काका स्वत:च्याच स्वानंदस्थितीत गोड हसत म्हणाले, "असे पायावर डोके ठेवा बरे. हार आणला आहे ना, तोही घाला !" प.पू.श्री.काकांचे हे प्रेमाचे अगत्य पाहून ती.अण्णा एकदम हरखूनच गेले. पटकन् खाली बसून त्यांनी प.पू.श्री.काकांचे चरण दोन्ही हातात धरून त्यावर डोके ठेवले, त्यांच्या गळ्यात हार घातला. लगेच प.पू.काका म्हणाले ; "बसा असे, वरती खुर्चीवर बसा." वडील म्हणाले ; "नको खालीच बसतो." त्यावर आग्रहाने प.पू.श्री.काका म्हणाले ; "नाही नाही. असे खुर्चीवरच बसा !" त्यांनी घरातून चहा मागवला, प्रेमाने ती.अण्णांना दिला आणि खूप आनंदाने त्यांच्याशी संवाद केला. सर्व कुटुंबाची विचारपूस केली. "कसे आलात ? गाडी घेऊन आलात का स्वत:ची ?" असेही विचारले. ती.अण्णा परत निघाले तेव्हा प.पू.श्री.काका म्हणाले ; "मी एक पत्ता देतो, तिथे जाऊन जेवण करूनच पुण्यास जायचे. जेवल्याशिवाय जाऊ नका !" त्यांनी दिलेला तो पत्ता होता एका हॉटेलचा, ज्याचे त्याच दिवशी उद्घाटन झाले होते. तिथे गेल्यावर ती.अण्णांना आमरसासहित पंचपक्वान्नांचे जेवण दिले गेले. गंमत म्हणजे देण्याचा प्रयत्न करून सुद्धा त्या हॉटेल मालकाने जेवणाचे पैसेच घेतले नाहीत. घरी आल्यावर ती.अण्णा माझ्या सौ.आईला म्हणाले ; "अगं कुसुम, आज श्रीमहाराजांच्या कृपेने मला एका थोर अवतारी महापुरुषाचे दर्शन झाले !" 
ती.अण्णा तेव्हा म्हणाले होते की, "ज्याअर्थी आज प.पू.श्री.काकांनी, "स्वत:च्या गाडीने आलात का ?" असे विचारले, त्याअर्थी आपण कधीतरी नक्कीच गाडी घेणार !" नंतरच्या काळात खरोखरीच माझ्या भावाने गाडी घेतली.
माझ्या वडिलांना प.पू.श्री.गुळवणी महाराजांनीच फलटणला दर्शनासाठी पाठवले होते. प.पू.श्री.गुळवणी महाराजांविषयी प.पू.श्री.काकांना इतका प्रेमादर होता की, त्यांनी पाठवले म्हणून ती.अण्णांना प.पू.श्री.काकांनी अतिशय आपुलकीने, प्रेमाने वागवले आणि पंचपक्वान्नांचे भोजन करूनच पाठवले. ती.अण्णा हे श्रीमहाराजांचे शिष्य आहेत, म्हणजे आपल्याच घरातले आहेत ; एवढ्या आपुलकीने प.पू.श्री.काका त्यांच्याशी वागले. "साधू दिसती वेगळाले । परि ते स्वरूपी मिळाले ।"* हे समर्थ श्री रामदास स्वामींचे वचन यथार्थच आहे !
- श्री.प्रशांत भास्कर खळे, नेरुळ - नवी मुंबई.
(छायाचित्र : प.पू.सद्गुरु श्री.गोविंद काका उपळेकर महाराज आणि प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराज यांचे फलटणच्या पू.श्री.काकांच्या 'श्रीगुरुकृपा' वास्तूच्या समोर काढलेले छायाचित्र.)
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

6 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- ३



प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

माझ्या आईला, कै.नलिनी देशपांडे हिला प.पू.श्री.काकांच्या दर्शनाची आवड होती. ती नेहमी त्यांच्या दर्शनाला जात असे. त्यामुळे महद् भाग्याने मलाही वयाच्या दहाव्या वर्षापासून प.पू.श्री.काकांचे दर्शन लाभत आलेले आहे. त्यावेळी त्यांच्या हातून खडीसाखरेचा प्रसाद आणि आशीर्वाद कायमच मिळायचे. त्यांच्याच दिव्य आशीर्वादांमुळे आज मी समाधानात आहे.
प.पू.श्री.काकांचा मला आलेला एक विशेष अनुभव येथे सांगत आहे. मी त्यावेळी अठरा वर्षाचा होतो. फलटणवरून जाऊन येऊन रोज बारामतीच्या टी.सी.कॉलेजमध्ये मी प्री-डिग्री कॉमर्स करत होतो. फलटणच्या ब्राह्मण आळीतील प.पू.दादामहाराज देशपांडे (ग्वाल्हेरकर) यांच्या वाड्यात आम्ही त्यावेळी राहात होतो. श्रीसंत हरिबुवा महाराजांवर आमच्या घराण्याची अतीव श्रद्धा होती. त्यामुळे रोज सकाळी मी सायकलवरून श्रीसंत हरिबुवा महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनाला जात असे. माझ्या वडिलांना १९७३ साली देवाज्ञा झाली होती आणि आमची परिस्थिती त्यावेळी अगदीच हलाखीची होती.
तो दिवस १९७४ सालच्या फेब्रुवारी महिन्याचा पहिला रविवार असावा. नेहमीप्रमाणे अकराच्या दरम्यान मी श्रीसंत हरिबुवा महाराजांच्या मंदिरात दर्शनास गेलो. मी गाभार्‍यात प्रवेश केला आणि मला प.पू.श्री.काका समाधीच्या मागे असलेल्या श्रीसंत हरिबुवा महाराजांच्या मूर्ती जवळ उभे असलेले दिसले. प.पू.श्री.काकांच्या बरोबर आलेल्या एकाने मला समर्थ मिठाई केंद्रातून पावशेर पेढे आणण्यासाठी पैसे दिले. मी लगेच सायकलवरून जाऊन पेढे घेऊन आलो. प.पू.श्री.काकांनी स्वत: सद्गुरु श्री.हरिबुवा महाराजांच्या समाधीस पेढ्याचा नैवेद्य दाखवला. त्यातला एक पेढा मला त्यांनी स्वहस्ते प्रसाद म्हणून दिला. मी त्यांना मनोभावे नमस्कार केला. हेच मला झालेले प.पू.श्री.काकांचे शेवटचे दर्शन ठरले. त्यानंतर काही महिन्यांनी, दि.८ ऑक्टोबर १९७४ रोजी प.पू.श्री.काकांनी समाधी घेतली.
खरोखर त्या प्रसाद पेढ्याने आमच्या आयुष्यात प्रचंड बदल झाले. त्यांच्या त्या अमोघ आशीर्वादांमुळे, खायची भ्रांत असलेल्या परिस्थितीतून सुधारणा होत होत आज अत्यंत समाधानी आणि सधन आयुष्य आम्ही व्यतीत करीत आहोत. हा नि:संशय प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज यांचाच कृपाप्रसाद आहे !
प.पू.काकांच्याच कृपेने आता बँकेतून निवृत्त झाल्यावर मला श्री ज्ञानेश्वरीच्या व संतवाङ्मयाच्या अभ्यासाची इच्छा व गोडी निर्माण झाली आहे. प.पू.श्री.काकांच्या 'श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनी'चे जे अध्याय पीडीएफ स्वरूपात नेटवर उपलब्ध करून दिलेले आहेत, ते मी डाऊनलोड करून त्यांचा अभ्यास करू लागलो आहे. त्यांच्या कृपेने आता या अभ्यासातही गती आणि आनंद लाभावा हीच सप्रेम प्रार्थना करून, प.पू.श्री.उपळेकर काकांच्या श्रीचरणीं विनम्र दंडवत घालतो !
- श्री.बजरंग देशपांडे, पुणे.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

5 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- २

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- २

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या 'अनुग्रह शताब्दी वर्षा'तील पुण्यस्मरण सप्ताह

सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे आमच्या घरावर कृपाछत्र आहे. त्यांच्या कृपादृष्टीचे अनेक अनुभव आम्हां सर्वांना नेहमीच येत असतात. माझ्या आई-वडिलांचे अनुभव मी येथे कथन करीत आहे.
साधारण १९७० सालची ही गोष्ट आहे. माझे वडील कै.श्री.मल्हारराव रामचंद्र घाडगे हे फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यात रोखपाल (cashier) म्हणून काम करीत होते. ते नेहमी श्री ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनाला जायचे. तेव्हा शेजारीच राहात असलेल्या प.पू.श्री.काकांचेही दर्शन आवर्जून घ्यायचे. त्यावेळी आमची परिस्थिती तशी खूप बेताचीच होती. आम्ही तीन बहिणी, दोन भाऊ व आईवडील असे सात जणांचे कुटुंब होते. कसातरी खर्च भागत असे. वडिलांना सारखे वाटायचे, मुलांच्या शाळेचा खर्च भागला पाहिजे, घरात सर्व काही सुव्यवस्थित हवे, तेव्हा चालू नोकरी बरोबरच मला अजून दोन ठिकाणी नोकरी केली पाहिजे, तरच सर्वांचे व्यवस्थित चालेल. 
अशा विचारांच्या ओघातच एकेदिवस ते प.पू.श्री.काकांच्या दर्शनाला गेले. तेव्हा प.पू.श्री.काका या पाटावरून त्या पाटावर जात हरिपाठ म्हणत होते. माझ्या वडिलांनी दर्शन घेतल्यावर प.पू.श्री.काकांनी एक मोठे हरिपाठाचे पुस्तक दिले व दोन पेढे त्यांच्या हातावर ठेवले. माझ्या वडिलांनी, ती.तात्यांनी घरी येऊन खूप आनंदाने ही गोष्ट ती.आईला सांगितली. आपल्या मनात चालू असलेल्या विचारांसाठी ही गोष्ट त्यांना खूपच पूरक वाटली, जणू प.पू.श्री.काकांचा आशीर्वादच मिळाला असे त्यांना मनोमन जाणवले.
प.पू.श्री.काकांनी दोन पेढे व हरिपाठाचे पुस्तक दिल्यानंतर माझ्या वडिलांना फलटण येथील श्रीसंत हरिबाबा महाराज मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात सेक्रेटरी म्हणून दुसरी नोकरी लागली. त्याशिवाय श्रीदेव मारुती मंदिर येथेही सेक्रेटरी म्हणून अजून एक काम लागले. त्यांनी खूप वर्षे प्रामाणिकपणे या सर्व नोकऱ्या केल्या. प.पू.श्री.काकांच्या अमोघ आशीर्वादांमुळे कसलीही अडचण न येता आमचे सर्वांचे शिक्षण वगैरे नीट होऊन अगदी भले झाले.
प.पू.श्री.काकांची सहज कृती किती सूचक होती पाहा. हरिपाठाचे पुस्तक दिले ; पहिली नोकरी श्री हरिबाबा मंदिरातच लागली. दोन पेढे दिले ; त्यांना खरोखर दोन जास्तीच्या नोकऱ्या लागल्या. पेढेच दिले याचा अर्थ समाधान लाभेल, सर्वकाही गोड होईल. प.पू.श्री.काकांसारख्या अवधूतावस्थेतील अवलिया संतांचे सहज वागणे-बोलणे देखील अतिशय सूचक व नेटके असते !
माझी आई श्रीमती सुमन मल्हारराव घाडगे रोज प.पू.श्री.उपळेकर काकांच्या मंदिरात दर्शनाला जात असे. पुण्यतिथी सप्ताहातील श्री ज्ञानेश्वरी पारायणालाही बसत असे. १९९२ साली एकेदिवशी समाधीचे दर्शन घेऊन ती मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या, प.पू.श्री.काकांच्या घराशेजारच्या एका तगरीच्या झाडाची फुले तोडायला गेली. त्या झाडाखाली एक मोठा चौकोनी दगड होता. त्या दगडावर ती चढली व फुले तोडत असताना, एकदम तोल जाऊन त्या दगडावरून खाली पडली. त्या धक्क्याने तिचा हात खांद्यापासून खाली आला, निखळला. निखळलेल्या हाताचे दुखणे खूपच असह्य असते. ती घाबरून जाऊन जोरात ओरडली ; "काका, मला वाचवा !" आश्चर्य म्हणजे त्याक्षणी तिचा निखळलेला हात स्वतःचा स्वत:च एकदम खटकन् आवाज होऊन जागेवर बसला. निखळलेला हात आपला आपण कधीही बसू शकत नाही, तो दुसऱ्या जाणकाराने विशिष्ट प्रकारे जोर देऊन बसवावा लागतो. पण त्यावेळी तिथे माझी आई एकटीच होती, आसपास कोणीही नव्हते.
मुळात तिचा स्वभाव अतिशय भित्रा पण खूप श्रद्धाळू होता. त्यामुळे प.पू.श्री.काकांनीच स्वतः तिचा हात बसवला यात काहीच शंका नाही. तसेही प.पू.श्री.काका डॉक्टरच तर होते ना ! हा खूप मोठा चमत्कार प.पू.श्री.काकांच्या कृपेने आम्हांला अनुभवायला मिळाला. तिने लगेच घरी येऊन सांगितले की ; "प.पू.श्री.काकांनीच माझा हात बसवला !" त्या प्रसंगानंतर तिच्या हाताला कुठेही सूज वगैरे आली नाही किंवा दुसरा काहीच त्रासही झाला नाही.  
मी आणि माझी बहीण सुवर्णा मल्हारराव घाडगे दोघीही प.पू.श्री.काकांचे नेहमी स्मरण करतो, वेळ होईल तसे समाधी मंदिरात दर्शनालाही जातो. प.पू.श्री.काकांसारख्या थोर महात्म्यांचे आपल्यावर कृपाछत्र आहे, त्यांची कृपादृष्टी आहे, याचे समाधान अवर्णनीयच असते !
- श्रीमती मंगला शिवाजी पवार, फलटण.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

