14 May 2018

उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें

 उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें 

भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज  श्रीसद्गुरूंचे महिमान वर्णन करण्यातली आपली असमर्थता सांगताना म्हणतात, "सूर्याला उटणे लावून अजून तेजस्वी करावे किंवा क्षीरसागरालाच पाहुणेर करावा, त्याची सरबराई करावी किंवा चंदनालाच अाणखी कशाने तरी चर्चावे किंवा अमृताला अजून रांधावे; त्याप्रमाणेच सद्गुरूंचे महिमान गाणे होय. कारण, "तैसे श्रीगुरूंचे महिमान । आकळितें कें असे साधन । अहो, सद्गुरूंचे महिमान जाणण्याचे साधनच उपलब्ध नाही, मग ते गाणार तरी कसे बरे? तेथे केवळ दंडवतच घालता येतो व तेच त्यांचे यथार्थ आराधन होय ! हे जाणोनियां नमन । निवांत केलें ॥ज्ञाने.१०.०.१३॥ त्यांच्या श्रीचरणी उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें ॥ज्ञाने.१०.०.१५॥ असा दंडवत घालण्यातच खरोखर आपले भले आहे !"
आज वैशाख कृष्ण चतुर्दशी, आमचे भगवंत प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे व प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे या सद्गुरुद्वयींची पुण्यपावन जन्मतिथी होय. म्हणूनच, सद्गुरु माउलींच्या सांगण्यानुसार त्यांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
प.पू.श्री.दादा व प.पू.सौ.ताईंबद्दल काय आणि किती बोलणार? गेल्या चोवीस वर्षांतल्या त्यांच्या अनंत अनुभूती, माझ्या हृदयीच्या नित्यसुगंधित कोप-यात सतत आनंदाने दरवळत आहेत. त्या आठवणींचा सहवास हाच माझ्यासाठी धनाधिपती कुबेरालाही तुच्छ मानायला लावणारा अनर्घ्य खजिना आहे; कितीही वेळा त्यातून काढले तरी कधीच कमी न होणारा ! आज त्या खजिन्याच्या गाभेवनात मनसोक्त विहरण्याचाच दिवस आहे; आणि मी मनोमन त्याचा पुरेपूर आस्वाद घेतच आहे.
आमच्या या सद्गुरुद्वयीविषयी गेल्यावर्षी एक छोटा लेख लिहिला होता. तोच पुन्हा शेयर करीत आहे. खालील लिंकवरील तो लेख वाचून आपणही त्यांच्या स्मरणाच्या आनंदात सहभागी व्हावे हीच सादर प्रार्थना. संतांचे स्मरण हेच त्यांच्या कृपेचे अनुसंधान आहे, त्यांच्या कृपेच्या प्राप्तीचे साधन आहे. म्हणून तेच आपल्यासाठी सतत अनुष्ठेय देखील आहे.
आपल्या अभंगशतक संग्रहातील एका मधुर अभंगात, सद्गुरुकृपा झाल्याची, सद्गुरुचरण घरी आल्याची आपली विलक्षण अनुभूती फार गोड शब्दांत सांगताना पू.दादा म्हणतात,
कवण पुण्य सुखावले, घरा आली गुरुपाऊले ॥१॥
अवघा आनंदी आनंद, अंगी भिनला रसछंद ॥२॥
गुरुचरणा प्रेममिठी, संसाराची ताटातुटी ॥३॥
आता नाचावे स्वानंदे, नयनी नीर वाचा स्फुंदे ॥४॥
म्हणे अमृता डुल्लावे, दास्य सुख नित भोगावे ॥५॥
पू.सौ.ताईंच्या व पू.श्री.दादांच्या पावन जन्मदिनी, त्या दास्यसुखात आनंदाने डुलण्याचे, त्या स्वानंदातच रममाण होऊन अष्टसात्त्विकाने डंवरून येऊन त्या अलौकिक श्रीरसराजांचा अद्भुत रसछंद अंगभर लेण्याचे देवदुर्लभ सौभाग्य आम्हांलाही कृपापूर्वक द्यावे हीच कळकळीची प्रार्थना त्यांच्या श्रीचरणी करतो आणि त्यांच्या पावन नामगजरात तेथेच तुलसीदलरूपाने विसावतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
जीव ऋणवंत होई त्यांचा 
https://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_24.html?m=1

0 comments:

Post a Comment