4 Sept 2020

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- १

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज पुण्यस्मरण सप्ताह
आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- १

फलटण येथील थोर सत्पुरुष प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हे विसाव्या शतकातील लोकोत्तर विभूतिमत्व होते. आपली 'ब्रह्मबैसका' कधीही न सुटलेले हे अवधूत अवलिया, सदैव त्याच ब्रह्मभावात विचरण करीत असत. त्यांची ती सहजसमाधी अवस्था कोणत्याही प्रसंगी आणि कोणत्याही स्थितीत कधीच भंगली नाही. त्यामुळे त्यांचे लौकिक व्यवहारही त्याच ब्रह्मानंदावस्थेत घडत असत. त्यांच्या काळातील ते नि:संशय अद्वितीय आणि विलक्षण असे सत्पुरुष होते यात काहीच शंका नाही ! 
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांवर, राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील अवधूत महात्मे, पुसेसावळी येथील सत्पुरुष सद्गुरु श्री श्रीकृष्णदेव महाराजांची पूर्णकृपा झालेली होती. इ.स.१९२० साली दैवी प्रेरणेने प.पू.श्री.काका आपल्या प्रथितयश लष्करीसेवेचा राजीनामा देऊन प.पू.सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांना शरण गेले. त्याच वर्षी त्यांच्यावर श्रीसद्गुरुकृपेचा वर्षाव झाला व ते अलौकिक आनंदात नाहून निघाले. यावर्षी त्या दिव्य घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणूनच प्रस्तुत पुण्यस्मरण सप्ताह आपण या "अनुग्रह शताब्दी वर्षा"चे औचित्य साधून विशेषत्वाने साजरा करणार आहोत. त्यानिमित्त आजवर कधीच प्रकाशात न आलेल्या प.पू.श्री.काकांच्या काही हृद्य आठवणी व भक्तांना आलेल्या दिव्य अनुभूती आपण या लेखमालेद्वारे जाणून घेऊ या. आजपासून ते भाद्रपद कृष्ण अष्टमी, दि.१० सप्टेंबर पर्यंत दररोज एकेका लेखामधून प.पू.श्री.काकांच्या अद्भुत अनुभूती उलगडल्या जातील. आपण सर्वांनी मनोभावे यांचा आनंदास्वाद घ्यावा व आपल्या सुहृदांनाही या पोस्ट पाठवून त्यांचा जास्तीतजास्त प्रसार करावा ही सादर विनंती.
- रोहन विजय उपळेकर

आठवणींचा सुखद परिमल - पुष्प- १

माझ्या माहेरी, फलटण येथील फणसे यांच्या घरावर प.पू.डॉ.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांची कृपा आहे. माझे वडील कै.श्री.विश्वनाथ फणसे हे खूपच धार्मिक होते व प.पू.श्री.गोविंदकाकांचे परमभक्त होते. त्यांच्यामुळे आम्ही घरातील सर्वजण प.पू.श्री.काकांचे भक्त होतो, आजही आहोत. प.पू.श्री.काका कधी कधी आमच्या घरी येत व झोपाळ्यावर बसून उंच झोका घेत. माझे वडील सांगत असत की, "पहिल्यांदा असे प.पू.श्री.काका एकदा घरी येऊन बसले व त्यांनी मोठा झोका घेतला, तेव्हापासूनच फणसे कुटुंबाचा उत्कर्ष झाला. त्या प्रसंगानंतरच आपल्या घरात श्रीमंती आली. ही नि:संशय प.पू.श्री.काकांचीच आपल्या घराण्यावरची कृपा आहे !"
माझे लग्नही प.पू.श्री.काकांनीच ठरवलेले आहे. मी तेव्हा सातवी मध्ये असेन, वय होते बारा वर्षे. मला पाहण्यासाठी कऱ्हाडहून कै.श्री.दत्तात्रेय मोटे आले होते. पाहुण्यांना घेऊन माझे वडील प.पू.काकांच्या दर्शनाला गेले. प.पू.श्री.काकांच्या 'श्रीगुरुकृपा' वास्तूतील हरिपाठाच्या खोलीत तेव्हा भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची गादी होती. दर्शन झाल्यावर प.पू.श्री.काकांनी गादीवरील एक पेढा घेतला व त्याचे दोन तुकडे केले. मग हात क्रॉस करून त्यातला अर्धा पेढा श्री.मोटे यांना दिला व अर्धा माझ्या वडिलांना दिला ; आणि "जावा" एवढेच शब्द त्यावेळी प.पू.श्री.काका बोलले. सोयरीक जमल्याचीच ही खूण होती व माझ्या वडिलांनी ती नीट लक्षात ठेवली होती.
पुढे एक वर्ष झाले तरी मोट्यांच्याकडून काही निरोप आला नाही. त्यावेळी माझ्यासाठी इतर ठिकाणच्या मागण्या येऊ लागल्या. माझे वडील पुण्याच्या एका स्थळाशी माझे लग्न करण्याचे ठरवत होते. पण संतांचा आशीर्वाद कधीच खोटा होत नाही, याचा अनुभव आम्हांला त्यावेळी आला. या बैठकीस जाण्यासाठी आमच्या दुसऱ्या पाहुण्यांना घ्यायला वडील गेले. तेव्हा ते म्हणाले, "थांबा, आपण कऱ्हाडला जाऊन आधी मोट्यांशी बोलू या." त्याप्रमाणे वडील व ते पाहुणे कऱ्हाडला गेले ; आणि माझे लग्न पुण्यात न ठरता मोटे यांचेकडेच ठरले. श्री.वसंतराव मोटे यांच्याशी मी वयाच्या तेराव्या वर्षी विवाहबद्ध झाले. अशाप्रकारे प.पू.श्री.काकांचा आशीर्वाद खरा ठरला व याचे सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले. आज मी वयाची पंचाहत्तरी पार केली आहे व प.पू.श्री.काकांच्याच आशीर्वादांनी माझा संसार सुख-समाधानात झालेला आहे.
लग्नानंतर मला बरेच दिवस मूल झाले नव्हते. माझे वडील प.पू.श्री.काकांना नेहमी विचारीत ; "काका, कधी होणार माझ्या मुलीला मूल ?" त्यावर प.पू.श्री.काका सांगत ; "काळजी करू नकोस, होणार आहे. थोडा धीर धर !" त्यानंतर पुढे दहा वर्षांनी मला मुलगा झाला. त्याला प.पू.श्री.काकांच्या पायावर ठेवले. बाळाला त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्यावेळी ते म्हणाले ; "याची दृष्ट काढत जा. हा घराण्याचे नाव काढेल !" आज त्यांचे शब्द खरे झालेले आहेत. त्याचवेळी ते मला म्हणाले होते की ; "तुला अजून एक मुलगी होईल !" हेही त्यांचे शब्द पुढे खरे ठरले.
माझे वडील प.पू.काकांच्या दर्शनाला रोज जात असत. एकेदिवशी त्यांनी लिहिलेल्या श्री ज्ञानेश्वरीची एक प्रत माझ्या वडिलांना दिली व सांगितले ; "विश्वनाथ, ही पोथी डोक्यावर घेऊन भगवान श्रीपांडुरंगांच्या पायाशी ठेव !" माझे वडील लगेच ती प्रत घेऊन पंढरपूरला श्रीपांडुरंग दर्शनाला गेले. नामदेव पायरीपासून ती प्रत डोक्यावर घेऊन ते चालू लागल्यावर, दोन्ही बाजूच्या  लोकांनी भराभरा बाजूला सरकून त्यांना  जागा करून दिली. ते सरळ श्रीभगवंतांच्या समोर जाऊन उभे राहिले व त्यांच्या पायी प्रेमादरपूर्वक दंडवत घालून त्यांनी ती प्रत चरणांवर अर्पण केली. प.पू.श्री.काकांच्या कृपेने त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष देवांचे दर्शन झाले, असे ते नेहमी सांगत असत. त्या प्रसंगानंतर अखेरपर्यंत ते एका एकादशीला पंढरपूरची व दुसऱ्या एकादशीला आळंदीची वारी करीत होते. 
आम्हां फणसे कुटुंबियांवर प.पू.श्री.काकांचा वरदहस्त सदैव होता व आजही आहे. माझ्या देवघरात प.पू.श्री.काकांचा फोटो नित्यपूजेत आहे. मी फलटणला गेल्यावर प.पू.श्री.काकांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय परत येत नाही. प.पू.श्री.काकांच्याच आशीर्वादांनी आम्हां दोघांना व मुलांना प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे यांच्याकडून दीक्षा लाभली. तसेच प.पू.सौ.ताई व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचे दर्शन, सहवास व सेवा लाभली व आजही लाभत आहे. आज या वयातही दररोजची साधना, उपासना व श्रीक्षेत्र दत्तधाम येथे दर्शन व सेवा नियमाने घडत आहे. हे सर्व नि:संशय प.पू.श्री.काकांच्याही आशीर्वादांचे सुफलित आहे, असे मी मनापासून मानते. प.पू.श्री.काकांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !
- श्रीमती शशिकला वसंतराव मोटे, पाटण.
शब्दांकन : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

17 Aug 2020

भक्तवत्सल भगवान श्रीबेणेश्वर महादेव



देवाधिदेव भगवान श्रीशिवशंकर हे 'आशुतोष' म्हणून प्रसिद्ध आहेत. कारण ते प्रार्थना केल्याक्षणी प्रसन्न होणारे आहेत. हा परमात्मा 'महाकाल' आहे, सकल चराचर व्यापून राहिलेला अाहे, दिसायला अतिशय उग्र, भयंकर आहे, प्राप्त होण्यासाठी अत्यंत दुर्मिळ मानलेला आहे ; पण भक्ताच्या अत्यल्पही भक्तीवर प्रसन्न मात्र 'तत्काल' होणारा आहे. भगवान आदिदेव श्रीमहाकालेश्वरांचे स्वरूप किती भीषण आहे पाहा. धूसर पांढुरक्या वर्णाच्या शरीरावर गजचर्म, व्याघ्रचर्म परिधान केलेले आहे, गळा कालकूटामुळे निळा झालेला आहे, पिंगट रंगाच्या जटा अस्ताव्यस्त सोडलेल्या आहेत, गळ्यात विषारी नागांची आभूषणे व नरमुंडमाला आहे, तिन्ही डोळ्यांतून क्रोधाच्या ज्वाला बाहेर पडत आहेत, तीक्ष्ण त्रिशूल हाती धरलेला आहे, भव्य नंदी शेजारी उभा आहे ; हे रूप केवढे भयंकर दिसत असेल ! पाहूनच भीती दाटणार आपल्या मनात. पण रूप कितीही भयंकर दिसत असले तरी या देवाधिदेवांच्या हृदयात मात्र करुणेची खळाळती अजस्र गंगाच अवतीर्ण झालेली आहे. त्यांची करुणाकृपा इतकी दिव्यपावन आहे की ती त्यांच्या ठायीच्या अपरंपार उग्रत्वालाही पुरून उरते. या अद्भुत कृपागंगेमुळेच तर ते आशुतोष म्हणून विख्यात आहेत !
भगवान श्रीविश्वनाथांनी आजवर असंख्य भक्तांची जगावेगळी व भयंकर परीक्षाही पाहिली आहे आणि त्या प्रसंगातील त्यांच्या अनन्यतेवर दिलखुलास प्रसन्न होऊन त्यांना जगावेगळे कृपादानही केलेले आहे. चिलया बाळ, उपमन्यू, उज्जैनचा गोपबालक, भक्तवर शबर-शबरी.. किती म्हणून उदाहरणे द्यावीत ? भगवान श्रीमहादेवांचे सारे काही अलौकिकच आहे ; त्यांचे वागणेही अलौकिक आणि त्यांचे देणेही अलौकिकच ! अशीच एक प्रत्यक्ष घडलेली हकिकत व जिथे घडली त्या अपरिचित पण जागृत शिवस्थानाचे माहात्म्य, आजच्या श्रावण मासातील शेवटच्या सोमवारी या लेखाद्वारे आपल्या समोर ठेवीत आहे.
२००७ साली प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्या पावन सान्निधात आम्हां तरुण मंडळींची द्वारका-सोमनाथ-गिरनार भक्तियात्रा संपन्न झाली होती. त्या यात्रेच्या दरम्यान भगवान श्रीसोमनाथांच्या दर्शनानंतर एका अद्भुत व अप्रसिद्ध शिवस्थानाच्याही दर्शनाचा सुयोग जुळून आला. दि.२१ फेब्रुवारी २००७ रोजी श्रीसोमनाथांच्या भव्यदिव्य शिवलिंगाचे दर्शन घेऊन व पूजा करून आम्ही दुपारी परत फिरलो. श्रीसोमनाथांच्या मंदिराजवळ प्रदूषण करणारी वाहने जाऊ देत नसल्याने, आमच्या मोठ्या गाड्या गावाबाहेर पार्किंगमध्ये लावलेल्या होत्या. गाडीचा ड्रायव्हर म्हणाला की, येथे जवळच एक सुंदर स्थान आहे, तिथे दर्शनाला जायचे का ? प.पू.श्री.दादांनी लगेच होकार दिल्याने आम्ही त्या पार्किंगच्या पिछाडीला साधारण एक-दीड कि.मी.वर असलेल्या, घनदाट वृक्षराजीने वेढलेल्या, अतिशय सुरम्य व शांत शिवमंदिराजवळ आलो. 
( https://rohanupalekar.blogspot.com )
जंगलातील त्या विलक्षण स्थानाला 'बेणेश्वर महादेव' म्हणतात. अगदीच अपरिचित असणाऱ्या या स्थानाची आख्यायिका मोठी अद्भुत आहे. श्रीसोमनाथ क्षेत्राच्या राजाची मुलगी या स्थानावर नित्य पूजेसाठी येत असे. यवनांच्या आक्रमणाच्या काळात, या शिवस्थानावर दर्शनासाठी आलेल्या त्या सुस्वरूप राजकन्येच्या पाठीमागे एकदा दुष्ट गझनीचे सैनिक लागले. त्यांची ती खराब नियत पाहून आणि पुढे वाढून ठेवलेल्या प्रसंगाचे गांभीर्य जाणून, त्या राजकन्येने भगवान श्रीआशुतोषांची कळवळून प्रार्थना केली आणि तेही अगदी नावाप्रमाणे तात्काळ प्रसन्न झाले. ते बेणेश्वर महादेवांचे प्रचंड शिवलिंग अचानक दुभंगले आणि त्या राजकन्येला आपल्यात सामावून घेऊन, पुन्हा सांधले गेले. त्या घडामोडीत राजकन्येची वेणी मात्र बाहेरच राहिली. आजही भगवंतांच्या भक्ताभिमानी भक्तरक्षक ब्रीदाची, त्यांच्या भक्तत्राण स्वभावाची प्रत्यक्ष साक्ष असणारी ती वेणी, शिवलिंगाच्या मागच्या बाजूला स्पष्ट दिसते. तसेच हे भव्य शिवलिंग खालच्या बाजूने भंगल्याची चीर व खड्डे देखील दिसतात. त्या राजकन्येला केवळ आपल्यात कायमचे सामावून घेऊन देव थांबले नाहीत, तर त्यावेळी शिवलिंगातून प्रचंड प्रमाणात भुंगे बाहेर पडले व त्या महादुष्ट सैनिकांच्या मागे लागले. त्या भुंग्यांनी त्यांना अक्षरश: पळवून लावले व ते सर्व भुंगे पुन्हा त्या शिवलिंगातच प्रविष्ट झाले. त्या घटनेची खूण म्हणून तयार झालेली काही छिद्रे देखील त्या शिवलिंगाच्या खालच्या बाजूला आजही स्पष्ट दिसतात.
भगवान श्रीचंद्रशेखरांच्या अद्भुत लीलेची ही प्रासादिक आख्यायिका ऐकून, भारावलेल्या मनाने आम्ही त्या नित्यजागृत श्रीबेणेश्वर महादेवांचे दर्शन घेतले. जवळपास तीन फुटांचा व्यास व चार फूट उंची असलेले ते भव्य शिवलिंग पाहून सर्वांच्या डोळ्यांत पाणीच आले. प.पू.श्री.शिरीषदादा देखील या स्थानाचे दर्शन घेऊन अतिशय आनंदित झाले होते.  त्यांना श्रीभगवंतांच्या या अपरिमित भक्तवात्सल्याच्या दर्शनाने भरून आले होते. भगवान श्रीशिवप्रभूंचे हे किती मंगलमय, करुणामय लीलानाटक आहे ना ! 
भगवान श्री ज्ञानेश्वर माउली श्रीभगवंतांच्या भक्तप्रेमाविषयी, भक्तवात्सल्याविषयी सांगताना म्हणतात ; 
पैं रंक एक आडलेपणें ।
काकुळती धांव गा धांव म्हणे ।
तरी तयाचिये ग्लानी धांवणें ।
काय न घडे मज ॥१२८॥
तिहीं जे वेळीं मी स्मरावा ।
ते वेळीं स्मरिला कीं पावावा ।
तो आभारही जीवा ।
साहवेचि ना ॥ज्ञाने.८.१४.१३०॥
श्रीभगवंतांच्या कुसुमकोमल हृदयात आपल्या अनन्य भक्तांविषयी एवढा अपार प्रेमभाव असतो की, त्या भक्तांनी स्मरण केल्याक्षणी ते धावत जाऊन तेथे प्रकट होतात, त्या भक्तांचे संरक्षण करतात, त्यांची मनोभावे सेवा करतात. भक्तच कशाला, एखादा संकटात पडलेला भक्तिहीन गरीब माणूस काकुळतीला येऊन, कळवळून प्रार्थना करू लागला, तरीही हे दयाळू भगवंत तातडीने त्याच्यासाठी धावून जातात व त्याची त्या संकटातून सोडवणूक करतात. कारण त्यांच्या मनात आपपर भावच नसतो. भगवान श्रीबेणेश्वर महादेवांची ही भक्तत्राण-लीला श्री माउलींच्या या ओव्यांचे जणू प्रात्यक्षिकच आहे असे म्हणायला हवे.
भगवान श्रीसोमनाथांच्या दर्शनाला कधी गेलात, तर आवर्जून या श्रीबेणेश्वर महादेवांचेही दर्शन घेऊन या बरं का !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

14 Aug 2020

सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज



नमस्कार ! 

आज श्रावण कृष्ण दशमी, राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम, प.पू.सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची १२० वी पुण्यतिथी ! 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावी राहणाऱ्या वे.मू.श्री.अप्पा जोशी व सौ.अन्नपूर्णाबाई या सत्शील दांपत्याच्या पोटी, त्यांच्या अपार दत्तसेवेचे फळ म्हणून, दि. ७ फेब्रुवारी १८३६, माघ कृष्ण पंचमीला श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचा जन्म झाला. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी बालपणीपासूनच अलौकिक लीला करीत असत. 

तरुणपणी ते सद्गुरुभेटीच्या ओढीने अक्कलकोटला गेले. इकडे राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज सारखे, "माझा कृष्णा येणार !" असे म्हणत खुशीत होते. श्रीकृष्ण स्वामी वेशीजवळ पोचले नाहीत तोवरच स्वामी महाराज मठातून घाईने निघाले. वाटेत भेटलेल्या लहानग्या श्रीकृष्णाचा हात धरून ते जवळच्या जंगलात घुसले. तब्बल सात दिवसांनी हे दोघे गुरु-शिष्य परत आले. त्यानंतर श्रीगुरु स्वामी महाराजांच्या आज्ञेने श्रीकृष्ण सरस्वती स्वामी पुढील कार्यासाठी कोल्हापूरला आले. 

श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या लीला अद्भुत आहेत. ते बालोन्मत्तपिशाचवत् राहात असत. ते कुंभार गल्ली मध्ये राहात असत, म्हणून त्यांना "कुंभारस्वामी" असेही म्हटले जाते. त्यांनी श्रावण कृष्ण दशमी, दि.१९ ऑगस्ट १९०० रोजी महासमाधी घेतली. स्वामी ज्या ठिकाणी राहात असत, त्या "वैराग्य मठी" मध्येच त्यांची समाधी बांधण्यात आली. 

श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या भक्तांनी त्यांच्याच दृष्टांतानुसार आणखी एक मठ गंगावेशीपाशी बांधला, त्याला "निजबोध मठी" म्हणतात. तेथे श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आलेला आहे.

आमच्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या श्रीगुरुपरंपरेचे, श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजच प्रथम श्रीगुरु आहेत. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज - प.पू.श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज, कोल्हापूर - प.पू.धोंडीबुवा महाराज, पलूस - प.पू.श्रीकृष्णदेव महाराज, पुसेसावळी - प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज, फलटण - प.पू.श्री.बागोबा कुकडे महाराज, दौंड ; अशी ही थोर सद्गुरुपरंपरा आहे. 

सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांचे विस्तृत चरित्र www.shri-datta-swami.net या साईटवर उपलब्ध आहे. त्याचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा. 

मी आज आम्हांलाच आलेला सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांचा एक सुंदर अनुभव सांगतो. २००८ साली आम्ही काही मित्रमंडळी दोन गाड्या घेऊन प.पू.श्री.गोविंदकाकांच्या गुरुपरंपरेतील दोन महात्म्यांच्या स्थानी दर्शनाला गेलो होतो. फलटणहून पू.काकांच्या समाधीचे दर्शन घेऊन आधी पुसेसावळी येथे गेलो. तिथे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांच्या समाधीची पूजा करून काही उपासना केली व तिथून पलूस येथे सद्गुरु श्री.धोंडीबुवा महाराजांच्या स्थानी गेलो. त्यावर्षी पू.धोंडीबुवांच्या समाधीचे शताब्दी वर्ष होते. त्यांच्या समाधिस्थानी मनोभावे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण पुढे श्रीक्षेत्र औदुंबर येथे गेलो.

श्रीकृष्णामाईला वंदन करून भगवान श्रीदत्तप्रभूंच्या विमलपादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्यासमोर बसून उपासना केली. दुपार झालेली असल्याचे पोटातील कावळे आठवण करून देऊ लागले होतेच. मग कृष्णामाईच्या काठावरील घनदाट औदुंबर वनात बसून आम्ही जेवायची तयारी करू लागलो. त्यावेळी मी माझा मित्राशी सहज बोललो की, "अरे सचिन, आपल्याला दोन श्रीसद्गुरूंच्या स्थानाचे दर्शन झाले. इथून खरंतर कोल्हापूर काही फार लांब नाही, पण तेवढा वेळ हाती नसल्यामुळे आपण कोल्हापूरला जाऊन सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचे दर्शन काही घेऊ शकणार नाही याचे वाईट वाटते रे !" असे म्हणून मी सहज मागे वळलो आणि आश्चर्याने चकितच झालो. वळून बघतो तर माझ्या मागच्या औदुंबर वृक्षाखाली बांधलेल्या सिंमेटच्या पारावर आमच्याकडे तोंड करूनच, सद्गुरु श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचा एक छोटासा पण सुंदर फोटो ठेवलेला होता. तिथे जवळपास आम्ही अर्धातास तरी वावरत होतो, पण तेवढ्या वेळात आमच्यापैकी कोणाचेही त्या फोटोकडे लक्ष गेलेले नव्हते. किंबहुना तेथे फोटो नव्हताच तो आधी. आमचा विषय व्हायला आणि त्याक्षणी तो फोटो तिथे दिसायला एकच गाठ पडली. मी धावत जाऊन त्या फोटोला कृतज्ञतेने नमस्कार केला व तो प्रसाद-फोटो उचलून आणला. सगळ्यांना ही घटना सांगितली. सर्वच लोकांना अतिशय आनंद वाटला. या त्यांच्या अनोख्या लीलेतून सद्गुरु श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या 'स्मर्तृगामी' ब्रीदाचे अद्भुत दर्शनच तर आम्हां सर्वांना अत्यंत करुणेने करविले होते. आम्हां प.पू.श्री.गोविंदकाकांच्या लेकरांवरची त्यांची ही कृपा पाहून खरंच डोळे भरून आले. श्रीगुरुपरंपरेतील हे अवतारी महात्मे आजही आपल्यासारख्यांवर कृपादृष्टी ठेवून आहेतच, यात तिळमात्र शंका नाही. आपण मनोभावे व प्रेमाने स्मरण करायचाच अवकाश ; त्यांची कृपागंगा प्रवाहित होतेच होते ! 

राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांच्या अम्लान श्रीचरणीं १२० व्या पुण्यतिथी निमित्त सादर दंडवत प्रणाम ! 

श्रीकृष्णसरस्वती दत्ता जय जय कृष्णसरस्वती दत्ता ।

श्रीसमर्था जय गुरुदत्ता अनाथांच्या नाथा ।।

लेखक - रोहन विजय उपळेकर

भ्रमणभाष - 8888904481


25 Jul 2020

श्रीसंत दासराम महाराज केळकर पुण्यतिथी



आज दि.२५ जुलै, श्रावण शुद्ध षष्ठी ; याच तिथी आणि तारखेला एकोणीस वर्षांपूर्वी सांगली येथील थोर अधिकारी महात्मे, चिमड संप्रदायातील ज्ञानी सत्पुरुष प.पू.श्री.रामराय गोविंद तथा प.पू.श्री.दासराम महाराज केळकर यांनी आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली. त्याही दिवशी सूर्योदयाला नागपंचमी असून संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी, त्यांच्या देहत्यागसमयी षष्ठी लागलेली होती. आज त्यांच्या एकोणिसाव्या पुण्यतिथीला तेच सर्व योग जुळून आलेले आहेत. शिवाय अजून एक विशेष योग म्हणजे, यंदाचे वर्ष हे श्रीसंत दासराम महाराजांचे जन्मशताब्दीचे वर्ष आहे.
श्रीसंत दासराम महाराजांच्या 'चैतन्याचा महामेरू' या जन्मशताब्दी गौरवग्रंथातील 'तत्त्वार्थींचा देखणा पायाळू' या आपल्या सर्वांगसुंदर लेखात, श्रीसंत दासराम महाराजांचा गौरव करताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "वेळोवेळी घडून आलेल्या सर्व दर्शनभेटींमधून प.पू.श्री.दादांचे संतत्व, चित्तावर नि:संशयपणे वज्रलेपासारखे ठसत गेले. त्या सर्व मंगलस्मृतींनी आजही सात्त्विक भाव अंत:करणात दाटून येतात. प.पू.श्री.दादांचे सारे व्यक्तिमत्व हे शास्त्रोक्त 'संतपदवी'चेच एक मूर्तिमंत उदाहरण होते. ते उत्तम कवी, लेखक, वक्ते होते. अनेक सद्गुण त्यांच्या ठायी दाटीवाटीने वस्तीला राहिलेले होते. आत्यंतिक साधेपणा, आत्यंतिक विनम्रता आणि अपार सद्गुरुप्रेम, भगवत्प्रेम यांनी ते नखशिखांत विनटलेले असत. त्यांचा सहवास भाविकाला शांत, तृप्त करून सोडणारा असे ; मग भले ते त्याच्याशी काही बोलोत अगर न बोलोत. त्यांची दृष्टी नेहमी अंतर्मुख असे. देहाच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव नसे. आपल्याच आनंदात ते जेव्हा मधूनच हसत, तेव्हा त्या हास्यातूनही त्यांच्या अंत:करणातील  भगवत्प्रेम बाहेर पाझरत असे. त्यांची सगळी देहबोलीच ज्ञानी भगवद्भक्ताची होती. खरोखरीच असे महात्मे दुर्मिळ ; हल्ली तर दृष्टीस पडणेही कठीण !
प.पू.श्री.दादांनी आयुष्यभर सर्वभावे सद्गुरुसेवा केली. त्याचबरोबर निष्ठापूर्वक सद्गुरुप्रदत्त साधनाही केली. त्यामुळे श्रीमहाभारतात म्हटल्याप्रमाणे 'ज्ञान' आणि 'शांती' या दोहोंची सहजप्राप्ती त्यांना झालेली होती.  प.पू.श्री.दादा महाराजांनी सद्गुरुआज्ञेनुसार सांगली नगरीत ज्ञानगंगा अखंड प्रवाहित ठेवून या नगरीला पुण्यभूमी केलेले आहे. अनेक श्रांतांना, क्लांतांना प्रेमाचा आधार देऊन शांतविले आहे. आपल्या अखंड, सप्रेम कीर्तनसेवेने सद्गुरुपरंपरेला व श्रीभगवंतांना तोषविले आहे. प.पू.श्री.दादा हे आधुनिक काळातील ज्ञानोत्तर भक्तीचे श्रेष्ठ, सर्वज्ञ, सामर्थ्यसंपन्न असे आचार्यच होते !"
सांगलीच्या केळकर घराण्यात पूर्वापार भगवद्भक्तीचा आणि संतसेवेचा उत्तम वसा जोपासलेला आहे. पू.श्री.दासराम महाराजांचे आजोबा श्री.अंताजीपंत केळकर परमशिवभक्त होते. त्यांना श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी प्रसाद म्हणून दिलेला रुपया आजही केळकरांच्या देवघरात पूजिला जातो. तर आजी सौ.लक्ष्मीबाई केळकर या श्रीसंत ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अनुगृहीत होत्या. पू.श्री.दासराम महाराजांचे वडील, पू.श्री.गोविंदराव तथा पू.मामामहाराज केळकर हे चिमड संप्रदायातील आदरणीय सत्पुरुष होते. सांगलीतील श्रीसंत तात्यासाहेब कोटणीस महाराजांकडील अखंड कीर्तनसेवेने प्रभावीत होऊन, पू.श्री.मामा केळकरांनीही १९२४ साली अखंड कीर्तनसेवेचा वसा घेतला. ईशकृपेने तो आज ९५ वर्षे झाली केळकरांच्या तीन पिढ्यांनी अव्याहत चालू ठेवलेला आहे. 
पू.श्री.मामा महाराज केळकर व पू.सौ.इंदिराबाई या दांपत्याच्या पोटी अधिक श्रावण कृष्ण षष्ठी, दि.६ ऑगस्ट १९२० रोजी कुरुंडवाड मुक्कामी पू.श्री.दासराम महाराजांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या चौदाव्या दिवशी श्रीसंत तात्यासाहेब कोटणीस महाराजांनी मांडीवर घेऊन या लहानग्या बाळाच्या मस्तकावर हस्तस्पर्श करून आपल्या कृपेची छाया घातली. "हा बाळ आमचाच असून लहानपणापासूनच कीर्तन करील. याचे नाव 'राम' ठेवा !" असा आशीर्वादही बाळाला मिळाला. 
लहानग्या रामरायाची दिव्य लक्षणे सर्वांना लवकरच पाहायला मिळाली. वयाच्या पाचव्या वर्षापासून रामराया कीर्तनसेवा करू लागले. सातव्या वर्षी त्यांना काव्यस्फूर्ती होऊ लागली. नवव्या वर्षी 'रामदासबोध' नावाचा १३ समास व १६९ ओव्यांचा लघुग्रंथ त्यांच्याकडून निर्माण झाला. पुढे मग आयुष्यात त्यांच्याकडून असंख्य आरत्या, संतचरित्रे, पदे व अभंग रचले गेले. 'श्रीदासराम गाथा' या ग्रंथात अशा विविध प्रसंगी त्यांच्याकडून रचल्या गेलेल्या १९५२ रचना प्रकाशित झाल्या आहेत. याशिवाय अनेक ओवीबद्ध ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.
पू.श्री.दासराम महाराजांच्या बालपणीचा एक प्रसंग फारच बोलका आहे. लहानगा रामराया आपल्या वडिलांना एकदा म्हणाला की, "मला रामरायाचे दर्शन घडवा !" पू.श्री.मामा महाराज म्हणाले, "येत्या शनिवारी रामदर्शन घडेल !" हे ऐकल्यावर रामराया एकदम खूश झाला व त्याने 'रामप्रभू येणार' म्हणून सगळे घर सजवायला घेतले. शनिवारी एक वानर दारात आले. त्याला पाहून पू.मामा म्हणाले, "वानरसेना आली, आता रामराया पण येणार". आणि खरोखर पू.श्री.मामामहाराजांनी बाल रामरायाला आकाशात श्रीरामदर्शन करविले. आपल्या वडिलांच्या शब्दावर विश्वासून बाल रामरायाने श्रीरामदर्शनाच्या उत्कंठेने सगळी तयारी सुद्धा केली होती. मग श्रीरामप्रभू का बरे मागे राहतील ? निष्ठेचे फळ त्यांनीही मग प्रेमाने प्रदान केले. संत हे असे सुरुवातीपासूनच अलौकिक असतात.
पू.श्री.दासराम महाराजांवर भगवान श्री निंबरगीकर महाराजांचा विशेष कृपालोभ होता. श्रीगुरुलिंगजंगम निंबरगी महाराजांनी विविध प्रसंगी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन ; कानडी, संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषेतील अभंग, आरत्या, श्लोक तसेच पदे अशा माध्यमातून बोध केला होता. ही सर्व पदे श्री.दासराम महाराजांना 'श्रुत' झाली, म्हणजे ऐकावयास मिळाली. १९८५ पर्यंत ह्या पदांची एकूण संख्या २२८ एवढी झाली. ती सर्व पदे 'श्रीगुरुलिंगगीता' या नावाने प्रकाशित झालेली आहेत. निंबरगी संप्रदायाच्या मूल तत्त्वज्ञानचे समग्र दर्शन त्यातून होते.
पू.श्री.दासराम महाराजांना सगळे 'दादा' म्हणत असत. त्यांच्या स्वभावात अपार मार्दव होते, ते कधीच कोणावर चिडत नसत. सदैव आपल्याच आनंदात रममाण होऊन राहात असत. ते पूर्ण निरहंकार महात्मे होते. त्यांच्याठायी अनन्य गुरुभक्ती आणि अलौकिक नम्रता पूर्ण पैसावलेली होती. त्यांना संतसेवेची फार आवडी होती. त्यांच्या 'श्रीरामनिकेतन' या वास्तूत कोणी साधुसंत आले की ते स्वत: प्रेमार्द्र होऊन, "साधु गृहाप्रति आले । भले सार्थक झाले ॥" हा अभंग म्हणून त्यांचे स्वागत करीत असत. 
आमच्या प.पू.श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे व प.पू.श्री.दासराम महाराजांचे अगदी सख्ख्या बंधूंसारखे प्रेमसंबंध होते. पू.श्री.मामा सांगलीला जाणाऱ्या आपल्या शिष्यांना आवर्जून पू.श्री.दासराम महाराजांचे दर्शन घेऊन यायला सांगत असत. तसेच पू.श्री.दासराम महाराजही आपल्या शिष्यांना पुण्याला पू.श्री.मामांकडे पाठवीत असत. पू.श्री.दासराम महाराजांनी पू.श्री.मामांवर रचलेली "आरती श्रीपादा, जयजया प्रसिद्धा । दत्तप्रभू जन्म घेती, नवल हे बहुसिद्धा ॥" ही सुंदर आरती आमच्या श्रीपाद सेवा मंडळाच्या 'नित्यउपासनाक्रमा'त समाविष्ट केलेली आहे.
माझे पणजोबा, प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांबद्दलही पू.श्री.दासराम महाराजांना फार प्रेमादराची भावना होती. मी १९९७ साली सांगलीला पू.श्री.दासराम महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. तेव्हा पू.श्री.गोविंदकाकांचा पणतू म्हणून त्यांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून मला भरभरून आशीर्वाद दिले होते. त्यावेळी गहिवरून येऊन, अतीव प्रेमादराने ते प.पू.श्री.काकांविषयी दोन शब्द बोललेही होते.
पू.श्री.दासराम महाराजांचे पन्नासच्या वर प्रकाशित झालेले ग्रंथ सांगलीच्या त्यांच्या निवासस्थानी उपलब्ध आहेत. www.dasram.org या संकेतस्थळावर त्यातले काही ग्रंथ आपण पाहू शकता. आत्मानुभूतीचा प्रसन्न आविष्कार असणारे हे सर्व ग्रंथ साधकांना परमार्थाचे मौलिक मार्गदर्शन करणारे दीपस्तंभच आहेत. 
दि.२५ जुलै २००१, श्रावण शुद्ध षष्ठीला सायंकाळी पू.श्री.दासराम महाराजांनी कृतार्थतेने आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली. घेतलेला कीर्तनसेवेचा वसा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मनापासून सांभाळला. आजही सांगलीच्या गांवभागातील 'श्रीराम निकेतन' या पवित्र वास्तूच्या कणाकणात त्यांचे चिन्मय अस्तित्व भरून राहिलेले आहे, भाविक-भक्तांना आपला अमोघ कृपाप्रसाद प्रेमाने प्रदान करीत आहे. 
ज्ञानोत्तरभक्तीचे थोर आचार्य असणाऱ्या श्रीसंत रामराय गोविंद तथा प.पू.श्री.दासराम महाराज केळकर यांच्या पावन श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग प्रणिपात.
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

4 Jul 2020

वै.ह.भ.प.पू.सोनोपंत तथा पू.मामासाहेब दांडेकर - पुण्यस्मरण



वारकरी संप्रदायातील अत्यंत आदरणीय व थोर विभूतिमत्व प्राचार्य श्री.शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर हे वारकरी मंडळींमध्ये सोनुमामा म्हणूनच जास्त प्रसिद्ध होते. अत्यंत नेटका वेष, तेवढीच मार्मिक व नेटकी भाषा आणि शुद्ध सात्त्विकतेने प्रफुल्लित झालेला चेहेरा ही पू.मामासाहेबांची वैशिष्ट्ये होत. ते कीर्तनाला उभे राहिले की साक्षात् श्री तुकोबारायच कीर्तन करीत अाहेत असा भास होत असे. 
पू.सोनुमामांचा जन्म २० एप्रिल १८९६ चा. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या नू.म.वि. मधून झाले. ते १९१७ साली बी.ए. व १९१९ साली तत्त्वज्ञान विषय घेऊन एम.ए. झाले. त्यांचे श्रीगुरु पू.विष्णुबुवा जोग महाराजांनी १९१७ साली आळंदीत वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. पू.सोनुमामा तेथील विद्यार्थ्यांना शिकवू लागले. तसेच न्यू पूना कॉलेज अर्थात् सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ते प्रोफेसर म्हणून रुजू झाले. स.प.चे प्राचार्य म्हणून १९५१ साली ते निवृत्त झाले.
वै.जोग महाराजांनी देहत्यागापूर्वी आपल्या शिष्यांना विचारले की, "माझ्या गळ्यातील नैष्ठिक ब्रह्मचाऱ्याची तुळशीमाळ कोण पुढे चालवणार ?" क्षणाचाही विलंब न लावता अवघ्या बावीस-तेवीस वर्षांच्या सोनोपंतांनी आदरपूर्वक आपले मस्तक समोर झुकवले व ती पावन माळ धारण केली. आणि आपल्या गुरूंना दिलेल्या शब्दाला जागून आजन्म नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन केले.
वै.पू.मामासाहेब दांडेकर हे पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. ते एक रुपयाही बिदागी न घेता सर्वत्र कीर्तन-प्रवचनसेवा करीत असत. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांची सार्थ ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीची सुदीर्घ प्रस्तावना आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास हे खूप मान्यता पावलेले ग्रंथ आहेत. स.के.नेऊरगावकर यांनी लिहिलेले पू.मामासाहेबांचे चरित्र अतिशय सुंदर आहे. आजच्याच तिथीला ; आषाढ कृष्ण चतुर्दशीला ; दि.९ जुलै १९६८ रोजी पू.मामासाहेब दांडेकरांनी पुण्यात देहत्याग केला. असे म्हणतात ; त्यांची अंत्ययात्रा एवढी मोठी होती की, त्यांचे पार्थिव आळंदीत पोचले तेव्हा त्या यात्रेतले शेवटचे लोक अजून पुण्यातच होते. यावरून त्यांना लाभलेला जनमानसाचा प्रचंड आदर व आधार स्पष्ट दिसून येतो.
वै.पू.मामासाहेब दांडेकरांच्या देहत्यागाचा प्रसंग त्यांच्या चरित्रात नोंदवलेला आहे. पुण्यातील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.यशवंतराव फाटक यांच्या दवाखान्यात त्यांचे देहावसान झाले. त्या प्रसंगाच्या एक साक्षीदार होत्या विश्वविख्यात संत प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे. पू.सौ.ताईंच्याच श्रीमुखातून वै.मामासाहेब दांडेकरांच्या देहत्यागाचा विलक्षण प्रसंग आम्हांला ऐकायला मिळाला होता, तो आजच्या त्यांच्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर आपल्याला कथन करीत आहे.
प.पू.सौ.ताई सांगत असत तो प्रसंग वै.मामांच्या चरित्रात नोंदलेला नाही. कारण प्रत्यक्षात तो प्रसंग सूक्ष्म प्रतलावर, अलौकिक स्तरावर घडलेला होता. त्यामुळे तो आपल्यासारख्या सामान्यांच्या चर्मचक्षूंना दिसण्याचा प्रश्नच येत नाही.
( https://rohanupalekar.blogsopt.com )
तेव्हा पू.वै.मामासाहेब डॉ.फाटकांच्या दवाखान्यात अॅडमिट होते. पू.सौ.शकाताईंचा लहानपणापासूनच डॉ.फाटकांशी खूप घरोबा होता. ते त्यांचे फॅमिली डॉक्टर होतेच. पुढे त्यांचे नातेही निर्माण झाले, कारण डॉ.फाटकांची धाकटी कन्या पू.सौ.ताईंच्या धाकट्या भावाची पत्नी झाली. वै.मामासाहेब अॅडमिट असताना ९ जुलैच्या सकाळी डॉ.फाटक तथा दादा पू.सौ.ताईंना म्हणाले की, "मी जरा हॉस्पिटलमध्ये राऊंडला जाऊन येतो, तोवर तू या खोलीच्या बाहेर थांब. कोणाला आत जाऊ देऊ नकोस. पू.मामासाहेब आत विश्रांती घेत आहेत !" पू.सौ.ताई 'ठीक आहे दादा' म्हणून तिथेच एका स्टुलावर बसून राहिल्या. 
थोड्याच वेळात एक खेडवळ दिसणारे पण अत्यंत तेजस्वी असे गृहस्थ जिना चढून आले व सरळ त्या खोलीत जाऊ लागले. पू.सौ.ताईंनी त्यांना अडविले व सांगितले की, आत कोणालाही सोडायचे नाही अशी डॉक्टरांची ताकीद आहे. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, "आम्हांला कधीपासून कोणाच्या परवानगीची गरज पडू लागली ?" त्यांच्या या उत्तराने चमकून पू.सौ.ताईंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि त्या एकदम आश्चर्यचकितच झाल्या. कारण ते प्रत्यक्ष भगवान श्रीपांडुरंग होते. पू.सौ.ताईंवर श्रीभगवंतांची जन्मापासूनच पूर्णकृपा असल्याने, त्यांना श्रीभगवंतांचे सतत प्रत्यक्ष दर्शन व संवाद होत असे. 
एवढे होईपर्यंत श्रीभगवंत खोलीचे दार उघडून आत गेले व त्यांनी दार लावून घेतले. पू.सौ.ताईंना आत काय घडतंय याची फारच उत्सुकता लागून राहिली होती. त्यांच्या मनाची ती घालमेल जाणून श्रीभगवंत त्यांना हळूच म्हणाले, "तुम्ही खिडकीतून पाहा हवे तर !" पू.सौ.ताईंना खूप आनंद झाला. 
श्रीभगवंत आत गेले आणि पू.मामांच्या कॉटपाशी जाऊन उभे राहिले. समोर शांतपणे डोळे मिटून झोपलेल्या वै.पू.मामासाहेबांकडे त्यांनी वात्सल्यपूर्ण नजरेने पाहिले व त्यांच्या गालांवरून प्रेमाने दोन्ही हात फिरवीत म्हणाले, "सोन्या, ऊठ, मी आलोय !" त्या स्पर्शाने आणि मधुर हाकेने पू.मामासाहेब एकदम जागे झाले आणि समोर प्रत्यक्ष आनंदकंद भगवान श्रीपांडुरंगांना पाहून त्यांना अनावर प्रेम दाटून आले. कसेबसे हात जोडून ते म्हणाले, "पांडुरंगा, देवा ! आलास. मी वाटच पाहात होतो तुझी." यावर गोड हसत देव म्हणाले, "होय, आलो बघ. चल आता, आपल्याला जायचंय !" त्यावर भारलेल्या मनाने पू.मामासाहेबांनी होकार दिला ; आणि त्याक्षणी त्यांच्या कुडीतून प्राण बाहेर पडले व श्रीभगवंतांमध्ये विलीन झाले. प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथ आपल्या लाडक्या भक्ताला न्यायला आले होते. केवढे परमभाग्य हे !! जन्मभर केलेल्या निरलस सेवेचा हा अत्यंत अलौकिक महाप्रसादच साक्षात् श्रीभगवंतांनी स्वत: येऊन वै.पू.मामासाहेब दांडेकरांना दिला होता. अक्षरश: सार्थक झाले त्यांच्या आयुष्याचे !
प.पू.सौ.शकाताई हा प्रसंग फार प्रेमाने सांगत असत. त्यांनी वै.पू.मामांची कीर्तने देखील ऐकलेली होती. त्या म्हणत की, "वै.सोनुमामा कीर्तनाला उभे राहिले की प्रत्यक्ष श्री नामदेवराय किंवा श्री तुकोबारायच कीर्तन करीत आहेत, असेच वाटत राहायचे." 
ज्यांना शेवटी न्यायला प्रत्यक्ष श्रीपंढरीनाथ भगवान आले, त्या वारकरी संप्रदायातील या अत्यंत थोर विभूतीच्या, वै.पू.मामासाहेब दांडेकर महाराजांच्या श्रीचरणीं ५२ व्या पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग दंडवत !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

22 Jun 2020

पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज


आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, पंचम श्रीदत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये ) स्वामी महाराजांची १०६ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक साष्टांग दंडवत !!
चमत्कारानेही आश्चर्यचकित व्हावे इतके अद्भुत आणि दैवी चरित्र आहे प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे. विलक्षण शब्दही थिटा पडतो त्यांच्या लीला ऐकताना-वाचताना. खरोखर त्यांचे चरित्र डोळसपणे अभ्यासले की, प.प.श्रीस्वामी महाराज हे अक्षरश: 'युगावतार' होते, याबाबत आपल्या मनात तिळमात्रही शंकाच उरत नाही. प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेय प्रभूच त्यांच्या रूपाने अलौकिक लीला साकारत होते व आजही साकारत आहेत. प.प.श्री.थोरल्या महाराजांचे वाङ्मय हाही दैवी महाप्रसादच म्हणायला हवा. सद्गुरु श्री माउलींच्या शब्दांत सांगायचे तर ते 'ब्रह्मरसाचे परगुणे'च आहे आणि तुम्हां-आम्हां जडमूढ जीवांच्या हमखास उद्धारासाठी त्यांनी ते मुक्तहस्ते वितरित केले आहे. यापरता आणखी काय मोठा उपकार म्हणावा ?
प.प.श्रीस्वामी महाराजांच्या अत्यंत सुप्रसिद्ध अशा 'करुणात्रिपदी' रचनेचा भावार्थ खालील लिंक वरील लेखात मांडलेला आहे. ही रचना गेली शंभर वर्षे अगणित भक्तांसाठी तारक ठरलेली आहे आणि उद्याही ठरणार आहे. कारण करुणात्रिपदी ही परमकरुणावरुणालय भगवान श्रीदत्तप्रभूंच्या करुणाकृपेचा प्रसाद करविणारीच आहे. त्या करुणात्रिपदीचा भावार्थ जाणून घेऊन आपण ती म्हणत गेलो, तर आपल्याला अधिक आनंद तर मिळेलच, शिवाय आपला भक्ति-प्रेमभावही वृद्धिंगत होईल. म्हणूनच, आजच्या पावन दिनी खालील लिंकवरील लेख आवर्जून वाचावा ही प्रार्थना !
त्याच लेखात, श्रीस्वामी महाराजांच्या चरित्रकथांवर प्रकाश टाकणाऱ्या आणि 'करुणात्रिपदीची जन्मकथा' सांगणाऱ्या अशा आणखी दोन लेखांच्या लिंक्स आहेत, त्याही वेळात वेळ काढून वाचाव्यात ही मनापासून विनंती आहे. कारण करुणात्रिपदीची निर्मिती कशी झाली हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा "मंदिरात दोष पाहू नयेत"* या नावाचा एक अत्यंत भंपक व खोटा लेख गेली काही वर्षे सोशल मिडियावर फिरतो आहे. त्यातील सर्व मुद्दे पूर्णत: खोटे व खोडसाळपणेच लिहिलेले आहेत. असा काही प्रसंग कधी घडलेलाच नाहीये प.प.श्रीस्वामी महाराजांच्या आयुष्यात. त्यामुळे करुणात्रिपदीची खरी जन्मकथा समजून घेण्यासाठी आणि श्रीस्वामी महाराजांच्या दिव्य चरित्राचे परिशीलन करण्यासाठी, खालील लिंकवरील तिन्ही लेख आवर्जून वाचावेत ही माझी सर्वांना प्रेमळ विनंती आहे.
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
भावार्थ करुणात्रिपदीचा
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा ।
वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा ॥

1 Jun 2020

त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पांडुसुता


 
आज गंगा दशहरा ! 
भगवती श्रीगंगेच्या अवतरणाचा दिवस. आजच्याच पावन तिथीला हस्त नक्षत्र, व्यतिपात योग, मंगळवार अशा योगावर माध्यान्ही भगवती श्रीगंगेचे पृथ्वीतलावर अवतरण झाले होते. म्हणून ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून आज दशमी पर्यंत "गंगा दशहरा" महोत्सव साजरा करून, आजच्या दिवशी गंगास्नान करून गंगापूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. गंगा दशहराच्या दहा दिवसांमध्ये गंगेचे स्नान, स्मरण, पूजन, वंदन आणि स्तुती केल्याने; चोरी, हिंसा व परदारागमन ही तीन कायिक (शारीरिक) ; कठोर बोलणे, खोटे बोलणे, चहाड्या करणे व असंबद्ध बडबडणे ही चार वाचिक ; आणि दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगणे, दुसऱ्याचे अनिष्ट चिंतणे व खोटा अभिनिवेश धरणे ही तीन मानसिक मिळून एकूण दहा प्रकारांची सर्व पापे नष्ट होतात. म्हणूनच श्रीगंगेला 'दश-हरा' अर्थात् दहा गोष्टी (पापे) हरण करणारी, असेही म्हणतात. तसेच या ज्येष्ठ शुद्ध दशमीलाही त्यामुळे 'दशहरा'च म्हणतात. 
भगवती श्रीगंगेच्या स्नान, दर्शन, स्मरण, वंदन, पूजन, तीर्थपान आणि स्तवन या सात प्रकारच्या उपासनेने सुख-समाधान तर लाभतेच; पण दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. यास्तव भगवान श्री माउली म्हणतात, 
जोडे अमृताची सुरसरी ।
तैं प्राणांतें अमर करी ।
स्नाने पाप ताप वारी ।
गोडीही दे ॥ज्ञाने.१७.१५.२१९ ॥
गंगेच्या सेवेने हरिभक्तीची खरी गोडी, आवडही निर्माण होते, असा या ओवीत श्री माउलींचा गर्भित अभिप्राय आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे.
कविवर्य जगन्नाथ पंडितांची 'गंगालहरी' आणि श्रीमद् आद्य शंकराचार्यांची दोन गंगास्तोत्रे फार सुंदर आणि सुप्रसिद्ध आहेत. या दशहरा महोत्सवात त्यांचे पठण करण्याची पूर्वापार पद्धत आहे. काही ठिकाणी रोज वाढत्या क्रमाने गंगास्तोत्राची आवर्तने करण्याचीही पद्धत आहे. आज मुद्दाम पठण करण्यासाठी भगवान श्री शंकराचार्यांचे एक गंगास्तोत्र लेखाच्या शेवटी दिलेले आहे. एरवीही ते स्तोत्र म्हणायला हरकत नाही.
भगवती गंगा ही अत्यंत परोपकारी आहे. भगवान श्री माउली, "गंगा काजेवीण चाले ।" अर्थात् ती पूर्णपणे नि:स्वार्थपणे वाहते, असे म्हणतात. तिच्यात स्नान करणाऱ्यांचे पाप-ताप ती नष्ट करते, पूजन करणाऱ्यांना पुण्य प्रदान करते आणि समाधान देते. या तिच्या उपकारांमागे तिचा कोणताच स्वार्थ नाही की अन्य उद्देश नाही. म्हणूनच गंगेला आपण पूजनीय माता, देवता म्हणतो, गंगामैया म्हणतो. मातेसारखे तिला फक्त कल्याणच करणे माहीत आहे. केवळ स्नान, पूजनच नाही, तर तिचे नुसते स्मरण केले तरीही तेच फळ लाभते. यासाठीच आपल्याकडे अंघोळीचा पहिला तांब्या अंगावर घेतला की "हर गंगे भागीरथी" असे म्हणायला लहानपणापासूनच शिकवले जात असे. आजच्या पिढीलाही हे आपण आवर्जून शिकवायलाच पाहिजे.
गंगा भारतीयांच्या मनी-मानसी अशी स्थिरावलेली आहे, आपले अंगांग व्यापून राहिलेली आहे. त्यामुळे आपल्या साध्या साध्या उपमांमध्येही गंगेचा संदर्भ येतोच. "झाले गेले गंगेला मिळाले" हे एक उदाहरण. गंगेला मिळाले म्हणजे साजरे झाले किंवा सार्थक झाले, वाया नाही गेले ; अशी आपली त्यामागची भावना असते.
या परमपावनी पुण्यसरितेची स्तुती करताना भगवान श्री माउली म्हणतात, 
कां फेडीत पाप ताप ।
पोखित तीरींचे पादप ।
समुद्रा जाय आप ।
गंगेचें जैसें ॥ज्ञाने.१६.३.१९९॥
लोकांचे पाप-ताप फेडीत, तीरावरच्या वृक्षांचे पोषण करीत गंगेचे पाणी समुद्राला जाऊन मिळते." म्हणूनच 'जगाच्या कल्याणा भगवंतांची गंगा विभूती', असे आपण आदराने, प्रेमाने म्हणून गंगामैयाच्या चरणीं नतमस्तक होऊ या !!
भगवान महाविष्णूंनी बळीराजाच्या उद्धारासाठी श्रीवामन अवतार धारण केला. त्यावेळी बळीच्या यज्ञशाळेत प्रकट होताना त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने ब्रह्मांडाचे कवच भेदले गेले आणि ब्रह्मांडाच्या बाहेरची जलधारा त्यांच्या चरणांना स्नान घालून आत आली. त्यांच्या चरणांवर लावलेल्या केशरामुळे तिचा रंग लाल झाला. हीच ती त्रिलोकपावनी भगवती गंगा होय. त्यामुळे तिला 'भगवत्पदी' किंवा 'विष्णुपदी' देखील म्हणतात. या धारेचा नुसता स्पर्श जरी झाला तरी संसारातील सर्व पापे नष्ट होतात, अशी शास्त्रांची मान्यता आहे.
भगवती गंगा ही स्वर्गलोक, मृत्युलोक व पाताळलोक अशा तिन्ही लोकांमधून प्रवास करते म्हणून तिला 'त्रिपथगामिनी' म्हणतात. राजा भगीरथाने शापाने मृत झालेल्या आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी प्रचंड तपश्चर्या करून भगवान श्रीशिवांना प्रसन्न करून घेऊन गंगा पृथ्वीतलावर आणली. त्यामुळे तिला 'भागीरथी' असेही म्हणतात. पुढे एकदा जन्हू ऋषींचा यज्ञ गंगाप्रवाहात सापडला. त्यामुळे विघ्न होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या तपोबलाने हा गंगाप्रवाह संपूर्ण गिळून टाकला. नंतर त्यांची मांडी फाडून ती पुन्हा प्रकट झाली. तेव्हापासून जन्हूंची कन्या म्हणून तिचे नाव 'जान्हवी' असे पडले. थोर भगवद्भक्त आणि महाभारत युद्धातील महावीर भीष्माचार्य हे श्रीगंगेचेच पुत्र होत. 
या भगवती गंगेच्या पावन जलाला, भक्तश्रेष्ठ ध्रुव, सप्तर्षी, सनकादिक महात्मे, 'तपश्चर्येची आत्यंतिक फलश्रुती' म्हणून मस्तकी धारण करतात. ही गंगानदी स्वर्गलोकातून मग हिमालयावर उतरून भारतवर्षाला पावन करीत समुद्राला जाऊन मिळते. सर्वश्रेष्ठ तपोनिधी भगवान श्रीशिवशंकर देखील, आपल्या आराध्यांचे, भगवान श्रीविष्णूंचे चरणोदक म्हणून या गंगामातेला नित्य आपल्या मस्तकावर धारण करतात. यासाठीच भगवान श्री माउली आदिनाथ भगवान श्रीशिवांचा गौरव करताना म्हणतात की,
करितां तापसांची कडसणी ।
कवण जवळां ठेविजे शूळपाणि ।
तोही अभिमान सांडूनि पायवणी ।
माथां वाहे ॥ज्ञाने.९.२५.३७२॥
तपश्चर्या म्हणावी तर शिवशंकरांच्या तोडीचा दुसरा कोणी नाही जगात, पण तेही अतीव प्रेमादराने आपल्या देवाचे चरणतीर्थ म्हणून गंगामैयाला मस्तकी धारण करतात.
आपल्याकडे प्रत्येक जलस्रोताला गंगाच म्हणण्याचा प्रघात आहे. आम्हां भारतीयांच्या हृदयी गंगेचे जे अनन्यसाधारण स्थान जन्मजात दृढ झालेले आहे, त्याचेच हे द्योतक आहे. शिवाय त्यानिमित्ताने का होईना, पण गंगेचे पुण्यप्रद स्मरण व्हावे, हाच त्यामागचा उद्देश आहे. आयुर्वेदातही अंतरिक्षजलाला 'गंगाजल'च म्हटले जाते. आम्हां भारतीयांसाठी गंगामैया ही केवळ नदी नाही ; ती आमची पूजनीय देवता, आमची जीवनरेखा आहे ! तिच्या नुसत्या सप्रेम स्मरणानेही आमची सर्व पापे नष्ट होतात अशी आमची अढळ श्रद्धा आहे. म्हणूनच मृत्युसमयी तिच्या तीर्थाचा एक थेंब तरी पोटात जावा यासाठी आम्ही भारतीय धडपडतो. 
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचेही गंगामैयावर नितांत प्रेम आहे. म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी गंगेसंबंधी अतिशय सुंदर उपमा योजलेल्या आहेत. आज आपण सद्गुरु श्री माउलींच्या काही निवडक मनोहर उपमांच्या माध्यमातून या लेखाद्वारे, भगवती श्रीगंगेची 'शब्दपूजा' बांधून, त्या हरिपदपाद्य गंगातीर्थाच्या स्मरणाने पुण्यपावन होत आहोत.
भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंनी गीतेच्या दहाव्या अध्यायात आपल्या पंच्चाहत्तर विभूती सांगितलेल्या आहेत. त्यात ते, सर्व वाहणाऱ्या ओघांमध्ये गंगा ही माझी विभूती आहे, असे म्हणतात. भगवान श्री माउली त्यावर भाष्य करताना म्हणतात,
पैं समस्तांही वोघां - ।
मध्यें जे भगीरथें आणिली गंगा ।
जन्हूनें गिळिली मग जंघा - ।
फाडूनि दिधली ॥ज्ञाने.१०.३१.२५६॥
ते त्रिभुवनैकसरिता ।
जान्हवी मी पांडुसुता ।
जळप्रवाहा समस्तां - ।
माझारीं जाणें ॥ २५७ ॥
समस्त जळप्रवाहांमध्ये, राजा भगीरथाने मोठी तपश्चर्या करून आणलेली आणि राजा जन्हूने गिळून आपली मांडी फाडून बाहेर काढलेली, स्वर्ग-मृत्यू-पाताळ अशा तिन्ही लोकांना पावन करणारी भगवती गंगा ही माझीच विभूती जाण, असे श्रीभगवंत अर्जुनाला सांगतात. देवी भागवतामध्ये मूलप्रकृती भगवती श्रीराधाजींच्या दहा विशेष विभूती सांगितलेल्या आहेत, त्यांमध्ये भगवती श्रीगंगेचा समावेश आहे.
आजच्या दशमीला होणारे "गंगावतरण" ही नुसती कथा नाही. त्यात गूढ योगार्थही आहे. त्यावर भाष्य करताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'साधनजिज्ञासा' या प्रश्नोत्तरांच्या अद्भुत ग्रंथात म्हणतात, "गंगेच्या अवतरणाचे जे हे प्रतीक आहे ते सद्गुरुतत्त्वाचेच कार्य-रूपक आहे. श्रीभगवंतांच्या चरणांतून निघालेली त्यांची कृपाशक्तिरूपी गंगा हीच ते शिवरूप सद्गुरुतत्त्व धारण करते ; आणि तेथून मग ती लोकांच्या पापक्षालनासाठी प्रवाहित होते. भगवान शिवांनी त्या मूळ कृपाशक्तीचा ओघ लीलया धारण केलेला असतो ; व त्यासाठी ते सद्गुरूच केवळ समर्थ असतात. श्रीभगवंतांच्या चरणांपासून ती शक्ती भगवान शिवांपाशी येते. ती त्यांच्या जटेत जाऊन नंतर त्यांच्या हृदयात प्रकटते ; आणि त्यांच्या हृदयातून निघून ती सर्व प्राणिमात्रांचे कल्याण करते. गंगावतरणाचे हे रूपक श्रीसद्गुरुतत्त्वाचे रहस्य आहे व हीच शक्तिपात दीक्षेचीही एक निगूढ पद्धत देखील आहे !"
आजवर झालेल्या यच्चयावत् सर्व महात्म्यांनी, साधुसंतांनी आणि ऋषिमुनींनी भगवती श्रीगंगेची स्तुती व सेवा केलेली आहे. सर्व साधू आयुष्यात कधी ना कधी या गंगामातेच्या पावन जलात स्नान करून पवित्र झालेले आहेत. गंगेचे पूजन, वंदन करणे हे सर्वांनीच आपले कर्तव्य मानलेले दिसून येते. याचे कारणही तसेच आहे. श्रीगंगामैया ही परमाराध्य भगवान श्रीमहाविष्णूंचे श्रीचरणतीर्थ आहे आणि म्हणूनच वैष्णवांसाठी ती सदैव पूज्य, सदैव सेव्य आहेच. श्री रामकृष्ण परमहंस तर "गंगावारि ब्रह्मवारि" असे म्हणत असत. गंगाजल हे प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे, अशीच त्यांची धारणा होती. श्रीगंगेच्या दर्शनाने, सप्रेम स्मरणानेही आमचे पाप-ताप नष्ट होतात व साधुसंतांना समाधान लाभते. जेवढी आपली ही श्रद्धा दृढ असेल, तेवढे अधिक फलही मिळेलच.
आज ज्येष्ठ मासातील या गंगा दशहऱ्याच्या पावन पर्वावर, श्रीगंगामैयाच्या पुण्यदायक स्मरणात तिच्या चरणीं नतमस्तक होऊ या आणि मनानेच तिचे स्नान करू या. भगवान श्री शंकराचार्य आपल्या गंगास्तोत्रात प्रार्थना करतात की, "हे माते गंगे, हरिहराद्वैतात्मक अशी शाश्वत भक्ती आमच्या हृदयात, तुझ्या कृपेने प्रकट होऊन स्थिर होवो व तुझ्या तीरावरच आनंदाने हरिस्मरणात शेवटचा श्वास घेऊन माझा देहपात होवो !" हीच प्रार्थना आपणही मनोभावे व्यक्त करून, 'जयगंगे जय मातर्गंगे जय जय जान्हवी करुणापाङ्गे ।' असा तिचा नामगजर करून दहा प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळवून पावन होऊ या !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
*******************
ll श्रीगंगास्तोत्रम् ll
देवि सुरेश्वरि भगवति गंगे
त्रिभुवनतारिणि तरलतरंगे ।
शंकरमौलिविहारिणि विमले
मम मतिरास्तां तव पदकमले॥१॥
जय गंगे जय मातर्गंगे ।
जय जय जान्हवी करुणापाङ्गे ॥ध्रु.॥
भागीरथि सुखदायिनि मात-
*स्तव जलमहिमा निगमे ख्यात: ।
नाहं जाने तव महिमानं
पाहि कृपामयि मामज्ञानम् ॥२॥
हरिपदपाद्यतरंगिणि गंगे हिमविधुमुक्ताधवलतरंगे ।
दूरीकुरु मम दुष्कृतिभारं
कुरु कृपया भवसागरपारम् ॥३॥
तव जलममलं येन निपीतं
परमपदं खलु तेन गृहीतम् ।
मातर्गंगे त्वयि यो भक्त:
किल तं द्रष्टुं न यम: शक्त: ॥४॥
पतितोद्धारिणि जान्हवि गंगे
खण्डितगिरिवरमण्डितभंगे ।
भीष्मजननि हे मुनिवरकन्ये पतितनिवारिणि त्रिभुवनधन्ये ॥५॥
कल्पलतामिव फलदां लोके
प्रणमति यस्त्वां न पतति शोके ।
पारावारविहारिणि गंगे
विमुखयुवतिकृततरलापांगे ।।६।।
तव चेन्मात: स्रोत: स्नात:
पुनरपि जठरे सोsपि न जात: ।
नरकनिवारिणि जान्हवि गंगे
कलुषविनाशिनि महिमोत्तुंगे ॥७॥
पुनरसदंगे पुण्यतरंगे
जय जय जान्हवि करुणापाङ्गे ।
इन्द्रमुकुट मणिराजितचरणे
सुखदे शुभदे भृत्यशरण्ये ॥८॥
रोगं शोकं तापं पापं
हर मे भगवति कुमतिकलापम् ।
त्रिभुवनसारे वसुधाहारे
त्वमसि गतिर्मम खलु संसारे ॥९॥
अलकानन्दे परमानन्दे
कुरु करुणामयि कातरवन्द्ये ।
तव तटनिकटे यस्य निवास:
खलु वैकुण्ठे तस्य निवास: ॥१०॥
वरमिह: नीरे कमठो मीन:
किं वा तीरे शरट: क्षीण: ।
अथवा श्वपचो मलिनो दीन-
स्तव न हि दूरे नृपतिकुलीन: ॥११॥
भो भुवनेश्वरि पुण्ये धन्ये
देवि द्रवमयि मुनिवरकन्ये ।
गंगास्तवमिमममलं नित्यं
पठति नरो य: स जयति सत्यम् ॥१२॥
येषां हृदये गंगाभक्ति-
स्तेषां भवति सदा सुख मुक्ति:।
मधुराकान्तापञ्झटिकाभि:
परमानन्द कलितललिताभि: ॥१३॥
गंगास्तोत्रमिदं भवसारं
वांछितफलदं विमलं सारम् ।
शंकरसेवक शंकररचितं
पठति सुखी स्तव इति च समाप्त: ॥१४॥
जय गंगे जय मातर्गंगे।
जय जय जान्हवी करुणापाङ्गे ।।
॥ इति श्रीमदाद्य शंकराचार्य विरचितं श्रीगंगास्तोत्रम् ॥
( http://rohanupalekar.blogspot.in )

15 May 2020

महान गायक गंधर्वराज श्री तुंबरु



आज वैशाख कृष्ण अष्टमी. ही तिथी गंधर्वांतील सर्वश्रेष्ठ गायक आणि भगवद्भक्त श्री तुंबरु यांची जयंती.
आपण विविध अभंगांमधून, स्तोत्रांमधून वाचतो की, श्रीभगवंतांपुढे नारद आणि तुंबरु यांनी सामगायनाची सेवा केली. देवर्षी श्री नारदांचे चरित्र त्यामानाने प्रसिद्ध आहे, पण या जोडीतील श्री तुंबरु याच्या बद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. आज त्यांच्या जयंतीदिनी आपण श्री तुंबरु यांच्याबद्दल जाणून घेऊ या.
महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी प्रधा यांच्या चार गंधर्व-पुत्रांपैकी तुंबरु हे एक होत. हे गंधर्वांचे राजे मानले जातात. अत्यंत मधुर गळा व गानकलेतील अद्वितीय अधिकार ही श्री तुंबरु यांची वैशिष्ट्ये होत. म्हणूनच स्वर्गातील तसेच धनाधिपती कुबेराच्या दरबारातील सर्वश्रेष्ठ गायक म्हणून श्री तुंबरूंचा प्राचीन ग्रंथांमधून उल्लेख येतो.
भगवान श्रीशिवशंकरांची उपासना करून तुंबरु यांनी घोड्याचे मुख, त्रिखंडात मुक्त संचाराचा अधिकार, गायनकलेतील सर्वश्रेष्ठत्व आणि अमरत्व(दीर्घजीवित्व) असे वर प्राप्त करून घेतले होते. आपल्या गायनाला साथ करण्यासाठी तुंबरु एका हातात वीणा व दुसऱ्या हातात चिपळ्या धारण करतात. यांचे भक्तिरसपूर्ण गायन भगवान श्रीविष्णू, भगवान श्रीशंकर व इंद्रादी देवतांना अतिशय आवडते. त्यामुळेच महान स्वर्गीय गायक म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत.
रंभा या अप्सरेचे तुंबरु हे गायनगुरु मानले जातात. तसेच काही ठिकाणी त्यांना तिचे पती देखील म्हटलेले आहे. 
श्रीमद्वाल्मीकि रामायणातील अरण्यकांडात सुरुवातीलाच श्री तुंबरूंची एक कथा येते. एकदा रंभेमध्ये आसक्त झाल्याने तुंबरु कुबेराच्या दरबारात वेळेवर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे रागावलेल्या कुबेराने त्यांना राक्षस होण्याचा शाप दिला. त्यांनी प्रार्थना केल्यावर, "भगवान श्रीरामांच्या हातून मृत्यू येऊन तुझी राक्षसजन्मातून सुटका होईल", असा कुबेराने उश्शाप दिला. त्या शापानुसार तुंबरु दंडकारण्यातील 'जव' नावाच्या राक्षसाच्या 'शतह्रदा' नावाच्या पत्नीच्या पोटी 'विराध' नावाने जन्माला आले. तपश्चर्या करून त्यांनी भगवान ब्रह्मदेवांकडून 'कोणत्याही शस्त्राने मृत्यू येऊ नये' असा वर मिळवला. विराध अत्यंत गलिच्छ दिसणारा, प्रचंड ताकदवान व दंडकारण्यातील ऋषिमुनींचे मांस भक्षण करणारा भयानक राक्षस बनला होता.
भगवान श्रीराम, श्री लक्ष्मण व सीतामाता दंडकारण्यात प्रवेशल्यानंतर लगेचच त्यांचा विराधाशी सामना झाला. विराधाने सीतामातेला पकडले व तो श्री रामरायांना म्हणाला, "तुम्ही वेषावरून तापसी दिसता आणि तरुण स्त्री व धनुष्यबाण घेऊन फिरता ? हा खोटेपणा झाला तुमचा. आता या तरुण स्त्रीला मी माझी पत्नी बनवणार आहे, तुम्ही जीवाचे भय असेल तर इथून निघून जा, नाहीतर मरायला तयार व्हा !"
विराधाने सीतामातेला पकडल्याचे पाहून भगवान श्रीरामरायांना अनावर क्रोध आला. त्यांनी व लक्ष्मणाने विराधाबरोबर युद्ध केले. भगवान श्रीरामरायांनी अत्यंत तीक्ष्ण असे सात बाण सोडले, त्या बाणांनी विराध जखमी झाला पण मेला नाही. कारण तसा त्याला वर होता. तोही चिडून आपले त्रिशूल घेऊन धावून आला. त्याचा शूल श्रीरामरायांनी बाणांनी मोडून टाकला. मग श्रीराम-लक्ष्मणांनी दोन धारदार तलवारी घेऊन विराधावर चढाई केली. विराधाने आपल्या लांब हातांनी दोघांना पकडले, श्रीरामराय व लक्ष्मणांना त्याने आपल्या खांद्यावर बसवले तो दुसऱ्या वनात जाऊ लागला. हे पाहून सीतामाता विलाप करू लागल्या. त्यांच्या रडण्याने क्रुद्ध झालेल्या या दोघांनी विराधाचे दोन्ही हात छाटून टाकले. त्यासरशी तो विराध मूर्च्छित होऊन कोसळला. त्याला रामरायांनी भरपूर बडवले, आपटले, पण तरीही तो मेला नाही. मग त्याच्या गळ्यावर पाय देऊन श्रीरामराय लक्ष्मणांना म्हणाले की, "याच्यासाठी मोठा खड्डा खोद. हा शस्त्राने मरणार नाही, याला असेच पुरून टाकले पाहिजे." 
श्रीरामरायांचे हे वाक्य ऐकून विराध विनम्रपणे त्यांना म्हणाला, "देवा, आपण इंद्रासमान पराक्रमी आहात. मी आपल्या हातून मृत्यू आल्याने या योनीतून सुटेन. मला तसाच उश्शाप मिळालेला आहे. मी आपल्याला आधी ओळखले नाही, त्याबद्दल क्षमा करा !" असे बोलून त्याने आपली सर्व कथा सांगितली. भगवान श्रीरामरायांच्या हातून मृत्यू आल्याने विराधाच्या जन्माला गेलेले तुंबरु पुन्हा आपल्या मूळ रूपात स्वर्गात निघून गेले.
भगवान श्रीविष्णूंचे परमभक्त असलेले श्री तुंबरु हे त्यांचे नित्यपार्षदच आहेत. ते सदैव श्रीभगवंतांची स्तुती गात सेवा करीत असतात. श्रीभगवंतांच्या सर्व अवतारांमध्ये श्री तुंबरूंनी सेवा केलेली आहे. महाभारत युद्धाचे ते प्रत्यक्षदर्शी मानले जातात. त्यांनी अर्जुनाला गंधर्वांचे शस्त्र आणि शिखंडीला रथाचे घोडे दिल्याचा संदर्भ आहे. धर्मराज युधिष्ठिरांच्या अश्वमेध यज्ञातही त्यांनी शंभर घोडे दिल्याचा महाभारतात उल्लेख आहे.
स्वर्गीय श्रेष्ठ गायक व थोर भगवद्भक्त अशा श्री तुंबरूंना जयंती निमित्त सादर साष्टांग दंडवत !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481